ही पोस्ट हरवलेल्या कथांची नाहीये. किंवा 'आजकाल पूर्वीसारखे काही राहिले नाही' म्हणत सध्या जे पोस्ट येतात ना तशीही नाहीये. किंवा 'गेले ते दिवस', 'बालपणीचा काळ सुखाचा वगैरेचीही नाहीये. सॉरी बोअर केलं. तर ती अशा काही वस्तूंची किंवा गोष्टींची आहे ज्या आपल्याला त्या त्या वेळी खूप प्रिय असतात आणि अचानक गायब होतात. परवा (म्हणजे कधीतरी रीसेंट्ली ) , स्वनिकची आवडती चादर सापडेना. तोही निमित्त काढून खेळत बसला. आम्ही मग त्याला लवकर झोपवायचे म्हणून चादर शोधायला लागलो. सर्वात पहिला भीतीदायक विचार मनात आला तो म्हणजे बाहेरून येताना कुठे विसरलो तर नाही ना? बराच वेळ झाल्यावर एका ठिकाणी मिळाली आणि हुश्श झालं. पण अशा काही गोष्टी असतात ज्या हरवल्या तर बरेच दिवस, महिने आणि वर्षेही वाईट वाटत राहते. त्या, वस्तूंबद्दल ही पोस्ट.
शाळेत असताना माझा एक स्केचपेन चा बॉक्स होता. त्यातला नेमका काळाच स्केचपेन हरवला. त्यामुळे कुठेही काही रेघा काढायच्या म्हणलं की त्याची आठवण यायची. किती शोधला, पण मिळाला नाही. तसेच आठवीत असताना आजोबांनी आणलेला एक शाईपेन होता. मला त्याने लिहायला खूप आवडायचं. म्हणजे उगाच लिहीत बसायचे त्याने इतका प्रिय. एक दिवस तो असाच गायब झाला. शाळेत हरवला नव्हता हे नक्की होतं. घरात खूप शोधला. इतकं वाईट वाटायचं की तो पेन असता तर आपलं अक्षर किती छान आलं असतं असे विचार मनात यायचे. कधीतरी सहा महिन्यांनी घरात कुठेतरी तो मला अचानक परत सापडला. त्याची शाई सुकून गेली होती. मी धुवून छान लिहायला पाहिले पण तो पूर्वीसारखा उठत नव्हता. त्याची नीब बदलली त्यामुळे तर अजूनच खराब झाला. मग माझाही मूड निघून गेला आणि त्याचं माझं प्रेम तिथेच संपलं.
एकदा घरी एक गंमत झालेली, एक पळी होती, ती अचानक गायब झाली. शोधली पण कुठे मिळाली नाही. आई नेहेमीप्रमाणे,'कमाल झाली बाई, कुठे गेली असेल' असा विचार करतच राहिली. आणि जवळ जवळ महिना-दोन महिन्यांनी, एक दिवस छोट्या डब्यातली चटणी (काळ मसाला ) संपलीय म्हणून मी काढायला गेले तर त्यात पळी दिसली. आजही तो सीन आठवतो. का? तर आपल्या समोर रोज असणारी, दिसणारी अशी वस्तू गायब झाली की समोरून कुठे गेली हा विचार छळत राहतो आणि तो काही केल्या जात नाही. विक्सची बाटली, सॉक्स, फोन अशा पटकन हाताशी न लागणाऱ्या वस्तू आणि आता तर इथे होती म्हणत आपण खाजवलेले डोके.
काही हरवणाऱ्या वस्तूंमधे आपण दुसऱ्या कुणीतरी हरवलेल्या वस्तूही आहेत. त्यात एखाद्या प्रिय ड्रेसची ओढणी किंवा सलवार हरवली तरी असे वाईट वाटायचे. आता ती कशी हरवू शकते? असा कुणी विचार करू शकते. तर त्याला एकच उत्तर, 'धोबी' आणि इस्त्रीवाले' . मग तो ड्रेस पडूनच राहणार ना कायमचा. आणि त्यांना बोलूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्यालाच त्रास. कितीही नवीन जोड त्याला आणले तरी त्या ड्रेसची मजा निघून गेलेली असते. तसेच एखादे कानातले, त्यातील एक हरवले की संपलेच ना. आणि बरोबर तेच आपल्याला सर्व ड्रेस वर सूट होणारे कानातले असते.
तसे पुन्हा घ्यायचे म्हणले तरी त्यात तो आनंद नाहीच.
हरवणाऱ्या वस्तूंमध्ये चोरीला जाणे हा एक मोठा विषय आहे. असेच एकदा शाळेत असताना मला नवीन स्लीपर आणले होते, पांढरे आणि निळ्या पट्ट्यांचे. अगदी पहिल्याच दिवशी घालून गेले आणि ग्राऊंड वरून कुणीतरी ते चोरून नेले. नवीन चप्पल हरवले म्हणून बोलून घेतलं ते वेगळंच पण ते हरवले याचं दु:खं अजूनही आठवतं. त्यानंतर चोरीला गेलेली अजून एक वस्तू. (नशिबाने माझा फोन तरी हरवला नाहीये अजून. आता संदीप म्हणेल उगाच कशाला बोलतेस. ) पण संदीपने एकदा मला एक ब्लू टूथ गिफ्ट दिला होता. तो मुंबईत कुठेतरी चोरीला गेला. असे त्याकाळी महागडे घेतलेले गिफ्ट हरवले म्हणून मला वाईट वाटले ते एक आणि त्याचे ऐकून घ्यावे लागले ते वेगळेच. त्यामुळे १० वर्षे झाली तरी तो ब्लू टूथ अजूनही माझ्या लक्षात आहे. माझ्या तरी याच दोन गोष्टी लक्षात आहेत. पण बरेच लोकांनां गाडी, पर्स, प्रवासाचे सामान, अशा अनेक चोऱ्यांचा त्रास नक्की झाला असणार. आणि त्यात गमावलेली वस्तू मग कायम लक्षात राहते.
कधी कधी जुने मित्र-मैत्रिणीही, जुनी नातीही असेच असतात. त्यात त्या वेळी खूप प्रिय असलेले लोक, रोज भेटणारे, नाही भेटले तर फोनवर बोलणारे. पण एकदा स्वत:च्या किंवा त्यांच्या नवीन विश्वात हरवले की शोधूनही आपल्याला सापडत नाही. त्यांच्यातलं आपलेपण सापडत नाही. आणि पुन्हा कधी मिळाले तरी त्यातला तो आनंद निघून गेलेला असतो. पण मन मात्र त्या जुन्या आठवणी काढतंच राहतं, हरवण्याचा आधीचे ते सोबतचे दिवस. त्यांच्याही हरवलेल्या यादीमध्ये आपण असू का? असो. तुम्हालाही येते का अशा हरवलेल्या गोष्टींची आठवण?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
खुप छान
खुप छान
लिस्ट तशी मोठी नाही पण तरिही
लिस्ट तशी मोठी नाही पण तरिही .....

१. "ती"ने दिलेला पेन
२. माझा पहिलावहिला SAMSUNG फोन
३. माझे bluetooth headphone
४. लग्नात घेउन तिथेच एक तासात हरविलेले Red Chief Sandals (रु.१६९९/-)
लग्नाच्या आधी म्हणजे प्रेमाचा
लग्नाच्या आधी म्हणजे प्रेमाचा इजहार वैगेरे झाल्यावर माझ्या नवर्याने (तेव्हा तो नवरा झाला नव्हता. भविष्यात होणार होता) वाढ्दिवसाला मला एक अंगठी गिफ्ट दिलेली. ती घरी किंवा घरातल्यासमोर घालायची नाही म्हणुन मी माझ्या पर्सच्या छोट्या कप्प्यत ठेवायची. बरीच वर्ष म्हणजे ६-७ वर्ष तरी - अगदी आमचं लग्न ठरेपर्यंत होती माझ्या कडे. बर्याच पर्स बदलल्या तरी.

मग लग्न ठरलं - झालं. आणि ती अंगठी कुठे हरवलीच
अजुनही मला खुप वाइट वाटतं आठवण आली की. त्यावेळची ग्रिटींग्ज वैगेरे आहेत अजुनही जुन्या फोल्डर मधे पण ती अंगठी नाहीच.
मित्रमैत्रिणींनी तात्पुरत्या
मित्रमैत्रिणींनी तात्पुरत्या घेऊन हरवून टाकलेल्या माझ्या वस्तू आहेत काही त्या अजूनही लक्षात आहेत माझ्या.
मोठा पसारा होईल त्याबद्दल लिहायचे तर. वेगळी पोस्ट टाकेन कुठेतरी. मस्त आठवण करून दिलीत.
माझी मैत्रिण मिनल ने ७ वीत
माझी मैत्रिण मिनल ने ७ वीत पहिल्या बेंच वर आम्हाला दोघींना बसवल्यावर गिफ्ट म्हणून दिलेल्या लाकडी डबीत पाय हलवणार्या लेडीबग ची किचेन.माझ्याकडे असलेली सर्वात ग्रँड वस्तू होती ती.अजूनही तशी कुठे दिसली तर नक्की विकत घेते.
लग्न झाल्यावर पहिल्यांदा घरी गेल्यावर धाकट्या मावस सासूबाईंनी दिलेली मीनाकारीची चांदीची साडीपिन.
दहावीचे पेपर लिहिलेले शाईचे
दहावीचे पेपर लिहिलेले शाईचे पेन. पर्पल मार्बल वर्क होते त्यावर. बहिणीने दिले होते.
एक लखलखते हिरा सदृश्य कानातले. दुसरे वायाच की मग.
नवीन मराठीत असताना एक नवा टेनिस बॉल घेतला होता विलास स्टोअर्स मधून. दोन वात्रट मुलानी तो खेळायला घेतला. व हरवून टाकला किंवा चोरला. आय स्टिल मिस इट.
म्हणजे मीच एकटी दोक्यात जमा
म्हणजे मीच एकटी दोक्यात जमा करुन ठेवत नाही.
किती छोट्या वस्तू असतात पण एकदा हरवल्या की कायम मनात राहतात. उलट बाकी वस्तू ज्या जुन्या होऊन बाजूला पडतात त्यान्चि किम्मत इतकी राहात नाही.
धन्यवाद कमेन्टबद्दल .
विद्या.
मला फक्त हरवलेल्या महत्वाच्या
मला फक्त हरवलेल्या महत्वाच्या वस्तु लक्षात राहतात.
लेटेस्ट हरवलेली वस्तु - स्कूटरची चावी. लिफ्टच्या गॅपमध्ये पडली आणि सापडलीच नाही. आफ्टर इफेक्ट - बहिणीची बोलणी.. स्कूटर तिची आहे.
होणार्या नवर्याने दिलेली पहिली दोन गिफ्ट्स - पेन ड्राईव आणि सीझेड डायमंडची चमकी. आफ्टर इफेक्ट - मग त्याने गिफ्ट देणं बंद केलं
आईला बाबांनी दिलेली चेन कधी नव्हे ती मी घातली - हरवली की ट्रेनमध्ये चोरीला गेली माहित नाही...- आफ्टर इफेक्ट - सांगायला हवेत का. आईने फटके दिले नाहीत नशिब.
आईचं हिरोचं पेन - आफ्टर इफेक्ट - वरचे विधान डिट्टो...
दोन मोबाईल - स्कूटरच्या ओपन डिक्कीतून उडुन पडले रस्त्यात. एक २००४ मध्ये एक २००७ मध्ये...आफ्टर इफेक्ट - प्रचंड हळहळ...
आणि वस्तुंमध्ये नाही गणना होत पण हरवलेली नाती..:(
इ-मेलची सुरुवात झाली ती
इ-मेलची सुरुवात झाली ती `रीडिफ मेल`पासून. नंतर `जीमेल`वर अकाउंट उघडल्यावर तिकडे दुर्लक्ष झालं. पण असू द्यावं म्हणून ते खातं चालूच ठेवलं. आता एक-दीड वर्षांपूर्वी त्याचा पासवर्ड विसरला. खूप प्रयत्न करूनही तो आठवेचना. कळीच्या प्रश्नांची 20 वर्षांपूर्वी दिलेली उत्तरंही चुकीची येत गेली.
... तर तो `पासवर्ड` हरवला आणि इ-मेलचं ते पहिलं खातंही!
आयुष्यात जेवढे कमावले नाही
आयुष्यात जेवढे कमावले नाही तेवढे हरवले आहे. थॅन्क्स टू माझा विसरभोळा स्वभाव. पावसाळाच्या एका सीजनमध्ये ३-३ छत्र्या हरवल्या आहेत. पायातली चप्पलही कित्येकदा हरवली आहे. आजही ऑफिसमध्ये पेन घेऊन कोणाच्या जागेवर गेलो की ते तिथेच विसरून येतो, किंवा नाही घेऊन गेलो तर त्याचे घेऊन येतो. कित्येकदा बिलाचे पैसे द्यायचे विसरलो आहे की दुकानदारांनी पाठीमागून भाईसाब करत हाका मारल्यात.. काय लिहू आणि काय नाय.. प्रतिसादाचा नाही हा लेखाचा विषय आहे..
बाकी सेंटी मारायचे तर माझी मस्ती हल्ली हरवल्यासारखी वाटते.. उफ्फ ये समाज के आदर्श ये उसूल पाळताना गंडलीय.. सोशलसाइटवरच काय ती थोडीफार मजा करतो..