आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....
शनिवार आणि रविवार हे आम्हा कष्टकरी लोकांच्या दृष्टीने खास दिवस . सोमवार ते शुक्रवार भरपुर कष्ट केल्यानंतर (पुण्यातील ट्रॅफिकमधुन वाट काढत ऑफिसला पोचणे हे मुख्य कष्ट .... ऑफिसमध्ये कामाचे वेगळे .. ) हे सुट्टीचे दोन दिवस म्हणजे जणू संजीवनीच ....
तर अशाच एका शनिवार सकाळची ही कहाणी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
शनिवार सकाळ ... जरा आरामातच उठलो. अर्थात मी सूर्यवंशी नाही (सेटमक्स सूर्यवंशम पहिल्यापासून हे मी फारच अभिमानाने सांगतो). त्यामुळे आमची सकाळ तशी लवकरच होते. त्यातून शुक्रवार रात्र जर कोरडीच असेल तर अजूनच लवकर.
त्यामुळें सकाळी वावरले... पेपर चाळला . हल्ली पेपर वाचण्यापेक्षा फक्त चाळतोच. एकतर पेपरात फारसे काही वाचण्याजोगे नसते आणि बातम्या तर थोपु व कायप्पा वर जास्त लेटेस्ट असतात.
आता काय करावे असा विचार चालू होता. तेव्हढ्यात आतून घेई छंद मकरंद ऐकू आले. बायकोनी सावन वर गाणी लावली होती ,,,
च्यायला हे काय ऐकतेस ? थांब तुला असली चीज ऐकवतो ... या माझ्या कॉमेंटवर बायकोनी फक्त मोबाईलचा आवाज वाढवला . आता काहीतरी करायला पाहिजे . तातडीने माझा सीडीचा ड्रॉवर उघडला, वसंतरावांची कट्यारचीची सीडी शोधली आणि कव्हर उघडले ....... तर आत चक्क रॉक ऑन ची सीडी. म्हणजे कव्हरला वसंतराव आणि आतमध्ये रॉक ऑन ... कुठे फेडाल ही पापे ... यांना क्षमा नाही . अर्थात हे सगळं मनातच.
ए .. जरा इकडे ये .. माझ्या हाकेला प्रतिसाद म्हणुन आतमध्ये फक्त गाणे बदलले गेले ..
आता मलाच काहीतरी करणे भाग होते. या सगळ्या सीडीज नीट लावून ठेवल्या पाहिजेत. आज आता हे सगळं आवरतोच .. मी माझा इरादा जाहीर केला.
ही मात्रा बरोबर लागू पडली. कारण मागच्या वेळी साफसफाई करताना एक जुने घंगाळे भंगारवाल्याला दिले होते. आता आमच्या बायकोने खास तांब्याचे घंगाळे आणले होते आणि त्याला पोलिश करून त्यात एक रबराचे झाड लावायचा प्लॅन होता हे मला कसे समजावे ....
त्यामुळे आवराआवर म्हटल्यावर लगेच आत हालचाल झाली
अरे पण तू आज पुस्तके आवरणार होतास ना ? .. आमच्या मातोश्री दुसरे कोण ...
खरं म्हणजे हे पुस्तक प्रकरण जरा हाताबाहेच जाऊ लागले आहे. काही वर्षांपुर्वी नवीन फर्निचर करताना पुस्तांकांसाठी छान कपाट केले होते. नंतर ते पुरेना म्हणून दुसऱ्या खोलीत अजून एक कपाट केले. पण ही पुस्तके तरीही बाहेरच. बरं .. हवे ते पुस्तक सापडले नाही कि चिडचिड फक्त माझीच कारण पुस्तक मलाच हवे असते.. काय करावे काळत नाही.. हे लायब्ररीवाले एवढी पुस्तके कशी संभाळतात देव जाणे.
हो.. हो ... पुस्तक पण आवरायची आहेत .. पण आधी सीडीज . मी ही ठाम होतो.
बरं .. आधी नाश्ता करून घे .. काल भाकऱ्या जास्त करायला सांगितल्या होत्यास ना....
नाश्ता ... तरीच म्हटलं मला भूक का लागलीय .. चला भाकरीचा काला करू या.. मग काय .. एक लठ्ठ कांदा चिरला .. भरपुर दही आणि वरून फोडणी .. हिरव्या मिरच्यांची अशी चरचरीत फोडणी केलीय देवा .. काय सांगावे .. चक्क तीर्थरुपांनी खोकत "सकाळ" बाजूला ठेवला आणि न बोलावता नाश्त्याला आले.
नाश्त्याचे कार्य आटोपल्यावर मी परत सीडीज कडे वळलो... आता मला कोणी डिस्टर्ब करू नका अशी जोरदार घोषणा करुन कामाला सुरवात केली
या घोषणेचा अर्थ " आता अंघोळीला कधी जाणार" असे फालतू प्रश्न विचारू नका असा होता. चहा वगैरे साठी डिस्टर्ब केले तर चालेल ...
सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम...
शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा
हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ...
धडाक्यात कामाला सुरवात केली. काही पत्ता चुकलेल्या सीडीजना योग्य पत्त्यावर पोचवले ... म्हणजे सीडी कव्हर एक आणि आत सीडी दुसरीच किंवा कव्हरच्या आत सीडीचं नाही ... मग त्या सीडीची शोधाशोध.
अशातच हाताला लागली ते रशिद खानची एक सीडी .. म्हणजे फक्त कव्हर .. परत शोधाशोध ... त्यातून ही माझी फार आवडती सीडी . पहिला ट्रॅक "जोग" आणि दुसरा "सोहोनी" ..
मुळात मी राशिदभाईंचा मी जबरदस्त पंखा ... अगदी १२-१३ वर्षांपूर्वी सवाई ला ऐकलं तेंव्हापासून ... काय यमन गायले होते , आणि त्यानंतर "याद पिया कि आये" बस हम तो फिदा हो गये. मग त्यानंतर पुण्यात कुठेही त्यांची महेफील आले तर आमची उपस्थिती ठरलेली. मग ते सी आर व्यास महोत्सवात असो किंवा दिवाळी पहाट असो ... "जग कर्तार हे तू ही " अजून कानात रुंजी घालताय. अरे रशीद भाईंची भैरव ची सीडी कुठे आहे?
अर्थात रशीद खान ला रशीद भाई म्हणण्याइतकी सलगी दाखवणं जरा अतीच होतंय ना ? पण तस पाहिलं तर भिमसेनजींना अण्णा म्हणणे किंवा अभिषेकींना बुवा .. आपलं तेवढं वय नाही आणि लायकी तर त्याहून नाही . पण एक रसिक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा दुरूपयोग ...
पण ते जाऊ दे .. ही सोहोनी ची सीडी कुठे गेली ?
रशीद भाईंचा सोहोनी ऐकलं होता गणेश कला क्रिडाला ... काय महेफ़िल होती . आधी कौशिकीचे गाणे. कौशिकी चक्रवर्ती .. नवा तारा .. new sensation च म्हणाना . सौन्दर्य आणि सूर यांचा अनोखा संगम. मनमोकळं हसण , प्रसन्न मुद्रा आणि अजॉयजींच्या तालमीतला गाणं चमत्कृतीपुर्ण , सरगमचा भरपूर वापर असलेलं. त्यादिवशी बिहाग गायली .. क्काय जमुन गायलेय म्हणता ... गाणं संपलं पण बिहाग चे सूर तसेच रेंगाळत होते. सभागृह पूर्णपणे भरून गेले होते. त्यानंतर मंचावर आले राशिदभाई ... आता काय पेश करणार? मुख्य म्हणजे हे बिहागचे सूर कसे बाहेर घालवणार ? पहिल्यांदाच मला थोडी धाकधुक वाटू लागली . आणि रशीद भाईंनी सुरुवात केली "देख वेख मन ललचाए " .. सोहोनी... पाहता पहाता बिहागचे सूर पुसले गेले आणि सोहोनीचे अधिराज्य सुरु झाले .. आणि त्यानंतर अतिद्रुत तराणा .. म्हणजे या सगळ्यावर कळसच .........
अरे ती सीडी नुसती हातात घेऊन काय करतोयस .. आवर लवकर ... बायकोने समोर चहाचा कप ठेवत मला वर्तमानात आणले. न मागता चहा ... वा ..
आज चहात आलं घातलय वाटते ... पहिल्याच घोटाला मी पावती दिली ...
आज ? मग नेहेमी चहात काय असते? सौ... गत
जाऊदे ... चर्चा वाढवण्यात काही अर्थ नव्हता ... बाकी बाहेर थंडी असो व नसो, आलं घातलेला चहा भारीच लागतो ...
मी परत सीडीजच्या ढिगाऱ्याकडे वळलो. एकंदर परिस्थिती तासाभरापूर्वी पेक्षा जरा भीषणच होती .. कारण बऱ्याच सीडीज ड्रॉवर मधुन बाहेर पडुन इतस्थत: पसरल्या होत्या. पण Disruption is necessary for new creation हे आम्ही नुकतेच मोदीगुरुजींच्या नोटबंदीतुन शिकलो होतो. त्यामुळे या परिस्थितीतूनही मार्ग निघेल याची मला खात्री होती
हळुहळु शात्रीय संगीतावर ताबा मिळवत मी गझल्स कडे वळलो. हे मी सीडीज बद्दल बोलतोय गैरसमज नसावा ....
जगजीत, पंकज , गुलाम अली अशी वर्गवारी सुरु झाली. हो ... पंकज उधास सुद्धा.. खरे तर माझ्या गज़ल ऐकण्याची सुरवात पंकज उधास पासुनच झाली.
पंकज, जगजित, हरिहरन, गुलाम अली हे म्हणजे गझल ऐकण्याच्या तयारीचे प्रथमा, द्वितीया, प्राविण्य आणि अलंकारच आहेत. यापुढे ज्यांना मेहेंदी हसन आवडतो ते म्हणजे संगीतातले खरेखुरे जाणकार अथवा सवाईला कडक इस्त्रीचा झब्बा घालून जाणाऱ्यांपैकी.
या सगळ्यात ही मराठी सीडी कुठून आली ? नाव कैफियत असले म्हणून काय झाले ? गाणी मराठीतच आहेत. माधव भागवतांचा अल्बम.
माधव भागवत.... प्रत्यक्ष ऐकले फक्त एकदाच... मन परत भूतकाळात गेले
२००४ सलातील गोष्ट आहे.. भटसाहेबांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात गरवारे कॉलेजच्या सभागृहात एक कार्यक्रम झाला होता. भट साहेबांच्या काही आठवणी, काही रेकॉर्डिंग्स, काही गाणी असे करत करत हा कार्यक्रम शेवटाकडे आला होता. आणि अचानक घोषणा झाली.. सुरेश भट यांचे एक चहाते मुंबईहून आले आहेत व त्याना काही सादर करण्याची इच्छा आहे.. त्यानंतर श्री माधव भागवत (त्यांच्या पत्नीसह) मंचावर आले व त्यानी एक गझल सादर केली..
मनाप्रमणे जगावयाचे किती किती छान बेत होते..
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते
माधव भागवत यांना प्रत्यक्ष ऐकण्याची ही पहिली व शेवटची वेळ. पण त्यांचा आवाज व सादरीकरण... हे नाव मनात घर करून गेले. त्यानंतर त्यांना नक्षत्रांचे देणे मधे हीच गझल सादर करताना टीवी वर बघून जुनी आठवण ताजी झाली. नंतर म्यूज़िक बॅंक च्या दुकानात शोधाशोध करत असतांना अचानक "कैफियत" सापडली... अप्रतिम अल्बम.. नंतर बाकीचेही अल्बम ऐकले पण कैफ़ियतची सर नाही . काही काही गोष्टी जमून जातात.
उत्तम कविता, साजेशी चाल आणि सुरेल गायन ... आणि हो.. सचिन खेडेकर यांचे कवितेतून केलेले अप्रतिम निवेदनही ..
सचिन खेडेकरांच्या आवाजात शब्द येतात
ते तुझ्या घराचे दर्शन... श्रीमंती जागोजागी....
फुलबाग मला दिसलेली कागदी फुलांची होती...
नुसतेच बहाणे होते.. नुसतेच खुलासे होते...
कोरड्या तुझ्या शब्दांचे.. कोरडे दिलसे होते...
त्यानंतर चक्क नामंझूर सारख्या कव्वालीच्या सुरवातीस शोभेल असे इंट्रो म्यूज़िक .. आणि माधव भागवतांचा आवाज.. क्या बात है....
अरे तुझं आवाराताय कि नाही ? यावेळी आम्हाला वर्तमानात आणण्याच्या मान मातोश्रींचा होता.
जेवायची वेळ झालीय .. पाने घेतोय .. पटकन अंघोळ करून घे ...
आता सुट्टीच्या दिवशी जेवायचा आणि अंघोळीचा काय संबंध ?
पण जाऊ दे..
आतमधुन छान लसणाच्या फोडणीचा वास येतोय. आज काय बेत आहे? मसुराची आमटी आणि तांदळाची भाकरी.... जबरा ... तांदळाची भाकरी गरम गरम खाल्ली पाहिजे. अंघोळीला फाटा देऊन मी सरळ स्वैपाकघरात घुसलो. आईच्या तीव्र नापसंतीकडे दुर्लक्ष करायला आत्त्ताच थोडं थोडं जमायला लागलाय.
भाकरीवर मोठठा लोण्याचा गोळा घेऊन सुरवात केली. उद्यापासून डाएट करायचं हे नक्की.
जरा अंमळ जास्तच जेवण झाले. आता दुपारची झोपा पाहिजेच... हळूज आतल्या खोलीत सटकत असताना माँसाहेबांनी टोकलेच.
झोपायला चाललास ? हा पसारा कोण आवरणार ? नेहमीचा आपुलकीचा प्रश्न
हे काय.. उठल्यावर लगेच आवरतो .. किती वेळा लागतो आवरायला ...
पुढचा वाक्य येण्याच्या आत शिताफीने सटकलो.
आमची दुपारची झोप ही झोप कमी आणि तंद्री जास्त असते. कारण झोपताना गाणी लावतो. ती ऐकता ऐकता छान तंद्री लागते. मध्येच सीडी चेंजरचा आवाज येतो तेव्हढाच अडथळा.
आज काय लावावे बरे ? सकाळपासून डोक्यात घोळतंय ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे... तेच ऐकुया.
भर दुपारी यमन ? माझाच आतला आवाज जोरात किंचाळला. मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यापासून ह्या आतल्या आवाजाचे स्तोम फारच वाढलाय.
त्याला काय झाले ? एकदा पडदे ओढले, डोळे मिटले कि झाली रात्र ... मनमुराद यमन ऐकुया.
भानावर आलो (कि जाग आली?) तेंव्हा उन्हं उतरली होती. सासू सून टीव्हीपुढे बसल्या होत्या. पण टीव्हीपेक्षा त्यांचाच आवाज जोरात येत होता.
मग मीच सर्वांसाठी कडक चहा बनवला.
मग नेहमीचाच संवाद झाला
अरे किती लाल चहा करतोस रे ... आमच्या तीर्थरुपांना चहात दुध आणि साखर दोन्ही जास्त लागते.
तुम्हाला पांढरा चहा प्यायच्या ऐवजी डायरेक्ट दूधच का पीत नाही ? ... यानंतर माँसाहेबांचा कप जोरात खाली ठेवण्याचा आवाज.
मी गुपचूप गरम दुधाचे भांडे आणि साखरेचा डबा वडिलांकडे सरकवला व बिस्किटाचा डबा पुढे ओढला.
आता संध्याकाळी काय करायचे ? या विचारात मी मोबाईल हातात घेतला. गेले ४-५ तास मोबाईलला हात पण लावला नव्हता.
कायप्पा उघडले .. गण्याचा मेसेज.. संध्याकाळी येताना पानं घेऊन ये .. संध्याकाळी येताना? कुठे येताना? हा गण्या पण ना अर्धवट का लिहितो ?
अरे .. इकडे आमच्या मित्रमंडळी ग्रुपवर मेसेजचा खच पडलाय...
आमच्या थोरल्या वाहिनी माहेरी चालल्यात... थोरल्या वाहिनी म्हणजे ... आमच्या ग्रुपमध्ये गण्याचे लग्न सर्वात आधी झाले.. त्यामुळे त्याच्या बायकोला आम्ही थोरल्या वाहिनी म्हणतो.
म्हणजे आज गण्याकडे पार्टी .. तरीच तो पानं घेऊन यायला सांगतोय... आमचा अनिल काय पान लावतो ... कलकत्ता साधा , पक्की सुपारी आणि लवंग जाळून ..
पण ह्या मठ्ठ गाण्याने पार्टीचा मेसेज मित्रमंडळ ग्रुपवर कशाला टाकला? इथे आमच्या बायका पण असतात.. बोंबला ..म्हणजे हे सौ नी वाचले असणार. अजून काही बोलली कशी नाही ? ही वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते.
गाण्याने मेसेज पाठवलाय …. मी हळूच सूतोवाच केले.
हस्तकलाला सेल लागलाय ... जाताजाता मला नमिताकडे सोड... बायकोचे हे वाक्य ऐकून हस्तकला चे किती आभार मानावेत तेच कळेना.
चालेल. मी पटकन अंघोळ करतो ... आपण लगेच निघु ..
आणि हा पसारा कोण आवरणार ? माँसाहेबांचा प्रश्न. दुसरं कोण ?
पण काही पर्याय नव्हता. सगळ्या सीडीज पटापट गोळा केल्या आणि ड्रॉवरमध्ये रचल्या. आता एखाद्या सीडीचे कव्हर बदललं म्हणून काय झाले? आतली गाणी थोडीच बदलतात ?
बस्स...... आता इथेच थांबतो .. यानंतर पार्टीत काय झाले ते काही लिहीत नाही . कारण दोन पेग नंतरचे सगळे सुसंगत आठवेल याची काय गॅरंटी ? आणि आठवलेंच तरी सगळेच काही लिहिता येणार नाही
तेंव्हा भेटुच परत .. एखाद्या शनिवारी.. अजून सीडीज आवारायच्यात .. पुस्तकेही तशीच पडली आहेत ...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तर अशी ही आमची एका शनिवारची कहाणी .. सकाळची कहाणी लिहायला बसलो आणि संपूर्ण दिवसाचीच कहाणी झाली.
असो.. तर हे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण (का उलटे ? )
यातील प्रसंगांचे प्रत्यक्ष जीवनात साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा
.
.
सर,शनिवारची सकाळ म्हणता
सर,शनिवारची सकाळ म्हणता म्हणता पूर्ण दिवसाची कहाणी लिहिली ओ तुम्ही,पण मस्त वाटली आणि किती पसारा करता??आवरला कि नाही हो विसरलेच कितीसा वेळ लागणार आहे म्हणा तुम्हाला??
वावरले,शात्रीय>>>इथे बदल हवा ना ??
हो.. हो ... पुस्तक पण आवरायची आहेत .. पण आधी सीडीज . मी ही ठाम होतो.
बरं .. आधी नाश्ता करून घे .. काल भाकऱ्या जास्त करायला सांगितल्या होत्यास ना....
नाश्ता ... तरीच म्हटलं मला भूक का लागलीय .. चला भाकरीचा काला करू या.. मग काय .. एक लठ्ठ कांदा चिरला .. भरपुर दही आणि वरून फोडणी .. हिरव्या मिरच्यांची अशी चरचरीत फोडणी केलीय देवा .. काय सांगावे .. चक्क तीर्थरुपांनी खोकत "सकाळ" बाजूला ठेवला आणि न बोलावता नाश्त्याला आले.
नाश्त्याचे कार्य आटोपल्यावर मी परत सीडीज कडे वळलो... आता मला कोणी डिस्टर्ब करू नका अशी जोरदार घोषणा करुन कामाला सुरवात केली>>>> दोनदा झालय........
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
छान लिहिलेय मध्ये एका
छान लिहिलेय
मध्ये एका पॅराग्राफचा देजावू झालाय.
आवडलं.. किनारे किनारे --- हि
आवडलं..
किनारे किनारे --- हि बंदीश, कौशीकी चक्रवर्तीच्या आवाजात ऐकून बघा.
धन्यवाद .. हा माझा मा बो वर
धन्यवाद .. हा माझा मा बो वर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न ...
देजावू झालेला पॅराग्राफचा दुरुस्त केला आहे ..
दिनेशदा क्या बात है ..
दिनेशदा
क्या बात है .. कौशिकीजींच्या आवाजात "किनारे किनारे" ऐकायला खरंच मस्त वाटते ..
त्यातच द्रुत तीन तालातील "मैं वारी वारी जाऊंगी प्रीतम प्यारे" पण खासच ..
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
आवडलं लिखाण, अजूनही
आवडलं लिखाण, अजूनही लिहा
मायबोलीवर स्वागत असो!
गाण्यातलं काही कळत नसलं मला
गाण्यातलं काही कळत नसलं मला तरी तुमचं लिहिणं आवडलं.
लिहित रहा!
मस्त जमून आली आहे मैफिल
मस्त जमून आली आहे मैफिल