निर्मिती

Submitted by फूल on 28 September, 2016 - 06:07

रेघ पुसटशी उठली जेव्हा आत,
उच्चारही वाटे रेघे त्या दुखवेल.
भीती वाटली विरून जाईल रेघ
पण रेघेलाही पंख उमटले दोन.

हलकेच उमटला मन:पटावर पक्षी
पण पकडू जाता विस्कटेल ही नक्षी.
हळूवार फिरविला विचार त्या पंखांवर
अन वाढू लागला पक्षाचा त्या वावर.

मग दिसू लागले दो पक्षांचे घरटे
अन फिरू लागले उत्त्पत्तीचे वारे.
ही तगमग सारी असो कवीची कवीला
पण अशीच घडते आणि उतरते कविता.

कप्प्यात मनाच्या कविता उलगडताना,
शब्दातीत सारे शब्दरूप होताना,
कधी येईल कविता शब्दवती होउन?
मी अशीच राहीन कर निढळी घेउन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मस्त आहे. आवडली.
कितीतरी लोकांकडून कसं स्फुरतं या प्रश्नाच उत्तर ऐकलं आहे, पण ह्याच्या इतकं सुंदर कोणी सांगतलेल आठवत नाही. मस्त.