सचिननामा-५: बोलर सचिन

Submitted by फारएण्ड on 2 January, 2017 - 22:12

"He is the one man you would expect to pick a wrong 'un"
इयान चॅपेल ची चपखल कॉमेण्ट - सचिन ने शेन वॉर्नला गुगली वर फसवल्यावर. सचिनचा एक जबरदस्त बोलिंग परफॉर्मन्स, २००१ च्या त्या कलकत्ता कसोटीतील. या सिरीज मधेही तो पहिल्या टेस्ट मधे मुंबईला आणि तिसर्‍या टेस्ट मधे चेन्नईला जबरदस्त खेळला होता. फक्त कलकत्याला बॅटिंग मधे अपयशी ठरला. ती उणीव त्याने चौथ्या डावात बोलिंग मधे भरून काढली. ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट्स बाकी असताना गिलख्रिस्ट, सेट झालेला हेडन आणि शेन वॉर्न तिघांना उडवून त्याने भारताला विजयाच्या दारात नेउन ठेवले. त्यातली शेन वॉर्न ची विकेट सर्वात धमाल आहे - कारण त्याने खुद्द शेन वॉर्न ला गुगली वर काढला आणि त्याला तो अजिबात समजला नाही. आधी गिल्ख्रिस्ट व हेडनला त्याने ऑफ स्पिन वर काढले होते, त्यामुळे त्याच्या स्पिन ची दिशा तीच असेल अशा अपेक्षेने वॉर्न खेळला, पण प्रत्यक्षात बॉल आत आला आणि तो एलबीडब्ल्यू झाला.

पण मला सर्वात आवडणारी त्याची विकेट म्हणजे २००४ च्या मुलतान कसोटी तिसर्‍या दिवशी शेवटच्या बॉल वर काढलेली मोईन खान ची. याच्याच आदल्या दिवशी बरेच नाट्य झाले होते. सचिन १९४ वर नाबाद असताना त्या दिवशी थोड्या ओव्हर्स टाकता याव्यात म्हणून द्रविड ने डाव घोषित केला. त्या संध्याकाळी टीम मॅनेजमेण्ट मधे बरेच काही घडले. जॉन राईट, गांगुली सकट अनेकांना वाटत होते की यातून टीम मधे दुफळी होणार. मात्र द्रविड ने सचिनशी याबाबत बोलण्याचा योग्य निर्णय घेतला व हा वाद मिटला. तरीही त्याचे पडसाद मॅच मधे उमटतात की काय अशी भीती होती. या तिसर्‍या दिवशी भारताच्या ६७५/५ ला उत्तर देताना पहिल्या डावात पाक ३४६/५ वर होते आणि मोईन खान व अब्दुल रझ्झाक खेळत होते. ते तसेच दिवसअखेर नाबाद राहिले असते तर पाक ने फॉलो ऑन कदाचित दुसर्‍या दिवशी टाळला असता. पण हा त्या दिवसाचा शेवटचा बॉल इतका भन्नाट गुगली होता की आधीच नर्व्हस असलेल्या मोईन खानला तो अजिबात झेपला नाही. त्याच्या पायांमधून तो स्टंप्स वर गेला.

इथेच सामना पुन्हा भारताच्या दिशेने फिरला. मग दुसर्‍या दिवशी इरफान पठाण व सचिन यांनी ४ ओव्हर्स मधे आणखी तीन विकेट्स उडवल्या. आणि पाकला ४०७ वर रोखले. याचा फायदा असा झाला, की भारताच्या बोलर्स ना आधीच्या रात्री विश्रांती मिळाल्यावर सकाळी खूप ओव्हर्स बोलिंग करावी लागली नाही, व द्रविड ला फॉलो ऑन देणे शक्य झाले, आणि दुसर्‍या डावात मग पाक ला लौकर उडवून भारताने मॅच जिंकली. इथे मोईन खान ला उडवल्यावर सचिन चे सेलेब्रेशन बघितले तर आदल्या रात्रीच्या वादाचे कोठेही चिन्ह दिसत नाही.

काही फॅन्सना हे लक्षात असेल की सचिनच्या वन डे मधल्या असंख्य मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड्सपैकी पहिले हे त्याच्या अष्टपैलू कामगिरीकरता होते - श्रीलंकेविरूद्ध पुण्यातील एका गेम मधे लंकेच्या टॉप ऑर्डर विकेट्स पैकी चार मधे त्याचा काही ना काही हात होता. दोन्ही ओपनर च्या विकेट्स त्याचे स्वतःच काढल्या आणि दोन कॅचेस ही घेतले. नंतर चेस करताना ४१ बॉल्स मधे ५३ मारून मॅच सहज जिंकून दिली.

आणखी एक दुर्लक्षित परफॉर्मन्स म्हणजे वेस्ट इंडिज विरूद्ध शारजा ला एका गेम मधे त्या ४ टॉप ऑर्डर विकेट्स काढून विंडीज ला १४५ मधे गुंडाळले.

असे वाचले आहे की सचिन आधी फास्ट बोलर होण्याकरता मद्रासच्या एमआरएफ फाउण्डेशन मधे गेला होता. पण डेनिस लिली ने त्याला परावृत्त केले. नंतर त्याने स्पिन वर कधी लक्ष द्यायला सुरूवात केली माहीत नाही. त्याच्या बोलिंग ची खासियत म्हणजे जेव्हा त्याचा टप्प्यावर कंट्रोल असे तेव्हा तो संघातील इतर स्पिनर्स इतकाच आणि कधीकधी त्यांच्यापेक्षाही जास्त स्पिन करत असे. त्यात ऑफस्पिन व लेग स्पिन दोन्ही करू शकत असल्याने बॅट्समनला त्याची बोलिंग अशा वेळेस अजिबात कळत नसे. पण स्पिन इतकीच त्याची खासियत म्हणजे बॅट्समनला पुढे खेचून बॉल त्याच्यापासून दूरवरून 'फायर' करणे व विकेटकीपर कडून स्टम्पिंग करून घेणे. इथे खाली ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोची च्या सामन्यात त्याने दोन असे उडवले आहेतच पण एकदा शाहिद आफ्रिदी पुढे येउन खेळू लागल्यावर धोनीच्या मदतीने त्यालाही परफेक्ट उचलला होता, ते इथे बघता येइल.

१९९८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे जवळजवळ सर्व गेम्स सचिनची बॅटिंग जबरदस्त झाली होती. त्यातील वन डे सिरीज मधल्या एका गेम मधे तो लौकर आउट झाला. भारताने ३०९ मारल्यावर ऑस्ट्रेलिया चेस मधे २००/३ वर होती आणि अजून २० ओव्हर्स बाकी होत्या. स्टीव्ह वॉ आणि मायकेल बेव्हन हे ऑस्ट्रेलियाचे चेस चे मास्टर्स क्रीज वर होते. लीहमन, मूडी आणि डेमियन मार्टिन अजून खेळायचे होते. तेव्हाच्या हिशेबानुसार मॅच ऑस्ट्रेलियाच्या खिशात होती.

भारताकडे पाचवा रेग्युलर बोलर नसल्याने अझर ने हृषिकेश कानिटकर व सचिन दोघांमधे त्या ओव्हर वापरायचे ठरवले असावे. या मॅच मधे सचिन ने ऑफ स्पिन आणि लेग स्पिन ने मिश्रण इतके अफलातून वापरले की वॉ, बेव्हन, मूडी, आणि लीहमन कोणालाही त्याची बोलिंग झेपली नाही. कारण तो नक्की कोणता स्पिन वापरणार आहे तेच सांगता येत नव्हते. स्टीव वॉ ला त्याने लेग स्पिन वर काढला, तर लीहमन ला गुगली वर. बेव्हन ला टीपिकल 'स्पिनर चे स्टम्पिंग' टॅक्टिक वापरून - बॅट्समन पुढे येतोय दिसल्यावर लेग साइड ने जोरात मागून बॉल विकेटकीपर कडे. ३२ रन्स मधे ५ विकेट्स उडवून ऑस्ट्रेलियाच्या चेस मधे एक्स्पर्ट असलेल्या मधल्या फळीला पूर्ण चकवले त्याने. याही मॅच मधे मॅन ऑफ द मॅच सचिनच.

मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याहीपेक्षा भारी कामगिरी त्याने त्याच वर्षी पुन्हा केली. ऑक्टोबर १९९८ मधे ढाक्याला पहिली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी "नॉक आउट" स्पर्धा भरली. भारताची पहिलीच मॅच ऑस्ट्रेलियाशी होती. त्यावर्षी भन्नाट फॉर्म मधे असलेल्या सचिन ने आधी बॅटिंग करताना भारताला ८/२ वरून १४१ रन्स करून ३००+ वर नेले. पुन्हा चेस मधे तशीच सिच्युएशन होती. ऑसीज १९४/४ ३४ ओव्हर्स मधे. स्टीव वॉ आणि बेव्हन क्रीज वर. पुन्हा सचिनचा स्पिन चालला आणि स्टीव्ह वॉ, बेव्हन आणि डेमियन मार्टीन ला आउट करून त्याने ३८ रन्स मधे ४ विकेट्स काढल्या.

या मॅच च्या विस्डेन रिपोर्ट मधला उल्लेखः "Tendulkar excelled even himself with a stunning all-round performance....(Aussie batsmen) played too many rash shots, especially against Tendulkar, who bowled a mixture of off-breaks and leg-breaks and ended the match as he had started it: in complete control.

१९९३ च्या हीरो कप टूर्नामेण्टच्या फायनल ला लारा फॉर्मात येत असतानाच त्याची दांडी सचिननेच उडवली होती. सचिन व लारा यांची तुलना कायम होते, पण एका गोष्टीत लारा सचिन ला मॅच करू शकत नाही - सचिन ने त्याला २-३ वेळा आउट केला आहे.

पण त्याच्या बोलिंगचीच काय पण करीयरची सुद्धा चर्चा ज्या परफॉर्मन्स शिवाय पूर्ण होउ शकत नाही, तो म्हणजे त्याच हीरो कप च्या सेमीफायनल मधला द. आफ्रिकेविरूद्धचा. एक ओव्हर मधे तीन रन्स आणि नो विकेट्स. पण हा सर्वांना माहीत आहे, कारण साउथ आफ्रिकेला शेवटच्या ओव्हर मधे विजयाकरता सहा रन्स हवे असताना टाकलेली ओव्हर आहे ती. हा परफॉर्मन्स स्कोअरकार्ड वर उठून दिसत नाही. १-०-३-०. पण सर्व फॅन्स ना सचिन ची बोलिंग म्हंटले की हीच मॅच आठवेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण त्याच्या बोलिंगचीच काय पण करीयरची सुद्धा चर्चा ज्या परफॉर्मन्स शिवाय पूर्ण होउ शकत नाही, तो म्हणजे त्याच हीरो कप च्या सेमीफायनल मधला द. आफ्रिकेविरूद्धचा. एक ओव्हर मधे तीन रन्स आणि नो विकेट्स. >>>> ही ओव्हर चांगलीच आठवतीय. भारत सामना जिंकल्याचा जितका आनंद झाला होता तितकेच वाईट वाटले होते द. आफ्रिकेबद्दल.

वा !! मस्त लेख फा !! अजुन येऊ देत.

हिरो कप आणि ती ओव्हर नक्कीच आठवते. त्या मुळेच आमच्या उत्साहाने क्रिकेट बघण्याला सुरूवात झालेली.

फारएण्ड, सलग सुट्ट्यांमुळे मायबोलीवर फारसं फिरकणं झालं नाही. पण काल आणी आज सगळे लेख वाचले आणी सगळे क्षण पुन्हा एकदा अक्षरशः एखादा सिनेमा पाहिल्यासारखे डोळ्यासमोरून गेले. मस्त लिहीताय.

मी तर हे लिखाण प्रकाशित झाल्याच्या पहिल्या भागापासून सचिनमामा असेच वाचतोय. आणि फा सचिनला आपुलकीने सचिनमामा बोलत असावा असे समजतोय Lol
आणि कहर म्हणजे फारेण्डला हे सचिनमामा नाव खूप बोअर वाटतेय, बदलशील का अशी विनंती करायच्याही विचारात होतो.. Proud
आई ग्ग.. काय हे.. तुमचा नंबर चेक करायचा म्हटला तर माझे डोळेच बदलावे लागतील Happy
असो, समजले तरी ...

बॉलर सचिनचे उल्लेखलेले सारे प्रसंग आठवणीत कोरलेले. मोईन खानचा बोल्ड लाईव्ह पाहिलेला. मजा आलेली. अजूनही आठवतोय तो क्षण. दिवसाच्या शेवटी अशी एखादी की विकेट काढणे आणि पुढचा दिवस सेट करणे हीच तर कसोटी क्रिकेटची गंमत असते.

कोलकत्ता ऐतिहासिक सामन्यातील त्याच्या गोलंदाजीच्या वाट्याबद्दल मी याच लेखमालेतील एका धाग्यावर त्या दिवशी प्रतिसाद दिला होता.

अगदी आजही जेव्हा एखादी पार्टनरशिप जमते तेव्हा सचिनची हमखास आठवण येते.. क्रिकेटच्या धाग्यावर ही आठवण काढूनही झालीय अधूनमधून..

शेवटच्या काळात मात्र सचिनने गोलंदाजी कमी केलेली. नेटमध्येही सराव अर्थातच कमी झाला असावा. परीणामी जेव्हा करायचा तेव्हाही कंट्रोल कमी जाणवायचा. लूज बॉलचे प्रमाण फार वाढलेले. पण त्यातूनही आशा असायची कारण लेगस्पिन करतानाचा गूगली भल्याभल्यांना फसवायचा त्याचा ..

सचिन हा एवरेज फलंदाज असता तर नक्कीच गोलंदाजीवर त्याने आणखी मेहनत घेतली असती आणि सहज अष्टपैलू म्हणून संघात राहिला असता.

मस्त रे फा !

सचिन फक्त स्पिन न करता बॉल ड्रिफ्ट पण करत असे. टोरँटोच्या गांगूलीने गाजवलेल्या सिरीजमधे तो जुना बॉल पण मस्त स्विंग करत होता ते अजून आठवतेय.

मस्त सिरीज फा.

सचिन ची हीरोकपमधली लास्ट ओव्हर नक्किच आठवते.

सचिनने जसा मोईनखानचा पोपट केला होता, तसाच श्रीलंकेच्या एका बॅट्समनचाही केला होता.

सहि...

Back to top