चला 'रफाल'ला जाणून घेऊया

Submitted by पराग१२२६३ on 25 September, 2016 - 10:56

गेल्या २३ सप्टेंबर १६ रोजी भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार आहे. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे. हा करार झाल्यानंतर आता त्याची एकूण किंमत आणि प्रत्यक्षात हवाईदलाला मिळणाऱ्या विमानांची संख्या यावरून आता बरीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. तिच चर्चा इथे करण्याचा हेतू नाही. हा करार अतिशय महागडा ठरला आहे आणि तरीही आता सरकार समर्थक - त्यातही कसे ७५० दशलक्ष डॉलर या सरकारने वाचवले आहेत - ते सांगण्यासाठी सरसारवले आहेत. या करारानुसार भारतीय हवाईदलाला मिळणाऱ्या एका रफालच्या किंमतीत २.५ सुखोई येऊ शकली असती. तसे पाहिले तर फ्रेंच शस्त्रसामग्री कायमच महागडी असते. हा अनुभव मिराज-२०००, त्यांचे अपग्रेडेशन, स्कॉर्पीन पाणबुड्यांची खरेदी इत्यादी बाबतीत आलेला आहेच. पण फ्रान्सशी भारताचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांच्यापेक्षा रशियाबरोबरच फ्रान्सकडून आपल्याला शस्त्रसामग्री घेणे तसे सोयीचे ठरत असते. त्यामुळे रफालच्या किंमतीची चर्चा थोडीशी बाजूला ठेऊन आपण या विमानांच्या इतर बाबींवर नजर टाकू या.

रफालच्या खरेदी व्यवहारात किंमत वाढत जाण्यामागे एक कारण ठरले आहे, आपण त्याच्याबरोबर घेत असलेले शस्त्रास्त्रांचे पॅकेज आणि त्यामध्ये आपल्या गरजांनुरुप बदल करून घेणे. या विमानातील मूळच्या काही यंत्रणांच्या जागी आपण आपल्याकडील इस्रायली बनावटीचे हेल्मेट माऊंटेड डिस्ल्पे, रडार वॉनिंग रिसिव्हर्स, लो बँड जॅमर्स, इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅकींग सिस्टीम अशा आणखी काही यंत्रणाही बसवणार आहोत. फ्रान्समधील कारखान्यात ही विमाने तयार होतानाच या यंत्रणा त्यात एकीकृत केल्या जाणार आहेत. त्यामुळे मूळच्या विमानामध्ये गरजेनुसार फेरफार करावे लागणार आहेत. त्याचीही किंमत या व्यवहारात समाविष्ट झालेली आहे.

रफाल डेल्टा विंग बहुपयोगी मध्यम पल्ल्याचे ४++ श्रेणीतील लढाऊ विमान आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ले करण्यासाठी, टेहळणीसाठी, आकाशात वर्चस्व निर्माम करण्यासाठी, जमिनीवरील आपल्या सैन्याला हवाई छत्र पुरवण्यासाठी, जहाजविरोधी, शत्रुच्या प्रदेशात दूरवर हल्ला करण्यासाठी आणि अण्वस्त्रवाहक म्हणूनही भूमिका रफाल बजावू शकते. त्यामुळे या विमानावर मोहिमेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. या विमानात डायरेक्ट व्हॉईस इनपुट बसवण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या यंत्रणांना (शस्त्रास्त्रे डागण्याची सोडून) तोंडी सुचना देता येतात. त्यामुळे वैमानिकावरचा भार हलका होतो. त्याचबरोबर रफालमध्ये एईएसए रडार बसवलेला असणार आहे. त्यामुळे रफाल एकावेळी आकाशातील शत्रुच्या अनेक लक्ष्यांचा वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ही यंत्रणा भारतीय हवाईदलाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच बसवलेली असेल. सुखोई-३० एमकेआयमध्ये या यंत्रणेऐवजी पॅसिव्ह अरे रडार आहे. तीही नजीकच्या भविष्यात बदलली जाणार आहेच. रफालच्या आरेखनामुळे त्याला उडत असताना स्थैर्य मिळत नाही. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी यावर डिजीटल फ्लाय-बाय-वायर उड्डाण नियंत्रण यंत्रणा बसवलेली आहे. त्यामुळे विमानाला आवश्यक असलेली स्थिरता मिळवून देणे शक्य झाले आहे.

हवेत उडत असताना शत्रुच्या प्रदेशातून माहिती मिळवण्यासाठी यावर अनेक प्रकारचे संवेदक बसवलेले आहेत. त्याची एकत्रित माहिती वैमानिकासमोर असलेल्या मोठ्या होलोग्राफीक हेड-अप डिस्प्ले यंत्रणेवर दिसते. त्याचबरोबर रंगीत बहुकार्यक्षम डिस्प्ले आणि केंद्रीय क़लिमेटेड डिस्प्लेही या विमानाच्या कॉकपीटमध्ये बसवलेले आहेत. त्यांच्यावर विमानातील सगळ्या संवेदकांनी मिळवलेली माहिती सादर केली जाते.

रफालमध्ये ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा बसवलेली आहे. भारतीय हवाईदलातील इतर लढाऊ विमानांमध्ये ती सध्या बसवण्यात येत आहे. रफालबरोबर आपल्याला ती इन-बिल्ट मिळणार आहे. या यंत्रणेमुळे रफालच्या कॉकपीटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवण्याची आवश्यकता नाही. परिणामी रफालचा उड्डाणाचा कालावधी जास्त झालेला आहे. तसेच रफालमध्ये ऑटोपायलट यंत्रणा बसवलेली असणार आहे. भारतीय हवाईदलाच्या काही प्रकारच्या लढाऊ विमानांमध्ये ही यंत्रणा सध्या बसवण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा वैमानिकावरील कामाचा ताण हलका करते आणि आपत्कालीन परिस्थिती सांभाळूनही घेते.

रफालमधील एमडीपीयू ही वैमानिकी यंत्रणा उड्डाणाचे नियंत्रण, माहितीचे विश्लेषण, शस्त्रास्त्र डागण्याचे नियंत्रण आणि एकूणच वैमानिक व विमान यांच्यातील समन्वयाचे काम करते. या विमानाच्या एकूण किंमतीमध्ये त्याच्यावरील रडार, इलेक्ट्रॉनिक दूरसंचार आणि स्वसंरक्षणाची यंत्रणा यांचा वाटाच ३० टक्के आहे. यावर स्पेक्ट्रा ही स्वसंरक्षण यंत्रणा बसवलेली आहे. ती विमानाचे हवेतील आणि जमिनीवरील शत्रुपासून संरक्षण करते. ही यंत्रणा हे या विमानाचे वैशिष्ट्य ठरली आहे. लिबियामधील नाटोच्या हल्ल्यांच्यावेळी या यंत्रणेची बरीच मदत झाली होती.

रफालच्या जमिनीवरील लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता पाहिल्यास तीही अतिशय चांगली असल्याचे लक्षात येते. विमानावर बसवलेल्या विविध प्रकारच्या टार्गेटींग पॉड्सच्या मदतीने रफाल जमिनीवरच्या लक्ष्यांवर हल्ला चढवते. या सगळ्या यंत्रणा लक्ष्याविषयीची माहिती पुरवतात, तर त्याचवेळी विमानाला टेहळणीची भूमिका बजावण्यासही मदत करतात. या सगळ्या यंत्रणा एमपीडीयूशी संलग्न केलेल्या असल्यामुळे एमपीडीयूकडून त्या माहितीचे विश्लेषण लागलीच होते आणि ती माहिती जमिनीवरच्या आपल्या सैन्याला, आपल्या नियंत्रण कक्षाला आणि वैमानिकालाही लगेच उपलब्ध होऊ शकते. रफाल आपल्याला मिळालेली लक्ष्याची माहिती आपल्या आसपासच्या आपल्या हवाईदलाच्या इतर विमानांनाही पुरवू शकते, ज्यामुळे त्यांना लक्ष्यांची अचूक माहिती वेळोवेळी उपलब्ध होते. शत्रुच्या प्रदेशाचे हवाई सर्वेक्षण करण्याची क्षमताही रफालमध्ये आहे.

या सर्व अत्याधुनिक यंत्रणांनी रफालला कोणत्याही प्रकारच्या हवामानात दिवसा किंवा रात्रीही प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता मिळवून दिलेली आहे. याची २ स्नेस्मा एम८८-२ टर्बोफॅन इंजिने स्वतंत्रपणे विमानाला ५०.०४ केएनचा रेटा देतात. त्यांच्या मदतीने रफाल १ मिनिटात सुमारे ६०,००० फुटांची उंची गाठण्यास सक्षम झालेले आहे. या विमानावर १४ हार्ड पॉईन्ट्स आहेत. त्यावरून एकूण ९.५ टनाची शस्त्रास्त्रे हे विमान वाहून नेऊ शकते. रफालमधील इंधनाच्या टाकीची क्षमता ४.७ टन आहे. पण माहिमेच्या गरजेनुसार इंधनाचा अतिरिक्त साठा नेण्याची सोय (ड्रॉप टँक्स) या विमानात आहे. अशा ३ डॉप टँक्सच्या मदतीने रफालचा पल्ला ३,७०० कि.मी.पर्यंत जातो. त्याबरोबरच रफालमध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरण्याचीही सोय उपलब्ध आहे. सुमारे १,८०० कि.मी. त्रिज्येचे प्रभावक्षेत्र असलेल्या रफालचा वेग ताशी २,५०० कि.मी. आहे. तसेच ते समुद्रसपाटीपासून सुमारे १५.५ कि.मी. उंचीवरून उडू शकते. याच्यावर बडी-रिफ्युलर बसवण्याची सोय असल्यामुळे हवेत उडत असताना गरजेच्यावेळी एका रफालमधून दुसऱ्या रफालमध्ये इंधन भरणे शक्य होते.
रफालवरची शस्त्रसामग्री
रफालवर एक ३० मि.मी.ची स्वयंचलित तोफ बसवलेली आहे, जिच्यातून मिनिटाला १२५ गोळ्यांचा मारा करता येतो. तसेच मॅजिक-२, मायका, मेटिओर ही हवेतून हवेतली लक्ष्ये भेदणारी क्षेपणास्त्रे रफालवर बसवलेली आहेत. यापैकी मेटिओर मानवी दृष्टीपलीकडचे लक्ष्य भेदू शकणारे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला १५० कि.मी. आहे. भारत रफालबरोबर ही क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. हवेतून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणारी अपाचे, स्टॉर्म शॅडो, हॅमर अशी बरीच शस्त्रसामग्री रफालवर बसवता येते.

असे हे रफाल महागडे असले तरी भारतीय हवाईदलातील सर्वांत अत्याधुनिक लढाऊ विमान ठरणार आहे.

Group content visibility: 
Use group defaults

उत्तम विश्लेषण, छान लेख. मुळात सुखोई आणि रफाल हे वेगवेगळ्या कॅटगरी मधील विमाने आहेत त्यामुळं त्यांची तुलना करणे अवघड आहे, दोन्ही हि अत्याधुनिक आणि उत्तम आहेत, पण सुखोई ची उपलब्दता 60 % (अंदाजे) आहे, म्हणजे मेंटेनन्स इशू आहेत. तसेच रफाल हे close range airfight म्हणजे dogfight मध्ये उत्तम आहेत.

eurofigher typhoon हे रफालपेक्षा भारी आहे असे वाचले ,मग रफालचाच एव्हढा अट्टाहास का बरे?

अमितदादा, अभिप्रायासाठी धन्यवाद.
सुखोई आणि रफालची श्रेणी जशी एकमेकांपेक्षा भिन्न आहे, तशीच त्यांची भूमिकासुद्धा निरनिराळी आहे. इथे दोघांचा उल्लेख अशा अर्थाने केलाय की सुखोईचे आधुनिकीकरण रखडल्यामुळे त्याच्यावर रफालच्या मानाने सध्या जुन्या वैमानिकीय यंत्रणा आहेत.

सिंथेटिक जिनियस, तुम्ही असे विचारले आहे की, eurofigher typhoon हे रफालपेक्षा भारी असतानाही आपण रफाल का निवडले. तर एक म्हणजे रफाल आणि eurofigher typhoon तसे पाहिले तर जवळजवळ एकसमान आहेत. पण व्यूहात्मक भूमिकेच्या बाबतीत रफाल सरस आहे. हे एक कारण. आणि यामागे आंतरराष्ट्रीय राजकीय कारण हे दुसरे कारण.

Eurofighter हे multi role लढाऊ विमान आहे, तर रफाल omnl role आहे. हेसुद्धा एक कारण आहे ज्यासाठी रफालची निवड आपण केलेली आहे.

Eurofighter हे multi role लढाऊ विमान आहे, तर रफाल omnl role आहे. हेसुद्धा एक कारण आहे ज्यासाठी रफालची निवड आपण केलेली आहे. >>> मला वाटतंय ह्यामागे दुसरं कारण आहे. खरं तर दोन्ही विमानांनी minimum operational requirement satisfy केली होती, दोन्ही विमाने उष्ण आणि थंड हवामानातील भरपूर चाचण्या उत्तीर्ण झाली होती. मात्र रफले lowest bidder होते, तसेच उच्च तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतात काही गोष्टींचं उत्पादन यावरती रफले ने eurofighter वरती बाजी मारली. तसेच तीन ( कि चार) देशांची तसेच तीन कंपन्यांची एकत्रित कंपनी असणारी eurofighter gmbh कंपनी सतत बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या काळात spare parts आणि सर्विसेस विनाविलंब करू शकते का याबद्दल पण शंका असावी.

अमितदादा,
तसेच तीन ( कि चार) देशांची तसेच तीन कंपन्यांची एकत्रित कंपनी असणारी eurofighter gmbh कंपनी सतत बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या काळात spare parts आणि सर्विसेस विनाविलंब करू शकते का याबद्दल पण शंका असावी.
-- हे तुमचे म्हणणे बरोबर आहे.