पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60476
एप्रिल १९११
सर मॅक्सवेल यांची नजर शून्यात कुठेतरी हरवली होती. आज केवळ एक सफरचंद, २ पोच्ड एग्ज आणि कडक काळी कॉफी एवढ्यावर त्यांनी जेवण उरकले होते. शक्यतो कॉफी न पिणारा आपला मालक आज कॉफीवर आहे हे बघितल्यावर घरातला नोकरवर्गही थोडा चिंतित होता. मॅक्सवेल हात पाठीशी बांधून येरझार्या घालत होते. त्यांच्या बटलरने पावलांचा जराही आवाज न करता प्रवेश केला. कॉफीचा रिकामा कप उचलला व त्या जागी वाफाळता नवा कप ठेवला. अत्यंत हलक्या आवाजात त्याने "सर" एवढेच शब्द उच्चारले आणि मेणबत्त्यांच्या अंधुक प्रकाशात तो कुठेतरी दिसेनासा झाला. मॅक्सवेल सावकाश एक एक पाऊल उचलत परत टेबलापाशी आले. उंची अशा कँडल स्टँड मध्ये तीन मेणबत्त्या जळत होत्या. त्या प्रकाशात कपातला द्राव चमत्कारिक दिसत होता. त्यातून येणार्या वाफा हवेत धुरकट रेघा ओढत होत्या. जणू टेबलावरच्या कागदावरील शब्दांना ओळींमध्ये बद्ध करत होत्या. शेजारीच एक लखोटा पडला होता. त्याच्यावरचे सील काळजीपूर्वक फाडलेले दिसत होते. लखोट्यावर सील वगळता कोणतीही इतर खूण नव्हती. ते सील ज्या ड्यूक कडून आले होते तो ड्यूक ब्रिटनच्या परदेश धोरण ठरवणार्या व्यक्तींपैकी एक होता. या सीलचा अर्थ स्पष्ट होता. सध्या चालू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर इतर कोणत्याही देशाबद्दल या व्यक्तीकडून तरी पत्रव्यवहार होण्याची शक्यता नव्हती. मोरोक्को!!
*****
अल-मामलकाह अल-मघ्रबियाह
पश्चिमेकडील साम्राज्य! मध्ययुगातील दर्यावर्दींचा उदय होईपर्यंत ज्ञात जगाचा पश्चिम कोपरा होता - मोरोक्को. म्हणूनच अरबांनी त्याचे असे सार्थ नामकरण केले. सातव्या शतकापर्यंत मोरोक्कोचा इतर जगाशी फारशा संबंध नव्हता. तिथे बर्बर साम्राज्याचे राज्य होते. इजिप्शियन व फिनिशियन लोकांचा त्यांच्याशी संबंध होता पण त्या काळात प्रवासाच्या साधनांचा फारसा विकास झालेला नसल्याने तिथे पोहोचणे अवघड होते व बर्बर आपले प्रभुत्व राखून होते. हेलेनिस्टिक जगाचा त्यांना स्पर्शही झालेला नव्हता. त्यांचे नावच याची निशाणी आहे. बर्बर -> बार्बारॉई (ग्रीक नसलेला, ग्रीकांना माहित नसलेला).
सातव्या शतकाच्या अखेरीस इस्लामचा उदय झाला. इस्लामचे प्रसारक चारी दिशांना पसरले. मघ्रिब अथवा मघ्रब म्हणजे पश्चिम दिशा त्याला अपवाद नव्हती. त्यांनी आजचा सुवेझ कालवा ओलांडला. इजिप्त, सुदान इ. देश पार करत ते सहारा वाळवंटापर्यंत पोचले. पण इतरांप्रमाणे तिथेच न थांबता ते अटलांटिक पर्यंत जातच राहिले. बर्बरांशी संघर्ष करून त्यांनी आठव्या शतकात कधी काळी मोरोक्कोवर पूर्ण वर्चस्व मिळवले. दहाव्या शतकापर्यंत कधीतरी मोरोक्को खलिफाच्या अधिपत्याखाली आला. मूळचे बर्बर लोक या लाटेत सामावून गेले. त्यांच्यातूनच मोरोक्कोच्या नव्या सल्तनती उभ्या राहिल्या.
एकोणीसावे शतक उजाडेपर्यंत युरोपाचे लक्ष मोरोक्कोकडे वळले. तसे भूमध्य समुद्राशी शेजार असल्याने ते पूर्वीपासूनच होते पण मोरोक्कोत जे आहे त्याच्यात रस निर्माण व्हायला काही कारण नव्हते. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र मसाल्यांच्या मागे वेड्या असलेल्या युरोपाला आता नवीन वेड मिळाले. धातु व खनिज संपत्ती शिवाय मोठमोठे कारखाने व्यर्थ होते. मोरोक्को सहारा वाळवंटाच्या पश्चिमेला असला तरी मोरोक्कोचा बराचसा हिस्सा अॅटलस पर्वतराजींनी व्यापला आहे. या पर्वतराजींमध्ये प्रचंड जैवविविधता तर आहेच - सिंह, बिबळ्या, अस्वल (आफ्रिकेतील एकमेव) व नानाविध वनस्पती. त्याबरोबरीने लोहखनिज, शिसे, तांबे, कोळसा, फॉस्फेट अशा जवळपास सर्व महत्त्वाच्या खनिजांच्या खाणी आहेत. या खनिजांनी युरोपातल्या औद्योगिक क्रांतिकारकांचे लक्ष वेधले नसते तरच नवल!
प्रथम स्पेन व नंतर फ्रान्सने मोरोक्कोच्या सुलतानाबरोबर विविध करार करून त्या प्रदेशावर प्रभुत्व मिळवले. फ्रान्स मोरोक्कोचा विश्वस्त बनला आणि सुलतानाला आपल्या आलिशान महालात विलासात रमण्याशिवाय काही काम उरले नाही. विसावे शतक उजाडेपर्यंत हीच परिस्थिती होती. पण १९०५ पासून जर्मनांनी या खाणींमध्ये रस घेण्यात सुरुवात केली. १९०६ मध्ये झालेल्या करारानुसार जर्मनांना काही खाणींवर व्यापारिक अधिकार मिळाले पण प्रभुत्व फ्रेंचांचेच होते. १९०९ मध्ये या खाणींना रेल्वेने भूमध्य समुद्राशी जोडण्याची जर्मन योजना आकार घेऊ लागली. फ्रान्स अशा योजनेला भीक घालण्याचा संभव नव्हताच पण जर्मनी काहीही बेकायदेशीर करत नव्हती. किमान जोवर ते सैन्य आणत नाहीत तोवर तरी. त्यात बहुतांशी युरोपाचा फ्रान्सला पाठिंबा होता व त्या कराराअंतर्गत जर्मनीचे हात दगडाखाली होते. यात एक गोम होती. फ्रान्सकडून काहीतरी अचाट प्रकार घडला तर जर्मनी पुन्हा कांगावा करू शकत होता. उदाहरणार्थ गरजेपेक्षा अधिक फ्रेंच सैन्य मोरोक्कोत येणे.
*****
सर मॅक्सवेल पुन्हा एकदा त्या पत्रावर नजर फिरवत होते. मसुदा साधारण असा होता. जानेवारीमध्ये जे बंड उसळले होते ते आता मोरोक्कोचा सुलतान व त्याच्या सैन्याकडून आवरले जाण्याची सुतराम शक्यता उरली नव्हती. सुलतान फ्रान्सकडे मदत मागता मागता टेकीस आला होता. विश्वस्त या नात्याने फ्रान्सला त्यांना मदत देणे भाग होते अन्यथा मोरोक्कोवरील नियंत्रण तर जाईलच वर जागतिक स्तरावर नाचक्की होणार ती वेगळी. जर्मनीतील ब्रिटिश सूत्रांच्या मते जर्मन यावर जोरदार प्रतिक्रिया देणार हे खात्रीपूर्वक सांगितले होते. थोडक्यात फ्रान्स व जर्मनी या दोन शेजार्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद होणार यात आता तिळमात्र शंका उरली नव्हती. यातून फार मोठे युद्ध उद्भवू नये हा ब्रिटनचा हस्तक्षेप करण्यामागील मुख्य हेतु असणार होता. अर्थात जर्मनीने कसलीही पाऊले उचलेपर्यंत काही ठाम भूमिका घेणे शक्य नव्हते. मॅक्सवेलना चिंतित करून जाणारी बातमी मात्र पुढच्या कागदात होती. अगदी घाईघाईत खरडलेल्या ओळी होत्या. थोडक्यात जर्मनीतल्या त्या सूत्राला ऐनवेळी मिळालेली ही माहिती होती.
"पक्षी आणि जर्मन इंडियात पोचले. काहीतरी महत्त्वाची कामगिरी .. व्हेरी व्हेरी डेंजरस पर्सन!!"
हा 'व्हेरी व्हेरी डेंजरस' मनुष्य जो कोणी होता त्याला शोधणे गरजेचे होते. बर्थोल्टशी या माणसाशी काही संबंध नसेल ना? आणि हा पक्षी कोण? दुर्दैवाने या माणसाबद्दल अधिक माहिती येईपर्यंत केवळ अंदाजच करता येणार होता. थकलेल्या मॅक्सवेल यांनी हात चोळून चेहर्यावर फिरवले. फुंकर घालून मेणबत्त्या विझवल्या. ते घर आता पूर्णपणे झोपी गेले होते.
~*~*~*~*~
राजाराम पुन्हा एकदा सर्कसचा शो बघायला आला होता. त्याला आता सर्व अॅक्ट्स तोंडपाठ झाले होते. तिकिट खिडकीवर बसणार्या छोटूला व मलिकाला आता त्याचा चेहरा ओळखीचा झाला होता. छोटूने तो येताच मलिकाला खुणावले. मलिकाने कोणतेही भाव न दाखवता धूर हवेत सोडला. छोटूला या प्रकाराची सवय होती. त्यांच्या प्रत्येक मुक्कामात एकजण असा दिसायचाच. तो प्रत्येक शोला येणार, मोठ्या उत्सुकतेने तिकिट काढणार. कसली तरी भाबडी आशा त्याच्या चेहर्यावर दिसेल. शोच्या शेवटी मात्र तो काहीतरी हरवल्याचे भाव त्याच्या चेहर्यावर असतील. काहीतरी चुकतंय, शोधूनही काहीतरी सापडत नाहीये अशी भावना स्पष्टपणे व्यक्त होईल. जसा जसा शो पुढे सरकेल तसा तसा तो अधिकच अस्वस्थ होणार. त्याची चुळबुळ वाढणार. मध्येच तो कुठेतरी बघेल. त्याच्या नजरेत क्षणभरच एक चमक येईल. पण क्षणभरच! पुन्हा तीच शोधक नजर, कशाची तरी हुरहुर लागलेली. तीच तीच दॄश्ये परत परत पाहून आता छोटूला तो क्रम पाठ झाला होता. त्याने कसलीही प्रतिक्रिया न देता राजारामकडून पैसे घेतले व आजच्या शोचे तिकिट दिले. राजारामने तिकिट घेतले व तो त्या गर्दीत दिसेनासा झाला. यंत्रवत छोटूचे हात चालत असले तरी डोळ्यांच्या कोपर्यातून तो मलिकाकडे बघत होता. मलिकाची नजर गर्दीत कुठेतरी खिळलेली होती. राजाराम मान उंचावून तिला शोधत होता. मलिकाने एक झुरका घेतला आणि मान किंचित वळवली. दूरवर कुठेतरी डोक्यावर पदर घेऊन ती उभी होती. तीच लाल साडी, उजव्या हाताने ते ओढलेला पदर गच्च धरलेला. मलिकाने आणखी एक झुरका घ्यायचा प्रयत्न केला. चिलीमीतला ऐवज संपला होता. छोटूला लक्ष ठेवायला सांगून ती नवीन चिलीम बनवायला निघून गेली. राजाराम अजूनही तिच्याच शोधात गर्क होता. 'तिचा' मात्र आता कुठेच पत्ता नव्हता.
*****
नेहमीप्रमाणेच उत्तम शो झाला. आज मीर व येलेनाचा ट्रॅपीज अॅक्ट विशेष रंगला. आता पुण्यातला मुक्काम हलण्यापूर्वी आता शेवटचे काही शो बाकी होते. मलिका आपल्या तंबूत बसून मेकअप उतरवत होती. तेवढ्यात तिला बाहेर कोणीतरी असल्याची चाहूल लागली. भद्राने पडदा बाजूला सारत प्रवेश केला. मलिकाने प्रश्नार्थक चेहरा केला. भद्र हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजला. मलिकाने काहीसा विचार करून होकार दिला. भद्र बाहेर गेला व दोन मिनिटात परतला.
"वेलकम जंटलमेन. तुमच्या मदतीस नटराज सर्कसची मलिका हजर आहे. प्लीज हॅव अ सीट."
मलिकाच्या अस्खलित इंग्रजीकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. ख्रिसने जोसेफकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. जोसेफच्या चेहर्यावरून त्याला याची अपेक्षा असावी असे जाणवले. कुठे बसायचं याचा विचार करत असतानाच भद्र दोन बांबूची स्टुले घेऊन उगवला. त्याच्यावर बसकण मारून ख्रिस म्हणाला,
"वेल मॅम, फर्स्ट ऑफ ऑल एका उत्कृष्ट शो बद्दल धन्यवाद. सेकंडली - कॅन आय हॅव अ कप ऑफ टी?"
~*~*~*~*~
पुणे! इंग्रजांना पुणे असा उच्चार जमणे शक्यच नव्हते मग त्यांनी पूना असे नामकरण केलेले. जे काही असो, विसाव्या शतकातही पुणे आपला आब राखून होते. कधीकाळी संपूर्ण हिंदुस्थानची सूत्रे इथून हलत असतील असं मात्र ख्रिसला वाटलं नाही. पुण्यात त्यांची व्यवस्था केली होती अॅलिस्टर लिटन याच्या घरी. लिटन पुण्यातील मुख्य पोलिस अधिकारी होता. त्या तिघांच्या दिमतीला सदाशिव नामक सार्जंट दिला गेला. सदाशिव नुकताच धर्मांतरित झालेला तरुण होता. त्याच्या नावाचे सदा असे लघुरुप जोसेफने केले. सदा कामात पुरेसा तरबेज दिसत होता. त्याने पुण्यातल्या परिस्थितीची थोडक्यात कल्पना त्यांना दिली.
पेशवाई पुणे आता इतिहासजमा झाले होते. त्याच्या सांस्कृतिक खुणा शाबूत असल्या तरी आता पुण्यात जोर होता तो वेगवेगळ्या समाजसुधारकांचा. बंगालच्या फाळणीच्या संदर्भात बाळ गंगाधर टिळक हे नाव ख्रिसने ऐकलेले होते. सध्या ते मंडालेच्या तुरुंगात असल्याचे त्याला ठाऊक होते. पुण्यावर टिळक व त्यांच्या सारख्या अनेक नेत्यांचा प्रभाव होता. गोखले वगैरे काही मवाळ नेते वगळता पुण्यात काँग्रेसमधल्या जहाल गटाचे वर्चस्व होते. रँड व आयर्स्ट या पोलिस अधिकार्यांच्या खूनाचे प्रकरण होऊन पंधरा वर्षेही पूर्ण झाली नव्हती. या पार्श्वभूमिवर पुण्यापर्यंत बंडखोरांचे जाळे पोचले नसते तरच नवल!
सदाच्या माहितीनुसार पुण्यात निश्चितपणे युगांतरशी संधान साधून असलेले काही तरुण होते. या मध्ये एक महत्त्वाचे नाव होते सलील! सलीलचा उघड सहभाग वरकरणी गणेशोत्सवात सामाजिक कार्यक्रम आयोजित करणे इ. पर्यंतच मर्यादित असला तरी त्याची बोलण्याची तिखट पद्धत, चाफेकर, फडके अशा मराठी बंडखोरांबद्दल गौरवास्पद भाषणे देणे या गोष्टी पुण्याच्या पोलिस खात्याच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. जर कोणी फणींद्रला मदत करत असेल तर सलीलला त्याचा पत्ता असण्याची शक्यता खूप जास्त होती. स्वतः फणींद्रविषयी मात्र सदाकडे शून्य माहिती होती. "हा मनुष्य पूर्वी पुण्यात येऊन गेला होता का?" सदाच्या या प्रश्नावर ख्रिसकडे खात्रीलायक उत्तर नव्हते. राहता राहिली सर्कस. सदाला त्या सर्कसबद्दल माहिती होती. तिला जोरदार प्रतिसाद आहे हे सदाने आवर्जून सांगितले. "अर्थातच या प्रतिसादामुळे या सर्कसचा खेळ लक्षपूर्वक पाहणे मला भाग पडले." त्याने हसत हसत पुस्ती जोडली. विचारविनिमय करून सर्वानुमते आधी त्या सर्कसला भेट द्यायचे ठरले.
*****
ख्रिसने चहाचा कप ओठांना लावला. उच्च दर्जाचा, इंग्लिश पद्धतीने ब्रू केलेला चहा प्यायची सवय असलेल्या त्या जीभेला उकळलेला चहाचा पहिला घोट वेगळी चव देऊन गेला. दूध साखर व वेलचीही चहात घातलेली होती. किंचित जायफळही होतं. प्रसन्नपणे हसून ख्रिसने खिशातून एक नाणे काढून छोटूच्या हातावर टेकवले. नाणे कनवटीला लावून चहाची रिकामी किटली घेऊन छोटू बाहेर पळाला.
"चहा खरंच खूप सुंदर होता." मलिकाच्या चेहर्यावर कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही. किंबहुना कोणी इतका चहा वेडा असेल असं तिला वाटलं नव्हतं. तिने चहापान चालू असताना भद्राला सांगून उमाला बोलावून घेतले होते. तसेच रुद्रला तंबूत न येण्याचे निक्षून बजावायला सांगितले होते. रुद्र ती सूचना ऐकेल याची शक्यता कमीच होती पण किमान त्याला इथली परिस्थिती सांभाळून घ्यायला कोणी आहे हे कळले तर थोडी आशा होती. उमाच्या साक्षीत रुद्रला नक्की का रस आहे हे मलिका किंवा भद्र या दोघांना माहित नसले तरी त्याच्या गोष्टींमध्ये फारशी ढवळाढवळ करायची नाही हे त्यांना ठाऊक होते. मलिकाला स्वत:ला हे दोन अधिकारी पुन्हा एकदा चौकशीसाठी येऊन थडकले हे फारसे आवडले नव्हतेच.
"मिस्टर काल्डवेल म्हणालात ना तुमचं नाव?"
"ओह कॉल मी ख्रिस. आय इनसिस्ट. आणि हो तुमचं इंग्रजी खरंच खूप छान आहे. कुठे शिकलात?"
"माझ्या इंग्रजीमध्ये तुम्हाला इतका रस आहे? आय अॅम फ्लॅटर्ड. असो तर ख्रिस. उमाला या आधी पण तुमचे काही सहकारी भेटून गेलेत. तिने तिला जे जे ठाऊक होते ते सर्व सांगितले. मग आता तुम्हाला काय पाहिजे?"
"मला माहित आहे कि इथे आमचे स्वागत नाईलाजाने होत आहे आणि बिलीव्ह मी मला स्वतःला तुम्हाला त्रास देताना खूप वाईट वाटतंय पण माझा नाईलाज आहे. सुदैवाने तुमचा पुण्यातला मुक्काम हलण्यापूर्वी मी तुम्हाला भेटू शकलो. मी उमाचा अगदी थोडा वेळ घेणार आहे."
तेवढ्यात उमा तंबूत आली. तिच्या मिशा पाहून क्षणभर ख्रिस गोंधळला. भद्राने तो प्रश्न ओळखून त्या मिशा खर्या आहेत अशी पुस्ती जोडली. जोसेफने लगेच ख्रिसच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. ख्रिसला असा धक्का अपेक्षित नव्हता.
"तर उमा नाही का तुझं नाव? उमा तुला कल्पना असेलच कि आम्ही कशा विषयी प्रश्न विचारणार आहोत." जोसेफने सुरुवात केली.
"हो. तुम्हाला त्या दिवशी बॉम्बे मध्ये आमचा खेळ बघायला आलेल्या त्या तरुणाविषयी आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत."
"बरोबर. हे चित्र बघ" जोसेफने फणींद्रचे स्केच तिच्या समोर धरले. ख्रिस तिच्या चेहर्याचे निरीक्षण करत होता. स्केच बघताच तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीति साकळल्याचे त्याला जाणवले. त्याने जोसेफला हलकेच इशारा केला.
"बरं तुला हा कुठे दिसला?" उमाने थोडक्यात त्या दिवशीचा प्रसंग पुन्हा सांगितला, रुद्रची झालेली नजरानजर वगळून!
"अच्छा. म्हणजे रुद्रला त्याने येताना पाहिले आणि तो पळून गेला?" उमाने जोसेफच्या प्रश्नावर हुंकार भरला.
वेट, समथिंग इज अमिस!! फणींद्र एखाद्या माणसाला बघून पळून गेला? ख्रिसच्या अंतर्मनाने त्याला काहीतरी चुकत असल्याची जाणीव करून दिली. या रुद्रला एकदा पाहिले पाहिजे.
"म्हणजे रुद्रची व त्याची नजरानजर झालीच नाही?" ख्रिसने आता सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. उमाने काहीसा विचार करून मान डोलाविली.
"ओके. तुला एक तरूण खेळ अर्धवट टाकून बाहेर पडताना दिसला. त्याला तू खडसावायचे ठरवले पण तो जसा वळला तशी तुला एक अनामिक भीति जाणवली. तुला काहीच सुचेना आणि अशात तो तुझ्या जवळ आला. तेवढ्यात रुद्र मागून आला. इतर लोक येत आहेत हे बघून तो तरूण तिथून निघून गेला. जर असं असेल तर तो तरूण आणि स्केचमधला तरूण एकच कशावरून?" उमाने चमकून वर पाहिले. म्हणजे?
"तू जर इतकी घाबरलेली होतीस कि तुला अगदी काहीही सुचत नव्हते तर तुझी साक्ष आम्ही विश्वासार्ह का मानावी? ज्याअर्थी तू इतक्या ठामपणे सांगत आहेस कि तू त्याचे डोळे पाहिलेस त्या अर्थी तो तू म्हणतेस त्यापेक्षा अधिक वेळ तिथे असावा. तसेच हा मनुष्य एकट्या दुकट्याला पाहून पळून जाणार्यातला नाही. उमा! काय लपवत आहेस? प्लीज, प्लीज आम्हाला खरं खरं सांग."
........
........
........
ख्रिस व जोसेफ रुद्रला भेटण्याकरिता बाहेर पडले. भद्रही त्यांच्या बरोबर गेला. मलिकाने एक सुस्कारा सोडला व ती उमासमोर उभी राहिली. उमा थरथरत होती. मलिकाने तिला खांद्याला धरून उभे केले. उमाला काही उमजेपर्यंत ती जमिनीवर कोसळली. मलिकाच्या हातात विलक्षण जोर होता. तिच्या शब्दांना एक धार!
"मला माहिती आहे कि तू हे रुद्र म्हणाला म्हणून केलं असशील. त्याच्या शब्दांमध्ये एक प्रकारची जादू आहे मला माहित आहे. सध्या तरी तू घाबरली होतीस वगैरे थाप त्यांना पचलेली दिसत आहे. पण इथून पुढे काहीही झालं तरी माझ्यापासून काहीही लपवायचं नाही. रुद्रची गोष्ट थोडी वेगळी आहे. त्यामुळे तुला मी एवढ्यावर सोडते. पण कायम लक्षात ठेव! नटराजा सर्कसमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत पण मलिकाला माहित नाही असं त्यातलं एकही नाही. ही परिस्थिती कधीही बदलता कामा नये. जा आता!"
*****
शो संपला तरी राजाराम तिथेच उभा होता. अजूनही तिची काहीच चिठ्ठी त्याला मिळाली नव्हती. पण आता त्याला तिचा स्पर्श झाला होता. आदल्या दिवशी ती स्वतः चिठ्ठी द्यायला आली होती. ती बोलली काहीच नाही. परतणार्या गर्दीत काही क्षणच ती त्याच्यापाशी होती. ते काही क्षण राजारामला युगांएवढे वाटले. तिने फक्त नेहमीप्रमाणे काही ओळी खरडलेला तो कागदाचा कपटा त्याच्या हातात सरकावला व ती पुन्हा एकदा त्या चमत्कारिक वातावरणात विरघळून गेली. अगदी काही पळांकरिता झालेला तो स्पर्श राजारामसाठी पुरेसा होता. तो हात त्याला वाटला होता तेवढा मुलायम नव्हता. कदाचित सर्कशीतली कामं करून करून तो रखरखीत झाला असावा. त्याची काहीच हरकत नव्हती. तिच्या सहवासापुढे हे काहीच नव्हते. अहो गुलाबालाही काटे असतातच की!
गर्दी ओसरू लागली तशी राजारामची अस्वस्थता वाढू लागली. ती येणार आहे ना? एका झाडाला टेकून तो सर्कशीच्या तंबूंकडे टक लावून बघत होता. आता येईल, मग येईल. हा हा म्हणता पुष्कळ वेळ होऊन गेला. तेवढ्यात त्याच्या हाताला तोच स्पर्श जाणवला. ती त्याच्या मागे उभी होती. अत्यानंदाने त्याचा आवाज घशातच अडकला. ती अगदी हळू आवाजात बोलली.
"या शहरातल्या शेवटच्या शो नंतर आपली भेट होईल. येताना अंघोळ करून, स्वच्छ कपड्यात ये. कोणालाही याबद्दल सांगू नकोस, अगदी स्वतःच्या आईलाही नाही. येताना अवश्य कपाळावर कुंकवाचा टिळा लाव. स्थळ व इतर सूचना चिठ्ठीत आहेत. मी आता येते."
त्याला कळायच्या आत ती तिथून अदृश्य झाली होती. तिच्या अशा सूचनांमागे काय अर्थ असावा? ज्या वेगाने हा विचार त्याच्या मनात आला त्याच वेगाने त्याने तो झटकून टाकला व घराच्या दिशेने पाऊले उचलली.
*****
"रुद्र काहीसा अबोल आहे साहेब. त्याचा स्वभावही थोडा तुसडा आहे. काय आहे त्याचं लहानपण फार विचित्र परिस्थितीत गेलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका."
"तो आम्ही विचारू त्याची उत्तरं देणार असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही." जोसेफ पुटपुटला. ख्रिसने एक व्हॅलिड पॉईंट मांडला असला तरी जर आता उमाला भेटलेला तरूण फणींद्र नसण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन जाण्याचा चान्स! मनातल्या मनात तो ख्रिसला शिव्यांची लाखोली वाहत होता. ख्रिस निर्विकार होता.
"जरा थांबा मी रुद्रला शोधतो. संग्राम पिंजर्यात आहे म्हणजे रुद्र कुठेतरी गेलेला असावा."
व्हॉट? पिंजर्यातल्या त्या राजबिंड्या जनावराकडे बघत दोघेही जवळपास एकत्रच ओरडले. भद्राने खुलासा केला. "रुद्रला संग्रामला पिंजर्यात ठेवायला आवडत नाही. रुद्रचे संग्रामवर पूर्ण नियंत्रण असल्याने तो असताना काही भीति नाही. पण तो नसला तर? मग मलिकाने त्याला कुठेही जाताना संग्रामला पिंजर्यात बंद करण्याचा नियम घातला आहे." मग भद्रही कुठे तरी नाहीसा झाला.
संग्राम त्या पिंजर्यात कसाबसा मावला होता. त्याचे पोट भरलेले असावे. त्याच्या डोळ्यांत झोप दिसत होती. जोसेफ व ख्रिसने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही देशाचे चिन्ह सिंह असले तरी पूर्ण वाढ झालेला जिवंत सिंह पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. तशी त्यांनी लंडनमध्ये सर्कस पाहिली असली तरी त्यातले सिंह संग्रामच्या निम्म्या आकाराचे असावेत. नकळत जोसेफ त्या राजेशाही सौंदर्याने मोहित होऊन चार पावले पिंजर्याच्या दिशेने सरकला. त्याचा उजवा हात किंचित उंचावला आणि संग्राममधला आळस कुठेतरी पळाला. तो चारी पायांवर उभा राहून गुरगुरु लागला. ख्रिसच्या नकळत त्याचा हात खिशात गेला. संग्रामच्या शक्तीसमोर हा पिंजरा टिकाव धरेल?
"संग्राम!!" या आवाजासरशी संग्रामचे गुरगुरणे बंद झाले. ख्रिस व जोसेफने पाहिले तर तिथे रुद्र उभा होता. अत्यंत शांतपणे पावले टाकत रुद्र ख्रिसच्या समोर येऊन उभा राहिला. ख्रिसने अनेक प्रकारच्या नजरांचा सामना केला होता. त्याच्या मते प्रत्येक डोळा एखाद्या डोहासारखा असतो. त्या डोहात भावनांचे तरंग उमटतात व या डोहातूनच मानवी मनाला वाचण्याचा मार्ग जातो. प्रथमच त्याने एखाद्या डोहावर झाकण पाहिले.
"सिंहाला जंगलाचा राजा समजतात. संग्राम एक बर्बर सिंह आहे. जगातल्या सगळ्यात मोठी प्रजाती. जणू राजांचा राजा, एक महाराणा! साधं पिस्तूल महाराणांना थोपवू शकत नाही. मला हसावं कि रडावं हे कळत नाही इतका हा उपाय फडतूस आहे." रुद्रच्या स्वरात अतीव तुच्छता होती.
"भद्र म्हणाला तुम्हाला मला भेटायचं आहे. बोला तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे?"
"त्या दिवशी..."
"उमाला भेटलेला माणूस तुम्हाला हवा असलेला माणूस आहे. त्याचे डोळे पूर्णपणे काळे होते. हीच खूण आहे ना त्याला ओळखण्याची? बाकी तो मला पाहून का निघून गेला? माहित नाही. पण जर संग्राम माझं ऐकतो तर त्याची लायकी ती काय? समाधान झालंच असेल. तर आता निघा इथून."
~*~*~*~*~
अॅलेक्सीने डिनर टेबल लावले. मटण करी, सोबत बीन्स ऑन टोस्ट व मॅश्ड पोटॅटोज होते. तर डेझर्टमध्ये यॉर्कशायर पुडिंग असा बेत होता. अॅलिस्टर व सदाही आज त्यांच्याबरोबर जेवायला होते. जोसेफचा मूड बिघडलेला होता. रुद्रच्या उद्धट प्रतिसादावर तो प्रचंड भडकलेला होता. ख्रिसला त्याला आवरायला बरेच सायास पडले होते. अॅलिस्टरने सर्वकाही ऐकल्यावर लगेच रुद्रला अटक करण्याची तयारी दर्शवली. ख्रिसने त्याचे आभार मानले पण नम्रपणे त्या सूचनेला नाकारले.
"पण का ख्रिस?" जोसेफला अजूनही समजत नव्हतं कि ख्रिस अशा उद्धट माणसाकडून झालेला अपमान का खपवून घेतोय.
"जोसेफ मी तुझ्या भावना समजू शकतो. त्याचे वागणे मलाही पटलं नाहीच. प्रश्न इतकाच आहे कि त्याला अटक करून आपण काय साध्य करू? किमान आत्ता तरी त्याचा फणींद्रशी काही संबंध असेल असं स्पष्ट होत नाहीये. ना त्याचा त्या जर्मन बर्थोल्टशी काही संबंध आहे. तो उद्धट आहे, सरकीट आहे, विचित्र आहे यात वाद नाही. क्वेश्चन इज, इज ही वर्थ अवर अटेन्शन? माय आन्सर इज अ रिसाऊंडिंग नो! त्याचा स्वभाव बघता तो कधी ना कधी गोत्यात येईलच. त्यामुळे त्याच्याकडे तू आणि अॅलिस्टर, सदा तुम्ही दोघे सुद्धा दुर्लक्ष करा."
जोसेफने काहीशा नाराजीनेच का होईन ख्रिसचे म्हणणे मान्य केले. ख्रिसने संभाषण पुढे चालू ठेवले.
"फणींद्र आपला मुख्य संशयित आहे. त्याच्या विषयी अॅलिस्टर आणि सदा तुम्हाला फारशी माहिती नाही. त्याला ओळखायची खूण तुम्हाला समजलीच आहे. फणींद्र कधीच लोकांत फारसा मिसळत नाही. त्याला अलिप्त राहून एकट्याने काम करणे आवडते. पुण्यात तो आला आहे म्हणजे तो एक तर कोणा जर्मनाला भेटायला आला असावा किंवा त्याच्या सलीलसारख्या एखाद्या साथीदाराला. पुण्यात जर्मन किंवा जर्मनीशी संबंधित लोक ....."
"आहेत पण त्यांचा फणींद्रशी संबंध नसावा. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे." अॅलिस्टरने ख्रिसचे वाक्य तोडत उत्तर दिले. "ते मुख्यत्वे संस्कृत अभ्यासक आहेत. त्यांची संख्या अगदी नगण्य आहे. मला विचाराल मिस्टर काल्डवेल तर ही फणींद्र थिअरी आणि फ्रीडम वगैरे म्हणजे अतिरेक आहे. मला माहित आहे कि खुद्द व्हॉईसरॉयनी तुम्हाला या केसमध्ये लक्ष घालायला सांगितले आहे पण ......... एनीवे" ख्रिसने तिसर्यांदा घसा खाकरल्यानंतर अॅलिस्टरला ती जाणीव झाली. सोशल एरर!! ख्रिसने एकदा त्याच्याकडे बघून स्मित केले.
"मी तुमच्या मतांचा आदर करतो पण आम्हाला काही गोष्टींची खात्री करणे भाग आहे. तसेही या निमित्ताने फणींद्र सारखा भयंकर माणूस पकडला जात असेल तर चांगलंच आहे. बरं तुम्ही मला सांगितलं त्यानुसार सदा इथला स्थानिक माहितगार आहे. सदा, इथे जर फणींद्रने कोणाला गुपचूप भेटायचं ठरवलं तर तो कोणती जागा निवडेल?"
"साहेब तशा जागा खूप आहेत. मला विचाराल तर मी स्वतः एखादी गजबजलेली जागा निवडेन कारण तिथे कोणाचाही शोध घेण कर्मकठीण! पण जर हा सलीलला भेटायला आला असेल तर गणेशखिंडीच्या इथलं जंगल ती जागा असण्याची शक्यता खूप जास्त आहे."
ख्रिसच्या स्मितात आता थोडं कौतुक होतं. "जंगलच का?"
"साहेब, त्या जंगलाइतकी निर्जन जागा पुण्यात दुसरी कुठली नसेल. तसंही सलील अनेकदा त्या दिशेने जाताना दिसला आहे. आम्हाला त्याच्या विरुद्ध काही ठोस सापडलं नाही म्हणून कधी फार पाठपुरावा केला नाही. पण साहेब ते जंगल न निवडण्यामागे पण एक कारण आहे."
"आणि ते काय?"
"साहेब त्या जंगलात आत्तपर्यंत बिबटे किंवा रानकुत्रीच पाहिली होती. पण एक वाघ तिथे हिंडत असल्याची बातमी आहे. पावलांच्या ठशांवरून तो बराच म्हातारा असावा. असा थकलेला, म्हातारा वाघच नरभक्षक असतो. आजूबाजूच्या गावातून काही माणसे गायब झाल्याच्या बातम्या पण उडत उडत कानावर आल्या आहेत."
ख्रिसने डोळे मिटून काही क्षण विचार केला. त्याने जोसेफ कडे बघितले. जोसेफने खांदे उडवले.
"नेव्हरदलेस एकदा तरी या जंगलाची सैर आपल्याला करावीच लागेल. आज सिंह पाहिला. मग वाघही पाहून घेऊयात. अॅलेक्सी?"
"अॅरेंजमेंट्स विल बी डन सर. शुड आय ब्रिंग डेझर्ट?"
"नॅचरली."
"व्हेरी वेल सर"
........
........
........
रुद्र संग्रामच्या पोटावर डोके ठेवून पडला होता. त्याच्या डोक्यातही तेच शब्द घोळत होते. जवळच्या जंगलात वाघ आहे!!
~*~*~*~*~
क्रमशः
पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60640
वाटच बघत होतो मस्त झालाय
वाटच बघत होतो मस्त झालाय भाग. फक्त पुण्यात असल्यामुळे जास्ती गुंतागुंत झाली नाहीये. चहाचा संदर्भ आवडला. मोरोक्कोचा इतिहास माहिती नव्हता पण त्याची गुंफण चांगली होतीये कथानकात.
एकदम युरूगु स्टाइल स्टोरी आहे
एकदम युरूगु स्टाइल स्टोरी आहे - खूप वेगवेगळे धागे असलेली. मजा येते आहे वाचायला.
नियमित भाग टाकण्याबद्दल थँक्स, पायस
वाचिंग अॅण्ड वाचिंग अॅण्ड
वाचिंग अॅण्ड वाचिंग अॅण्ड वाचिंग...
धन्यवाद तिघांनाही माबोचा
धन्यवाद तिघांनाही माबोचा सर्व्हर नेमका माझ्या सोमवारच्या 'फ्री' वेळात डाऊन असल्याने भाग मंगळवारी आला.
धनि - मोरोक्कोचा इतिहास व जैवविविधता फार इंटरेस्टिंग आहे. खेदाची गोष्ट ही आहे कि त्यांची जैवविविधता त्यांनी जपली नाही त्यामुळे बर्बर सिंह, अॅटलस अस्वल अशा कितीतरी प्रजाती गेल्या शतकात नामशेष झाल्या. रच्याकने मला या भागात ख्रिसच्या हातात मोरोक्कन मिंट टी द्यायची फार इच्छा झालेली पण तो 'मॅग्निफिशियंट मिश्चिफ सर' करून घसा खाकरायचा
र्म्द - धन्स
हिम्सकूल - लायकिंग कि नाही
एकदम युरूगु स्टाइल स्टोरी आहे
एकदम युरूगु स्टाइल स्टोरी आहे + १ . मस्त चललिये
अरे एकदम लायकिंग... वेटींग
अरे एकदम लायकिंग... वेटींग अॅण्ड वेटींग अॅण्ड वेटींग फॉर नेक्क्ष्ट पार्ट..
सगळी कथा पूर्ण झाल्यावर एक सलग वाचून काढायला जास्त मजा येईल... मला स्वत:ला अश्या कथा एकदा सुरु झाल्या की सलग वाचायला आवडतात... ब्रेक आला की परत लिंक लागायला वेळ जातो.. पुस्तक वाचताना घरच्यांच्या फार शिव्या खाल्ल्या आहेत मी ह्याच्यामुळे.. एकदा सुरु केले की संंपल्याशिवाय खालीच ठेवत नाही..
मस्त सुरू आहे. सगळी कथा पूर्ण
मस्त सुरू आहे.
सगळी कथा पूर्ण झाल्यावर एक सलग वाचून काढायला जास्त मजा येईल. >> +१
भारी, मज्जा येतीये वाचायला.
भारी, मज्जा येतीये वाचायला. एक आठवडा वाट पाहण्यात जातो पण. मागचा भाग पुन्हा वाचला.
आत्ता तरी जिगसौ चे तुकडे जुळवत असल्याचे वाटत आहे, काहीच चित्र स्पष्ट नाही. पुढे एकदा आकार आल्यावर अजून धमाल होईल
सर्वांना धन्यवाद एक्स्ट्रॉ
सर्वांना धन्यवाद
एक्स्ट्रॉ फीचर :
हा चेहरा लक्षात ठेव - संग्राम
मस्त!! मजा येतेय वाचायला. मला
मस्त!! मजा येतेय वाचायला.
मला वाटलं आज एक्स्ट्रा फीचर म्हणून एखाद्या चहाची नाहीतर योर्कशायर पुडिंगची रेसिपी असेल.
चित्र चांगलं आलंय, विशेषतः आयाळ!
हा भाग ही मस्त गणेशखिंड च्या
हा भाग ही मस्त
गणेशखिंड च्या उल्लेखाने पावन झाले.