तापोळा

Submitted by जव्हेरगंज on 30 May, 2016 - 10:20

फुटलेल्या अंगठ्यावर तिनं चिरगुट बांधल.
"ठणका मारतुय का?"
"लय दुखतय"
"आसूदी आता, घरी गेल्यावर हाळद लावू"
"हू.."
डबडबलेल्या डोळ्यांनी तो मागोमाग चालत राहिला.
"आयं, सरकार लय मोटं आसतं का ग?"
"हू.. लय मोटं आसतं"
"मजी लायटीच्या डांबापेक्शाबी उच्ची?"
"हू.. लय उच्ची आसतं, आता गप चाल"

तांबूरस्त्यानं चालत गेल्यावर रुकड्यायचं बारकं देवाळ लागलं. त्याच्या जरासं म्होरं कटावर वाट बघत बसलेल्या बाया दिसल्या. पाठीमागे हिरव्यागार गवतात खळाळून चारी वाहत होती

"आयुव, आज सोन्याबी आलाय का?, कशाला आणलवं यवढ्या उनातानात"
"आलाय म्हागं लागून, चला, उटा आता"
"चिखुल झालाय मायंदाळा, कटावरनंच जाव लागल खाली, चलै सोन्या"

फुटलेल्या अंगठ्याकडं कुणाचं लक्ष जात नाही. त्याला ते कुणाला दाखवायचंही नाही. चिरगुट मात्र लालभडक झालंय. भुसभूशीत मातीत टाचा रुतवून तो सगळ्यांच्या मागोमाग चालू लागला.

"आयं, पीठ कसं तयार हुतं गं?" काल रात्री भाकऱ्या खाताना पडलेला प्रश्न त्याने आत्ता विचारला होता.
"कसं मजी, गिरणीत"
"गिरणीच्या आत काय आसतं गं?"
समोरच्या रांगेत बाया खोखो हसल्या. तसा जरा तो खजीलच झाला.

हेक्टरी ऊस संपता संपत नव्हता. मधोमध घुसलेला कट त्यांना दुसऱ्या टोकाला घेऊन आला. 'नळाच्या खाल्ल्या बाजूला काय आसंल?' हे त्याचं बऱ्याच दिवसांपासूनचं कुतूहल होतं. तो धुक्यात हरवलेला पऱ्यांचा प्रदेश मुळीच नव्हता. तेथे सफरचंदाची झाडेही नव्हती. उंचावरुन कोसळणारे धबधबेही तिथे कुठेच नव्हते.

एका खुरट्या झुडूपाला तिनं फारी बांधली. खाली आडोश्याच्या सावलीत तो बसून राहिला. चार दगडं जमवून मग दगडांचा खेळ करत बसला. भूक लागल्यावर फडकं उघडलं. चार घास खाऊन घेतले. दिपवणारं उन बघत कधी डोळा लागला त्याला समजलंच नाही.

आडोश्याची सावली जाऊन कललेलं उन त्याच्या आंगाखांद्यावर आलं. तिनं येऊन फारी सोडली. एखाद्या भयंकर स्वप्नातून बाहेर आल्यासारखा तो जागा झाला.

"आये, मलाबी यक गठुडं दी"
तो तिच्या मागोमाग गेला.
फारी हातरुन ती खुरपलेलं गवत टाकत राहिली. टावेलात त्याच्यासाठीही थोडसं.
"आजून दि की उलिकसं"

गवताच्या भाऱ्याची तिनं जीव खाऊन गाठ मारली. न पेलवणारं ओझं डोक्यावर घेतलं. बाकीच्या बायांनीही आपापला भार उचलला.
बारकं गाठोडं घेऊन तोही तयार.

पुन्हा सगळ्या हेक्टरी उसात.
कटावरून वाट काढत दुसऱ्या टोकाला.
आता तो प्रश्न विचारत नव्हता. 'आपल्या भाऱ्यात एखादं हत्तीचं पिल्लू आहे की काय' एवढं त्याला ते जड वाटत होतं.

खळाळून वाहणारी चारी तो कसाबसा पाहत राहतो. आतापर्यंत न जाणवलेले उन्हाचे चटके आता त्याच्याही पायाला बसू लागले. तांबूरस्त्यानं टोळकं चालत राहतं.

घरी आल्यावर त्यानं आवडत्या गायीच्या दावणीत इवलंसं गाठोडं रिकामं केलं. खरंतर तो दमला होता. गायीचं कान गोंजारत दावणीच्या दगडावर बसून राहिला.

तिनंही डोक्यावरचा भारा ओट्याच्या कडंला उतरवला. मग न्हानीतलं भगुणं आणून रांजणातलं दोन तौल्या पाणी ओतलं. पाय धुवून ओट्यावरच बसून राहिली.

ती अशी रोजच बसते. गायीचं कान गोंजरताना फुटलेल्या अंगठ्याकडं त्याचं लक्ष गेलं. चिरगुट सुटून गेलं होतं. ओली जखम रक्ताळली होती.
"तायडे, हाळद टाक गं थुडी त्येज्या आंगट्यावर, लागलय बग त्येज्या पायाला"

"कुटं लागलय सोन्या तुला" म्हणून तायडीही त्याला आत घेऊन चालली.
जाता जाता तो तिच्या पायाकडे निरखत गेला. नेहमीसारखेच होते.

"तायडे तुला म्हायतेय का, सरकाराच मुंडकं आभाळाला थडाकतं, लय उच्ची आसतं"
"व्हय.."
"लय पैशं आसत्यात सरकाराकडं, लय शिरमंत आसतं."

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Looking forward to more. I am a big FAN of your writing. Cant wait to see the next part. Happy

Vidya.

झ्याक लिवलंय ... उगा प्वाटात सारखं बाग् बूग् व्हत व्हतं वाचताना, कायतरी ईपरित व्हईल म्हनून ... शेवट वाचल्यावर गार गार वाटलं जिवाला. Happy

लहानग्या जिवाची निरागसता खूप भावली.