स्वीकार

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 12 October, 2016 - 01:33

स्वीकार…..

क्लच, ब्रेक आणि एक्सलेटर चा समतोल सांभाळत तो स्वतःचा तोल न ढासळता गाडी चालवत होता. नेहमीचा एक-सव्वा तासाचा रस्ता ट्रॅफिकच्या कृपेमुळे दोन तास झाले तरी संपत नव्हता. गाडीच्या गुरगुरण्यासोबत तोही फुरफुरत होता. त्यातच तिसऱ्यांदा सिग्नल लागला. सिग्नल लाल होऊन हिरवा झाला पण तो काही फारसा पुढे सरकला नव्हता. हताश होऊन त्याने बाजूच्या खिडकीतून नजर टाकली, न जाणो ती लेन पुढे जात असेल तर त्यात घुसावे अशा काहीशा स्वार्थी विचाराने.. पण काहीच उपयोग झाला नाही, अचानक मागची गाडी पुढे आली आणि...........आणि त्याची, तिच्यासोबत नजरानजर झाली. काही सेकंद ते दोघे एकमेकांकडे बघत राहिले; ती बावरली आणि तिने चेहरा फिरवला.. ती घाबरली होती कि शरमली होती कि... आणखीन काही.. बहुतेक जुनी ओळख कि जुनी जखम ? असंच काहीतरी... पण तिच्या नजरेतली ओळख त्याला जाणवली... अन तिलाही.. तिच्यासोबत असलेल्या 'त्याने' त्याची लेन पुढे सरकली म्हणून गाडी पळवली. याने मात्र मागे राहणेच पसंत केले... आजही... अगदी पंधरा वर्षांपूर्वी त्याने जे केले होते तेच... आजही.

घरी पोहोचेपर्यंत तो नॉर्मल झाला होता. पण हृदयातल्या त्या जुन्या जाणीवा, भावना बिछान्यावर पडताच पुन्हा जाग्या झाल्या ; ज्या त्याला निजू देत नव्हत्या.

साधं सरळ आयुष्य होत इतरांसारखच. शाळा आणि नंतर कॉलेज आणि ते कॉलेजचं शेवटचं वर्ष. दोघांचं. पण त्याने हिंदी घेतलेलं तर तिने फ्रेंच.. एकंच कॉलेज, कॅम्पस, कॅन्टीन, लायब्ररी वगैरे मुळे तोंड ओळख होती, पण नक्की कशी-कधी ती त्याला भेटली हे काही त्याला आठवेना, मात्र एका पुस्तकाच्या देवाण घेवाण प्रकारामुळे बहुतेक त्यांचं प्रकरण सुरु झालं याची शक्यता होती. म्हणजे तीच त्यांची पहिली भेट आणि त्यानंतर अशाच कितीतरी भेटींचा वाढलेला योगायोग. गप्पा गोष्टी, विचार, केलेले वाद, एकत्र अभ्यास, कठीण प्रसंगी दिलेली साथ आणि अशीच वाढलेली मैत्री अन जुळून आलेलं प्रेम. एका रेषेत सगळं चाललं असताना, प्रेमाचा टप्पा गाठला आणि मग कुठे तरी प्रवास वळणावळणाचा होऊ लागला. फायनल परीक्षा झाल्या, रिझल्ट लागला आणि त्याने नोकरीला सुरुवात केली. ती मात्र घरीच बाबांच्या आणि भावाच्या व्यवसायात लक्ष घालत होती. जशी संधी मिळेल तसं चोरून भेटणं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं चालायचं. खूप गम्मत वाटायची त्याला तिची. समुद्रकिनारी बसल्यावर त्याच्या हातात हात देतानाही दचकायची आणि रस्ता क्रॉस करताना मात्र त्याचा दंड घट्ट धरायची. हातात रुमाल जरी असला तरी त्याचा घाम ओढणीने पुसायची. त्याला गुलाबजाम आवडायचे म्हणून मुद्दाम बनवायला शिकली होती ती. त्याने दिलेलं प्रत्येक फुल तिने जपलं होत, अगदी एकदा गम्मत म्हणून त्याने तिला मोठ्ठाले कमळ दिले होते पण तेही तिने जपून ठेवलय हे कळल्यावर तो गार झाला होता. प्रत्येक आठवण साठवण म्हणून तिने आणि त्यानेही जपली होती.

प्रेमाच्या प्रवासाला दोन-अडीच वर्षे झाली आणि तिच्या घरच्यांना "काहीतरी शिजतंय" ची कुणकुण लागली. तिचं स्वतःच देखील मत होत कि आतातरी याने एकदा घरी येऊन माझ्यासाठी विचारून जावं. पण तिच्या घरचा व्यवसाय आणि इतर प्रतिष्ठा बघता त्याला वाटत होत कि निदान आणखीन दोन वर्षे तरी मला दे. 'लग्नाची बेडी' असल्या विचारांचा तो नव्हता पण नवीन जबाबदारी नक्कीच शिरावर येणार होती त्यासाठी त्याला फक्त वेळ हवा होता... ती झेपण्याची ताकद वाढवायची होती. थोडे मतभेद वाढले आणि त्याचाच फायदा तिच्या घरच्यांनी घेतला. अगदी फिल्मी वाटेल पण तसंच झालं.. तिचं लग्न लावून दिल. कसं काय? कुठे? ते सगळं बरोब्बर म्यानेज होतं. जस पळून जाऊन तरुण मुलं-मुली लग्न करतात तसंच गावी नेऊन हिचंही लग्न लावून दिल. तिच्या सासरच्यांनाही कल्पना दिली, कि चुकीचं पाऊल पडू नये म्हणून थोडी लग्नाची घाई करा. एका मुलीच्या आई वडिलांचं मन त्यांनी ओळखलं, त्यांनाही मुलगी होतीच आणि लग्नाला होकार मिळाला. त्यांची मुलगी ह्यांच्या घरी सून म्हणून आली आणि ह्यांची मुलगी त्यांच्या घरची सून झाली. जुन्या काळी साटंलोटं म्हणायचे ते हेच. खूप प्रयत्न करूनही तिला त्याच्याशी शेवटपर्यंत बोलता नाही आलं, नाईलाजाने बोहल्यावर चढली ती. त्याच्यासमोर आली ते दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधून. तिचं दुःख तिलाच माहित, त्याने तिला पाहिलं ... आणि मग थांबला तो... तिचे पाणावलेले डोळे स्वतःच्या भरल्या डोळ्यांत साठवत निघून गेला तो तिच्या आयुष्यातून. कदाचित तिला याचीच भीती वाटत होती; म्हणून ती आपल्याशी भांडायची... हे आज कळालं होत त्याला. फक्त एखादा वाईट विचार मनात येणं आणि मग खरंच तशी परिस्तिथी ओढवणं हे जास्त क्लेशकारक असत, पटलं त्याला. पण, वेळ निघून गेली होती. मनाच्या आणि शरीराच्या कितीही विरुद्ध असलं तरी ‘ती’ आता संसारात पडली होती, तो चालवणं तिला भाग होत. कितीही कटू असलं तरी सत्य तिने स्वीकारलं आणि त्यामुळेच तिचं आयुष्य पुढे सरकत होत..

त्याचं... त्याचं आयुष्य मात्र या वळणावर येऊन थांबलं होतं. पूर्णपणे. पुढे का चालावं आणि कोणासाठी तेच त्याला समजत नव्हतं. "मी नाही जगू शकत तिच्याशिवाय" हेच तो स्वतःला सांगत होता, प्रत्येक श्वासाला, आणि त्यामुळेच तो मरत होता प्रत्येक क्षणाला...

तीच हसणं, तीच डोळ्यात डोळे घालून बिनधास्त बोलणं, पुढे जाताना मागे वळून पाहणं, तीच गुणगुणन, तीच वाद घालणं, भांडणं, हुमसून हुमसून रडणं... आणि असच किती -काय काय .. नक्की काय काय विसरायचं होतं त्याला? खूप प्रयत्न करत होता तो... सत्य... कटू सत्य स्वीकारण्याचा.. "ती आता माझी नाही होऊ शकत". इतकं नैराश्य ओढवून घेतलं होत त्याने की आत्महत्येचे विचार डोक्यात घुमू लागले होते... पण नाही.... तेही जमलं नाही आणि त्यालाही कारण तीच होती. "आत्महत्येचा पर्याय भ्याड माणसं स्वीकारतात. ज्यांच्यात हिम्मत नसते, एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणं जमत नाही म्हणून हे सुंदर आयुष्य संपवायचं ? छे, मूर्ख असतात ते. उलट जो त्यावरही मात करून जिंकतो आणि जगून दाखवतो तोच खरा जगतो. संपवण्याची प्रक्रिया खूप सोप्पी असते, आणि सहज मिळणारा शॉर्ट कट स्वीकारणं यात कसलं आलाय शहाणपण ? " तिचं ते निर्भीड बोलणं त्याला आठवायचं आणि मग तो पुन्हा उभा राहायचा... जगायला... तिच्याशिवाय. मग वेड्यासारखं त्याने गुंतवून घेतलं स्वतःला कामाच्या ढिगाऱ्यात. तरीही फावल्या वेळेशी गाठभेट व्हायचीच, पण आता तो त्या दोघांमधले वैचारिक वाद-संवाद आठवायचा. "एखाद्या व्यक्तीला आपण खूप खूप खूप मोठ्ठ स्थान देऊन ठेवतो आणि मग ती व्यक्ती अचानक दूर गेली की मग जाणवतं, अरे आपण स्वतःचच अस्तित्व विसरून गेलो होतो. अशी कधी वेळ आली ना की मग स्वतःच अस्तित्व शोधायचं आणि नव्या प्रवासाला सुरुवात करायची. " "ए काही पण असं थोडीच असत? एवढं सोप्प असत काय एकाला काढून दुसऱ्याला ती जागा देणं? आणि… आणि हे असं काही आपल्या दोघांच्या बाबतीत नाही होणार". त्याला खूप विश्वास होता की ते दोघे दूर नाही होणार, पण ती, ती थोडी व्यावहारिक विचार करायला लागली होती... आणि त्यामुळेच ती त्याला समजवायची. मी नसेन तर हा कोसळू नये.. हेच तिला त्याच्या मनावर बिंबवायचं होत. त्याला मात्र ती गेल्यावर ह्याची जाणीव झाली. ती तेव्हाही माझ्यासाठी जगत होती आणि मला मात्र ते कधीच कळलं नाही... उगाचच फिलॉसॉफी पाजळवू नको असं चिडवायचो मी तिला... आत्ता त्याला सगळं उमजत होत.

आपल्याला थांबता नाही येणार, तिला ते नाही आवडणार... हेच तो बारा वर्षे स्वतःच्या हृदयाला समजावत होता आणि.... एका तपानंतर तो सावरला...आज ती अचानक समोर आली...आणि पुन्हा उजळणी झाली. ती मात्र आपल्याला अजून विसरली नाही, डोळ्यात ओळख होती अजूनही पहिल्या प्रेमाची.

त्याची तंद्री भंगली, शेजारी झोपलेली त्याची तान्हुली रडत उठली. तिच्या आईने तिला छातीशी धरलं आणि तो तिला थोपटत आता निजेच्या आहारी जाऊ लागला.

माणसं आयुष्यातून निघून गेली तरी त्यांचं आयुष्यातील स्थान, अस्तित्व हे कायम अबाधित असतं. पहिलं प्रेम विसरता नक्कीच येत नाही, काही काळासाठी आयुष्य थांबतं हे हि नक्की; पण ते संपत नाही... आणि याच सत्याचं जिवंत उदाहरण तो स्वतः होता. पहिलं प्रेम ना तो विसरला होता ना ती... पण तरीही सत्य स्वीकारण्याची हिम्मत त्या दोघांनीही दाखवली होती आणि म्हणूनच मिळालेलं आयुष्य ते खऱ्या अर्थाने जगत होते कारण आयुष्यात कधी कधी नकारही स्वीकारावे लागतातच. हो ना ?

……..मयुरी चवाथे – शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Back to top