स्वावलंबनातून मूल्याधारीत समृद्धीप्रत नेणारा 'स्यमंतक' : ओळख

Submitted by अमेय२८०८०७ on 18 June, 2016 - 06:10

ही उन्हाळी सुट्टी अनेक कारणांनी सत्कारणी लागते आहे. काही नवीन वाटांची ओळख होते आहे. मी त्यांवरून चालेन ही शक्यता धूसर असली तरी आता काहीशी समज आलेल्या लेकाला या सगळ्याबद्दल त्याच्यापरीने विचार करताना पाहणे हा माझा मूळ हेतू आहे, जो बऱ्यापैकी सफल होत आहे.

निमित्त आहे ते 'स्यमंतक' या कोकणच्या अंतरंगातील धामापूर गावी उभारल्या गेलेल्या सचिन व मीनल देसाई या तरुण जोडप्याने उभारलेल्या शिक्षण प्रकल्पाचे.
माझ्या आईने त्यांच्यासाठी काही कथाकथन कार्यक्रम केले होते त्यामुळे तिच्याकडून फोनवर स्यमंतकविषयी प्राथमिक माहिती मिळाली होती. नेट शोधही घेतला होता त्यात आणखी थोडा तपशील होता पण कामाच्या झकाझकीत पाठपुरावा शक्य नसल्याने काहीतरी चांगला उपक्रम इतकीच नोंद घेतली गेली होती.

यावर्षीच्या कोकण फिरस्तीत मालवणहून सावंतवाडीला जायचे होते. त्या रस्त्यावर धामापूर असल्याने स्यमंतकला भेट देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार होतो. मात्र मुसळधार पावसाने जरा घात केला आणि पूर्वसंपर्क होऊ शकला नाही त्यामुळे आगंतुक म्हणून जाणे कितपत संयुक्तिक ठरेल याचा विचार करतच मी धामापूरच्या दिशेने गाडी हाकारली.

मुख्य रस्त्यापासून शंभरेक मीटर आत, हिरवाईत आणि झाडादगडांच्या आडोशात वसलेले ठिकाण समोर आले. प्रथम दर्शनात आजूबाजूच्या अनेक घरांसारखे हेही कोकणी घर वाटले. छतावर तीनचार जणांची कौलेदुरुस्ती चालली होती. मात्र बिनभिंतींची का असेना पण शाळा असे जे वाचले होते तशा काही खुणा अजिबात दिसत नव्हत्या.

IMG_20160618_135422.JPGIMG_20160618_134146.JPG

अंगणातच मीनल होत्या, अवेळी येऊनही अत्यंत सौहार्दाने स्वागत करत त्यांनी सचिनना बोलावले. चेहऱ्यावर प्रश्नचिन्हे पाहायची सचिनना सवय असावी कारण हस्तान्दोलनासोबत त्यांचे पहिले वाक्य होते," ही शाळा नाही, हा एक Commune (बिरादरी?) आहे. माणसांसकट प्रत्येक घटकाचे इथे एक दायित्व आहे."

घराभवती फिरत आमचा वर्ग सुरू झाला. आपल्या गावात, मातीत राहून निसर्गाशी तादात्म्य राखत सातत्यशील आणि थोड्या अभिनव पद्धतीने उपजीविका करू पाहणाऱ्या सर्वांसाठी स्यमंतकची निर्मिती झाली आहे. मूलभूत विज्ञानाची कास धरत उपलब्ध वस्तू आणि साधनांचा महत्तम उपयोग करून घेणे हे यांचे लक्ष्य आहे.

अंगणातील कोपऱ्यात छताखाली काही शिवणयंत्रे ठेवली होती. छोट्या पिशव्या शिवायचे काम सुरू होते. कोकणातील लाल तांदळाला बरीच मागणी आहे मात्र गोण्यांत किंवा प्लास्टिक पिशव्यांत ते खराब होतात. यावर अभ्यास करून एक खास कापड येथील मुलांनी तयार केले, प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याचे उत्पादन करून घेतले आणि त्याच्या पिशव्या शिवायचे तंत्र शेतकरी कुटुंबातील सदस्यांना शिकवले जात होते.

IMG_20160618_135312.JPG

सलामीने प्रभावित होतोय तोवर सचिन पुढे गेले. घरासमोरील उतारावर लावलेल्या औषधी वनस्पतींकडे लक्ष वेधले गेले. या वापरून वेगवेगळे साबण बनवले जाताहेत. प्रत्येक वनस्पतीची साबणातील घटकांशी होणारी अभिक्रिया लक्षात घेऊन त्यानुसार येथील संशोधक प्रमाण ठरवतात. उत्पादनांना चांगली मागणीही येऊ लागली आहे.

पुढे काही पिंपात फळांच्या साली आणि फळे फर्मेंट करत ठेवलेली दिसली. जंगलात पडून कुजून वाया जाणाऱ्या विविध फळांपासून घरच्या स्वछतेसाठी नैसर्गिक आम्लक्षार असलेले द्रव सध्या प्रायोगिक अवस्थेत आहेत. यांमुळे स्वच्छतेसोबत ते घाण पाणी जमिनीचे किंवा गटारातून जलस्रोतांचे प्रदूषण करण्याचा धोकाही टळू शकतो.
खाण्यायोग्य फळाफुलांपासून जॅम, सरबते आधीच करून झाली आहेत आणि स्यमंतकने आयोजित केलेल्या किंवा भाग घेतलेल्या महोत्सवांतून विक्रमी प्रतिसादही मिळत आहे.

IMG-20160618-WA0025.jpgIMG-20160618-WA0013.jpg

सेंद्रिय खताला पर्याय म्हणून तयार केलेले कंपोस्ट ब्लॉक्स हे स्यमंतकचे आणखी एक फायदेशीर उत्पादन. चाळीस किलो खताचे काम करेल इतका कस एक किलोत सामावल्याने शेतीची गणिते बदलून जातील. पंजाबातून याला प्रचंड मागणी आली आहे आणि व्यावसायिक उत्पादनाचा मेळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे की स्यमंतक हा कारखाना नव्हे. इथल्या प्रयोगांना यश आले की तंत्र त्या त्या समूहाला हस्तांतरीत करून ही लोकं पुढच्या उपक्रमाकडे वळतात.

IMG-20160618-WA0015.jpg

गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र यापासून बनवली गेलेली दंतमंजन आणि तक्रासव (आयुर्वेदिक औषध) ही आणखी दोन यशस्वी उत्पादने. दुधाच्या कितीतरी पटीने उत्पन्न मिळवून देणारी. तामिळनाडूतील एका संस्थेने याचे उत्पादन करून यश मिळवले आहे. बाकी संशोधनासाठी चारपाच गायी आहेतच.

IMG_20160618_135608.JPG

फेरो सिमेंटपासून बांधकाम हाही यांचा लाडका प्रकल्प आहे. नेहमीच्या सिमेंटहून कमी लागणारे काँक्रीट आणि साचेसुलभता यातून दर्जात तडजोड न करता किफायत साधता येते. फेरो सिमेंट ब्लॉक्स आणि वापरून टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या वापरून केलेल्या खिडकीचा एक नमुना फार आवडला. सिमेंट, लाकूड आणि काच यांच्याऐवजी एक ब्लॉक वापरून काम होते. येथील खोल्या, गोठा वगैरे सर्व बांधकाम अशाच पद्धतीचे आहे.

IMG_20160618_134640.JPG

एकेका प्रयोगामागील प्रेरणा समजून घेत असताना आम्ही परसदारीच्या स्वयंपाकघरात पोचलो. बायोगॅसवर होणाऱ्या नित्याच्या स्वयंपाकासोबत उत्पादनातील प्रयोगांसाठीही स्वयंपाकघराचा वापर असल्याने ही एक rustic प्रयोगशाळाच भासत होती. इथे राहून गेलेल्या फ्रेंच लोकांनी त्यांचा परंपरागत ओव्हन बनवून दिला आहे ज्यावर दर रविवारी पौष्टिक ब्रेड बिस्कीटे बनवण्याचे काम चालते.

IMG-20160618-WA0009.jpgIMG-20160618-WA0010.jpgIMG-20160618-WA0008.jpg

बघण्यासारखे अजूनही बरेच शिल्लक होते. सायकलची व्हॉल्व्हट्यूब वापरून तयार केलेला पाण्याचा पंप, दोऱ्या वळता येईल असा सुधारित चरखा, खतप्रकल्प, मोठ्या प्रमाणावर वाळवणे घालता येतील असे सौरचलित ड्रायर्स यासारख्या अनेक गोष्टींची केवळ ऐकीव माहिती घेतली. पावसाचे पाच लाख लिटर पाणी गोळ्या करण्याचा संकल्प म्हणून काही विद्यार्थी छतावर स्वतः तयार केलेली यंत्रणा बसवण्याची तयारी करत होते (जी आधी कौलेदुरुस्ती वाटली होती) पण वेळ सरून जात असल्याने आणि सर्व माणसे भयंकर कामात असल्याने त्यांना जास्त त्रास देणे इष्ट वाटेना.

IMG_20160618_135117.JPGIMG_20160618_140442.JPG

पुन्हा अंगणात येऊन आम्ही काही वेळ बोलत बसलो. स्यमंतकच्या व्यवस्थापनाबद्दल सचिन सांगू लागले. आठ वर्षात प्रकल्पाचा 40% खर्च वसूल करण्यापर्यंत ते पोचले आहेत. पुढच्या आठ वर्षात संपूर्ण आर्थिक स्वावलम्बनाचे ध्येय आहे. सध्या सुदैवाने देशापरदेशातून अनुदान येत आहे परंतु हे लवकर थांबावे अशीच त्यांची इच्छा आणि प्रयत्न आहेत. हिशेबाची पै न पै मुलेच सांभाळतात. केला जाणारा खर्च आणि उत्पादन यांची सूक्ष्मतम आकडेवारीही टिपून त्याचे पृथ:करण केले जाते, यासारख्या बाबी कळून आणखी आदर वाढला. अंतिमतः स्यमंतकला स्वतःची गती देऊन यातून बाहेर पडण्याचा विचारही सचिननी बोलून दाखवला. त्यांची 12-13 वर्षांची मुलगीही इथेच शिकत आहे. बाकीच्या आठ विद्यार्थ्यांसोबत (10 पेक्षा जास्त विद्यार्थी घेण्याची सचिनची तयारी नाही कारण संशोधनावर लक्ष पुरवता येणार नाही. बाकी प्रकल्पांसाठी शेकडो लोकांचे प्रशिक्षण चालू असते पण कायमस्वरूपी विद्यार्थी इतकेच) मुलीचीही स्वयंपाकघर, सफाई वगैरे ड्यूटी लागते आणि तिलाही परिसंस्थेतील घटक म्हणून प्रकल्पात योगदान द्यावे लागते.

जे दिसत होते, कळत होते त्याचे पडसाद मेंदूवर उमटायला वेळ लागत होता. वरवर साध्या दिसणाऱ्या कामामागे सूत्रबद्ध शिस्त, परिश्रम आणि नियोजन आहे याची जाणीव मात्र चटकन होत होती. जागाही इतकी शुद्ध आणि प्रशांत आहे की काहीतरी आगळे वेगळे अनुभवून भारावून जायला झाले. सुदैवान जगभरातील अनेक समविचारींचा स्यमंतकला आशीर्वाद आहे. डॉ प्रकाश आमटे उभयतां चार दिवसांपूर्वीच इथे राहून गेलेत, परिसरात वावरलेत हे ऐकल्यावर तर मला तिथली मूठभर माती सोबत न्यावी असे सरसरून वाटले.

सचिन-मीनल यांचा निरोप घेऊन परत निघत असता मला स्यमंतकचे मर्म थोडेसे उलगडले. तिथे जे जे काही केले जाते त्याला विज्ञानाचा समर्थ आधार आहे. गणित, भौतिक, रसायन, जीव ही शास्त्रे प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थी शिकत आहेत ज्यामुळे पुस्तकी ज्ञानाइतके महत्त्वाचे मूल्य आणि जीवनशिक्षण मिळत आहे. या अर्थाने ही बिनभिंतींची शाळाच आहे. सचिन म्हणतात तसे जगण्याच्या ओघात येणाऱ्या अडचणी हाच त्यांचा अभ्यासक्रम आणि प्रकल्प या त्यांच्या परीक्षा.

IMG_20160618_140332.JPG

मी हे जे काही लिहायचा प्रयत्न केलाय तो किती अपुरा आहे याची माझी मलाच कल्पना आहे. एका त्रोटक भेटीत डोंगराएवढ्या कामाचा लेखाजोखा घेता येत नाही पण या निमित्ताने कोकणात गेल्यावर थोडी वाकडी वाट करून स्यमंतकपर्यंत एखादा उत्सुक पोचला तरी या ओळखीचा उद्देश सार्थ होईल.

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर उपक्रम. इथे परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

हा धागा ध्यासपंथी पाऊले मध्ये असायला हवा. पुढे मागे कोणाला संदर्भ हवा असल्यास शोधणे सोपे जाईल.

सुंदर लेख, अमेय....
वाचून झाल्यावर लगेच गूगल करुन त्यांची वेबसाईट शोधली आणी फेसबुक ला पण अ‍ॅड केलय, जर तुम्हाला काही हरकत असेल तर लिंक्स काढून टाकेल, किंवा माझा प्रतिसाद उड्वला तरी चालेल.

http://syamantak.cfsites.org/index.php

https://www.facebook.com/schoolwithoutwalls

अमेय, ह्या प्रकल्पाची आणि देसाई दांपत्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

देसाईंसारखे लोकं जनेतेसाठी किती विचारपूर्वक प्रकल्प हाती हेतात आणि यशस्वी करून दाखवतात त्याचं कौतुक वाटतच पण आपल्या थिटेपणाची जाणीव होऊन जाते.

देसाईंना ह्याची कल्पना कशी सुचली अणि त्या कामात झोकून द्यायवसं का आणि कसं वाटलं हे वाचायला आवडेल.

अजून एक सुरेख ओळख. सचिन आणि मीनल देसाईंकरता हॅट्स ऑफ.

स्यमंतक चा अर्थ काय?

आर्च +१. मीही अगदी तीच मागणी करणार होते मग "मागण्या वाढत आहेत की काय" असं वाटून नाही लिहीलं.

स्यमंतक हा एक दैवी मणी होता. धारणकर्त्याला सदैव समृद्ध करत राहायचा.
कृष्णावर त्याच्या चोरीचा आळ आला होता वगैरे कथा आहे

ध्यासपंथी पाऊले मध्ये लेखन समाविष्ट केले आहे

सचिनना मायबोली बद्दल सांगितले आहेच, ते स्वतः काही लिहितात का पाहूया.

एका आगळ्यावेगळ्या कार्याची सुरेख ओळख. खुप खुप धन्यवाद अमेयराव स्मित _/|\_ >>>>>+११११११

देसाई दांपत्याला सलामच ... ____/\____