झटपट चॉकलेट केक

Submitted by दक्षिणा on 18 July, 2016 - 05:24
chocolate cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हाईड अ‍ॅन्ड सीक बिस्किटचा एक पुडा, पारले जी ची १५ बिस्किटे, ५ चमचे पीठी साखर, एक कप दुध, एक ईनो चं पॅकेट (प्लेन), ड्रायफ्रुट सजावटीकरता, एक चमचा तुप, एक चमचा कणिक (हे दोन्ही ग्रिसिंग साठी)

क्रमवार पाककृती: 

प्रथम, कुकरमध्ये तळ लपेल इतकी वाळू घालून, बारीक गॅस वर झाकण लावून (शिटी काढून टाकून) तापत ठेवावा.

पार्ले आणी हाअ‍ॅसी ची बिस्किटे घ्यावीत.
1_2.jpg

हाईड अ‍ॅन्ड सीक चॉकलेट बिस्किटे मिक्सरवर फिरवून त्याची पुड करून बाऊल मध्ये ओतावी, पारले जी च्या बिस्किटांचीही पूड करून घेऊन त्यात मिक्स करावी. वरून पीठी साखर घालावी. मला गोडाची कल्पना नव्हती, शिवाय बिस्किटे आधीच गोड असतात त्यामुळे फक्त ५ चमचे साखर घेऊन बारीक करून घातली.
हे मिश्रण नीट हाताने हलवावे, त्यात चुकून एखादा बिस्किटचा तुकडा राहिला असेल तर तो काढून टाकावा.
2_1.jpg

मग हे मिश्रण दुध घालून हळू हळू हलवावे. साधारण अर्धा ते पाऊण कप दुधात बॅटर हवे तसे दाटसर बनते. भसकन दूध घालून मिश्रण खूप पातळ करू नये. बॅटर बाऊल मधून कुकरच्या भांड्यात ओतता येईल अशा प्रकारे बनवावे.

3_1.jpg

हे मिश्रण ५ मिनिट ठेवावे, त्या दरम्यान दुसरीकडे कुकरच्या भांड्याला तुपाचा हात फिरवून त्यावर कणिक भुरभुरावी.
4_1.jpg

मग मिश्रणात ईनोचे एक आख्खे पाकिट ओतून ते मिश्रण चमच्याने नीट हलवावे.
5_0.jpg

मग कुकरच्या भांड्यात ओतावे आणि वरून हवी ती ड्रायफ्रुट्स घालून सजवावे. (मी फक्त काजू वापरले ते पण ५ :फिदी:)
6_0.jpg

कुकर खूप गरम झालेला असल्याने हलकेच झाकण काढून त्यात स्टँड ठेवावे (गरम भांड्याखाली ठेवतो ते) त्यावर कुकरचे भांडे ठेवून, झाकणाला जमा झालेली वाफ्/पाणी पुसून झाकण पुन्हा लावावे. आणि अगदी मंद गॅसवर हे मिश्रण ३० ते ३५ मिनिटे बेक होऊ द्यावे. नंतर एखादी मोठी सुरी किंवा सुई घालून केक नीट शिजला का ते पहावे, सुई/सुरी बाहेर येताना त्याला मिश्रण चिकटले तर पुन्हा गॅस वर ठेवावे.
सर्वात शेवटी (केक शिजल्याची खात्री झाल्यावर) ५ मिनिटे गॅस मोठा ठेवून बंद करावा.

गार झाला की प्लेट मध्ये काढा, आणि खा... Happy
7.jpg

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी निदान ४ लोकांना भरपूर होईल चहासोबत. बकाबका खाल्ला तर एकट्याला ही नाही पुरणार.
अधिक टिपा: 

अधिक टिपा काय देऊ? Uhoh भरपूर ड्रायफुट घालू शकता. Proud

माहितीचा स्रोत: 
नेटवरून साभार.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे केक. हा केक जाड बूडाच्या नॉन स्टीक पॅन मधे पण होईल. झाकण ठेवताना ते जाडसर नॅपकिन मधे गुंडाळून ठेवायचे, म्हणजे वाफ शोषली जाते.

वरकरणी तरी चांगला दिसतोय Happy पण प्रत्यक्ष केकचं टेक्स्चर कळत नाहीये.
एखादा तुकडा काढून बाजूनंही फोटो घ्यायला हवा होता. पुढच्या वेळी तसाही काढ.

केक करण्याची पहीलीच वेळ होती त्यामुळे काही गोष्टींचा अंदाज आला नाही.
इनो घातल्यामुळे केक फुगतो आणि स्पाँजी होतो असा माझा समज आहे. मी केलेला केक खूप स्पॉंजी नव्ह्ता झाला पण खूप डेन्स पण नाही झाला. केक अधिक स्पाँजी होण्यासाठी काय करावे? Uhoh

बिस्किटं किती गोड असतील याचा अंदाज न आल्याने बॅटर मध्ये फक्त ५ च चमचे पिठीसाखर घातली होती, त्यामुळे गोडीला कमी झाला होता.

भांडं ग्रिसिंग करताना कणिक किती भुरभुरावी याचा ही अंदाज न आल्याने ती थोडी जास्त झाली Sad

पुढच्या वेळी सर्व चुका सुधारेन Happy

केक स्पाँजी व्हायला अंडे फेटून घालतात किंवा सोडा + बेकिंग पावडर घालतात. ( दोन्ही घालण्याचे कारण, हे घटक दोन वेगवेगळ्या तपमानाला काम करतात. ) तूझ्या रेसिपीतले घटक जरा वजनाने जड आहेत. पण यातही दूधाच्या जागी एक अंडे फेटून घालता आले असते. इनो घालून ढोकळा वगैरे चांगला होतो.

केक जर कमी गोड झाला, तर वरुन साखरेचे पाणी ( गरम असतानाच ) ओतायचे. ते केकमधे शोषले जाते आणि केक कोरडा पडत नाही.

तळाशी कणीक भुरभुरल्यावर डबा उलटा करून थोडा झटकायचा, जास्तीची कणीक पडून जाते. नॉन स्टीक पॅन मधे केलास तर कणीक वगैरे लागणार नाही.

दिनेश,
अंडं वगैरे न वापरता पण केक स्पाँजी होतोच की काही लोकांचा, ते कसं जमवत असतील? Uhoh त्यासाठी काही टिपा असतील तर सांगा. माझ्याकडे बेकिंग पावडर आणी सोडा दोन्ही होतं. इनो+बेसो+बेपा असं तिन्ही वापरायचं का? Uhoh इनो नक्की काय काम करतं?

साखरेच्या पाण्याची आयडीया ऑफिस मधल्या मैत्रिणीने पण सांगितली पण केक कोरडा होऊ नये म्हणून, पण साखर कमी पडली हे गार झाल्यावर खाल्ला तेव्हाच समजलं Sad पण पाणी ओतण्यात काही अर्थ नव्हता Sad

मंजूडे माझ्या रवा केकची कशी फजिती झाली पाहिलिस ना? त्यावरून मला वाटलं की ते बॅटर खूप पातळ झालं म्हणून केक मध्ये फुलायच्या ऐवजी शिजला... (शिर्‍यासारखा) म्हणून यावेळी जरा बॅटर घट्ट केलं होतं.

पण मागच्या केक पेक्षा काही गोष्टी चांगल्या झाल्या, त्या म्हणजे, केक अख्खा निघाला, संपूर्ण फुलला... इ.

दक्षे, मला पण तुझ्या आवाजात ऐकू आली ही रेसिपी. Happy
तुझी तायडी इथे पण तुला सारख्या सूचना देत आहे :p
रेसिपी करून बघायला लागणार.. केक डायरेक्ट खायची सोय म्हणून ठेवली नाहिये इथे..

दक्षे, अंडे वापरायचे नसेल तर सोडा वॉटर वगैरे वापरावे लागते. किंवा सेल्फ रेझिंग फ्लोअर तरी.

इनो मधे अगदी कोरड्या रुपात सोडा आणि सायट्रीक अ‍ॅसिड असते. हे घट्क कोरड्या स्वरुपात एकमेकांशी अजिबात प्रतिक्रिया करत नाहीत पण पाण्याच्या सानिध्यात मात्र त्यातला कार्बन डाय ऑक्साईड वेगळा होतो.

पाण्याशी संपर्क आल्या आल्या हि क्रिया होते, त्यामूळे खाद्यपदार्थात इनो घालायचा तर अगदी शेवटच्या क्षणीच
घालावा लागतो. एकदा पदार्थात बुडबुडे निर्माण झाले कि ते आतच टिकवायचे काम उडदाची डाळ किंवा मैदा यासारखे चिकट पदार्थ करतात.

इनो आणि सोडा एकत्र वापरण्यात मात्र अर्थ नाही.

तूला रस असेल तर डॉ. वर्षा जोशी यांचे स्वयंपाक घरातील विज्ञान हे पुस्तक वाचून बघ.

सोनचाफे, तुझं काय जातंय भडकवायला? बायो, इथं आम्ही गिनिपिगं असतोय Sad
समोर आलेलं कच्चंपक्कं खायचं आणि वर किती छान किती छान पण म्हणायचं Uhoh समोर उभं ठाकून 'कसं झालंय, आवडलं?' असं विचारल्यावर न खाऊन आणि न म्हणुन सांगता कुणाला? हे म्हणजे इकडं आड तिकडं विहीर!

म्हणुन हे असं आधीच शंका घेऊन इतरांकडून सूचना मागवून फायनली सुधारीत आवृत्ती मिळण्यासाठी बेललेले पापड आहेत Lol दिनेश, मंजु, मेधा कशासाठी आहेत मग?

सई, म्हणजे तुझ्यापर्यंत आला तो केक.. ?? मला वाटलं वरकरणी पाहून असं लिहिलंस कमेंट्मधे तेव्हा चव फक्त दक्षीनेच पाहिली असणार. असो कोणीही छान प्रयत्नाने नवीन काहीतरी बनवलं तर मला तर बरं वाटतं.. आता गिनिपिग मी बनले असते पण दक्षी सगळ्या गोष्टी इथे माझ्याकडे पाठवेपर्यंत तिचाच धीर निघणार नाही ना.. Sad म्हणून ते काम तूच कर.. Proud
आणि दक्षे प्रयत्न चालू ठेव.. माझाही पहिला केक थोडा घट्ट झाला होता.. हळूहळू पाण्याचं प्रमाण कळत जातं आणि केक कोरडा होणं कमी होतं.

त्यावरून मला वाटलं की ते बॅटर खूप पातळ झालं म्हणून केक मध्ये फुलायच्या ऐवजी शिजला... (शिर्‍यासारखा) म्हणून यावेळी जरा बॅटर घट्ट केलं होतं.>>> तो रवा होता, इथे मैदा आहे. Happy
प्रयोगाअंती परमेश्वर!! Wink

कोणीही छान प्रयत्नाने नवीन काहीतरी बनवलं तर मला तर बरं वाटतं..>> मला पण!
वरचे आपले मुद्दाम तेलाचे दोन थेंब.. जाता जाता उगीच भडका उडवायला! मजा येते Wink

गंमत केली गं, चांगलं करते पोरगी, एकदम मनापासून Happy हातालाही चव आहे तिच्या Happy