विळखा

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 6 July, 2016 - 08:19

विळखा

"आज संध्याकाळी कोणाचं तोंड बघितलं आठवत नाही अजून संपूर्ण रात्र जायची आहे" श्रीकांतच्या डोक्यातले विचार थांबतच नव्हते. लोक सकाळी उठल्यावर दुसऱ्यांची तोंड बघतात पण या बिचाऱ्याची सकाळ गेल्या दोन महिन्यानपासून संध्याकाळी होते, मुळात त्याचा नवीन दिवसाचं संध्याकाळी सुरू होतो. नवीन नोकरी आणि नवीन नोकरीतील स्ट्रगल या दोहोंच्या विचित्र चक्रव्यूहात तो अडकला होता. " पाहिले तीन महिने रात्रपाळी करावी लागेल आणि त्यात चांगला परफॉर्मन्स दाखवला तर पुढे दोन वर्षांचे काँट्रॅक्ट (करार) साइन करता येईल." या मान्य केलेल्या अटीवरच त्याला नवीन नोकरी मिळाली होती. नोकरी मिळाल्याच्या अति उत्साहामुळे जास्त विचार न करता तो "हो" म्हणाला होता आणि आता वैतागलाही होता. कॉलेजमध्ये असताना कधी रात्री-अपरात्री घरी गेल्यावर आई चिडायची म्हणायची ,"रात्रीची भूत फिरतात रस्त्यावर, माणसं नाही. माणसांसारखे वागा, रात्री झोप आणि दिवस बाकीची काम उरका " तेव्हा "पार्टी सकाळी करतात का? " असा उलट प्रश्न आईला विचारावासा वाटत असतानाही आणखी बोलणी ऐकावी लागतील असा विचार करून तो मौन पत्करायचा पण त्या वयात रात्र कधीही वैऱ्याची वाटलीच नव्हती. आता मात्र या रात्रीच्या झोपेचं महत्त्व कळलं होत. रात्रीचा जॉब करायचा आणि दिवस मस्त आराम करायचा हे प्रत्यक्षात ददरोज करण जड जात होतं. रात्री 11 ते सकाळी 8 अशी अपॉइंटमेंट लेटर वरची नोकरी फक्त नऊ तासांपुरती मर्यादित नव्हती, 8 चे 9-10 वाजायचे. मग घरी पोहोचल्यावर फ्रेश व्हायचं, फोन, फेसबुक, मिस्ड कॉल्स, नेट सर्फिंग असं सगळं करून 12-12.30 ला झोपायचं ते थेट 6-6.30 ला उठायचं आणी मग त्याचा दिवस सुरू व्हायचा.

आजचा दिवस नव्हे संध्याकाळ ही त्याचं वेळापत्रक बिघडवण्यासाठीच उजाडली होती. घरातले सगळे जण लग्नसमारंभाला गेले होते आणि रात्री उशिरा परतणार होते. घरात दुसरं कोणीच नव्हतं आणि नेहमी 7 वाजेपर्यन्त उठणारा श्री नेमका 8-8.15 ला उठला. मोबाईल वर अलार्म लावला होता पण चार्जिंग नसल्याने तोही एक-दोनदा वाजून बेशुद्ध झाला. श्रीकांत ला जाग आली आणि डोळे किलकिले करून पाहिले तर घरातल्या काळोखाला बघून तो धाडकन उठला. "अजून पाच दहा मिनिटांनी उठूया" हा नेहमीचा डायलॉग विसरलाच. छातीतली धडधड कमी झाल्यावर त्याला आठवलं की आज आपण घरात एकटेच आहोत. तो अंथरुणातून उठला, लाईट लावून घड्याळ बघितलं तर रात्रीचे आठ वाजले होते. मोबाईलला शिव्या घालत उचललं आणि चार्जिंग च सलयं लावलं. तो धावत बाथरूम मध्ये पळाला, मग लक्षात आलं आज पाणी पण आपल्यालाच भरायचं आहे. पाणी जायला अर्धा तास बाकी होता, शेवटची कळशी उठून पिंप भरून तो घाईघाईत फ्रेश व्हायला जातानाच नेमका सांडलेल्या पाण्यावरून पाय घसरून पडला. कळवळत उठून अंघोळीला गेला, या सगळ्या गोंधळात 9.30 झाले. अजून रात्रीच जेवण बाकी होतं. बाहेरच कुठल्यातरी हॉटेलमध्ये जेऊन तो ऑफिससाठी पळणार होता. शेवटी एकदाचा तयार होऊन, घर बंद करून तो घराबाहेर पडला. खिशाला परवडेल त्या ठरलेल्या हॉटेलवर आला, आणि..........पुन्हा वेटिंग मध्ये उभा राहिला. आज वेळ त्याच्याबरोबर नव्हती या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. पंधरा-वीस मिनिटांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला जागा मिळाली आणि त्यानंतर जेवण. या सगळ्या प्रकारात रात्रीचे 10.30 वाजले होते. ऑफिसमध्ये उशिरा पोहोचणं साहजिक होतं, त्यामुळे "कशाला उगाच रिक्षाला पैसे घालवा, येईल बस इतक्यात" या कंजूस विचाराने तो बस स्टोप वर बसची वाट पाहत बसला. इअर फोन कानाला लावले आणि गाणी गुणगुणत राहिला. पंधरा मिनिटे होऊनही बस आली नाही यामुळे आता तो थोडा अस्वस्थ झाला. अति उशीर होतोय हे लक्षात येत होत. आज रस्ताही गुंतागुंतीचा वाटत नव्हता. 11 वाजून गेले आणि बरोबर 11.05 ला ऑफिसमधून त्याला फोन आला, “अरे श्रीकांत आहेस कुठे तू? तू कधी येणार मग मी कधी निघणार? त्यात तुझा साथीदार नाही... तू नेहमी वेळेवर येतोस म्हणून मी आज तुला ओव्हर द्यायला थांबलॊ आणि आजच तुला उशिरा यायचा होत? अरे कितीतरी फॉरेनर्सची फ्लाईट आहे ते रात्री 2-3 पर्यंत येतील, काही VIP थांबले आहेत इथे, अरे खूप डिटेल्स आहेत. कधी येतो आहेस? हे सगळं सांगेपर्यंत अर्धा तास जाईल आणखीन..तू कधी येणार? का मीच नाईटला थांबू..जातच नाही घरी आणि खातो बायकोच्या शिव्या..तुम्हा नवीन लोकांना वेळेचं महत्त्व कसं नाही रे, अरे बोल काहीतरी?" पराग सर चिडून बोलत होते. त्यांची बडबड आणि रडगाणं चालूच होत. अखेरच्या प्रश्नानंतर त्यांनी थोडा श्वास घ्यायला अल्पविराम घेतला आणि तितक्यात श्रीकांत उत्तरला, "सर मी निघालोच आहे, पण अर्धा तास झाला बस नाही आणि कोणी रिक्षावालाही तयार होत नाहीये यायला, म्हणे आपल्या गेस्ट हाऊस च्या गार्डन जवळ "भूत आहे" गेटपर्यंत नाही सोडू शकत, चालत जा म्हणतात, आता यांना पैसेही द्यायचे आणि एवढं चालत पण यायचं तेही रात्रीच. काय ही दादागिरी?" त्याने अर्धी तर थापच मारली. हे ऐकताच पराग सर मात्र आणखीन जोरात खेकसला, "अरे शहाण्या (खरं तर मूर्ख) माणसा.. एवढ्या रात्री कुठून बस मिळणार आणि आज बसचा संप आहे. न्यूज बघतोस का?" या प्रश्नाने, "दिवस झोपण्यात घालवल्यावर न्यूज केव्हा बघू? तुमच्यासारखे नशीबवान आम्ही कुठे?" असा उलट सवाल विचारावा की परिस्तिथीच गांभीर्य लक्षात घेऊन माफी मागावी या संभ्रमात असतानाच पराग सर पुन्हा खवळले, "जी रिक्षा मिळेल ती पकड आणि ये चालत गार्डनपासून, भूत वगैरे काही नसत रे... आपले फॉरेनर्स नाही का येत अपरात्री?" त्यावर श्री पण वैतागून म्हणालाच, "अहो त्यांच्यासाठी कंपनीची गाडी असते त्यांना कशाला कोणतं भूत झपाटेल? मी एकटा कसा येऊ?" "अरे तुला सांगितलं ना असं काही नाही. ये तू बिनधास्त आणि भुताने झपाटलं ना तर आहेत खूप ओळखीचे तांत्रिक बाबा..मारतील झाडूने आणि काढतील अंगातलं भूत...." त्याला हसताना ऐकून, मोबाईल मध्ये घुसून त्या सरच्याच कानाखाली झाडू हाणावा असं वाटलं श्रीकांतला अन तो पुढे म्हणाला, "ठीक आहे सर, आज मी अर्जंट लिव्ह घेतो... येताच नाही ऑफिसला मग तुम्ही करा शिफ्ट आणि काय ते बघा बायकोचं...मी चाललो माघारी " हे ऐकून मात्र सर नरमाई वर उतरला, "नाही रे बाबा, भूत नाहीये इथे... तू ये ..जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर ये..." सरांना असं वेठीस दारात आल्याचं समाधान श्रीकांतच्या मनाला झालं आणि त्याच यशाच्या धुंदीत त्याने रिक्षावाल्याला हाक मारली, "भैयाजी स्टार साईट गेस्ट हाऊस चलोगे?" "चलुंगा साहब लेकिन गार्डन के पहले छोड दूंगा... भूतवाला गार्डन है वो, बादमे झगडा नहीं करना .. चलना है क्या?" "चल बाबा, पुढे मी पाहून घेईन (भुताला) " आणि एकदाचा तो रिक्षात बसला. रात्रीचे पावणे बारा वाजत आले होते.

शहर झोपायच्या तयारीत होत... काही रस्ते पांगले होते.. वर्दळ कमी झाली होती...काही जण तर गाढ झोपी गेले होते .. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून रिक्षाने वेग घेतला.. सव्वा बारा - साडे बाराच्या मधल्या वेळात रिक्षा गार्डन च्या आधी येउन थांबली. "साब.... " श्री आढेवेढे न घेता, कोणत्याही विनंतीच्या फंदात न पडता रिक्षातून उतरला, पैसे दिले अन पुढच्या रस्त्यावरून चालत भुताळी गार्डनमध्ये शिरला... भुताला आपल्याला झापाटायचं असेल तर कुठूनही गेलो तरी गाठ्णारच, तेव्हा शोर्ट कट नेच जाऊया.. असा विचार करून तो आत शिरला.. दुरून रिक्षावाला थांबून बघत होता, "और एक शिकार " अस काहीतरी पुटपुटत त्याने रिक्षा फिरवली. आतमध्ये जितक्या धैर्याने श्री शिरला होता तितक्याच जास्त पटीने तो आत शिरताच चरकला होता... पानांची होणारी सळसळ आणि सुटलेला गार वारा, त्याने पावलं झटापट चालवायला सुरुवात केली.. अर्ध गार्डन पार झाल आणि कसलीच चुळबूळ, सावट दिसलं नाही म्हणून त्याने निश्वास सोडला... थोडा बिनधास्त पुढे चालू लागला... अन... थबकला... भूत वगैरे त्याला दिसलं नाही पण एक तर्राट झालेला म्हातारा एका बेंचवर बसला होता, त्याची अवस्था बघून तरी तो त्याला भूत वाटला नाही. तो धीराने त्याच्या समोरून गेला.. पण म्हातारा आडवा आलाच... "बिडी हाय का?" त्याने विचारलं... "नाही..." "मग तुमची ती हाय फाय शीगारेट हाय का?.. ती बी चालल" त्याने त्यालाही नकारार्थी मान हलवली, म्हातारा हसला, "बर.. भूत गाठंल त्याआधी निघून जा..." श्रीला त्याच्याशी बोलायला अन घाबरायला वेळ नव्हताच, आधीच खूप उशीर झाला होता; तो चार पावलं पुढे चालला अन.. “म्हातारा भुताला घाबरत नाही ?? कि हाच सगळ्यांना घाबरवतोय मुद्दाम ? साला... ह्याच्यामुळे एवढी पायपीट करावी लागली ... बघतोच याला” म्हणत श्री मागे वळला .. अगदी तिसऱ्याच क्षणी .. तो काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात... मागे कुणीच नव्हत.. तो एकटाच उभा होता त्या भकास गार्डनमध्ये...

इतक्या लगेच हा म्हातारा गायब झाला... ????? म्हातारा होता कि भूत? मग मला काहीच का केल नाही ? पुढे तो फक्त प्रश्नांच्या जाळ्यात अडकला .. ज्याची उत्तर कोणाकडेच नव्हती... मी ह्या म्हातार्याचा शोध लावणारच.. मनाशी ठरवून तो निघाला... ऑफिसमध्ये तो पोहोचला. पराग सर त्याची वाटच पाहत होते, त्यांना त्याला लवकर डीटेल्स देऊन मोकळ व्हायचं होत कारण गेस्ट ना पिक अप करण्यासाठी एक गाडी पुढच्या अर्ध्या तासात निघणार होती. शेवटी सिनिअर्स ना मिळणाऱ्या सुख सुविधा मोठ्याच असतात आणि श्रीकांतला "बिनधास्त ये" म्हणून सांगणारा सर स्वतः भुताच्या भीतीने रात्रीच जाण येण टाळायचा. सर निघून गेल्यावर आणि सगळ काम आटपल्यावर थोड रील्याक्स होत श्रीने सोबतच्या एका मदतनीस म्हणून आलेल्या मित्राबरोबर विषय काढलाच, "का रे गण्या त्या गार्डन मधल्या भुताला कोणी पाहिलंय का? कि नुसत्याच हवेतल्या गप्पा ?" गणेशने त्याच्याकडे सांशक नजरेने पाहिलं.. श्री उत्तरला, "अरे आज रात्री साडे बाराच्या दरम्यान मी आलो तिथून, कोण भूत वगैरे नाही दिसलं"
गण्या - मला नाही माहीत. पण चार - पाच लोकांना झपाटलेल आहे इकडे त्याने, असं ऐकलंय.
श्रीकांत - तुला काही स्व अनुभव ?
गण्या - नाही आणि प्लिज मला भीती वाटते अशा विषयांची, तेव्हा गप्प बस.
श्रीकांत - कोणीही भूत वगैरे नाहीये अरे.. जो चांगला त्यासोबत सगळंच चांगलं आणि जो वाईट त्यासोबत सगळंच वाईट. सगळी फसवणूक आहे. काहीतरी गौडबंगाल वाटत मला तर तिथे. तुला माहितीय आज मी येत होतो तर............
गण्या- मला ऐकायचं नाहीये.
गणेश तिथून उठून कामाला लागला.. पण तो काहीतरी लपवत होता हे स्पष्ट जाणवत होत आणि त्या अस्पष्ट बोलण्यामागे भीतिने थरथरणार त्याच अंग देखील त्याने न्याहाळलं होत.. पण विषय मात्र पुढे वाढू शकला नाही.

पुढचे चार पाच दिवस गेले. पण गार्डन मध्ये न पाहिलेलं भूत काही त्याला स्वस्थ बसू देईना... त्याचा हिशोब सरळ सकट होता... भुतांवर त्याचा विश्वास नव्हता, मुळात असं काही असत ही तो अंधश्रद्धा मानायचा, त्यामुळे जर या गार्डनमधल्या भुताला त्याला पाहायला मिळालं असत तर एक अविश्व्सनीय प्रकारावर त्याचा विश्वास बसला असता आणि जर तिथे कोणीही भूत नसेल तर गार्डनमधून जाण्याचा रस्ता मोकळा झाला असता आणि भूत नाहीये याची खात्री लोकांना पटली असती. लोकांच्या निदान त्याच्या इथल्या स्टाफ च्या मनातली भीती दूर करून तो फेमसचं होणार होता, न जाणो नकळत त्याचा त्याच्या नोकरीत फायदाही झाला असता. म्हणजे एकंदर त्याचा दोन्ही बाजूनी फायदाच होता. हातात फक्त एकंच महिना होता त्यानंतर रात्रपाळी संपणार होती आणि त्याची साईट देखील बदलणार होती. जे करायचं ते आत्ताच. त्याने पुन्हा त्या गार्डन ला जाण्याचं ठरवलं... भले रात्री - मध्यरात्री नाही तरी, जितक्या उशिरा जमेल तितक्या उशिरा.. एकटं जायचं आणि गाठायचं भुताला नाहीतर म्हाताऱ्याला. त्याचा निर्धार पक्का होता.. त्याने त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याला थोडा मस्का मारून "मी रात्री थोडा उशिरा येईन आणि हवं तर सकाळी ओव्हर द्यायला थांबेन.. तू 9 तासांची ड्युटी संपवून माझ्याआधी लवकर जा, मी उशिरापर्यंत थांबेन" असं सांगून रात्री उशिरा येण्याचा मार्ग मोकळा करून घेतला. त्या रात्री तो एक बस स्टोप आधीच उतरला आणि गार्डनमध्ये शिरला.. मनाशी ठरवून की आज म्हातारा दिसला तर त्याला प्रश्नांच्या जाळ्यात अडकवणार. गार वारा, काळोख आणि रातकिड्यांची किरकिर वातावरण भयाण करायला सोबत होतीच. नाही म्हंटल तरी लांब लांब का होईना पण 2-3 विजेचे दिवे होते तिथे. त्यातच तो तर्राट झालेला म्हातारा त्याच बेंचवर बसलेला दिसला... अगदी त्या रात्रीचाच प्रसंग पुन्हा घडला... श्रीकांत ने मनाशी बरंच काही ठरवलं होत पण "बिडी हाय का?" म्हाताऱ्या ने विचारलं... "नाही..." असं एवढंच संभाषण झालं. जणू काही श्रीकांतवर कोणी जादू केली असावी. तो पुढे गेला अन त्याला तिथे येण्याचं कारण आठवलं... पुन्हा तेच... मागे कोणीच नव्हतं... नक्की काय झालेलं मला? का नाही मी विचारू शकलो त्याला काहीच? नाकी -डोळी ठीकठाक धडधाकट असलेला म्हातारा भूत नाही हेच सत्य आहे.. मग मी का गप्प झालो? कोण आहे तो? या असल्या प्रश्नांची उत्तर त्याला शोधायची होती म्हणून रात्री उशिरा गार्डनमधून ऑफिसला येण्याचा त्याने नित्यक्रम केला होता... पण ददरोज तोच प्रकार घडायचा... श्रीकांत म्हाताऱ्यासमोर काही बोलूच शकायचा नाही आणि आठवल्यावर मागे मान फिरवेपर्यंत म्हातारा गायब व्हायचा. दोन-चार-सहा-आठ दिवस झाले हेच चालू होतं. ह्याबाबत त्याने त्याच्या सहकाऱ्याला कैलाशला सांगितलं...तोही नवीनच होता पण बिनधास्त होता, नोकरीची पर्वा नसणारा, काहीतरी काम करतोय हे दाखवण्यासाठी फक्त यायचा.. बाप मोठा बिझिनेसमॅन पण पोरावर विश्वास नाही त्यामुळे नोकरी करायचा. शेवटी एका रात्री नेहमीप्रमाणे श्रीचं बोलणं ऐकून तो बोलला, "चल, उद्या मी पण येतो तुझ्याबरोबर ,बघतोच म्हातारा कसा गायब होतो ते..." दोघांनी काहीतरी प्लॅन ठरवून दुसऱ्या दिवशी उशिरा येण्याचं काहीतरी कारण सिनिअर ला कळवलं. श्रीकांत ला आत्ता थोडा हुरूप आला होता.. एकाला दुसऱ्याची साथ. धडधाकट माणसाला भूत समजणाऱ्या मुर्खांना आणि त्या म्हाताऱ्याला आता धडा मिळणार होता.

दुसऱ्या रात्री दोघे गार्डनमध्ये पोहोचले...

श्रीकांत आधी पुढे जाणार आणि मागून कैलाश येऊन म्हाताऱ्याला पकडणार असं ठरलं. नेहमीप्रमाणे तो गार्डन मध्ये शिरला.. म्हातारा त्याच बेंचवर बसला होता. नेहमीच तेच संभाषण झालं आणि नेहमीप्रमाणेच श्री संमोहित पण झाला... तो पुढे गेला आणि भानावर आल्यावर त्याने मागे वळून पाहिलं. पुढचं काम कैलाशचं होतं. कैलाश आणि म्हातारा यांचं बोलणं चालू होत. म्हातारा त्याला विचारत होता, "बिडी हाय का?" कैलाशने एक डोळा मारत, "हाय फाय सिगारेट आहे.. हवी का? चल घेच फुल पाकीट आणि यापुढे....."(लोकांना फसवणं बंद कर असं तो म्हणणार त्याआधी ...) त्याला काही बोलू न देता म्हाताऱ्याने त्याचा गळा एका हाताने घट्ट पकडला... त्याची पकड मजबूत होत चालली होती अन कैलाश त्या हाताचा विळखा सोडू शकत नव्हता... श्री हे दोन पावलं अंतर राखून पाहत होता.. पण जागेवरून हलू देखील शकला नाही... "अरे ए सोड त्याला...मरेल तो " हे एवढंच तो ओरडू शकत होता.. नक्की काय चाललं आहे हे दोघांना कळायच्या आत म्हाताऱ्याचं रूप पालटलं.. रागाने डोळे लाल झालेले, धडधाकट दिसणारा तो ..त्याच्या हाता-पायांची हाडं दिसू लागली.. शरीरावर मास राहील ते नावापुरतच.. तोंडाचा जबडा वाकडा झाला होता... गालापासून मानेपर्यंत टाके घातल्याचे निशाण दिसत होते... भयंकर रूप झालेलं... त्याला पाहिल्यावर त्याच्या त्या दयनीय अवस्थेची कीव करावी की या क्षणी तोंडातून ओकारी बाहेर यावी.. काहीही घडू शकत होतं, ज्याची जशी मानसिक अवस्था तशी प्रतिक्रिया..... तो म्हातारा जोराने किंचाळलाच, " मरूदे ह्याला... मरायलाच हवा.. तसं बी ह्य व्यसन त्याला जितेपनी म्हारणार हाय.. सिगारेट फुकतोस ना र... फुकून फुकून च तुझी जिंदगी फुकट जाणार ... नंतर तडफडत जीव जाण्यापेक्षा आत्ताच ह्याचा जीव घेतो... माझ्या हाताचा इळखा नरडं दाबून टाकंल... मरेल ह्यो... आत्ताच... मी बी जित्तेपनी म्येलो.. क्यान्सरनं.. लै फुकायचो, दारू प्यायचो.. झिजून झिजून म्येलो... माझं व्यसन पोराला लागलं... माझ्या नजरेसमोर त्यो मेला.. ह्या बिडीमुळेच, तू बी मरणार... म्हणून आत्ताच मारतो...."

"नाही नाही पिणार.. शिवणार पण नाही.. बघणार पण नाही... माफ कर .. सोड मला.." कैलाश थरथरत्या आवाजात जसं जमेल तसं बोलला... "न्हाई सोडणार, तुला जिंदगीची फिकर नाय, कदर बी नाय.. तव्हा जिंदगी जगायचा हक बी नाय ... तूला व्यसनाचा अन त्यापाई कॅन्सरचा इळखा जकडणार त्याआधी मीच मुक्त करतो तुला...." तो म्हातारा किंचाळला... तंबाखूच्या व्यसनामुळे श्रीकांतच्या एका आत्याला कॅन्सर झाला होता.. तिची मृयूच्या वेळची दयनीय अवस्था त्याच्या नजरेसमोर आली, म्हाताऱ्याच्या बोलण्यामागचा अर्थ कळाला आणि त्याने आजपर्यंत हे रूप त्याला का दाखवलं नाही ह्याच उत्तरदेखील मिळालं... पण समोरचा कैलाश... त्याला गमावायचं नव्हतं त्याला... बहुतांशी भुताचा सामना करणं शक्यच नव्हतं पण आजपर्यंत याच भुताने त्याला काहीच केलं नव्हतं म्हणून एकदा तरी बोलून समजावण्याचा त्याने प्रयत्न करायचं ठरवलं...तो म्हणाला, "म्हातारबा.. अहो त्याला माहीतच नव्हतं तो काय चूक करतो आहे ते.. मग अशी उगाचच शिक्षा का देताय त्याला?... एकदा माफ करा.. " कैलाश... पण गयावया करत होता...पुढे बऱ्याच वेळा नंतर त्याचा गळा म्हाताऱ्याने सोडला. "जा... सोडला तुला... पण एक ध्यानात ठेव.. पुन्हा जर सिगारेट, दारू अन कशाकडे पण वळलास.. तर... भूतं...कवा बी आनी कुठं बी येऊ शकतात... एक डाव माफ केलं तुला.. शेवटचं..जा निघ इथून आनी इथं जे बी घडलं अन का घडलं ते कुणाला बी कळायला नगो..भ्या (भीती) हे हवंच" दोघांनीही तिथून धूम ठोकली, आपल्यासोबत के काही घडलं ते काय होत यापेक्षा ते का घडलं याचाच विचार कैलाश करत होता... कुठलंही व्यसन न करण्याचा मनोमन त्याने निर्णय घेतला. जीवनाचा अर्थ फक्त मौज मजा, पैसा उडवणं हा नव्हे तर त्या जीवनाचा आदर राखण आणी त्याला जपणं हा देखील आहे... हे नवीन काहीतरी त्याला कळलं होत.

राहता राहिला श्रीकांतचा प्रश्न... तर तो त्या रात्री नंतरच्या रात्रीही त्या गार्डन मध्ये गेला होता... म्हातारा तिथेच होता.. धडधाकट... आज श्री संमोहित नाही झाला. काहीच न बोलता त्या म्हाताऱ्यासमोर उभा राहिला.. म्हातारा म्हणाला, "जिंदगी नाही जिता आली पण ह्ये मरण जगतोय आत्ता... तू गूनी हायस.. तसाच राहा.. ह्या (वि)इशापासून अन विळख्यापासून दूर राहा" त्यानंतर धुक्यात कुठंतरी त्याचा आत्मा दिसेनासा झाला.. श्री ला तो परत कधीच दिसला नाही... पण हो; व्यसन करणार्यांना तो अजूनही विळख्यात अडकवतो, अन भीतीचा धाक दाखवून कॅन्सरच्या विळख्यात अडकवणाऱ्या व्यसनातून मुक्त व्हायला सांगतो...

श्रीकांत मात्र "भूतं म्हणजे धोका" असं समीकरण पार विसरून गेला होता... "चांगल्यांसोबत चांगलंच होत" यावर त्याचा पक्का विश्वास बसला होता... अन जिवंत असेपर्यंत तरी त्या समाजसेवी मृतात्म्याला तो मनोमन हात जोडणार होता...

…………. मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर लिहलय...व्यसनमुक्तीचा छान संदेश दिला आहेत.
लिहित रहा.

Happy कन्सेप्ट आवडला.
पण शेवटी खूप सोपं करून/ समजावून सांगितलं आहे ते टाळून वाचकांवर सोडून दिलं असतं तर जास्त मजा आली असती. ही गोष्ट वाचून डोक्यात विचारांचा भुंगा काही काळ रहात नाहीये. सिगारेटचं पाकीट दिसलं आणि मानगूट पकडली इतकं स्पष्ट करून थांबवली असती तर इम्प्याक्ट वाढला असता. (असं मला वाटलं, राग मानू नका)

Happy

आभार.

पटेश