पण तो मुसलमान नव्हता..

Submitted by सई केसकर on 6 March, 2017 - 11:53

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.

या अशा लॉजिकचा ज्यांच्या जवळच्यांचा जीव गेला आहे अशाना काहीच उपयोग नसतो. बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी ओबामा सरकारने बरेच लॉबिंग केले होते. ओबामा सरकारच्या काळात सँडी हुक (कनेटिकट) मध्ये असेच अमानुष हत्याकांड घडले होते, आणि तिथे तर १० वर्षांखालील मुलांवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. तेव्हा बाराक ओबामांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. कोणालाही हलवून टाकेल असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे बंदूक वापरायचा परवाना मिळवणे कठीण केले पाहिजे इथपर्यंत तरी चर्चा झाली होती.

पण असे प्रसंग घडतात आणि विसरले जातात. भारतीयांविरुद्ध असे चुकून हेट क्राईम्स ९/११ नंतर देखील झाले होते. यात शीख लोकांचे नाहक बळी गेले. पण मुस्लिम समजून चुकून मारले गेले असले तरी असा द्वेष करणाऱ्या माणसाच्या हातात बंदूक द्यावी, आणि ती बाळगणे हा त्याचा मूलभूत हक्क असावा हा मोठा विरोधाभास आहे.

अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे. कारण भौगोलिक ज्ञानाच बघायचे असेल तर सामान्य भारतीय माणसापुढे एक फ्रेंच आणि एक अमेरिकन उभा केला तर त्या दोघांनाही गोरे नाहीतर फिरंगी हे एकच विशेषण लागू होते. आपल्या पैकी किती लोकांना सुन्नी, शिया, बोहरी, बहाई, सुफी अशा सगळ्या प्रकारच्या मुस्लिम पंथांची माहिती असते? किती जणांना ज्युईश लोकांचे अंतर्गत पंथ, जसे की हेसिडिक आणि झियोनिस्ट यातला फरक समजतो? कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन, मेथाडिस्ट, मॉर्मन असे ख्रिश्चन धर्माचे विभाग माहिती असतात?

एवढेच काय, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात. तसेच मणिपूर, मिझोराम, आसाममधून येणाऱ्यांना नेपाळी नाहीतर चिनी करून टाकतात. फरक एवढाच की ज्या लोकांना यांचा "त्यांच्या राज्यातील नोकऱ्या" चोरल्याबद्दल राग येतो, त्यांच्या हातात भारतीय सरकारनी कायदेशीर बंदुकी दिलेल्या नसतात.

आणि याही पुढे जाऊन, जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना या घटना घाबरवून टाकतात आणि अस्थिर करतात कारण गोळ्या झाडायची आधी कुणी त्यांचा पासपोर्ट बघायला किंवा धर्म विचारायला येत नाही. त्यांची पहिली ओळख म्हणजे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि मध्य पूर्वेतील लोकांशी साधर्म्य असणारा त्यांचा रंग.

ट्रम्पच्या आधीचे ओबामा सरकारदेखील इमिग्रेशनबद्दल अतिशय कडक होते. ९/११ नंतर अमेरिकेने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी "व्हिसा मँटिस" हा सिक्युरिटी चेक सुरु केला होता. "स्टेम"(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक शास्त्रद्यांना या पॉलिसीचे फटके बसले आहेत. पण सुरक्षेसाठी काही निष्पाप लोकांचे थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर पण आतंकवादी अमेरिकेत येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू होता. असे असतानादेखील ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले.

पण उघडपणे मुस्लिमांविरुद्ध आणि परदेशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांबद्दल इतक्या त्वेषाने बोलणारा ट्रम्प हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे. जरी "हिंदूंवर" त्यांची मेहेरनजर असली, तरी अशी धर्मीक असहिष्णुता, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील फरक बघून दाखवली जाणार नाही हे ही एक सत्य आहे. ब्रेक्झिटच्या मतदानाच्यावेळी सुद्धा भारतीय लोकांनी इतर (मुस्लिम) लोकांचे ब्रिटनमध्ये स्थलांतर थांबवायच्या बाजूने मतदान केले होते. तसेच अमेरिकेतील श्रीमंत भारतीयांनी ट्रम्पसाठी प्रचार आणि मतदान केले. पण जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण करून एखादा नेता निवडून येतो, तेव्हा त्यांनी मतदानाच्या काळात टाकलेली एक ठिणगी पुढे कधी आणि किती अक्राळविक्राळ रूप धारण करेल याचा अंदाज त्या नेत्यालादेखील नसतो.

जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या जमातीविरुद्ध केलेल्या नकारात्मक प्रचाराचे पडसाद सगळ्यांवरच पडण्याची भीती आहे. आणि म्हणून निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे. प्रचारातही आणि सोशल मीडियावरही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरारा, तुमचे मुक्तचिंतन फारच मुक्त असल्याने काय गोळाबेरीज लक्षात आली नाही. आज मुसलमान धर्मीयांचे अतिरेकी असण्यात प्रमाण जास्त आहे याचा आणि त्या धर्माचा काही संबंध नाही असे म्हणायचे असेल तर त्याला पूर्ण अनुमोदन. आज मुसलमान आहेत, पुर्वी ख्रिश्चन क्रुसेड आणि इन्क्विझिशन्स होते. त्याचवेळी हिंदुस्तानात जुलमी सनातनी धर्म होते जे एका मोठ्या जनसमुदायाला पशुवत वागणूक देत होते, चीनमध्ये वा जपानमध्येही जुलुमी राजवटी होत्या ज्यात सामान्य जनता भरडली जात असे.

आज मुसलमान वा मिडल इस्ट अतिरेकी कारवायांमध्ये जोरदार आहे याला जसे भूराजकीय (जिओपॉलिटिकल) कारण आहे तेच कारण क्रुसेड्सना देखील होते. ख्रिश्चनांनी विशेषतः रोमन कॅथालिक चर्चने आपला खुंटा बळकट करायला व पवित्रभूवर त्यांच्या मते झालेल्या मुस्लिम आक्रमणाविरुद्ध क्रुसेड्स उघडल्या. त्यांनी ते केले नसते तर तुर्कांनी त्यांच्यावर हल्ले चढवले असतेच. या काळात तुर्की साम्राज्य व युरोपीयन चर्च पुरस्कृत क्रुसेड्स यांच्या दक्षिण्/पूर्व युरोप काबीज होणे, दुष्मनांच्या हातात जाणे होतच राहिले. दक्षिण स्पेनपासून पार आत हंगेरीपर्यंत तुर्की आक्रमणाच्या खुणा दिसतात. शेवटी तो साम्राज्याचा लढा होता. मुसलमान निरागस आणि ख्रिश्चन क्रुसेडर्स कसे त्यांच्यावर गेली १००० वर्षे अत्याचार करत आहेत हे तर एकद आयसिसी तर्कट झाले. जगातला आजचा दहशतीचा भस्मासूर व मुसलमान धर्म यांचा संबंध नसला तरी जगातील बहुतांश दहशतवाद मुसलमान राष्ट्रातून उगम पावतोय हे तर सत्य आहे.

पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात प्रामुख्याने ख्रिस्चन लढले असले तरी धर्म हा त्यात मुद्दा नव्हता. दुसर्‍या महायुद्धातला ज्यु विरोध धार्मिक नसून आर्थिक/सामाजिक आणि राष्ट्रीय रंगाचा होता. त्याला चर्चने मान्यता दिली - जर्मनी व इटली दोन्हीमध्ये - पण त्याशिवायदेखील तो विरोध राहिलाच असता. त्याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोविएत रशियात ज्युंना मिळालेली वागणूक. सोविएत रशियातील कुठलेही ज्यु व्यक्तीचे चरीत्र वा ज्यु संबंधित चरित्र वाचल्यास लक्षात येईला की ज्यु असाल तर सोविएत रशियात युनिवर्सिटीतसुद्धा प्रवेश मिळणे अशक्य होते. २०-२५ जागांपैकी एखादी जागा ज्यु विद्यार्थ्यास मिळे भले तो/ती कितीही हुशार असेल. त्यांना पक्षात, सरकारात वरच्या जागा मिळणे, चांगली घरे मिळणे जवळपास अशक्य होते. हीच स्थिती तुलनेने धार्मिक साम्यवादी पोलंडमध्येही होती आणि तुलनेने निधर्मी जनता असलेल्या हंगेरीतही होती. आज हंगेरीत चर्च जवळपास शिल्लक नसले तरी फिदेस या सत्तेत असलेल्या उजव्या पक्षात आणि त्यांच्यापेक्षाही कट्टर झालेल्या जबॉक पक्षात टोकाचा ज्युद्वेष दिसून येतो.

१. त्या क्रूसेड्सपासून मारून टाकायचा प्रयत्न करण्यात आलेल्या मुसलमानांत आजही इतका जोर का आहे? इतके वाईट आहेत तर टिकून का आहेत?
कारण तुर्की साम्राज्य लेचेपेचे नव्हते. क्रुसेड्सनी त्यांना पार नष्ट केले नाही. त्याचप्रमाणे भारतात मुस्लिम आक्रमणे झाली तरी भारतातील जनता पूर्ण मुस्लिम झाली नाही. दोन्हीची कारणे थोड्याफार फरकाने स्थानिक जनता पराजित झाली तरी तिथली संस्कृती अति-आदीम नव्हती, जनता आक्रमकांपेक्षा अगदीच मागास (आर्थिक/सामरीकदृष्ट्या) नव्हती आणि येणार्‍या आक्रमकांच्या रोगराईला इम्युन होती हे पण आहे. या उलट परिस्थिती जिथे होती तिथे स्थानिक संस्कृती वा जनता वा दोन्ही समूळ नष्ट झाले. याचे सर्वोत्तम उदाहरण दक्षिण अमेरिका.

२. आपले हिंदूबंधू नवक्रूसेडी ख्रिश्चनांना सो कॉल्ड सपोर्ट तर करताहेत, पण त्याचवेळी तो फादर स्टेन्स अन तत्सम प्रकरणेही होताहेत.
ये किधर? हिंदूबंधू व त्यांच्या संघटना ख्रिस्चन प्रसारास कधीचाच कडवा विरोध करत आहेत की. आख्खी वनवासी कल्याण सारखी संस्था जिचा सुरुवातीचा प्रेझेन्स पूर्ण मध्यभारतात होता (जगदलपूरचा राजा व.क.आ.चा पहिला प्रमुख होता ना?) , इशान्य भारतात व केरळात संघाचा स्थापनेपासून नेटाने चालू ठेवलेला प्रेझेन्स

{Let us not demotivate our maayboli friends who have invested years building a life in the US.}

तुम्ही जनरल विधान करता तेव्हा ते सगळ्यांना उद्देशून असतं आणि त्या
सगळ्यात आम्ही येतो ज्यांनी उगाच दुसर्‍या राज्यातल्या लोकांना demotivate केलेलं नाही, कोणाची खिल्ली उडवलेली नाही. हा साधा विचार तुम्ही लिहिताना नाही करायला पाहिजे का? की डायरेक जनरल विधानं करायची अन इन्टेन्डेड आडियन्सला गोळी लागली तर ठिक पण इतर संबंध नसलेल्या आडियन्सला गोळी लागून त्यांना अमा प कळा सोसाव्या लागल्या त्याचं काय?

गोळाबेरिज लक्षात न येताच फारच लांबलचक प्रतिसाद आला हे पाहून गहिवरलो.

*

मुसलमान धर्म स्वीकारता येतो, तसाच सोडताही येतो.

आजही इतके देश मुसलमान का आहेत? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. शिवाय कुणी मुसलमान आहे म्हणजे अतिरेकी व माथेफिरूच असेल हे इक्वेशन कुठून येते तेही समजलेले नाही. कारण इतर माथेफिरूंची उदाहरणे तुम्हीच दिलेली आहेत.

याचेच एक्स्टेन्शन, मुसलमानाविरुद्ध कितीही हिंसा, मुसलमानावर कितीही अघोरी अत्याचार केले, तर ते क्षम्यच ठरतात ही विचारधारा कुठून येते?

गोळाबेरिज लक्षात न येताच फारच लांबलचक प्रतिसाद आला हे पाहून गहिवरलो.
>>>
तुम्ही आधीच्या प्रतिसादात गोल मटोल ठोकाठोकीच मोठी केली होती. काय काय धरून लिहिणार.

>>>>

आजही इतके देश मुसलमान का आहेत? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. शिवाय कुणी मुसलमान आहे म्हणजे अतिरेकी व माथेफिरूच असेल हे इक्वेशन कुठून येते तेही समजलेले नाही. कारण इतर माथेफिरूंची उदाहरणे तुम्हीच दिलेली आहेत.
याचेच एक्स्टेन्शन, मुसलमानाविरुद्ध कितीही हिंसा, मुसलमानावर कितीही अघोरी अत्याचार केले, तर ते क्षम्यच ठरतात ही विचारधारा कुठून येते?
>>>
प्रत्येक देशात/समाजात विरोधी गटांना सब-ह्युमन करण्याची भावना वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होते. त्याला तत्कालीन कारणे, तत्कालीन नेतृत्व, समाजाची विचारधारा अश्या अनेक बाबी असतात. प्रामुख्याने दुसर्‍या कुणामुळे तरी मला गरिबीत/पराभवात राहावे लागत आहे हे एक कारण किंवा दुसर्‍या कुणालातरी पशुवत वागवले नाहीतर मी गरीब होईन हे दुसरे कारण.
मनुष्याच्या मूलभूत हक्कांवर आजही अभ्यास करावा अशी टिप्पणी करणारा जेफर्सन स्वतः गुलाम ठेवत असे.
युरोपात ज्युंना मनुष्याचा दर्जा न देण्याचे काम अनेक सत्ताधीशांनी केले, शेवटचा हिटलर. आता पुन्हा निओनाझींचा उदय होत आहे.
आयसिसबरोबर लढणारे येझदी तसेच आयसिसच्या मुसलमान पंथाबाहेरच्या बायकांना मनुष्याचा दर्जा देत नाहीत.
दक्षिण अमेरिकेत जंगलात राहण्यार्‍या ट्राइब्जना पकडून नरबळी म्हणुन वापरले जात असे.
भारतात अस्क्पृष्यांना पशुवत वागणूक दिली जात असे, आजही अनेक जातींमध्ये हा वृथाभिमान खाजगीत दिसून येतो.

तुमचा मुद्दा अजून लक्षात आला नाही.

{{{ आजही इतके देश मुसलमान का आहेत? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. }}}

या प्रश्नाच्या उत्तराने काय सिद्ध होणार? जर होणारच असेल तर इतरही काही असेच प्रश्न -

जगात हिंदू देश किती?
जगात हिंदूबहुल असूनही निधर्मी देश किती?
जगात मुस्लिमबहुल असुनही निधर्मी देश किती?

येऊद्या या प्रश्नांची उत्तरे आणि त्यानुसार सिद्ध होऊ शकणारी गृहीतके.

तोंडी लावायला अजुनही काही उपप्रश्न-

जगात शीख राष्ट्रे किती? (ह्या धर्माच्या अनुयायांची संख्या कायमच अल्प राहिली आहे, पण तरीही यांना जगभर मिळणार्‍या सवलती विचारात पाडायला लावणार्‍या आहेत - जसे की हत्यार बाळगण्याची परवानगी, सैन्यात राहूनही दाढी, लांब केस ठेवण्याची परवानगी इत्यादी)
जगात ज्यू राष्ट्रे किती? जगात पारशी राष्ट्रे किती? (अल्पसंख्य असूनही या धर्मांच्या अनुयायांचा जागतिक अर्थकारणात वरचष्मा दिसून येतो.)

मुद्दा लेखाच्या शीर्षकात आहे, टण्या.
मी फक्त त्या अनुषंगाने लिहितोय.

रच्याकने, मी विचारलेले प्रश्न, मला उत्तरे येत नाहीत म्हणून विचारलेले असतात, असे नसते. पण ऑनेस्ट इन्पुट्स आर ऑल्वेज वेल्कम. दुसर्‍या प्रतिसादात तुम्ही लिहिलेली उत्तरे बरोबर आहेत, असे माझेही मत आहे.

बिपिनचंद्र,
मी मांडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी शोधतो आहे, तसेच इतर कुणाला काही सुचतेय का, तेही पाहतो आहे.
तुम्ही मांडलेले नवे प्रश्न जे आहेत, त्यांची उत्तरे मला ठाऊक नाहीत, पण ती तुम्हाला सापडोत ही सदिच्छा!

>>>जगात ज्यू राष्ट्रे किती? जगात पारशी राष्ट्रे किती? (अल्पसंख्य असूनही या धर्मांच्या अनुयायांचा जागतिक अर्थकारणात वरचष्मा दिसून येतो.)

हा वरचष्मा आहे कारण या धर्मांचे लोक राजकारण्यांच्या नाड्या आपल्या हातात ठेवण्याइतके धनाढ्य होऊ शकले आहेत. आणि आपल्या कम्युनिटीला घट्ट पकडून ठेवण्याची, आणि त्यांचे इंटरेस्ट जपण्याला ते प्राधान्य देतात. हे जसे धार्मिक आहे तसे कम्युनिटी बद्दल आहे. भारतीय गुजराती लोकांची अशीच एकी असते आणि त्यामुळे ते मोठी मोठी कामे साध्य करू शकतात. आणि ओघाने यांचा द्वेषही बराच होतो.

आर्थिक इंटरेस्ट असल्याशिवाय प्राधान्यही दिले जात नाही आणि त्रासही दिला जात नाही. अमेरिकेला मुस्लिम राष्ट्रांमध्ये मसीहा देश बनून जायची जशी सवय आहे, तशी त्यांना आफ्रिकेतील लोकांना मसीहा म्हणून वाचवायची नाही. कारण जिथे जिथे अमेरिका जाते तिथे तेल असतेच. तसेच ज्या लोकांकडून आर्थिक उलाढाली होतात त्यांची लॉबी जपली जाते. मग गरीब वगैरे इलेक्शनच्या वेळेला आठवतात तेवढेच.

आर्थिक इंटरेस्ट असल्याशिवाय प्राधान्यही दिले जात नाही आणि त्रासही दिला जात नाही.

हेच कारण .. अगदी याच कारणाने मुस्लिम राजांचा इतिहास मुद्दाम काळा लिहिला गेलेला आहे, असे वाटते.

Pages