गोभी कुलचा

Submitted by सुलेखा on 22 November, 2016 - 01:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कुलचा हा प्रकार पराठ्याच्या जवळपास जाणारा असला तरी नांवाप्रमाणे आपले वेगळेपण दाखवुन देणाराही आहे. तरीही घरी करायला खुपच सोपा आहे. कणिक, कणिक्+मैदा ह्या मिक्स पिठाचा करता येतो पण मैद्याचा केला तर अगदी बाहेर सारखा होतो.
इथे गोभी स्ट्फ कुलचा केला आहे.मटर्,पनीर्,आलु, आलु+कसुरी मेथी असे प्रकार ही करता येतील.
आता गोभी कुलच्यासाठी चे साहित्य आणि कृती :--
कुलचा :--
२ कप मैदा
२ चमचे दही
२ चमचे तेल
१ पाऊच किंवा २ टी स्पून ड्राय यिस्ट
१/२कप कोंबट दूध
१ चमचा साखर
१टी स्पून मीठ
गोभी सारणः--
फ्लॉवर्/गोभी
खालील साहित्य चवीप्रमाणे घ्या----
बारीक चिरलेली हिरवी मिरची
लाल तिखट
मीठ्/सेंधव मीठ
मिरेपुड
धणेजिरे पूड
गरम मसाला
चाट मसाला
आमचुर पावडर किंवा लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ चमचे तीळ किंवा कलौंजी [कांद्याचे बी-हे काळ्या तीळासारखे दिसते ]
तयार कुलच्याला वरुन लावायला अमूल बटर /लोणी / तूप

क्रमवार पाककृती: 

कोंबट दूधात चमचाभर साखर व यिस्ट घालुन चमच्याने छान ढवळुन मिक्स करुन त्यावर झाकण ठेवा. साधारण १० मिनिटानंतर बाकी कृती करायची आहे.
एका मोठ्या बाऊल मधे मैदा + मीठ + तेल + दही आणि आधी एकत्र केलेले दूध साखर यिस्ट चे मिश्रण एकत्र कालवा. लागेल तसे पाणी घालुन कणकेच्यासाठीच्या कणकेच्या गोळ्यापेक्षा सैलसर असा गोळा तयार करा.वरुन तेलाचा हात लावुन घ्या. ह्या बाउल वर झाकण ठेवा. अर्ध्या तासाने पुढील कृती करायची आहे.यिस्ट मुळे हे मिश्रण दुप्पट होते म्हणुन मोठ्या आकाराचा बाऊल घ्यावा.P1040120 (2).JPG
तोपर्यंत गोभीचे सारण तयार करायचे आहे. गोभीचे मोठे तूरे काढुन घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करुन घ्या.त्यात हे तूरे ५-१० मिनिटे बुडवुन ठे॑वा. त्यानंतर कोरड्या फडक्य्याने त्यातील सर्व पाणी टिपुन कोरडे करुन घ्या.किसणीवर हे तूरे किसून घ्या.
आता त्यात चवीप्रमाणे हिरवी मिरची,तिखट-मीठ,मिरेपूड्,धणेजिरे पूड,गरम मसाला,चाट मसाला,आमचूर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन हाताने सर्व मिश्रण छान कालवुन घ्या.P1040123 (2).JPG

साधारण अर्ध्या तासाने भिजवलेल्या मैद्याच्या गोळ्याचे मिश्रण दुप्पट फुगलेले दिसेल.तेलाच्या हाताने मिश्रणाचा गोळा तयार करा.मिश्रण सैल झालेले जाणवेल.P1040121 (3).JPG

आता पराठ्या पेक्षा मोठा गोळा घेवुन मैद्याच्या पिठीवर पुरीइतका लाटा त्यात गोभीचे तयार सारण भरुन पुन्हा गोळा तयार करा.थोड्या पिठीवर लंबगोल्/वाटोळा लाटा.गॅसवर मध्यम आचेवर तापलेल्या जाड तवा किंवा फ्राय पॅन वर कुलचा टाका.लगेच कुलच्याच्या वरील भागावेर थोडे तीळ्/कलौंजी व कोथिंबीर पसरवा.भाकरी प्रमाणे त्यावर थोडेपाणी शिंपडुन हाताने दाबा म्हणजे तीळ व कोथिंबीर कुलच्यावर चिकटेल.आता कुलच्याला उलथन्याच्या सहाय्याने उलटवुन दुसरी बाजुही भाजुन घ्या. दोन्हीकडुन भाजलेल्या कुलच्याला एका ताटात काढुन त्यावर बटर्/लोणी/ तूप लावा.
स्टफ कुलच्या बरोबर मीठ व जिरेपूड घातलेले दही,चटणी,ठेचा,लोणचे, लोणी,सॉस असे काहीही आणिन्त्याशिवाय नुसता खाला तरी मस्त लागतो.इथे मी हिरवी मिरची + लसूण + ओले खोबरे + कोथिंबीर ची चटणी, बुंदी रायते ,टोमॅटो+कांदा+गाजर फोडी वर चाट मसाला,मीठ आणि कोथिंबीर घालुन खायला घेतले आहे.P1040126 (2).JPG

टिप :-- इतर सारण करताना त्यातील मसाल्याचे सर्व घटक तेच ठेवून पनीर व उकडलेला बटाटा किस हाताने कुसकरुन घ्यावा.कुलचा थंड झाल्यावर छान लागतो. त्यात तेल व दही घातल्यामुळे मऊ-नरम आणि खुसखुशीत होतो.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. शेवटचा फोटो तोंपासु.

मी भाऊबिजेला पनीर स्टफ्ड कुलचे केले होते. यिस्ट न मिळाल्यामुळे बेपा घातली होती त्यामुळे ३ ते ४ तास पीठ भिजवून ठेवले होते.

सुलेखा, मला सगळ्या आव्डलेलं वाक्य म्हणजे, "इथे मी हिरवी मिरची + लसूण + ओले खोबरे + कोथिंबीर ची चटणी, बुंदी रायते ,टोमॅटो+कांदा+गाजर फोडी वर चाट मसाला,मीठ आणि कोथिंबीर घालून खायला घेतले आहे..

गरमगरम खायला दिले आहे असे म्हटले नाही!!