शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये. तरी आम्ही बारके सारके योध्दे आहोत मदतीला. त्याचे अखंड धुम्रकांड फ़क्त तेजुच्या घरी किंवा तेजु हजर असताना तीही संदेश आणि तन्मय सह असेल तेंव्हा बंद असते. त्यालाही एक कारण आहे.
एकदा अशीच आम्हा सगळ्यांची एकत्र मैफ़ील आटोपल्यावर एक दोन दिवसानी तन्मय म्हणजे तेजुचा मुलगा एकटाच चित्र काढत होता. तिच्या भाषेत कागद कारखान्यांना मदत करत होता.
त्याने एका आगबोटीचे चित्र काढले कशात पाहून कुणास ठाउक ! तर त्या बोटीवर त्याने धुराची रेषा काढलेली बघुन त्याचे बाबा एकदम खुष, बारकावे दिसले की हा आर्किटेक्ट खुष होणारच. कौतुकाने त्याने पोराला विचारले
" तन्मय बेटा ! बोट काढलीयेस का ? "
" छान आहे ना बाबा ?" तन्मय सव्वादोन वर्षाचा असुन एकदम सुस्पष्ट बोलतो बोबडे नाही.
" वा ! एकदम मस्त, काय घेउन चाललीये तुझी बोट ?"
" शल्या काकाला नेतेय "
" कुठाय तो ?"
" हा काय इथे " एका बोटीचा भाग असावा अश्या वाटणार्या एका मानवाकृतीवर बोट ठेवत तन्मय म्हणाला "आणि बाबा माहीताय का? सगळ्याच बोटींवर शल्याकाका असतो" हे जरा अतीच झाले
" का बरं" संदेश हैराण एव्हाना तेजु तिथे पोहोचलेली.
" मग, सगळ्याच बोटीतुन धुर येतो तो शल्याकाकाच सोडतो ना ! " तन्मयने बॉंब टाकला.
तिथे पुढे काय तांडव झाले असेल त्याची फ़क्त कल्पना करायची. पण शल्याला तातडीने वॉर्नींग दिल्या गेली की त्याने लहानमुलांसमोर सिगारेट ओढता कामा नये.
एकंदरच शल्या त्याच्या सिगारेटमुळे बरेचदा टिकेला सामोरा जातो जर असे काही बोलणारे आम्ही दोस्तलोक असु तर ठीक, भलत्या कुणी असा प्रयत्न केला तर त्याने बाराच्या भावात जायची तयारी ठेवावी. यातुन त्याचा डॉक्टरही सुटलेला नाही.
"शैलेशराव ती सिगारेट सोडा त्याने तुमचे निम्मे आजार कमी होतील" या डॉक्टरांच्या बोलण्यावर तडकलेला शल्या,
" त्यापेक्षा मी डॉक्टरच सोडतो म्हणजे माझे निम्मे पैसे वाचतील" असे बोलुन बाहेर पडला.
त्याच्या सिगारेट ओढण्यामुळे त्रस्त संज्याच्या मते एकट्या शल्याने सिगारेट सोडली तर ग्लोबल वॉर्मींग निम्म्याने कमी होईल. शल्याला नवे नवे व्यसनमुक्तीचे मार्ग सुचवत असतो. एकदा त्याच्या सांगण्यावरुन शल्याने चॉकलेट खायला सुरुवात केली. म्हणजे जेंव्हा सिगारेटची लहर येईल तेंव्हा तोंडात चॉकलेट टाकायचे असे. आता शल्या तोंडात चॉकलेट ठेउन सिगारेट ओढतो.
स्वतः शल्याने सिगारेट सोडण्यासाठी काही कमी प्रयत्न केलेले नाहीत हं. त्याने व्यसनमुक्ती शिबीरात हजेरी लावली होती पण त्याचे पुढे काय झाले हे मागे एकदा लिहीलेले आहेच. पण तिथेच तो थांबला नाही तर त्याने एका मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेउन पाहीला. पहील्या दोन-चार बैठकीत डॉक्टरने त्याला एकाच प्रश्नाने हैराण केले की तुम्हाला सिगारेट ओढुन काय मिळते. यावर शल्या भडभडून बोलु शकतो याची बिचार्याला काय कल्पना असणार? विचारले आणि फ़सला. शल्याने त्याला सिगारेटचे इतके फ़ायदे सांगीतले आगदी मनावरचा ताण कमी होतो इतपत. डॉक्टरही जरा जास्तच हुशार निघाला. त्याने आता बघा मी ओढतो सिगारेट काही फ़रक पडतो का पहातो असे म्हणुन त्याने शल्याकडच्या सिगारेटचे दोन चार कश मारले आणि आता तो डॉक्टर दिवसाला चार-पाच पाकिटे सिगारेटची संपवतो असे ऐकुन आहे खरे खोटे देव जाणे.
एक गोष्ट मात्र अगदी नक्की शल्या सिगारेट या विषयावर डॉक्टरेट करु शकतो. त्याचे डोळे बांधुन खुशाल त्याला वेगवेगळ्या फ़्लेवर्सच्या सिगारेट द्या तो अचुक नावे सांगु शकेल. या शल्याच्या धुम्रकांडात केवळ एकदाच भला मोठा अडथळा आला, तो पाचगणीला एका ट्रेनिंगला गेला होता तेंव्हा.
त्याचे झाले असे की शल्याची निवड पाचगणीच्या ट्रेनिंगसाठी निवड झाली. तिथे हा गेला खरा पण तिथले कायदे ऐकुन परत फ़िरायच्या मुड मधे आला होता असे तो स्वतःच म्हणाला. तिथे दारु, सिगारेट, गुटखा, तंबाखु असले काही चालत नाही. चार दिवसाच्या ट्रेनिंगमधे शल्याची कुचंबणाच व्हायची खरं तर पण रुम स्वतंत्र असल्याने चोरुन सिगारेट ओढता येत होत्या. पण शल्याच्या शब्दात सांगायचे झाले तर.
" साला, चार चार तासांच्या लेक्चर मधुन सिगारेटसाठी वेळ मिळायचाच नाही मग त्याची थोडीफ़ार भरपाई मी रात्री रुमवर गेल्यावर करायचो"
त्याची ही थोडीफ़ार भरपाई मी माझ्या डोळ्याने पाहीलीये. तिथे काही पुरावा राहु नये म्हणुन त्याने सिगारेटचे फ़िल्टर पॉलीबॅग मधे भरुन ती स्वत:च्या बॅगमधे टाकुन त्याने परत आणले होते. त्याची ही थोडीफ़ार भरपाई कमीत कमी अर्धा किलोची असावी.
सकाळी सकाळी उठल्यावर स्वारी श्वासही घ्यायच्या आधी सिगारेट पेटवते त्याच्या या सवयीला वैतागलेल्या शल्याच्या पिताश्रींनी एकदा शल्याची सगळी सिगारेटची पाकीटे रात्री खिडकीतुन बाहेर फ़ेकुन दिली कमीत कमी दुसर्या दिवशी तरी सकाळी हा सिगारेट पेटवणार नाही. पण त्यांचा प्रयत्न व्यर्थ गेला दुसर्या दिवशी सकाळी हा प्राणी पुन्हा धुराच्या रेषा सोडताना दिसल्यावर त्याच्या पिताश्रींनी हतबध्द होवुन विचारले "बाबा रे ! सगळ्या सिगारेट बाहेर फ़ेकल्यावर तुझ्याकडे आता पुन्हा सिगारेट कुठून आले?"
" पप्पा, याला रिझर्व स्टॉक म्हणतात तुम्ही कधी ना कधी असे काहीतरी करणार याचा मला अंदाज होताच म्हणुन रोज रात्री झोपताना मी तुमच्या शर्टच्य खिशात एक पाकीट ठेउन झोपत होतो म्हणजे रात्रीत तुम्ही असले काही केलेच तरी मला अडचण व्हायला नको" निर्विकारपणे शल्या उत्तरला.
त्या बिचार्या शल्याच्या वडीलांना कपाळावर हात मारण्याखेरीज करण्यासारखे काही उरले नाही.
" शल्या गध्ध्या, तु नाही सोडूशकत सिगारेट तर नको सोडु निदान कमी तरी करशील " एकदा मी (पण) कळवळून म्हणालो.
" केलेय ना, कमी आधी विल्स ओढायचो आता गोल्डफ़्लेक ओढतो विल्स पेक्षा गोल्डफ़्लेक लांबीला कमीच आहे." हे आणखी एक बाणेदार उत्तर
" शल्या मस्करी नको करु यार ! मी काय बोलतोय ते तुला चांगलेच कळतेय. मी तुला सिगारेट ओढायची संख्या कमी कर रे ! "
" अबे केलेय ना कमी आजकाल रात्री जाग आल्यावर नाही ओढत सिगारेट" थोडासा आवाज खाली करत पुढे म्हणाला." तशी आजकाल मला रात्री जागच येत नाही म्हणा"
"पण नक्की का ओढतोस तु सिगारेट? इमानदारीत सांग "
" अबे तु काय मोठा `दुध का धुला' नाहीयेस तुला माहीताय दोनचार मिनीटे कीक लागते छान."
" पण ती प्रत्येकवेळी नाही"
" हां ते बरोबर आहे किक बसते सकाळच्या एकाच सिगारेटला आणि मग दिवसभर नुसता धुर बस्स, आणि आपल आयुष्य काय आहे रे ? साला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी "
मी पार निरुत्तर झालो, शल्याचा गुण म्हणावा की दुर्गुण पण तो काही काही वेळा त्याच्या शैलीत असे काही बोलुन टाकतो की एकदम समोरच्याला विचारात पाडतो. आयुष्या बद्दल फ़ारच निर्विकार वाटणारा हा माणुस आयुष्याबद्दल फ़ार संवेदनशील आहे. वरवर कठीण वाटणार्या त्याच्या मनाच्या कवचाआड फ़ार जवळच माणुसकीचा ओलावा आहे. भले मग तोंडात जळती सिगारेट घेउन असेल पण खड्ड्यात अडकलेली अपंगाची तिचाकी सायकल चिखल आणि लोकांची पर्वा न करता एकट्याने ढकलुन बाहेर काढायची जिगर आहे. कदाचीत हाच एक दुवा त्याला इतरांशी जोडायला पुरेसा ठरतो. मला माहीताय शल्या ज्या ज्या ठीकाणी गेलाय ना ! त्या त्या ठीकाणी त्याच्या धुम्रकांडा बद्दल त्याला चार शब्द समजावुन सांगणारे आहेत पण त्याबद्दल शल्याला वाईट म्हणणारे कुणीही नाहीत आगदी आमच्या बाजुचे खडूस आप्पा सुध्दा.
" काय बे ? काय नवा प्लान करतो काय माझी सिगारेट सोडायला ?" शल्याचा मजबुत हात खांद्यावर पडला आणि मी भानावर आलो. शल्याच्या ओठात नवी सिगारेट पेटलेली, चेहर्यावरचे हसु नेहमी सारखेच " लेका, माझे निरीक्षण थांबव आणि चल समोर चहा मारु !"
आणि मी या नव्या धुम्रकांडाच्या नायकासोबत गपचुप चालायला लागतो.
ही ही चाफा
ही ही चाफा

मस्तच
मस्तचं.
मस्तचं. अशी सोनेरी किनार असतेच प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक नात्याला. एक मात्र खरं ह्या सगळ्या फुंक्यांकडे स्पष्टीकरण लय भारी असतं. माझ्या ऑफीसमधे एक कलिग असाच प्रामाणिक फुंक्या (म्हणजे सिगरेटशी प्रामाणिक) होता. तो फुंकायला खाली जायचा आणि आम्ही बिनफुंके पाय मोकळे करायला खाली बरोबर जायचो. तो असं काही पटवायचा प्रयत्न करायचा की फुंकणं चांगलं असतं... तेही ऑफिसमधे घडलेल्या गोष्टींची उदाहरणं देउन.. की सिगरेटला शिव्या देणारा कलिग एकदा म्हणाला. आता परत एखादा पिळू कस्टमर भेटायला आला तर मीही तुझ्या बरोबर सिगरेट ओढणार..
>>>>" केलेय ना
>>>>" केलेय ना कमी, आधी विल्स ओढायचो आता गोल्डफ़्लेक ओढतो. विल्स पेक्षा गोल्डफ़्लेक लांबीला कमीच आहे." हे आणखी एक बाणेदार उत्तर>>>
हेहेहे
विल्स ओढणारे सर्व जण आयुष्यात कधी ना कधी हा प्रयत्न करुन पाहतात.. त्याने काहिही फरक पडत नाही हा भाग वेगळा...
व्हेन देअर इज "विल्स" देअर इस अ वे.
गेले ते दिन गेले......... २.५० रुपड्याला विल्स यायची. इंजिनीअरींगमध्ये पाच मित्र प्रत्येकी ५० पैसे टाकुन एक सिगारेट फुंकायचो.. मग दोन लेक्चर झाली की आणि ५० पैसे..
चाफ्फा,सही
चाफ्फा,सही रे.. तुझी ही कथेतील पात्रं आता वास्तवातली वाटायला लागली आहेत.. मजा येते वाचताना..
आयुष्याच्
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी>>>>>>>>>
.. हे आवडलं.
केलेय ना,
केलेय ना, कमी आधी विल्स ओढायचो आता गोल्डफ़्लेक ओढतो विल्स पेक्षा गोल्डफ़्लेक लांबीला कमीच आहे." हे आणखी एक बाणेदार उत्तर
>>>>
चाफ्फ्या, एकदम सही.
--------------
नंदिनी
--------------
चाफ्फ्या
चाफ्फ्या एकदम भन्नाट रे:)
पण एक अगाउ सुचना देउ का रे ? लिखाण सोडुन दे निदान माय्बोलिवरचे तरि
एकदम मस्त! "
एकदम मस्त!
" मग, सगळ्याच बोटीतुन धुर येतो तो शल्याकाकाच सोडतो ना ! ">>>>>
चाफ्फ्या
चाफ्फ्या आज वाचली रे कथा.
शल्या ला मस्तच उतरवलयस.
अनघा
हल्लो, शल्य
हल्लो,
शल्या खरच तुमच्या ओलखिच आसेन तर kindly pass this message to him - cigarate is not only harmful to him but its more harmful to his nearest and dearest.
reshma
आयुष्याच्या प्रत्येक
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी ">>> + १००००
आवडली कथा.
आवडली कथा
आवडली कथा