डाळ/तांदूळ ढोकळा

Submitted by तृप्ती आवटी on 5 September, 2009 - 11:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, ३-४ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, मीठ, पाव चमचा हळद. फोडणीसाठी तेल, मोहोरी, जिरं, हिंग. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उपसून टाकुन इडली/डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान फसफसले पाहिजे.

ह्या पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेले- हिरव्या मिरच्या + आल्याचा तुकडा + लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका थाळ्याला (किंवा ढोकळे करायचे काही उपकरण असल्यास त्यात) तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा. ढोकळा छान फुलतो. थाळा नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते. पहिल्यांदाच करत असाल तर "नाइफ टेस्ट" करुन बघायला हरकत नाही.

गुजराथी पद्धतीने थोडा गोडसर ढोकळा करायचा असेल तर चमचाभर साखर घालावी. ताटात अगदी पातळ थर द्यावा. साधारण एक सेमिचा थर पुरेल. मिरची,लसणाची पाकळी एखादी कमी घालावी तसेच हळद घालु नये.

दोन्ही प्रकारात हिंग, मोहोरी, जिर्‍याची फोडणी आणि खोबरं/कोथिंबीर घालुन सजवावे.

dhokaLa.JPG

प्रकाशचित्रात पहिले चित्र आहे आईने केलेल्या ढोकळ्याचे. दुसरे आहे ते मी गुजराथी पद्धतीने केलेल्या गोडसर ढोकळ्याचे. आईने केलेला अर्थातच जास्त छान लागतो Happy

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांना पोटभर नाष्टा होतो.
अधिक टिपा: 

१. पीठ उन्हाळ्यात ५-६ तासांत छान फसफसते. एरवी मी रात्री ओवनमधे ठेवुन देते ढोकळे सकाळी करायचे असतील तर. अवन प्री-हीट करायची गरज नाही.
२. पीठ छान फसफसले नसेल तर मिश्रण ताटात घालण्याआधी अगदी एक मिनिट चिमुटभर सोडा घालावा.

माहितीचा स्रोत: 
आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांदळाचा रवा चालेल का ग वापरलेला? माझा ढोकळा नेहमीच पिठल्याच्या वड्या होतो. Uhoh तांदळाचा रवा आहे घरात म्हणून हा उद्याच करून बघावं म्हणते.

श्यामले, तू विचारलंस तरी. मी (न विचारताच) तांदळाचा रवा वापरणार आहे.:P (दुकानात उपमा करायला म्हणून रव्याचं पाकीट उचललं,तो तांदळाचा रवा निघाला.) चांगले झाले नाही तर सिंडीच्या माथी खापर.. Proud

मृ, धन्यवाद Happy

मी इडली रवा वापरुन करुन बघितला आहे एकदा. चांगला झाला होता. तांदळाच्या रव्याचं मला माहिती नाही. आईने सांगितलेली कृती मी जशीच्या तशी दिली आहे. बाकी मला काही विचारु नका, पस्तावाल Proud

इडली रवा म्हणजेच तांदळाचा रवा. ढोकळे मस्तच दिसताहेत. पण सिंडे पीठ व्यवस्थित फसफसले असेल तर सोडा, इनो काहीच घालायचे नाही?

ढोकळा किंवा तत्सम प्रकार करताना पिठ फसफसणे आवश्यक आहे. नाहितर पदार्थ दड्दडीत होतो. रात्री भांड्यात पिठ टाकल्यावर, त्याची पातळी लक्षात ठेवावी, दुसर्‍या दिवशी किमान दुप्पट झालेली असेल तरच ढोकळा करावा, नाहीतर वाट बघावी.
नीट आंबण्यासाठी, त्यात थोडे नारळाचे पाणी, कांदा, ड्राय यीष्ट यापैकी काहितरी टाकावे. किंवा भांड्यावर केळीचे पान झाकून ठेवावे.

सिंडे, मस्त पाकृ. मी बर्‍याच दिवसांपासून योग्य प्रमाण शोधत होते. आता नक्की करून पाहीन. फोटो पन कसला सही आलाय..

अश्विनी, (आई म्हणाली) जर जाड लेयर देऊन (म्हणजे तिने केलाय तसा) करायचा असेल तर पीठ फसफसल्यानंतरही चिमूटभर सोडा घालावा म्हणजे छान हलका होतो ढोकळा. मी त्या चपट्या ढोकळ्यासाठी सोडा नाही घालत.

हा ढोकळा मस्त होतो आणि मुख्य म्हणजे पौष्टीक पण आहे. मी नेहमी असाच करते पण इनो घालुन. इनो न घालता सुद्धा तुझा हलका झाला म्हणतेस मग करु बघते तसा पुढच्यावेळी. Happy

सायोनारा, मस्त दिसत आहेत ढोकळे.
मीपण करुन पाहिला गं, फार छान झाला Happy
जरा जास्तच भिजवेले डाळी आणि इडली रवा, त्यातले निम्मे ढोकळ्याला वापरले आणि रहिलेले निम्म्या पिठाचे मग दुसर्‍या दिवशी अप्पे केले, ते पण मस्त झाले. थँक्स!

मी केलेला ढोकळा नेहमीच चुकतो, विकतचे मिक्स आणले तरी तो कुकरमधुन बाहेर काढला की चपटच होऊन जातो. Sad

असा करुन बघेन आता.

Thanks! फार दिवसापासून ही रेसिपी शोधत होते. हा प्रकार करुन बरेच दिवस झल्याने विसरले होते.

खुप छान आहे!
माझी आई पन असच धोकला बनवते,
फख्त एक फरक, तन्दुल आनी दाल वाटत असतअना दही घलाव, नन्तर मग आंबवाव,
म्हनजे धोकला मस्त होतो!

मस्त आहे कृती..
काल रात्री अचानक इतकी इच्छा झाली ढोकळा खायची..
मग झटपट ढोकळ्याच्या दोन कृत्या सापडल्या युट्युबवर, त्या मिक्स करून केला ढोकळा!
चांगला होता ढोकळा, पण विकतच्याची मजा नाही आली Sad

आता पुढच्या वेळेस ह्या पद्धतीनं करून बघेन आणि रिपोर्ट देईन.

Pages