फ्री...? : भाग ०

Submitted by पायस on 26 September, 2016 - 22:07

२६ मार्च १९११
कलकत्ता, ब्रिटिश इंडिया

सकाळचा चहा-नाश्ता घेऊन अ‍ॅलेक्सीने बेडरूम मध्ये प्रवेश केला. त्याने पहिल्यांदा आपल्या मालकाने डोक्यावर घेतलेले पांघरूण बाजूला केले. पडदे उघडून सूर्यप्रकाशाला वाट करून दिली. डोळ्यावर पहिली तिरीप येताच चुळबुळत ख्रिस्तोफरने डोळे उघडले. अ‍ॅलेक्सीच्या स्मितहास्याला उत्तरादाखल हसून तो उठून बसला.
"आजचा चहा सिलोन विथ ड्राईड मँगो लीव्हज. टी सेट वेजवुडचा आहे" बेडवर टेबल लावता लावता अ‍ॅलेक्सी बोलला.
"सनी साईड अप?" ख्रिस्तोफरने अंड्याकडे नजर टाकत विचारले.
"अर्थात. त्या सोबत सॉसेजेस मीडियम रेअर, टोस्ट, बेकन आणि ग्रिल्ड टोमॅटोज विथ मशरूम्स."
ख्रिस्तोफरने चहाचा एक घोट घेतला व बेकन चावता चावता त्याने टोस्टला लोणी लावायला सुरुवात केली. अ‍ॅलेक्सीने त्याचा वॅलेट होता. वॅलेटच्या सर्व कामात तो निपुण होताच पण ख्रिस्तोफरने त्याला निवडण्याचे कारण होते त्याच्या हातची चव. या देशात अस्सल इंग्लिश ब्रेकफास्ट तयार करू शकणारा वॅलेट मिळणं कठीण होते.
"सर ब्रेकफास्ट झाला कि बाथ तयार आहे.. मी सूट काढून ठेवतो. आपल्याला लगेच ट्रेनने बॉम्बेला पोचणे अपेक्षित आहे. मी तिकिटे काढण्याची व्यवस्था केली आहे."
व्हॉट? ख्रिसच्या डोक्यात आज विश्रांती होती. रविवार आणि सध्या फारसे काम नाही या दोन्ही कंडिशन्स जुळून आल्याने त्याच्या अंगात आळसही होता. पण वरकरणी काही न दाखवता त्याने कारण विचारले?
"आय बेग युवर पार्डन टू इन्फॉर्म यू ऑन सच शॉर्ट नोटिस पण आज पहाटेच एक टेलिग्राफ आला आहे. लॉर्ड मॅक्सवेल यांनी तुम्हाला बोलवून घेतले आहे." आपल्या तरुण मालकाला या अचानक आलेल्या कामामागे कोणी मोठी व्यक्ती असल्याची जाणीव करून देणे अ‍ॅलेक्सीला भाग होते.
ख्रिसने खांदे उडवले व अ‍ॅलेक्सीला जाण्याचा इशारा केला. तो विचारात पडला. या म्हातार्‍याचे आपल्याकडे काय काम असेल?

*****

सन १९११ ला भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. पंचम जॉर्ज याच वर्षी ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट झाला. याच वर्षी बंगालची फाळणी मागे घेण्यात आली. याच वर्षी मोहन बागानने ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंटला पराभूत करण्याचा पराक्रम केला. याच वर्षी बिहारमध्ये टाटांनी पहिली स्टील मिल सुरु केली आणि याच वर्षी, डिसेंबर १९११ मध्ये दिल्ली दरबार भरला. अशा महत्त्वपूर्ण वर्षातला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे २२ मार्च १९११. या दिवशी शाही आदेशानुसार संपूर्ण भारताला कळवण्यात आले कि त्यांचा सत्ताधीश, हिज हायनेस राजे पंचम जॉर्ज व हर हायनेस राणी मेरी हे भारताला डिसेंबर मध्ये भेट देतील. त्यांच्या राज्यारोहण सोहळ्यानिमित्त खास दरबार दिल्लीत भरवला जाईल. यापूर्वीही दोन 'दिल्ली दरबार' होऊन गेले होते. १८७७ मध्ये राणी व्हिक्टोरियाने कंपनी कडून भारताचा कारभार स्वीकारण्याच्या निमित्ताने पहिला दरबार भरला होता तो व्हाईसरॉय लिटनच्या अध्यक्षतेखाली. तर १९०३ मध्ये सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणाच्या निमित्त लॉर्ड कर्झन, तेव्हाचा व्हाईसरॉय, याने दोन आठवडे चाललेला भव्य सोहळा आयोजित केला होता. पण या दोन्ही दरबारात एक कमी होती. दोन्ही दरबारात राजा व राणी दोघेही अनुपस्थित होते.
बट नॉट धिस टाईम सर. १९११ चा दरबार म्हणून खर्‍या अर्थाने शाही दरबार असणार होता व व्हाईसरॉय हार्डिंग्ज हा दरबार यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्नांत कुठलीही कमी करणार नाही याबाबत कसलीही शंका नव्हती. चार्ल्स हार्डिंग्जला व्हाईसरॉय म्हणून जेमतेम एक वर्ष झाले होते. गेल्याच वर्षी बॅरन म्हणून त्याची नेमणूक करून त्याला अर्ल मिंटोच्या जागी व्हाईसरॉय बनवण्यात आले होते. मोर्ले-मिंटो सुधारणांमुळे तुलनेने चळवळीही थंडावल्या होत्या व बंगालची फाळणी रद्द करण्याचा विचार बोलून दाखवल्यामुळे एकंदरीत हार्डिंग्जसमोर फारशा समस्या दिसत तरी नव्हत्या.
लॉर्ड मॅक्सवेलच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे मात्र याला दुजोरा देत नव्हते. सर हेन्री मॅक्सवेल हे हार्डिंग्जच्या मर्जीतल्या माणसांपैकी एक होते. बॉम्बे प्रेसिडेन्सीत त्यांच्याइतका प्रभावशाली व्यक्ती सापडणे कठीण होते. पण सर मॅक्सवेल राजकारणातल्या इतर सोंगट्यापेक्षा अधिक महत्त्वाचा मोहरा होता. ते एस एस बी चे ब्रिटिश इंडिया शाखेचे प्रमुख होते. एस एस बी म्हणजेच सीक्रेट सर्व्हिस ब्युरो. १९०९ मध्ये जर्मन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या या संघटनेचे महत्त्व पुढील वर्षांमध्ये अधिकच वाढणार होते.
"ख्रिस्तोफर काल्डवेल आलेले आहेत सर. त्यांना लायब्ररीत थांबवले आहे." सर मॅक्सवेल यांची तंद्री भंगली. थोड्याच वेळात ते लायब्ररीत होते. ख्रिसने स्मितहास्य करत हस्तांदोलन केले. चहा, बिस्किटे ठेवून नोकर निघून गेला. ती लायब्ररी आता एकप्रकारचा खलबतखानाच होती जणू. चहाचा पहिला घोट घेताच तो उद्गारला "अर्ल ग्रे"
"अ‍ॅज ऑलवेज, गो विथ द क्लासिक माय डियर"
ख्रिस मात्र अर्ल ग्रेच्या चवीच्या फारशा प्रेमात नव्हता. त्याने सहज नजर फिरवली तर कोणत्याही इंग्लिश लॉर्डला शोभेल अशी ती लायब्ररी होती. जमिनीवर अत्यंत आलिशान असा गालिचा होता. त्यांच्या समोर ठेवलेला स्टर्लिंग कंपनीचा सिल्व्हर टी सेट म्हातार्‍याच्या खास इंग्लिश आवडीचा आणखी एक पुरावा होता. पण अशा काही गोष्टी वगळता त्या खोलीविषयी ख्रिसचे मत स्पष्ट होते - बोरिंग!! मळखाऊ रंगसंगती, सर्व पुस्तके राजकारण व समाजकारण इ. बोजड विषयांशी संबंधित. किमान साईन ऑफ फोर बाळगायला काय हरकत आहे असा ख्रिसचा प्रामाणिक प्रश्न होता. त्यावर,
"रीड शेक्सपीयर माय बॉय. दॅट्स ऑल यू नीड टू रीड!"
दोघेही एकमेकांना काही क्षण निरखून बघत राहिले. ख्रिस्तोफर काल्डवेल! तिशीत प्रवेश करून त्याला काही महिनेच झाले होते. भुरे डोळे, काळे केस, किंचित तांबूस वर्ण. अंगकाठी तशी बारीकच, बघून कोणाला चटकन हा फाईट करू शकेल असे वाटले नसते. अत्यंत देखणा चेहरा; लंडनमधल्या अनेक तरुणी त्याच्यावर फिदा होत्या. तर हेन्री मॅक्सवेल त्याच्यापेक्षा वयाने दुप्पटीपेक्षा जास्त होते. चंदेरी केस, निळे डोळे, डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा, हातात हस्तिदंती मुठीची काठी, हातांनी तिच्याशी चाळा चालवलेला. गोर्‍यापान चेहर्‍यावर आता सुरकुत्या दिसत असल्या तरी तो प्रत्यक्ष वयाच्या ५ वर्षे कमीच दाखवत होता. घसा खाकरून अखेर त्यांनी बोलायला सुरुवात केली,
"कलकत्ता काय म्हणतंय?"
"सध्या शांत आहे पण लक्ष देणं गरजेचं आहे. इकडच्या तुलनेत तिथे उंदीर जास्त आहेत."
"दॅट्स व्हाय आय असाईन्ड माय कॅट देअर" मॅक्सवेल हसून उत्तरले.
"मग या बोक्याला परत का बोलावून घेतलं आहे?"
उत्तरादाखल ख्रिसला एक कागद मिळाला. ते एक रेखाचित्र होते. गोल चेहर्‍याच्या पन्नाशीतल्या कोणा पुरुषाचे ते चित्र होते.
"जर्मन?"
"गुड. कसं ओळखलंस?"
"जबडा व नाक जरा जास्तच मोठे दिसत आहेत. त्यात तुम्ही मला एवढ्या घाईगडबडीत बोलावून घेतलंत. मला त्रास देणारी व्यक्ती मग जर्मनी सोडून इतर कुठून आली असेल असं मला वाटत तरी नाही."
कधी नव्हे ते हेन्री मनापासून हसले. "खरं आहे तुझं. कैसरचे लोक अगदी अर्ल अ‍ॅस्क्विथ यांची झोप उडवू शकतात तर तुला त्रास देणं त्यांच्यासाठी फारच सोप्पं काम आहे. याचं नाव आहे बर्थोल्ट होनेस. पेशाने प्रोफेसर म्हणू शकतोस. गेली अनेक वर्षे भारतात येऊन जाऊन आहे, संस्कृतचा अभ्यासक म्हणून पूना व बॉम्बे मध्ये वास्तव्य केलेले आहे. अर्थात आपल्या नजरेत गेल्या काही वर्षात भरला."
"मग याने असं काय विशेष केलं कि तुम्हाला मला बोलावून घ्यायची गरज भासावी?"
मॅक्सवेल यांचा चेहरा गंभीर झाला. "बर्थोल्ट होनेस आता या जगात नाही. ही वॉज किल्ड."

~*~*~*~*~

विसाव्या शतकाचं पहिलं दशक म्हणजे धामधुमीचा काळ होता. या काळात अनेक राजकीय करार झाले. अनेक युद्धेही झाली. यात काही निकाल धक्कादायक होते - रशियाचा जपानकडून झालेला पराभव. तर काही निकाल दूरगामी परिणाम करणारे होते - बाल्कन देशांमधली कोणतीही उलथापालथ. पण या सर्वांमध्ये एक घटनेचा उल्लेख सर्वात आधी झाला पाहिजे, १९०५ चा मोरोक्कन क्रायसिस. जर्मनीने मोरोक्कोच्या सुलतानाला त्याचा सार्वभौमत्वाचा अधिकार मिळवून देत असल्याची बतावणी करत फ्रान्सचा वरचष्मा संपवण्याचा प्रयत्न केला होता. जवळ जवळ वर्षभर चाललेल्या या वादाचे पर्यवसन सुदैवाने युद्धात झाले नाही पण याने एक महत्त्वपूर्ण माहिती जगासमोर आली. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी आपापसातले पूर्वीचे वाद मागे टाकले होते व त्यांच्या युतीला जवळपास सर्व युरोपचा पाठिंबा होता. जर्मनी एकाकी होती.
ब्रिटनने फ्रान्सला मित्रराष्ट्र म्हणून निवडण्याची कारणे स्पष्ट होती. जर्मनी औद्योगिक क्षेत्रांत धडाक्याने प्रगती करत होती आणि लवकरच ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती होती. पण तरीही युद्ध पेटलेच तर फ्रान्स व रशिया हे अधिक प्रबळ मित्र ठरतील असा लंडनचा अंदाज होता.
"बाय जोव्हज दे डोन्ट स्टॉप टू बॅफल मी" ख्रिस तो आवाज ऐकून भानावर आला. खरं म्हटलं तर तो जरा कंटाळलाच होता. जेव्हा त्याला सांगितले गेले कि हा तपास तो एकटा करणार नसून त्याच्या सोबत जोसेफ असेल तेव्हा तो काहीसा वैतागला. जोसेफ पॅक्स्टन - ख्रिसपेक्षा वयाने ३-४ वर्षे मोठा स्कॉटिश तरुण. भीमकाय, साडेसहा फूट उंच, तांबूस केस, करडे डोळे, गालावर जखमेचा व्रण व सिगार ओढण्याची सवय. अर्थात जोसेफला स्वतःला ख्रिसबरोबर काम करायची कल्पना पसंत होती अशातला भाग नाही. ख्रिसच्या मते जोसेफ हा एक कोंबडा होता. सदैव कलकलणारा कोंबडा! वाईनचा घोट घेत तो संभाषणात परत सहभागी झाला.
"त्यांना खरंच आपल्या मर्यादा कळत नाहीत. ग्रेट ब्रिटिश एम्पायरशी शत्रुत्व ओढवून घेणं हा अव्वल दर्जाचा मूर्खपणा आहे."
बघायला गेलं तर जर्मनीचं खरं भांडण फ्रान्सबरोबर होते पण बर्‍यापैकी किक बसलेल्या जोसेफला समजावण्याच्या फंदात हेन्री व ख्रिस दोघेही पडले नाहीत.
"बर्थोल्ट वर वर पाहता फक्त संस्कृतचा अभ्यासक दिसतोय." ख्रिसने समोरचे कागद चाळता चाळता बोलायला सुरुवात केली. जोसेफने त्या दोघांची रजा घेतली होती. तो या प्रकरणात ख्रिसच्या थोडं आधीपासून लक्ष घालत असल्याने त्याला जास्त माहितीही होती. ख्रिसने त्यामुळे आधी शक्य तितका अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता.
"हम्म. भारतात फारसे जर्मन नाहीत. त्यामुळे त्या सगळ्यांवर लक्ष ठेवणं फार कठीण काम नाहीये. बर्थोल्ट जर्मन-ज्यू होता. बॉम्बे मध्ये ज्यूंची संख्या इतर प्रांतांपेक्षा बरीच जास्त आहे. त्याने बॉम्बेला आपलं घर बनवलं यात नवल काहीच नाही. पुण्याला इतर संस्कृत पंडितांची भेट घेण्याकरिता केलेला प्रवास वगळता तो फारसा कुठे गेल्याची नोंद तरी नाही."
"खूनाची पद्धत नक्कीच लक्षवेधी आहे. तो ज्या परिस्थितीत सापडला ती देखील इंटरेस्टिंग आहे पण एस एस बीने लक्ष घालावे एवढं या केसमध्ये काही खरंच विशेष आहे का? बॉम्बे पोलिस डिपार्टमेंट पुरेसे सक्षम आहे अशी माझी समजूत होती. पण आता असं दिसतंय कि एस एस बी ला पोलिसांची कामे पण करावी लागणार."
हेन्रींनी उत्तरादाखल दात विचकले. "जोसेफने एवढा निरुत्साह नाही दाखवला. तुला यात काहीच सनसनाटी नाही वाटत? तुझ्या आतल्या अन्वेषकाला यात काहीच आव्हान नाही दिसत?"
"मला काय वाटतं आणि काय दिसतं यापेक्षा मी कशात लक्ष घालणं अधिक महत्त्वाचे आहे याविषयी बोलूया काय?"
"ओह व्हाय नॉट माय लॅड. या प्रकरणात रस निर्माण व्हायचं कारण एक शब्द आहे. खरं तर एक पूर्ण शब्द पण नाही. तो शब्द उच्चारण्याची धडपड."
"कोणता शब्द?"
"फ्री.."

~*~*~*~*~

बर्थोल्ट होनेस. जर्मनांना पूर्वीपासून संस्कृतविषयी आकर्षण राहिले आहे. होनेस या आकर्षणाचा पाठपुरावा करत भारतात येऊन पोचला. तेव्हा युरोपीय व्यासपीठावर उघड उघड भांडणे नव्हती. जोवर तुम्ही व्यापारिक हिताच्या आड येणारी कोणती गोष्ट करत नसाल तोवर इंग्लिश लोकांना या एकांड्या जर्मनाबद्दल काही हरकत नव्हती. मग जवळ जवळ ३ दशकांपूर्वी तरुण बर्थोल्ट भारतात आला. अनपेक्षितरित्या त्याला तिथे ज्यू बांधव सापडले. इथे ज्यूंचा किमान उघडरित्या द्वेषही होत नव्हता. वर त्याची आवडती भाषा संस्कृत शिकण्याची संधी. अजून काय पाहिजे माणसाला?
एवढ्या वर्षात बर्थोल्ट आता बॉम्बेत रुळला होता. त्याची जर्मन हेल आता बरीचशी अदृश्य झाली होती. हळू हळू तो पूर्णपणे इंग्लिश बनत गेला. स्थानिकांना तर त्याच्यात आणि इंग्लिश साहेबात फार काही फरक कधी वाटलाच नव्हता - दोघेही त्यांच्यासाठी गोरेच. सुशिक्षित भारतीयांना त्याच्या पार्श्वभूमिविषयी थोडी कल्पना असल्याने ते थोडे जपून राहत असले तरी एकंदरीत त्याला चांगलीच वागणूक मिळाली. इथल्या समाजाशी जुळवून घेण्यात तर तो यशस्वी झाला होताच पण त्याच्यापुढे जाऊन आता तो ब्रिटिश पद्धतींच्या सोशल पार्ट्या, टी पार्ट्या इ. मध्ये पण जाऊ लागला होता. आज आरशापुढे उभा राहून तो त्या डिनर पार्टीसाठी तयार होत होता. इथल्या एका धनिक कुटुंबाने ही पार्टी आयोजित केली होती. निमित्तही खास होते. सम्राटांच्या राज्यारोहणाची बातमी आली होती. त्यात तो सोहळा इथे भारतात होणार होता. त्याला आधी थोडे विचित्र वाटले, एका जर्मनाला का आमंत्रण पाठवत आहात. पण उपस्थितांमध्ये बहुसंख्य ज्यू किंवा पारशी असतील हे कळल्यावर त्याची भीड थोडी चेपली. या दोन्ही लोकांशी बोलताना तो शक्यतो कचरत नसे. आताशा त्याला इथला टक्सीडोही आवडू लागला होता. नव्हे काय म्हणतात इंग्लिश लोक त्याला, हां डिनर जॅकेट. हातावर तेल घेऊन डोक्यावर जेवढे शिल्लक होते तेवढे केस त्याने चापून चोपून बसवले. बो टाय ला दोन्ही हातांनी धरून सारखे केले. दोन पावले मागं जाऊन पाहिलं. नेईन् उजवीकडे कलला. आरशाजवळ जाऊन किंचित पुढे वाकून परत बो सारखा केला. नेईन् आता डावीकडे कलला. अजून दोन तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर वैतागून त्याने आरशावर हलकेच हात टेकवला. त्याने चापून चोपून बसवलेले केस आता विस्कटले होते. बर्थोल्ट, आपण त्या गोष्टीवर नंतरही विचार करू शकतो. पार्टीला उशीरा जाणे योग्य ठरणार नाही.
त्याच वेळी इतर कोणी असता तर त्याला त्या बो टायमध्ये काहीही चूक जाणवली नसती.

*****

"तर शेवटचे मिस्टर होनेस इथे जिवंत दिसले होते?" ख्रिसने विचारले.
"येस सर. मिस्टर जुस्सावाला यांचे घरी हिज हायनेसच्या कोरोनेशनच्या घोषणे निमित्त एक छोटी डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. माझ्या माहितीनुसार इथे एकशे दहा पुरुष व एकशे तेहतीस स्रिया उपस्थित होत्या. तर सर्व्हंट्सची संख्या पंच्याऐंशी होती. त्यातले पाहुण्यांशी संवाद साधण्याची संधी असलेले छत्तीस." जोसेफला बोलण्याची संधी न देता अ‍ॅलेक्सीने घडाघडा माहिती सांगितली.
"अ‍ॅलेक्सी. याचा इतकाच अर्थ होतो कि ते छत्तीस या गुन्ह्याशी संबंधित असण्याची शक्यता अधिक आहे. उरलेल्यांना आपण अजून संशयाच्या घेर्‍यातून बाहेर काढलेले नाही."
"सर्टनली सर."
जोसेफ या द्वयीकडे बघतच राहिला. त्याच्या आ वासलेल्या चेहर्‍याकडे बघून ख्रिसने घसा खाकरला. त्याचा इंग्लिश संस्कृतीतला अर्थ स्पष्ट होता - यू आर कमिटिंग अ सोशल एरर मिस्टर पॅक्स्टन.
"पण हे सर्व कधी?..."
"तुला असं म्हणायचंय का कि माझा वॅलेट इतकंही करू शकत नाही?"
जोसेफला नेमकं याच कारणामुळे ख्रिस्तोफर अजिबात आवडत नसे. त्याला ख्रिसच्या बुद्धिमत्तेविषयी, त्याच्या क्षमतेविषयी तिळमात्र शंका नव्हती. त्याच्याकडे असलेला हा कसबी वॅलेट ते वलय अजून वाढवत असे. पण या होलीअर दॅन दाऊ स्वभावाशी जुळवून घ्यायला त्याच्या आतला स्कॉचमन तयार नव्हता. मुळात इथे तुला वॅलेटचे चोचले पाहिजेतच कशाला? त्यात ख्रिस्तोफर लंडनकर आणि जोसेफ ग्लास्वेजियन. कोणीतरी सर हेन्रींना विचारलेही होते कि या दोघांना एकत्र मॅनेज करताना ते डोक्यावर फिनलंडचा बर्फ ठेवतात का आईसलँडचा? त्यावर हेन्रींचे उत्तर - वेल, बुद्धिबळ खेळायला घोडा व हत्ती दोन्ही लागतात. जोसेफ हे उत्तर ऐकून एवढेच म्हणाला होता - ब्लडी ओल्ड गीझर.
त्यांच्याबरोबर एक सार्जंट देण्यात आला होता पण तो मुख्यत्वे काही गडबड झालीच तर अतिरिक्त ताकद असावी म्हणून दिलेला होता. अन्यथा जोसेफला त्याची उपस्थिती बिलकुल नामंजूर होती. मी असताना अतिरिक्त मनुष्यबळ लागलेच कसे? हे होईपर्यंत अ‍ॅलेक्सी दारावरची घंटा वाजवून मोकळा झाला होता. अत्यंत सावकाशपणे ते दार उघडले गेले.
दरवाज्यात उभी असलेली व्यक्ती साठीच्या पलीकडची असावी. त्याने लाल अंगरखा घातला होता व त्या अंगरख्यास सोन्याची बटणे होती. दाढी राखलेली होती तर केसांची झुलपे मानेवर रुळतील इतपत वाढलेली होती.
"येस?"
"गुड मॉर्निंग. मी मिस्टर पॅक्स्टन, हे मिस्टर काल्डवेल. आम्ही मिस्टर आर्देशीर जुस्सावाला यांना भेटायला आलो आहोत."
"मिस्टर पॅक्स्टन, मालक तुमचीच वाट बघत होते. प्लीज, माझ्यामागून या."
जुस्सावालांचे घर म्हणजे एक छोटेखानी महाल म्हणावा लागेल. ती दोन मजली वास्तू त्यांच्या श्रीमंतीचा दाखला पदोपदी देत होती. त्यांना दिवाणखान्यात सोफ्यांवर बसायला सांगून तो बटलर अदृश्य झाला. थोड्याच वेळात आर्देशीर प्रवेश करते झाले. नमस्कार, हाय हॅलो होते न होते तोवर मागून चहाही आलाच.
"दार्जिलिंग. वेलची आणि काळी मिरी" ख्रिस वासावरून ओळखत अनवधानाने बोलून गेला.
"तुम्हाला चहाची चांगली जाण दिसते मिस्टर काल्डवेल. मला स्वतःला मिरीने चवीला येणारा तो झटका आवडतो."
आर्देशीरनेच विषयाला हात घातला.
"तर मिस्टर काल्डवेल. तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे? मला जेवढे माहित होते ते सर्व मी मिस्टर पॅक्स्टन यांना सांगितलं आहे." या प्रश्नाच्या उत्तराबाबत जोसेफला कुतूहल होते. खूनी कोण याविषयी त्याच्या मनात फारशी शंका उरली नव्हती. फक्त त्या "फ्री"चे रहस्य सोडवायचे म्हणजे झाले. ते देखील त्याने त्याच्या मते सोडवले होते. पण भक्कम पुरावा नसल्याने तो काही करू शकत नव्हता.
"मिस्टर जुस्सावाला सर्वप्रथम तुम्हाला तसदी दिल्याबद्दल मी माफी मागतो. मला माहित आहे कि मिस्टर पॅक्स्टन माझ्या आधी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण त्यामुळेच त्यांची या प्रकरणाविषयी काही ठाम मते निर्माण झाली आहेत. ती बर्‍याच प्रमाणात बरोबर असतीलही पण मग मी नव्याने तपास करताना त्यांच्या पाऊलखुणांचा माग काढला तर साध्य काय होईल? तुम्ही या प्रेसिडेन्सीतील साम्राज्याच्या खास मित्रांपैकी आहात. मी तुम्हाला त्रास देत असेन तर मला क्षमा करा पण मला काही माहित नाही असे समजून पुन्हा नव्याने सर्व घटनाक्रम सांगू शकलात तर मी आपला आभारी असेन."
आर्देशीर यांनी ख्रिसला काही क्षण न्याहाळले. चहाचा आणखी एक घोट घेऊन कप खाली ठेवला.
"ठीक आहे. बर्थोल्ट होनेसशी माझी वैयक्तिक ओळख नाही. म्हणजे तशी तोंड ओळख आहे पण ती मुख्यत्वे तो ज्या कुटुंबासोबत राहतो त्यांच्यामार्फत. त्या कुटुंबाला मी चांगला ओळखतो. सुसंस्कृत लोक आहेत ते. त्यांचा याच्याशी काही संबंध असणे शक्य नाही."
"आणि आमचा तसा काही समजही नाही." जोसेफ मध्ये किंचित आवाज चढवून बोलला. ख्रिसने केवळ घसा खाकरला - सोशल एरर!
"मिस्टर पॅक्स्टन म्हणतात ते बरोबर आहे. होनेससोबत जे झाले ते दुर्दैवी होते आणि त्या कुटुंबाचा त्याच्याशी काही संबंध असेल असे इथे कोणालाच वाटत नाहीये. तुमच्याइतकेच मलाही या प्रकरणामागे दडलेले सत्य शोधून काढण्यात रस आहे. पण त्यासाठी आपल्याला जेवढी माहिती मिळेल तेवढी हवी आहे."

............
............
............

"मग?" जोसेफने बग्गीला काठीन चलण्याचा इशारा करता करता ख्रिसला विचारले.
"काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. होनेस एकंदरीत सरळमार्गी मनुष्य होता असं चित्र उभं राहतंय. आय कॅन इमॅजिन त्याच्या जर्मन-ज्यू पार्श्वभूमिमुळे आपण त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो."
"अ‍ॅन्ड इट फायनली पेड ऑफ. आर्देशीरनी सांगितले ते ऐकले ना? या माणसाशी बोलताना होनेसला आर्देशीरनी पाहिले होते."
ख्रिस त्या स्केचेसकडे बघत होता. एकात दाढी मिशा वाढलेला, कपाळाला भस्म फासलेला साधू तर दुसर्‍यात बोलर हॅट चढवलेला, क्लीन शेव्हन आंग्लाळलेला भारतीय तरुण. दोन्ही चित्रे पाहून पटकन कोणाला कळले नसते कि ही एकाच माणसाची चित्रे आहेत. ख्रिसच्या नजरेला दोन्हींत एक साम्य जाणवले जे पटकन लक्षात येत नव्हते. खूप खोल गेलेले डोळे. जरा लांबून पाहिले तर असे वाटावे कि काळ्या बाहुल्या त्या डोळ्यांना भरून राहिल्या आहेत.
"फणींद्र दत्त! बंगालात राहून, त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून तुला याची माहिती नसेल असं होऊच शकत नाही. आता 'फ्री..' चा आणखी काय अर्थ असू शकतो?"

~*~*~*~*~

या सर्वांच्या काही महिने आधी

सर्कसचा इतिहास तसा खूप जुना आहे. रोमन साम्राज्याच्या काळात मनोरंजनाच्या खेळांना सर्कसबरोबर साधर्म्य दाखवणारे स्वरुप प्राप्त झाले होते. अगदी ते घटकाभर जमेस नाही धरले तरी आज दिसणारी तंबूतील सर्कस पहिल्यांदा फिलिप अ‍ॅस्टलीने ४ एप्रिल १७६८ रोजी लंडनमध्ये सादर केली. अ‍ॅस्टलीच्या सर्कशीत अ‍ॅक्रोबॅट्स, विदूषक, हॉर्स ट्रिक्सचा समावेश होता. लंडनकरांना लवकरच अ‍ॅस्टलीच्या सर्कशीने वेड लावले. हे वेड आधी इंग्लंड मध्ये व नंतर अमेरिकेत पसरले. जॉन रिकेट्स या स्कॉटिश माणसाने पहिल्यांदा अमेरिकेत सर्कसचा प्रयोग केला. अगदी जॉर्ज वॉशिंग्टनने सुद्धा आवर्जून हजेरी लावली होती म्हणतात. म्हणा सर्कस आवडत नाही असे लोक सर्कस आवडणार्‍यांपेक्षा कमीच!
भारतात त्यामानाने सर्कशीचे लोण उशीरा आले. विष्णुपंत छत्र्यांनी जुसेप्पे किआरिनि (giuseppe chiarini) या इटालियन सर्कस चालकाचे आव्हान स्वीकारून १८८० मध्ये भारतीय सर्कशीची मुहूर्तमेढ रोवली. पण तरीही छत्र्यांची सर्कस अपवादात्मकच म्हणावी लागेल. विसाव्या शतकात हातावर मोजता येतील इतक्याच भारतीय सर्कशी होत्या.

..........
..........

उमाला यापैकी काहीही माहिती नव्हते. ती जेव्हा त्या तंबूंच्या कोंडाळ्यामध्ये उभी होती तेव्हा तिला फक्त आसरा मिळू शकेल अशी एक जागा दिसत होती. ती त्या परिसराचे निरीक्षण करत होती. चित्रविचित्र आवाज ऐकू येत असूनही 'हे काय नेहमीचं आहे' अशा भावाने तिथले लोक वावरत होते. नेमके कितीजण आहेत याचा तिला अंदाज येत नव्हता. जे कोण होते ते सामान्य नव्हते हे मात्र नक्की. तिला तिथपर्यंत घेऊन आलेला माणूस खवलेमांजर अंगाखांद्यावर खेळवत होता. एका तंबूतून सापांचे फूत्कार ऐकू येत होते. एक मुलगी अत्यंत लयबद्ध हालचाली करत तिच्या दिशेने येताना दिसली तेव्हा तिला क्षणभर वाटलं कि ठीक आहे एकजण तरी विचित्र नाही. पण तेवढ्यात त्या मुलीने आपली मान जवळ जवळ एकशे ऐंशी अंशात वळवली, मागे उभ्या असलेल्या कोणाशी तरी दोन शब्द बोलली आणि परत मान जागेवर आणून, उमाकडे बघून स्मित केले. 'नटराजा सर्कस' मधला पहिला दिवस उमासाठी धक्क्यांनी भरलेला होता.
तिला ज्या तंबूत आणून सोडले तिथे फक्त एक स्त्री व एक अत्यंत नाजूक चेहर्‍याचा मुलगा होता. ती स्त्री या सर्कसची मालक होती - मलिका. नटराजा सर्कसची ती खर्‍या अर्थाने मलिका होती. उमाने थोडक्यात आपला परिचय देऊन सर्कसमध्ये आसरा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
"भद्र हिच्या चेहर्‍यावर हा रुमाल का बांधला आहे?"
"मलिका हिचा चेहराच सर्कससाठी हिला योग्य बनवतो. हिला अनेक खेळात वापरता येईल. त्याबदल्यात हिला आसरा देणे माझ्यामते योग्य ठरेल."
असे म्हणून त्याने हलकेच तो रेशमी रुमाल बाजूला केला. मलिकाचे डोळे विस्फारले. मग तिच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर आली. तिने भद्राकडे पहात मूक संमती दिली. निश्चितच उमाला या सर्कसच्या खेळांमध्ये कुठे ना कुठे स्थान देता येण्यासारखे होते. उमाला एखाद्या पुरुषाला लाजवतील अशा टोकदार मिशा होत्या.
उमा भद्राबरोबर जेव्हा बाहेर पडली तेव्हा ती आनंदात होती. अखेर कुठेतरी तिच्यातल्या या वैगुण्याचा उपयोग होता. पण तिला त्या दुसर्‍या मुलाची नजर अस्वस्थ करून गेली. तो संपूर्ण वेळ मख्ख चेहर्‍याने उभा होता. जणू तो चेहरा त्याच्या मनावर बसवलेला नक्षीदार लोखंडी दरवाजा होता. त्याचे भाव तिला अजिबात वाचता आले नाहीत.

~*~*~*~*~

अ‍ॅलेक्सीने डेजर्टसाठी कॅबिनेट पुडिंग आणले. ख्रिसची स्वतःची पसंत ब्लूबेरीजची होती पण सहज उपलब्ध म्हणून अ‍ॅलेक्सीने द्राक्षे व मनुका वापरल्या. हा प्रकारही ख्रिसला आवडला. खाता खाता अ‍ॅलेक्सीबरोबर त्याने आज गोळा केलेल्या माहितीची उजळणी करायला सुरुवात केली.
"बर्थोल्ट त्या दिवशी सकाळी घराबाहेर पडला तो थेट रात्री परतला. आधी भरपेट नाश्ता करून तो एक सर्कस पाहायला गेलेला. नटराजा सर्कस म्हणून कुठलीशी भारतीय सर्कस आहे. काही वेळ रेंगाळला तिथेच आणि मग बाहेर पडला."
"ती सर्कस आता कुठे आहे?"
"ती बॉम्बेतून बाहेर पडली."
"तिचा पत्ता लाव. जोसेफने बहुतेक हा धागा अजून पूर्णपणे तपासून पाहिला नसणार."
"अ‍ॅज यू से, सर"
"जोसेफ त्याच्या फणींद्र थिअरीवर गरजेपेक्षा जास्त फर्म आहे. फ्री... चे अनेक अर्थ निघू शकतात. अ‍ॅलेक्सी?"
"सर?"
"मोअर पुडिंग"
"व्हेरी गुड, सर"
"आणि अ‍ॅलेक्सी...."
"कंटिन्यू विद द स्टोरी? सर?"

*****

बर्थोल्ट डिनर पार्टीतून बाहेर पडताना थोडासा घाबरलेला होता. फणींद्रला त्या पार्टीत येण्याचे आमंत्रण कसे मिळाले हा त्याच्यासाठी एक मोठाच प्रश्न होता. जेव्हा आर्देशीरना फणींद्रविषयी शंका आली आणि त्यांनी त्याच्याकडे आमंत्रण आहे का याची तपासणी करविली - सरप्राईज सरप्राईज! फणींद्रकडे आमंत्रणपत्रिका होती. वेल, या लोकांना कमी लेखून चालणार नाही. हा त्यांचा देश आहे आणि त्यांच्याच देशात त्यांच्या ओळखी नसतील? बर्थोल्टला वैयक्तिक पातळीवर फणींद्र व त्याच्या संघटनेबद्दल आदरच होता. पण साध्याइतकेच साधनही महत्त्वाचे नाही का?
विचारांच्या तंद्रीत चालता चालता त्याला ती त्याला दिसली. ती खरंच येईल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. तिचा चेहरा दिसत नव्हता, डोक्यावरून तो कपडा घेतलाय तिने, पदर म्हणतात आय गेस इथले लोक, जे काही असो. रात्रीच्या अंधारात तसेही नीट दिसत नाहीये. पण ती आलीये. मी तिला ओळखलंय.

*****

"सो अखेरचे त्याला त्या मुलीबरोबर पाहिले?"
"येस सर. तो ज्या परिवारासोबत राहतो त्यांनी त्याला एका डोक्यावरून पदर घेतलेल्या मुलीला सोबत घेऊन रात्री परतताना पाहिले. तो सर्व सकाळी सांगतो म्हणून तिला वरच्या मजल्यावर त्याची खोली आहे तिथे घेऊन गेला."
"ओके. आपण उद्या तिथे जात आहोत. त्या मुलीला पाहिलेल्या सगळ्यांना भेटण्याची व्यवस्था कर."
"मी मिस्टर पॅक्स्टनशी बोलून व्यवस्था करतो, सर"
"गुड. पुढे?"
"रात्री कधीतरी, नक्की वेळ त्यापैकी कोणाला सांगता आली नाही कारण ते गोंधळून गेले होते. पण रात्री उशीरा त्यांना मिस्टर होनेसच्या किंचाळ्या ऐकू आल्या. वर जाऊन पाहिले तर मिस्टर होनेस रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि मुश्किलीने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होते. मिस्टर होनेसने मोठ्या प्रयासाने खिडकीकडे बोट दाखवले व काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला."

......
......
......

"फ्री ...... फ्री ...... फ्र... इ......"

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60399

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! एकदम स्वातंत्रपूर्व काळातलं कथानक . ते ही इतक्या रोचक पद्धतीने मांडलेलं.

पुढच्या भागाला उशीर लावू नका प्लिज

सही सुरुवात केली आहे. Happy एवढ डिट्टेलवार कस लिहता हो तुम्ही ??? एक एक पात्र डोळ्यासमोर उभे राहिले.
पुढचा भाग वाचायला उत्सुक.

पायस, तुझं नाव बघितलं आणि लग्गेच वाचायला घेतली!

नेहमीप्रमाणेच फॅन्टॅस्टिक झालंय लेखन!

स्टोरी इंटरेस्टिंग वाटतेय!

क्रमशः असल्याने वाचलं नाही. डोक्याला भुंगा लागतो खुप.
सध्या अश्या बर्‍याच अर्धवट कथांचा भुंगा आहे डोक्याला. त्यात अजून एकाची भर नको.
प्लीज कथा लवकर लवकर पूर्ण करा म्हणजे सलग वाचता येईल.

सर्वांना धन्यवाद! Happy

थोडे क्रमशः विषयी -
ही कथा बरीच दीर्घ असणार आहे. आता माझा लिखाणाचा वेग (:हाहा:) धन्य असल्याने क्रमशः गेल्या दोन्ही दीर्घकथांमध्ये सोसावे लागले होते. यावर माझा आत्ताचा तोडगा असा आहे - साप्ताहिक मालिका. या कथेचा नवीन भाग दर सोमवारी येईल. (येथील सोमवारी - भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवार रात्र ते मंगळवार सकाळ). मध्ये मध्ये काही एक्स्ट्रॉ फीचर्स मी टाकत राहीन. जसे,

अ‍ॅलेक्सीचे कॅबिनेट पुडिंग :
अ‍ॅलेक्सी तुझं पुडिंग इतरांनाही खायला मिळायला पाहिजे. त्याशिवाय तू किती चांगला कूक आहेस कोणालाही कळणार नाही.
अ‍ॅज यू से, सर
डियर माबोकर्स. उत्तम पुडिंग बनवण्यासाठी उत्तम साहित्य असणे आवश्यक आहे. चांगल्या प्रतीचे साहित्य नसेल तर तुमचे पुडिंग जणू थेम्स शिवाय लंडन!
साहित्य :
१ १/२ औस पाकात मुरवलेल्या संत्र्याच्या साली (कँडीड पील)
४ औस द्राक्षे (ब्लूबेरीज किंवा गूजबेरीजही चालतील. मिस्टर काल्डवेल ब्लूबेरीजला प्राधान्य देतात)
स्पंज केक (नसेल तर सॅव्हॉय केक किंवा फ्रेंच रोल चालेल.)
.....
सीरियसली अ‍ॅलेक्सी प्रत्येक गोष्टीला पर्याय देणार आहेस तू?
सर?
ओह्ह, लीव्ह इट
व्हेरी वेल, सर
.....
४ अंडी
१ पाईंट दूध
लिंबाची साल (लेमन रिंड, जस्ट अ लिटल. इथे व्हॅनिला बीन्स किंवा बदामाचे कापही वापरू शकता.)
अगदी छोटा जायफळाचा तुकडा (किसून, आवडीनुसार)
३ टेबलस्पून साखर
बटर

कृती :
उत्तम पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या दर्जाचा साचा हवा. असा साचा तुम्हाला सहज बेकिंगच्या सामानाच्या दुकानात मिळून जाईल.
प्रथम बटर वितळवून घ्या. संपूर्ण साच्याला बटर लावून घ्या. संत्र्याच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करा. ते साच्यात मध्य भागी ठेवा. आता केकचे थोडे तुकडे मग वरून द्राक्षे/बेरी असे थरावर थर रचत जा. प्रत्येक थरानंतर केकवर थोडे बटर लावा. साचा जवळ जवळ पूर्ण भरू द्या (थोडी जागा असू द्या).
एका बाऊल मध्ये दूध घ्या. त्यात जायफळ, लेमन रिंड व साखर घाला. आता यात व्यवस्थित फेटून घेतलेली अंडी मिसळा. हे मिश्रण ४ ते ५ वेळा नीट फेटा. आता हे मिश्रण साच्यात ओता व बटर पेपरने झाकून दोन तास तो साचा तसाच ठेवून द्या. दोन तासांपेक्षा कमी वेळ ठेवलात तरी हरकत नाही पण मग तो इंटेन्स फ्लेवर येणार नाही.
आता एका भांड्यात पाणी उकळा. बटर पेपर काढून एका स्वच्छ कपड्याने साच्याचे तोंड बंद करा व तो उकळत्या पाण्यात ठेवा. जितकं हळू हळू तुम्ही पुडिंगची उकड काढाल तेवढे ते चविष्ट बनेल. (माझं रिकमेंडेशन १ तास)
यानंतर एक मिनिट पाण्याबाहेर काढून किंचित थंड होऊ द्या. आता कापड काढून लगेच सर्व्हिंग बाऊलमध्ये पुडिंग काढून घ्या. क्रिम, मनुका अथवा स्वीट सॉसने सजवा. गरमागरम सर्व्ह करा.

५-६ जणांसाठी पुरेल.
तयारी वेळ - २ तास. कृती वेळ - १ तास.
साच्याची किंमत - १ शिलिंग. साहित्याची किंमत - १ शिलिंग ३ पेनी

अ‍ॅलेक्सी,
सर?
या किंमती १९११ मध्ये आहेत. आता २०१६ चालू आहे.
ओह. नाऊ सर?
अ‍ॅलेक्सी?
सर?
दॅट विल बी ऑल फॉर टूडे
व्हेरी वेल, सर

जबराट....पहिल्याच भागात तुमच्या लिखाणावर फिदा झालो....

पुडींगची पाककृती पण कडक....

सलाम घ्यावा....

आणि कुठून वाचलं असं झालं, आता पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघणे आले....

पायसा _/\_

भाग ० जबरीच झालेला आहे पण पुडींग ची पाककृती म्हणजे अगदी चेरी ऑन द टॉप आहे !!

फुकट मिळतेय ते वाचायला पण पेशन्स नाहीत असा प्रश्न विचारालाय काय पुडिंग रेसिपी टाकून? Light 1

सुरुवात जबराट. पुभाप्र.

वा! मस्त रोचक सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणेच ही कादंबरीदेखिल उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही. त्यामुळे उत्सुकतेनं पुढच्या भागांची वाट पहात आहे.

पायस ... पाकृ आणि अशा इतर अ‍ॅडिशन्सची कल्पना केवळ महान!

ही अशा पद्धतीची पहिली कादंबरी असेल आणि इंटरअ‍ॅक्टिव्हही ठरेल.

फुकट मिळतेय ते वाचायला पण पेशन्स नाहीत असा प्रश्न विचारालाय काय पुडिंग रेसिपी टाकून?

>> हे माझ्यासाठी होते का? मी त्यांना क्रमशः लिहूच नका असे म्हटलेले नाहीये.
मी फक्त मी सगळे भाग एकदम वाचून प्रतिक्रिया देईन असे सांगितले आहे.

Pages