सध्या मी 'शिक्षण कोणत्या माध्यमात घ्यावे' ह्या विषयावरचे काही लेख आणि चर्चा पाहिल्या. त्यासोबत 'प्रमाण भाषा कुठली असावी / असावी का?' असेही प्रश्न उद्भवलेले पाहिले. ह्या प्रश्नांवरती अजून माझे मत काही एक असे बनलेले नाही, परंतू ज्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल जरा सर्वांसमोर मांडावे ह्या उद्देशाने हा लेख लिहितो आहे. ह्या सर्व चर्चा ऐकताना/ वाचताना असे जाणवले की अनेकांना संशोधन नक्की कसे चालते ह्याची नीट कल्पना नसते. शिवाय 'अमुक एक भाषा ही ५ वर्षात ज्ञानभाषा होऊ शकेल' वगैरे बाता करताना इतर ज्ञानभाषांनी काय काय सोसले/ जिंकले आहे ह्याची देखील माहिती त्यांना नसते. तेव्हा विज्ञान संशोधनात लेखांचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने भाषेचे महत्त्व काय ते आपण पाहू, म्हणजे ह्यात इंग्रजीने काय मक्तेदारी राखली आहे हे दिसून येईल.
सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक संशोधक काही न्यूटन/आइनस्टाईन नसतो. किंबहुना सध्या जगात 'संशोधक' असा किताब लावणारे लाखो असतील; त्यांच्या सगळ्यांच्याच संशोधनाचा परिणाम काही जग हलवून टाकणारा नसतो. परंतू त्यांनी अभ्यासलेला छोटा-छोटा विषयसुद्धा एकूण संशोधनाच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक संशोधन हे अनेक पातळ्यांवर चालते, जसे शासकीय संशोधन संस्था (इसरो/नासा प्रमाणे), इतर संशोधन संस्था, विज्ञान/अभियांत्रिकी विद्यापीठे, संशोधनाला वाहिलेल्या कंपन्या किंवा अनेक कंपन्यांमध्ये असणारे 'संशोधन आणि विकास' विभाग (आर अॅण्ड डी) इत्यादी. ह्यातील प्रत्येक संशोधन म्हणजे कुठल्यातरी अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर काढण्याचा एक प्रयास असतो. मग तो प्रश्न कुठलाही असू शकतो - 'विश्वाची निर्मिती कशी झाली' सारखा मोठा प्रश्न किंवा 'तीनचाकी सायकलला दोन बाजूला पोचे पाडले तर ती अधिक वेगात धावू शकेल का' सारखा छोटा प्रश्न.
आता अश्या प्रश्नांचे तुम्ही जे काही उत्तर शोधून काढाल त्याला 'संशोधन' म्हणवून घेण्यासाठी एक प्रकारची मान्यता अपेक्षित असते (येथे मान्यता दत्त अपेक्षित नाही). ती मान्यता मिळवण्यासाठी जगात एक सर्वमान्य प्रणाली आहे आणि सर्वच संशोधक ह्या प्रणालीचा अवलंब करतात. ती म्हणजे असे संशोधन कुठल्यातरी मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित करणे. ते प्रकाशित करण्या आधी तुमच्या विषयातल्या २-३ तज्ज्ञ संशोधकांकडून त्याचे परीक्षण केले जाते. त्यांना तुमचा शोधनिबंध प्रकाशनायोग्य वाटला तरच तो प्रकाशित होतो. एवढ्यावर भागत नाही. तुमच्या पुढे किती संशोधक त्यांच्या निबंधामध्ये तुमच्या निबंधाचा उल्लेख (ज्याला सायटेशन असे म्हणतात) करतात, किंवा दुवा देतात, त्यावर तुमच्या संशोधनाचा 'इम्पॅक्ट' ठरतो. शिवाय त्या जर्नलच्या २ किंवा ५ वर्षातील सर्व लेखांचा 'इम्पॅक्ट' हा त्या जर्नलचा 'इम्पॅक्ट फॅक्टर' ठरवतो. तुम्ही जितक्या अधिक इम्पॅक्ट फॅक्टर वाल्या जर्नलमध्ये लेख प्रकशित कराल, तितके तुमचे संशोधन उच्च दर्जाचे समजले जाते. आता इम्पॅक्ट फॅक्टर ग्राह्य मानावा का, हा मुद्दा वादग्रस्त आहे; त्याबद्दल नंतर केव्हातरी लिहीन. परंतू सर्वसाधारण हे असे आहे.
नमनाला घडाभर तेल ओतल्यानंतर आता मुख्य विषयाकडे वळू. तर सांगायची गोष्ट अशी, की जगात एकूण संशोधनापैकी सर्वात जास्त, प्रचंडपणे संशोधन हे इंग्रजीमध्ये प्रकाशित होते. तुम्ही कितीही आदळ-आपट करा, जगातील एकूण इंग्रजी भाषकांची संख्या कमी दाखवा, परंतू ही वस्तुस्थिती आहे. काही इतर भाषेत देखील जर्नल्स आहेत, नाही असे नाही. जर्मन, पोर्तुगीझ, स्पानिश, रोमन भाषेतील काही नावाजलेली जर्नल्स आहेत. परंतु त्यांनी देखील अनेक वर्षांच्या उत्तमोत्तम प्रकाशनानंतरच नाव कमावले आहे. स्वभाषेत संशोधन करणार्या नावाजलेल्या संशोधकांची परंपरा त्यांच्याकडे इंग्रजीच्या बरोबरीने आली आहे. चिनी भाषेत देखील प्रचंड संशोधन प्रकाशित होते, परंतु ते इतर लोक कित्पत वाचत असतील, शंकाच आहे! जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीझ इत्यादी भाषेतील संशोधक देखील आता मोठ्या प्रमाणात इंग्रजीकडे वळत आहेत. ह्या सर्व भाषेतील प्रकाशित संशोधनाचे प्रमाण इंग्रजीच्या तुलनेने अतिशय कमी आहे.
मराठीत देखील काही प्रकाशने आहेत. परंतु त्यांचा आवाका सध्या अगदीच नगण्य आहे. त्यांना 'इम्पॅक्ट फॅक्टर' जवळ जवळ नाहीच. तुम्हाला स्वभाषा ही ज्ञानभाषा व्हावी असे वाटत असेल, तर त्या भाषेत (माध्यम धरून) संशोधन होणे गरजेचे आहे. त्या संशोधनाला मान्यता मिळावी म्हणून त्या त्या विषयातले परंतु तुमच्याच भाषेतले तज्ज्ञ परीक्षक सापडणे आणि तितके दर्जेदार जर्नल असणे गरजेचे आहे. ह्यासाठी त्या भाषेत दर्जेदार संशोधन प्रकाशित करणार्या संशोधकांची परंपरा हवी. हे मुद्दल जोपर्यंत नाही, तोपर्यंत ती भाषा ज्ञानभाषा होणे अशक्य आहे.
सध्या परिस्थिती अशी आहे, की तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन प्रकाशित कराल, तितके तुमचे नाव अधिक होते. जितके नाव होईल, तितके इतर पुरस्कार, आर्थिक साहाय्य अधिक मिळते, तितके तुम्ही आणखी दर्जेदार साहित्य खरेदी करून संशोधन जास्त करू शकता. अश्या प्रकारे तुमचा नोबेल किंवा अन्य पुरस्कारांचा मार्ग सुकर होतो. ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील होते. इन्ग्रजी जर्नल्स मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचाच संदर्भ मोठ्या प्रमाणावर दिला जातो आणि तो तसा आपल्या निबंधासाठी दिला जावा म्हणून तो देखिल इंग्रजीत लिहिला जातो. हे चक्र भेदणे प्रचंड अवघड आहे! भारतीय संशोधकांचे लेख मोठ्या प्रमाणावर 'भाषा शुद्ध नाही' ह्या कारणावर नाकारले गेलेले मी पाहिले आहेत. वर दिलेली साखळी लक्षात घेता 'भारतीय संशोधक नोबेल स्पर्धेत मागे का' ह्यातील एक कळीचा मुद्दा तुम्हाला आता लक्षात येईल.
तर हे सर्व पाहता निदान विज्ञान विषयक संशोधनात इंग्रजीची मक्तेदारी आहे हे सत्य मान्य करणे भाग आहे. राहता राहिला प्रश्न 'आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी का?' ती व्हावी किंवा नाही याबद्दल हा लेख नाही, परंतू 'ती नजिकच्या भविष्यात तशी होऊ शकते का' ह्याचे स्पष्ट उत्तर 'नाही' असे खेदाने द्यावे लागेल.
मुद्द्दा इतकाच मी
मुद्द्दा इतकाच मी सायंटीस्टनीच योग्य भाषेत डॉक्युमेंट करायला हवं असं नाहीये. योग्य डोक्युमेंटेशन स्कील्स असणार्या लोकांची मदत घ्यावी, कोलॅबरेट करावं आणि करतात. >>> परफेक्ट रार
क्ष पेक्षा ६० % ने अधिक" असं
क्ष पेक्षा ६० % ने अधिक" असं डॉक्युमेन्ट करणं हे चांगल्या संशोधकाचं लक्षण आहे. >>> होय. पण हे माझं निरीक्षण मी ' संशोधन करताना" मराठीत लिहिलं काय आणि इंग्रजीत लिहिलं काय किंवा साईन फॉर्म मधे लिहिलं काय ? काय फरक पडतो.
ते प्रसिद्ध करायची वेळ येईल तेव्हा मी जर उत्तम पेपर लिहिणार्याकडून ते 'सायंटीफीकली रीडेबल आणि अॅक्सेप्टेबल' भाषेत लिहून घेऊ शकतेच.
<हे डोक्युमेन्ट केलं नाही तर
<हे डोक्युमेन्ट केलं नाही तर ठरवणार तरी कसं की ते चांगलं संशोधन आहे, असं मी म्हणते आहे. >
संशोधकाची भाषा वापरलेली नसली, तरी कामाचं स्वरूप कळतंच. त्यावरून कामाचा दर्जा कळतोच.
माझ्यासाठी संशोधन = संशोधन करणे + ते छापणे.
<योग्य डोक्युमेंटेशन स्कील्स
<योग्य डोक्युमेंटेशन स्कील्स असणार्या लोकांची मदत घ्यावी, कोलॅबरेट करावं आणि करतात.>
अशी स्कील्स असलेल्या व्यक्तीला संशोधनाची भाषा अवगत असायला हवी. म्हणजे ती व्यक्तीही संशोधन ज्या विषयातलं आहे, त्याच विषयातली हवी. तिथे केवळ भाषा, शैली यांना महत्त्व देऊन चालणार नाही.
Re : चिनूक्सचे वाक्य - खरेतर
Re : चिनूक्सचे वाक्य - खरेतर क्ष पेक्षा ६०% जास्त असेच असले पाहिजे, असेही नाही, असे मला वाटते. much more पेक्षा greater (than) ... अशी आकडा नसलेली रचनासुद्धा चालत असावी. फक्त काही शब्द, काही वाक्प्रचार, हे बरेच अस्पष्ट असतात, ते संशोधकाने टाळावे, अशी अपेक्षा असते. मी स्वतः माझ्या एका पेपरमध्ये Let us च्या ऐवजी Let's सारखे प्रकार केले होते. तेही ह्याच श्रेणीतले म्हणता येईल. ह्या अशा गोष्टी स्वभाषा नसेल, तर पटकन लक्षात येत नाहीत.
माझ्यासाठी संशोधन = संशोधन
माझ्यासाठी संशोधन = संशोधन करणे + ते छापणे. >> +१. एक म्हणजे बरेच पेपर्स वाचायला इतके अवघड असतात, की ते रेफरीने वाचले हेच खूप आहे. त्यात अजून कुणीतरी संशोधन रीडेबल बनवणारा ते वाचून ते बरोबर करेल आणि तुम्हाला पाहिजे त्या भाषेत तो लिहून देईल, ही अपेक्षा अवास्तव वाटते.
भास्कराचार्य, नाही. निदान
भास्कराचार्य,
नाही. निदान माझ्या विषयात असं मोघम लिहिलं जात नाही. greater than मध्ये कितीने हे महत्त्वाचंच आहे. आमची सगळी मोजमापं नॅनोस्केलची असतात. स्टेबिलिटी जास्त होती, म्हणजे कितीनं जास्त होती हे तासांच्या हिशेबात सांगावेच लागते.
शंतनूनी त्याच्या पोस्ट मधे
शंतनूनी त्याच्या पोस्ट मधे क्लीयर केलंय -
१. मला पब्लिश करण्याबद्दल म्हणायचे आहे, थॉट प्रोसेस बद्दल नाही.,
२. बेसिक कॉन्सेप्ट्स समजणे महत्त्वाचे - अगदी बरोबर आहे. त्यासाठी मातृभाषा सोयीची असते किंवा नसते ह्यावर वाद आहेत. लेखाचा विषय तो नाही.
३. कदाचित लेखाचे शीर्षक 'विज्ञान संशोधन लेखनातील इंग्रजीची मक्तेदारी - असे हवे. संशोधक नसलेल्या अनेकांना संशोधनात पब्लिश करणे काय असते ते माहित नसते. त्यांना ह्यावरून थोडीफार कल्पना आली तरी चांगले आहे.
"संशोधन करण्यात इंग्रजीची मक्तेदारी " आणि "केलेलं संशोधन लिहिणं जर्नल्स मधे / लोकांसाठी यात असलेली इग्रजीची मक्तेदारी" या दोन विषयात खूप फरक आहे इतकंच मला वाटतं. आणी त्यावर चर्चा होतीये इथे. यातला 'इंग्रजीची मक्तेदारी' हा मुद्दा वगळून चर्चा होऊ शकणार नाही या विषयावर.
चार्य, मी एक जनरल उदाहरण
चार्य, मी एक जनरल उदाहरण दिलं.
निदान माझ्या विषयात असं मोघम लिहिलं जात नाही. greater than मध्ये कितीने हे महत्त्वाचंच आहे. आमची सगळी मोजमापं नॅनोस्केलची असतात. > +१
चिनूक्स, अच्छा. गणितात
चिनूक्स, अच्छा. गणितात इंट्रोडक्शनमध्ये किंवा कंजेक्चर लिहीताना मोघम लिहीणे अलाऊड आहे. (अर्थात रेफरी जितके मान्य करेल तितकेच.) पण त्याचीही वर म्हटल्याप्रमाणे पद्धत असते.
शीर्षकात थोडंफार मोघम चालतं.
शीर्षकात थोडंफार मोघम चालतं. म्हणजे शीर्षकात 'low temperature' असं म्हटलं तरी चालतं. इण्ट्रोमध्ये किती लो हे लिहावंच लागतं.
आपण पेपर पाठवत असलेलं जर्नल अमेरिकी की ब्रिटिश यावरूनही काही गोष्टी ठरतात. उदाहरणार्थ, aluminium आणि aluminum.
बरेच संशोधक आपल्या गाईडच्या भाषेत पेपर लिहू लागतात. माझं तसं झालं आहे.
अशी स्कील्स असलेल्या
अशी स्कील्स असलेल्या व्यक्तीला संशोधनाची भाषा अवगत असायला हवी. म्हणजे ती व्यक्तीही संशोधन ज्या विषयातलं आहे, त्याच विषयातली हवी. >> आता तर हे स्पेशलाईझ्ड ट्रेनिंगचे विषय आहे. आमच्या अनेक कॉनफरेन्सेस्ला लोकं ट्रानस्लेटर वापरतात टॉक देताना देखील.
कालच मि. एम शी यावर बोलत होते. त्यांच्या फिल्ड मधे रशियात खूप काम होतं. अॅबस्ट्रॅक्ट किंवा की वर्ड्स मॅच झाले, अपीलींग झाले तर लोक आर्टीकल्स ट्रानस्लेट करून घेतात. अश्या सर्व्हीसेस आहेत स्पेशलाईझड ट्रानस्लेशनच्या.
फार्मा मधल्या standard operating procedures ट्रान्स्लेट करायचे मी भारतात असताना. कंपनीमधे फ्लोवर वरच्या कामगारांना देण्यासाठी. ह्या कामाचे पैसे देखील मिळायचे तेव्हाही. आता तर अजूनच बदललंय आणि प्रोफेशनल झालंय सगळं.
रार, मी पेपर लिहिण्याबद्दल
रार,
मी पेपर लिहिण्याबद्दल बोलतोय. भाषांतराबद्दल नव्हे. विषयातलं ज्ञान नसताना मी रनॉ गाडीचे ब्लूप्रिंट फ्रेंचमधून इंग्रजीत भाषांतरीत केले आहेत. भाषांतर आणि मुद्रितशोधन यांच्या सेवा खूप पूर्वीपासून उपलब्ध आहेत.
पेपरही लिहून मिळतात, लिहून देणारेच जर्नलांकडेही पाठवतात, पण आपण चांगल्या इम्पॅक्ट फॅक्टरच्या जर्नलांबद्दल बोलतोय, आणि तिथे छपण्यायोग्य पेपर लिहून मिळतात का, याबद्दल मी साशंक आहे.
आमच्या फील्ड मधे चांगल्या
आमच्या फील्ड मधे चांगल्या लॅब्समधे 'सायंटीफीक रायटर' च्या ऑफीशीयल पोझीशन्स आहेत. अॅकॅडेमीया मधे सुद्धा.
त्यातले खूप लोकं स्वतः त्या विषयातली पीचडी वगैरे असतात. पण त्यांना स्वतःला लॅब वर्क, रीसर्च करण्यात इंटरेस्ट नसतो. त्या पोझिशनची डिमांड आणि एक्स्पेक्टेशनच ग्रॅट रायटींग, पेपर रायटींग, लिटरेचर सर्च करून नोट्स काढणे ही आहे. principle investigators लोकं , पोस्टडॉक्स फक्त रीसर्च काम करतात. लिखाणात वेळ देत बसले तर तेवड्यात दुसरं कोणी पब्लीश करून मोकळं होऊ शकतं, इतक्या काही लॅब्स शोधामधे क्लोझ असतात.
विद्यापीठांमध्येसुद्धा?
विद्यापीठांमध्येसुद्धा? आमच्या विषयात असं नक्की नाही. खाजगी कंपन्यांमध्ये आहेत, विद्यापीठांमध्ये नक्की नाहीत.
उलट विद्यापीठात प्रमाण
उलट विद्यापीठात प्रमाण वाढतंय. कारण खूप बेसिक रीसर्च विद्यापीठात होतोय. त्यातुन मग स्टार्टप्स येतात. मग बिग कंपन्या ती टेक्नॉलॉजी अॅप्लीकेशनला वापरतात, किंवा स्तारटप्स मर्ज करून घेतात. हे आधी कमी होतं, आता जास्त वाढलंय.
मी मर्क ला होते तेव्हा आमच्याच ग्रुपनी इव्हॅल्युएशन रीसर्च करुन २ स्टार्टप्स, स्टेम सेल मधल्या मर्ज करुन घेतल्या. त्यातली एक फ्रेंच. ह्या लँग्वेज प्रोसेसेंग मधून मी स्वतः गेलीये, काम केलंय.
असो.
पण ह्या चर्चेच्या निमितानं वेगवेगळे पर्स्पेक्टीव्हज, कामाच्या पद्धती , काय काय प्रकारच्या थॉट प्रोसेस ह्याबद्दल मस्त इंटारेंस्टींग, आणि माहिती देणारं कळतंय इतरही फिल्ड मधलं हे फार मस्त आहे.
आपण अनेकदा आपल्याला माहित असलेल्या गोष्टींवर बेस्ड-च ठाम काही बोलत असतो. असा वेगळा अँगल, माहिती विचार करायला लावते. छान आहे ही चर्चा.
आमच्या विषयात असं काहीच नसतं.
आमच्या विषयात असं काहीच नसतं. खाजगी कंपन्याच नाहीत. टाईपसेटींग वगैरे सर्व स्वतःलाच करावे लागते.
आमच्या विषयातही नाही. कंपन्या
आमच्या विषयातही नाही. कंपन्या मोजक्याच आहेत. तिथे पेटंट लिहायला लोक असतात. विद्यापीठांमधले संशोधक आपलं आपण लिहून छापतात.
मोघम भाषेत कोणी लिहित असेल
मोघम भाषेत कोणी लिहित असेल किंवा जनरल विधान करत असेल तर तो चांगला संशोधक होऊच शकत नाही. चिन्मयने लिहिलेल्या उदाहरणाच्या भाषेत जर कोणी पेपर सोडा, मास्तरशी बोलला असता तरी त्वरित योग्य पाणउतारा करून एखादी संधी आणखी देऊन घराचा रस्ता दाखवला असता.
स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात जर आपण काय केलं ते सांगता येत नसेल तर जे काय केलं आहे त्यात अजून काम करण्याची जरुरी आहे. वाक्यरचना, भाषा, मांडणी इ. मध्ये मदत समजू शकतो. रायटर हा डंब सायंटिफिक इंग्रजी लिहू शकेल. कोर स्टेटमेंटस गोलमाल असतील तर मग कठीण आहे.
कंपनीत पेटंट ड्राफ्ट करायला मदत मिळते तरी क्लेम्स स्वतःचे स्वतः स्वच्छ लिहावेच लागतात. मदत लीगल/ खाचाखोचा / प्रायर आर्ट सर्च स्वरूपाची असते.
लिहिताना / कुठलही विधान करताना ते एकतर तुम्ही सिद्ध करा किंवा आधी कोणी सिध्द केलं असेल तर त्याचा रेफरन्स द्या. एक्स्ट्रापोलेट करून काही मांडायचंच असेल तर असं माझं मत आहे/ असं मला वाटतं अशा प्रकारची वाक्यरचना करा. पुरावे द्या. चर्चा करा. भोंगळ/ वरवर/ पुरावा नसताना काहीही लिहू नका. अवतरण शक्यतो देऊच नका, दिलीच तर कमीत कमी आणि रेफरन्स देवून द्या. हे काही कठीण आहे का? हायस्कूल पास पोराला इतकं समजलच पाहिजे. सायंटीस्ट पर्यंत जायची काही गरजच नाही.
मोघम भाषेत कोणी लिहित असेल
मोघम भाषेत कोणी लिहित असेल किंवा जनरल विधान करत असेल तर तो चांगला संशोधक होऊच शकत नाही. >> मान्य. पण ह्यात इंग्रजीची मक्तेदारी असण्याचा संबंध नाहीये. आपला विषय 'विज्ञान संशोधनातली इंग्रजीची मक्तेदारी' असा आहे. आणि काही लोकांचं इथे असं मत आहे की संशोधनासाठी इंग्रजी-च येण्याची गरज असते-च असं नाही.
संशोधनात कॉनसेप्ट्स , केलेलं काम, त्याबद्दल विचार पक्कं असण्याची गरज असते. आणि ते इंग्लीश मधे असलं म्हणाजेच पक्कं आहे /पक्कं असतं असं नाहीये. अधिक अॅक्युरेटली म्हणायचं तर निदान मला तरी तसं वाटत नाही, माझ्या माहितीत असलेल्या अनेकांच्या उदाहरणावरुन, चर्चेवरुन, ऑब्झरवेशन्स वरून.
संशोधनात कॉनसेप्ट्स , केलेलं
संशोधनात कॉनसेप्ट्स , केलेलं काम, त्याबद्दल विचार पक्कं असण्याची गरज असते.
हे तर नक्कीच. ज्ञान, संशोधन कुठल्याहि भाषेत होऊ शकते,
पण त्याचे वाजवी श्रेय मिळणे हा वेगळा मुद्दा आहे.
त्यासाठी ते सगळे प्रसिद्ध करायला नि त्याचे वाजवी श्रेय मिळायला सध्या तरी इंग्रजी तून लिहीले तर अधिक फायदा होतो.
कदाचित उच्च गणित शास्त्रात भाषेपेक्षा गणिताची कॉमन भाषा म्हणजे चिन्हे, म्हणजे बेरजेसाठी मोठा सिग्मा, इन्टेग्रल चे चिन्ह, वगैरे. लिहून भाषेचा प्रश्न मधे येणार नाही. ती चिन्हे बहुधा सर्व भाषीयांना माहित आहेत.
आइन्स्टाइन ने त्याच्या संशोधनावर जर्मन मधून पुस्तके लिहीली, त्यांचे निरनिराळ्या भाषांमधून लोकांनी भाषांतर करून घेतले कारण त्या संशोधनाचा दर्जा तेवहढा उच्च मानला जातो.
वर भोंगळ लिहिणारा ही चांगला
वर भोंगळ लिहिणारा ही चांगला संशोधक असू शकतो अशी चर्चा वाचली. त्याला मदत मिळाली पाहिजे असही वाचलं. प्राथमिक शिक्षण कुठल्या भाषेत घ्या हे ही वाचलं. याचा कशाचाच मूळ लेखाशी संबध नाही. पण चर्चेच्या ओघात ते विषय आले. बाकी भोंगळ लिहायला भाषेचं बंधन नाहीच.
भारताच्या अनुषंगाने विचार केला तर (इतिहासाचा अपवाद जो वर वाचला) भारतीय भाषांत वैज्ञानिक साहित्य प्रकाशित होत नाही/ भाषांतरीतही होत नाही. भारतीय एकाही भाषेत अद्ययावत ज्ञान आज उपलब्द आहे का? एकूणच अनेक क्षेत्रात इंग्रजीत ज्ञान उपलब्ध आहे तर संशोधनाची भाषा, (आता संशोधन करताना तुमच्या शेजारच्या व्यक्तीशी किंवा गाईडशी किंवा आणि कोणाशी संभाषण लोकल भाषांत केले तर ती संशोधनाची भाषा होत नाही.), संशोधन झाले हे जगाला सांगायला त्यातील मान्यवर व्यक्तींना सांगायला जी भाषा वापरतात ती भाषा इंग्रजी आहे का? वर भाचा म्हणतात तसे जर्मन/ जपानी/ हिब्रू गणितज्ञ जर त्या भाषेत पेपर लिहित असतील तर त्या क्षेत्राची ती भाषा असेल.
तर ज्ञानी व्हा अधिकाधिक ज्ञानी व्हा.
संशेधन झालं हे ज्यांना सांगितलं तर कळेल / समजेल/ जे अप्रीशीट करतील तो समूह, त्या समूहाला जी भाषा समजते ती त्या क्षेत्राची भाषा. याला अपवाद असतील पण ते नियम सिद्ध करण्यापुरतेच.
भारतीय भाषा दूर राहिली. शेकडो
भारतीय भाषा दूर राहिली.
शेकडो वर्षांच्या प्रयत्नांनी विज्ञान, संशोधन यांच्या क्षेत्रात इंग्रजी भाषेने जे वर्चस्व मिळवले त्या मार्गावर आपण केवळ गेल्या वीस तीस वर्षात चालू लागलो आहोत. विज्ञान, संशोधन यात प्रगति, यश नेत्रदीपक जरूर आहे, पण तेव्हढे यश भाषेला मिळायला शतके लागतील.
अशी स्कील्स असलेल्या
अशी स्कील्स असलेल्या व्यक्तीला संशोधनाची भाषा अवगत असायला हवी. म्हणजे ती व्यक्तीही संशोधन ज्या विषयातलं आहे, त्याच विषयातली हवी. तिथे केवळ भाषा, शैली यांना महत्त्व देऊन चालणार नाही.
<<
अशा मदतनिसांनी संशोधन ढापून आपल्या नावावर खपवायचे प्रकार होतात का?
तुमचं लॉजिक स्ट्राँग असेल तर
तुमचं लॉजिक स्ट्राँग असेल तर योग्य तो सिंटॅक्स वापरून प्रोग्राम करणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी झाली ना +१
कालच मि. एम शी यावर बोलत होते. त्यांच्या फिल्ड मधे रशियात खूप काम होतं.
>>
रार = जेम्स बाँड??
<अशा मदतनिसांनी संशोधन ढापून
<अशा मदतनिसांनी संशोधन ढापून आपल्या नावावर खपवायचे प्रकार होतात का?>
भारतात विद्यापीठांमध्ये आणि सरकारी किंवा खाजगी प्रयोगशाळांमध्ये पेपर लिहून देणार्या व्यक्ती नाहीत. पेपर लिहिता न येणारे बाहेरून मदत घेतात, पण असे पेपर स्वतःच्या नावानं खपवता येत नाहीत. 'आम्ही पेपर लिहून देतो आणि जर्नलांकडे पाठवतो' असं सांगणार्या खाजगी कंपन्या आहेत. त्या अशा सेवा पुरवतात. पण ती जर्नलं अगदीच टुकार, इम्पॅक्ट फॅक्टर नसणारी, केवळ प्राध्यापकांच्या बढत्यांसाठी काढलेली असतात. त्यांना शून्य किंमत असते.
तस्मात केवळ पेपर लिहिणारे संशोधन ढापून आपल्या नावावर खपवतील, ही शक्यता नाही.
Pages