पिअर्स साबण

Submitted by satishb03 on 20 April, 2016 - 13:29

पिअर्स साबण काय काय करतो ? एका आंघोळीत बाईला देखणं करुन नवऱ्याला तिच्यावर जबराट प्यार करायला लावतो. ऑफीस मधुन कितीही दमून आलेला असो. पिअर्सने आंघोळ केलीय ना तिने ? आवळलीच पायजे तिला ! संतुर साबण काय करतो ? कौनसे काँलेजमे पढती हो ? उत्तर यायच्या आत आरोळी ! मम्मीsss... मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नहीं चलता ? सैफ लगेच च्यूतिया बनतो ! आरतिच्याबायलिला काय उमर ? ह्या असल्या फाल्तु वचनेबल जाहिरातीँनी आमच्या काही बायका होत्यात वेड्या. आणि माजतात गोंधळ.

गोष्ट तशी साधी. सत्तरी ओलांडलेला आणि गाव तालुक्याबाहेरही कधी न गेलेला एक अडाणी , स्वाभिमानी सासरा नामे बळीराम. एका कानाने जरा बहिरा. डायबेटीसने भरपूर ग्रासलेला, आंग खाजवायला त्रासलेला , भरपूर उन्हाळे सोसलेला , पिव्वर गरीबीवर पोसलेला.
धाकट्या लेकाच्या आग्रहानं पुण्यात आला. ते त्याच्या लो क्वालिफाईड सुनेला फारसं रुचलं नाही. पण जेव्हा जेव्हा त्याच्याप्रति तिचा तिटकारा जागा होई तेव्हा तेव्हा लो क्वालिफाईड नवरीचा हाय क्वालिफाईड नवरा म्हाताऱ्याच्या विकलेल्या पाच एकराची आणि लागलेल्या नोकरीची सांगड तिला याद करुन देई आणि तिच्या घुश्याला थंडे करी. त्यादिवशी त्यांच्या एरियात एक म्हातारी गचकली . म्हातारी भरपूर म्हातारी होऊन गचकली असल्याने दुःखाचा म्हणावा तसा लोट परीसरात उठला नाही. म्हातारीच्या चार नाती आणि त्यांची लेकरं सोडली तर रड्यापड्याचा ठार दुष्काळच ! खुद म्हातारीचा लेक येखादं मंगलकार्य येवजल्या सारखा पायाला भिंगरी लावून फिरत होता. झाली तिची मयत. मयतीवरुन लोक आले आणि गप्पा हाणीत बसले.

शहरातली मयत पहिल्यांदाच पाहिलेला बळीराम हारकून गेलेला. पाच वर्षापूर्वीच शहरवासी झालेल्या रंगआबाला म्हटला, बायली काय माती करत्यात रं पुण्यात ? ह्या काचाची गाडी, ही जत्रा , मढ्याचा जीव गुदमरंल हितकी फुलं ? आंगावर श्याल , घामघाम आत्तर , हे मेनबत्या , उदबत्या , वंदना , लैच इंतेजाम करत्यात लका. बायली मढं खुषच व्हत आसंल. उगं हासल्यावानी दिसतं काय ? रंगआबा म्हटला बळीराम तु मेलास की आसाच इंतेजाम कराय लावू . खो खो खो हासत बळीराम म्हटला , होय गड्या मुलकात फिरावं आन् मराण पुण्यात यावं. रंगआबा म्हटला मग ह्या आपरीशनात जगू नकू गड्या . आरं आपल्या साँदीन आस्तं काय आबा ? दोघेही खो खो हसले..हाय क्वालिफाईड मुलाने जवळ येऊन बापाला सांगितलं तात्या आंघोळ करा. होय. म्हणुन बळीराम आंघोळीला गेला. आंघोळ करुन पान तंबाखु खायला ओल्ड कंपनीत आला. उद्या त्याला दवाखान्यात जायचं होतं. गावाकडं हर्ण्याचं आँपरेशन की काय सांगितलेलं. अवघड जागा सुजलेला. तरी हा मिडकणं सोसत थिरच राह्यचा. कंपनी म्हणायची खरं सुजलीय का जागा ? ह्यो म्हणायचा दावू काय धोतर फेडून पिकल्याला घड ? ख्या ख्या ख्या खू खू खू व्हायचं.

त्यादिवशी निजानिज झाली . म्हातारा सासरा सवयीने पहाटंच उठला आंघोळ केली आणि वारवासाला शाळेकडच्या लींबाकडं जाऊन बसला. इकडे हाय आणि लो क्याटेगरीतले नवरा बायको नामक राजा राणी उठले. राणीने झकपक आंघोळ केली. ती घट्ट दुधाच्या चहाला लागली . मयतीमुळे बुडालेले कार्यक्रम आता बघावे असं मनात योजू लागली. न्हाणीतून राजाचा आवाज आला . आगं साबन नाही की . संपला वाटतं. वापरू का तुझा ? नको नको थांबा.मी आणायला पाठवते कुणाला तरी नवा. दारावरून चाललेल्या मनीषाला हाक मारून तिने , मनिषा एवढा एक लक्स साबन आण गं . म्हणून साबणाची सोय केली . नवरदेव लक्सची वाट बघत टाँवेलवर टिव्ही पाहत थांबले. लक्स आला. आंघोळ झाली. राजा राणी चहा पेले आणि बळीराम म्हतारं दारात धडकलं. मामा पटकन् आंघोळ करुन चहा घ्या. म्या आंगुळ केली. आँ ? तुमचं धोतर नाही तिथे. टाकलं माजं मीच पिळून . आणि साबन तर नव्हता . मग ? व्हता की तिथं निळा टुकडा. आँ ? झर झर झर झर नक्षे बदलले.

या म्हाताऱ्याने वापरलेल्या साबनाने मी आंघोळ केली. माझा पिअर्स याने वापरला ? राणी प्रचंड अस्वस्थ झाली. राजाकडे खाऊ का गिळू असं पाहू लागली . राजा शरमून म्हटला तुझ्या पप्पांनी आंघोळ केली असती तर ? राणी म्हटली तोंड बंद ठेवायचं हं. हे इथे नकोयेत मला. गर गर गर गर सुत्रे फिरली राणीने बरोबर चावी मारली ! आंगाला हात लावू देणे नाही. चार दिवस राजा तरमाळला. मदन खवाळला .
राजाने सुट्टी काढली. धोतरजोडी घेऊन आला. अंड्याची चटणी करायला सांगितली. म्हाताऱ्या सोबत आलेल्या फडक्यातच बांधली. लगबग लगबग चालू झाली. बळीराम म्हातारं झी टाँकिज वरचा सांगते ऎका बघण्यात गुंगलेलं. तात्या चला आकराची येश्टी हाये. हितला डाक्टर रजेवर गेलाय. सोलापुरातल्या आश्विनीला दावू. आँ. हितं दुसरा कुठला न्हाई का ? न्हाई चला. सुनबाई म्हटल्या काळजी करु नका . इथून पैसे पाठवून देऊ. म्हतारं म्हटलं पैशे नकु माय तुझे. नीट राह्वा दोगंबी वाद येवाद करु नका.

स्टँण्डवर आल्यावर म्हाताऱ्याने लेकाला विचारलं बंडा कारं घालवायलाच मला ? सुर्याखा] भांडलीय काय कशावरनं ? नाही तात्या. मग का रं , कोण हाय आता गावात माझं ? तिघी लिकी लांब दिल्यात. तुझी माय मेलीय. तिथला लेक पेण्यात बुडलाय. काय संबाळायचीय तितली सुन ? राजाच्या डोळ्यात पाणी आलं पण तो भडवा झाल्यानं गापकन् जिरलं. पाचशेच्या चार नोटा म्हाताऱ्याच्या हातात दिल्या. पाया नाही पडला तरी म्हाताऱ्याचा आशिर्वादाचा खरखरीत हात त्याच्या पाठीवर थरथरला. येस्टीत बसला. थांबून राहिलेल्या लेकाला म्हटला. जा तु हालंल की आता झटक्यात. गोपाला फ़ोन कराय लावतो पोचलो की. वाद येवाद करु नकु बग.

बुंग येस्टी गावात ! काय तात्या केला का लेकानं इलाज ? या कौतुकी सवालाला कटाळत, कटाळा येवूस्तोर , आर कट्टाळा यायला करमचना तितं मन आलो गड्या गावात.
हे उत्तर देत बळीराम म्हातारं गावात घरात रुळलं. चार दिवसात त्याची सोय फरशी नसलेल्या समाजमंदीरात केली गेली. पाठीला खडं टोचत , चवाळ्यावर पडून मेलेल्या बायकोच्या आठवणी आठवीत पडायचं आणि मर्जीतल्या माणसांना हाळी देऊन पान तंबाखू मागायची आणि खायची. एक नातू जिव लावून जेवाय लावायचा तेवढं जेवायचं आणि पडायचं. असा त्याचा दिनक्रम ठरला. पंधराच दिवस टिकला. बळीराम म्हातारं पंधरा दिवसात खलास झालं.

काचाची गाडी, लालभडक फुलं, हे मेनबत्या, घामघाम आत्तर आणि माणसाची जत्रा , निळीजरद शाल , बुधवंदना जागच्या जागी जिरली. रोज तंबाखू साठीच हाक ऎकणाऱ्या रामभौला डौट आला आज तात्याची हाक कशी आली नाही बाँ ? ह्यानं जवळ जाऊन बघितलं तर चिमणीवानी तोंड वासून बळीराम म्हातारं खलास झालेलं !

नंतर नीट आरोड पण उठला नसेल. जाग जागी फाटलेल्या चादरीच्या झोळीतच ह्याला उचललं असेल. ह्याच्या पायाला खरचटल्यानं उठलेला रक्ताचा लाल डाग जिर्ण पिवळ्या धोतरावर नीट उठला असेल. याच्या चंचीत पाचशेच्या चार नोटा नक्की घावणार. याच्या मयताला लाल तर सोडा , झेंडूचीच फुलं नीट वक्ताला गावात घावणार नाहीत. विदाऊट फुले याची मयत होणार. जत्रा कुठली हो ? मातीला सव्वाशे वर संख्या नसते. गाव सुध्दा ग्लोब्लाइज झालेय आता ! पण मरेस्तोर सोशिक राहिलेलं बळीराम म्हातारं हे विदाऊट तकरार नीट समजून घेणार आणि झक् मारीत कावळा होऊन लगेच पिंड शिवणार ! रिअली ..आय स्वेर !

येडझव्या सारखी पिअर्सने आंघोळ करायची असते काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार सतीशभाऊ,
फार फार उत्तम, आतून आलेलं, विदारक, आणि तरीही ताकदीनं लिहून गेलाय तुम्ही!
वाचता वाचता भावनिक होत गेलो. प्रचंड प्रभावी!

ज ब र द स्त !

आभार !

बर्‍याच काळानंतर इतके तीक्ष्ण, काळजाचा ठाव घेणारे लिखाण वाचायला मिळाले. किंचित उपहासगर्भ अशी शैलीसुद्धा आवडली.>>>>> अनुमोदन

मस्त Happy

विचार करायला लावणारी कथा.

नावडतीचे "मीठ" सुध्दा आळणी लागते. नात्यांमधे वादळ निर्माण होण्यास एक छोटेसे निमित्त लागते. Chaos theory सारखे.

जबरी लिहिलेय. शेवट सुन्न करणारा Sad हे असेच होणार आयडिया आली होतिच, पण लिहिलय, खासच. आतपर्यंत पोचली.

अरेच्च्या !!
काय हे ?

मधले दहा बारा प्रतिसाद गेले कुठे ??

(दुसरा प्रतिसाद फारएण्ड चा असल्याचे आठवते. ) त्यानंतरचेपण दहाबारा गायब ?

सतीश वाघमारेंशी (सेक्रेटरीमार्फत) संपर्क साधला होता.

गप्पांचे पान आणि लेखनाचा धागा यातली नेहमीची गल्लत त्यांच्याकडूनही झालेली दिसतेय. त्यांना अ‍ॅडमिनशी संपर्क साधावा असे सुचवले आहे. नवीन सदस्याकडून हे होतेच. त्यांना मदत करताना आपणही ही गोष्ट लक्षात ठेवत नाही.

@ सतीश वाघमारे
३० प्रतिसाद झाल्यानंतर जुने १५ प्रतिसाद वाहून जातात. या धाग्यावर ते झालेले आहे. आता पुन्हा हे प्रतिसाद वाहून जायच्या आत अ‍ॅडमिनकडे मदतीसाठी संपर्क साधावा. वाहतं पान आहे हे लक्षात आल्यानंतर सदस्य प्रतिसाद देण्याचे टाळतात.

नवीन लेखन मधे गेल्यानंतर गप्पांचे पान हा पर्याय न स्विकारता लेखनाचा धागा या पर्यायावर टिचकी मारावी. धाग्यावरचे प्रतिसाद वाहून जात नाहीत.

Pages