मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांच्या भुमिका असलेले कोड मंत्र हे नाटक रविवारी बघितले.
उत्तम अभिनय, ओघवते कथानक आणि आजवर मराठी रंगमंचावर न आलेला विषय यासाठी अवश्य अवश्य बघावे असे हे नाटक आहे.
नाटक सस्पेन्स थ्रीलर नाही तरीही नाटकाचे कथानक उघड करू नये अशी विनंती मुक्ता बर्वे स्वतः करत असल्याने
ती मानावीच लागेल.
सैन्यातील काही चालिरिती आणि कोर्ट मार्शल हा नाटकाचा विषय. नाटकाच्या सुरवातीस प्रेक्षकांसमोर एक खुन होतो, आणि जी व्यक्ती आरोप कबूलही करते तरीही कथानक पुढे जबरदस्त वळणे घेते.
नाटकात केवळ दोन स्त्रिया त्यापैकी एक पुर्वीची सैनिकच, शिवाय दोन वकिल आणि बाकी सर्व आर्मीमेन. अगदी कडक युनिफॉर्म मधे.
एकंदर ( सर्व मिळून ) चाळीस कलाकार हे नाटक सादर करतात. सैन्याच्या कवायती, सराव, सेलेब्रेशन्स नव्हे तर थेट युद्ध सुद्धा रंगमंचावर सादर होते आणि ते अगदी बारकाव्यासकट अस्सल आहे. नाटकात आर्मीतील लोकांच्या पत्नी हा एकच घटक आलेला नाही, आणि त्याची कथानकात गरजही नाही.
एवढ्या संख्येने कलाकार स्टेजवर वावरत असले तरी त्यांच्यातील शिस्त वाखाणण्याजोगी आहे. पण तरीही हे नाटक
देशभक्तीपर नाही, तशी अपेक्षाही नसावी. ( नाटकाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत सादर करण्यात येते.)
या नाट्कात अनेक प्रसंग आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी सादर होतात पण त्यासाठी अजिबात ब्लॅक आऊट
केला जात नाही. आवश्यक ते सामान आणणे आणि नेपथ्यात किरकोळ बदल करणे हे नाटकातील कलाकारच
करतात, आणि तेही अगदी सहज होते.
त्यामूळे नेपथ्य थोडे अडचणीचे वाटू शकते, त्या शिवाय मी प्रयोग शिवाजी मंदिर ला बघितला, तिथले स्टेज मूळातच लहान आहे, त्यामूळे हे फार जाणवते.
शिवाय या लहान आकारामूळे आणखी काही तडजोडी कराव्या लागल्या ( असे नंतर नाटकातील एक कलाकार यांच्या बोलण्यातून कळले ) युद्ध प्रसंगात प्रकाशयोजना आणखी प्रभावी असायला हवी होती. इतर थिएटर मधे तशी होते, असे त्या कलाकार म्हणत होत्या.
या नाटकाने आणखी एक नवा पायंडा ( निदान माझ्या बघण्यात तरी ) पाडला असे दिसले. प्रयोग संपल्यावर मुक्ता
बर्वे सर्व कलाकारांची ओळख करुन देते. एरवी हे कलाकार प्रेक्षंकासमोर येत नाहीत.
मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर मुख्य भुमिकेत असले तरी प्रत्येक छोट्या भुमिकेतील कलाकार आपले काम चोख करतो, त्यामूळे हे नाटक पुर्ण टीमचे आहे.
सर्वांनी अवश्य बघावे असे नाटक आहे हे !
व्वा:!!! परीक्षण वाचून नाटक
व्वा:!!! परीक्षण वाचून नाटक बघायची उत्सुकता लागून राहिलीय.
नाटक बघायची उत्सुकता लागून
नाटक बघायची उत्सुकता लागून राहिलीय +१
या नाटकाचा प्रवास, मुक्ताच्याच शब्दांतः-
http://www.loksatta.com/manoranjan-news/mukta-barve-marathi-play-code-ma...
हो छान आहे हे नाटक. एकदम
हो छान आहे हे नाटक. एकदम वेगवान. कमांडोजच्या हालचाली पाहून रोमांचित व्हायला होतं. मुक्ताचा अभिनय लाजवाब. सर्वच अभिनेत्यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सेकंदासेकंदाच्या टायमिंगमुळे नाटक 'बघणं' हा एक आगळा अनुभव मिळतो.
शेवट फारसा आवडला नाही, पण एक वेगळा प्रयोग म्हणून नाटक मस्तच आहे. अवश्य बघा.
मागच्या आठवड्यात लोकसत्तात
मागच्या आठवड्यात लोकसत्तात मुक्ताचा लेख वाचल्यापासून उत्सुकता आहे. बघणार.
अतिशय सुंदर आहे हे नाटक !
अतिशय सुंदर आहे हे नाटक ! मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांची अभिनयाची जुगलबंदी पाहण्याजोगी आहे . सैन्यातील काही रीतींची ओळख होते .विशेषतः सैनिकांची ' अखेरची मानवंदना ' पाहताना भरून येते . मुक्ता सर्व कलाकारांची ओळख तर करून देतेच पण पडद्यामागील कलाकारांची ओळखही तितकेच महत्व देऊन देते .
विशेष म्हणजे मुलीलाही हे नाटक आवडले . प्रयोग संपल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट ही नाटकाला मिळालेली दादच आहे.
बघायला पाहिजे हे नाटक. हे
बघायला पाहिजे हे नाटक.

हे नाटक रविवारी बघितले.>>>>>>...दिनेशदा, आगमन झालं का?
खूप छान ओळख.
खूप छान ओळख.
हे नाटक गुजराथी मधून मराठी
हे नाटक गुजराथी मधून मराठी मधे आलेय. गुजराथी मधला प्रयोग बराच कानठळी असतो असे एका समीक्षकाने लिहिले आहे, त्या मानाने मराठीतला प्रयोग सुसह्य आहे. स्टेज मात्र मोठेच हवे.
मी या नाटकाची तिकिटे नेट वरुन क्रेडीट कार्डाने विकत घेतली होती, थिएटर वर गेल्यावर कळले कि तेच सीट नंबर दुसर्यांना दिलेत. एरवी मी वाद घातला असता, पण त्या सीटवर माझ्याच दहावीच्या वर्गशिक्षिका सौ. कमल बापट होत्या. आणि आता तर त्या माझ्या नातेवाईकही आहेत. मग काय, मला तर डबल बोनस.
अरे! हा धागा पाहिलाच
अरे! हा धागा पाहिलाच नव्हता.
नुकतंच हे नाटक पाहिलं. एक नाट्यानुभव म्हणून खूप आवडलं. ब्लॅक-आऊटस पूर्ण टाळल्यामुळे प्रेक्षकांना एक सेकंदही उसंत मिळत नाही. सर्वच कलाकारांचं को-ऑर्डिनेशन उत्तम आहे.
मोठ्या रंगमंचाचा मुद्दा पटला. गडकरी रंगायतनचं स्टेज मोठं/छोटं कसं मानलं जातं माहिती नाही; पण सेट जरा अडचणीचा वाटतो खरा. मी सेटवरची एकूण एक्झिट्स (विंगा) मोजण्याचा २-३दा प्रयत्न केला. पण नक्की मोजता आल्या नाहीत. नेहमीच्या पद्धतीने डावी-उजवीकडे ३-३ असतीलच असं ठामपणे म्हणता येणार नाही.
नाटकातल्या सैनिकांच्या शिस्तबद्ध आणि त्या-त्या प्रसंगी समर्पक आणि अचूक हालचाली पाहून आश्चर्य वाटत होतंच. त्याचा उलगडा कर्टन-कॉलच्या वेळी होतो.
कर्टन-कॉलही आवडला. असा खरं प्रत्येक नाटकाचा व्हायला हवा.