विज्ञान संशोधनातील इंग्रजीची मक्तेदारी

Submitted by शंतनू on 18 June, 2016 - 06:07

सध्या मी 'शिक्षण कोणत्या माध्यमात घ्यावे' ह्या विषयावरचे काही लेख आणि चर्चा पाहिल्या. त्यासोबत 'प्रमाण भाषा कुठली असावी / असावी का?' असेही प्रश्न उद्भवलेले पाहिले. ह्या प्रश्नांवरती अजून माझे मत काही एक असे बनलेले नाही, परंतू ज्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल जरा सर्वांसमोर मांडावे ह्या उद्देशाने हा लेख लिहितो आहे. ह्या सर्व चर्चा ऐकताना/ वाचताना असे जाणवले की अनेकांना संशोधन नक्की कसे चालते ह्याची नीट कल्पना नसते. शिवाय 'अमुक एक भाषा ही ५ वर्षात ज्ञानभाषा होऊ शकेल' वगैरे बाता करताना इतर ज्ञानभाषांनी काय काय सोसले/ जिंकले आहे ह्याची देखील माहिती त्यांना नसते. तेव्हा विज्ञान संशोधनात लेखांचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने भाषेचे महत्त्व काय ते आपण पाहू, म्हणजे ह्यात इंग्रजीने काय मक्तेदारी राखली आहे हे दिसून येईल.

सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक संशोधक काही न्यूटन/आइनस्टाईन नसतो. किंबहुना सध्या जगात 'संशोधक' असा किताब लावणारे लाखो असतील; त्यांच्या सगळ्यांच्याच संशोधनाचा परिणाम काही जग हलवून टाकणारा नसतो. परंतू त्यांनी अभ्यासलेला छोटा-छोटा विषयसुद्धा एकूण संशोधनाच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक संशोधन हे अनेक पातळ्यांवर चालते, जसे शासकीय संशोधन संस्था (इसरो/नासा प्रमाणे), इतर संशोधन संस्था, विज्ञान/अभियांत्रिकी विद्यापीठे, संशोधनाला वाहिलेल्या कंपन्या किंवा अनेक कंपन्यांमध्ये असणारे 'संशोधन आणि विकास' विभाग (आर अ‍ॅण्ड डी) इत्यादी. ह्यातील प्रत्येक संशोधन म्हणजे कुठल्यातरी अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर काढण्याचा एक प्रयास असतो. मग तो प्रश्न कुठलाही असू शकतो - 'विश्वाची निर्मिती कशी झाली' सारखा मोठा प्रश्न किंवा 'तीनचाकी सायकलला दोन बाजूला पोचे पाडले तर ती अधिक वेगात धावू शकेल का' सारखा छोटा प्रश्न.

आता अश्या प्रश्नांचे तुम्ही जे काही उत्तर शोधून काढाल त्याला 'संशोधन' म्हणवून घेण्यासाठी एक प्रकारची मान्यता अपेक्षित असते (येथे मान्यता दत्त अपेक्षित नाही). ती मान्यता मिळवण्यासाठी जगात एक सर्वमान्य प्रणाली आहे आणि सर्वच संशोधक ह्या प्रणालीचा अवलंब करतात. ती म्हणजे असे संशोधन कुठल्यातरी मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित करणे. ते प्रकाशित करण्या आधी तुमच्या विषयातल्या २-३ तज्ज्ञ संशोधकांकडून त्याचे परीक्षण केले जाते. त्यांना तुमचा शोधनिबंध प्रकाशनायोग्य वाटला तरच तो प्रकाशित होतो. एवढ्यावर भागत नाही. तुमच्या पुढे किती संशोधक त्यांच्या निबंधामध्ये तुमच्या निबंधाचा उल्लेख (ज्याला सायटेशन असे म्हणतात) करतात, किंवा दुवा देतात, त्यावर तुमच्या संशोधनाचा 'इम्पॅक्ट' ठरतो. शिवाय त्या जर्नलच्या २ किंवा ५ वर्षातील सर्व लेखांचा 'इम्पॅक्ट' हा त्या जर्नलचा 'इम्पॅक्ट फॅक्टर' ठरवतो. तुम्ही जितक्या अधिक इम्पॅक्ट फॅक्टर वाल्या जर्नलमध्ये लेख प्रकशित कराल, तितके तुमचे संशोधन उच्च दर्जाचे समजले जाते. आता इम्पॅक्ट फॅक्टर ग्राह्य मानावा का, हा मुद्दा वादग्रस्त आहे; त्याबद्दल नंतर केव्हातरी लिहीन. परंतू सर्वसाधारण हे असे आहे.

नमनाला घडाभर तेल ओतल्यानंतर आता मुख्य विषयाकडे वळू. तर सांगायची गोष्ट अशी, की जगात एकूण संशोधनापैकी सर्वात जास्त, प्रचंडपणे संशोधन हे इंग्रजीमध्ये प्रकाशित होते. तुम्ही कितीही आदळ-आपट करा, जगातील एकूण इंग्रजी भाषकांची संख्या कमी दाखवा, परंतू ही वस्तुस्थिती आहे. काही इतर भाषेत देखील जर्नल्स आहेत, नाही असे नाही. जर्मन, पोर्तुगीझ, स्पानिश, रोमन भाषेतील काही नावाजलेली जर्नल्स आहेत. परंतु त्यांनी देखील अनेक वर्षांच्या उत्तमोत्तम प्रकाशनानंतरच नाव कमावले आहे. स्वभाषेत संशोधन करणार्‍या नावाजलेल्या संशोधकांची परंपरा त्यांच्याकडे इंग्रजीच्या बरोबरीने आली आहे. चिनी भाषेत देखील प्रचंड संशोधन प्रकाशित होते, परंतु ते इतर लोक कित्पत वाचत असतील, शंकाच आहे! जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीझ इत्यादी भाषेतील संशोधक देखील आता मोठ्या प्रमाणात इंग्रजीकडे वळत आहेत. ह्या सर्व भाषेतील प्रकाशित संशोधनाचे प्रमाण इंग्रजीच्या तुलनेने अतिशय कमी आहे.

मराठीत देखील काही प्रकाशने आहेत. परंतु त्यांचा आवाका सध्या अगदीच नगण्य आहे. त्यांना 'इम्पॅक्ट फॅक्टर' जवळ जवळ नाहीच. तुम्हाला स्वभाषा ही ज्ञानभाषा व्हावी असे वाटत असेल, तर त्या भाषेत (माध्यम धरून) संशोधन होणे गरजेचे आहे. त्या संशोधनाला मान्यता मिळावी म्हणून त्या त्या विषयातले परंतु तुमच्याच भाषेतले तज्ज्ञ परीक्षक सापडणे आणि तितके दर्जेदार जर्नल असणे गरजेचे आहे. ह्यासाठी त्या भाषेत दर्जेदार संशोधन प्रकाशित करणार्‍या संशोधकांची परंपरा हवी. हे मुद्दल जोपर्यंत नाही, तोपर्यंत ती भाषा ज्ञानभाषा होणे अशक्य आहे.

सध्या परिस्थिती अशी आहे, की तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन प्रकाशित कराल, तितके तुमचे नाव अधिक होते. जितके नाव होईल, तितके इतर पुरस्कार, आर्थिक साहाय्य अधिक मिळते, तितके तुम्ही आणखी दर्जेदार साहित्य खरेदी करून संशोधन जास्त करू शकता. अश्या प्रकारे तुमचा नोबेल किंवा अन्य पुरस्कारांचा मार्ग सुकर होतो. ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील होते. इन्ग्रजी जर्नल्स मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचाच संदर्भ मोठ्या प्रमाणावर दिला जातो आणि तो तसा आपल्या निबंधासाठी दिला जावा म्हणून तो देखिल इंग्रजीत लिहिला जातो. हे चक्र भेदणे प्रचंड अवघड आहे! भारतीय संशोधकांचे लेख मोठ्या प्रमाणावर 'भाषा शुद्ध नाही' ह्या कारणावर नाकारले गेलेले मी पाहिले आहेत. वर दिलेली साखळी लक्षात घेता 'भारतीय संशोधक नोबेल स्पर्धेत मागे का' ह्यातील एक कळीचा मुद्दा तुम्हाला आता लक्षात येईल.

तर हे सर्व पाहता निदान विज्ञान विषयक संशोधनात इंग्रजीची मक्तेदारी आहे हे सत्य मान्य करणे भाग आहे. राहता राहिला प्रश्न 'आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी का?' ती व्हावी किंवा नाही याबद्दल हा लेख नाही, परंतू 'ती नजिकच्या भविष्यात तशी होऊ शकते का' ह्याचे स्पष्ट उत्तर 'नाही' असे खेदाने द्यावे लागेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी लोकसत्ता की अजुन कुठे इतिहासकार राजवाडे यांच्या संदर्भात लेख वाचलेला. त्यात असे होते की राजवाड्यांनी जे काही संशोधन केलेय ते फक्त मराठी भाषेतच लिहिलेय म्हणून.

मराठीत संशोधन करुन मराठीत छापायला मेकॉलेच्या थडग्याने किंवा व्हिक्टोरियाच्या आत्म्याने विरोध केला आहे का ?

खुशाल मराठीत संशोधन करुन छापा ...

हर्पेन, सध्या उत्तर राखून ठेवतो. कदाचित आणखीन एक लेख लिहीन.

Aarchimay, शक्य आहे. माझ्या वाचनात सुद्धा भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे मराठी जर्नल आले होते. विज्ञान विषयात आपल्याला आणखीन भारतीय जर्नल्स माहिती असतील तर कृपया नक्की कळवा. मी 'संदर्भ' नावाचे एक नियतकालिक पाहिले होते, पण ते नवीन संशोधन प्रसिद्ध करत नसून रिव्ह्यू जर्नल आहे (म्हणजे त्यात प्रकाशित होणारे अगदीच पहिल्या वेळी प्रकाशित झालेले नसते).

सीमंतिनी, तेवढ्या एका कारणावरून मराठी माध्यमात शिकू नये हे चुकीचे आहे - कारण
१. जगात संशोधन हा एकमेव विषय नाही, शिवाय विज्ञान पण एकमेव क्षेत्र नाही.
२. बर, संशोधन ठरवलेच असेल तरी ते कोणत्या विषयात करणार आणि कोणत्या भाषेत करणार हे लहानपणापासून कुठे ठरलेले असते? तेव्हा तर विषयच माहिती नसतात.
३. कोणत्याही माध्यमात शिकलात तरी इंग्रजी शिकता येते आणि संशोधन प्रकाशनाची वेगळी अशी तांत्रिक इंग्रजी तर सगळ्याच संशोधकांना शिकावी लागते, तो अगदी लंडनमध्ये जन्मला असला तरी!

Happy आता उलट प्रतिवाद म्हणजे - इंग्रजी माध्यमात शिकले तरी मराठी शिकता येते की... त्यासाठी करियर कशाला पणाला लावायचे. अतिशयोक्तीचा दोष पत्करून मराठी म्हणजे हल्ली फक्त लिपी तर उरली आहे. अगदी मायबोलीवरचे मराठी इंग्रजी शब्दांचे प्रमाण मोजले तरी ते जाणवेल.
माझा आक्षेप "चूक" शब्दाला आहे. संशोधन करायचे व म्हणून इंग्रजी माध्यमात जायचे किंवा शास्त्र-गणित इंग्लिश मिडियम असे जर एखाद्या पाल्य-पालकाने ठरवले तर ते चूक बरोबर असे वर्गीकरण करण्यापेक्षा तो त्यांचा प्रेफरंस म्हणून सोडून द्यावे.

लहानपणी भाषा शिकणे जास्त सोपे असते आणि पुढे त्याचा जास्त फायदा होतो म्हणून दोन-तिन तरी भाषा शिकाव्या.

> सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक संशोधक काही न्यूटन/आइनस्टाईन नसतो.
सद्य लेखात हे जरा गमतिशीर आहे - त्या दोघांचेही लिहिणे इंग्रजीत नव्हते (आईनस्टानचे नंतरचे होते)

केवळ लोकसंख्येमूळे सर्वांना पुढे चिनी शिकावी लागेल असं म्हंटलं जातं. काळापूढे/काळामूळे काय हहोल ते सांगता येत नाही पण ज्या वेगानी गोष्टी बदलू शकतात त्यामूळे काहिही करणे शक्य आहे. उद्या फतवा निघू शकतो की सगळ्या विद्यालयांनी लोकल भाषेतच संशोधन प्रसिद्ध करायचं. त्याला अर्थातच विरोध वगैरे होणार.

संशोधन या सर्व गोष्टींच्या परे हवे असे मला वाटते - वैश्विक - जस्तीत जास्त लोकंपर्यंत पोचू शकेल असे
युरोपमध्येपण सगळ्यांना इंग्रजी येत नसल्याने सगळे संशोधन सगळ्यांपर्यंत पोचत नाही - पण तिथे लोकलही बर्‍याच गोष्टी होत असतात, आणि भाषांतरे पण ....

हं .... आडनाव नाही.

पण स्थळ. ऑष्ट्रेलिया !

विशिष्ट क्लासमधले , स्वतः इंग्रजी माध्यमात शिकलेले , परदेशी गेलेले .... अशा ठराविक लोकाना मातृभाषेचे उमाळे खूप येतात !

( हे माझे निरिक्षण आहे... दुखावले गेले असल्यास क्षमस्व)

मी लेख २-३ दा वाचला. विचार करतीये. महत्त्वाचा प्रश्न आहे, चर्चा होणं आवश्यक आहे असंही वाटतंय. मी यावर माझं मत लिहायचा प्रयत्न करते, पण कदाचित थॉट्स फार क्लॅरीटीने आले नाहीत मांडता मला, तर आधीच क्षमस्व. चर्चेतून कदाचित क्लॅरीटी येईल असं वाटतंय.
१) संशोधन इंग्रजीतून चालतं म्हणजे काय हे मला स्पष्ट झालेलं नाही.
संशोधनाला अ‍ॅज अ कॉन्सेप्ट कोणती भाषा नसते. ते पब्लीश होताना भाषा येते असं मला वाटतं.
मी अजूनही खूप सारं टेक्नीकल थिंकिंग पण अनेकदा मराठीतून करते. खास करून प्रेझेंटेशनच्या आधी थॉट्स रीव्हाइज करताना, स्वतःशी मुद्दे फायनलाईझ करताना. अर्थात हे करताना टेक्नीकल शब्द इंग्रजी मधेच येतात, पण विचार करण्याची प्रोसेस नक्कीच मराठी असते. कारण त्या भाषेतच लहानपणापासून विचार करायची सवय आहे, त्यामुळे केलेल्या विचारात आत्मविश्वास वाटतो.
माझे अनेक संशोधक मित्र इटालियन, जर्मन, स्पॅनीश, मॅडरीन मधून विचार करतात हे आमच्या गप्पांतून आम्ही अनेकदा एकमेकांना बोलून दाखवलंय.
ह्यानंतर लिखाणाची /पब्लीशींग ची भाषा जरी इंग्लीश असली, किंवा लिटरेचर सर्च जरी इंग्लीश मधे होत असला, तरी संशोधन , कॉन्सेप्ट मागची थॉट प्रोसेस इंग्लीश मधेच होते असं नाही मला वाटत. त्यामुळे 'संशोधन इंग्रजीतून चालतं' हे मला नीटस पटलेलं नाहीये.

२) संशोधनासाठी ( खरं तर इतरही अनेक बाबतीत, पण इथे संशोधनाबद्दल बोलतोय) बेसिक कॉनसेप्ट्स नीट समजणं आवश्यक आहे. लहान मुलं - त्यांच्या बुद्धी, आजूबाजूचा परीसर, वातावरण, शिकवणार्यांची कपॅसीटी ,बेसिक्स पक्की करण्यासाठी मिळणारी इतरांची मदत - अश्या अनेक घटकांना विचारात घेऊन - मुलं ज्या भाषेत कंफर्टेबल असतील, मग ती भाषा मराठीच हवी असं नाही, त्या भाषेत त्यांचे बेसिक्स, मूळ पक्कं होणं आवश्यक आहे.
ह्यामुळे दोन गोष्टी होतात - विषयाची आवड लागते आणि विचारात कॉनफीडन्स येतो - जो परत एकाद्या विषयाचा अधिक अभ्यास करायला उपयोगी पडू शकतो

दुर्दैवानं आज महाराष्ट्रात ज्यांच्या आजूबाजूला अशी संकल्पना पक्की करण्यासाठी काहीही मदत नाही, पालकांना ते शक्य होत नाही, शाळेत नीट शिकवत नाहीत, अशी मुलं देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकताना दिसतात. आपण फक्त उच्च, मध्यम वर्गीयांबद्दल विचार करून कनक्लूजन काढाणं योग्य नाही.
एक मोठा संख्येने विद्यार्थी वर्ग असा आहे, की ज्यांना त्यांच्या लोकल भाषेत बोलायला सांगीतलं, तर अतिशय उत्तम रित्या ते विचार करतात, प्रश्न मांडतात, आदिवासींना पोराम्ना तर जंगलाचं , झाडाफुलांचं इतकं ज्ञ्यान आहे हे मी स्वतः अनुभवलंय की ते पाहून थक्क व्हायला होतं. कारण शेवटी ते 'ऑबझरवेशनल रीसर्च ' करतात एका अर्थी अगदी लहानपणापासून. नकळत.
पण तेच त्यांना इंग्लीशमधे सांगा म्हणलं तर कॉनफीडन्स वाट्त नाही, आणि बुजतात - पर्यायी ह्या मुलाला काही येत नाही, हा ढ आहे असं कनक्लूजन काढून शिक्षक मोकळे होतात.
कुठेतरी ही सायकल ब्रेक होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि इथे कोलॅबरेशन (जे संशोधन क्षेत्रात एक की फॅक्टर आहे आजच्या जगात ) अ‍ॅप्रोच वापरायला हवा.
संशोधन करणारे आणि ते जगापर्यंत पोचवणारे एकत्र येऊन.

३) हाच भाषेचा मुद्दा थोडा वेगळ्या प्रमाणात मी पण अनुभवला. मुळात भाषा ही फक्त बोली भाषा नसून, इतरही बरंच काही येतं त्यात संशोधन करताना.
ह्यातलं सगळं लहानपणापासून शक्यच नसतं येणं/शिकणं. म्हणून बेसिक पक्के होणं हे आवश्यक आहे, कोणत्याही क्षेत्रासाठी. पुढे अ‍ॅप्लीकेशन मेथड्स, पद्दती बदलल्या तरी त्या त्या परीस्थीतीत मार्ग काढता येतात, निदान तसे ते काढायची कपॅसीटी/ अ‍ॅबीलीटी तरी येते.
उदा.
हाय थ्रूपूट मेथड्स मुळे प्रचंड डाटा जनरेट होतो, खास करून कॅन्सर रीसर्च मधे. तो अ‍ॅनालाईझ करायला 'बायोइनफॉर्मेटीक्स ' जरूरी आहे. पण मला कॉप्युटरची भाषा अजिबात येत नाही. याचा अर्थ माझा रीसर्च थांबणार का?
तर यावर उपाय म्हणून बेसिक सायन्स करणारे आम्ही, बायोइनफॉर्मेटीक्स करणार्‍यांबरोबर कोलॅबोरेशन मधे काम करतो.
प्रश्न विचारणं डाटाला हे माझं काम, माझं संशोधन - त्याची उत्तरं कॉप्युटरच्या भाषेत दुसरं कोणी द्यायला मदत करतं.

कुठेतरी ही सायकल ब्रेक होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि इथे कोलॅबरेशन (जे संशोधन क्षेत्रात एक की फॅक्टर आहे आजच्या जगात ) अ‍ॅप्रोच वापरायला हवा.

संशोधनाला अ‍ॅज अ कॉन्सेप्ट कोणती भाषा नसते. ते पब्लीश होताना भाषा येते असं मला वाटतं.

रार तीनही मुद्द्यांना प्रचंड अनुमोदन. +१

जगात समस्या व त्याही तो समुह कायमचा नष्ट होऊ शकतो अशा समस्या सगळ्या व्यक्ती व समुहांना असतात. यापुर्वीही होत्याच की. या पुढेही असतील.
म्हणुन जसे व्यक्ती म्हणुन आपले चांगले होण्यासाठी आपण आणखी मेहनत करुन चांगले करीयर करतो / अभ्यास करुन चांगले शिक्ष्ण घेतो / औषध घेऊन रोग बरा करतो त्या त्या समस्या सोडवतो तसच समुह म्हणुनही नको का करायला?
इथे जास्त मेहनम (अभ्यास व करीयर बाबत), औषधे हे सरव उपायच तर आहेत की? हे उपाय आपण करतोच की?
मग तसच समुह म्हणुन का नको?

"एवढी प्रचंड मोठी समस्या आहे" हे नुसते वर्णन करुन थांबणे हे तुमचे ध्येय आहे की,
"आता वर्णनाच्या (Description of Problem) पुढे जाऊन उत्तरावर काम करुया. हा पहिला उपाय माझ्याकडुन..." हे तुमचे ध्येय आहे?
त्याच्याने फरक पडतो. अत्ता दुस-यांकडे उत्तर नाही म्हणुन सगळ्यांनीच थांबले तर कसे होईल? कुठनतरी हे चक्र थांबायला हवे ना?
तेव्हा आत्ताजरी नाईलाजाने आपण इंग्रजी माध्यम निवडले तरी ते करत असता आपल्या १०० वर्षांच्या आयुष्यात यावरच्या उपायात काय खारीचे योगदान दिले त्याचाही विचार व्हावा.

संशोधन करताना मराठीत विचार करतो म्हणजे नक्की काय? उदाहरण देऊन सांगता आलं तर वाचायला आवडेल.

कारण जे मराठी शब्द उपलब्ध आहेत ते वापरणे, किंवा क्रियापदं, विशेषण मराठी वापरणे म्हणजे मराठी विचार नक्कीच नसेल. आपल्याला आलेले अनुभवा, मग जे कदाचित मराठी नसतील पण आपण ज्या वातावाराणार मोठे झाले त्यामुळे आलेले असतील, ते विचार करताना उपयोगी पडतात. पण याचा भाषेशी संबंध नसतो. मराठीत शिक्षण पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा (किंवा पहिली काही वर्षे) इंग्रजीत बोलताना, विचार मांडताना आधी मराठी वाक्य तयार करून मग ते इंग्रजीत बोललं जात असेल, पण काही वर्षे त्या वातावरणात राहिल्यानंतर आज असं नक्कीच होत नाही. रादर बोलताना. विचार मांडताना (कामाचेच नाही तर रोजच्या जगण्यातले ही) काय सांगायचय हे इतकं जोरात उसळी घेऊन बाहेर पडतं की बोलून झाल्यावर १० मिनिटांनी स्वतःशीच विचार केला की मी नक्की कोणती भाषा वापरली तर ते आठवत नाही. (समोरच्या व्यक्तीला मी वापरत असलेल्या दोन्ही/ अधिक भाषा येतात हे अर्थात गृहीत आहे Happy )

ज्याना इंग्रजीत बेसिक्स समजावून सांगायला कोणी नाही त्यांना स्वभाषेत बेसिक्स सांगायला नक्की कोणी आहे का? आणि लोकल भाषेत आत्मविश्वासाने बोलतात पण इंग्रजीत बुजतात याचं मूळ हे दुसऱ्याला हसणे, टिंगल करणे, भाषा आली नाही की/ चुका केल्या की चुकाच बघणे आणि विचार समजून न घेणे या प्रकारच्या mentality मध्ये आहे. जे भारतीय (आणि अनेक) समाजात आहे, ज्याची कारणे सामाजिक उतरंड इ. आहेत. एशियन, युरोपियन अनेक लोक अत्यंत आत्मविश्वासाने इंग्रजी (जे अनेकदा भाषेचा विचार केला तर चुकीचे असते) बोलतात, पण त्याना जे म्हणायचं आहे ते पोहोचवतात. त्याच्या आड accent, व्याकरण काही काही येत नाही.

बाकी कोल्य्बोरेशन असेल तर उत्तमच. पण प्रत्येक साक्षर माणसाला किमान पायाथॉन मध्ये बेसिक स्क्रिप्टीन्ग आलं पाहिजे. प्रयत्न कर, खूप सोपं आहे.

शंतनु,
लेख छान आहे.

आभि नव +१

विशेषतः महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळा बन्द होत असताना बाब चिन्ताजनक नक्कीच आहे.

बाकी कोल्य्बोरेशन असेल तर उत्तमच. पण प्रत्येक साक्षर माणसाला किमान पायाथॉन मध्ये बेसिक स्क्रिप्टीन्ग आलं पाहिजे. प्रयत्न कर, खूप सोपं आहे >>> कॉलॅबोरेशन मधे माझ्यासाठी त्यातले एक्स्पर्ट अ‍ॅनालीसीस करतानाच मी हा विचार केला. निदान ते काय बोलतात हे डीटेल नाही समजलं तरी थोडंस का होईना, निदान प्रश्न विचारण्याइतकं तरी जमलं पाहिजे असा विचार करून मी पायथॉन शिकायला घेतलं. R शिकायला सुरवात केली. कोर्सेरावरचे पायथॉन कोर्सेस केले.
कॉप्यूटरची भाषा खरंच माहिती नव्हती, पण लॉजीकल विचार केल्यास जमू शकतं हे जाणवलं.
पण हे नंतरचं. आऊट ऑफ क्युरीऑसीटी.

बाकी मराठीत विचार म्हणजे काय यावर लिहायचा प्रयत्न करते नंतर.

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.

सीमंतिनी, आपला प्रतिवाद बरोबर आहे. फक्त माझा मुद्दा वेगळा आहे. 'अमुक एका कारणामुळे कुठलेही माध्यम निवडणे चूक आहे' - हा तो मुद्दा. त्याचा अर्थ मराठीच निवडावे असा होत नाही. तुम्ही इतर सर्व बाबींचा विचार करून निवडावे.

aschig, न्यूटन आणि आईनस्टाईन यांचा उल्लेख 'सर्वच संशोधक इतके मोठे लोकप्रिय नसतात.. लाखो संशोधक छोटे छोटे विषय हाताळतात' - ह्यासाठी केला आहे. बाकी भाषांतरे व्हायला हवीत - हे पटले. तसे करण्याने ते सामान्यांपर्यंत पोहोचेल. हा लेख सामान्यांपर्यंत संशोधन कसे पोहोचेल असा नाही, तर एखादा अभ्यास 'संशोधन' म्हणून केव्हा गणला जातो (प्रकाशित केल्यामुळे), आणि त्यात कुठली भाषा वरचष्मा ठेवून आहे - ह्याबद्दल आहे.

rar, तुमचे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. त्यातला १. मला पब्लिश करण्याबद्दल म्हणायचे आहे, थॉट प्रोसेस बद्दल नाही., २. बेसिक कॉन्सेप्ट्स समजणे महत्त्वाचे - अगदी बरोबर आहे. त्यासाठी मातृभाषा सोयीची असते किंवा नसते ह्यावर वाद आहेत. लेखाचा विषय तो नाही.
३. कदाचित लेखाचे शीर्षक 'विज्ञान संशोधन लेखनातील इंग्रजीची मक्तेदारी - असे हवे. संशोधक नसलेल्या अनेकांना संशोधनात पब्लिश करणे काय असते ते माहित नसते. त्यांना ह्यावरून थोडीफार कल्पना आली तरी चांगले आहे.

अभि.नव - मी वस्तुस्थिती मांडली आहे. एखादी समस्या हाताळताना विषय समजून घेणे, समस्येच्या मुळाशी जाणे हे सुद्धा उपयोगी पडू शकते.

वरच्या काही प्रतिसादांमध्ये 'संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचवण्या'बद्दल लिहिलं आहे. त्या अनुषंगानं -

संशोधनाची स्वतंत्र भाषा असते. त्या विषयाची तांत्रिक माहिती नसेल, तर लिहिलेला मजकूर बहुतेक वेळा कळू शकत नाही. त्यामुळे संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर फक्त भाषांतर उपयोगी नाही. त्यासाठी वेगळं, स्वतंत्र लेखन व्हायला हवं. जर्नलांमध्ये पेपर लिहिताना सामान्यांनी तो पेपर वाचावा, हा हेतू कधीच नसतो.

फिजिकल केमिस्ट्रीमध्ये भारतात संशोधन करणार्‍या अनेक भारतीय संशोधकांना इंग्रजीत संशोधकाच्या भाषेत पेपर लिहिता येत नाहीत. त्यांचं काम उत्तम असतं, पण ते ज्या भाषेत लिहितात ती भाषा संशोधकाची नसते. उदाहरणार्थ, the stability with a capping agent was much more हे वाक्य. इथे much more ही भाषा संशोधकाची नाही. अशा भाषेमुळे अनेकदा काम चांगलं असूनही उत्तम आंतरराष्ट्रीय जर्नलांमध्ये भारतीय संशोधकांचे पेपर स्वीकारले जात नाहीत.

त्यामुळे संशोधन प्रकाशित करताना भाषा इंग्रजी असून उपयोगी नाही. ती संशोधनाला आणि संशोधकाला साजेशीही असावी.

बाय डीफॉल्ट वाहता धागा बनवण्याचा ऑप्शन काढून टाकून, वाहता धागा काढायचा असल्यास तशी प्रशासकांना विनंती केल्यानंतरच तो धागा वाहता करण्यात यावा, अशी सूचना या निमित्ताने मांडतो.

नेमक्या चांगल्या चर्चा वाहून जातात.

त्यामुळे संशोधन प्रकाशित करताना भाषा इंग्रजी असून उपयोगी नाही. ती संशोधनाला आणि संशोधकाला साजेशीही असावी.
>> म्हणजेच जर "ही" इंग्रजी बॉर्न अँड ब्रॉट अप इन लंडन व इंग्रजी माध्यमवाले भारतीय या सगळ्यांनाच वेगळी अशी आत्मसात करावी लागत असेल तर संशोधनासाठी म्हणुन इंग्रजी माध्यम निवडा हा दावा (सुद्धा) फोल ठरतो!!
Happy
हे वेगळे आत्मसात करणे तर मराठी वाले ही करु शकतातच की?

> त्यामुळे संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर फक्त भाषांतर उपयोगी नाही. त्यासाठी वेगळं, स्वतंत्र लेखन व्हायला हवं.

सुरुवात पॉप्युलर भाषांतरांनी होऊ शकते (तसं साहित्य त्या भाषेत उपलब्ध नसेल तर).
(बहुतांश) पेपर्स भाषांतरीत करण्यात (निदान वरील भाग झाल्याशिवाय) अर्थ नाहीच.

एक माणूस एका झाडाला मिठी मारुन बसलेला असतो. आणि ओरडत असतो ..... या झाडाने मला धरले आहे, मला सोडवा.

तिकडून एक दुसरा मनुष्य जात असतो, तो बोलतो ... मूर्खा, झाडाने तुला नाही , तू झाडाला धरले आहेस. तू सोड म्हणजे तू स्वतंत्रच आहेस.

...........

इंग्रज , इंग्रजी, मेकॉले याना शिव्या घालणार्‍यांची अवस्थाही तशीच असते.

इंग्रजीतच शिका, असा कुणाचाहाई अट्टहास सक्ती नाही, मराठी शाळाही आहेत.. पण हेच लोक तिथे जात नाहीत.
मराठीत विजिटिंग कार्ड छापू नका, दुकानाचा बोर्ड मराठीत लावू नका, असा नियम नाही, पण हेच लोक तसे वागतात.
संशोधनाचा पेपर अमूक एका भाषेतच छापा, असाही नियम नाही, पण हे लोक मातृभाषेत लिहून छापत नाहीत,

दोष मात्र मेकॉले, व्हिक्टोरिया आणि नेहरु यांना देतात.

.........

असे विचार आचरणात आणायला गट्स लागतात.

उदा. इंग्रजी काळात निजामाने इंजिनियरिंगच्या पुस्तकांचे ऊर्दूत भाषांतर करवुन घेतले होते. भारतात ३५० संस्थानिक होते म्हणे. किती लोकानी हे धाडस दाखवले ?

.........

गुगलवर engineering urdu medium असे टायपून बघा . कितीतरी कॉलेजेस मिळतील . प्रत्येक राज्यात उर्दू बोलणार्‍यांपेक्षा त्या राज्याच्या बोलीभाषेत बोलणारे लोक नक्कीच जास्त आहेत ... पण तरीही सायन्स हायर कोर्सेस उर्द्दूत मिळू शकतात , पण मराठीत नाही.संशोधन त्याच भाषेत प्रकाशित करणे सोयीचे जाते ज्या भाषेतून उच्च शिक्षण व संदर्भ उपलब्ध आहेत. कालांतराने हे विद्यार्थी उर्दूत संदर्भ लिखाण करू शकतील.

याला जबाबदार कोण ? बाबर आणि निजाम ? Proud

-------------------------------------------------------------------------

बायदवे, जे लोक अमेरिका, इंग्लंड, ऑष्ट्रेलियात जातात, त्यांची मुले तिथे कोणत्या भषेत शिकतात? मग भारतातील मुलानी इंग्रजीतून शिकले किंवा छापले तर इंटरनेटावर हाहाकार का माजतो?

माझा मुद्दा असा आहे की प्राथमिक शिक्षणापासून जर तुमची भाषा मराठी ( किंवा जी काय भाषा हवी ती) असेल तरच त्यात संशोधनासाठी उपयोगी शब्द, प्रतिशब्द यांची भर पडत जाईल. भाषा वापरलीच जात नसेल तर संशोधनासारख्या विषयांमध्ये ती वापरायची शक्यता फारच कमी.

अजून एक मुद्दा असा की आधी जग दखल घेइल असे संशोधन तर करा, ते इंग्रजी मध्ये प्रकाशित करून क्रेडेबिलिटी तर बनवा. नन्तर निवडा भाषा तुम्हाला हवी ती!

उद्या भारतातून १० विगवेगळ्ञा विषयान्वर नोबेल विजेते सापडले आणि त्यानी फक्त हिंदी जर्नल्स मध्ये लिहायला सुरुवात केली तर आपोआप हिंदी मध्ये ही बाहेरून प्रबन्ध येऊ लागतील.

आईन्स्टाईन ने सापेक्षता सिद्धांत मांडल्यानन्तर पुढचे सगळे पेपर्स हिब्रु मधून लिहिले असते तरी त्यांची दखल घेतली गेली असतीच आणि कित्येक युनिवर्सिटीज मध्ये हिब्रु शिकणारे वाढलेही असते.

आधीची पोस्ट्स वाहून गेली वाटतं.

अमित, पोस्ट पटले.

>> जर्नलांमध्ये पेपर लिहिताना सामान्यांनी तो पेपर वाचावा, हा हेतू कधीच नसतो.

+१

>> अशा भाषेमुळे अनेकदा काम चांगलं असूनही उत्तम आंतरराष्ट्रीय जर्नलांमध्ये भारतीय संशोधकांचे पेपर स्वीकारले जात नाहीत.

जर संशोधन जर नीट मांडता येत नसेल (हे इंग्लीशमधूनच? दुसर्‍या भाषेत पब्लिश झालेल्या संशोधनाशी माझा संबध येत नाही म्हणून इंग्लीश पुरतं बोलते) तर "चांगलं काम " म्हणजे काय? आपण केललं संशोधन जर परिणामकारक रित्या इतर लोकांपर्यंत पोचवता आलंच नाही तर "चांगलं काम" हे कसं ठरतं?

"मच मोअर" ऐवजी मराठीतून लिहायचा असता पेपर तर नीट लिहीला गेला असता असं म्हणतोस का? मला हा भाषेचा अडसर न वाटता पूअर सायंटिफीक रायटींग वाटत आहे.

सशल,

पेपर चांगला लिहिला म्हणजे संशोधन महत्त्वाचं आहे, असं नाही. संशोधन उत्तम, विषयाला पुढे नेणारं असलं तर त्याला मी चांगलं काम म्हणतो.

<अनेक भारतीय संशोधकांना इंग्रजीत संशोधकाच्या भाषेत पेपर लिहिता येत नाहीत.> असं मी लिहिलं आहे. संशोधकाची भाषा ही महत्त्वाची आहे. संशोधकाच्या भाषेत 'मच मोअर' किंवा 'खूप जास्त' यांना स्थान नाही

जर संशोधन जर नीट मांडता येत नसेल (हे इंग्लीशमधूनच? दुसर्‍या भाषेत पब्लिश झालेल्या संशोधनाशी माझा संबध येत नाही म्हणून इंग्लीश पुरतं बोलते) तर "चांगलं काम " म्हणजे काय? आपण केललं संशोधन जर परिणामकारक रित्या इतर लोकांपर्यंत पोचवता आलंच नाही तर "चांगलं काम" हे कसं ठरतं?
>>> प्रत्येकालाच विचारही करता यायला हवा, शोधही लावता यायला हवा, मग तो उत्तम रीत्या इंग्लीशमधे मांडताही यायला हवा, अश्या सगळ्याच ब्रेन फॅकल्टीज एकाच माणसात असायला हव्यात अशा अपेक्षा का?
सायंटीस्ट म्हणून एखाद्या माणसाकडे उत्तम प्रोब्लेम सॉल्व्हींग अ‍ॅबीलीटी असेल, तो फंडामेंटल काही काम करत असेल, नवीन कॉनसेप्ट मांडत असेल तर त्याच्या ब्रेनची ते फॅकल्टी जास्त डेव्हलप झालेली असू शकते. अशा वेळी कदाचित तो उत्तम भाषा वपरू शकणार नाही पेपर लिहायला योग्य अशी. पण त्यामुळे त्याच्या कामाचा दर्जा अजिबातच कमी होत नाही. उलट ज्या माणासाची लिखाणाची फॅकल्टी डेव्हलप झाली असेल, अश्यांबरोबर कोलॅबरेट करुन हे संशोधन लोकांपुढे मांडायला हवं.
एकाच माणासाकडे सगळी एक्स्पर्टीज असण्याची अपेक्षा करण्यापेक्षा, ज्याच्याकडे जे चांगलं आहे, त्याच्याकडून ते एक्पर्टीज घेऊन यातून खूप चांगलं काम होऊ शकतं आणि लोकांपर्यंत पोचूही शकतं.

परत एकदा संशोधन करणं आणि संशोधन मांडणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ह्यातल्या कशाबद्दल बोलायचंय, चर्चा करायचीये हे नक्की करायला हवं.

>> संशोधकाची भाषा ही महत्त्वाची आहे. संशोधकाच्या भाषेत 'मच मोअर' किंवा 'खूप जास्त' यांना स्थान नाही

सहमत. मी नीट वाचलं नसावं

>> संशोधन उत्तम, विषयाला पुढे नेणारं असलं

हे डोक्युमेन्ट केलं नाही तर ठरवणार तरी कसं की ते चांगलं संशोधन आहे, असं मी म्हणते आहे. पेपर लिहीणे हा एक प्रकार झाला. पण केलेलं संशोधन हे योग्य ती भाषा वापरून डॉक्युमेन्ट करणं महत्वाचं. आणि एकदा उत्तम डॉक्युमेन्टेशन करता आलं की पेपर लिहीणे हे फक्त पुढची पायरी नाही का ? तुमचं लॉजिक स्ट्राँग असेल तर योग्य तो सिंटॅक्स वापरून प्रोग्राम करणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी झाली ना. ते ट्रिव्हियल आहे असं म्हणत नाही.

संशोधकाच्या भाषेत 'मच मोअर' किंवा 'खूप जास्त' यांना स्थान नाही
>> बरोबर आहे. तिथे आकडेवारी, टक्के अश्या गोष्टी हव्यात.
उदा. खूप जास्त न म्हणता, क्ष पेक्षा ६० % ने अधिक - असं लिहायलं हवं असा चिनुक्सचा मुद्दा आहे.

आता पेटंट फाइल करताना सायंटीस्ट शोधावरती फोकस करतात, त्यातल्या नॉव्हेल्टीवर.
ते सबमिट करतानाची भाषा, लिहिण्याची पद्धत यासाठी त्या क्षेत्रातले लोक आहेत. त्यांना शंका असतील, तर ते प्रश्न विचारतात. सायंटीस्ट त्यावर विचार करून, प्रयोग करुन उत्तरं देतात.
हे उदाहरण झालं.
मुद्द्दा इतकाच मी सायंटीस्टनीच योग्य भाषेत डॉक्युमेंट करायला हवं असं नाहीये. योग्य डोक्युमेंटेशन स्कील्स असणार्या लोकांची मदत घ्यावी, कोलॅबरेट करावं आणि करतात.

केलेलं संशोधन हे योग्य ती भाषा वापरून डॉक्युमेन्ट करणं महत्वाचं. >> अर्थात. लॅब बुक्स, प्रोटोकॉल्स, त्यात पण ट्रायल प्रोटोकॉल्स, पायलट एक्सपरीमेंटस. नीरीक्षणं, नोटस आणि इतरही बरंच काही. पण हे इंग्लीशमधे हवं असं नाही. अनेक चायनीज, जॅपनीज, इटालियन, रशियन लोकांच्या नोटस, निरीक्षणं त्यांच्या भाषेत असतात.

>> एकदा संशोधन करणं आणि संशोधन मांडणं

संशोधन करताना अमुक तमुक "मच मोअर" असं तर विचारात नसतं ना. "क्ष पेक्षा ६० % ने अधिक" असं डॉक्युमेन्ट करणं हे चांगल्या संशोधकाचं लक्षण आहे.

भाषा फाइन ट्युन (जर्नल ला अपेक्षीत अशी) करण्याकरता हेल्प घेता येऊ शकते.

Pages