प्राण्यांचे अदभुत अनुभव - 1

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 August, 2016 - 06:34

प्राण्यांचे अदभुत अनुभव - १

*चा वट वाघूळ* (फक्त प्रौढांसाठी)

लहानपणापासून रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचे खेळ बरेच पाहिले. आपण सर्वांनीच पाहिले असतील. ते ना कपडे घालतात, ना त्यांना कसली जनाची मनाची लाज असते. शरीरधर्म पाळायचा मोह झाला की बस्स तो पाळायचा, एवढेच त्यांना ठाऊक असते. अश्यावेळी मग एकमेकांत अडकलेली कुत्र्यांची जोडी बघताना कळत्या वयात खुदूखुदू हसायला यायचे. तर थोडे मोठे झाल्यावर ते ऑकवर्ड वाटू लागायचे. मग सुसंस्कृतपणाची झूल अंगावर पांघरणारे मानव त्यांना कसे वेगळे करता येईल हेच बघायचा. काहीवेळा दगडी मारून, तर काही वेळा घासलेट ओतण्यासारखे क्रूर प्रकार अवलंबवायचा. पण त्यांचे काही सुखाने चारचौघांसमोर होऊ द्यायचा नाही. भले अश्यावेळी मानवासारखा तुच्छ प्राणी त्यांच्या खिजगिणतीतही नसला तरी तो त्यांना आपले अस्तित्व जाणवून द्यायचा.

पुढे थोडे आणखी मोठे झालो तसे डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर विविध प्राणीजातींचे संभोग दाखवतात अशी खबर आम्हाला लागली. तेवढ्यासाठीच मग उलटसुलट डिस्कवरी चॅनेल बघितला गेला. थोडेफार बघायला मिळालेही. पण त्यात माणसांच्या पॉर्नसारखी गंमत नसल्याने कधी चटक लागली नाही. एखाद्या प्राण्याबाबत कुतूहल क्षमले की त्यावर काट मारायचो. पुन्हा काही त्याला बघणे व्हायचे नाही. आपण अमुकतमुक प्राण्याच्या रतिक्रिडा पाहिल्यात वगैरे फुशारक्या मारत आमच्या चर्चाही झडायच्या. एकंदरीतच या सर्वामुळे किशोर वयातच आमच्यातील सुप्त कुतूहल मिटले होते.

त्यानंतर कॉलेजला असताना जो थोडाबहुत हॉस्टेल लाईफचा अनुभव घेतलाय तितका वेळ त्या हॉस्टेलरूमच्या खिडकीतून कबूतरांचाही अनुभव घेतलाय. अक्षरशा बघून बघून आपल्यालाच वीट यावा ईतके त्यांचे चालायचे. यांना काही कामधंदे नसतात का? पोटाची खळगी जशी रोज दोन वेळा भरावी लागते तेच यांचे शरीराच्या भूकेबाबतही होते का? कबूतर हे शांतीचे प्रतीक आहे की संभोगाचे प्रतीक आहे? असे प्रश्न रोज पडायचे. वासूगिरी करणारया पोरांना "पावसाळी कबूतर, जंगली कबूतर, रंगीला कबूतर" अश्या नावांनी चिडवले जायचे. फ्लर्टींग, स्त्रीलंपटपणा, लाळघोटेपणा, या सर्वांनाच मिळून गुटरगू करणे हा आमचा परवलीचा शब्द झाला होता. तर भांडण करताना 'तुला पुढचा जन्म कबूतराचा मिळावा' असे शाप आम्ही एकमेकांना द्यायचो. काही महाभाग तो शाप देखील आशिर्वाद समजून घ्यायचे ती गोष्ट वेगळी.

तर असो, ही झाली हलकीशी प्रस्तावना. आता धाग्यातील रोमॅन्चिक किस्स्याकडे वळूया..

परीक्षांचे दिवस होते. पेपरच्या आदल्या रात्री नाईट मारून ताजा ताजा अभ्यास करायचा आणि सकाळी ते डोक्यातून कापरासारखे उडून जायच्या आधी कागदावर छापायचे असा आमचा शिरस्ता असल्याने आम्ही कॉलेजमध्येच अभ्यासाला बसायचो. मी आणि माझा एक मित्र, ईतर गजबजाटापासून दूर एकाण्ताच्या शोधात स्टडीरूमपासून फारकत घेत क्लासरूमसमोरील पॅसेज, गॅलरी, बाल्कनी शोधून अभ्यासाला बसायचो. असेच त्या दिवशीही दुसरया माळ्यावरच्या एका कॉमन पॅसेजमध्ये फतकल मांडली होती. सिलॅबस खूप मोठा होता, डोक्यात काही शिरत नव्हते. आता पर्यंत जो अभ्यास झालाय तो पास होण्यास पुरेसा आहे की नाही हे काही उमजत नव्हते. आणखी नव्याने काही वाचायचे की जे झालेय त्याचीच रिविजन करायची हे काही समजत नव्हते. याच द्विधा मनस्थितीत असताना अचानक उडत्या तबकडीसारखे काहीतरी येऊन आमच्या शेजारी आदळले. आम्ही दोघेही दचकून दोन फूट मागे उडालो. आधी कोणीतरी दगड फेकला की काय असे वाटले. पण दगड असता तर टणटण उडत पुढवर गेला असता. ती वस्तू जिथे आदळली तिथेच थांबली. थोडावेळ निरखून पाहिले असता त्यात हालचाल दिसली. सजीवांचे तिसरे लक्षण. पण ते जे काही होते ते अवलक्षण होते हे आम्हाला नंतर कळले. हळूहळू हिंमत करत जवळ जाऊन बघितले. तर तो एक वटवाघूळ होता. आश्चर्य वाटण्यासारखे यात काही नव्हते, कारण कॉलेज परीसरात ऊंचच उंच झाडे आणि त्यांना लटकलेली वटवाघळे हे परीचयाचे द्रुश्य होते. तर, वटवाघूळ हा पक्षी आजवर कोण्या माणसाला चावल्याची केस ऐकली नसल्याने थोडे आणखी पुढे जायची हिंमत केली. तेव्हा समजले की तो एक वटवाघूळ नसून ती दोन वटवाघूळं होती. एकावर एक निपचित पडली होती. नव्हे किंचितशी हालचाल करत होती. उताणे झोपून श्वास घेताना छाती वर खाली व्हावी ईतकीच हालचाल. वटवाघूळांमध्ये नर मादी ओळखता यावे एवढे सायन्स आमच्या स्कूलमध्ये शिकवले नव्हते. पण तरीही त्यांच्या त्या स्थितीवरून जो अंदाज बांधायचा तो आम्ही बांधलाच. थोडेसे त्यांना काडीने ढोमसले, थोडे कागदाचे बोळे मारून पाहिले. तरीही ते एकमेकांची पकड सोडायला तयार नव्हते. त्यांच्या या एकाग्रतेवरून ते कन्फर्मही झाले.

आता पुढे काय. त्यांना तसेच सोडून आम्ही तिथून जाऊही शकत नव्हतो. का ते नक्की सांगता येणार नाही. पण लहानपणी डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिलेल्या गंमतीजंमती एकमेकांना सांगणे एंजॉय करायचो तर ईथे काहीतरी दुर्मिळ घटना प्रत्यक्षात बघत होतो. मित्रांमध्ये नक्कीच भाव खाता यावे असा हा अनुभव होता. दुर्दैवाने आम्हा दोघांकडेही कॅमेरावाला मोबाईल नसल्याने त्याचे चित्रण करू शकत नव्हतो. आता कोणाच्या अश्या स्थितीचे चित्रण करणे योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक या वादात मला पडायचे नाहीये. पण टक लावून जितके निरीक्षण करता येईल तितके केले. अर्थात, त्यांना याने काही फरक पडणार नव्हताच. पण आमचा दुसरया दिवशी पेपर होता. एकीकडे आम्हाला रात्रभर घासून अभ्यास करायचा होता, आणि दुसरीकडे हे लोकं मात्र इथे मौजमजा करत आहेत, ही असूयेची भावना आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या क्रिडेत विघ्न आणावे असे बरेच वाटत होते, पण तसे केल्यास आपल्यालाही कधी काही मिळत नाही या अंधश्रद्धेविरुद्ध जायचे धाडसही होत नव्हते.

पुढे अर्धापाऊण तास झाला तरी त्यांची मिठी काही सुटत नव्हती. अखेर कंटाळून मग आम्हीच बसायची जागा बदलली. तरी सुरुवातीला दर दहा पंधरा मिनिटांनी आणि नंतर अर्ध्या अर्ध्या तासाने, झाले का आतातरी यांचे म्हणत, त्यांना बघणे होत होते. पण पुर्ण रात्रभर तीच आणि तेवढीच हालचाल. ना कमी ना जास्त. एकाच सूरात, एकाच लयीत. चालूच होते. वन नाईट स्टॅण्ड हि संकल्पना बहुधा वटवाघूळांवरूनच आली असावी. त्याजागी माणसांची जोडी असती तर कदाचित तासाभरातच घोरत पडली असती. एकंदरीतच रात्रीच्या अंधारात उडणारया त्या निरुपद्रवी किड्यांबद्दलचा आदर त्या रात्रीत भरमसाठ वाढला. दिवसभर काही न करता झाडाला तंगड्या लावून पडण्याचा त्यांना हक्कच आहे असे वाटू लागले. ना कसला गोंगाट, ना कसली गडबड, कबूतरांनीही आपला थिल्लरपणा सोडून त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे. नव्हे माणसांनाही शिकण्यासारखे बरेच काही आहे असेही वाटून गेले.

नंतर पहाटे कधीतरी ते जसे आले होते तसेच अचानक गायबले. आम्ही सकाळी ईतर मित्रांना घेऊन तिथे गेलो तर तिथे कसलाच लव लेश शिल्लक नव्हता. जणू तिथे काही घडलेच नाही अशी ती फरशी स्वच्छ होती. पण आमचे तारवटलेले डोळे आणि तरीही न झालेला अभ्यास पाहून मित्रांनी आमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला.

पुढे कित्येक परीक्षा आल्या आणि आम्ही कित्येक स्टडीनाईटस मारल्या. पण असे काही पुन्हा कधीच कोणालाच दिसले नाही. बहुधा ते आमच्याच नशीबी असावे जे ती जोडी रस्ता चुकून तिथे आली असावी.

--------------------

आजवर हा किस्सा मी अनेक जणांना सांगितला. मायबोलीवर टाकायला मात्र जरा संकोचत होतो. अखेर मनाचा हिय्या करून त्यात ठिय्या मांडून बसलेल्या या वटवाघळांच्या जोडीला आज कागदावर ऊतरवले. तरीही तोंडी किस्सा सांगण्यात जी मजा आहे ती अशी लिहून वाचण्यात नाही. कधी भेट झाली तर नक्कीच. पण तोपर्यंत तुमच्याकडेही असे प्राणीविश्वातले अदभूत किस्से असल्यास नक्की शेअर करा.. सुरुवात झालीय, तर लाजू नका Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच अद्भूत आहे हां अनुभव!

नागांचं मैथून सगळ्यात भारी असतं असं मला वाटतं.
आताही आठवलं तरी अंगावर काटा येतो.

एक दोन वेळा प्रत्यक्ष पाहिलंय.
पण ते लिहून काढण्याइतके तुझ्यासारखे सरस्वतीचे वरदान माझ्याकडे नाही.

वटवाघूळ म्हणजे प्राणी का पक्षी....
'तो' वटवाघूळ की 'ते' वटवाघूळ...

माहीत असून उत्तर नाही दिलेस तर पुढचा जन्म कबूतराचा मिळेल आणि
माहीत नसतानाही लेख पाडला असशील तर पुढचा जन्म वाघळाचा

चॉईस इस युवर्स Wink

बाकी

तरीही तोंडी किस्सा सांगण्यात जी मजा आहे ती अशी लिहून वाचण्यात नाही. हे अगदी बरोबर त्यामुळे पुढचे भाग ऑडियो पॉडकास्ट म्हणून तयार कर, लिहू नकोस. कृ. ध.

इंटरेस्टींग अनुभव ऋन्म्या
वटवाघळांचं इंटरेस्टिंग बिहेविअर

The bat is considered to be one of the slowest reproducing animals in the world.

With that in mind, it is possible for the actual mating process to take place in the fall. However, the female won’t release the sperm to meet with the eggs until some time in the spring. For other species though the mating and the sperm going to the eggs all occurs at the same time frame.

साती, @ सरस्वतीचे वरदान,
हो तर. म्हणूनच तर अश्या नाजूक विषयात पाय अडकवायचे धाडस करतो Happy

हर्पेन Proud
तो वटवाघूळ आणि ते वटवाघूळ दोन्ही ऐकायला छान वाटते.
तेच जर ईंग्लिशमध्ये गेलो तर त्याचे "ती बॅट" असे स्त्रीलिंगी होते.
एकंदरीत वटवाघूळ हा प्रकार उभयलिंगी असावा Happy

श्री, छान माहीती. हे मलाही माहीत नव्हते. आलेला अनुभव लिहिला पण गूगाळायचे फारसे कष्ट नेहमीसारखेच कधी घेतले नाहीत. पण घ्यायला हवेत. एवढे विविध जीव आहेत पृथ्वीतलावर, बरेच प्राण्यांची प्रजोत्पादन पद्धती रोचक असू शकते.

लहानपणी गावी गाई-बैल, घोडा, गाढव तर पावसाळ्यात बेडकांचे आजूबाजूला बघून इतकं काही अद्भुत वगैरे वाटायचं बंद झालं. तेव्हा आमचा गडी आम्हालाच हाकायचा की त्यांची निजायची वेळ आहे, व्हा बाजूला. Happy

डिस्कवरी चॅनल आधी पाहायचो, आता तर काय, युट्युब चिक्कार आहेत प्रत्येक प्राण्याचे.

अगदी बाळबोध शोध लागला असे वाटला लेख वाचून.
असो.

प्रामाणिकपणे नेहमी मला तुझे लिखाण आवडतेच असे नाही.
पण तरीही हे आवडले. मुळात लिहिण्याची पद्धत आवडली.
मॅच्युअर लेखकांच्या स्पर्धेत उतरतो आहेस की काय हे वाटून इतर प्रख्यात लेखकांना सावध करावे असे वाटू लागलेय. Light 1

लिखाण उत्तमच जमले आहे हे निर्विवाद पण विषय बाळबोध वाटला, कारण हे सगळे खेडेगावात लहानपण गेल्यापाई सतत दिसत असे, एखाद्या उबदार हिवाळी सकाळी आईने बंबातल्या गरम ऊन पाण्याने खसखस घासून अंघोळ घातली की च्यायला आधीच कानात कुईंsssss असा एक आवाज येत राही, त्यात मरगळलेले गाव, एकदम नशा आल्यागत अवस्था होई, त्याला इलाज म्हणून भाकरी तयार होऊस्तोवर गावच्याच बखळीत गोट्या/विटीदांडू खेळणे हे क्रमप्राप्त असे, ह्या बखळी म्हणजे म्हैस रेड्यांचे हनिमून रिसॉर्ट असत, दर दोन दिवसाआड कोणाच्यातरी म्हशीला रेडा द्यायचा उद्योग तिकडे कायम सुरु असायचा, रेडा उडायला कमी पडला की खवट हसत मालकाला "काय पाटील रेड्याच्या मलिद्यात कमी केलेली दिसते" म्हणणारे म्हैस मालक हे ही दृश्य असे बरेचवेळी, तिथून बाहेर पडले की अन भाद्रपद महिना असला तर कुठंतरी कुत्री दिसतच असत, वरती डॉक्टर सातींनी नागाच्या मिलनाबद्दल लिहिले आहे, त्यासंबंधी सांगायचे झाल्यास हे मिलन संथ असतेच शिवाय मिलन सुटल्यावर नागाचा अवयव बराच वेळ रेट्रॅक्ट होऊन मूळ स्थानी जात नाही अन शरीराबाहेर तसाच घसपटत असतो, अश्यावेळी नर (नाग) हा अतिशय थकलेला अन गलितगात्र असतो, अन माणसाच्या हातून मरायचा किंवा शिकारव्हायचा सर्वाधिक धोका असतो, आपले पूर्वज फार डोळस असत, हे पटते कारण नागाचे उत्कट अन अग्रेसीव मिलन पाहूनच बहुदा त्यांनी "नागदेवता" ही उर्वरता (फर्टिलिटी), सुबत्ता अन विरिलिटी सोबत संलग्न केली असावी.

असो, कॉमेंट जरा विस्कळीतच झाली आहे, पण वाटेल तसे लिहित गेलोय इतके म्हणतो फक्त.

असो, कॉमेंट जरा विस्कळीतच झाली आहे, पण वाटेल तसे लिहित गेलोय इतके म्हणतो फक्त.>>>>तरी सुद्धा आवडलं

मला आवडला हा लेख.. त्या त्या वयातल्या गोष्टी असतात या.. वरती सोन्या बापूंनी लिहिलेय तसे शहरातील मुलांना मोकळेपणी बघताही येत नाही आणि बोलताही येत नाही...

पण एक वेगळा अनुभव म्हणून मुद्दाम लिहितो. विजया मेहता यांनी नागमंडल हे नाटक सादर केले होते. त्यात सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर आणि भक्ती बर्वे होते. नागाच्या संगाचा एक दृष्यानुभव त्या नाटकात होता. सुकन्या आणि उदय यांचा पराकोटीचा उच्च अभिनय होता त्यात आणि त्या दोघांत तर किमान एक फुटाचे अंतर असे.

त्याच नाटकात आणखी एक प्रसंग होता. सुकन्याला तिला एक परिक्षा द्यावी लागते आणि त्यासाठी वारुळात हात घालावा लागतो. वारुळात कुणीतरी तिचा हात ओढते. ती हात ओढून बाहेर काढते तर हाताचाच नाग झालेला असतो. तो नाग तिच्या शरीराशी खेळतो... तो प्रसंग अजूनही मी विसरु शकलो नाही. इतके सेन्सुअल दूष्य मी इतर कुठल्याच कलाकृतीत बघितले नाही. दुर्दैवाने त्याचे चित्रीकरण झाले नाही.

अजून चारेक प्रतिसाद आले या धाग्यावर. बरं वाटले. अन्यथा मी प्रतिसादशून्यचीही मनाची तयारी करूनच हे प्रकाशित केलेले.

खरंय. मुंबईमध्येच लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्याला जरा जास्तच अप्रूप असू शकते. तरीही वटवाघळाचे बघणे सहजी कोणाच्या नशिबी नसावे, किंबहुना आजवर मलातरी कोणीही समअनुभवी भेटला नाहीये, म्हणून जरा फुशारक्या मारत लिहिले.

वर उल्लेख झालेल्या बेडकाचेही बघणे झालेय. पहिल्यांदा अशीच मौज वाटली कारण मुंबईत बेडकेही तशी दुर्मिळच. पण नंतर तो पावसाळा आणि ते गार्डन, दर दिवसाआड त्या बेडूकऊड्या बघणे होतच राहिल्याने त्यातीलही रस निघून गेला.

बाकी प्रत्यक्ष बघणे आणि यूट्यूबचित्रफिती बघणे यात मैदानावर क्रिकेट खेळणे आणि विडिओ गेमवर क्रिकेट खेळणे एवढाच फरक असतो.