भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a2qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला भगुलं चा अर्थ माहीती होता जो मी सांगितला (बरोबर आहे का तो?) पण अशा व्यक्तिगत प्रतिसादाची गरज नाही असे वाटले म्हणून विषयाला धरून बोला असे लिहिले तर काय चुकले? >> Lol

हीरा यांना बरोब्बर समजला आहे प्रतिसाद.

कमाल आहे. सुरूवात कुणी केली हे ही आठवेना

__/\__

आणि आता पूर्वग्रहदूषित ची काडी पण टाकलेली दिसते. याला उत्तर दिले की सर्टिफिकेशन एजन्सी पिळू पिळू म्हणत उड्या मारणार. तेव्हां आता गीता वाचणे बंद Wink

मराठीची शब्दसंपदा वाढवण्यासाठी गेली काही वर्षे संस्कृताचा आधार घेतला जातोय तो माझ्यामते तितकासा योग्य नाही. कारण संस्कृत भाषा ही लोकव्यवहारातून प्रदीर्घकाळापूर्वी नाहीशी झालेली आहे. गेल्या दोन हजार वर्षांत जो बदललेला लोकव्यवहार आहे त्याचे प्रतिबिंब संस्कृतात नाही. जुन्या शब्दांची मोडतोड अथवा त्यावर कृत्रिम सोपस्कार करून क्लिष्ट शब्द घडवणे हे फारसे उपयुक्त नसते. त्याउलट बाराव्या शतकापर्यंत कृष्णा-गोदावरीपासून वैनगंगेपर्यंतच्या विस्तीर्ण दख्खन पठारावर समृद्ध संस्कृती नांदत होती, बहुजनसमाज उद्यमशील आणि नवविचारोन्मुख होता. (सामाजिक आणि धार्मिक कर्मकांडांचा अपवाद.) व्यापार-उदीम जोरात होता. इतक्या सकारात्मक घडामोडी घडत असताना त्याची अभिव्यक्ती करू शकणारी तत्कालीन माहाराष्ट्री भाषाही सशक्त होती. या भाषेतले शब्द आजच्या जीवनव्यवहाराच्या अभिव्यक्तीसाठी अधिक योग्य ठरले असते. त्यांची फारशी मोडतोड करावी लागली नसती.
आजही आजूबाजूच्या वातावरणातले शब्द, जसे, गुजराती, कन्नड, तेलुगु, इंग्लिश इ.,मराठीने बिनदिक्कत स्वीकारावे. काही वाईट परिणाम होणार नाही.
ता.क.: हे प्रतिसाद म्हणजे चर्चा भरकट(व)णे नसून मूळ मुद्द्याला 'मद्देनज़र रखते हुए' चर्चा विस्तारणे आहे.

मराठीची शब्दसंपदा वाढवण्यासाठी गेली काही वर्षे संस्कृताचा आधार घेतला जातोय तो माझ्यामते तितकासा योग्य नाही. >>> एकवेळ मान्य

लहान मुलांना, इंग्रजी शिकताना लागणार्‍या वेळ आणि श्रमांपेक्षा प्रमाण (पक्षी इथल्या चर्चेत ज्याला संस्कृताळलेले म्हटले जाते आहे ते) मराठी शिकायला लागणारा वेळ एकच असेल (हे पटणे देखिल जरा अवघडच) तर इंग्रजीच्या पाठी जावे हा विचारही मान्य

पण प्राकृत / पाली / मराठवाड्यातल्या लोकांच्या बोलीशी मिळतीजुळती भाषा / बहुजन समाजाला समजेल आणि उमजेल अशी मराठी भाषा आणि त्यातले शब्द यांचे कोष, साहित्यात वापर वगैरे राहूदे पण रोजच्या व्यवहारात उपयोगात कोणी आणायला हवे ?
पुढाकार कोणी घ्यायला हवा?

ही पण प्रमाण (संस्कृत प्रचूर) भाषा(च) नीट बोलता येणार्‍यांचीच जबाबदारी का ?

ते ते लोक त्यांची त्यांचीच भाषा व्यवहारात वापरतात ना? की पुणेकरांनी अन्य कुठली बोली आपलीशी करायला हवीय?

अनेकानेक विषयांची सरमिसळ होऊ लागलीय. शिक्षणाचे माध्यम निवडताना भाषेचे संवर्धन , जतन हा हेतू ध्यानात ठेवायचा की काय?

अनेकानेक विषयांची सरमिसळ होऊ लागलीय. +१ Proud
त्यामुळे लिहू की नको असेच झाले होते पण जाऊ दे म्हटलं. इतके सगळे जण वेगवेगळे लिहिताहेत तर आपण ही लिहावं.

व्यवहारात म्हणजे मला शिक्षण व्यवहारात / पाठ्यपुस्तक बनवताना म्हणायचं होतं.
आम्हाला आमच्या बोलीतून विषय शिकायचे आहेत अशी मागणी / दबाव गट करता येऊ शकतोच की
तसेही बालभारतीच्या संपादक मंडळावर नेहेमीच / सगळे जण काय आपापल्या घरात शहरी, पुणेरी प्रमाण भाषा बोलणारे असतात की काय?

झालंच आहे सरमिसळ तर
प्रमाण भाषेची नक्की काय गरज / महत्व आहे हा मला अनेक वर्षांपासून पडलेला प्रश्न आहे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

पण बोलीचीही किती रूपे असतात. मग पाठ्यपुस्तके कशी आणि किती छापणार? कुठेतरी प्रमाणीकरण लागेलच.
राज्यकारभार आणि शिक्षणासाठी प्रमाणभाषा हवी. आता राज्यकारभाराची जी काय भाषा असते ती समजून घ्यायला प्रयास पडतात ते सोडा.

CBSC अभ्यासक्रमात इंग्रजीतही इतरभाषिक शब्द आहेत. घरांचे प्रकार मधे kachha ghar and pakka ghar असं आहे दुसरीच्या पुस्तकात.

हर्पेन, महाराष्ट्राच्या एके काळच्या प्रमाणभाषेवरचा माहाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव कमी होऊन संस्कृताचा वाढला ही घटना घडून गेली आहे. आता ती बदलता येणार नाही. परिणामस्वरूप प्रमाणमराठी ही सर्वसामान्यांच्या भाषेपासून दूर गेली इतकेच. असे कलाटणी देणारे अपघात म्हणा अथवा शुभ घटना म्हणा, भाषेच्या आणि सगळ्याच इतिहासात घडत असतात. इतिहास बदलता येत नाही. त्यापासून बोध घेता येतो.
आणि जीवनव्यवहार हा शब्द मी सर्वंकषरीत्या वापरला आहे. म्हणजे त्या त्या सभोवतालात जे जे काही घडू शकते, ते सर्व. उदा.आपल्याकडे बलुतेदारी होती. या बारा बलुतेदारांद्वारे गावगाडा चाले. यातल्या प्रत्येकाची खास भाषा होती. ती नंतरच्या प्रमाणभाषेशी जोडली गेली असती तर (उदा.) केमिस्ट्री, (प्राथमिक किमया) मेटॅलर्जी (प्राथमिक धातुकाम/ओतकाम) विणकाम (वीविंग), सुतारकाम (तक्ष-टेक्नॉलॉजी), कृषि,- आणि असे अनेक जीवनव्यवहार- तर आताच्या तंत्रभाषेला उपयुक्त असे काही शब्द त्यातून मिळवता आले असते अथवा रूपान्तरातून बनले असते. या शब्दांवर प्रक्रिया होऊन (धातुसाधिते, क्रियापदे, विशेषणे इ.)अनेक शब्द आणि शेवटी एक तंत्रपरिभाषा निर्माण होऊ शकली असती. पण या व्यवहाराला आणि परिणामतः त्यातल्या शब्दांना योग्य ते महत्त्व मिळाले नाही. प्रमाण मराठी यामुळे खूप थिटी झाली. तिची अभिव्यक्तिक्षमता कमी झाली.
आणखीही अनेक कारणे आहेतच, जसे: नव्या संकल्पनांचे स्फुरण थांबले, गतानुगतिकता आली, कष्टाचे आणि कष्टकर्‍यांचे मोल जे इतर ठिकाणी वाढले ते येथे उलट कमी झाले वगैरे..
पुन्हा माझा आवडता मुद्दा : कोणतीही घटना ही एकल अशी घडत नाही. आजूबाजूच्या त्रिमितीचा आणि काळाचा तीवर हुकूम चालतो. या सर्वांच्या रस्सीखेचीतून जे काही उदयास येते तो इतिहास असतो.

धागा भरकटला आहे किंवा आता आलेले मुद्दे अवांतर आहेत का ?
जर सुरूवातीपासून धागा वाचला तर ते कळेल. अचानक धूमकेतूसारखे उगवून विषयावर बोला किंवा धागा भरकटला आहे असे म्हणणे सुरूवातीपासून या धाग्यावर सहभाग नोंदवत असलेल्यांवर अन्यायकारक होते असे माझे मत आहे. इथे इंग्रजी माध्यमामुळे गळती वाढली हा मुद्दा मागे जाऊन कुणी व का आणला हे शोधून मग आताचे मुद्दे अवांतर आहेत का हे पहावे.

पण प्राकृत / पाली / मराठवाड्यातल्या लोकांच्या बोलीशी मिळतीजुळती भाषा / बहुजन समाजाला समजेल आणि उमजेल अशी मराठी भाषा आणि त्यातले शब्द यांचे कोष, साहित्यात वापर वगैरे राहूदे पण रोजच्या व्यवहारात उपयोगात कोणी आणायला हवे ?
पुढाकार कोणी घ्यायला हवा? >>>

इथे कोणी म्हणजे कोण अपेक्षित आहे ? याचे उत्तर दिले की काही लोक नेहमीचे तुणतुणे वाजवतात कि पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण, विकृत मनोधारणा. वास्तव स्विकारणार का कुणी ?

कोणी पुढाकार घ्यायला हवा होता म्हणजे ज्यांची संस्कृती पराभवाची आहे, जिचे डॉक्युमेंटेशन नाही, ज्यांची भाषा, परंपरा नष्ट झालेले आहेत, ज्यांचे गौरवशाली नेते एका संस्क्रुतीने खलनायक ठरवल्याने जो समाज आपले स्वत्व विसरून गेला आहे त्याने ते करायचे का ?

हा समाज सगळ्याला मान डोलावणारा म्हणूनच सहीष्णू आहे. भारतीय संस्कृतीबद्दल सहीष्णू असे म्हटले जाते त्यातला सहीष्णू हाच हिस्सा आहे. कुठली भाषा प्रमाण असायला हवी याबाबतीत जर जागृती असती तर मूठभरांची भाषा प्रमाण झाली असती का ?

शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ जे कुणी होते त्यांनी ते ठरवले. जर संपूर्ण समाजात शिक्षणाची परंपरा असती तर देशात ज्याप्रमाणे राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला विरोध झाला तेच राज्यपातळीवर झाले असते. देशात आज राष्ट्रभाषेऐवजी राजभाषा म्हणून अनेक भाषा स्विकारल्या गेलेल्या आहेत. भाषांतराची व्यवस्था केली गेलेली आहे.

मातृभाषेचा मुद्दा कुणीतरी काढला म्हणून महाराष्ट्रातल्या विविध भाषांचा मुद्दा आला. उगीच वाकड्यात जायचे म्हणून तो आलेला नाही. अर्थात ज्याला नाही समजून घ्यायचे त्याचे स्वातंत्र्य आहेच आणि स्वयंघोषित सर्टिफेक्शन एजन्सीजचे देखील स्वातंत्र्य मान्य आहे.

हर्पेनजी, तुमच्या प्रश्नाचे उत्तर सरळ देता येणार नाही.

हर्पेनजी

प्रमाणभाषेची आवश्यकता भाषेची रुपं प्रमाणित करण्यासाठी असते. एखाद्या भाषेचे अपभ्रंश एका समान धाग्यात ओवण्यासाठी ते आवश्यक असते. पण महाराष्ट्रातल्या भाषा या एकमेकींची रुपं आहेत असं म्हणता येत नाही. प्राकृत वरून आलेल्या भाषा आणि संस्कृतातून उद्भवलेल्या भाषा यातून एका प्रदेशात भाषा बोलणा-यांच्या वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या.

म्हणून विचारलं होतं की महाराष्ट्री (ग्रामीण) भाषा जर प्रमाण असती तर त्यातले पाली भाषेतले शब्द सदाशिव पेठी भाषा बोलणा-यांना सोपे गेले असते का ?

आपल्याकडे याच्या उलट झाल्याने ग्रामीण भागातल्या लोकांना ही भाषा जड गेली. पण काही वर्षातच त्यांनी जुळवून घेतले.

हीरा यांना ते कळाले होते.

माध्यम कोणते असावे या मुद्द्यामध्ये इतरही काही महत्त्वाचे मुद्दे अंतर्भूत आहेत, असायला हवेत.प्रमाण भाषेचा मुद्दा हा त्यातला एक. दुसरा ज्ञानभाषेचा मुद्दा त्याहूनही महत्त्वाचा आहे. याचेही दोन पदर आहेत. एक म्हणजे जी मुले माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक पातळीपर्यंत पोचू शकत नाहीत त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तरी या प्राथमिक शिक्षणाचा त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग होत नाही. आयुष्याच्या संघर्षात यातली काही मुले यशस्वी होतातही पण त्याला त्यांचे हे शिक्षण कारणीभूत नसते. उदा. हॉटेलात बश्या विसळणारा एखादा मुलगा पुढे एखादी टपरी आणि नंतर हॉटेल टाकूही शकतो. पण त्यामागे त्याची जीवनसंघर्षाला थेट भिडण्याची अत्यंत विरळा अशी जिद्द आणि व्यावहारिक ज्ञान असते जे शालेय शिक्षणातून मिळालेले नसते. दुसरा पदर म्हणजे जे लोक उच्च शिक्षण घेतात त्यांना (इथल्या संदर्भानुसार मराठी) ही मातृभाषा अपेक्षित ज्ञान देऊ शकत नाही. मग काही वर्षे एक भाषा आणि नंतर दुसरीच भाषा, अशी उडी मारावी लागते. प्रथमपासून ज्ञानभाषेतल्या शिक्षणाने हा ट्रान्ज़िशनचा त्रास वाचतो म्हणून कदाचित इंग्लिशला पसंती मिळत असेल. मराठी ही ज्ञानभाषा होऊ शकेल पण त्याला दीर्घ कालावधी लागेल. सध्याचे ज्ञान आधी मराठीत आणावे लागेल. यात भाषांतराचे सरकारी किंवा खाजगी कारखाने सुरू होऊन त्यात लक्ष्यपूर्तीसाठी दणादण भाषांतरे पाडली जाण्याचाच संभव जास्त आहे. आणि क्रमिक ग्रंथ घाईघाईने तयार होऊ शकतील पण संदर्भग्रंथांचे काय? शिवाय तोपर्यंतच्या काळातल्या एका पिढीने काय करायचे? आणि पुन्हा या वीसपंचवीस वर्षांच्या कालावधीत नवे ज्ञान इतरत्र निर्माण होतच राहाणार त्याचे काय?
जोपर्यंत इथल्या भूमीत नवीन संशोधन, नवीन संकल्पना निर्माण होत नाहीत तोपर्यंत इथली भाषा प्रगल्भ होणार नाही. अगदी तमीळ. तेलुगु, रशियन, जर्मनमध्ये असलेले ज्ञान एका संपर्कभाषेशिवाय आपल्यापर्यंत पोचणार नाही. सुदैवाने आपल्याला 'इंग्लिश' ही उत्तम संपर्कभाषा म्हणून उपलब्ध आहे. मग तिला कुबड्या न मानता एक सुलभ साधन मानून का न तिचा उपयोग करून घ्यावा?
भारतीय संदर्भात इथल्या कित्येक भाषा अगदी अविकसित आहेत. उदा. अनेक आदिवासी बोली. त्यांना त्या त्या प्रांतातल्या प्रचलित भाषा अगदीच व्यवहारापुरत्या येतात किंवा अजिबात येत नाहीत. यांच्यासाठी शाळा उघडताना त्यांना तिथली प्रमाण (इथे) मराठी अगदी 'कमल नमन कर' पासून शिकावी लागते.आपल्या समाजात हाडीमासी खिळलेली सामाजिक विषमता कमी होण्यात इंग्लिश भाषा एक सेतू बनू शकते.
मातृभाषेतून ज्ञानग्रहण, संकल्पनास्पष्टीकरण सोपे होईलही, पण मुळात ते ज्ञान मातृभाषेत उपलब्ध असेल तरच. असो. ह्या विषयावर मतभेद आहेतच, आणखीही वाढू शकतील. तेव्हा थांबणे योग्य.

हीरा..

तुमची पोस्ट छान आहे. तरीही..

>> आपल्या समाजात हाडीमासी खिळलेली सामाजिक विषमता कमी होण्यात इंग्लिश भाषा एक सेतू बनू शकते.

हे वाचून हि सामाजिक विषमता नष्ट करता करता आपले सामाजिक वैविध्यही नष्ट होईल का.. करावे लागेल का.. असे वाटून गेले..

पण मागच्या पानावर पोलाईट घोस्ट यांनी म्हटलंय ( 8 June, 2016 - 21:19) तसं "आजही 'मला पगार भेटला' म्हट्लं की नाकं मुरडून हसलं जातंच. अगदी माबोवरही, व नेहेमीच्या आयुष्यातही." इथे जेव्हा नाक मुरडून हसणे बंद होईल तेव्हा त्या वैविध्याला काही अर्थ उरेल. लोक एकमेकांच्या वैविध्याचा आदर न करता त्याचा वापर सामाजिक विषमता वाढवण्यासाठी करत असतील तर मग ते वैविध्य नष्ट होण्याकडेच बहुतेकांचा कल असेल यात नवल नाही.

असो.. फार अवांतर झाले.

चायना, हाँगकाँग, तैवान मधुन आलेल्या सर्व उत्पादनांच्या खोक्यांवर त्यांच्या चायनीज मधे ही इंग्रजीच्या बरोबीरने सगळे का छापलेले असते?

त्याचा संबंध फक्त पैशाशी आहे. ते लोक इंग्रजी शिकले नाहीत तरी भरपूर मोठ्या प्रमाणात माल विकत घेत असतात. ते लोक म्हणाले आम्ही हे विकत घेत नाही कारण आम्हाला ते काय लिहीले आहे ते समजत नाही. मग त्यासाठी चिनी, स्पॅनिश इ. भाषांमधून नुसते छापायला काय खर्च येणार, फार तर थोडी किंमत वाढवावी.
(ती किती याचाहि अगदी शास्त्रीय, गणिती विचार करून ठरते)

पण माल खपतो, पैसे मिळतात. भारतात अनेकांना इंग्रजी चांगले समजते, इंग्रजी समजत नाही म्हणून मालच घेणार नाही असे होत नाही. जेंव्हा माल विकणार्‍याला वाटेल की जर भारतातल्या डझनाहून अधिक भाषांमधून छापले तर त्या खर्चाच्या मानाने आपला नफा वाढेल तर ते करणे कठिण नाही.

इथे भारतीय दुकानात बघितले तर काही मालावर भारतातल्या दोन तीन भाषांमधून मजकूर लिहीलेला असतोच. (मराठी तून असेलच असे नाही, कारण गरज नाही - महाराष्ट्रातले लोक लै हुष्षार, त्यांना हिंदी, इंग्रजी, गुजराती सगळे समजते) Happy

हिरा, एका वेगळा दृष्टिकोन दिल्याबद्दल धन्यवाद. शेतीतल्या अनेक संज्ञा शाळेतल्या पुस्तकत/लेखनात कधीच आल्या नाहीत. मात्र घरी प्रमाण मराठीच्या जवळची बोली असल्याने हा फरक कधी लक्षात आला नाही.

स्वयंघोषित सर्टिफिकेशन एजन्सीसाठी पुन्हा हा आयडी घेतला Lol
धमाल मनोरंजन आहे. Lol

त्यातल्या त्यात रुमालाचार्य मास्तुरे !! Rofl

सर्टिफिकेशन एजन्सीला इथले प्रतिसाद झेपत नाहीयेत असे दिसते. त्यांची पातळी उंचावल्यानंतर त्यांचा विचार करता येईल. सध्या त्यांना असेच गंडलेले असू द्यावेत Proud

हीरा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जे प्रयत्न चालू होते त्यात शब्द संख्या कमी पडत होती. तेव्हां अर्धमागधी आणि पाली मधून आलेल्या ( पण आता प्रमाणभाषेतून लुप्त झालेल्या) शब्दांची भर घालून प्रयत्न केले गेले. म्हणजेच हे शब्द आहेत याची कल्पना आहे पण त्याकडे गरज पडल्याशिवाय लक्ष न देणे हे खटकण्यासारखे आहे. वर एका आयडीने पूर्वग्रहाचा आरोप केला आहे त्या आयडीला कशाचीही कल्पना नाहीये. आपल्याला वाटते ते(व्हढे)च खरे असे एका सर्टिफिकेशन एजन्सी प्रमाणे ते आरोप आहेत.

हा ई- सकाळ मधे आलेला (पिळू) साहीत्यिक इरगोंडा पाटील यांचा (पिळू) लेख.
https://pratisaad.blogspot.in/2016/03/blog-post.html

इरीटेटेड लोकांसाठी लोकाग्रहास्तव ..

हीरा

तुम्ही वादसंवादप्रिय भारतीय का ऑर्कुट कम्युनिटीवर होतात का ? कारण तुमचे प्रतिसाद नेहमी पूर्वी वाचले आहेत असा फील देतात. याच कम्युनिटीवर ग्रामीण भाषा व इतर महाराष्ट्रीय बोलीभाषांवरचे सदाशिव पेठी भाषेचे अतिक्रमण अशा काहीशा शीर्षकाचा धागा होता... त्यात एक कुणी भाषातज्ञ कित्येक दिवस मराठी प्राकृतातून आलेली आहे हे मान्य करायला तयार नव्हते. तुम्ही त्या कम्युनिटीवर असाल तर ही चर्चा आठवत असेल.

शोधायचा प्रयत्न केला पण सापडत नाहीये, कसं शोधावं हे समजत नाहीये.

घायल, कुठल्याही कम्यूनिटीवर माझा वावर नव्हता आणि नाही. मराठी आंतरजालावरील काही संस्थळांवर मात्र या विषयावर जेव्हाजेव्हा विषय निघाला तेव्हा विस्ताराने लिहिले आहे. अगदी मनोगत, उपक्रम, मी मराठी, मिसळपाव, मायबोली यांवर बरीच खडाजंगी या आधी होऊन गेली आहे आणि अजूनही पुन्हा पुन्हा होत असते. मिसळपाववरील एका धाग्यात तर या लेखातल्या युनेस्कोच्या अहवालाचे साधारणतः हेच संदर्भ (अगदी तंतोतंत नसले तरी) हिरिरीने देण्यात आले होते आणि साधारणतः हीच भूमिका अशीच हिरिरीने मांडली होती. तिथेही असाच प्रतिवाद केला होता. म्हणून तुम्हाला 'देजा वू' वाटले असेल.
'अभिजात' या दर्जाबद्दल सांगायचे तर त्यामुळे भाषेच्या विकासात फारसा फरक पडत नसावा. अभिजात दर्जा मिळाला की सरकारकडून त्या भाषेच्या विकासासाठी पाचशे कोटींचा निधी मिळतो म्हणतात.(ह्याबद्दल नक्की माहिती नाही.) पण विकास ही संज्ञा इतकी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट-अमूर्त आहे की काय केल्यास विकास झाला असे म्हणता येईल हेच समजत नसते. काही अध्यासने निर्माण करणे, काही 'भाषाभवने' बांधणे, एखाद्या दूरस्थ विद्यापीठात दोनचार विद्यार्थ्यांसाठी मराठीचा पदवीअभ्यासक्रम सुरू करणे, असे साधारणतः होते. कदाचित काही जुन्या दुर्मीळ पुस्तकांचे पुनर्मुद्रण होत असेल, काही अनुवाद सिद्ध होत असतील, काही आढावे-सर्वे प्रसिद्ध होत असतील..उदा. आधुनिकोत्तर मराठी साहित्य, स्त्रीसाहित्याचे अंतरंग, मराठी साहित्यातला विद्रोह, दलित साहित्य वगैरे. अर्थात हेही ठीकच म्हणा.
आणखी एक. भाषेचा, पुस्तकाचा बोलबाला हे सर्व मार्केटिंग असते. आणि पुस्तक किती खपते यावर प्रकाशक पुढील पुस्तक उचलण्यास तयार होतात. डिप्राइव्ड समाजातील लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांना जर उठाव नसेल तर ती पुस्तके, त्यातली भाषा, प्रतिपादन सर्वदूर पोचणार नाही. म्हणजे पुन्हा पुस्तके विकत घेण्याइतपत ऐपत असण्याचा मुद्दा आला. ज्यांना यात रस नाही त्यांच्यावर ही पुस्तके विकत घेण्याची सक्ती करता येऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा प्रमाणित मराठीच्या प्रतिष्ठेमागे जो आर्थिक समृद्धीचा मुद्दा आहे, तोच या ग्रामीण मराठीच्या प्रतिष्ठेमागे आला. गुजराती भाषेला आणि भाषकांना प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या पर्चेसिंग पॉवरमुळे. नाही तर गुजराती साहित्य हे सर्वसाधारणपणे खूप उच्च दर्जाचे आहे असे नाही. पण त्यांच्याकडे कोटीकोटी उड्डाणे घेऊ शकणार्‍या साहित्यसंस्था, प्रकाशनसंस्था आहेत. तडाखेबंद खप असणाया ललितेतर आणि अभ्यासक्रमीय साहित्याचा (उदा. नवनीत गाइड्स) त्यांच्याकडे जवळजवळ एकाधिकार आहे. त्यांचे अर्थव्यवहार पाहून आपले डोळे पांढरे होतील.
तेव्हा, समृद्ध समाजाच्या संस्कृतीला, भाषेला आपोआप प्रतिष्ठा मिळते हा नियम आहे. (ता. क.- नवे वास्तव असे सांगते की पुणे,मुंबई, अह्मदाबाद येथील खूपशी गुजराती मुले इंग्लिश माध्यमातून शिकतात )

हीरा,

एक म्हणजे जी मुले माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक पातळीपर्यंत पोचू शकत नाहीत त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तरी या प्राथमिक शिक्षणाचा त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग होत नाही.
>> इथे मॅकॉले येत असावा का? कारण प्राथमिक शिक्षण केवळ इंग्रजी माध्यमातून घे तले म्हणून लगेच या प्राथमिक शिक्षणाचा त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग होईल असेही नाही ना?

हर्पेन, ते वाक्य 'मातृभाषेतील शिक्षण हेच मुलांच्या विकासासाठी उत्तम आहे' अशा अर्थाच्या विधानाबाबत होते. जमिनीवरचे वास्तव हे आहे की कमकुवत आणि थोड्याश्या परक्या मातृभाषेत शिकले काय आणि सशक्त परक्या भाषेत शिकले काय, लवकर ड्रॉप आउट होणार्‍या मुलांना काहीच फरक पडत नाही. आणि उच्चशिक्षण घेणार्‍यांना पहिल्यापासून सशक्त भाषेत शिक्षण घेणे हे फायद्याचे आहे.
इंग्रजी माध्यमामध्ये आज कित्येकांना थोड्याश्या उज्ज्वल भविष्याची थोडीफार तरी हमी दिसते. तर घेऊ दे ना त्यांना त्या भाषेत शिक्षण. उद्या इंग्रजीची चलती संपली (जशी आज इंजिनीअरिन्ग कॉलेजांची संपली आहे) आणि मराठीची सुरू झाली तर हेच लोक मातृभाषेतून शिक्षणाकडे धाव घेतील. सध्या शिक्षण हे कोणीही भाषेच्या संवर्धनासाठी वगैरे घेत नाही. तर किंचितसे चांगल्याप्रतीचे जीवनमान मिळवण्यासाठी घेतो.
शिवसेनेच्या उदयाला हा इंग्रजीत तरबेज असण्याचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. द्वैभाषिकात तेव्हाचे मुख्यमंत्री श्री मोरारजी देसाई आणि इथले 'अंग्रेजी हटाव'वाले समाजवादी यांच्या आग्रहामुळे महाराष्ट्रात इंग्रजी एकदम आठव्या इयत्तेपासून सुरू केले गेले. चारपाच वर्षांतच याचे दुष्परिणाम दिसू लागले. इथून मॅट्रिक्युलेट होऊन बाहेर पडणार्‍या मुलांचा चांगल्या कंपन्यांमधल्या कारकून, स्टेनो, टाय्पिस्ट अशा तेव्हाच्या 'कुशी' नोकर्‍यांसाठी मद्रासहून येणाया इंग्लिशपारंगत फौजेसमोर पाड लागेना. मग मार्मिकमधून आक्रमक भाषेत कोणत्या कंपनीत किती मद्रासी आहेत यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या. वातावरण तापले. लुंगी हटाव आंदोलन सुरू झाले. उडपी हॉटेलांवर हल्ले झाले वगैरे पुढचा इतिहास सर्वांना माहीत आहे.शिवसेनेने ही आंदोलने आणि वडापावच्या गाड्या याबरोबरच, सैरभैर झालेल्या बेकार मराठी तरुणांसाठी इंग्लिश प्रशिक्षण आणि समुपदेशन केले असते तर फार मोठा कार्यभाग साधला असता. कोहिनूर टेकनिकल इन्स्टिट्युटच्याबरोबरीने बालवाडीचे वर्ग काढून त्यात इंग्लिश शिकवायला सुरुवात केली असती तरीही काही विधायक कार्य घडले असते.
'सा विद्या या विमुक्तये' या सुभाषितातल्या विमुक्तीचा अर्थ 'दारिद्र्यापासून मुक्ती' असाच घेतला जातोय कारण ती प्राथमिक गरज झाली आहे.
'

>>इंग्रजी माध्यमामध्ये आज कित्येकांना थोड्याश्या उज्ज्वल भविष्याची थोडीफार तरी हमी दिसते. तर घेऊ दे ना त्यांना त्या भाषेत शिक्षण. उद्या इंग्रजीची चलती संपली (जशी आज इंजिनीअरिन्ग कॉलेजांची संपली आहे) आणि मराठीची सुरू झाली तर हेच लोक मातृभाषेतून शिक्षणाकडे धाव घेतील.

पण मराठीची चलती सुरू कशी होणार ???

Pages