तिच्याकडे पाहून तो हसला.. पण ते सूक्ष्म हसणेही तिच्या नजरेतून सुटले नाही..सुखावली ती..
"काय वं धनी..अस का बघता माज्याकडं "
"हिरॉइन दिसतीय ..अक्षी शबाना आझमी वानी "
" ऑ !! शबाना आझमी..ते वं का ? ऐशर्या का नाय ?"
दीर्घ उसासा घेत, चपलात पाय सरकवत तो काहीतरी करवादला..बाहेर पडतानाचे ते वाक्य तिला ऐकू आले .." आपल्यासारक्याला परडाय नग ?"
स्वप्नं देखील मोजून मापून पाहण्याची सवयच जडली होती गावाला. गेल्या महिन्यात हाहा:कार उडाला होता. उभं पीक पाण्यावाचून गेलं होतं..सावकाराचा तगादा सुरू झाला होता...जमीन नावावर करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
महिनाहरात दोन आत्महत्या झाल्या. रामा गेला आणि पंधरा वीस दिवसांच्या अंतराने शिर्पा पण गेला !
आपल्यापुरते तरी समस्यांचे उत्तर त्यांनी शोधले होते. संसार उघडे पडले होते. कच्चीबच्ची भूक लागल्यावर शेजारीपाजारी फिरत होती.. सुरूवातीची सहानुभूती आता ओसरली होती. आता आयका खेकसायला लागल्या होत्या..
जात्यातले भरडले गेले होते..सुपातले धास्तावलेलेच होते.
जख्ख म्हाता-या आईच्या चेह-यावर दुष्काळ दिसत होता. तिच्या चेह-यावरच्या सुरकुत्या शेतातल्या काळ्या मातीत पसरल्या होत्या. आकाशात भास्कर आग ओकत होता. दॉरवर कुठेही काळ्या मेघांचा मागमूस नव्हता. खुरटलेल्या झाडीसारखी त्याच्या डोळ्यातली आशा मावळत चालली होती. गेल्या दुष्काळात याच झाडाला बा नं टांगून घेतलं होतं. त्याला उतरवून घेताना हृदयात झालेली कालवाकालव आजही ताजी होती.
ढेकळातून असाच किती वेळ चालत होता कुणास ठाऊक...अचानक कुणीतरी त्याला ओढल्याने तंद्री भंग पावली. ""
पाबळीत नगं जाऊ ...! " शिवा कानातच ओरडला....अजगर हाय तिथं अजगर !!
भानावर येऊन त्याने शिवाकडे पाहिलं... पाबळीकडं आपण कसे काय वळालो त्याला आठवेना.. तंद्रीत बकरीच्या पिल्लामागं पावलं ओढत राहिली होती. या पिल्लानं त्याला लळा लावला होता. बा परत आलाय...त्याने मनाची समजूत घातली होती.
पिलू दिसत नव्हते...त्याच्या काळजात धस्स झालं !!
पाबळीत हालचाल दिसली म्हणून शिवाचा हात झिडकारून तो पळत सुटला.
आटलेल्या पाण्याच्या झ-याच्या आडोशाने इथे हिरवाई दिसत होती. पाण्यासाठी जनावर इथे येत होते..आणि इथेच तो दबा धरून असला होता...अजगर !!!
पिलू इथेच आले असले पाहिजे. वेड्यासारखा तो पिलाला पहात होता.. हाका मारत होता ..
आणि त्याला पिलाचा आवाज आला....केविलवाणा !!
घात झाला होता..पाठीमागून त्याला अजगाराने गिळले होते.. डोळ्यासमोर त्याचा बा अजगाराच्या कराल दाढेत चालला होता. पिलाच्या डोळ्यातला आकोश त्याच्यापर्यंत पोहोचत होता. तो स्तब्ध होऊन पहात होता...असहाय्य !!
मस्तवाल अजगर पिलाला गिळत होता.. घरी गेल्यावर आज दूध काढताना त्याच्या आईला काय उत्तर द्यायचे ? तिचा पान्हा आटला तर....आपल्या पिलांचे काय होणार ?
एक क्षण असा आला कि त्याच्या डोक्यातच तिडीक गेली. अजगराच्या भयाची जागा आता संतापाने घेतली. तावातावाने त्याने तिथली एक टोकदार आणि जड फांदी उचलली. कसलाही विचार न करता अजगरावर वार करायला सुरूवात केली. शिवा लांबूनच हे दॄश्य पहात होता....थिजलेल्या नजरेने...!
बेभान होत त्याने वेगाने वार सुरूच ठेवले होते. भक्ष्य गिळत असलेला अजगर प्रतिकार करू शकत नाही. सुस्तावून पडलेल्या त्या दैत्याला बचावाची संधीचबमिळू द्यायची नाही हा निश्चयच केला होता त्याने... घामाने निथळेपर्यंत त्याचे हे काम चालू होते..
अजगराने ते पिलू ओकून टाकले होते. ते ही निपचीत पडलेले होते. भीतीने त्याचा जीव कधीच गेला होता...
अजगरासारखाच तो गलितगात्र होऊन पडला होता..हताश ..खिन्न !!
कसेबसे आपले प्राण एकवटून त्याने रानाकडे चालायला सुरूवात केली. गावात पोहोचताच त्याला सावकाराचा निरोप आला.. त्याचा जीव खालीवर झाला.
सायंकाळच्या कॄष्णछाया घरांच्या ओसरीवर वाकुल्या दाखवू लागल्या होत्या...उघडे बोडके आकाश त्याच्याकडे निर्विकारपने पहात होते. तांबूस छटांनाही खिन्नतेची झालर दिसत होती,
मनातले मळभ झटकत तो वाड्यावर पोहोचला.
त्याला पाहताच सावकार दारापर्यंत आला. नाटकीपणे त्याच्याकडे पहात तोंड भरून हसला.
"मुदत संपली ना बाबा ? झाली का व्य्वस्था ?"
खाली मान घालून तो असहाय्यपणे अंगठाने जमीन टोकरत राहिला.
" देवाने तोंडात जुबान दिली हाय ना.. बोल ना...काय करायच ?"
बा ने याच्या बहिणीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने वर्षभराची मुदत मागितली होती. पीक घ्यायला बियाणे लागणार होते.. त्यासाठी थोडेसे कर्ज घेताना यावेळी सगळीच जमीन गहाण टाकायला लागली होती.
" समजले....काय बी बोलायच नाय आता...तुजी अडचण मी जाणते..पण माजा पैसा अडकला बाबा...व्यवहारापुढं नाईलाज हाय बाबा "
त्याच्या कानात हे वाक्य गरम शिशासारखं ओतलं जात होतं अर्थ स्वच्छ होता... जमीन गेली होती. त्याला घेरी आल्यासारखं वाटत होतं
त्याच्या डोळ्यापुढं म्हातारी, तीन पोरं आणि बायको या सर्वांचे चेहरे फेर धरून नाचत होते... त्याला मदतीची हाक मारत होते.. त्याच्या डोळ्यात पाहत होते.
आणि त्यांची नजर...
त्याला बकरीच्या पिलाची आठवण झाली. त्या पिलाची नजर...त्याला गिळणारा अजगर !
सावकार हसत होता.. त्याचा हात धरून अंगठे उठवायचे काम करत होता.
दुपार्चा तो त्वेष ..ते वेड्यासारखे अजगराला भिडणे.... पिलाची सुटका नाहीच झाली पण जिवंतपणी..
अंगठे उठवायचे काम झाले होते.
पाबळीतला जखमी अजगर हालचाल करायला लागला होता... आता तो अधिकच धोकादायक झाला होता !!
*****
Maitreyee Bhagwat
11.9.2009
छान कथा!! छोटीशीच पण
छान कथा!! छोटीशीच पण अर्थपूर्ण.
हं......
हं......:(
सुन्न व्हायला झालं !
सुन्न व्हायला झालं !
मैत्रेयी, छानच! मुपीवर वाचली
मैत्रेयी,
छानच! मुपीवर वाचली होतीच. तुम्हाला इकडे बघून आनंद वाटला...
खुपच विदारक सत्य अगदी
खुपच विदारक सत्य अगदी थोडक्यात मांडलयं.
बापरे! भयानक सत्य. चांगलं
बापरे! भयानक सत्य. चांगलं मांडलं आहे.
.आभार...
.आभार...
लहान कथा, तरीही परिणामकारक
लहान कथा, तरीही परिणामकारक वाटली.छान कल्पना.
विदारक पण परिणामकारक सत्य ...
विदारक पण परिणामकारक सत्य ...
चांगल लिहिलय. भयानक वास्तव.
चांगल लिहिलय. भयानक वास्तव.
मन सुन्न झालं वाचून ...
मन सुन्न झालं वाचून ...
हं !
हं !
अस्वस्थ वाटलं वाचून..
अस्वस्थ वाटलं वाचून..
परिणामकारक कथा.. 
एकदम वास्तववादी कथा आहे.मनाला
एकदम वास्तववादी कथा आहे.मनाला स्पर्शून गेली.आपण पिलाला वाचवू शकलो तर......
अतिशय परिणामकारक.. सुंदर
अतिशय परिणामकारक.. सुंदर
(No subject)
आई गं!!! इतकेच येतय डोक्यात.
आई गं!!! इतकेच येतय डोक्यात.
छान मांडलिये कथा. दृष्य
छान मांडलिये कथा. दृष्य डोळ्यापुढे उभ राहात अगदी... सुन्न वाटलं वाचुन....
छोटिशीच पण फार परिणामकारक
छोटिशीच पण फार परिणामकारक कथा.
कथेची मांडणी आवडली
कथेची मांडणी आवडली
(No subject)
परिणामकारक कथा.
परिणामकारक कथा.
छान विषय. माहिती... १.
छान विषय.
माहिती...
१. अजगर-साप कधिहि भक्ष्य पाठीमागुन गिळत नाहि....
२. भक्ष्य गिळत असताना जर धोका जाणवला / त्रास झाला तर, भक्ष्य regurgitat करतात.
. किंग ऑफ नेट ...या
.
किंग ऑफ नेट ...या माहितीबद्दल आभारी आहे.
सुंदर शैली.. कथा आवडली. पुढील
सुंदर शैली..
कथा आवडली.
पुढील लेखनाला शुभेच्छा.
छान जमली आहे कथा. अंतर्मुख
छान जमली आहे कथा. अंतर्मुख करुन गेली....
.....अ !
.....अ !
सुटसुटीत,प्रखर वास्तववादी!!!
सुटसुटीत,प्रखर वास्तववादी!!!
सर्वांचे धन्यवाद..
सर्वांचे धन्यवाद..
हि कथा कशी काय सुटली नजरेतुन
हि कथा कशी काय सुटली नजरेतुन .
सुंदर नाही म्हणता येणार कारण डोळ्यातुन पाणी आलं वाचताना. पण छानच, आवडली !
Pages