मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होऊन गेलंय ते सांगते. दरवेळी एखाद-दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा 'माझे फारसे दिवस राहिलेले नाहीत' हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो. ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरांनी तिला काही नवी औषधं सुरू केलीयत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच 'अरे वा' म्हणतो. 'भारीच औषध दिसतंय. तुला नक्की आराम पडेल याने'. यावर आई नेहमीप्रमाणे भला मोठा उसासा टाकते.
तिची तगमग या तपासण्या आणि औषधांपेक्षा वेगळी आहे हे आपल्याला समजतं. खरंतर हे आपल्याला अनेक वर्षांपासून समजत आलेलं आहे. तिला नातवंडांचं तोंड बघायचं आहे. तिची अपेक्षा वयपरत्वे रास्तच आहे. एरवी तिचं आयुष्य संघर्ष आणि अभावांतच निघून गेलं होतं. वडील गेल्यापासून ते आपल्याला नोकरी मिळेपर्यंतचा काळ. तब्बल बारा वर्षं. आमच्या बोलण्यात ह्या बारा वर्षांचा उल्लेख नेहमीच येतो. आई म्हणते, 'बाबा, रामचंद्रालादेखील बारा वर्षं वनवास सहन करावा लागला होता. आपण तर साधी माणसंच'.
मग काहीबाही आठवणी निघतात. एखाददुसरी दुखरी नस. सणासुदीच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये असणारी लगबग, रोषणाई आणि आपल्या घरातला अंधार आणि उदासी. परिस्थिती नसतानाही आई जमेल ते प्रयत्न करून आपल्यासाठी कपडेलत्ते करायची. आपण तिचं मन राखायचो पण प्रचंड वाईट वाटत राहायचं. आईच्या आनंदाचं काय? आपलं जे झालं ते झालं किमान आपल्या मुलाने चांगलं आयुष्य जगावं अशी तिचा प्रयत्न असायचा. आपण आणि आपले वडील हे तिचं सर्वस्व. वडील गेल्यानंतर आमच्या घराची आणि पर्यायाने आमचीही रया गेली.
कुटुंबातलं एखादं मरण त्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून जावं असं काहीसं होऊन गेलं होतं. नातेवाईक, त्यांचे जाणते-अजाणतेपणी होणारे उपकार, मदत. त्या उपकारांचं आपल्यावर झालेलं ओझं. हजार गोष्टी आहेत. घरी गेलं की ह्या सगळ्या गोष्टी डोक्यावर येऊन कोसळतात. आपल्या डोळ्यांमध्ये सर्वदूर पसरून राहिलेली ही बेरंगी कुठेतरी आपल्या जुन्या दिवसांचं देणं असावी. खरंतर जगात रंगांची कमतरता नाही. पहाटेचं केशरी भगवेपण. रात्रीची अथांग निळाई. रस्त्यावर दुतर्फा फुलणारी पिवळीजर्द फुलं. आपल्या घरासमोरची जास्वंदी. वाट्टेल तितके रंग आहेत. आपल्याला ह्या सर्वांचा सपशेल विसर पडावा का? की आपल्या रक्तातच पाणी साचलं आहे?
'कधी आला भाऊ?' एक प्रेमळ वयस्कर आवाज आपली तंद्री भंगवतो. द्रौपदामावशी, आईची मोठी बहीण आलेली असते. 'अरे मावशी! तू कधी आलीस'. आपण गडबडून विचारतो. 'मघाशीच आले बाबा. तुम्हां मायलेकाचं बोलणं सुरू होतं. म्हटलं कशाला खोडा घाला!' ह्यावर आई म्हणते, 'काय गं आक्का, काही बोलते. तुझं येणं कसं खोडा होईल बाई?' आई पुढे होत बोलते. 'बैस कशी इथं. मी चहा टाकते तुझ्यासाठी'. आई अक्काला बसवून स्वयंपाकघरात लगबगीने जाते. आपल्या बहिणीला भेटून झालेला आनंद तिच्या लगबगीतून स्पष्ट जाणवतो.
आई आणि अक्का दोघी सख्ख्या बहिणी. दिसतातही एकदम बहिणी-बहिणीच. पण बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त आहेत एकमेकींच्या. अक्काचा स्वभाव खूपच मायाळू. तिच्या तुलनेत आई थोडी कठोरच आहे. ऐन तारुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीने आईच्या स्वभावात कडवटपणाच येऊन बसला होता. अक्का बिचारी फारच मऊ होती. एवढा मोठा संसार नेटाने सांभाळणारी. तीन पोरं आणि दोन पोरी असा मोठाच कुणबा होता तिचा. हाताला थोडीफार जमीन पण ती देखील कोरडवाहूच. घरी गरिबीचे कायम वास्तव्य. पण अक्काचं मन मोठं होतं. कधी कुणाच्या घरी रिकाम्या हातानं गेली नाही. काहीतरी घेऊनच यायची खायला. नाहीच काही मिळालं तर किमान डझनभर केळीतरी. तिच्या ह्या स्वभावाचं कायम कौतुकच वाटत आलं आहे आपल्याला. ही साधी माणसं, एवढी मायाळू, एवढी माणुसकी असणारी. आणि दुसरीकडे आपण बघतो ते, ज्यात जगतो ते साधनसंपन्न जग. आपल्यासकट आपल्यासारख्या कोत्या माणसांनी भरलेलं. दहा प्रकारचे विमे काढूनही आपल्याला नीट झोप लागत नाही. मागे ऑफिसातल्या गणपतीसाठी पब्लिकने आपल्याकडून दोन हजार वर्गणी काढून घेतली तर दोन दिवस करमलं नाही आपल्याला.
बाकी काय, मुलं कशी आहेत? आपण मावशीच्या एकेका मुलाचे नाव घेऊन पृच्छा करतो. धाकला इथे, मधला तिथे. मोठा गावी. अजून कोणकोण कुठंकुठं. मावशी भरभरून सांगते. आपण समजून घेतो आहोत असं दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करतो. पण एवढं मोठं गणगोत, ते एका संवादात लक्षात राहणं कठीणच. गेल्या काही दिवसांत अक्काची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे असं समजतं. नाशिककडून आलेल्या पाण्यामुळं तिच्या शेतीचा भाव वधारला आहे. हे ऐकून आपल्याला खरंच आनंद होतो. कुठेतरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचं भलं होतंय हे पाहून होणारा निरपेक्ष आनंद. मग विषयाला फाटे फुटत जातात आणि तिच्या घराचा विषय निघतो. मुलांनी तिचं घर विकायला काढलं आहे असं सांगून अक्का डोळे टिपू लागते. तिनं आणि तिच्या नवऱ्यानं मोठ्या कष्टाने बांधलेलं हे घर. त्या घरातच तिनं आपलं बहुतेक आयुष्य काढलेलं. मुलांची दुखणीखुपणी, त्यांचं बालपण. या घरातच तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या आठवणींचं अधिष्ठान असणारं हे घर मुलांनी बाप मरतो न मरतो तोच वर्षभरात विकायलाही काढलं होतं.
रडू नकोस, आक्का. ही तर जगरहाटीच आहे. हे जुनं घरं जाईल तर तुझ्या मुलांची नवी, सुखसुविधांनी युक्त घरं होतील हे का वाईट आहे? आपण उगाचच काहीबाही सांगून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. एव्हाना चहा घेऊन आलेली आईदेखील काही सांत्वनपर बोलू लागते. आपण आक्काला समजावण्यासाठी म्हणून बोललो खरं पण जुनं जाऊन नवं येण्याची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मोठीच जीवघेणी आहे. बरं झालं आपल्याला भावंडं नाहीत असा एक विचारही त्यावेळी मनात चमकून गेला.
मावशीचं घर कोणी जवळचाच नातलग विकत घेणार आहे. मुलं घर विकून आलेला पैसा सचोटीनं वापरणार नाहीत अशी तिला काळजी वाटते. मोठ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मधला व्यसनी आहे. धाकल्याची संगत वाईट. शिवाय मुलींना वाटा दिला जाणार नाही, त्यामुळे भविष्यात जावई उलटतील आणि हिस्सा मागायला लावतील अशी शंकादेखील तिला भेडसावते आहे. पैशावरून आताच मुलांमध्ये आणि त्यांच्या बायकांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. काय गंमत आहे पाहा, सगळी रक्ताचीच नाती, पण एकदा पैसा मध्ये आला की निव्वळ व्यवहार सुरू होतो !
आई आणि मावशीसोबत खूपच गप्पा होतात. बघताबघता संध्याकाळ होते. जेवणानंतर फिरायला म्हणून बाहेर पडतो. पलीकडच्या गल्लीत वेरुळकर सरांचं घर आहे. त्यांना भेटून यावं असा विचार येतो. वेरुळकर आपल्याला इंग्रजी शिकवायचे. तळमळीचे शिक्षक - अत्यंत कमी पगारावर जीव तोडून काम करणाऱ्या आदर्शवादी-ध्येयवादी पिढीतलं झाड. ह्या लोकांनी आपली उमेदीची वर्षं अशीच घालवून टाकली. ना धड पैसा मिळवला ना केलेल्या कामाचे श्रेय. पण तरीही ह्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं. अशी गोष्ट जी आपल्याला कदाचित कधीच साधणारी नाही.
विचार करता-करता सरांच्या घराजवळ जाऊन पोहोचतो. दार उघडेच असते. सर बल्बच्या उजेडात काहीतरी वाचत बसलेले असतात.
'येऊ का सर?' आपण विचारतो. 'अरे ये की! असा विचारतोयस काय?' सर आनंदाने स्वागत करतात. आपल्याला बसायला खुर्ची देतात. आपण उगाचच थोडेसे वरमतो. 'राहू द्या सर. मी घेतो खुर्ची. तुम्ही बसा. सहजच आलो होतो भेटायला उभ्या उभ्या'. 'अरे वा ! असं कसं तू आमचा आवडता विद्यार्थी. शिवाय आता एवढा मोठा अधिकारी. तुला खुर्ची तर हवीच'. सर मिश्किलपणे बोलतात.
'काय सर. तुमची विनोदबुद्धी भारीच. अहो मी साधा सरकारी कर्मचारी आहे. शिवाय माझ्या डोक्यावर अधिकाऱ्यांची अख्खी पंगतच आहे - मी कसला आलोय अधिकारी!' अशा काहीबाही गप्पा होतात. मग चहा. सर आता बऱ्यापैकी म्हातारे दिसू लागले आहेत. सध्या ते आणि काकू दोघेच असतात इथे. दोन्ही मुलांची लग्नं होऊन गेलीयत. एक मुलगा पुण्यात असतो तर दुसरा मुंबईत असे समजते.
मुलासोबत राहायला का गेला नाहीत हे विचारण्याचं धाडस होत नाही. एक तर म्हातारा तत्त्वांचा पक्का आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं. दुसरं हे की आपली आई तरी कुठे राहते आपल्यासोबत? खरंतर ह्या जुन्या पिढीला आपली मुळं तोडावीशी वाटत नाहीत. आपण मात्र पक्के उपरे झालेलो आहोत. सरांशी बोलता बोलता मागे पडलेल्या गावांची मनातल्या मनात उजळणी सुरू असते. सर अनेक गोष्टींबद्दल बोलतात. बदलत चाललेली कुटुंबव्यवस्था, मुंबई-पुण्याकडं स्थलांतरित होत असलेले लोंढे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांवर होत असलेला अन्याय. रस्त्यांवरचे खड्डे, धरणात राहिलेले पाणी. राजकारण, समाजकारण, जातकारण. एक ना हजार गोष्टी.
सर तसे समाजवादी आहेत. देशात झालेला राजकीय बदल त्यांना फारसा आवडलेला दिसत नाही. आपण ह्या बाबतीत थोडे उदासीन आहोत हे संकोचत मान्य करतो. मुळात आपण मोठे झालो तो कालखंड अतिशय कंटाळवाणा होता. साम्यवाद संपल्यात जमा झालेला आणि समाजवाद मोडकळीस आलेला होता. देशात धड सामाजिक बदलही घडून येत नव्हते, ना तंत्रज्ञानातही फारशी प्रगती घडून येत होती. फाळणी किंवा आणीबाणीसारख्या मोठ्या घटना आपल्या पिढीने पाहिल्या अथवा भोगल्याच नाहीत. त्यामुळे आपल्या पिढीच्या विशेष राजकीय - सामाजिक भूमिकाच नाहीत असे आपण सरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग विचार येतो की कदाचित ह्यामुळेच आपण एवढे निर्ढावलो आहोत. आपल्यापुढे आदर्श अजिबातच उरलेले नाहीत. नपेक्षा आदर्शांच्या पतनाच्या काळात आपण जगतो आहोत. सरांना आपण खूप मानतो पण त्यांच्यासारखे अभावांचे आयुष्य घालवण्याची आपली तयारी नाही.
पण मग आपल्याला जो एक सल टोचत असतो तो कसला आहे? आई किंवा वेरुळकर मास्तरांच्या चेहऱ्यांवर जो एक संथ शांत भाव दिसतो तो आपण कधीच का अनुभवू शकत नाही?
सर ज्या बदलांबद्दल बोलत असतात ती सामाजिक, राजकीय स्थित्यंतरं नाही म्हटलं तरी आपणही पाहिलीच आहेत. नोकरीपेशा माणसात दिसून येणारं सामाजिक औदासीन्य आपल्यातही पुरेपूर उतरलं आहे. निवांतपणा आणि संथपणाची सवय होऊन गेलीय. मागे त्या कार्यक्रमात जो राडा झाला त्याने आपण खूपच अस्वस्थ झालो होतो. आपल्या संथपणात ह्या अशा तीव्र गोष्टींचा खंड नकोसा वाटतो. आपण संघर्ष टाळतो.
पण हे योग्य आहे का? आपण आपल्या सभोवतालाचा एक अपरिहार्य भाग आहोत. ह्या जगात जे काही उलटपालट घडतं त्यात आपणही गुंतलेलो असतोच. माणसाची समाजात आणि समाजाची माणसात मोठीच हिस्सेदारी असते. आपल्यासारख्या असंख्य डोक्यांची उतरंड म्हणजे आपला हा समाज. उतरंड ह्यासाठी की हा समतल नाही. एकेकाळी पृथ्वी सपाट आहे असं मानलं जायचं. मग विज्ञानाची क्रांती झाली आणि पृथ्वी गोल असल्याचं सिद्ध झालं. पण ह्या गोलाईतही काही गडबड आहेच. काही गोष्टी वर जातात तर इतर खाली. खालचे वर जाईल आणि जे वर आहे ते यथावकाश खाली येईल असं ओघाने ठरून गेलेलं. आपल्या मागच्या अनेक पिढ्या लौकिकार्थानं खालीच दबून मेल्या असं म्हणायला भरपूर वाव आहे. पण आपण खरोखरच वर जातो आहोत का? जिला ऊर्ध्वगामी म्हटलं जातं अशा लोकसंख्येत आहोत का? आपण भरपूर कर भरतो. बऱ्यापैकी पैसा धरून आहोत. बहुदा आपण ह्या ऊर्ध्वगामी रेषेचा आरंभबिंदू आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या खऱ्याखुऱ्या अर्थाने वरच्या प्रतलात जातील आणि जगतील.
शिवाय ही उतरंड विश्वव्यापी आहेच. म्हणजे अमुक देशात अमुक धर्म भारी. त्या धर्मातही तमुक लोक इतरांहून जड. उबग, शिसारी आणणारा प्रकार. प्रगत देशांनाही वर्गसंघर्ष चुकलेला नाही. आणि आपण तर जाणूनबुजून मागास देशाचे नागरिक. सरकारी कार्यालयांमधून समाजातल्या ह्या खाचखळग्यांचे प्रदर्शन जरा जास्तच ठाशीव पद्धतीने घडून येतं. तिथे वर्गलढ्याला अधिकृत संरचनेत बांधलं गेलं आहे. माणसांच्या श्रेणी पाडल्या गेल्या आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात आणि मनात स्वत:च्या इभ्रतीबद्दल काही संशय येण्यासाठी जागाच ठेवली गेलेली नाहीये. ही प्रथम श्रेणी. इथे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ लोक वसतात. पांढरीशुभ्र कॉलर असणारे मोठे लोक. त्यानंतर द्वितीय. मग ह्याच क्रमाने खाली. थोडक्यात आपापल्या वजनाप्रमाणे नीटनीट रहा. रेषेत पडा. थोडेही इकडे तिकडे होऊ नका. झालात तर ह्या परमसुखदायी व्यवस्थेतून तुम्हाला त्वरेनं बाहेर केलं जाईल.
एवढी आखीव, भरभक्कम व्यवस्था. आपल्याला शाळेत असताना पाठ्यपुस्तकातल्या 'पक्की घरे' ह्या संज्ञेचं मोठं अप्रूप होतं. वादळवारा, ऊन, पाऊस पचवून उभी राहणारी संस्था. तशीच ही व्यवस्था. पक्की तर आहेच पण सीमाकरदेखील. तुम्हाला सीमेत बांधून ठेवणारी. ही व्यवस्था नसेल तर बहुतेक अनागोंदी येईल. सर्वत्र गोंधळ माजेल ह्या भीतीच्या बडग्याने सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी मजबूत साखळी. ह्या व्यवस्थेच्या सीमांमधून होणारा आपला जीवनसंघर्ष. ह्या संघर्षात बरं-वाईट, पाप-पुण्य ह्या सारख्या गोष्टींना कितपत वाव आहे? अजूनही आपल्या सभोवती काही लोक नैतिक वागतातच, जसा ऑफिसातला गायके बाबा. वयस्कर आहे आणि धार्मिक म्हणून त्याला सारे बाबा म्हणतात. बाबाला एक मुलगी आहे आणि एक लहानसं घर. तो कधीही कमिशन घेत नाही. म्हणतो 'माझा हिस्सा तुम्ही घ्या. मला माझ्या अधिकारात जितकं मिळतं तितकं पुरे'.
बाबा खरोखर पुण्यवान आहे का? की तो कुठल्यातरी चुकीचं प्रायश्चित्त घेतो आहे? लाच घेणं, भ्रष्टाचार करणं हे पाप आहे का? की ती ह्या युगाची जनरीत आहे. मोठमोठे खेळाडू, अभिनेते कर बुडवतात. हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का? सदाकाकाचा लहाना मुलगा - गिरीश - आपल्याला नेहमीच सांगतो की तो टॅक्सी, हॉटेलाची बोगस बिलं देतो कंपनीत. कोण बघतं. शिवाय म्हणतो की ह्या कंपन्या आपल्या जीवावर अब्जावधी कमावतात. मग आपण काय घोडं मारलंय कुणाचं?
एकूण पुण्य म्हणजे काय? आणि पाप कशाला म्हणावं? एक उदाहरण घेऊत. समजा एक अनाचारी बाप आहे ज्याने नाना लबाड्या करून प्रचंड संपत्ती उभी केली आहे. त्याची मुले सज्जन आणि सरळमार्गी आहेत. त्यांना बापाची कर्मे नकोत - पण त्याचं ऐश्वर्य जे परंपरेनं त्यांना मिळून जाणारं आहे, किंवा मिळतं आहे, त्याचं काय?
आता ह्याच्या उलट बघू. एक अतिशय पुण्यवान माणूस आहे सरळमार्गी. एक छदामही कुणाकडून न घेणारा. त्याची मुले यथातथा वाढली. पुढे मुले नैतिकतेत न बसणाऱ्या गोष्टी करून मातब्बर झाली. आता त्या पुण्यवान माणसाने काय करावे? आपल्या पुण्याचं फळ आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतं आहे असं म्हणावं का? की आपल्या मुलांनी नैतिकता सोडून दिली आहे म्हणून कुढत बसावं?
निर्णय कठीण आहे. पाप करणारा आणि पुण्य करणारा, यथावकाश दोघेही मरतील. कदाचित त्यांचा निवाडा होत असेल. न्यायाचा एक दिवस असतो असं बहुतेक धर्म मानतात; जो कुणीही पाहिलेला, अनुभवलेला वा भोगलेला नाही. एकूण नैतिकता ही मोठी सोयीची गोष्ट आहे. जघन्य अपराधांपासून माणसानं दूर रहावं म्हणून समाजातल्या प्रतिभावंत आणि विचारी माणसांनी घडवलेली गोष्ट. ही नसती तर समाज रानटी झाला असता हे खरंच; ती माणसाला कक्षेत ठेवण्यासाठी हवीच खरी - पण लोकांनी जगताजगता तिची सोय करून घेतली. हवी तशी वापरता येण्याजोगी, लवचीक बाब.
असे हजार प्रश्न, हजार विवंचना डोक्यात घेऊन आपण वापस निघतो. प्रवास ह्या प्रश्न-उपप्रश्नांच्या ससेमिऱ्यामुळे नकोसा होत असावा आपल्याला बहुतेक.
(क्रमश:; संपूर्णतः काल्पनिक )
सगळे भाग वाचले, आवडले.
सगळे भाग वाचले, आवडले.
वा, मस्त!
वा, मस्त!
मस्तं! डयरीतील पाने
मस्तं! डयरीतील पाने वाचल्यासारखे वाटले.
धन्यवाद हर्पेन, फिल्मी, राया
धन्यवाद हर्पेन, फिल्मी, राया