बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं. आपल्या इथपर्यंतच्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलीच दिशा नाही ही मनाशी ठामपणे ठरवलेली गोष्ट नक्की त्या माणसाला कशी सांगायची या विचारानेच रडू येत होतं. त्यात तो बर्फ, सभोवताली पसरलेला, कुठे कुठे काळामिट्ट झालेला तर कुठे कुठे थरावर थर बसून अक्राळविक्राळ झालेला. बसने गेल्यामुळे मी अर्धा तास आधीच पोहोचले, म्हणून मग तिथेच असलेल्या स्टारबक्समध्ये माझी आवडती कॉफी घेऊन पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागले.
"खरंतर असं कौन्सेलरकडे वगैरे जाण्यासारखं काहीच नाहीये. आपल्याला अशा काय जबाबदाऱ्या आहेत. मिळालेला पैसा आपण भारी भारी स्नो बूट्स नाहीतर जीन्स घेण्यात उडवतो. इथे अशी हवी तशी कॉफी घेऊन कुठल्यातरी दुःखाचं पोस्ट मॉर्टम करायची वाट बघतोय. रिडिक्यूल्स!"
पुन्हा तेच विचारचक्र सुरु झाले. मोठ्या माणसांकडून कित्येक वेळा ऐकलं होतं. "काही जबाबदाऱ्या नाहीत ना म्हणून येतं हे असं डिप्रेशन."
"तुमच्या पेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बघा"
हे सगळे आवाज हळू हळू माझाच आतला आवाज बनून गेले होते. एक क्षण वाटलं नकोच ते. असंच परत जावं. पण आपण कुणालातरी सकाळी सात वाजता या अशा थंडीत आपल्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे असं पळून नाही जायचं, असा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये गेले.
जॉनथन च्या ऑफिस बाहेर लांबच लांब कॉरिडॉर होता. ठोकळ्यासारख्या बिल्डिंगमध्ये तो करडा चौकोनी कॉरिडॉर अजूनच खच्ची करत होता. मधेच आपल्याला जे वाटतंय तो या गावाचा तर परिणाम नाही ना, असाही विचार डोकावून गेला मनात. तेवढ्यात त्या लांबलचक कॉरिडॉर च्या दुसऱ्या टोकाला एक उंच माणूस खांद्यावर सायकल लटकवून येताना दिसला. जशी जशी त्याची आकृती जवळ आली तशी मी त्याला कधीही पाहिलेलं नसताना देखील हा तोच आहे अशी मला खात्री पटली. त्यानीदेखील मला ओळखलं असावं, कारण माझ्याशी हस्तांदोलन करायच्या खूप आधीच, लांबूनच माझ्याकडे बघून तो हसला. त्या निर्मळ आणि खुल्या हास्याच्या आठवणीचा देखील मला खूप आधार वाटतो.
पुढचे सात आठवडे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारची मी अतिशय आतुरतेने वाट बघू लागले. जॉनाथन चूक बरोबर अशा पठडीतून माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याच्या बरोबर बोलून नेहमीच हलकं वाटायचं आणि त्यानी दिलेले होमवर्क करण्यात प्रचंड मजा यायची. थोडेच दिवसांत नुसतं त्याला भेटण्याबद्दल नाही, तर त्या सकाळच्या बर्फात पाऊलखुणा उमटवण्यापासून ते अर्धा तास आधी पोचून, कॉफी पिण्याबद्दलदेखील मला प्रेम वाटू लागलं. आणि ज्या गोष्टीमुळे मला जॉनाथनकडे जावं लागत होतं, त्या आयुष्यात घडल्याबद्दल कुठेतरी थोडीशी कृतज्ञतादेखील वाटू लागली. हा योग्य शब्द आहे नाही माहिती नाही, पण आपण इंग्रजीमध्ये ज्याला 'बीइंग ग्रेटफूल' असं म्हणतो तसं काहीसं.
हे सगळे प्रसंग मी "डिअर जिंदगी" हा सिनेमा बघताना (रडत रडतच) पुन्हा जगले. सिनेमा बघताना रडण्यात माझा आधीपासूनच हातखंडा आहे. आणि यावर्षी पिंक, डिअर जिंदगी, दंगल असल्या सिनेमांनी माझ्या या स्वभावाला खच्चून प्रोत्साहन दिले आहे. हा काही डिअर जिंदगीचा रिव्यू नाही. पण ज्या सिनेमानी एका दर्शकाला आपला अनुभव लिहायला असं प्रोत्साहित केलं त्याचा रिव्यू वगैरे लिहायची काहीच गरज नाही.
आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.
अशी मदत न घेण्याची कित्येक कारणं आपल्याकडे असतात. पण अशी मदत घेऊन आपण कमकुवत आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देत आहोत असा समज करून घेणे धोक्याचे आहे. दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.
अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे. नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.
त्यामुळे जर कुणी मी पहिल्या अपॉइंटमेंटच्या आधी तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.
लेख छान..पण माझा एक प्रश्न
लेख छान..पण माझा एक प्रश्न आहे..
हा लेख एक उत्तर वा उत्तर च्या प्रोसेस बद्द्ल आहे ज्यच्या प्रिटेक्स्ट "डिप्रेशन व ते येण " हे आहे..
पण डिप्रेशन आल म्हणजे नेमक काय झाल..?
ते कशा मुळे आल ?
ते आल्यावर कस फिल होत, काय वेगळ फिल होत..तस का फिल होत?
ज्याना कुणाला डिप्रेशन आलेल, आणी त्यानी ते घालवल, ते जर या वरिल प्रश्नाच उत्तर दिलीत..तर डिप्रेशन कस येत, काय होत हे कळायला मदत होइल..
नाहीतर ह्यालाच डिप्रेशन म्हाणतात हे कळनार नाही आणी ते नाही कळल तर मग ते फिक्स कस करनार..
ता.क..: स्वताचे अनुभव सांगावेत.. कुठली लिंक देउ नये...
उत्तम लेख. <तळ्यात मळ्यात
उत्तम लेख. <तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.> यासाठी सहमत. डिप्रेशन मुळे सुसाईड च्या दोन केसेस अगदी जवळून बघितल्या आहेत त्यापैकी एक अल्पवयीन तर दुसरी एमबीबीएस एमडी डॉक्टर. ही दोन्ही जण अतिशय संवेदनशील होती, खूप विचार करणारी, कमी बोलणारी अशी होती. दोन्ही केसेस मध्ये थोडे उदासी आहे, मनाविरुध्द गोष्टी झाल्या आहेत, एकटेपणा आहे हे जाणवत होते पण एवढी टोकाचे पाऊल घेतील असे वाटले नाही..
रॉबीन विल्यम सारखे लोकही असतात ज्यांना काउंसलींग आणि मेडीकेशनचा दोन्हीचाही फरक पडला नाही. जेनेटिक व्याधी नसेल तर टोकाचे डिप्रेशन येऊ नये यासाठी जडणघडण, फायटर अॅटीट्यूड, लहानपणीचे अनुभव चा जास्त परिणाम होत असावा.
रॉबिन विल्यम्सच्या
रॉबिन विल्यम्सच्या आत्महत्येबद्दल त्याच्या पत्नीची मुलाखत.
स्वाती, मुलाखत वाचली.
स्वाती, मुलाखत वाचली. त्याच्या आत्महत्येची एकमेव कारण डिप्रेशन नसू शकेल पण बरीच वर्षे तो काउंसलींग आणि मेडीकेशन दोन्ही घेत होता हे वाचले होते तरीही त्याला फायदा झाला नाही हे म्हणायचे होते. त्याच्या बायकोने जो dementia with Lewy bodies (DLB)आजार लिहला आहे तो मेंदूचा आजार आहे असे दिसते. मन हा फिजिकल अवयव नसल्यामुळे क्रोनिक डिप्रेशन हाही एक प्रकारचा मेंदूचाच आजार मानायला हरकत नाही आणि या आजारावर १००% मात करणारा उपाय अजून अस्तितवात नाही असे दिसते.
छान लेख आणि प्रतिसाद. अशा
छान लेख आणि प्रतिसाद. अशा लेखांची खूप गरज असते.
आपल्याला एखादा सेटबॅक हँडल करता येत नाही हा दुबळेपणा नाही, खूप लोकांना ते जमत नाही हे बघितल्यावर आपण नॉर्मल आहोत, ह्या विचारानी बरं वाटतं.
माझ्या समोरची दोन जोडप्यांची उदाहरणे.
एका केसमध्ये नवर्याने बायकोला लग्नानंतर लगेच सांगितलं होतं की, माझे वडील मी दोन वर्षांचा असताना वारल्यानंतर खूप कष्ट करुन वाढावलं आहे. तिचे काहीही चुकलं तरी तिच्याबद्द्ल कुठलीही तक्रार मी ऐकून घेणार नाही आणि असंचं काही. थोडक्यात आजच्या जमान्यातही नवरा बायको आहेत. इक्वल पार्टनरर्स नाहीत.
दुसर्या केसमध्ये नवरा बायकोच्या इतका प्रेमात की एका शहरात राहुनही त्याचे स्वतःच्या आईवडीलांकडे अजिबात जाणे येणे नाही, अगदी प्रत्येक सणासुदीला देखील सुटी काढून बायकोच्या माहेरच्या शहरात. वगैरे वगैरे.
दोनही केसेस दुर्दैवाने एक्सट्रीम आहेत. पण या दोनही मुलींची पर्सनल आणि इतर प्रॉबलेम्सशी डील करण्याची पध्दत चेंज होताना बघितली आहे. पहिलीचा बेसि़क काँफिड्न्स हळूहळू जाताना आणि दुसरी ओव्हरकाँफिडन्ट होताना. दुसरीचं मानसिकची स्वास्थ्य चांगलं आहे.
पहिलीचा मात्र दृष्टीकोण पूर्ण बदलून गेला. तिचं प्रत्येक छोट्या गोष्टीत रडगाणं आणि तक्रारी असतात. लोकं तिला थोडं टाळतात सुध्दा. आईवडीलही किती ऐ़कून घेत असतील कोणास ठावूक.
त्यामुळे सिमिलर प्रॉब्लेमशी लढण्याची दोघींची क्षमता खूप वेगळी आहे, किंवा परिस्थितीमुळे बदलली आहे. त्यामुळे दुसरी ज्या गोष्टीशी लढू शकते तिथे पहिलीला औषधे घ्यावी लागतात याचा गिल्ट घालवायला असे लेख उपयोगी पडतात. तसेच आपल्याला छोट्या किंवा किरकिर वाटणार्या तिच्या तक्रारी या तिच्यासाठी मोठ्या असू शकतात याची माझ्यासारख्या तिच्या आजूबाजूच्या लोकांना पुन्हा जाणिव करून देतात.
*****
काही गोष्टी प्रत्येकात डीफॉल्ट असतात (किंवा नसतात). 'दंगल'मध्ये दोन तीन वेळा गीताला उद्देशून डायलॉग आहे, "हारना नही". त्या प्रत्येक वेळी ती हारण्याच्या वर्जवर असते, त्या वाक्याने तिला स्फूर्ती येउन ती जिंकते.
मला जर कुठल्या क्रिटिकल वेळेस कोणी "हारना नही" असं सांगितलं तर त्या प्रेशरमुळे माझी शक्तीच जाईल. त्यापेक्षा माझे आईवडील जसं सांगतात, की ठीक आहे, जो रिझल्ट असेल तो चालेल, इट्स ओके. त्यामुळे मी प्रेशराचा विचार न करता योग्य ते पाउल उचलू शकते.
त्यामुळे जिंकायचे'च' असेल तिथे त्या प्रेशरशी डील करायला मला मदत लागेल. आणि अशा छोट्या मोठ्या प्रसंगी स्वतःचे लिमीटेशन्स ओळखून प्रोफेशनल मदत घेण्याची बाउ करायची गरज नाही हे अशा लेखांमुळे पुन्हा ठळक होते.
धन्यवाद.
मोरपंखनीस १. काम करावेसे न
मोरपंखनीस
१. काम करावेसे न वाटणे. किंवा सकाळी उठूच नये असे वाटणे. (असे वाटणे म्हणजे तसे करणे नव्हे. कारण आपण जे वाटतं ते सगळं नेहमी करू शकत नाही. त्यामुळे "तुझं तर सगळं छान चाललंय" असं वरून वाटणारा माणूस पण डिप्रेस्ड असू शकतो)
२. सारखे रडू येणे.
३. झोपेत बदल होणे. माझ्या बाबतीत झोप कमी झाली होती. नॉर्मली ७-९ तास असते. मला पहाटे ३-३:३० लाच जाग येऊ लागली होती. आणि त्यानंतर उजेड होईपर्यंत अस्वस्थ वाटायचे.
मला एवढे तीनच बदल साधारण ३ महिने जाणवले. पण यात मी सुट्ट्या घेणे वगैरे केले नाही कारण घरी बसून मला अजून त्रास व्हायचा.
औषधांचा मला अनुभव नाही कारण मी ती घेतली नाहीत. त्यामुळे मी यावर फार बोलू शकत नाही. पण इथे चालू असलेल्या चर्चेतून नवीन गोष्टी कळतायत ते पण चांगलं आहे.
सई छान लेख. स्वाती आंबोळेंचे
सई छान लेख.
स्वाती आंबोळेंचे प्रतिसाद आवडले
मला एवढे तीनच बदल साधारण ३
मला एवढे तीनच बदल साधारण ३ महिने जाणवले. >> हे बदल नेमके कशामुळे झाले?
समुपदेशनानंतर यातून बाहेर पडण्यासाठी कोणकोणते उपाय अमलात आणले? याबद्दल थोडी सविस्तर माहिती मिळाली, तर या नैराश्याच्या मुळाशी जाता येइल.
सई छान लेख. तो रियाझ चा
सई छान लेख.
तो रियाझ चा प्रतिसाद आहे न तो तर - अगदी अगदी
स्वाती आंबोळेंचे प्रतिसाद आवडले
जे कोणी या गोष्टीवर शंका घेतायत त्यांनी एक करा
जे कोणी अशा जोनाथन कडे जावून आलेत त्याच्या कुटुंबियांशी बोला. आपल्या जोडीदाराच्या , मुलाच्या आयुष्यात घडलेले बदल तेच सांगू शकतात.
सई छान लेख व प्रतिक्रिया
सई छान लेख व प्रतिक्रिया तित्क्याच छान! स्वाती आंबोळे व वैद्यबुवांचे प्रतिसाद विशेष आवडले. लोक आता स्वतःविषयी बोलू लागलेत ही समाधानाची बाब. त्यामुळे इतर लोकांचे गैरसमज दूर होण्यास परस्पर मदत होते. दोन समुपदेशकांचा/ मानसोपचार तज्ञांचा केस कडे बघण्याचा दृष्टीकोन भिन्न असू शकतो त्यामुळे सामान्यांचा गोंधळ वाढतो हे देखील खरे आहे. एखाद्या डॉक्टरांच्या मते एखाद्या केस मधे शस्त्रक्रिया अत्यावश्यक आहे तर दुसर्याच्या मते नाही असे होताना आपण पहातो. मग शेवटी आपल्या बुद्धीच्या तारतम्याकडे जावे लागते. हितचिंतकांचि मदत घ्यावी लागते.
अशा लेखांची आणि त्यावरील
अशा लेखांची आणि त्यावरील चर्चेची किती गरज आहे हेच पुन्हा अधोरेखित होते आहे.
आनंदी राहण्याचा रियाझ हे तर अगदीच बेश्ट.
छान! एखादा विरोधी सूर दिसला
छान! एखादा विरोधी सूर दिसला की त्यालाच कौन्सेलिंगची किती गरज आहे असे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे म्हणून सुखावणे हे पुन्हा एकवार घाऊकपणे दिसून आले. त्याच्यापलीकडे काही बोललेच जाऊ नये ही भूमिका काही समजत नाही.
कौन्सेलिंगची अफाट गरज आहे/ असू शकते, ती असण्यात कमीपणा नाही, समूपदेशनामुळे मदत होते, मानसशास्त्र व समूपदेशन हे वाटते तितके मागास नाही, शरीराप्रमाणेच मनही मेन्टेन करावे लागते हे सगळे सगळे मान्य आहे. (आता पुढचे लिहू का?)
>>>>आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.<<<<
ह्या परिच्छेदावरून प्रतिसाद दिलेले होते. आनंदी जीवनाचे रहस्य म्हणजे जवळची नाती आहेत हे त्या आज म्हातार्या झालेल्या कालच्या व तिकडच्या तरुणांनी सांगावे आणि आपण वाचून माना डोलवाव्यात, असे का? इथली कुटुंबव्यवस्था म्हणजे काय आहे मग? पुन्हा एकदा, 'जवळची नातीच अडसर ठरू शकतात' ह्याला अजिबात विरोध नाही, फक्त वर कोट केलेली वाक्ये त्या लोकांनी सांगावीत आणि आपण नवीन काही समजल्याप्रमाणे आनंद मानावा हे काही पटत नाही.
दुसरे म्हणजे 'आनंदी व समाधानी राहणे ही चैन नसून जबाबदारीसुद्धा आहे' ह्या वाक्याबाबत! हा विचार येथे सहजरीत्या पटावा अशी परिस्थिती देशात नाही. इथे बोंबलायला एक निर्मळ हास्य मुखावर यायला कैक आठवडे लागतात असा सभोवताल आहे. सुविचार लिहिले की ते आचरणात आणता येतात अशी अवस्था इथे नाही.. प्रत्येक पावलाला ताण, कटकट आहे. जिथे जगताना मूलभूत आव्हानांशीच झगडा असतो तिथे 'आनंदी राहण्याची जबाबदारी' वगैरे कोण घेत बसणार?
तुमच्या प्रतिसादातील शेवटचे
तुमच्या प्रतिसादातील शेवटचे दोन परिच्छेद एकमेकांना इतके विरोधी का आहेत?
जर या देशातली पारिवारिक संस्कृती इतकी चांगली आहे की एखाद्या शास्त्रीय पद्धतींनी केलेल्या अभ्यासाची सुद्धा गरज नाही. तर मग तुमच्या चेहऱ्यावर हासू यायला कुठला अडथळा आहे? नोटबंदीचा?
>>>>नोटबंदीचा?<<<< सहसा
>>>>नोटबंदीचा?<<<<
सहसा स्वतःच्या धाग्यावर इतरांनी चर्चा भरकटेल अशी विधाने करू नयेत अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. तुमचे निराळेच दिसते.
सई, तू करेक्ट असलीस, तरी
सई, तू करेक्ट असलीस, तरी डोन्ट फीड द ट्रोल्स.
आपण आनंदी आणि समाधानी राहणे
आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे >>> +१०
लिखाण आवडले.
>>>>तुमच्या प्रतिसादातील
>>>>तुमच्या प्रतिसादातील शेवटचे दोन परिच्छेद एकमेकांना इतके विरोधी का आहेत?<<<<
आनंदी जीवनाचे रहस्य म्हणजे जवळची नाती आणि आनंदी राहणे ही जबाबदारी आहे अश्या दोन परस्परविरोधी विधानांवरील परिच्छेद असल्यामुळे तेही परस्परविरोधी वाटू शकतील.
मला जवळचे नातेवाईक आहेत आणि कधीही मला आनंदाची व्याख्या विचारली तरी ते माझ्याबरोबर असावेत अशीच ती असेल. पण म्हणून नेहमीचे जीवन जगत असताना आनंदी राहण्याची जबाबदारी कृत्रिमपणे व नियमीतपणे स्वीकारणे मला सहज शक्य नाही. दु:ख, ताण, समस्या ह्यातूनच खरे तर नाती तावून सुलाखून निघतात.
पण म्हणून नेहमीचे जीवन जगत
पण म्हणून नेहमीचे जीवन जगत असताना आनंदी राहण्याची जबाबदारी कृत्रिमपणे व नियमीतपणे स्वीकारणे मला सहज शक्य नाही.> हे सहज व्हावे कृत्रिमपणे नाही म्ह्णुन हा लेखप्रपंच आहे असे मला वाटले.
दु:ख, ताण, समस्या ह्यातूनच खरे तर नाती तावून सुलाखून निघतात.>> मान्य.
पण दु:ख, ताण, समस्या सगळ्यांनाच हाताळता येत नाही,तिथे बाहेरची मदघ्यावेवी फायहोत्त्तो.
ए आर सी, दोन्हीबाजूने तेच
ए आर सी,
नियमीतपणे व ठरवून आनंदी राहणे हे सहजपणे होण्यासाठी समूपदेशन सहाय्यकारक ठरेल हे मान्य, पण काही प्रमाणातच! 'आपल्या अस्तित्वाच्या' बाहेरच्या जगात (ज्यात अगदी रक्ताच्या नातेवाईकांपासून ते संपूर्ण बाहेरचे जग मोडते) इतके नकारात्मक घटक कार्यरत असू शकतात की समूपदेशनामुळे 'सहजपणे आनंदी राहण्याचा' जो मार्ग सुचवला गेला असेल तो एका पातळीनंतर निष्प्रभ ठरू शकेल. ह्यात कोठेही समूपदेशन कुचकामी आहे असे अजिबात म्हणायचे नाही. त्यालाही मर्यादा असू शकतील असे म्हणायचे आहे. समूपदेशकाकडे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पात्र आहे असे काहीसे म्हंटल्यासारखे वाटत आहे, ते पटत नाही. दुसरे म्हणजे समूपदेशन हा आनंदी राहू शकण्याचा एखादा रामबाण उपाय आहे असे म्हंटल्यासारखे वाटत आहे, तेही पटत नाही. तसे असते तर निम्मे नागरीक समूपदेशक आणि उरलेले त्यांचे क्लाएन्ट्स झाले असते.
माझ्या आयुष्यात आनंद व दु:ख दोन्ही आहे. माझ्या आयुष्यात जवळची नाती व 'जवळची नातीच अडसर ठरणे' हे दोन्ही प्रकार आहेत. जवळची नाती हाच माझा आनंदही आहे. असे असताना मी 'नियमीतपणे व सहजपणे आनंदी राहावे व ती मी माझी जबाबदारी समजावी' अशी माझी अपेक्षाच नाही. मला दु:ख, समस्या, तडजोडी ह्या सगळ्यांचे अस्तित्व मान्य आहे. आहे तसे आयुष्य व त्यातील तडजोडी स्वीकारून आहे त्यात आनंद मानणे हे नैसर्गीक आहे. त्या नैसर्गीक भावना अधिक महत्वाच्या वाटतात. रडायची, त्रागा करायची, संतापायची, कुढायची आणि हसायची, हसवायची असे सगळे काही करायची माझी तयारी आहे. मी मुद्दाम आनंदी राहिल्यामुळे घरातील इतरांना सहाय्य होऊ शकेल हे समजू शकतो. पण भिंतीला गिलावा दिल्याने कन्स्ट्रक्शनची क्वॉलिटी सुधारणार नाही.
जवळची नाती हाच आनंद आहे आणि आनंदी राहणे ही जबाबदारी आहे ही दोन विधाने मला चक्क विरोधी वाटली.
Liked the article. Swati, i
Liked the article. Swati, i have experienced ur post.
I used to love Ayn Rand books - but a few yrs back they started to feel like too one sided. And horrific as I started studying ecology.
रोजच्या आयुष्यातील समस्या
रोजच्या आयुष्यातील समस्या प्रत्येकालाच असतात पण त्यातही मन सुस्थितीत असेल तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत असतो. मनात येणार्या उद्याबद्दल आशा असते. डिप्रेशन या आजाराने हे सगळे थांबते. इतके की आजूबाजूला आनंदी घटना घडली तरी मनात आनंद झिरपतच नाही. अगदी स्वतःच्या कुटुंबात काही चांगले घडले तरीही मन नैराश्याच्या काळोखातच रहाते.
अपत्याला चांगल्या युनिवर्सिटीत स्कॉलरशिपवर अॅडमिशन मिळालेय पण नैराश्याच्या गर्तेतील बाबा तो आनंद पूर्णपणे उपभोगू शकत नाहीयेत. उत्साहाने अपत्याच्या कॉलेजसाठी खरेदी, इतर तयारी करण्या ऐवजी खोलीत झोपून आहेत. कॉलेजच्या खर्चाची काळजी नाहीये. मूल सदवर्तनी आहे. प्रेमळ पत्नी आहे. पण मनातला काळोख संपतच नाही. हे जवळच्या व्यक्तीबाबत अनुभवले आहे.
आनंदी रहाण्याचे रहस्य जवळची नाती मग ती रक्ताची असो वा जोडलेली. मात्र मानसिक आजारात या नात्यांवर देखील ताण येतो. रुग्ण जेव्हा वैद्यकीय मदत घेणे नाकारतो तेव्हा केवळ डिप्रेशन आलेल्या व्यक्तीच्याच आयुष्यावरच परीणाम होतो असे नाही तर त्याच्या जवळच्या माणसांची आयुष्यही उलटीपालटी होवून जातात. त्यामुळे या नात्यांशी असलेली आपली बांधिलकी म्हणून, आपण त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे एक कारण आहोत म्हणून तरी डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी उपचार घेवून आनंदाच्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात करणे ही जबाबदारी . हा मी लावलेला अर्थ.
>>>> स्वाती२ | 9 January,
>>>> स्वाती२ | 9 January, 2017 - 18:57 नवीन <<<<
ओके!
इथे डिप्रेशन ही समस्या आहे हे लक्षात आले नाही. शुभेच्छा व्यक्त करतो.
....
....
>>>>उत्तर नसल्यास राहु
>>>>उत्तर नसल्यास राहु द्या...<<<<
मी दिलेले प्रतिसाद चुकीचे होते. क्षमस्व!
सर्वांचे भले होवो!
मोरपंखी, तुम्हाला डिप्रेशन
मोरपंखी, तुम्हाला डिप्रेशन झूट वाटत असेल तर तुमच्याइतक्या नशीबवान तुम्हीच. तुमचं असं वाटणं अबाधित राहो हीच शुभेच्छा.
तुम्हाला डिप्रेशन आलेल्यांचेच अनुभव ऐकायचे होते त्यामुळे मी माझ्या पाहण्यातले अनुभव लिहिले नाहीत. पण इथे मतप्रदर्शन करण्याआधी नेटवर सहज सर्च केला असतात तर बरीच माहिती (लोकांच्या 'स्वत्ताच्या' अनुभवांसहित!) मिळाली असती. असो.
कारणपरत्वे शारीरिक आणि मानसिक स्थितींमध्ये तात्पुरते चढउतार होणं आपण सगळेच अनुभवतो. कारणांत दगदग आली, आजारपणं, प्रापंचिक काळज्या, व्यावसायिक ताण इ.इ. आले. चढउतारांत हर्षवायूपासून नैराश्य, चिडचीड, अस्वस्थता, औदासिन्य, थकवा हे परिणाम. सहसा कारणावर इलाज झाला (दमलो असू तर पुरेशी विश्रांती मिळाली, नोकरी गेली होती ती दुसरी मिळाली, इ.) की, किंवा जिथे उपाय नसतो (उदा. कोणा निकटवर्तियाचा मृत्यू इ.) तिथे कालांतराने आपल्याला 'बरं' वाटतं.
'बरं' वाटतं म्हणजे काय? म्हणजे आपण 'अॅन्ड दे लिव्ह्ड हॅप्पिली एव्हरआफ्टर' स्टेजला पोचतो का? नाही. आपण उर्वरित आयुष्यातील बर्यावाईट घटनांना सामोरे जायला सक्षम होतो.
डिप्रेशनसारख्या विकारांत (यांची रेन्ज खूप मोठी आहे आणि मी कोणी तज्ज्ञ नाही) हे घडत नाही. तात्कालिक कारण असतंच असं नाही आणि त्यावर उपाय सापडला म्हणून 'बरं' वाटतंच असं नाही. डिप्रेशन म्हणजे माणूस 'दु:खी'च असेल असं नाही - इन्डिफरन्ट होवू शकतो. काहीच 'आतवर' पोचत नाही अशा मनःस्थितीत दिवसचे दिवस, महिनेच्या महिने राहू शकतो. ज्या अॅक्टिव्हिटीज त्या व्यक्तीला एरव्ही आवडत असतात (मित्रमंडळींशी गप्पा, कौटुंबिक संमेलनं, प्रवास, व्यायाम, काम, धार्मिक कार्य, सिनेमा, वाचन, सेक्स, इ.इ.) त्यात अजिबात रस उरत नाही. कारणाशिवाय अस्वस्थता, चिडचीड, रडारड, दिवसचे दिवस झोप न लागणं किंवा अक्षरश: दिवसचे दिवस झोपून काढणं, भूक मरणं किंवा अती लागणं इ.इ. खूप मोठ्ठ्या रेन्जमधली लक्षणं दिसतात. अशा व्यक्ती निकटवर्तियांच्या कोणत्याही प्रयत्नांना (प्रेम, राग, रुसवा, आर्जव, धाक, आमिष, धमकी) रिस्पॉन्स देण्याच्या स्थितीत नसतात. यात जेनेटिक फॅक्टर्स कार्यरत असू किंवा नसू शकतात. टोकाच्या केसेसमध्ये माणूस आत्महत्येस (निष्कारणसुद्धा!) प्रवृत्त होऊ शकतो.
योग्य उपचारांनी (यात औषधं आणि समुपदेशन दोन्ही आलं) या अवस्थेवर काही प्रमाणात ताबा मिळवता येऊ शकतो. म्हणजे माणूस तोंडावर स्माइल चिकटवलेला झॉम्बी होतो का? नाही. तो आयुष्यातील बर्यावाईट घटनांना सामोरे जायला सक्षम होतो.
ही माहिती अपूर्ण आहे, हा विषय खूप मोठा आणि क्लिष्ट आहे आणि मी तज्ज्ञ नाही. पण विषयाच्या गंभीरपणाची थोडीशी कल्पना येईल अशी आशा आहे.
सई, अतिशय सुंदर लेख, स्वाती
सई, अतिशय सुंदर लेख,
स्वाती आंबोळे यांचे प्रतिसाद सुद्धा सुरेख,
इतरही काही प्रतिसाद अतिशय नेमके आहेत.
सगळ्यांनाच एक विनंती, चांगली चाललेली चर्चा प्लिज फिस्कटवू नका,
इंस्टीगेटिंग प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा,
काही लोकांना कायम आपण जगाच्या केंद्रस्थानी असावे असे वाटते,
आपण लेख हाच केंद्रबिंदू ठेऊन डिस्कशन करू या.
...
...
Swati a is totally right.
Swati a is totally right. Depression does exist.some times close knit Indian families can be suffocating. Also in my humble opinion modern life puts a person in some very difficult situations which the family simply was not built to handle. It can be supportive at one level. But to arrive at a resolution of complex issues one may need professional intervention. A counsellor helps one bring out deep seated issues and put them on the table. If not confront them and resolve.
मी वर दिलेले प्रतिसाद ही माझी
मी वर दिलेले प्रतिसाद ही माझी मते अजूनही आहेत, पण चर्चा 'ज्या' वळणावर गेलेली दिसत आहे तेथे माझ्या प्रतिसादांमधील भावना अस्थानी वाटू लागलेली आहे.>>>>>> चर्चा आधी सुद्धा डिप्रेशनवरच होती आणि नंतर सई, स्वाती, स्वाती२ आणि इतर काही लोकांनी त्या बद्दल आणखिन सविस्तर लिहिलं. भावना अस्थानी असायचा बल्ब इतक्या उशिरा कसा काय पेटला तुमचा? तुम्हाला नसेल माहिती की डिप्रेशन हा प्रॉबलेम असतो लोकांना, जो खरा आहे, पण मग सुरवात करतानाच चेष्टेचा किंवा उपरोधक सुर का?
इथे बोंबलायला एक निर्मळ हास्य मुखावर यायला कैक आठवडे लागतात असा सभोवताल आहे. सुविचार लिहिले की ते आचरणात आणता येतात अशी अवस्था इथे नाही.. प्रत्येक पावलाला ताण, कटकट आहे. >>>>>>> ज्या माणसाला दररोज अगदी मुलभूत गोष्टींकरता लढावं लागतं तिथे त्यांना नैराश्य ह्या विषयावर विचार करायला कुठे वेळ आहे हा मुळातच फॉल्टी लॉजिक असलेला प्रश्न आहे. ह्या झगडणार्या लोकांना सुद्धा त्रास होतो आणि त्यामुळे त्यांचं जीवन आणखिन जास्त कठिण होत असेल. तुम्ही जर बघितलं तर लक्षात येइल की काही लोकं हिंमत दाखवून त्यांच्या परिनी पुरेपूर प्रयत्न करत असतात झुंज द्यायची आणि जमल्यास त्या परिस्थितीतून बाहेर पडायची. काही लोकं बाहेर पडतात सुद्धा पण काही लोकं बिचारे धारातिर्थी पडतात. त्यातल्या कित्येक जणांना हा आजार असू ही शकतो पण त्या विषयी बोलणं ही त्यांच्या आयुष्याची प्रायॉरिटी नाही. अहो डिप्रेशन तर सोडा अगदी सगळ्यांना माहित असलेला आणि प्राणघातक म्हणून अगदी प्रसिद्ध असलेला हृदयविकाराच्या दुखण्यांकरता वगैरे सुद्धा काही लोकं डॉक्टर कडे जात नाहीत. कारण डॉक्टरकडे गेलं की खर्च होतो म्हणून.
हे सगळं खरं असलं तरी डिप्रेशनचा आजार हा खरा आहे आणि तो लोकांना असतो ही पण वस्तुस्थिती आहे.
ह्या उपर ज्या लोकांना मुलभूत गरजांकरता झगडावं लागत नाही त्यांना आनंदानी जगायचा हक्क आहेच की? आणि त्यांना जर ह्या आजाराकडे जातीनी लक्ष द्यायची मुभा असेल तर ते देतीलच. विचार न करता बळच श्रीमंतांचं दुखणं वगैरे छापची लेबलं लावणं म्हणजे अगदी उथळ विचारसरणी (डेप्थ नसलेली) असल्याचं लक्षण आहे.
मला हे मान्य आहे की डिप्रेशन
मला हे मान्य आहे की डिप्रेशन असत... (काय राव.. इथ उपरोध पण समजाउन सांगावा लागतो)...
माझ म्हणन इतक होत की इथ Solution बाबतीत ढीग भर चर्चा झाली ती योग्य आहे..
पण diagnosis of diseases हेच नव्हत नीट सांगीतल... हे या कारणा साठी म्हणतोय कि माझ्या आजुबाजुला नातलगा मध्ये जर मला अस कोणि आढळल तर मी त्या प्रमाणे विचार करुन त्याला किंवा त्याच्या आई वडिल यांना या बाबत काही सुचवु शकतो (तुम्ही सांगीतलेल्या माहीतीचा diagnosis of diseases मध्ये मदत होउ शकते)..
आता आजुन याच उत्तर गुगल वर शोधा हेच असेल तर.. काय बोलनार पुढे..
Pages