बादलीयुद्ध एक , दोन
-------------------------------------------------------------------------------
मी बादलीचा
बादली माझी
मी बादलीतल्या 'मगा'चा
'मग' माझ्या बादलीचा
आपण एक प्रथितयश कवी होऊ शकत नाही ही माझ्या हृदयातली एक भळभळती जखम आहे.
चित्रं काढता काढता मला कविता करण्याचा नाद लागला. नादच. छंद ही खूप मोठी गोष्ट झाली.
यमकं जुळवायला जी एक तंद्री लागते ती माझ्यात नाही हे आपल्याला कबूल.
यमकं जुळवणं हीच खरी कविता असंही काही नसतं हेही आपल्याला कबूल.
पण माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो हे शेवटी कुठेतरी मान्यच केले पाहिजे.
जगातले तमाम कवी हे बसस्टँडवर शबनम थैली घेऊन उभे असतात असं मला उगाचच वाटतं. माझ्या मनातलं त्यांचं हे चित्र मला काहीकेल्या पुसता येत नाही. मी त्या अनाम कवींना सलाम करतो.
नाहीतरी ह्या खोलीत टाईमपासच्या नावाला फक्त एक वही आणि पेन्सिल आहे. गाणी ऐकणे मी सध्या बंद केले आहे.
माझा एक सिनीयर म्हणतो, प्रेम ही एक महत्वाची गोष्ट आहे. साल्या तू प्रेम कर. प्रेमामुळे आयुष्यात एक प्रकारची जिद्द येते.
पण त्या वाटेला मी अजूनतरी गेलेलो नाही.तो आपला प्रांत नाही. केसांची झुलपे वाढवून पोरींच्या मागे बिड्या फुकत फिरणे ही आपली परंपरा नाही. ती तर गोरखचीसुद्धा नाही. पण तो गेल्याच आठवड्यात शलाकाशी दोन शब्द बोलला होता. तो नक्की काय बोलला हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे साहजिकच मी त्याच्यावर बोगसपणाचा ठपका ठेऊ शकत होतो.
पण परवा लायब्ररीत ती त्याला "हाय गोरख" म्हणून हात हलवत निघून गेली. ही नक्कीच एक दखल घेण्याजोगी गोष्ट आहे.
शलाका सुंदर नाही. मात्र ती कायम उत्तान कपडे घालते. तिच्या वळणदार शरीराच्या कमानी त्यातून डोकावत राहतात. मधून भांग पाडलेल्या तिच्या कपाळावर एक भलीमोठी टिकली असते. आणि रोज कुठल्या ना कुठल्या बिहारी पोराबरोबर ती फिरत बसते.
गोरखच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत याची मला कल्पना नाही.
खूप दिवसांपासून माझी एक काल्पनिक प्रेयसी आहे. जी ख्रिश्चन आहे. जी कायम धुक्यात राहते. चर्चमध्ये जाऊन प्रेयर करते. जी इवल्याश्या स्कुटरवर चेरी ब्लॉसम घेऊन माझ्या भेटीला येते. काऊबॉय हॅट, स्कर्ट अँड टॉप, स्टे अप्स स्टॉकींग्ज आणि बरेच काही...
जी मला अजून कधी भेटली नाही. आणि मी तिच्या शोधात आहे.
झऱ्यातून पाणी जसे गळतच गेले
तुझे दु:ख मला कायम छळतच गेले
मी विचार करतो. असं काही होणं कितपत शक्य आहे. एकतर मी कुठल्याच ख्रिश्चन कुटुंबाला ओळखत नाही. आजपर्यंत मी त्यांचं साधं घरही बघितलं नाही. ख्रिश्चन धर्माविषयी एक सुप्त आकर्षण मात्र जरुर आहे.
चॅको. इज माय फ्रेंड. ही इज लिविंग अॅट रेल्वे लाइन. अँड ही इज ए ख्रिश्चन.
वन्स ही केम इन आवर होस्टेल. अँड ही डान्सड लाईक मायकेल जॅक्सन.
इट्स ट्रूली हिल्यारीयस.
चॅको. एक उध्वस्त कवी जसा दिसेल तसा. ख्रिश्चन तो मुळी वाटतच नाही. मला म्हणाला, "पल्ली आहे का आत?"
वर्गाबाहेर मी उभा होतो. आणि 'रोज डे' नावाचा तो एक थिल्लर दिवस होता.
कठड्याला रेलून मी उभारलो. आणि म्हणालो,
"कोपऱ्यातल्या बेंचवर बसलीय, बघीतलं मी तीला".
चॅको जरा वेळ तसाच उभारला. मग त्यानं वर्गात आत वाकून बघितलं आणि पुन्हा माझ्याजवळ आला.
"अरे ऐकना, आज ना, मी तिच्याशी फ्रेंडशीप करणारे" बहुतेक त्याची घालमेल होत असावी. पण खुल्या दिलाने तो बोलला.
"क्या बात है यार, बेस्ट ऑफ लक!" मी म्हटलं खरं, पण म्हटलं तर ही एक फॉर्म्यालिटी होती. म्हटलंतर एक प्रोत्साहनही होते.
गुलाबाचं फुल घेऊन तो आत चालत गेला. आणि साधारण तीस सेकंदानं बाहेर आला.
"अरे मी काय कमी वाटलो काय हीला, हिच्यासारख्या छप्पन बघितल्या, मला म्हणते पोलिसात देईन, घे आमचा XXX, अरे हिच्या सगळ्या खानदानाला XXX XXX"
चॅको सॅक सांभाळत बडबडत राहीला. मी त्याला उडपीमध्ये चहा प्यायला घेऊन गेलो. तिथे दिलीप भेटला.
"अरे होता है चॅको भाय, काम डाऊन यार" दिलीप सिगारेटचा झुरका मारत म्हणाला.
बाजूलाच एक पडकी खोली होती. मग आम्ही तिच्या व्हरांड्यावर जाऊन बसलो.
"आज गाना गाणे का मन कर रहा है यार" चॅको चा मूड अजूनच खराब होत चालला होता.
खरंतर आम्हां तिघांनाही चांगल मराठी बोलता येतं. पण त्या बिहारी पोरांमुळे आम्हालाही हिंदी बोलायची घाणेरडी सवय लागली.
"चल मेरे रुम पे, तेरेको गझल सुनाता हू " मी म्हटलं. तसंही गोरखकडं पंकज उधासचं एक कॅसेट होतंच.
पण आम्ही बसलो. खूप वेळ बसलो. एखादा पेशंट शेवटच्या घटका मोजत असावा अशी विचित्र शांतता तिथे बराच वेळ पसरली.
"ना मैं मोमन विच्च मसीतां, ना मैं विच्च कुफर दीय रीता
ना मैं पाकां विच्च पलीता, ना मैं मूसा ना फिरवोन..."
बराच वेळ चॅको गात राहीला. दिलीपनं सिगारेट संपवून पलिकडं कटींगची ऑर्डर दिली. मला मात्र या सगळ्याचा कंटाळा आला.
संध्याकाळी मी खोलीवर गेलो. नुकतंच कोणीतरी निवर्तलं असावं अशी अवकळा माझ्या खोलीला आली होती. मग दरवाज्याला मोठं कुलूप घालून मी गच्छीवर जाऊन बसलो. गच्छीवर एक जुनी फाटकी गादी पडली होती. तिच्यातला कापूस बाहेर आला होता. एकंदरीत ते दृष्य बघण्यारखे नव्हते. म्हणून मी तिकडे फारसे बघितलेच नाही. आभाळकडे बघितले तर ते तांबूस झाले होते. झाडे काळवंडली होती. एकूणच तिथे पाहण्यासारखे असे काही नव्हतेच. म्हणून मग पुन्हा खाली आलो.
रात्री ऊशिरा गोरख माझ्या खोलीवर आला. समोरच्या रिकाम्या कॉटवर बसून राहीला. आणि माझा टेपरेकॉर्डवर त्यावेळी बंद होता. ना त्याने चालू केला ना मी.
आज मी चित्रे काढली नाहीत. कविताही केली नाही. बस तो नायट्रीक अॅसीडचा एक तुकडा जरुर तोंडात टाकला.
"तरी मी तुला सांगत होतो, आपल्या लेवलची नाय रे ती" मी गोरखला म्हटलं.
"च्यायला, पण अडीचशे रुपये फुकट गेले रे माझे" गोरख हसून म्हणाला.
"त्यात काय एवढं, अजून कोणी भेटली तर तिला दे" हा एक रास्त मार्ग होता. पण गोरखसारख्या माणसाने याचा विचार अगोदर करुन ठेवलेला असणार.
त्यानं मला ग्रिटींग कार्ड आणून दाखवलं. ते एक भलंमोठं आठदहा पानांच झुरमुळं ग्रिटींग कार्ड होतं. अगदी संग्रही करुन ठेवावे असे.
काल रात्रीच त्याने बाजारात जाऊन गुपचूप विकत आणले होते. अगदी माझ्यापासूनही लपवलं.
सकाळी त्याला कँटींगमध्ये शलाका दिसली. मग तो खुर्ची ओढून तिच्यासमोर बसला. तिने स्माईल दिली. मग तिची चायनीज न्यूडल्सची ऑर्डर आली. भलीमोठी प्लेट आणि भलामोठा चमचा. ती घापघाप खात बसली.
खिशामध्ये दहा रुपये असलेल्या गोरख केवळ चहाच पिऊ शकला. त्याला म्हणे प्रचंड ऑकवर्ड वाटलं. वहीमध्ये लपवलेलं ग्रिटींग कार्ड बाहेर आलंच नाही.
"सालं तिचं बिल द्यायची पण आपली औकात नाही रे" गोरख म्हणाला.
मी बाटलीतलं घोटभर पाणी पिलो. आज झोप लवकरच येणार असे दिसते.
"तिनं नक्की कोणते न्यूडल खाल्ले रे?" मी डोळे चोळत म्हणालो म्हणालो.
"च्यायला नावंच माहीत नाही रे, आणि तिनं माहित्ये का, कपात पांढरं कायतरी पिली रे, च्यायला कायकाय खातात ही लोकं"
त्यादिवशी गोरख माझ्या रुममध्ये बराच वेळ येरझाऱ्या घालत होता. रात्री कधीतरी तो निघून गेला.
-----------------------
पॅसेंजेर ट्रेन भुरर्कन निघून जाते. भलामोठ्या अवजड मालगाड्या मात्र मनाला विशेष आनंद देऊन जातात. गेलाबाजार रेल्वेचे रिकामे रुळसुद्धा मला पाहायला आवडतात.
कुठून कुठल्या गल्लीत आलो कळलं नाही. चॅकोची बाईक मात्र सुसाट सुटली होती. ना रेल्वे दिसली ना रुळ. रस्त्यात एक फाटक मात्र जरुर लागलं. तो क्षणिक लोहमार्ग रस्त्यावरच्या चिक्कार गर्दीने मला नीटसा पाहता आला नाही.
चॅकोची बाईक पुन्हा सुसाट सुटली. बरीच म्हणजे साधारण चार दोन किलोमीटर्स. आणि मी चॅकोच्या घरी पोहोचलो.
चॅकोचा कंप्यूटर अगदीच जुना. मळकट ठोकळा. घर मात्र ठिकठाक. ओकेबोके.
कुठलासा इंग्लिश पिच्चर टिव्हीवर लागला होता. आणि त्याची मम्मी अश्लिल कॉमेडी ऐकून खदखदून हसत होती.
"अरे बैठो बेटा, कुछ चाय वाय लोगे?"
मी म्हटलं, नको.
चॅको म्हटला "मम्मी...?"
मग तिनं चॅनेल बदलला आणि उठून चहा करायला निघून गेली.
चॅकोचा कंप्यूटर सुरुच होईना. सुरु झाल्यावर त्यानं माझ्याकडची सीडी मागितली. त्याचं प्रेझेंटेशन कॉपी करुन मग त्याने ती बर्न केली.
फावल्या वेळात चॅकोच्या दोन गलेगठ्ठ बहीणी दिसल्या. त्यातली एक वाडग्यात काहीतरी खात बसली होती.
अचानक सीपीयूनी सीडी बाहेर फेकली. मी तिला पिशवीत घातली. मग चहा पिऊन मी त्या घरातून बाहेर पडलो.
जाताना चॅको म्हणाला "बस नाम चेंज कर, और सबमीट कर दे"
मी म्हणालो, थँक्यू.
संध्याकाळी मग मी खोलीवर परतलो. मेसमध्ये जेवण केलं आणि झोपलो. त्यादिवशीही मला काहीच करु वाटलं नाही. माझं सुप्त ख्रिश्चन आकर्षण ढळत चाललंय हे नक्की.
-----------------------
सकाळी उठून मी कॉलेजला गेलो. वर्कशॉपमध्ये घाम गाळून लेथ मशीन चालवली. ते दलिंदर अॅप्रॉन कधी एकदाचा काढून फेकून देतोय असं झालं. टूलला धार लावताना दिलीप म्हणाला, "चॅको दिसला कारे तुला?"
मी म्हटलं, नाही.
"हुडक त्याला, पार्टी घ्यायचीय साल्याकडून"
मी म्हटलं, काय झालं?
"म्हणजे तुला काय म्हायीतच नाही, हाहा"
"नाही"
"मग उडपीत गेल्यावर बोलू"
दोन तास घाम गाळल्यावर वर्कशॉपमधून आमची सुटका झाली.
ते दलिंदर अॅप्रॉन रुमवर फेकलं आणि सरळ उडपीत गेलो.
"और चॅकोभाय, लो मजे करलो" दिलीप त्याची खेचत होता.
"पागल है रे वो, किसने बताया तेरेको"
"क्या हुआ रे?" मी मध्येच घुसलो.
"अरे सांग तुझ्या दोस्ताला, मॅसेज पाठवलाय म्हणावं शलाकानं" दिलीप पुन्हा सिगारेट पेटवत म्हणाला.
मी चॅकोचा मोबाईल घेतला. काल रात्री साधारण आठ वाजताचा एसेमेस होता. शलाकाचा.
"DO U LYK TO WATCH BLUE FILM WITH ME, THEN COME 2 MY HOME"
"मग गेलास की नाय साल्या?" मी आपली अशीच माहीती काढण्याचा प्रयत्न केला.
"अरे रंडी है वो साली, आपुन काय को टाईम बर्बाद करेगा, तुझे जाना है तो तू जा, सेटींग आपण लगायेगा" आता मात्र एक झुरका चॅकोनेही मारला.
साली यांची ओळखतरी कधी झाली. संध्याकाळी गोरखला जेव्हा मी हा किस्सा सांगितला, तेव्हा तो ही बराच वेळ हसत होता.
-------------------------------------------------------------------------------
क्रमशः
वाचतोय, आवडतंय लिखाण..
वाचतोय, आवडतंय लिखाण..
मागच्या भागात बादली निदान शेवटी तरी आली होती या भागात तर गायबच
कंसांची झुलपे वाढवून
कंसांची झुलपे वाढवून पोरींच्या मागे बिड्या फुकत फिरणे ही आपली परंपरा नाही......>>>>>>>+++++++११११११
खुप मस्त लिहीलय....!!! पण माझ्या मते, 'कंसांची झुलपे ऐवाजी, केसाची झुलपे' लिहायला पाहिजे, अस वाटतय...!!!
अरे ह्या भागाची सुरुवातच
अरे ह्या भागाची सुरुवातच बादलीने आहे की रे हर्पेन..
हं. वाचतेय.
हं. वाचतेय.
खूप दिवसांपासून माझी एक
खूप दिवसांपासून माझी एक काल्पनिक प्रेयसी आहे. जी ख्रिश्चन आहे. जी कायम धुक्यात राहते. चर्चमध्ये जाऊन प्रेयर करते. जी इवल्याश्या स्कुटरवर चेरी ब्लॉसम घेऊन माझ्या भेटीला येते. काऊबॉय हॅट, स्कर्ट अँड टॉप, स्टे अप्स स्टॉकींग्ज आणि बरेच काही...
जी मला अजून कधी भेटली नाही. आणि मी तिच्या शोधात आहे. .. Nice. .. Lines ,,
खूप दिवसांपासून माझी एक
खूप दिवसांपासून माझी एक काल्पनिक प्रेयसी आहे. जी ख्रिश्चन आहे. जी कायम धुक्यात राहते. चर्चमध्ये जाऊन प्रेयर करते. जी इवल्याश्या स्कुटरवर चेरी ब्लॉसम घेऊन माझ्या भेटीला येते. काऊबॉय हॅट, स्कर्ट अँड टॉप, स्टे अप्स स्टॉकींग्ज आणि बरेच काही...
जी मला अजून कधी भेटली नाही. आणि मी तिच्या शोधात आहे. .. >>> सही सगळ्यांची स्वप्नं थोड्याफार फरकाने सारखीच असायची बहुतेक
थोड्याफार फरकाने >> म्हणजे,
थोड्याफार फरकाने >> म्हणजे, जी पारसी आहे, जी कायम बंगलीत राहते , आग्यारीत जाऊन प्रार्थना करते, सायकलला समोर लावलेल्या बास्केट मध्ये मस्का पाव घेऊन तुझ्या भेटीला येते, फुलाफुलांचा स्कार्फ, स्लीवलेस लॉग फ्रॉक, गॉगल आणि बरेच काही
असंच ना श्री
टीना मुनीम का
दादर-पार्ले वरून थेट करमाळाच गाठलास की, पण ईंग्लिश बोलणारीच हवी हा सोस काही कमी होत नाही.
हायझेन परफेक्ट
हायझेन परफेक्ट