आकाशदर्शन

Submitted by संतोष सराफ on 7 March, 2017 - 08:01
ठिकाण/पत्ता: 
Dahisar, Mumbai

अथांग आभाळाखाली मोकळ्या माळरानावर संपूर्णच्या संपूर्ण रात्र घालवणे ही कल्पनाच खूप मनोहारी आहे.

शहर-उपनगरांत रहाणाऱ्या प्रत्येकाच्या मनांत एक गाव असतं. कधीकाळी त्या विशिष्ट गावी आभाळाकडे पहात मोकळ्या माळरानावर काढलेल्या आंधाऱ्या रात्रींचे क्षण आठवतात.

कोणा भावंडांच्या साथीने अंगणात आजी आजोबांच्या कुशीत झोपी जाताना ऐकलेल्या नक्षत्रांच्या गोष्टी मनांत रुंजी घालतात.

तो धृव तारा, त्याच्या भोवती रिंगण घालणारे सप्तर्षि, त्यांच्या बरोबरची अंधूकशी अरूंधती. धृव ताऱ्याच्या अढळपणाची ऐकलेली गोष्ट, जुन्या लोकांनी सांगीतलेल्या धूमकेतूंच्या रोमांचक कहाण्या, राहू-केतूंच्या चंद्रसूर्याला ग्रहण लावण्याच्या साक्षी हे सगळं कसं मनांत घर करून बसलेलं असतं.

पण आता मात्र अश्या अंधाऱ्या आकाशाच्या दर्शनाचे योग येतच नसतात. ऊंच ईमारतींच्या झाकोळात आणि रात्रीच्या कृत्रिम झगमगाटात आभाळातले ते निसर्गाचे मुक्त उधळण कसे दिसणार? आणि येत्या पिढीला जर ते दिसलंच नाही तर त्याचं आकर्षण कसं निर्माण होणार?

आमच्या पिढीच्या लोकांना मात्र नेहमी बा.सी. मर्ढेकरांसारखे ‘कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो...’ असे वाटत रहाते.

वाटते, ठरवून असे शहराच्या दूर जावे. सायंकाळी ठरलेल्या माळावर अंग झोकून द्यावे. पश्चिमेचा लालिमा गडद होताना एकेक तारका स्पष्ट होते. तिचे मर्म जाणून घ्यावे. पूर्वजांच्या अडचणींना वाट दाखवणाऱ्या या तारका-नक्षत्रांच्या भाषा आपणही समजाऊन घ्याव्यात.

पण असे योग हे एकट्याने ठरवण्याचे नसतातच मुळी. असे ठरवून माळावर भेटणे कसे फ्रुटफुल झाले पाहिजे. आजच्या वेगवान आयुष्यात एखादी रात्र फुकट घालवणे परवडते थोडीच? त्या एकाच रात्री शक्य असेल तितक्या आभाळाचे दर्शन झाले पाहिजे. त्यातले आधुनिक विज्ञानातले बारकावे इतिहास-पुराणातल्या संदर्भांसकट समजले पाहिजेत.

आणि त्यासाठी सज्ज असतात ती आकाशदर्शन घडवणारी तज्ज्ञ मंडळी.

मला आठवतं, पहिल्यांदा जेंव्हा हा असा कार्यक्रम मी अटेंड केला तेंव्हा अत्यंत भारावून गेलो होतो. म्हणजे तारांगणात शो पहाणे वेगळे आणि असे खुल्या आकाशात रात्रभर डोकावणे वेगळे हे जाणवले.
एखाद्या संगीताच्या मैफिलीला रंग चढावा तसा या कार्यक्रमाला रंग चढतो अक्षरश:. त्यातून तज्ज्ञ मंडळी उत्तम समालोचक असतील तर क्या बात है!

बाळ पंडितांची लहानपणी ऐकलेली क्रिकेटची मराठी कॉमेंटरी आठवते? समालोचन? तसे कहाण्या रंगवून सांगणारे समालोचक हवेत.

हल्लीच विकसित झालेला तो लेझर टॉर्च सर्वदूर पटांगणावर पसरलेल्या श्रेते वर्गाला एकाच बिंदूकडे पहायला लावायला मदत करतो. मग या समालोचकापासून आपले अंतर कुठेही असो. आपल्याला त्याने जणू एखाद्या विशिष्ठ तारकेवरच बोट ठेवले आहे असे जाणवते.

माहिती आणि आकाश पुढे पुढे सरकत रहाते. उत्तरेकडचा तो ध्रुव मात्र साथ सोडत नाही. दुष्ट ढग शहाण्या खलनायकाप्रमाणे अनुपस्थित राहिले तर कमीत कमी चोवीस नक्षत्रांची दिमाखदार परेड खरोखर चुकवू नये अशी असते.

यात अधूनमधून भल्या मोठ्या दुर्बिणींतून ग्रह-तारे पहावयास मिळतात. कधी शुक्राची कोर तर कधी गुरुचे विलोभनीय दर्शन. त्याची उपग्रह मंडळी. कधी शनीची कडी तर कधी दूरस्थ नेब्युला. कधी कोणता तारका गुच्छ तर कधी एखादा द्वैती तारा.

आपल्याकडे त्यामानाने अवेअरनेस कमी असल्याने हे कार्यक्रम क्वचित होतात. आणि उपनगरे इतकी दूरवर पसरल्याने हल्ली पूर्वीच्या आकाशदर्शनांच्या जागा प्रकाश प्रदूषित झाल्यात.

हौशी मंडळी मात्र अजूनही योग्य जागा शोधतातच. कितीही अडचणीचे असेल तरी लोकांना विनासायास डेस्टिनेशनवर पोहोचवतातच. आणि सायंकाळी सातच्या सुमारास खेळ सुरु करतातच.

अश्या कार्यक्रमांच्या शोधात असणार्यांनी सहसा या मंडळांचा पूर्वानुभव लक्षात घेऊनच कार्यक्रमास जावे. मी पूर्वी खगोल मंडळाच्या कार्यक्रमास आवर्जून वर्णी लावत असे. त्याचे कारण म्हणजे त्यांची तज्ज्ञ मंडळी.

तो काळ देखील तसाच होता. विसेक वर्षांपूर्वी वांगणीची रात्र अंधारी असे. हल्लीची कल्पना नाही; पण आमच्या भागातून लहान मुले आणि फ्यामिली घेऊन ट्रेनने प्रवास करणे फार जिकीरीचे झाले आहे.

त्यामुळे अश्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांनी आपापल्या भागातील मंडळ निवडणे उत्तम. कारण त्यामुळे जाण्या-येण्याची योग्य सोय होते.

तिथे जाताना सहसा खूप सामान न्यावे लागणार नाही ना हे पहाणे गरजेचे असते. त्यामुळे नाश्ता, जेवण याची सोय मंडळ करत असेल तर फार बरे.

स्थळ एखादे शांत रिसॉर्ट निवडावे कारण मग स्वच्छतागृहे चांगली असण्याचा प्रश्न सुटतो. रात्री बेरात्री काही सेवा-मदत हवी असल्यास स्टाफ हजर असतो.

स्थळ अती लांब नको. तासाभरात जागेवर पोहोचणे उत्तम. पण फार जवळ असले की प्रकाश प्रदूषण असणारच. त्यामुळे हा नियम थोडा शिथिल करावा.

माळरानाच्या अगदी जवळ उंच पहाड असेल तर त्या दिशेचे क्षितीज समजाऊन घेता येत नाही. पूर्व आणि पश्चिम दिशेला असे क्षितीज झाकले जात असेल तर फारसे बिघडत नाही. कारण आकाश पूर्व ते पश्चिम असे सारखे बदलत असते आणि संपूर्ण पॅनोरमा आपल्या डोक्यावरून जाणारच असल्याने फारसे मोठे नुकसान होत नाही. परंतु उत्तरेला फार महत्वाची नक्षत्रे असतात. काही महत्वाची नक्षत्रे दक्षिनेलाही असतात. या दिशांची नक्षत्रे फारशी डोक्यावर येत नसल्या कारणांमुळे उत्तरेकडे बुटका जरी असला तरी आणि दक्षिणेकडे उंच पहाड असलेली जागा नको. किंबहुना दूरदूरवर क्षितिजापर्यंत नजर जावी असे सपाट मैदान या कार्यक्रमाला आदर्श होय.

मी जेंव्हापासून ह्या कार्यक्रमांचे आयोजन करू लागलो, तेंव्हापासून मला नेहमी जाणवते ती लहान मुलांची लक्षणीय उपस्थिती. आपल्या आजूबाजूला असलेले हे विश्व नेमके कसे आहे, कशाचे बनले आहे याची उत्सुकता छोट्यांना नसेल तरच नवल. आणि म्हणूनच इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने कार्यक्रम करण्याची खासियत या आकाशदर्शन घडवणाऱ्या तज्ञांकडे असली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना- लहानांपासून वयोवृद्ध लोकांना हा कार्यक्रम तितक्याच गोडीने अनुभवता यावा हे उद्दिष्ट असावे.

विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावावी त्याचप्रमाणे कलाशाखेच्याही विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम जरूर अटेंड करावा. भाषा, संस्कृती, इतिहास, प्राच्यविद्या, भूगोल हे सगळे विषय प्यारे असतात या कार्यक्रमाला.

आपल्या भारतीय खागोलशास्त्राने आपली- म्हणजे आपल्या मराठी महिन्यांची कालगणना बनते. या महिन्यांच्या नावावरून आकाश कसे वाचावे, पाश्चात्यांच्या चालीरीती आणि आपल्या चालीरीती यांचा उगम आणि संगम कसा ओळखावा हे सगळे आकाशदर्शनातून कळते.

मराठी कवितांना तर आकाशातल्या तारकांनी कितीतरी ओळी पुरवल्यात. हे सर्व नक्षत्रांचे देणे याची देही याची डोळा समजाऊन घेणे भाषा आणि संस्कृतीप्रेमी मंडळींना देखील आपलेसे करते.

रामायण आणि महाभारताचा काळ नेमका कुठला? भारताच्या दक्षिणेला असलेल्या या महाराष्ट्राच्या पठारावर वस्ती निर्माण होताना आकाशात काय स्थिती होती, अती प्राचीन काळी आकाश कसे दिसत होते, भविष्यातले आकाश कसे असेल इतकेच नाही तर सर्वदूर पसरलेल्या या तारकांचे आयुष्य कसे असते, यांच्या रंगांचे वैशिष्ठ्य काय, हे आकाराने किती मोठे असतात, यांना कोणी जोडीदार असतात काय, हे कायम असेच चमकतात का? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे जेंव्हा संवादातून मिळत जातात तेंव्हा प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा खरा आनंद मिळतो.

तेंव्हा मंडळी, “का रोहीणीस वाटे, चंद्रासवे असावे?’ या दत्ता केसकरांच्या कविप्रश्नाचे उत्तर शोधायला या सिझनमध्ये आकाशदर्शनास आवर्जून हजेरी लावा. एका वेगळ्या विकेंड पर्यटनाचा अनुभव मिळवाल.

संतोष सराफ
९९६९७२१५५८
Email: sarafssantosh@gmail.com

माहितीचा स्रोत: 
Katharupi khagol shastra by Leena Damle.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Tuesday, March 7, 2017 - 07:10
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख करुन दिलीत. मला नक्कीच आवडेल यात भाग घ्यायला.
माझ्या लहानपणी एक हौशी गृहस्थ असे कार्यक्रम शाळांमधून करत असत. त्यांच्याकडे एक मोठी मोबाईल छत्री होती, त्यात आतून ते
तारे प्रोजेक्ट करत असत. हा कार्यकम दिवसाच होत असे. एक वर्गात अंधार करुन ही छत्री लावत असत ते.
नेहरु तारांगण मधे पहिल्यंदा खरेच छान कार्यक्रम होत, आता मात्र पुर्ण रया गेलीय.

छान!पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या ताम्हिणी येथे होणार्या आकाशदर्शनाच्या अनेक कार्यक्रमांना (starparties) मी उत्साहाने हजेरी लावलेली आहे.स्वयंसेवक म्हणून कामही केलंय.

शाळेतुन आम्हाला नेहरु तारांगण मध्ये नेले होते तेव्हा ह्या सगळ्याची पहिल्यांदा गोडी लागली आणी मग शाळेचा नेरळला कॅम्प होता तेव्हा सगळे आकाशाकडे पहात झोपलो होतो. असा काही कॅम्प परत करायला नक्कीच आवडेल.

दिनेश, राया,
तारांगणात जो कार्यक्रम होतो तो काही विशिष्ट विषय घेऊन केलेला असतो. साधारण चाळीसेक मिनिटांचा कार्यक्रम असतो तो. त्याने आकाशाबद्दलची उत्सुकता ताणली जाते.
पण या कुतूहलाचे संपूर्ण समाधान मिळते ते आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाने.
येत्या पंचवीस तारखेला कार्यक्रम आहेच.

वावे, ज्योतिर्विद्याचे पूर्वाश्रमीचे अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाला समालोचक म्हणून असतात. तुंहा ओळखत असणार त्यांना. श्री सुहास गुर्जर.

अरे सही.. वाचतानाच असे वाटत राहिले की हे ईथे असे जायलाच हवे.. उगाचच स्वदेसही आठवला.. ये तारा वो तारा हर तारा .. नक्कीच खूप भारी अनुभव असणार.. कार्यक्रम संपल्यावर तिथेच झोपायचे आणि सकाळच्या कोवळ्या तांबड्या सोनेरी किरणांना अंगावर झेलत उठायचे Happy

संतोष.. मी नेहरु तारांगणात अहदी ते सुरु झाले तेव्हाही कार्यक्रम बघितले आहेत आणि आता काही महिन्यापुर्वीही. पुर्वी एका खास प्रोजेक्टरने ग्रह तारे दाखवत असत, तो आता मोडीत काढलाय. आजकालच्या एच डी च्या जमान्यात, तिथे सध्या जे दाखवतात ते अगदीच धूसर दिसते.

ऋन्मेष, खरंय. झोपतातही काही. पण 'को जागरती' हे महत्वाचं.
मी अद्याप 'जागवणारा' म्हणून ओळखला जातो.
पण या जानेवारीतली थंडी मात्र काही और होती. कुडकुडली माणसं. मी एकटा सर्वांच्या मधून फिरत होतो. पण प्रेक्षक मात्र त्यांच्या पांघरूणातून हात देखील बाहेर काढत नव्हते.
नशीब, रात्रभर भरपूर गरम गरम चहा मिळत होता आम्हाला.
दुसऱ्या दिवशी लोकांच्या प्रतिक्रिया मात्र 'खूप आवडले' अश्याच होत्या.
मुंबईच्या लोकांना थंडी आवडते.

दिनेश, खरं आहे तुमचं. पूर्वीच्या प्रोजेक्टरची मजा मी देखील अनुभवली आहे. सध्या ते डिजीटलचे चित्र ती मजा आणित नाही.
पण खरी निखळ मजा प्रत्यक्ष आकाश पहाण्यालाच. आभाळ मात्र पुरेसे अंधारे हवे.

संतोष, तूम्ही इथे नियमित सदर लिहिले तर फार बरे होईल. दोन दिवसांपुर्वी सूर्यास्तानंतर लगेच शुक्र फार तेजस्वी दिसत होता. त्या थोड्या प्रकाशित आभाळातही तो उठून दिसत होता. मला फोटोही घेता आला त्याचा.