तें नावाचे बाबा - सुषमा तेंडुलकर

Submitted by चिनूक्स on 10 June, 2009 - 01:56

श्री. विजय तेंडुलकर यांच्या ज्येष्ठ कन्या सुषमा तेंडुलकर यांनी लिहिलेली ही कहाणी - त्यांच्या बाबांची. तेंडुलकर गेल्यानंतर आपल्या मनातलं कुणाला तरी भडभडून मोकळेपणानं आणि प्रांजळपणानं सांगत सुटावं या भावनेनं त्यांनी केलेलं हे लिखाण आहे.

हे काही कालक्रमानुसार घडत गेलेलं तेंडुलकरांचं जीवनचरित्र नाही. या जिव्हाळ्याच्या गप्पांना कालाचं बंधन नाही.. जसं आठवेल तसं केलेलं हे लेखन आहे. पण या सार्‍या हकिकतींतून 'तें' नावाचे बाबा अचूक उभे राहतात. बापानं लेकीवर आणि लेकीनं बापावर जे अतूट प्रेम केलं त्याचं हे एक जिवंत चित्र आहे.

'तें नावाचे बाबा' या पुस्तकातील ही काही पानं..

tenbaba.jpg

मी बाबांचं सगळ्यांत पहिलं अपत्य. माझा जन्म एका म्युनिसिपल हॉस्पिटलात झाला. त्यावेळी बाबांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. गंमत म्हणजे, माझी आई मला जन्म देऊन ज्या कॉटवर झोपलेली होती, तिच्या समोरच्या कॉटवर एक भिकारीण होती. आणि तिनेही मुलीलाच जन्म दिला होता. माझ्या डॉक्टरीण बाई आणि त्यांचे यजमान श्रीयुत नेरुरकर, बाबांचे मित्र. त्यांनी अनेक बाबतींत बाबांना मदत केली, तशी याही बाबतीत केली. बाबांना मी जन्मल्याचा प्रचंड आनंद झाला होता. मला सतत कडेवर घेऊन जिथं तिथं हिंडत असत. मी वाढत असताना त्यांनी माझ्यावर दोन गोष्टीही लिहिल्या. एक 'बोंडलं हरवलं' आणि दुसरी 'जगप्रवास'. माझ्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी त्या वेळच्या संपूर्ण पगारातून मला एक फ्रॉक आणला होता.

लहानपणापासून मला गरिबांविषयी कळवळा. माझ्याकडे जे असेल, त्यातून मी त्यांना मदत करायचे. अजूनही हे चालू आहे. बाबा मला नेहमी म्हणत, "मला माहितेय, तुला ह्या लोकांविषयी एवढं का वाटतं. कारण तुझा जन्मच मुळी भिकारणीबरोबर झाला."

नंतर प्रिया जन्माला आली. ती तब्येतीने फारच नाजूक. पण सुंदर होती. तिला कुठेही पाठवायचं तर बाबा मला तिच्याबरोबर, तिची काळजी घ्यायला पाठवत असत. मी ती आनंदाने घेत असे. ते मला तिच्यापेक्षा 'स्ट्राँग' समजत. त्या वेळी आमच्याकडे टेलिफोन नव्हता. त्यांच्या कामासाठी, ते मला एकटीला फोन करायला पाठवत असत. कुठलंही माझं काम असेल तर बाबा म्हणत, "जा. तूच तुझं काम करून ये. दुसर्‍यावर अवलंबून राहू नये." माझी भीती त्यांनी घालवली, सतत एकटीला सोडून आणि प्रोत्साहन देऊन.

दिवाडकर आणि कोरगावकर त्यांचे दाट मित्र होते. ते ज्योतिषी होते. बाबांना जेव्हा ते भेटत, तेव्हा आमचं सर्वांचं भविष्य सांगत असत. एकदा बाबा त्यांना भेटून आले, आणि मला आनंदानं सांगायला लागले, "आज त्यांनी मला जे तुझ्याविषयी सांगितलं, त्यात मला सगळ्यांत आवडलं की, ती तुमची मुलगी खूप उदार होणार. लोकांना सतत मदत करणार." मी मनातून खट्टू झाले. हे कसलं भविष्य! पण आजारी पडण्यापूर्वीही ते अनेक लोकांना सांगत, 'ही माझी मुलगी खूप उदार आहे.'

एकदा बाबांचे वडील आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तिथे माझ्या आईने हुंडाविरोधी खूप तडफदार भाषण केलं. आजोबांनी घरी येऊन बाबांना सांगितलं, "नान्या, मी आज एका मुलीचं भाषण ऐकलं आणि ती तुझ्यासाठी योग्य आहे." माझी आई तशी बाबांची नातलगच लागत होती. पुढे तिची आणि बाबांची ओळख झाली. बाबा तिच्या प्रेमात पडले. त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं. पण माझ्या आजीला पत्रिका जुळायला हवी होती. पत्रिका जुळत नव्हती. शेवटी दिवाडकर आणि कोरगावकर, बाबांचे ज्योतिषी मित्र, त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी खोटी पत्रिका बनवून, ती जुळवली. आणि आईबाबांचं लग्न झालं. माझी आई दिसायला खूप सुंदर. छान नृत्य करायची, सुंदर गायची आणि नाटकांतून कामं करायची. लग्नानंतर आईबाबांनी मिळून बर्‍याच नाटकांत कामं केली. सुरुवातीला त्यांचा संसार मोटर गॅरेजमध्ये होता. लग्नानंतर तीन वर्षांनी माझा जन्म झाला. त्यांची इतकी गरिबी होती की आईकडे फक्त दोन साड्या, एक परकर होता. एकदा खूप पावसामुळे आईचा परकर वाळलाच नाही. मग ती बाबांचा लेंगा आत घालून त्यावर साडी नेसून बाबांबरोबर तालमीला गेली.

शेवटपर्यंत आई माझ्या आजीची लाडकी सून राहिली. आजीला आवडतं म्हणून ती कायम केसांचा अंबाडा घालायची. आजीला आईविषयी खूपच वाटायचं. कारण तिला माहीत होतं, आपला मुलगा विजय खूप बुद्धिमान आणि दिसायलाही सुंदर. तिला आईची खूप काळजी वाटायची. आजी आईला अगदी शेवटपर्यंत धरून होती.

आजी आणि बाबांचा पुण्याला तिच्या घरी एक प्रोग्रॅम ठरलेलाच असे. बाबा तिच्या मांडीवर डोकं ठेवत. आजी त्यांना कुरवाळत राही. दोघांच्या गप्पा चालत. नंतर आजीला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला. बाबा नेहमी तिला भेटायला जात. तिची शेवटची स्टेज होती. एके दिवशी बाबा मुंबईला निघणार, एवढ्यात आजीने सांगितलं, "विजय थोडा वेळ थांब जरा." त्या अवस्थेतही ती केर काढत होती. बाबा थांबले. आजीनं तिचं डोकं बाबांच्या मांडीवर ठेवलं आणि ती गेली.

*

बाबांनी आईचा त्रास हॉस्पिटलमध्ये बघितला होता. ते नेहमी म्हणत, "मला हॉस्पिटलमध्ये कधीही ठेवू नका. घरीच ठेवा." पण शेवटी त्यांनाही दीर्घकाळ रुग्णालयात राहावं लागलं. पण प्रयाग रुग्णालय हे आमच्यासाठी रुग्णालय नव्हतंच. ते आमचं घर होतं. प्रयाग डॉक्टर नेहेमी आम्हांला म्हणत, "तुम्ही तुमची कामं करा. बाबा माझ्या घरीच आहेत असं समजा. मी त्यांची सगळी काळजी घेतो."

सुरुवातीला घरी जेव्हा बाबांचा आजार जास्त झाला तेव्हा त्यांनीच पुण्याला जायचं ठरवलं. जायच्या दिवशी सकाळी निघताना मला म्हणाले, "हे बघ मी आठ-दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहून येतो. तू काही काळजी करू नकोस. मी लवकरच परत येणार." आदल्या दिवशी मीही बाबांबरोबर रात्रभर जागलेली होते. ते जे मुंबईहून पहिल्यांदा पुण्याला हॉस्पिटलमध्ये गेले ते थेट ’आय.सी.यू.’मध्ये. एक एक दिवस जात होता. बाबा काही व्यवस्थित व्हायची चिन्हं दिसेनात. मग मीच दर रविवारी त्यांना भेटायला पुण्याला जात असे. पहिल्या दिवशी गेले तर आय.सी.यू.मध्ये त्यांना खूप नळ्या लावलेल्या होत्या. मला म्हणाले, "ह्या नळ्या बघून घाबरू नकोस हं. मी बरा होणाराय आणि तुझ्याबरोबर राहायला येणार." मला म्हणाले, "जा बरं- काहीतरी आधी खाऊन ये, इथे काही मिळणार नाही." मी म्हटलं, "बाबू मी वाटेत खाऊन आलेय, तुम्ही काळजी करू नका."

असे अनेक महिने गेले. त्यांच्या तब्येतीचे चढ-उतार चालू होते. पण मुंबईपेक्षा पुण्यातच त्यांची तब्येत चांगली राहत होती. मला तर आता असं वाटतं, त्यांना मुंबईला आणायलाच नको होतं.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर सर्वांसाठी एक ’गेट टुगेदर’ही सर्वांनी हॉस्पिटलच्या गच्चीवर केलं. त्यांची खूप मित्रमंडळी जमली होती. बाबा खूप छान दिसत होते. खूप खुषीत होते.

हॉस्पिटलमधून मग बाबा मुंबईत काही दिवस तनूच्या घरी होते. नंतर अंधेरीला घरी आले. पण मुंबईत घरी आल्यानंतर त्यांनी संकल्पच सोडला, "मी खाणार नाही, औषधं घेणार नाही, आयुष्य माझं आहे, तुम्ही मला कसलीही सक्ती करू नका." मी एकदा त्यांच्या जवळ गेले आणि मोठ्यांदा म्हटलं, "बाबा काही खात नाही. त्यामुळे मलाही खाणं जात नाही." तर ते एकदम जागे होऊन म्हणाले, "मी आज खाणार आहे." पण तरीही खात नव्हते. मलाही जेवण जात नसे. मग त्यांना कळलं की असं सर्व सोडूनही आपल्याला मरण येत नाहीये. परत त्यांना पंचवीस ठिकाणी दुखायचं. शेवटी त्यांनी सांगितलं, "ट्रीटमेंट द्या." लगेच त्यांना परत प्रयाग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मला खरंच कळत नाही, ज्या माणसाला जगण्याची इच्छाच उरलेली नाही, त्या माणसाला एक इंजेक्शन देऊन का नाही मरू देत? इच्छामरण का नसावं?

शेवटचे दहा दिवस तरी किमान ते खूपच आजारी होते. पण त्यांची विनोदबुद्धी ’ऑन लाइन’ होती. एकदा आम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या इंग्रजी सिनेमाची डी.व्ही.डी. लावून दिली. कानात इअरफोन्स घातले. हे सर्व केल्यावर बहादूरने त्यांच्यासाठी टी.व्ही. लावला. त्यावर राखी सावंतचा मुलाखतीसकट दे धमाल गोंधळ चालू होता. बाबांचं लक्ष कधी कुणास ठाऊक, त्या टी.व्ही.कडे गेलं. थोड्यावेळानं शांतपणे ते म्हणाले, "हे माझं नाही." आम्ही म्हट्लं, "अहो ती डी.व्ही.डी. तुमच्या आवडत्या सिनेमाची आहे." तरी म्हणताहेत, "हे माझं नाही." शेवटी आमच्या लक्षात आलं की ते सिनेमा फक्त ऐकत होते. आम्ही खूप हसलो. ते म्हणाले, "आधी बंद करा तो टी.व्ही. मला फिल्म बघू दे." शेवटी बहादूरला टी.व्ही. बंद करावा लागला.

एकदा बहादूर त्यांना खुर्चीत बसायला सांगत होता. व्यायाम म्हणून. त्यांना खुर्चीत अजिबात बसायचं नव्हतं. बहादूरचं बोलणं नेहमीच वरचढ. आजारी माणसासाठीही तो त्याचा टोन बदलत नसे. त्याने त्यांना खुर्चीत थोडा वेळ बसवलं, परत झोपवलं. त्यांनी मला हाक मारली, "सुषमा, इकडे ये." मी म्हटलं, "काय?" म्हणाले, "हा बहादूर पाताळयंत्री आहे. माझ्यावर सारखा अरेरावी करतो. ह्याला तू काढून टाक." मला तो 'पाताळयंत्री' शब्द ते त्या अवस्थेत असताना त्यांना आठवलेला पाहून खूप गंमत वाटली. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला, "बहादूर करतो ते प्रेमाने करतो." तर माझ्यावर रागावले. म्हणाले, "तू परत तेच मला सांग."

एके दिवशी मी एकटीच त्यांच्याजवळ बसले होते. मला ते काहीतरी 'जर्मन, जर्मन' म्हणत होते. मला काही कळेना. शेवटी बहादूर आला. मी म्हटलं, "बघ ते जर्मनचं काय म्हणतायत."
बहादूर म्हणाला, "जर्मन वाटर म्हणजे सोडा त्यांना हवा आहे."
मग मी सोडा दिला. पण नंतर त्यांनी उट्टं काढलंच. बहादूरला म्हणाले, "ही मुलगी."
बहादूर म्हणाला, "ती कोण आहे?"
म्हणाले, "ती माझी मुलगी आहे."
बहादूर म्हणाला, "नाव काय तिचं?"
म्हणाले, "सुषमा."
बहादूरने विचारलं, "मग तिचं काय?"
ते म्हणाले, "ती अतिशय मंद आहे. माझं जर्मन वॉटर तिला कळू नये?"
मी खळखळून हसले.

*

शेवटी शेवटी त्यांना व्हेन्टिलेटरचा खूप त्रास व्हायचा. तो त्यांना नको वाटायचा. रात्री ते 'मास्क' काढूनच टाकत. त्यांना सपोर्ट नको होता. तनूची त्यांना मुंबईला आणायची तयारी चालू होती. डॉक्टर प्रयाग बघायला आले. काही लोक म्हणत होते की काहीच आशा नसेल तर मुंबईला न्यायलाच लागणार. पण माझा डॉ. शिरीष प्रयागांवर विश्वास होता. ते 'सपोर्ट' काढून बाबांना रूममध्येच ठेवणार होते. त्यांचा व्हेन्टिलेटर काढायचा ठरला. डॉक्टर आमच्याशी बोलले, "आपण त्यांचा व्हेन्टिलेटर काढून त्यांना साध्या ऑक्सिजनवर ठेवू या आणि कमीत कमी मेडिकेशन देऊ या." डॉक्टरांनी 'आयसीयू'मधून त्यांना रूममध्ये न्यायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ते परत थोडे जागे झाले. तनूने डॉक्टरना सांगितलं की, आपण परत व्हेन्टिलेटर लावून बघू या. पण प्रयाग म्हणाले, "उपयोग नाही."

दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता मी हॉस्पिटलमध्ये पोचणार होते. पण आठ वाजताच तनूचा फोन आला. 'लवकर निघून ये.' मी गेले तेव्हा त्यांचं शरीर थंड पडलं होतं. मी त्यांना 'किस' केलं. थोडी रडले. त्यांचे कपडे वॉर्डबॉईजनी बदलले. हॉस्पिटलच्या लोकांनी त्यांना हार घातला. फुलं वाहिली. त्यांना नेताना मी त्यातली दोन-तीन फुलं काढून घेतली. ती अजूनही माझ्या डायरीत आहेत. शेवटपर्यंत मी जेवढं त्यांना कुरवाळून घेता येईल तेवढं घेतलं. बघून घेता येईल तेवढं बघून घेतलं. कारण एवढा मोठ्ठा माझा बाप मला परत दिसणार नव्हता.

त्यांची इच्छा होती की ते गेल्यावर त्यांना पत्रकारांनी कॅमेर्‍यात घेऊ नये. आम्ही पत्रकारांना जेव्हा अशी विनंती केले तेव्हा लगेचच सर्वांनी कॅमेरे बंद केले. सर्व पत्रकारांना बाबांविषयी किती आदर होता!इतर ठिकाणी पत्रकारांना नावं ठेवली जातात. पण माझ्या बाबांच्या बाबतीत असं मुळीच झालं नाही. झाडून सगळ्या पत्रकारांनी बाबांचं म्हणणं ऐकलं. मी खरंच पत्रकारांची ऋणी आहे.

वैकुंठ स्मशानभूमीत गेल्यावर तिथल्या कचेरीत मला मोहन आगाशेने हाक मारून बोलावलं. म्हणाला, "हा फॉर्म भरायचाय. मला माहिती सांग." दुसर्‍या बाजूला अमोल पालेकर उभे होते. नाव, पत्ता, मुलं किती, सगळं. मी आणि मोहन आगाशेने लिहिलं. नंतर मला मोहनने विचारलं, "शिक्षण किती?" मी म्हटलं, "मॅट्रिक पण नाही." त्याने लिहिलं, 'नॉन-मॅट्रिक.' हा माझा 'बाबू'. नॉन-मॅट्रिक. शाळा बुडवून हॉलिवूडचे सिनेमे बघायचा. १९४२च्या चळवळीत सहभागी झाला. शाळा सोडून दिली. त्या माझ्या बाबूने आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. लहानपणी एका ज्योतिषाने कोल्हापुरात त्यांचा हात बघून सांगितलं होतं, "तेंडुलकर, तू मोठं व्हायचं ठरवलंस तर खूप मोठा होशील. तुझ्यासारखं दुसरं कुणीही मोठं नसेल. पण वाईट व्हायचं ठरवलं तर तुझ्यासारखं वाईटही कुणी नसेल!"

*

माझ्या लाडक्या सुषमास,

तुझ्या वाढदिवशी माझ्याकडून काही लिहून घेण्याचा तुझा नियम. पुढच्या तुझ्या वाढदिवसांना मी असेन की नाही याची खात्री नसल्याने तुला लिहायला बसलोय. लिहिताना आपण बोलताना असतो त्यापेक्षा specific आणि मुद्द्याला धरून असतो. लिहून मला काही गोष्टी चांगल्या सांगता येतात, तसे लेखी विचारून मिळणार्‍या उत्तरातून अनेक गोष्टी ठसठशीतपणे समजतात.

तुला फक्त माझाच आधार आहे. पण मी फार काळ असणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. कदाचित उद्या किंवा पुढच्या आठवड्यातही नसेन. मी गेलो तर तुला हक्काचे माणूस नाही. ज्याच्यावर हक्काने राग काढू शकशील असेही कुणी नाही.

वाढदिवसाच्या दिवशी ’मोठी हो’ म्हणण्याचे कारण नाही. जन्माला आलेले बहुतेक सगळे इच्छा असो, नसो, मोठे होतच असतात. म्हणजे केवळ आकाराने नव्हे. माणसापुरते बोलायचे तर समजुतीनेदेखील. ना-समज असे आपण मानतो, त्याची समजदेखील जी थोडी फार असेल ती वाढत असते. आपण तिची दखल अनेकदा घेत नाही, ही गोष्ट निराळी.

तर आपण वाढतो आहोत. तू वाढते आहेस. कालपरवा माझे बोट घट्ट पकडून रस्त्यातून एकेक पाऊल टाकत, भोवतालचे सगळेच नवे नवे पाहात तू चालत होतीस आणि एकदम मोठी कशी झालीस? असे मला मधूनच वाटते. मधली वर्षे अलीकडे एकमेकांत मिसळून जवळ जवळ नाहीशी व्हायला बघतात. खूप जुना क्षण हा आत्ताचा बनून समोर उभा राहतो. ही मजा माझ्या वयाचा भाग असावी. काळ सर्वार्थाने आटायला लागला आहे. आयुष्य फार छोटे वाटते. त्याहून मी छोटा. बाकी सगळे मोठेच मोठे. लांबच लांब. नजरेत न सामावणारे.

तुझ्या वाढदिवसानिमित्ताने माझ्या वयाची जाणीव झाली. माझ्या आयुष्याचा अखेरचा काळ सुरू झाला आहे. भविष्यकाळ संपल्यात जमा आहे. वर्तमानच खरा आहे. तुम्हा सर्वांमुळे तो चांगला आहे पण मी लौकरच नसेन हे विसरून जगण्यात आता शहाणपणा नाही. हे लिहिताना मी मुळीच उदास नाही. इतके जगण्याची संधी मिळाल्यानंतर उदास होणे गुन्हाच ठरेल. तुला हे लिहिताना मी अगदी मजेत आहे.

तुझे आयुष्य तू तुझ्या समजुतीने, अनुभवाने, सावधपणे आणि शहाणपणाने जग. तुझे आयुष्य सर्वस्वी तुझे आहे. आणि ते कसे जगायचे हे सर्वस्वी तूच ठरवायचे आहेस. केवळ भावनेने निर्णय घेऊ नकोस. यात passionही येते. तर्‍हेतर्‍हेचे आवेग येतात. हे आवरण्याला कठीण असतात. आपण आपल्याला अभिप्रेत नसलेल्या गोष्टी करतो. यातून कुणीही पूर्णत: मुक्त नाही, मात्र निर्णय घेताना विचार जागा असला पाहिजे. तो भावनेपासून वेगळा असला पाहिजे. तो जितका कोरडा तितका स्वच्छ आणि पारदर्शक असतो. म्हणून तो कोरडा असला पाहिजे.

हे म्हटले तर स्वत:च्या बाबतीत कठीण. पण अशक्य नव्हे. विचाराने घेतलेला निर्णय अचूकच असतो असेही मी मानत नाही. पण अशा निर्णयात पश्चात्तापाला जागा नसते. पश्चात्ताप हा आपल्या मौल्यवान आयुष्याचा अपव्यय. चूक झाली - विचाराने झाली - तर किंमत मोजून मोकळे झाले पाहिजे. तक्रार करणे, रडणे हा लेचेपेचेपणा. चुकादेखील ताठ मानेने स्वीकारून जगायचे तर त्या निर्दयी विचाराच्या आधाराने घडाव्यात. म्हणून निर्णयाच्या वेळी तू आयुष्यात विचार जागा ठेव. त्याने चुका टळतात असा गैरसमज ठेवू नकोस.

तू जिद्दी आहेस. एखाद्या गोष्टीचा ध्यास जीव तोडून घेणारी आहेस. तो घेतल्यावर बाकी सर्व गोष्टी बिनमहत्त्वाच्या मानणारी आहेस. हे तुझे बळ आहे. या बळावर तू आत्तापर्यंतच्या आयुष्यात जे मिळवलेस ते मिळवलेस. जे मिळाले नाही त्यामागेही तू याच जिद्दीने धावलीस. आपल्याला जे मिळते आणि मिळत नाही त्यात आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी गुंतलेल्या असतात. या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींचे भान, निर्णय घेतेवेळी हरवू देऊ नकोस. किंबहुना ते पक्के मनाशी ठेव. एकतर बिनतक्रार किंमत चुकवण्याची तयारी ठेवून जिद्द पुढे चालवावी किंवा नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींचे वर्चस्व मनोमन मान्य करून मागे फिरावे एवढे दोन पर्याय आपल्यापुढे असतात. दोन्ही अवघड असतात. पण जिद्दीने जगण्याचे आयुष्य अवघडच असते. त्यात सोपे सहसा काही असत नाही. कोणता पर्याय स्वीकारायचा हे तूच ठरवायचेस.

मला असे लक्षात येते की, तुझ्या आयुष्यात जी नाती निर्माण झाली, त्या पुरुषांच्यात कळत-नकळत तू मला पाहतेस. मला महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यातली नाती महत्त्वाची होतात. ती सहसा तुटत नाहीत. मी ती तोडत नाही. यामुळेच माझा फायदा या नात्यांना मिळतो. तो किती मिळू शकतो हे प्रमाण कमीजास्त होईल. पण मी पुरुष म्हणून जास्त dependable आहे. माझ्या फायद्यासाठी मी नात्यातून पळत नाही. ते तुडवून पुढे धावत नाही. हा माझा चांगुलपणा वगैरे नसून महत्त्वाकांक्षेचा अभाव या उणिवेतून तयार झालेला स्वभाव-गुण आहे. मला मोठी उद्दिष्टे नाहीत. नात्यांवर आणि नात्यातून जगणारा मी माणूस आहे. मोठी उद्दिष्टे नसणार्‍या माणसात मोठे दोषही नसतात.

तुझ्या आयुष्यात असा पुरुष नाही. जे आले ते वेगळे होते. हे मी तुझ्यापुढे माझे observation ओघाने ठेवतो आहे. मला तू कुणात पाहत असलीस तर तुझी दृष्टी स्पष्ट व्हावी म्हणून मी हे लिहिले. मैत्रीतला पुरुष dependable असणे फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते. नाहीतर त्या नात्याला आकार येऊ शकत नाही. ते स्थिर होऊ शकत नाही. धक्के बसत राहतात. तुझे आयुष्य तुझे आहे, ते आणखी कुणाचे नाही. कुणीही त्याच्याशी खेळू शकत नाही. तू कुणाला खेळू देऊ नयेस असे वाटते. याचा अर्थ नोकरीतल्या पर्मनंट झाल्याच्या पत्रासारखे काही आपल्या हातात आले पाहिजे असा नाही. एखादे नाते असे होईल की नाही ते आपल्यालाच आतून कळू लागते. आणि हे कळणे चुकत नाही. ते बरोबर येते.

तुझ्याकडे एक मोठा गुण आहे. तू वर्तमानातच जगत असतेस. भविष्यात नाही आणि भूतकाळात नाही. हा गुण चांगला आहे. माझ्याकडे तो काही प्रमाणात असत आला. पण वर्तमानात जगत असताना भूतकाळाकडे पाहणे निर्णयाच्या वेळी टाळू नये. भूतकाळ जगून झालेला असतो म्हणजे एक प्रकारे निरुपयोगी. पण त्यात आपले आधीचे निर्णय, अ-निर्णय दडलेले असतात. ते नव्या निर्णयाच्या वेळी उपयोगी येणारे असतात. त्याचा उपयोग करावा.

आपण जन्माला येतो ते प्रथम स्वत:साठी येतो. स्वत:च्या गरजेसाठी इतर सर्व शोधतो, समजावून घेतो, वाढवतो, जोडतो किंवा तोडतो. स्वत:ची गरज असल्याशिवाय काही करू नये. इतरांसाठी खर्ची पडणे चूक. आपली गरज केंद्रस्थानी ठेवूनच जगावे. ही गरज नेहमीच स्वत:पुरती, संकुचित असेल असं नाही. मदर तेरेसाने जे काय केले ते स्वत:ची गरज म्हणून केले आणि गरज व्यापक होत जाणे हा आपल्या वाढीचा भाग आहे. पण गरज आपलीच. खर्ची पडू नकोस, उपयोगाला ये. त्यातून वाढ. स्वत: श्रीमंत हो. श्रीमंती केवळ पैशाची नसते.

जगण्याच्या घाईत कसेही जगले किंवा न जगले तरी आयुष्य थांबत नाही. त्याचे काटे झरझर पुढे धावत असतात. आपण जगत जात असतो. पण शेवटच्या टप्प्याशी जगलेले सर्व आपल्याला येऊन धरते. कधी आपले पापे घेते, कधी लाथा घालते. शिव्याशापही देते. यातून सुटका नसते. विशेषत: संवेदनक्षम माणसांना तर मुळीच नसते. म्हणून जगण्याच्या घाईतही स्वत:ला बिनमहत्त्वाचं समजू नकोस. स्वत:साठी जग. मग इतरांसाठी.

मला म्हणायचे ते म्हणून झाले आहे, असे वाटते. निर्णयाच्या वेळी हे पत्र वाच. ते तुला मार्ग दाखवू शकेल. मी नसलो तरी तुझ्यातला मी असेन. तो तुला उत्तम जगण्याला मदत करील. हे लिहिताना माझे मन प्रसन्न आहे. वाचल्यावर तूही तसेच राहायचेस. एरवी ढगाळ राहणारे माझे मन निरभ्र आहे. स्वच्छ आहे. तुझ्या मनाचा मुळातला सरळपणा ही तुझी ताकद ठरू दे. घाबरण्यासारखे तुला काही नाही. बिनधास्त जग.

तुझ्यावर नितान्त प्रेम करणारा-

तुझा
बाबा.

------------------------------------------------------------------------------------

तें नावाचे बाबा

लेखिका - सुषमा तेंडुलकर
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठसंख्या - ९८
किंमत - रुपये शंभर

------------------------------------------------------------------------------------

पुस्तकातील निवडक भाग पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, यांच्या सौजन्याने
टंकलेखन साहाय्य - अंशुमान सोवनी

------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझे आयुष्य तू तुझ्या समजुतीने, अनुभवाने, सावधपणे आणि शहाणपणाने जग. तुझे आयुष्य सर्वस्वी तुझे आहे. आणि ते कसे जगायचे हे सर्वस्वी तूच ठरवायचे आहेस. केवळ भावनेने निर्णय घेऊ नकोस. यात passionही येते. तर्‍हेतर्‍हेचे आवेग येतात. हे आवरण्याला कठीण असतात. आपण आपल्याला अभिप्रेत नसलेल्या गोष्टी करतो. यातून कुणीही पूर्णत: मुक्त नाही, मात्र निर्णय घेताना विचार जागा असला पाहिजे. तो भावनेपासून वेगळा असला पाहिजे. तो जितका कोरडा तितका स्वच्छ आणि पारदर्शक असतो. म्हणून तो कोरडा असला पाहिजे.
हे म्हटले तर स्वत:च्या बाबतीत कठीण. पण अशक्य नव्हे. विचाराने घेतलेला निर्णय अचूकच असतो असेही मी मानत नाही. पण अशा निर्णयात पश्चात्तापाला जागा नसते. पश्चात्ताप हा आपल्या मौल्यवान आयुष्याचा अपव्यय. चूक झाली - विचाराने झाली - तर किंमत मोजून मोकळे झाले पाहिजे. तक्रार करणे, रडणे हा लेचेपेचेपणा. चुकादेखील ताठ मानेने स्वीकारून जगायचे तर त्या निर्दयी विचाराच्या आधाराने घडाव्यात. म्हणून निर्णयाच्या वेळी तू आयुष्यात विचार जागा ठेव. त्याने चुका टळतात असा गैरसमज ठेवू नकोस.

>>> किती साध्या सोप्या भाषेत सुंदर, आयुष्याला पुरुन उरेल असा सल्ला दिला आहे.

आणि ते महत्वाकांक्षेचा अभाव आणि नाती जपण्याच्या स्वभावासंदर्भातले आत्मपरिक्षण तर अफाट आहे.

फक्त तेंचे लेखन आवडले. आत्मपरिक्षण परखड आहे, आणि त्यात स्वतःला जराही ढील दिलेली नाही हे आवडले. लेच्यापेच्याचे काम नोहे याची जाणीव करुन देते !

चिनुक्स आणि अंशुमानचे आभार.

ते शेवटचे पत्र फारच हृदयस्पर्शी आहे..

चिनूक्स आणि अंशुमान, आभारी आहोत!!
--------------
नंदिनी
--------------

मलाही ते 'तें'चं पत्र(च) आवडलं. किती स्वच्छ, नेमके आणि परखड विचार!

धन्यवाद चिनूक्स आणि अंशुमान.

पत्र छानच आहे...

चिनूक्स आणि अंशूमान.. परत एकदा धन्यवाद...

छान लिहिले आहे सुषमा तेंडुलकरांनी त्यांचे अनुभव. शेवटचा भाग वाचून भरून आलं.
तें च पत्र अशक्य सुंदर आहे. किती मोठं तत्वज्ञान एका पत्रात सामावलय.
खूप खूप धन्यवाद चिनूक्स आणि अन्शुमान.

पत्र खरंच छान लिहिलं आहे... एकदम आवडलं.

पत्र खूप सुंदर आणि हृद्यस्पर्शी.

सुंदर पत्र आणि लेख्.चिनुक्सचे धन्यवाद

तेंडुलकरांचे ज्योतीषी घनिष्ठ मित्र असतील असे वाटले नव्हते
~~~~~~~~~~~~~~~~~~
अच्छा था मन का अवसन्न रहना
भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
कि बहुत दिन हो गये घरको छोडे|

'तें' पत्रं कुणीही जतन करावं आणि निर्णयाच्या वेळी काढून वाचावं असं. सुरेख...
चिनुक्स, अंशूमान... आभार रे तुमचे.

मस्तच. धन्यवाद, चिनूक्स आणि अंशुमान. प्रिया तेंडुलकर बद्दल जितकं माहित आहे, तितकंच कमी सुषमा तेंडुलकरबद्द्ल.

धन्यवाद, चिनूक्स आणि अंशुमान! वेगवेगळ्या लेखांमधुन तें ची एव्हढी छान ओळख करुन दिल्याबद्दल! एकुणच लेख खुप सुंदर आहे. शेवटचे पत्र तर एकदम ह्रदयस्पर्शी!
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

पत्र ! किती किती किती स्वच्छ आणि स्पष्ट विचार असावेत ! भूमितीतल्या आकृत्यांसारखे.
चिन्मय, अंशुमान, कितीही आभार मानले तरी अपुरे आहे.

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    भूमितीतल्या आकृत्यांसारखे. <<<

    अगदी रे! Happy

    एका संवेदनशील तरीही प्रखर बुद्धीमत्ता असलेल्या तेंडुलकरांची आम्हाला इतकी ओळख करुन दिल्याबद्दल चिनुक्स तुमचे आभार.

    काय बोलणार, लिहीणार ?....
    ह्यावर थोडे चिंतन आवश्यक आहे.
    "तें" चे ते पत्र फक्त सुषमाताईंसाठीच नाही तर आपल्यासाठी पथदर्शक आहे......!

    किती नेमके विचार मांडले आहेत पत्रातून! कोणाही पालकाला आपल्या मुलांना असंच काही सांगायचं असणार. पण किती स्वच्छ, सरळ शब्दात ते सगळं सांगितलंय!

    चिनूक्स, अन अंशुमान , असे निवडक भाग आमच्यापुढे आणल्याबद्दल तुमचे किती आभार मानू ?

    ते, त्यांची मुलगी आणि ते पत्र ! छापलं गेलं काळजावर

    चिनुक्स्,अंशुमान ऋणी आहे !

    तें च पत्र अशक्य सुंदर आहे. किती मोठं तत्वज्ञान एका पत्रात सामावलय.
    खूप खूप धन्यवाद चिनूक्स आणि अन्शुमान. >>

    +१

    Pages