पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे? आणि का?

Submitted by सचिन काळे on 7 March, 2017 - 12:08

आज रविवार! मस्त सुट्टीचा दिवस. श्रीयुत दिलीप, सकाळचा नाष्टा वगैरे आटपून आरामखुर्चीमध्ये पेपर वाचत बसलेले आहेत. त्यांचे रिटायरमेंटहि जवळ आलेले असल्याकारणाने पेपरमध्ये त्यासंबंधित लेख वाचण्यावर आजकाल त्यांचा भर असतो. त्यांच्या सौभाग्यवती अनिताची स्वैंपाकघरात आवराआवर चाललीय. मुलगी जाई, स्टडीरुममध्ये कॉलेजचे प्रोजेक्ट पूर्ण करत बसलीय. तिचे हे कॉलेजचे शेवटचे वर्ष. पुढील दोनएक वर्षात तिला उजवायचा त्यांचा विचार आहे. तिला आतापासूनच लग्नाच्या मागण्या येण्यास सुरुवात झाली आहे.

एवढ्यात दारावरची बेल वाजते. 'डिंग! डाँग!' दिलीप उठून दरवाजा उघडतात. दरवाजात त्यांचा परममित्र आणि स्नेही शरद, रेखावहिनी आणि त्यांचा मुलगा अमित उभे. शरद नुकतेच रिटायर झालेत. अमितने इंजिनियरिंगची डिग्री घेतलीय आणि तो सध्या एका एमएनसीत काम करतो.

त्यांना पहाताच दिलीप अत्यानंदाने ओरडले. "या! या! नमस्कार! नमस्कार!!" त्यांनी सौ.ना हाक मारली. "अगं, पाहिलंस का, कोण आलंय ते!"

सौ.अनिता आणि जाई लगबगीने बाहेर आल्या. अनिता "अरे वा! या! या! नमस्कार!" जाईसुद्धा त्यांना पाहून आंनदली. "नमस्कार काका आणि काकी! हाय अमित! ये! ये!"

शरद, वहिनी आणि अमित सोफ्यावर येऊन बसले. दिलीप, अनिता आणि जाई, त्यांच्या समोरच खुर्चीवर बसले.

दिलीपने सहज विचारले "आज कसे येणं केलंत?"

शरदने बोलण्यास सुरवात केली. "अरे, आज आम्ही एका खास कारणाने तुम्हां सर्वांशी चर्चा करायला आलो आहोत. तुम्हाला माहीतच आहे, की अमित आता नोकरीत स्थिरावलाय. आणि आता आम्ही त्याच्या लग्नाचं बघतोय. त्याला तीन चार मुलीही सांगून आल्यात. काही मुली वयाने त्याच्या बरोबरीच्या आहेत, काही त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान तर काही सहा-सात वर्षांनी लहान आहेत. आता आम्हाला प्रश्न पडलाय कि आम्ही सुनबाई कोणती करावी. अमितच्या वयाच्या बरोबरीची असणारी करावी? त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षे लहान असणारी करावी? कि त्याच्यापेक्षा सहा सात वर्षांनी लहान असलेलीसुद्धा चालेल? आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही आहोत. पती पत्नीच्या वयात असणाऱ्या फरकाचा त्यांच्या संसारवर कितपत प्रभाव पडू शकतो? ह्याबद्दल आपलंहीे काय मत आहे हे विचारावं. तसंच तुमच्याशी चर्चा केल्याने आम्हाला काही नवीन माहिती मिळेल. म्हणून तीही जाणून घ्यायला आम्ही आलो आहोत"

त्यावर अमित लगेच उसळून म्हणाला "अहो काका, सोपं आहे. मी लग्न करणार म्हणजे माझी होणारी बायको माझ्याच वयाची असायला हवी नको का? त्यात चर्चा कसली करायची?

दिलीप उत्तरले "हे बघ अमित, हे सर्वमान्य आहे की स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत बौद्धिकदृष्ट्या लवकर परिपक्व होत असतात. त्यामुळे पतीपत्नी जर एकाच वयाचे असले तरी त्यांच्या बौद्धिक पातळीत बराच फरक असू शकतो. ज्याचा परिणाम त्यांच्या संसारवर होऊ शकतो. आणि कदाचित त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वसाधारणपणे लग्न करताना मुलगा आपली होणारी पत्नी आपल्यापेक्षा दोन तीन वर्षे लहान असणारीच बघत असतो.

त्यावर जाईने विचारले "मग पती हा पत्नीपेक्षा दोन तीन वर्षांनी वयाने मोठा असावा का? याचे अजून काय परिणाम होऊ शकतात?"

दिलीप "पती पत्नीपेक्षा दोन तीन वर्षांनी वरिष्ठ असल्यामुळेे त्याला सतत आपल्या पत्नीप्रति असलेल्या जबाबदारीची जाणीव होत रहाते, काळजी रहाते. ज्यामुळे पत्नीला आपोआप पतीसोबत सुरक्षिततेची आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि त्यांचे एकमेकांसंबंधीचे आकर्षण कायम राहते. पती वयाने पत्नीपेक्षा मोठा असल्याने त्याच्या आयुष्यात स्थैर्य अगोदरच आलेले असते. तो आर्थिक दृष्ट्या सबल झालेला असतो. ज्यायोगे त्यांच्या संसाराची सुरवात सुरळीत होऊ शकते. साधारणतः वयापरत्वे स्त्रिया ह्या विविध कारणांमुळे त्यांच्या वयाच्या पुरुषांपेक्षा लवकर प्रौढ दिसायला लागतात. त्यामुळे जरका पती हा पत्नीपेक्षा वयाने दोन तीन वर्षे मोठा असल्यास, त्यांच्या मध्यमवयीन काळात त्यांची जोडी विजोड दिसण्याची शक्यता कमी होते.

जाईने परत विचारले "आणि पती हा पत्नीपेक्षा सहा सात वर्षांनी वयाने मोठा असला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?"

याचे शरदने उत्तर दिले "पतीपत्नीमध्ये सहासात वर्षांचे अंतर असल्यास त्यांच्यामध्ये पूर्ण एका पिढीचे अंतर पडते. त्यांच्या आवडीची गाणी, टीव्हीचे कार्यक्रम, पिक्चर यांची आवड आणि निवड पुष्कळ वेगळी असू शकते. एकाला दुसऱ्याच्या प्रौढपणाचा, तर दुसऱ्याला पहिल्याच्या बालिशपणाचा बऱ्याचदा सामना करावा लागू शकतो. सुरवातीला एकमेकांमध्ये पाहिलेला सारखेपणा मागे पडून त्यांच्यामध्ये असलेला वेगळेपणाच जास्त उठून दिसायला लागतो. कुठेतरी असे वाचले होते की पतिपत्नीमधील वयाचा फरक जितका जास्त तितका त्यांच्यात बेबनाव होण्याचा संभव जास्त असतो, पण असेही आहे की पतीपत्नीचा जितकी जास्त वर्षे सहवास राहील तितके त्यांच्यात वादाचे प्रमाण कमी राहील.

रेखावहिनी "कधी कधी लग्न करताना  दोघांची मानसिक आणि शारीरिक बरोबरी आहे का? हे पाहिलेच जाते असे काही नाही. काही व्यक्तींना आपला जोडीदार निवडताना त्याचे समाजातील स्थान, त्याची आर्थिक सुबत्ता आणि त्यामुळे आपोआप स्वतःला भोगायला मिळणारे विलासी जीवन, आर्थिक सुरक्षितता जास्त आकर्षित करू शकते. उदाहरणार्थ, आपण पाहतोच कि कित्येकदा किर्तीमान आणि ख्यातनाम व्यक्तींच्या जोडीदारांमध्ये तब्बल वीस-वीस वर्षांचेसुद्धा अंतर असते. हो! मग वयाचे जास्त अंतर असलेल्या जोडप्यांमध्ये पुन्हा दुसरे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशावेळी त्यांच्यात भरपूर सामंजस्य असावे लागते. आपल्यात आणि आपल्या जोडीदारात सर्वच बाबतीत असलेला फरक पूर्णपणे स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या संसारचा मार्ग आखावा लागतो. पती पत्नीपेक्षा जरका वयाने बराच मोठा असेल तर त्याचे आपल्या पत्नीबरोबरीचे वागणे हे एखाद्या पित्याप्रमाणे असू शकते. किंवा पत्नी पतीपेक्षा वयाने फारच मोठी असेल तर तिचे आपल्या पतीबरोबरीचे वागणे एखाद्या आईप्रमाणेसुद्धा असू शकते. वयातील असलेल्या जास्त फरकामुळे कोणा एकाचा फार लवकर मृत्यू होणे संभवते. तसेच मूल होऊ देण्यावरूनसुद्धा त्यांच्यात वाद होऊ शकतो. कदाचित त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीपत्नीपासून एखाददुसरे मूलही असू शकते, ज्याचाही त्यांच्या संसारवर प्रभाव पडू शकतो. दोघांच्या पिढीमध्ये एक दोन पिढ्यांचे अंतर असल्याने पुष्कळ बाबतीत त्यांच्यात मतभिन्नता असू शकते.

सौ.अनिता "खरं तर वयाच्या मुद्द्याकडे आपण खास लक्ष दिले पाहिजे. त्याऐवजी आपल्याकडे मुलामुलींची लग्ने करताना इतर गोष्टी तपासण्यावरच भर दिला जातो. जसे की त्यांचे घर कसे आहे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर कसा आहे, त्यांचा जात आणि धर्म कोणता आहे. मुलाच्या बाबतीत असेल तर त्याची मिळकत किती आहे, वगैरे वगैरे. त्याऐवजी हे पाहिलं पाहिजे, की होणाऱ्या पतीपत्नीमध्ये वयाचा किती फरक आहे? ते एकमेकांना अनुरूप आहेत का? त्यांचा बौद्धिक स्तर, आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या आणि वागण्याच्या सवयी जुळतात का?

यावर जाई म्हणाली "मला वाटते लग्न करताना होणाऱ्या पतीपत्नीमध्ये वयातील फरकाचा मुद्दा तेव्हा एवढा महत्वाचा ठरू नये, जेव्हा त्यांच्यात एकमेकांबद्दल नितांत आदर, प्रेम, सहकार्य, योग्य सुसंवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असेल. जोडीदाराबद्दल कमीत कमी आणि तार्किक दृष्टया पूर्ण होणाऱ्या अपेक्षा ठेवल्या, तसेच त्याची एकूण कुवत ओळखली तर त्यांच्यात बेबनाव होण्याची शक्यता कमी होईल. दोघेही मानसिकदृष्ट्या परिपक्व असणे, स्वार्थीपणाचा अभाव असणे आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे हे शेवटी महत्वाचे ठरते, नाही का?

दिलीप शरदला म्हणाले "आपण सर्वांनी आपापली मते मांडली. चर्चा बाकी छान झाली. पण तुझ्या प्रश्नाचे नेमके उत्तर काही मिळत नाहीए."

शरद "हो ना!! आता काय करावे?"

रेखा वहिनी "अहो भावोजी! तुमचे एक मित्र 'मायबोलीवर' सभासद आहेत ना!!? त्यांनाच त्या व्यासपीठावर इतर सभासदांची मते विचारायला सांगा ना!! आपल्याला अजून काही नवी माहिती मिळेल."

दिलीप " हो! हो! चांगली युक्ती सांगितलीत. मी त्यांना नक्की विचारायला सांगतो. बघूया अजून कोणती नवीन माहिती मिळते ती!!"

तर, मायबोलीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो! माझा मित्र दिलीपच्या आग्रहावरून मी तुमचे मत विचारतोय. सांगा बरं तुम्हाला काय वाटते? पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे? आणि का?

(निवेदन : वरील लेखातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. (मात्र मी विचारलेला प्रश्न खरा आहे))

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटलं शिक्षण राहिलं बाजुला, जाई-अमितच सूप वाजणार की कांय! Phew.
हि चर्चा whatsapp वर पण करता आली असती, group काढायचा.

मला वाटलं शिक्षण राहिलं बाजुला, जाई-अमितच सूप वाजणार की कांय >> Lol पण सुरूवात वाचून असेच वाटले Proud

बाकी जाऊ देत. पण 'सूप वाजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ अगदी वेगळा आहे Happy
सूप वाजणे म्हणजे संपणे/ समाप्त होणे.

थोडीशी कळ काढली असती तर या प्रश्नाचे उत्तर विश्वास नांगरेपाटील, अविनाश धर्माधिकारी, नाना पाटेकर, विकास आमटे यांच्या नावाने व्हॉट्स अ‍ॅपवर मिळून गेलं असतं हो ....

वयामध्ये कितीही अंतर असावं चालतंय कि वर्षानुवर्षे.
माझ्या आजी-आजोबांमध्ये चौदा वर्षाचं अंतर होत आणि माझ्या काका काकूंमध्ये अकरा वर्षांचं
पण सध्याच्या पिढीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर एखाद दोन वर्ष पाठी पुढे दोन्ही साईड ने . हल्ली काही काही वेळा लव्ह म्यारेज मध्ये मुली नवर्यापेक्षा मोठ्याही असतात १-२ वर्षांनी म्हणून दोन्ही साईड ने म्हटलं Wink

जाई-अमितच सूप वाजणार की कांय! << +१

मला तर ६ जण जे इतक्या चढाओढीने मराठीत चर्चा करताहेत ते मायबोलीवर कसे नाहीत ह्याचे आश्चर्य वाटतय.

बाकी जाऊ देत. पण 'सूप वाजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ अगदी वेगळा आहे Happy
सूप वाजणे म्हणजे संपणे/ समाप्त होणे.
>>
लग्नाचे सूप वाजले असे म्हणतात ना?

आपल्या गौरवशाली परंपरेत तर मुली ७-८ वर्षाच्या आणि त्यांचे नवरे तीस-चाळीस वर्षाचे असंही असायचं. किती तो निरागस काळ. लाल्या, कम्युनिष्टांनी मिळून आपल्या सगळ्या गौरवशाली परंपरांचा सत्यानाश केला. म्हणून आता हे असे २-३ वर्षं अंतर वगैरे ठेवण्याची फॅडं आली आहेत. सगळे नुसते पाश्चात्यीकरण करुन ठेवलेय. स्त्रीमुक्ती, मॅकोले, कम्युनिष्ट वगैरे सगळ्यांनी मिळून पारंपारिक भारतीय कुटुंबसंंस्थेला आणि संस्कृतीला रसातळाला नेऊन ठेवलेय. Lol

लग्नाचे, संमेलनाचे सूप वाजले असे म्हटले तर त्या वाक्याचा अर्थ "तो सोहळा समाप्त झाला" असा होतो.
त्या वाक्प्रचाराचा संबंध सुगीच्या दिवसात सुपात धान्य पाखडण्याशी काही तरी आहे. नक्की काय ते आता विसरले , शोधावे लागेल.

मला तर ६ जण जे इतक्या चढाओढीने मराठीत चर्चा करताहेत ते मायबोलीवर कसे नाहीत ह्याचे आश्चर्य वाटतय.>> Rofl

पूर्वी चार चार दिवस चालणार्‍या लग्नात शेवटच्या दिवशी पंगत संपत आली की पंगतीतून सूप डावाने वाजवत नेत. कार्यक्रम सम्पला आता आअपापल्या घरी जा असे सूचीत करत.

पूर्वी चार चार दिवस चालणार्‍या लग्नात शेवटच्या दिवशी पंगत संपत आली की पंगतीतून सूप डावाने वाजवत नेत >> अछा असं असायचं का ? म्हणजे आता आपापल्या घरी जाऊन जेवा असं . आम्ही आमच्या सोसायटीत होळीला सगळ्यांनी खाली जमाव म्हणून थाळ्या ( ताट ) डावाने वाजवायचो तसं Happy
हल्ली ट्रिंगSSSSग अशी बेल वाजवतात तसं का? >> हो हॉलवाले वाजवतात Lol

विकु Happy

आत्ता गुगल केलं तर कुठल्यातरी लोकसत्ता पुरवणीमधे हे सापडलं : संदर्भ किती अचूक आहे माहित नाही!
सूप वाजणे’ची व्युत्पत्ती कशी झाली? या प्रश्नाचे उत्तर
बरेच वाक्प्रचार/ म्हणी या ग्रामीण जीवनातून आल्या आहेत. सूप वाजणे हा वाक्प्रचार असाच आहे. शेतात भाताची मळणी होते, नंतर भात वाळवून वारे दिले जाते. फोले व धसकट वाऱ्याबरोबर निघून दूर पडतात व जड दाणे एकावर एक पडत त्याची रास भरते. उंच हात करून सुपातून दाणे खळ्यात सोडले जातात. दाणे खाली पडल्यानंतरसुद्धा वजनाने किंचित जड पण फोलकट स्थितीतील टाकाऊ भाग चांगल्या धान्याजवळून दूर उडवण्यासाठी पुन्हा सुपाचा झपकारा मारला जातो. हा झपकारा राशीच्या शिगेपेक्षा किंचित वरून मारण्याची खुबी शेतकऱ्याकडे असते. राशीला स्पर्श झाला तर सुपाच्या फटकाऱ्याने चांगले दाणे कोंडय़ात पडून व्यर्थ जाण्याची शक्यता असते. एका बाजूने रास उचलून बैलगाडीने किंवा माणसी डोक्यावरून धान्य घरी वाहून नेण्याचे काम सुरू असते. वारे देऊन संपत आल्यावर रास संपत येऊन जमीन उघडी पडत जाते या वेळी मात्र सुपाचा फटकारा जमिनीला बसून सुपाचा आवाज होतो. राशीला सूप थडकले तर दाण्यामुळे आवाज होत नाही.
पण उघडय़ा जमिनीला सूप लागले तर ते फाड्कन वाजते. रास दिवसभर वाळवून सायंकाळी उचलण्याचे काम शक्यतो होत असते. काही वेळा रात्र होते. उजेड नसतो. रास अजून किती आहे, किती खेपा होणार वगैरे चर्चा वाहून नेणाऱ्यांची असते. पण सूप वाजल्यावर कुणीही न सांगता कळून जाते की रास आता अंतिम टप्प्यात आली. सूप वाजले म्हणजे रास संपली. एकूण काम पण संपले. तोच वाक्यप्रयोग संमेलनासारख्या ठिकाणी वापरला जातो. सूप वाजले म्हणजे संपले असा त्याचा अर्थ असतो.

पण सूप वाजल्यावर कुणीही न सांगता कळून जाते की रास आता अंतिम टप्प्यात आली.
>>>
मग आता ट्रॅ़क्टर वाजला अशी म्हण पाहिजे. मळणी मशिनचं काम संपत आलं की मशिन चालवायला दिलेला खडखडून जागा होऊन ट्रॅ़क्टर सुरू करतो पुढल्या पट्टीत (शेतात) मशिन न्यायला.

नताशा Proud
मैत्रेयी, इन्टरेस्टिंग माहिती. Happy
टण्या, मराठी दिनाचं सूप वाजलं नाही तोच सूपाच्या जागी ट्रॅक्टर?! शिव शिव! Proud

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आपल्याला सिनिअर मुली भाव देत नाहीत.
आपल्याच वर्गातील मुली आपल्याला पक्के ओळखून असल्याने पटत नाहीत.
मग दुसरया वर्षापासून आपण फ्रेशर मुलींच्या मागे लागतो.
तिसरया वा चौथ्या वर्षी कुठेतरी डाळ शिजते. आणि आपसूक दोन ते तीन वर्षांचे अंतर तयार होते.
जर कॉलेजला नाही पटली तर हेच ऑफिसला लागू.

ऋण्म्या, तुझी डाळ शिजलीये हे एक बरंय. ती शिजायला किती वर्ष लागली आणि किती वर्षांचं अंतर आहे हे राहू देत सुपातच.

जर ठरवून लग्न असेल तर ३-४ वर्षाच चालू शकेल, प्रेमविवाह असेल तर वयाचा मुद्दा गौण ठरतो तिथे सामंजस्याला जास्त महत्व आहे

मी कधीतरी वाचले होते की बायको वयान लहान का असावी कारण जर दोघां मध्ये १०-१२ वर्षाचे अंतर असेल तर नवरा लवकर म्हातारा होईल आणी त्याच्या म्हातारपणात बायको त्याची काळजी घेईल

Pages