कॉलेजला जाताना त्या चौघीजणी रस्त्यात भेटल्या. अभ्यासाचं वर्ष सुरू होऊन चार महिने झाले तरी त्यांच्याशी तोंडदेखलं हसून पुढे जाण्याइतकीच ओळख होती. त्या बाकी मुला-मुलींमधे फार मिसळायच्या नाहीत. तासालाही एकमेकींच्याच शेजारी बसायच्या. इंग्लिशचा एखादा शब्द समजला नाही तर त्याबद्दल मॅंडरिन मधे आपापसात चिवचिवाट करायच्या. चौघींची नावंही थोड्याफार फरकाने मला सारखीच वाटायची. निंग्निंग, लिन-शाओ, निंग्जुन, ज्युन-पू वगैरे वगैरे... त्यादिवशी विशेष खुशीत असाव्यात; मला स्वत:हून ओळख दाखवून हसल्या. मी रेंगाळले म्हंटल्यावर चक्क स्वतःहून बोलायला लागल्या!
अभ्यास झालाय का वगैरे वायफळ गप्पा झाल्या आणि जिचं नाव मला निंग्जुन वाटायचं तिने विचारलं,
“तू त्या वरच्या वर्गातल्या मिंग्यू ला ओळखतेस ना?”
चायनीज़ सोसायटीमुळे त्याही मिंग्यू ला ओळखत होत्या. मी हो म्हणायच्या आतच ज्युन-पू म्हणाली,
“अरे वा! घरचे सोडूनही बाकी मित्र-मैत्रिणी आहेत वाटतं मिंग्यू ला ?”
बाकीच्या सगळ्या छद्मी हसल्या, पण त्यात इतका दंश का होता मला कळलं नाही.
मिंग्यू तशी वेगळीच होती. पक्की चायनीज़ असली तरी सगळ्यांमधे मिसळणारी, सगळीकडच्या मुला-मुलींशी भरपूर बोलणारी, एकदा घरच्यांबद्दल बोलायला लागली की पावसासारखी कोसळणारी, आणि चायनीज़ सोसायटीतल्या घोळक्यात कधीच न दिसणारी! दुपारी एकत्र जेवताना ती नेहमी माझ्या मागे उभी असायची, त्यामुळे हळुहळू ओळख वाढली तसतशा खूप गप्पा व्हायला लागल्या. त्या मुलीत यांना नावडण्यासारखं इतकं काय असेल?
अजून महिन्यभरात या चौघींशीही गाठभेट जास्त व्हायला लागली. वर्गात एकमेकींच्या शेजारी बसायला लागलो; कधीतरी जेवायलाही एकमेकींच्या खोलीवर जायला लागलो. एक दिवस नेमकी मिंग्यू माझ्याकडे आलेली असतानाच लिन आणि ज्युनपण मला फ्राइड राइस द्यायला आल्या होत्या. एकमेकींना बघून अतिघीही अवघडल्या, आणि मिंग्यू लगेचच आम्हाला अच्छा करून निघाली. त्यादिवशी मला अगदीच राहवलं नाही. MSc संपत आलं आणि हे कसली पाचवीतली भांडणं असल्यासारखं वागणं? मी लिन ला विचारलं...
“कंटाळा येतो गं अर्निका, सारखं तिच्या बहीण-भावांबद्दल ऐकून. माझ्या भाच्या अशा आणि माझा भाऊ असा... हो कळलं आम्हाला; असतील मस्त. सतत घरच्यांबद्दल बोलणं इतकं शिष्ट वाटतं. शिवाय जरा पैशांचा गर्व.” लिन जरा वैतागून म्हणाली. “सांगणार असलीस तर सांग तिला. कोणीतरी सांगायला हवंच आहे.”
मिंग्यू ला मी काय सांगणार? मलाच गणित सुटत नव्हतं...पैशांचा गर्व? छानछोकीने रहाणाऱ्या, ब्रॅंडेड कपडे घालणाऱ्या, रोज हॉटेलात जेवणाऱ्या आणि मिनरल वॉटर आणायलाही लॅक्मेचं लिपस्टिक लावून जाणाऱ्या याच मुलींच्या कितीतरी मैत्रिणी मी रोज बघत होते. जरा चार दिवसांची सुट्टी मिळाली की भरमसाठ खर्च करून युरोपात फिरून येणारे यांचे बॉयफ्रेंडही मी बघत होते. ते सगळे नॉर्मल, निगर्वी! आणि ही साधीसुधी रहाणारी-वागणारी मुलगी घरच्यांबद्दल बोलते म्हणून पैशाचा माज करणारी?
"लिन, म्हणजे मी तर तुमच्या लेखी जगातली सगळ्यात उद्दाम आणि गर्विष्ट मुलगी असणार! बहीण-भावंडांच्या गोष्टी सांगणारी... तरी माझ्याशी बोलताच की तुम्ही." मी म्हणाले.
“तुझा काय संबंध? उद्दाम नाही, सुदैवी आहेस तू! आमच्याकडे एकच मूल असू शकतं ना... One-child policy. आम्ही सगळ्या एकेकट्या आहोत. निंग्नुओ आणि माझे आईबाबाही एकुलती एक मुलं आहेत त्यांच्या त्यांच्या आई-वडिलांची. दुसरं मूल होऊ द्यायचंच असेल तर तुम्हाला सरकारला दाखवून द्यावं लागतं की आमच्या घरची परिस्थिती उत्तम आहे; अजून एक मूल पोसण्याची आमची कुवत आहे; आमच्याकडे तितका पैसा खेळता आहे...तसं तरी, किंवा मग सरकारात असाल तर असतात बाकी अपवाद.
मिंग्यूच्या घरची परिस्थिती चांगलीच असावी त्या काळातही. तिला मोठा भाऊ आहे...भावाला दोन मुलं आहेत आता. शिवाय आत्ते-मामे भावंडांबद्दलही ऐकलंय बरेचदा. कशाला सांगायच्या सारख्या विकतच्या भावंडांच्या गोष्टी? आमची काय किंवा बाकी बऱ्याच जाणांची काय, काय परिस्थिती आहे माहित्ये ना तिला?”
माणसांनी बजबजलेल्या देशातल्या लोकांच्या नशिबात असा एकटेपणा असू शकेल ही कल्पनाही केली नव्हती! त्यांची श्रीमंती मी पैशात मोजत होते, आणि माझी श्रीमंती त्या माझ्या भावंडांमध्ये. भावंडांना किंमत, म्हणजे अक्षरश: पैशात मोजली जाणारीही किंमत असते, हे मला त्यादिवशी पहिल्यांदा जाणवलं.
त्यांचं असणं, त्यांच्याशी भाडणं, त्यांच्याबरोबर रहाणं, त्यांची कौतुकं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं, एकत्र खेळलेली भातुकली, एकत्र जागवलेल्या रात्री, एकत्र न केलेला अभ्यास, आई-बाबांवर रुसल्यावर हक्काने तक्रार सांगायला त्यांच्यापाशी जाणं, गृहित धरलेलं रक्षाबंधन आणि भाऊबीज, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायचं असताना कधीतरी जबरदस्तीने यांच्याबरोबर रहायला लागणं आणि त्यामुळे होणारी धुसफूस, जरा कोणी वेणी ओढली तरी घरी येऊन एकमेकींकडेच सगळं सांगून टाकणं... हे आठवून हसायला किंवा डोळ्यात पाणी आणायला आपल्याला मुळात हक्काची भावंडं आहेत, आपल्या आई-बाबांनाही ती आहेत, हे घरचं केवढं मोठं वैभव आहे हा विचारच कधी केला नव्हता! लहानपणी घरी भांडण झालं की आम्ही एकमेकांना चिडून म्हणायचो, “नको बोलू. काही मोठं सोनं लागलं नाहीये तुला.” पण खरंच सोनं लागलेलं होतं आम्हाला सगळ्यांना!
तेव्हापासून लिन आणि तिच्या बाकी तिघी मैत्रिणी आपापसातच रहातात याचं वाईट वाटेनासं झालं. आम्ही भावंड एकत्र असलो की त्या कोंडाळ्याबाहेर काय चाललंय याची शुद्धही नसते आम्हाला. ती गोष्ट या मुलींच्या वाट्याला अशी आडवळणाने आली असेल कदाचित!
त्यादिवशी जेवताना मी घरी सगळ्यांना फोन केला. माझ्या भावंडांना केला... मग आईबाबांच्या भावंडांना...आणि नंतर आजीच्याही भावंडांना! उगाच शिळोप्याचं बोलायला...भांडण उकरून काढायला... पत्र लिही म्हणून हट्ट करून घ्यायला... हक्क गाजवायलाही... एका राखीत सगळ्यांना घट्ट एकत्र बांधून टाकावंसं वाटत होतं!
लिन ने आणून दिलेला तिखट फ़्राइड राइससुद्धा उगाच नारळीभातासारखा गोड लागत होता...
छानच लेख! आधी वाचलाय असं
छानच लेख! आधी वाचलाय असं वाटलं (ब्लॉग वर आहे का तुझ्या?)
आत्ता लगेच भावंडांच्या ग्रूपवर फॉरवर्ड केली लिंक! भावंडांचं असणं हे एक वेगळंच सुख आहे
>>लिन ने आणून दिलेला तिखट
>>लिन ने आणून दिलेला तिखट फ़्राइड राइससुद्धा उगाच नारळीभातासारखा गोड लागत होता...<<
क्या ब्बात है !!
छान लेख!
छान लेख!
सुरेख लिहीतेस...
सुरेख लिहीतेस...
सही ! छान लिहिलयसं.
सही ! छान लिहिलयसं.
लेख आवडला
लेख आवडला
सुंदर लिहीले आहे! आवडले.
सुंदर लिहीले आहे! आवडले.
सुरेख लिहिलंय. शेवट पण छान
सुरेख लिहिलंय. शेवट पण छान लिहिलाय.
भावंड असणं म्हणजे पैशाचा माज हा दृष्टीकोन किती मजेशीर आहे.
मस्त लेख!
मस्त लेख!
खुप छान लिहिलयस.. मी माझ्या
खुप छान लिहिलयस..

मी माझ्या भावंडांमधे अजुनही रमते.. गम्मत म्हणजे आम्ही भांडण नाही करत कुणीच कुणाशी.. फक्त मज्जा अन् एकत्र येउन दुसर्याची टर उडवण हा उद्योग सर्वात आवडता.. सांगितल्याबगैर कुणाला कळणारही नाही कि हि भावंड आहेत इतके छान मित्र मैत्रीणी आहोत एकमेकांचे...
आय अॅम फिलींग सो रिच टुडे
खूप सुरेख लिहिलाय लेख. शेवटचा
खूप सुरेख लिहिलाय लेख. शेवटचा भाग तर थेट भिडणारा. असंच एक विश्व माझं आणि भावाचं होतं. दुसरं कोणी लागत नसे, आलं तर ना नव्हती. अत्यंत उबदार आठवणींचे क्षण.
छान लिहिलय!
छान लिहिलय!
एकदम मस्त लिहिलय!
एकदम मस्त लिहिलय!
सुरेख!
सुरेख!
मस्त !
मस्त !
छान लेख :)
छान लेख

आणि उगाचच गरीब झाल्यासारखे वाटले, कारण मी एकलौता एक
छोटाच पण सुरेख.आवडला. :)
छोटाच पण सुरेख.आवडला.
सुरेखच!
सुरेखच!
मस्त! वेगळाच अप्रोच!
मस्त! वेगळाच अप्रोच!
छान लेख. आवडला :)
छान लेख. आवडला
सुरेख!
सुरेख!
खूपच छान लिहलयं!
खूपच छान लिहलयं!
खूप मस्त लेख. कीतीतरी गोष्टी
खूप मस्त लेख. कीतीतरी गोष्टी आपण सतत गृहित धरून चाललेले असतो. पण तेच खरे वैभव असते!!
छान!! आवडलं!!
छान!! आवडलं!!
मस्त! आवडलं!
मस्त! आवडलं!
कितीतरी गोष्टी आपण कित्ती
कितीतरी गोष्टी आपण कित्ती गृहीत धरून चालत असतो!
खूप खूप आभार, मायबोली :) होय
खूप खूप आभार, मायबोली
होय जिज्ञासा, हा लेख आहे blog वर.
हे सगळं बोलताना लिन इतकी हळहळत होती... नापास झालेल्या मुलाला मेरिटमधे आलेल्याने पेढे दिल्यावर कसं होईल, तसंच काहीसं. दर रक्षाबंधनाच्या आणि भाऊबिजेच्या आधी आठवण होते मला; आम्ही भावंडं एकमेकांची ओवाळणी आहोत असं वाटतं.
ऋन्मेष, मायबोलीवर आहेतच की रे तुझीच भावंडं
मनापासून लिहिलेलं आवडलंच.
मनापासून लिहिलेलं आवडलंच. भावंडांची, माणसांची श्रीमंती खरंच वेगळी व समृध्द असते. तिची जागा जगातली बाकीची कोणतीही गोष्ट भरून काढू शकत नाही.
कितीतरी गोष्टी आपण कित्ती
कितीतरी गोष्टी आपण कित्ती गृहीत धरून चालत असतो! >>>>>>>> +१
मला खुपच आवडला लेख!
मला खुपच आवडला लेख!
Pages