उगाच कुणी मराठीमध्ये शीर्षक का दिले नाही म्हणून विचारणार त्यापेक्षा आपलं दिलेलं बरं. बरोबर ना? असो.
मागच्या आठवड्यापासून इथे 'डे लाईट सेव्हिंग' सुरु झालं. की संपलं? कळत नाही. हे म्हणजे, 'डोळ्याची दूरदृष्टिता म्हणजे कसे जवळचे दिसत नाही' त्या टाईप मध्ये आहे असे मला वाटते. मिळत असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा म्हणून उन्हाळ्यात सर्व घड्याळे एकेक तास पुढे केली जातात. आणि अर्थातच थंडीत पुन्हा मागे. म्हणजे काय तर साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका रविवारी मध्यरात्री २ दोन वाजलेले असताना, २ वाजलेत असं म्हणायचंच नाही, १ वाजलाय म्हणायचं आणि त्यामुळे सकाळी तुम्ही रोज ६ वाजता उठत असाल तर त्यादिवशी त्याच वेळेला तेव्हा सात वाजलेले असणार. आणि थंडीत संध्याकाळी ५ वाजता सूर्यास्त होत असेल तर तो ४ वाजताच होणार. जाऊ दे. जास्त स्पष्टीकरण देत नाही. मलाच कसंबसं समजलंय.
पण या वेळेच्या बदलाने होतं काय तर, घरातील सर्व घड्याळ (फोन सोडून) स्वतः बदलावी लागतात. बरेचवेळा जी वेळ आहे ती योग्य आहे का बदलायची राहिलेय हे कळत नाही. सकाळी उठून पोरांना एक तास पुढे किंवा मागे रुटीन लावावं लागतं. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वेडीच झाले होते. म्हणलं सर्व घड्याळातील वेळ बदलायची? तर नुसती घडयाळे नाहीत, ट्रेन, बस यांच्या वेळा, ऑफिस हे सर्व तर झालंच. पण अमेरिकेतील या बदलाने तिकडे ऑफशोअरला काम करणाऱ्या भारतातील लोकांनाही पुढे मागे करावे लागते. प्रत्येक सर्व्हर, सिस्टीमचे घड्याळ बदलायचे तेही दर सहा महिन्यांनी आणि बदललेल्या दुसऱ्या दिवशी सर्व नॉर्मल चालू आहे असेच वागायचे. मला तर अजूनही अवघड जातं ते.
पण सर्वात जास्त त्रास मला याचा होतो तो थंडीत. एकतर आधीच दिवस छोटा झालेला असतो. थंडी वाढलेली असते आणि त्यात अचानक दुपारी ४ वाजताच एकदम अंधार पडायला लागतो. ऑफिसातून कितीही लवकर निघा, बाहेर पडताना अंधार आहेच. त्यामुळे जणू दिवस संपूनच गेलाय असं वाटतं. मुलांना बाहेर खेळण्यासाठी असेही पूरक वातावरण नसते त्यात अंधाराची भर. थंडी आणि अंधार यातून घरी पोहोचल्यावर भूक लागल्यावर खूप खाल्लेही जाते. व्यायाम वगैरे साठी अजिबात उत्साह नसतो. मस्त गरम चहा, नास्ता घेऊन पांघरुणात बसून टीव्ही बघावा असं वाटतं. अशा वेळी माणूस घरात एकटा राहत असेल तर 'डिप्रेशन' येण्याच्या शक्यता अजून वाढतात. शिवाय वजन वाढते ते वेगळेच.
बर्फ पडू लागल्यावर दिवसा काचेतून दिसणारं ऊनही निरुपयोगी होतं. मला नेहमी प्रश्न पडायचा हे चित्रपटात बर्फ आणि ऊन कसं काय दाखवत असतील. आता प्रत्यक्षात पाहिल्यावर कळतंय की ऊन नुसतं नावाला असतं. तापमान कमीच असतं त्यामुळे बर्फ वितळतच नाही. हे सर्व अनुभवल्यावर आणि त्यानंतर भारतात राहिल्यावर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. १. आपल्याकडे भारतात 'सूर्य प्रकाश' आणि पूरक तापमान किती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. २. आणि आपण त्याचा किती कमी प्रमाणात उपयोग करून घेतो.
योगामध्ये आपल्या पूर्वजांनी जे सूर्याचे नमन केले आहे ते अतिशय योग्य आहे असे मला पटू लागले आहे. सुरुवात करायची तर, सूर्यप्रकाश नसल्याने ज्या त्वचेच्या व्याधी किंवा व्हिटॅमिन डी चा अभाव हे इथल्या लोकांत जाणवते ते भारतात कमी होऊ शकते. लहानपणी थंडीत आजोबा आम्हाला सकाळी उन्हांत बसायला सांगायचे त्यांच्यासोबत आम्हीही 'उन्हं खातं' बसायचो. पण आजकाल आपण सूर्यप्रकाश नुसता बघायलाही बाहेर थांबत नाही. सकाळी उठून चालत जाणे तर दूरच. इथे बॉस्टन किंवा जिथे थंडी ६-६ महिने असते अशा ठिकाणी मुलांचे खेळावरही परिणाम होतो. त्यांना कुठे खेळायला न्यायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. भारतात आपल्याला पाऊस आणि कडक उन्हाळा सोडला तर जवळजवळ ८ महिने व्यायामाला पूरक वातावरण असते. तरीही मुलांच्या खेळांकडे कमी लक्ष असते (निदान इथल्या मुलांच्या तुलनेत तरी). बाहेर मुले खेळताना दिसणेही तसे पूर्वीपेक्षा कमीच आहे. पण व्यायाम आणि एखादा नीट शिकलेला खेळ यांचे प्रमाण अजून कमी.
तसेच शेतीचेही आहे. शेतकऱ्यांच्या गरिबीमुळे आणि नवीन प्रकल्पांच्या अभावामुळे असलेल्या सूर्यप्रकाशाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेत नाहीये असे वाटते. इथे लोकांना थंडीत भाज्या परदेशातून आयात कराव्या लागतात. आमच्या घरात सध्या एक तुळस आहे, तिला मी आता घरात ठेवले आहे आणि रोज सकाळी जमेल तसे उन येईल त्या त्या जागी तिला फिरवत राहते. पण तेही आता पुरेसे वाटत नाहीये आणि मला बहुदा 'प्लांट लाईट' आणावा लागणार आहे. ज्यातून सूर्यप्रकाशासारखे किरण तिला मिळतील. अनेक लोकांना असे रोपे टिकवताना पाहून वाटते मी भारतात असताना का इतकी निष्काळजी राहिले? तेव्हाही थोडे लक्ष लावून झाडे जागवायला हवी होती.
इथे अनेक वेळा बाल्कनीत कपडे वाळत घातलेत म्हणजे भारतीय असणार असे जोक मी ऐकलेत. आणि मलाही कधी वाटायचं की जाऊ दे ते कपडे ड्रायर लाच टाकावेत. उगाच कशाला बाल्कनीत कपडे? पण मी भारतात कपडे धुवायचे मशीन बघत असताना ड्रायर पाहिला त्यात कपडे वाळवण्यासाठी आणि धुण्यासाठी मिळून ३ तास लागणारे सायकल होते. म्हणजे किती ती इलेक्ट्रिसिटी वाया. गेल्या २-३ वर्षात माझ्या लक्षात आलं आहे की खरंच इतका सूर्यप्रकाश उपलब्ध असताना का मी तो ड्रायर वापरायचा हट्ट करायचा? आणि इतकी वीजही वाया? आपल्याकडे हा एक रिसोर्स आहे त्याचा वापर करून घेतलाच पाहिजे आणि त्यामुळे मला तसे कपडे वाळवणे अतिशय योग्य वाटते. आपल्याकडे अजून सोलर प्लॅण्टही अजून व्हायला हवेत ज्याने त्याची पूर्ण क्षमता वापरली जाईल.
उन्हाचा आपल्या शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होतो. जसे पावसाळी वातावरण उदास करते तसेच ऊन प्रसन्न करते. सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या खिडकीतून किंवा बाल्कनीत येणारे ऊन कितीतरी उत्साह देऊन जाते. पण किती जण ते अनुभवण्यासाठी लक्ष देतात? कारण आपण ऊन गृहीत धरतो असे मला वाटते. आज नाही पाहिले, उद्या असेलच. त्यात कडक उन्हाच्या त्रासाचाही भाग असतो थोडा, पण जाणीवपूर्वक सूर्यप्रकाश अनुभवणे खूप कमी झाले आहे असे वाटते. इथे लोकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे मिळेल तेंव्हा ते त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. खरंच आपण अनेकदा मुलांना किंवा जवळच्या व्यक्तीला म्हणतो, you are my sunshine'. म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला सूर्यप्रकाशाइतकीच आनंद देते, उजेड देते आणि आपल्याला प्रसन्न करते. त्यामुळे मी तर म्हणते 'Sunshine is our sunshine'. आणि आपण त्याची किंमत करायला शिकलं पाहिजे, लवकरच !!
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मला हा नियम माझ्या एका दिवंगत
मला हा नियम माझ्या एका दिवंगत मित्राने दोन ते तीनवेळा समजावून सांगितला होता. तओ अमेरिकेत पाच वर्षे राहून कायमचा परतला होता. मला हा नियम जाम समजलेला नव्हता. अजूनही समजलेला नाही.
जर कोणी खालील निकषांच्या आधारे समजावून सांगितला तर कदाचित समजेलः
१. मूळ समस्या
२. घड्याळात किती वाजलेले दिसतात ह्याच्याशी त्या समस्येचा संबंध
३. घड्याळातील वेळ बदलून ही समस्या कशी सुटते
४. हे फक्त अमेरिका हा अजस्त्र देश आहे म्हणून होते की इतर काही कारणाने?
धन्यवाद!
ओ विद्याताई, तुमच्या
ओ विद्याताई, तुमच्या प्रतिसादावर तुमचं नाव दिसतंच की. प्रत्येक प्रतिसादाखाली विद्या अशी सही कशाला ठोकायची!
@ विद्या भुतकर, छान लिहिलंय.
@ विद्या भुतकर, छान लिहिलंय. आवडलं. अभ्यासपूर्ण लेख आहे. परदेशातली बरीच माहिती समजली. खास करून उन्हाळ्यात सर्व घड्याळे एकेक तास पुढे केली जातात हे जाणून गंमत वाटली. उन्हावाचून त्यांची किती अडचण होतेय हे नव्याने माहित झाले. खरंच! उन्हाच्या बाबतीत आपण पुष्कळ सुदैवी आहोत. आपण म्हणता ते बरोबर आहे. आपण आपल्या येथे भरपूर प्रमाणात असणाऱ्या सूर्यप्रकाशाची किंमत करायला शिकलं पाहिजे.
१. मूळ समस्या >>>
१. मूळ समस्या >>> उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी उन्हाचा अधिकाधिक वापर करता यावा म्हणून मार्चच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास पुढे केले जाते. थंडीत म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी ते परत एक तासाने मागे घेतले जाते. दक्षिण गोलार्धातील देशांत ऋतुमान बरोबर उलट असते त्त्यामुळे उत्तर गोलार्धातील देश जेव्हा घड्याळ पुढे करतात तेव्हा दक्षिण गोलार्धातील देश घड्याळ मागे करतात. उत्तर गोलर्धातील देश जेव्हा घड्याळ मागे करतात तेव्हा दक्षिण गोलार्धातील देश घड्याळ पुढे करतात. मोबाईल आणि कॉंप्यूटर वर वेळा बदलाव्या लागत नाहीत. टाईम झोन व्यवस्थित सेट केला असेल तर त्या आपोआप बदलल्या जातात. रिस्टवॉच मधील वेळ मात्र आठवणीने बदलावी लागते.
२. घड्याळात किती वाजलेले दिसतात ह्याच्याशी त्या समस्येचा संबंध >>> ९ ते ५ कामाची वेळ ठरलेली असते. घड्याळ पुढे केले की संध्याकाळी अधिक उजेड मिळतो.
३. घड्याळातील वेळ बदलून ही समस्या कशी सुटते >>> घड्याळ बदलले की आपले रुटीन त्यानुसार चालू ठेवायचे. ह्याचा उपयोग कामाच्या वेळा संपल्यावर खूप होतो. संध्याकाळचा खूप वेळ सत्कारणी लावता येतो. निदान डोमेस्टीक वापरातील वीज वाचते.
४. हे फक्त अमेरिका हा अजस्त्र देश आहे म्हणून होते की इतर काही कारणाने? >>> डे लाईट सेव्हींग हे केवळ अमेरिकेत केले जाते असे नाही. देश मोठा असण्याचा डे लाईट सेव्हींगशी काही संबंध नाही. ब्रिटन सारख्या छोट्या देशात सुद्धा हे केले जाते. प्रत्येक देशाचे डे लाईट सेव्हींग वेळापत्रक आपण येथे पाहू शकता.
https://en.wikipedia.org/wiki/Daylight_saving_time_by_country
डे लाईट सेव्हींगबद्दल पुष्क्ळ महिती विकिपिडिया वर सापडेल https://en.wikipedia.org/wiki/Daylight_saving_time
सुमुक्ता Thank you for the
सुमुक्ता Thank you for the details.
२. घड्याळात किती वाजलेले दिसतात ह्याच्याशी त्या समस्येचा संबंध >>> ९ ते ५ कामाची वेळ ठरलेली असते. घड्याळ पुढे केले की संध्याकाळी अधिक उजेड मिळतो. >> मला वाटते की घड्याळ पुढे केल्याने सकाळी जास्त उजेड मिळतो आणि सन्ध्याकाळी लवकर अन्धार पडतो. काल तर ३ नन्तरच सन्ध्याकाळ झालीय असे वाटत होते.
ओ विद्याताई, तुमच्या प्रतिसादावर तुमचं नाव दिसतंच की. प्रत्येक प्रतिसादाखाली विद्या अशी सही कशाला ठोकायची!>> मेलमधे वगैरे टाकायची सवय लागली आहे. नाही टाकली की अर्धवट वाटते मला. आता तुम्ही म्हणताय तर नाही ठोकत.
मला वाटते की घड्याळ पुढे
मला वाटते की घड्याळ पुढे केल्याने सकाळी जास्त उजेड मिळतो आणि सन्ध्याकाळी लवकर अन्धार पडतो. काल तर ३ नन्तरच सन्ध्याकाळ झालीय असे वाटत होते. >>> डे लाईट सेव्हींग उन्हाळ्यात अधिक उजेड मिळावा म्हणून केले जाते असे मला वाटते (माझी माहिती चूक असू शकते). कारण थंडीमध्ये काहीही केले तरी उजेड फारसा मिळतच नाही. त्यामुळे उन्हाळ्यात घड्याळ पुढे करून अधिक वेळ उजेड मिळावा हा हेतू असावा.
तुम्ही आत्ता घड्याळ मागे केलेत ना??? आम्ही (ब्रिटनमध्ये) हिवाळा असल्याने घड्याळ मागे केले.
सुमुक्ता तुम्ही आत्ता घड्याळ
सुमुक्ता तुम्ही आत्ता घड्याळ मागे केलेत ना??? आम्ही (ब्रिटनमध्ये) हिवाळा असल्याने घड्याळ मागे केले.>> हो. बरोबर आहे. माझा अजून्ही घोळ होतो.
हेही बरोबर आहे की उन्हाळ्यात जास्त उजेड मिळावा म्हणून हे सर्व केले आहे. पण मला वाटते की तेव्हा असेही दिवस मोठाच असतो. तर मग उगाच हिवाळ्यात त्रास का करुन घ्यायचा?
माझ्या मुलीची शाळा हि डे लाईट
माझ्या मुलीची शाळा हि डे लाईट सेविंग करत असे . घड्याळ मागे करणे तर शाळेच्या हातात नव्हतं. तिची शाळा सकाळची असे आणि थंडीत शाळा अर्धा तास उशीरा भरत असे . एरवी सातची असे पण थंडीत ती सात वीस का साडे सात ला भरत असे . सात ला जाने महिन्यात चांगला काळोख असे पण साडे सातला चांगलं उजडलेलं असे .
मी ह्या वरूनच लक्षात ठेवते घड्याळ मागे का पुढे ते .
आपल्याला वाटतं लंडन आणि अमेरिकेत थंडीत दुपारी साडे तीन चारला काळोख पडतो पण ते घड्याळं मागे करतात एक तास म्हणून जास्त लवकर वाटत आपल्याला .
Day light saving चा फंडा
Day light saving चा फंडा लक्षात ठेवण्यासाठी सोपी युक्ती : just remember fall back and spring forward (फॉलमध्ये घड्याळ मागे जाते आणि स्प्रिंगमध्ये पुढे).
Day light saving चा फंडा
Day light saving चा फंडा लक्षात ठेवण्यासाठी सोपी युक्ती : just remember fall back and spring forward (फॉलमध्ये घड्याळ मागे जाते आणि स्प्रिंगमध्ये पुढे). >> Thanks
>>>>त्यामुळे उत्तर
>>>>त्यामुळे उत्तर गोलार्धातील देश जेव्हा घड्याळ पुढे करतात तेव्हा दक्षिण गोलार्धातील देश घड्याळ मागे करतात. उत्तर गोलर्धातील देश जेव्हा घड्याळ मागे करतात तेव्हा दक्षिण गोलार्धातील देश घड्याळ पुढे करतात.<<<<
भारत हा देश ह्यातील कोणत्याच गोलार्धात येत नाही का?
सदर्न कॅलिफॉर्नियात या!
सदर्न कॅलिफॉर्नियात या! भरप्पूर ऊन मिळेल.. विंटर माझा सर्वात आवडता ऋतू आहे इथला..
बेफ़िकीर, भारत विषवव्रुत्तावर
बेफ़िकीर, भारत विषवव्रुत्तावर आहे, त्यामुळे आपल्याकडे उन्हाळा आणि हिवाळा यात दिवसामधे थोडाफार फरक पडतो, पण इतका नाही जितका टोकान्वर.
>>>>बेफ़िकीर, भारत
>>>>बेफ़िकीर, भारत विषवव्रुत्तावर आहे, त्यामुळे आपल्याकडे उन्हाळा आणि हिवाळा यात दिवसामधे थोडाफार फरक पडतो, पण इतका नाही जितका टोकान्वर.<<<<
ओके ओके!
पण समजा घड्याळ बदलले नाही आणि पाच वाजता अंधार पडला म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर करता आला नाही तर घड्याळ बदलायचे की ऑफिसचे टायमिंग? मला हे कैक वर्षांपासून समजतच नाही आहे. राव, जितके वाजलेत तितके वाजलेत ना? आता सूर्यप्रकाश हवा आहे तर ऑफिस लवकर सुरू करून लवकर बंद करा की?
(आजकाल वेड्यासारखे बोलतानाही वाटू लागलेले आहे की आपण वेड्यासारखेच बोलत आहोत)
>>बेफ़िकीर, भारत
>>बेफ़िकीर, भारत विषवव्रुत्तावर आहे, त्यामुळे आपल्याकडे उन्हाळा आणि हिवाळा यात दिवसामधे थोडाफार फरक पडतो, पण इतका नाही जितका टोकान्वर.>>नाही. विषुववृत्तावर नाही. भारत कर्क वृत्तावर आहे. त्यामुळे विषुववृत्तापासुन फार दूरही नाही आणि फार जवळही नाही.
सूर्योदय आणि सूर्यास्त कधी
सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होतात हे न बघता ते आपल्याला हव्या त्या वेळेला व्हायला हवेत म्हणून घड्याळातच बदल केला जाणे, असा ह्याचा अर्थ आहे ना?
आता घड्याळ एक तास मागे केले
आता घड्याळ एक तास मागे केले आहे (आता रात्र मोठी आहे म्हणून day light saving बंद).....ते जर तसेच ठेवले तर जेव्हा येथे ऊन्हाळा सुरु होईल तेव्हा पहाटे ४.३० ला सूर्य उगवेल, आणि सकाळचा वेळ वापरता येणार नाही. कारण दिवस तसा मोठाच असतो. ..१५ तासांचा पण मग उगाच ४.३० ते ५.३०-६.०० पर्यंत झोपून रहावे लागेल.
सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होतात हे न बघता ते आपल्याला हव्या त्या वेळेला व्हायला हवेत म्हणून घड्याळातच बदल केला जाणे, असा ह्याचा अर्थ आहे ना?>> हो. कारण आपल्याला घड्याळाच्या काट्यावर चालावे लागते ना...सूर्याला नाही
बेफ़िकीर, सूर्योदय आणि
बेफ़िकीर, सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होतात हे न बघता ते आपल्याला हव्या त्या वेळेला व्हायला हवेत म्हणून घड्याळातच बदल केला जाणे, असा ह्याचा अर्थ आहे ना? >> होय, हे म्हणजे आपल्या 'प्रमाण वेळ' च्या व्याख्येला धक्का देणारे वाटते. आपले घड्याळ पुढे असले तरी कुठेतरी 'Standard time' चे भान असतेच. पण Standard time च बदलणे हे मलाही सुरुवातीला वेगळे वाटले होते. पण आता सवय झालीय.
विद्या.
भारत हा देश ह्यातील कोणत्याच
भारत हा देश ह्यातील कोणत्याच गोलार्धात येत नाही का? >>> भारतातदेखील पूर्वेकडील राज्यांमध्ये उन्हाळा आणि हिवाळा यात दिवसामधे बर्यापैकी फरक पडतो बहुतेक. डे लाईट सेव्हिंग करायला हरकत नाही. का करत नाहीत ते मात्र माहित नाही.
आता सूर्यप्रकाश हवा आहे तर ऑफिस लवकर सुरू करून लवकर बंद करा की? >>>> मग "अरेच्चा आज ऑफिस लवकर सुरू होणार होतं होय. माझ्या लक्षातच आलं नाही आणि मी एक तास उशीर केला" अशी कारणं देतील की लोक!!!!!! ती कारणं देऊ नयेत म्हणून घड्याळ मागे पुढे करायलासुद्धा रविवार निवडला असावा. म्हणजे एका दिवसात वेळेचे भान येईल अशी अपेक्षा
just remember fall back and spring forward >>>> हे मस्त आहे
पले घड्याळ पुढे असले तरी कुठेतरी 'Standard time' चे भान असतेच. पण Standard time च बदलणे हे मलाही सुरुवातीला वेगळे वाटले होते. पण आता सवय झालीय.>>>>> हे मात्र खरे डे लाईट सेव्हिंग मुळे लोकांना जेट लॅग सुद्धा येतो म्हणे. माझं बाळ दररोज रात्रि १२ ला जागं व्हायचं आता घड्याळ मागे केल्यामुळे त्याला ११ लाच जाग येते.
सुमुक्ता एनर्जी सेव्हिंगसाठी
सुमुक्ता
एनर्जी सेव्हिंगसाठी हे केले जाते हा युक्तिवादही समजलेला आणि पटलेला नव्हता. तो युक्तिवाद अजून ह्या धाग्यावर दिसलेला नाही.
एनर्जी सेव्हिंगसाठी हे केले
एनर्जी सेव्हिंगसाठी हे केले जाते हा युक्तिवादही समजलेला आणि पटलेला नव्हता. तो युक्तिवाद अजून ह्या धाग्यावर दिसलेला नाही. >> कारण मलाही तो पटलेला नाहीये. उन्हाळ्यात विजेची बचत होत असेल तर हिवाळ्यात ती तितकीच वापरलीही जाते (वेळ बदलल्यामुळे) असे मला वाटते.
घड्याळ मागे केल्यामुळे एक तास
घड्याळ मागे केल्यामुळे एक तास जास्त झोप मिळते... एक दिवस... तेवढीच मज्जा बाकी काय ते एनर्जी सेव्हिंग वगैरे समजत नै ब्वा आपल्याला...
Pages