आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.
पण बुडत्याचा पाय खोलात या नात्याने संजय राऊत नामानिराळे होतात आणि शिवसेनेला तोंडावर पाडतात हे मागील सहा - सात वर्षात खूप वेळा घडले आहे.
ज्या शिवसेनेने भल्या भल्यांना घाम फोडला,अनेक गर्विष्ठ माना झुकवल्या त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर ही वेळ आणण्यास सर्वस्वी संजय राऊत हेच जबाबदार आहेत.
उद्धव ठाकरेंनी माफी मागताना अत्यंत सूचक व योग्य शब्द वापरले आहेत. त्यांनी वाघ दोन पाऊले मागे जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे. दोन पावले मागे सरलेला हा वाघ कोणाची शिकार करणार व कधी करणार हे बघण्यासारखे असेल.
कुणी याला नामुष्की म्हणत असेल तर त्याचा तो अपरिपक्वपणा म्हणावा लागेल. एक प्रकारची राजकीय सुज्ञता दाखवताना उद्धव ठाकरेंनी याच पीसी मध्ये मराठा आरक्षणावर आणखी तीव्र व कठोर भूमिका मांडत त्यांच्या जबड्यात कोण अडकणार आहे याचे सुतोवाच केले आहे.
उद्धव ठाकरेंनी मागितलेल्या विनम्र माफीचा आधार घेऊन कुणी उन्माद दाखवत असेल वा विजयी वीराचा आव आणून छाती पिटत असेल तर तो जिजाऊ मा साहेबांचा मराठा नाही, कारण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील तमाम माताभगिनींची ही माफी मागितली आहे, कुणा संघटना वा जात वा नेत्याच्या अनुषंगाने ती नाहीये.
तेंव्हा या माफीवर जर कुणी उन्माद दाखवत असेल अन त्याच उन्मादक व्यक्तीने 'त्या व्यंगचित्राने आपल्या भावना दुखावल्या' हा दावा जर आधी केला असेल तर तो केवळ आणि केवळ कांगावाच ठरतो. कारण ही माफी आपल्याच माय भगिनींच्या भावनांसाठी आहे अन त्यावर उन्माद करणारा हा अधिक धोकेदायक वाटतो.
व्यक्तीशः अनेक लोकांना उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचे शल्य वाटेल, खासकरून शिवसैनिकांना वाईट वाटेल. मला सुद्धा काही क्षण ही माफी खटकली. वास्तविक पाहता 'मोडेन पण वाकणार नाही' या बाण्याने मराठी माणसाचे अपरिमित व्य्वाहारिक नुकसान केले आहे याची जाणीव ज्या ज्या माणसाला असेल त्या त्या प्रत्येक व्यक्तीस यातला सुज्ञपणा लक्षात येईल. त्यामुळे एका माफीने शिवसेनेला वा सेना नेतृत्वाला कमीपणा न येत नसून आपण असले अत्यंत कडूचवीचे विखार हसतमुखाने पचवू शकतो हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंचा हा राजकीय प्रगल्भपणा काही लोकांच्या डोळ्यात ठसठसेल पण त्याला इलाज नाही, कारण शेवटी आपण बाजी पलटी करूनही बाजी मारू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचे असेल. शिवाय घोडामैदानही योगायोगाने जवळ आलेलेच आहे.
'दोन पावले मागे सरलेला वाघ' हा दबा धरून बसलेल्या वाघापेक्षा जास्त धोकादायक असतो असे जाणकार सांगतात. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात नेमके काय चालले असेल याचा अचूक वेध शब्दशः घेणे अशक्य आहे मात्र एक नक्की आहे, की या खेळीचा त्यांना दूरगामी फायदाच होणार आहे. त्यांनी ही खेळी करून अनेकांना बुचकळ्यात टाकताना आपली पुढची खेळी काय असेल यासाठी नेल बाईटींग सस्पेन्स तयार केला आहे हेही तितकेच खरे ...
'सामना'' मध्ये लिहिताना वा इतरत्र बोलताना संजय राऊतांनी इथून पुढे तारतम्य बाळगले तर सेनेस त्यांचा उपयोग नसला तरी त्रास तरी होणार नाही. त्यांचा अति आवेश व आततायीपणा त्यांना व पर्यायाने सेनेला नडतो ..यावर उपाय त्यांनीच शोधायचा आहे. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने संजय राऊत यांचा वाईट दिवस असेल. शिवसेनाप्रमुख गेल्यावर जितके वाईट त्यांना वाटले असेल तितकेच शल्य त्यांना आज जाणवत असणार आहे. कारण तेही हाडाचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी आज आत्मचिंतन करावे असा हा दिवस आहे.
असो... ही सर्व माझी वैयक्तिक भूमिका आहे, ती सर्वाना पटावी असा आग्रह नाही.
सूचना - सदर पोस्टवर जातीवाचक वा राजकीय वा व्यक्तिगत शेरेबाजी करून आपल्या संस्कारांचा पालथा घडा उघडू नये.
- समीर गायकवाड.
छान
छान
लै हास्यास्पद लिहिलेय. सायेब
लै हास्यास्पद लिहिलेय.
सायेब एवढे फॉलोवर आणि एवढे वाचक आहेत.
बघा?
किती?
बोला?
ठीक.
करतो.
या आता!
मुळात मराठ्यांची आंदोलने
मुळात मराठ्यांची आंदोलने कोणाला तापदायक ठरणार याबाबत सर्व पक्ष, नेते, पत्रकार इतकेच काय पण आंदोलनाचे संयोजकही अनभिज्ञ होते. हा साप फडणीसांनी घड्याळवाले काकांच्या गळ्यात तर काकांनी फडणीसाच्या गळ्यात अडकवायचा प्रयत्न केला.नन्तर एवढा मोठा लोण्याचा गोळा पाहून अपमान सोसून बरेचशे 'नेते ' 'आम्हीही तुमच्या बरोबर तेव्हा होतो बरं का ? 'याचं डॉक्युमेन्टेशन करण्यासाठी त्यात मागच्या लायनीत का होइना घुसू लागले.त्यात बीजेपी , काँगी, घड्याळी, सगळ्यांचे आमदार होते, मात्र सेनेचे आमदार त्यात कोठे दिसले नाही. कारण बहुधा 'वरून 'भूमिका ठरली नसावी. सामन्यातूनही याची फार दखल घेतली गेली नाही. फक्त आंदोलानात शिवसेनेचा 'भगवा ' आहे असे आबर्जून सांगण्यात आले. त्यावर संयोजकाणी तो महाराजांचा भगवा आहे कोणा पक्षाचा नाही हे स्पष्ट केले. सेनेने फडणीसाणाना निर्णय घेण्याची मागणी करून मराठे आणि फडणीस यांची 'लावून देण्याचा'प्रयत्न केला. म्हणजे चीत भी मेरी और पट भी मेरी.
कार्टून चे निमित्त होऊन अचानक हा साप शिवसेनेच्या लुंगीत शिरल्यावर सर्वात आधी आनन्दाचे भरते आले ते भाजपला. काल त्यांचे प्रवक्ते राम भाउ कदम यंचा आनन्द पॅनेल डिस्कशनमध्ये लपता लपत नव्हता. मग यथावकाश धनंज य मुंडे , विखे पाटील यांनी आपापले माऊथ ऑर्गन वाजवून घेतले.
संजय राऊत या नतद्रष्ट इसमाने 'माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ' ही भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली . ( ती अद्यापही कायम आहे') सध्या ते गोव्याला पळून गेलेले आहेत तिथल्या निवडणुकीच्या निमित्ताने..
सेनेला माफी मागायला ५-६ दिवस का लागावेत ?एकदा तुमची चूक आहे हे मनातून मान्य असल्यावर ? किंचित
लाथ लागली तरी आपण पट्कन पाया पडून चट्कन सॉरी म्हणतो. त्याने हे अनवधानाने झाले ही भूमिका क्लिअर होते. समोरचाही तो विषय सोडून देतो.
त्याचे कारण आहे जेव्हा सेनेला त्यांच्याच भाषेत सेनेच्या कार्यालयावर दगडफेक करून उत्तर दिल्यावर सेना भानावर येऊ लागली. सेनेला त्यांच्या 'पद्धतीने ' उत्तर देणारे निर्माण झाल्यावर सेना टरकली. औरंगाबादचे त्यांचे नेते १०० शिव'सैनिकांचे ' कडे घेऊन ऑफिसमध्ये बसू लागले. सगळ्यात कहर झाला तो शिवसेनेच्या एका खासदाराने व तीन आमदारांनी मातोश्रीवर राजीनामे दिल्यावर. त्याना मातोश्रीवर बोलावून त्यांच्या दाढ्या कुरवाळण्यात आल्या ( त्यातले खासदार खरेच दाढीवाले आहेत ). मराठवाड्यात तालुका / जिल्हा स्तरावर पदाधिकार्यांचे राजीनामे व्हाट्सप वर फिरू लागले. अन अचानक सेनेला दसरा मेळाव्याची आठवण झाली .लाखोंची गर्दी हजारावर येणार हे दिसू लागल्याबरोबर हे माफीचे नाटक सुरू झाले. शिवाय जिल्हा परिषदांच्या आणि मनपांच्या निवडणुका काही महिन्यांवर आहेत अन्यथा कार्टूनिस्ट
वर शेकवलेले प्रकरण सेनेवरच शेकणार असे दिसू लागल्यावर झालेली ही पश्चात बुद्धी आहे. खरेच वाईट वाटले असते तर दुसर्या तिसर्यादिवशीच माफी आली असती.
ही मानभावी माफी सर्वांच्या लक्षात आलेली आहे. तिची भाषाही विनाशर्त नाही.
सेनेची मराठ्यांत मोठी वोट बँक आहे १८ पैकी १४ खासदार मराठा आहेत. मुळात या मोर्च्याच्या निमित्तने मराठा समाजात पर्यायी नेतृत्वाचे धृवीकरण सुरू झाले आहे अशा स्थितीत ही वोट बँक जाऊ नये म्हणूनच हा आटापिटा आहे. आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ( जे मिळणे अशक्य आहे कारण सरकारने त्यात सरकारी वकीलामार्फत ज्या मेखा मारलेल्या आहेत त्यानुसार) सेनेने विशेष अधिवेश्नाची मागणी केली आहे ती स्गळ्यांच्या तोंडून मराठा आरक्षण्बाबत अधिकृत भूमिका वदवून घेण्यासाठी पर्यायाने स्वतःच्या लुंगीतला साप दुसर्याच्या लुंगीत सोडण्यासाठी. त्यावर सरकारने हाय कोर्टात पुढची तारीख मागून घेऊन 'प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' अशी बांग देण्याची सोय केलेलीच आहे.
ह्या सगळ्या साठमारीत सगळ्यात सेनेला नि:संशयपणे फटका बसणार आहे . कारण मराठा समाजाने ही माफी मनोमन स्वीकारलेली नाही. सेनेच्या दृष्टीने ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. बाकी शिवसेना संपवण्याचे मनोहर जोशींचे 'कार्य' राऊत निश्चित पार पाडतील यात शंका नाही.
रच्याकने , या प्रकरणी मोर्चाचे संयोजक--जे कोणी असतील ते - यांचा चाणाक्षपणा विशेष आहे. त्यांची यावर प्रतिक्रिया पुन्हा सगळ्यांचा पोपट करणारी आहे. त्यांनी म्हटले आहे की कार्टून कडे ते फक्त कार्टून आहे एवढ्याच दृष्टीने पहा. त्यातून्वाद वाढवू नका वगैरे .
आता बोला !!!
लै हास्यास्पद
लै हास्यास्पद लिहिलेय.
<<
सहमत !
ह्याला तुम्ही वाघ म्हणत असाल तर तुमची मर्जी.
सेनेने माफी मागायचीच
सेनेने माफी मागायचीच नव्हती.
कार्टून वादात तर मुळीच नाही.
मी सैनिक नाही की त्यांचा विरोधी नाही. मराठा आहे की आणखी कोणत्या जातीचा ते माझे माझ्यापाशी. पण माझ्यामते हा लोकशाही आणि विचारस्वातंत्र्याचा पराभव आहे.
सेनेचा वाघ "दोन" च पावले
सेनेचा वाघ "दोन" च पावले मागे सरकला आहे हे वाचून मात्र मौज वाटली.
असेलही बुवा खरेच.
पण वाघाला एकदा पिंजर्यात डांबल्यावर तो दोन पावले मागे सरकतोय की पुढे याने कोणाला काय फरक पडतोय
लेख एकसूरी आणि एकांगी वाटला.
लेख एकसूरी आणि एकांगी वाटला.
अरेरे ! ते व्यंगचित्राचे
अरेरे ! ते व्यंगचित्राचे सदरच सामनातून बंद होणार !
काय ही वेळ आली!
घरात पिढ्यान पिढ्या व्यंगचित्र काढून राजकीय मत खंबीरपणे मांडण्याचा इतिहास असताना आता व्यंगचित्र सदरच सामनातून हटणार.
परम्परेपेक्षा इलेक्शन जिंकणे
परम्परेपेक्षा इलेक्शन जिंकणे महत्वाचे. तरच पैसा मिळतो.
हेच इतिहास काळात घडले असते
हेच इतिहास काळात घडले असते तर ...
रयतेचे हित ध्यानात घेऊन उधोजीरावानी मराठ्यांशी तह केला , असे इतिहासकारानी लिहिले असते.
..
ते कुठे तरी विदेशात विदेशी पेपर, विदेशी धर्म, विदेशी व्यंगचित्र , खूनखराबा वगैरे झाल्यावर एतद्देशीय पेपरवाले त्या परदेशी पेपरचे, त्यांच्या खंबीरतेचे कौतुक करत होते व विरोधी धर्माला शिव्या घालत होते, त्या एतद्देशीय पेप्रात सामनावालेही होते ना? पेप्राचे कर्तव्य ! अभिव्यक्तीस्वातंत्र्य , शौर्य , विरोधी धर्म किती क्रूर , पेप्रावर हल्ला करतात म्हणजे काय ! !!!!!! काय त्या चर्चा झडल्या होत्या !!!!!
आणि आता स्वतःच्याच देशात स्वतःच्याच धर्मातील एका गटापुढे एका व्यंगचित्रापायी लोटांगण घालायची पाळी आली ?
@ऋन्मेऽऽष हा लोकशाही आणि
@ऋन्मेऽऽष
हा लोकशाही आणि विचारस्वातंत्र्याचा पराभव आहे.>>>>>>>>>
सेनेला तरी या गोष्टी कधी माहिती होत्या ...........?
"मुक मोर्चा " आंदोलनास "मुका
"मुक मोर्चा " आंदोलनास "मुका मोर्चा" म्हणणाऱ्या माफी मागणाऱ्या वाघाने "दसरा मेळाव्यास" सुद्धा त्याच पठडीतील एखादे समर्पक नाव व्यंगचित्रासकट सुचवावे