"चल पिक्चरला!" माझ्या डोळ्यावर चढणारी सुस्ती भंग करत मित्राने फर्मावले. विचारणे वगैरे प्रकार हॉस्टेलवर चालत नाहीत, तिथे थेट आज्ञाच असते.
मी त्याच्याकडे एक नि:शब्द कटाक्ष फेकला.
"अरे एकच शो आहे" माझ्या नजरेतले भाव ओळखत तो थोडासा ओशाळत म्हणाला. हॉस्टेलवर रहाताना सिनेमाला जायची एकच राजमान्य वेळ असते - रात्री ९ ते १२. आणि आत्ता सकाळचे फक्त १०:३० वाजत होते.
माझी त्याच्यावरची नजर तशीच, पण आता भाव दुसरे. मित्रच तो, त्याने ते पण बरोबर वाचले.
"डेक्कनला, इजाजत, ११ चा शो आहे." रेखा आणि आरडी यांच्यापुढे मला सुस्ती गौण आहे हे त्याचे गणित बरोबर होते.
एक कप अमृत रिचवून आमच्या सायकली कर्वे रोडच्या उताराला लागल्या. सगळे सोपस्कार पूर्ण करून जेंव्हा आत पोहचलो तेंव्हा अंमळ उशीरच झाला होता. म्हणजे जाहिराती, त्यावरची आमची बडबड असे काही करायलाच मिळाले नाही. चित्रपटाची नामावली सुरुच झाली आम्ही गेल्यागेल्या. आणि पुढचे अडीच तास बडबड करायला सुचलेच नाही. एक उत्कट अनुभव उलगडत गेला आमच्या समोर आणि अगदी रोमारोमात भिनत गेला - कधीही न विसरण्यासाठी.
इजाजत - काय नाहीये या सिनेमात? कथेतील ठसठशीत व्यक्तीरेखा आणि त्या सादर करायला रेखा, नसिरुद्दीन, अनुराधा पटेल अशी तगडी स्टारकास्ट, गुलज़ारची सुंदर गाणी आणि छोटे बर्मन खाँ साहेबांचे अप्रतीम संगीत आणि गुलज़ारचीच पटकथा व संवाद. असा मणीकांचन योग हिंदी चित्रपटात फार कमी वेळा येतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्यांना एकत्रीत करून दिग्दर्शकाने (हा पण गुलज़ारच) जो अनुभव दिलाय या चित्रपटातून तो कधीच विसरता येत नाही, आणि तेच त्याचे सगळ्यात मोठे यश.
चित्रपट सुरू होतो तो पावसातून जाणार्या एका ट्रेनपासून. पावसाने नटलेल्या हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर नावे येऊ लागतात आणि तो फील अचूक पकडत झुळूझुळू वाहणार्या झर्याच्या अवखळ चालीत आशा गाऊ लागते -
छोटीसी कहानी से
बारीशों के पानी से
सारी वादी भर गयी
लाला लाला लालाला
कडव्यात चौथी ओळच देत नाही, बांध चाल - गुलज़ार पहिला गुगली टाकतो. छोटे नवाब बर्मन तो चेंडू असा काही टोलवतात की बॉलर बरोबर आपणही अवाक् होतो. त्या चौथ्या ओळीच्या जागी आरडी चक्क लाला लाला असा फिलर वापरतो पण तो फिलर न वाटता गाण्याची ओळच बनून जातो. गाणे चालूच असते अणि आपण ऐकतच असतो, डोळे टक्क उघडे ठेऊन. हो, अशोक मेहताचा कॅमेरा तो हिरवा निसर्ग असा काही टिपत असतो की पापणी मिटणेही जीवावर येते. सगळ्या चित्रपटभर त्याचा कॅमेरा सुंदर फ्रेम्स दाखवतच रहातो - एकदाही प्रसंगापेक्षा भारी न होण्याची खबरदारी घेत.
गाडी थांबते आणि नायक, नायीकेची प्रतिक्षालयात भेट होते. मग सगळा चित्रपट फ्लॅशबॅकने उलगडत जातो. आजोबांनी महेंद्रचे लग्न सुधाशी ठरवलेले असते. तो नोकरीचा बहाणा करून ते पुढे ढकलत असतो पण खरे तर त्याचे मायावर प्रेम असते. मनाने आणि शरीराने ते एकमेकांचे झालेले असतात. पडद्यावर काहीही अती न दाखवता गुलज़ार हे शारीरीक प्रेम नुसत्या शब्दांतून रंगवतो, त्याची परीसिमा गाठतो - एक सौ सोला चाँद की राते एक तुम्हारे कांधे का तील या ओळीत. आपण फक्त तोंडात बोटे घालून बघतच रहातो ही अजब कारीगिरी.
तर आजोबा आता कसलीही सबब ऐकायला तयार नसतात. महेंद्र सुधाला मायाबद्दल सगळे सांगून टाकतो. ती तरीही त्याला स्विकारते; एका छोट्याशा अपेक्षेच्या बदल्यात - त्याने यापुढे आपल्याशी एकनीष्ठ रहावे. लग्न होते आणि त्या दोघांचे आयुष्य सुखा-समाधानात चालू होते. निदान वरवर तरी तसे वाटत असते. पण नियतीला ते मान्य नसते. ती म्हणते -
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जिने दो
जिंदगी है बेहने दो
प्यासी हू मैं प्यासी रेहने दो
(मला इथे अभिमान मधला ’बिरहा ही जीवन का सच्चा सूर है’ ह संवाद नेहमी आठवतो. ती प्यास, ती तनहाइ पाठ सोडत नाही माणसाचा)
लग्न करून घरी आल्यावर सुधाला एक वही मिळते मायाच्या कवितांची. आणि सुरू होते तिची घुसमट. त्या उत्कट कवितांमधून माया आणि महेंद्रचे गहिरे प्रेम तिच्या पुढे उलगडत जाते आणि आपण त्यांच्या प्रेमाच्या आड आलो आहोत अशी तिची भावना होऊ लागते. तिचीच का आपलीही घुसमट व्हायला लागते इतके ते प्रेम अथांग असते. ते अथांगता दाखवताना गुलज़ार लिहितो -
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो
हे ऐकत असताना डोळ्यापुढे ना रेखा असते ना अनुराधा. असतो तो फक्त पाण्याबाहेर काढलेला एक मासा आणि त्याची तडफड. घुसमट नाही होणार तर काय?
गुलज़ारने जेंव्हा ह्या ओळी पहिल्यांदा आरडीला ऐकवल्या होत्या तेंव्हा त्याने त्यांना संगीत द्यायला साफ़ नकार दिला होता. सहाजीकच होते ते. शब्द सुंदरच आहेत पण चालीत बांधण्यासारखे अजिबात नाहीत. आरडीची चिडचिड झाली तो गुलज़ारला म्हणाला "तू उद्या मला टाइम्स ऑफ इंडियातली बातमी देशील आणि म्हणाशील याला चाल लाव" पण गुलज़ार शब्द बदलायला तयार झाला नाही. शेवटी आरडीने विडा उचलला आणि एक सुंदर गाणे आपल्याला मिळाले. गुलज़ारच्या या शब्दांनी त्याला गीतकाराचे राष्ट्रीय पारितोषीक मिळवून दिले आणि ते गाणार्या आशाला गयिकेचे. पण एवढे अशक्यप्राय काम करुनही आरडीला त्या गाण्याबद्दल कसलेच पारितोषीक नाही मिळाले.
सुधाची घुसमट वाढतच जाते आणि घडणार्या काही घटनांमुळे महेंद्र मायात परत गुंतत चालला आहे अशा गैरसमजात ती घर सोडून जाते. फ्लॅशबॅक संपतो आणि आपण दी एंड पाशी येऊन पोहचतो (हिंदी चित्रपटाचा कधी शेवट होत नाही, त्याचा दी एंडच होतो). महेंद्र सुधाचा गैरसमज दूर करतो आणि ते दोघे आता परत एकत्र येणार असे वाटत असतानाच ’तो’ शेवट होतो. इतका अटळ पण पटलेला शेवट दुसर्या कुठल्याही चित्रपटात मला आढळला नाहीये अजून पर्यंत. चित्रपट संपतो आणि आपण शेवटच्या अनपेक्षीत वळणाने सुन्न झालेले डोके घेऊन बाहेर पडतो.
यातल्या अभिनेत्यांविषयी काय बोलावे? कुठे कुणी अभिनय केलाय असे वाटतच नाही सगळे आपल्या अवतीभवती घडतय इतके खरे वाटत रहाते. अनुराधाचा हा रेखाबरोबरचा उत्सव नंतरचा दुसराच चित्रपट. पण ती रेखापेक्षा कुठेही कमी पडलेली नाही - ना सौंदर्यात ना अभिनयात. रेखा आणि नसिरुद्दीन तर महानच आहेत. शेवटच्या प्रसंगात शशी कपूरही छाप पाडून जातो.
माझ्या मनात संपूर्ण चित्रपटाइतकेच जागा अडवून बसले आहे ते चित्रपटातले चौथे गाणे -
खाली हाथ शाम आयी है
खाली हाथ जायेगी
आज भी ना आया कोइ
खाली लौट जायेगी
कुणी मला विचारले संध्याकाळची कातरता कशी असते तर क्षणाचाही विलंब न करता मी हे गाणे ऐकवेन. हे ऐकल्यावर जे वाटते तीच संध्याकाळची कातरता.
नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.
ह्या सिनेमात एक सीन असा आहे
ह्या सिनेमात एक सीन असा आहे की प्लॅट्फॉर्मवर असतानाच रेखाला नसीरचे पाकीट उघडून पैसे देण्याची वेळ येते तेव्हा आत पाकीटाच्या आत कोणाचा फोटो आहे हे ति पहाते. पण ते प्रेक्षकांना नाही दिसत. मला तेव्हापासून कुतुहल होते की तो कोणाचा फोटो असतो? माया की सुधा?
अप्रतिम लेख!!
अप्रतिम लेख!!
सुमेधाव्ही, रेखा मायाचा फोटो
सुमेधाव्ही, रेखा मायाचा फोटो अजूनही आहे का पाकीटात ते बघत असते .. आधी ती नसीरकडे त्या फोटोबद्दल तक्रार करते मग (तात्पुरता) समजूतदारपणा दाखवून तो फोटो परत होता तिथेच सरकवते .. म्हणूनच मग इतक्या वर्षांनीं संधी मिळाल्यावर ती परत बघते की फोटो अजूनही आहे का? (तीच्या मनात आशा असावी की फोटो नसावा किंवा मग असंही म्हणता येईल की फोटो असावा अशी आशा असावी म्हणजे तीने जे केलं (नसीरला सोडून दुसरं लग्न) त्याचं जस्टीफिकेशन तिला मिळेल ..)
माधव, वा ! खुप छान ! >>>कुणी
माधव, वा ! खुप छान ! >>>कुणी मला विचारले संध्याकाळची कातरता कशी असते तर क्षणाचाही विलंब न करता मी हे गाणे ऐकवतो<<< +१०००००

लाजो>>>खुप आवडता चित्रपट... कथानक, गाणी, दिग्दर्शन, रेखा, अनुराधा... सगळचं... जबरदस्त!!! <<< +१००
बस्के >>>माझी आई या सिनेमाची, गाण्यांची, रेखाच्या साड्यांची फॅन.. <<< माझी सख्खी मैत्रीण असणार ती
रैना >>>पण नासिर ची व्यक्तिरेखा .... आणि ती निर्दोष वाटायलाही नकोय हे मला आवडते.<<< अगदी अगदी
सशल, वा !
इन्द्रधनू, बदल केलाय. आगावा,
इन्द्रधनू, बदल केलाय.
आगावा, लिंकबद्दल धन्यवाद. मला कधीची हवी होती ती डॉक्युमेंटरी. पण दुकानात मिळतच नव्हती. यु-ट्युब वर शोधायचे डोक्यात नव्हते आले. आता तुझ्या कृपेने बघता येइल
पण योग म्हणतात तसे हा Collectable Item आहे.
योग, मायबोलीवरच्या आरडी फॅन्सचे गटग करायचे का - ती डॉक्युमेंटरी बघण्याकरता?
लंपन, नसीरच्या आवाजातले This is Maya हे शब्द गाण्याचाच भाग आहेत माझ्याकरता
सशल, त्या फोटोबद्दल अगदी अगदी.
'ना कम ना ज्यादा' लिहिलंय
'ना कम ना ज्यादा' लिहिलंय तुम्ही >>>>> अनुमोदन !
सुरेख लेख ! स्पर्धेकरता शुभेच्छा.
छान लिहिलय, माधव !
छान लिहिलय, माधव !
>>नेहमी संध्याकाळी येणारी ही
>>नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.
हे खासच
मस्त
मस्त
सुंदर लिहीलेय, चित्रपट पाहीला
सुंदर लिहीलेय, चित्रपट पाहीला नाही पण नासरुद्दीन शहा म्हटल्यावर अभिनय जबरद्स्त असणारच !
>>योग, मायबोलीवरच्या आरडी
>>योग, मायबोलीवरच्या आरडी फॅन्सचे गटग करायचे का - ती डॉक्युमेंटरी बघण्याकरता?
anytime.....
सुमेधाव्ही, रेखा मायाचा फोटो
सुमेधाव्ही, रेखा मायाचा फोटो अजूनही आहे का पाकीटात ते बघत असते .. आधी ती नसीरकडे त्या फोटोबद्दल तक्रार करते मग (तात्पुरता) समजूतदारपणा दाखवून तो फोटो परत होता तिथेच सरकवते .. म्हणूनच मग इतक्या वर्षांनीं संधी मिळाल्यावर ती परत बघते की फोटो अजूनही आहे का? (तीच्या मनात आशा असावी की फोटो नसावा किंवा मग असंही म्हणता येईल की फोटो असावा अशी आशा असावी म्हणजे तीने जे केलं (नसीरला सोडून दुसरं लग्न) त्याचं जस्टीफिकेशन तिला मिळेल ..) >> हा प्रसंत मी इतका निरखून नाही पाहिला. धन्य सशल.
छोटीसी कहानी से बारीशों के
छोटीसी कहानी से
बारीशों के पानी से
सारी वादी भर गयी... लाला लाला...
नाजाने क्युं दिल भर गया....
ना जाने क्युं आंख भर गयी....
ही ज्या सिनेमाची सुरुवात असते... तो अप्रतिमच असतो....
हा सिनेमा रेखाचा? नसीर चा ? की अनुराधा चा?..... हा सिनेमा नाहिये !! ही कविता आहे.... फक्त कविता...
मेरा कुछ सामान ... पहाताना... " एक तुम्हारे कांधे का तिल" हे ऐकुन आंगावर येणारे रोमांच...
रेखाची अगतिकता...
कतरा कतरा .. चे अजीब लोकेशन. त्या वर हॅमॉक वर नसीर बसलेला.. बाजुला रेखा आपलं मादक रुप सोडुन साध्या साडीत....
एक दिन ऐसा ही कुछ हुवा था... हो... निंद मे भी जब तुमने छुवा था!!!! बस्स.... अनोखे शब्द... अनोखा शब्द साज आणि अवखळ अनोखा आवाज.....
मला मात्र कुठेतरी नसीर आणि रेखा पेक्षा अनुराधा पटेलच जास्त आवडली. तिने फारच प्रामाणीक अभिनय केला आहे. तिचे डोळे फारच बोलके....
निंबुडा,, या गाण्याचा अर्थ तो
निंबुडा,, या गाण्याचा अर्थ तो चित्रपट बघितल्या शिवाय नाही लागणार, नुसते गाणे नव्हे, तो पूर्ण चित्रपटच !
लौटा दो, म्हणजे काय.. ते पण तेव्हाच कळेल.
>>>
दिनेशदा,
मी सिनेमा पाहिलेला नाहीये. पहिल्यांदा गाणे ऐकले तेव्हाच त्यातला भाव लक्षात आला. "लौटा दो" चा अर्थही कळला. मयेकरांनी दिलेली लिंक पाहिली. मला लागलेला अर्थच त्यातही विशद केलाय. फक्त 'एकसो सोला चांद' हा सिनेमातला काहीतरी स्पेसिफिक रेफरन्स आहे असे वाटले म्हणून विचारले. दर महिन्यातून एकदा पौर्णिमा येते. म्हणजे एकसो सोला चांद पाहण्यासाठी ११६ महिने एकत्र काढावे लागतील. १२ ने भागले तर ९.६ असा आकडा येतो. म्हणजे ९ ते १० वर्षे त्यांचा प्रेमालाप चालला असावा असा मी माझ्या गणिती डोक्याने (?) काढलेला अर्थ आहे. प्रत्यक्ष सिनेमात काय आहे माहित नाही. म्हणून इथे विचारले.
निंबुडा, काय बोललात अगदी!
निंबुडा,
काय बोललात अगदी! मीही अशीच आकडेमोड केली होती. शेवटी ठरवलं की साडेनऊ वर्षे फार होतात. मग थोडा अंदाज लावला की पौर्णिमा अधिक मागील आणि पुढील असे २ दिवस मिळून ५ दिवस (शुक्लत्रयोदशी ते कृष्णद्वितीया) चंद्रप्रकाश असतो. त्यामुळे एका महिन्यात ५ रात्री धरल्या तर ११६/५ = सुमारे २४ महिने (= २ वर्षे) येतात. चार महिने पावसाळ्याचे चंद्रदर्शन न धरल्यास २ च्या दीडपट म्हणजे ३ वर्षे होतात.
प्रेमालापासाठी २ ते ३ वर्षे हा आकडा मायाच्या स्वभावास साजेसा वाटतो!
प्रत्यक्षात सिनेमात काय आहे ते माहीत/आठवत नाही.
आ.न.,
-गा.पै.
गामा लोक्सो, इतके होऊनही खरे
गामा
लोक्सो, इतके होऊनही खरे गौडबंगाल काय ते सांगा की इथेच! चित्रपट पहायचा योग कधी येईल माहीत नाही.
निंबुडा, गामा > हे `सौ साल
निंबुडा, गामा >
हे `सौ साल पेहेले , मुझे तुमसे प्यार था' सारखं वाटलं मला !
ए रुक्ष गणित्यांनो.... वाइच
ए रुक्ष गणित्यांनो.... वाइच दमानं घ्या.....
सगळ्या गोष्टी २+२ = ४ नसतात. गाणं नीट ऐका. त्या साठी सिनेमा पहायची गरज नाही.
ती माया त्याला सांगते आहे की जसे माझे कपडे आणि वस्तु पाठवल्यास तसेच माझे ते क्षण पण परत दे.
११६ चांद की राते ---- म्हणजे तुझ्या सहवासात घालवलेल्या तेवढ्या रात्री, ते क्षण, तो सहवास, त्या एकत्र घालवलेल्या रात्री. मग चंद्र आहे की नाही ह्याला महत्व नाही. तु माझ्या जवळ होतास म्हणजे चंद्र आकाशात असण्यासारखेच आहे. .... ( असा अर्थ मी घेतला खरे खोटे गुलजार जाणे. )
तिकडे ११६ रात्री म्हणजे किती दिवस ते करायला ती माया काय गणिताची प्रोफेसर नसते.....
भावनाओंको समझो मेरे दोस्तों.... दिन गिननेमे क्या मतलब है.
ह्या सिनेमातल्या अनुराधा पटेल
ह्या सिनेमातल्या अनुराधा पटेल ला त्या वर्षीचं "फिल्म फेअर सहय्यक अभिनेत्री" चं नॉमिनेशन मिळालं होतं. पण तुम्हाला माहित आहे की ते तिला न देता त्या वर्षी कोणाला मिळालं?
चक्क सोनु वालियाला !!!! आहे की नाही गम्म्त......
फिल्म फेअरकडून आणखी कोणती
फिल्म फेअरकडून आणखी कोणती अपेक्षा होती?
सर्वोत्कृष्ट संगीत-साठी य चित्रपटाचे नॉमिनेशनही नाही. कसेकतला मिळालेय ते.राजेश रोशन खूभमां साठी स्पर्धेत.
पण गुलजारना गीतकारासाठी मिळालंय, हेही नसे थोडके.
मेरा कुछ सामां साठी आशा आणि गुलजार यांना नॅशनल अॅवॉर्ड मिळाले. पण संगीतकाराला नाही.
आत्ताच गूगललं तर ११६ चांद की
आत्ताच गूगललं तर ११६ चांद की राते बद्दल हे मिळाल :-
Incidentally, the line “ek sau solaah chaand ki raatein, ek tumhaare kaandhe ka til” from the song Mera Kuchh Saamaan from Ijaazat refers to the 116 phases of the moon that are listed in Indian classical literature. What Gulzar means to say is that all the possible phases of brightness that the moon has to offer, cannot even begin to match the tiny dark spot on your shoulder.
<<माझ्या मनात संपूर्ण
<<माझ्या मनात संपूर्ण चित्रपटाइतकेच जागा अडवून बसले आहे ते चित्रपटातले चौथे गा<<>>...
है शाब्बास...
नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.>>>>
मान्या...
त्या छोटीसी कहानी से... ऐकताना येणार्या काट्यांनी माझं साळींदर होईल अशी मला नेहमी भिती वाटते.. इतकं कातिल आहे ते गाणं.
आर. डी. ने आयुष्यात केवळ
आर. डी. ने आयुष्यात केवळ मासूम, घर आणि इजाजत एवढे तीनच सिनेमे केले असते तरीही तो अमर झालाच असता ....
असो. एकूणच अप्रतिम .... सुरेख शब्दचित्र ...
शेवटची ओळ तर खास ठेवणीत जपावी अशी ....
बक्षिसावर हक्क सांगायला हरकत नाही
अश्विनी के, धन्यवाद! अर्थ
अश्विनी के, धन्यवाद!
अर्थ मस्तच आहे त्याचा .. (पण ११६ फेजेस् असतात चंद्राच्या हे काही माहिती नव्हतं बुवा .. :))
पाण्याबाहेर काढलेला एक मासा
पाण्याबाहेर काढलेला एक मासा आणि त्याची तडफड>> अनुमोदन!
छान लिहिलसं माधव. गुलजारचा चित्रपट म्हणजे एक कविताच असते की.
कुणी 'खुशबू' वर लिहिलेलं आवडलं असतं. तो गुलजारपटही एकदम साधासुधा सुंदर आहे, त्यातल्या कुसुमसारखा.
आर. डी. ने आयुष्यात केवळ
आर. डी. ने आयुष्यात केवळ मासूम, घर आणि इजाजत एवढे तीनच सिनेमे केले असते तरीही तो अमर झालाच असता ...>> अगदी अगदी .. आणि आंधी ला ही धरा यात .
माधव , तुम्ही खूपच छान लिहिलंत.
बाकी आर.डी, गुलजार, आशा आणि नसीर व रेखा बद्दल काय बोलावं?
छानच लेख. [[[[[[ हा माझा
छानच लेख.
[[[[[[ हा माझा आवडता अत्यंत चित्रपट... पण मला परत कधीही बघावासा वाटला नाही ]]]]+१
अनुराधा पटेलचा एक्सिडेंट च प्रसंग पहावत नाही.....
आणि शेवटही.... मायाही नाही आणि सुधाही सोडून गेलेली......
फार सुरेख लिहिले आहे माधव
फार सुरेख लिहिले आहे माधव
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जिने दो
जिंदगी है बेहने दो
प्यासी हू मैं प्यासी रेहने दो
हे गाणे माया ला जास्त सूट झाले असते..
Pages