मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 May, 2016 - 18:29

सुरुवात माझ्यापासून करतो

माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.

*1) जात*

प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?

मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.

तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.

त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.

पण आज अडचण मात्र वाटतेय.

कारण लवकरच ही जात माझ्या लग्नाच्या आड येणार आहे.

जर आमच्या दोघांपैकी कोणी एकाने दुसर्याची जात कागदोपत्री स्विकारली किंवा दोघांनी तिसरीच जात लावली तर ही अडचण सुटण्यास मदत होईल.

समाजमान्यतेनुसार वर असलेल्या जातीतून खाली असलेल्या जातीत जाणे सोपे पडेल की व्हायसे वर्सा सोपे पडेल?

कृपया धर्मांतराचा सल्ला देऊ नका. कारण मी नास्तिक असलो तरी गर्लफ्रेण्ड आस्तिक आहे आणि तिला देव बदलायचा नाहीये.

तळटीप - एखादा सल्ला मस्करीत दिला तर तसे नमूद करा अन्यथा तुमचा एक मजेचा सल्ला आमचा जीव घेऊ शकतो.

*2) पत्रिका*

पत्रिकेत काहीसे 34-36 गुण जुळवायचे असतात. आमचे दहाबाराच की काहीसे बरेचसे कमीच जुळताहेत. याऊपर कसलेसे विघ्नही आहे ज्यानुसार आमचे लग्न झाल्यावर पाच वर्षांच्या आत एकाचा अपघाती मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे तेव्हा समजले जेव्हा आमचे लग्न करायचे नक्की झाल्यावर आम्ही बाहेरच्या बाहेर पत्रिका चेक केली. आमचा दोघांचा यावर विश्वास नसल्याने आम्ही मागे नाही हटणार, पण दोन्ही घरचे लोक पत्रिका बघण्यावर विश्वास ठेवणारे आहेत त्यामुळे ते आम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत.

हा गुंता कसा सोडवावा. नकली पत्रिका बनवून घरच्यांना अंधारात ठेवावे की त्यांना खरे खरे सांगून आपल्या प्रेमाचे भविष्य अंधार्या खाईत लोटावे..

*3) घर (मुंबईत घर)*

सध्या जे मुंबईत घर आहे ते आईवडिलांचे आहे. लग्नानंतर लवकरच स्वत:चे घ्यायचा विचार आहे. किंबहुना ते बूक करून मगच लग्न करायचे आहे.
सध्याच्या आकडेमोडीनुसार दोघांचे पगार आणि बचत जोडून 55-60 लाखापर्यंत घराचे बजेट जातेय. एखाद्या छोट्या शहरात ही रक्कम मोठी वाटू शकली असती. पण मुंबईत वन बीएचके मिळायचे वांधे झाले आहेत. आणि एकीकडे मराठी माणसांनो मुंबईबाहेर पडू नकाचे नारे लावले जात आहेत.
खरे तर मलाही मुंबई सोडायची नाहीयेच. पण आता पन्नास साठ लाख खर्च करून काय मुंबईच्या वन रूम किचन मध्ये लोअर मिडलक्लास बनून राहायचे का? आणि अश्या पोराला आपली पोरगी द्यायला कोणता बाप तयार होईल? माझ्या गर्लफ्रेंडचे वडील तयार होतील का हा प्रश्नच आहे.

____________________________________

असो....

तर या माझ्या प्रेमविवाहात असलेल्या तीन अडचणी आहेत. कमी अधिक प्रमाणात या तीन किंवा ईतर अडचणी (आपापल्या परीने भर टाका) मराठी मुलांच्या प्रेमविवाहात असतात. त्या सर्वांची सांगोपांग चर्चा करायला हा धागा. इथे तुम्ही एका मराठी मुलाचे किंवा मुलीचे पालक म्हणूनही चर्चेत भाग घेऊ शकता. चर्चेचा फायदा सर्वांनाच.

आपला नम्र,
नवतरुण ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा प्रेमात पडल्यावर आणि इकडे माझी गर्लफ्रेंड म्हणत मिरवल्यावर पत्रिका चेक करण्यात काय पॉईंट आहे? तुम्ही मुळात पत्रिका चेक करायला टाकलीत म्हणून किती गुण जुळतात आणि किती नाही हे कळलं ना? काय गरज होती त्याची? तसंच जात आणि धर्म. ह्या गोष्टी जर लग्नातला अडथळा असतील तर डोळसपणे प्रेमात पडावं.

प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?>>>>>>धर्म बदलता येते जात नाही.
म्हणुन म्ह्ट्ले जाते जात नाही ती जात.

जाति व्यवस्था को नष्ट करने के लिए तीन सुझाव ।
१ ) धर्म शास्त्रों में विश्वास रखने की धारणा को नष्ट
करना ।
२ ) धर्म शास्त्रों एवं वेदों के अधिकार नष्ट करना ।
३ ) अन्तर्जातीय विवाह ।
संदर्भ “ एनीहिलेशन ऑफ कास्ट ”

नकली पत्रिका बनवून घरच्यांना अंधारात ठेवावे की त्यांना खरे खरे सांगून आपल्या प्रेमाचे भविष्य अंधार्या खाईत लोटावे.. <<<<<< नकली पत्रिका बनवून गरच्याना अंधारात ठेवा हे काम पंडितच करुन देईल थोडे जास्त पैसे द्या.
अंधारी खाई होती की उजेडाची ५ वर्षाने कळेलच की Happy Happy

सध्या आहे त्या बजेट मधे घर घ्या आणि प्रेमाने रहा तो पण महल वाटेल.

पुढिल आयुष्यासाठी भरघोस शुभेच्छा.

बरेच मुद्दे लिहायचे आहेत नंतर लिहितो सविस्तर.तिसरा मुद्दा - घराची अडचण सर्वांनाच आहे प्रेमविवाह असो नसो.फार हुच्च विचार ठेवायचे तर मुलगा आर्थिक स्वतंत्रच हवा.पैका नसेल तर बय्राच गोष्टी गिळाव्या लागतात.चांगल्या हॅाटेलऐवजी टपरीवरचा वडापाव खातो तसे.
२) पत्रिका जुळवणे हेच मोठे थोतांड आहे.इथे नंतर
३) मित्रवगैरे गुळाचे मुंगळे दूर गेल्यावर फिरकत नाहीत.
४) पत्रिकेत प्रेम विवाह योग म्हणजे याच मुलीशी होईल असे नाही.
५) अपघात योग कोणालाही असतो.घाबरून कसं चालेल?
६)

१] जातीचा प्रश्न - मित्रांकरवीं घरीं पिल्लू सोडा कीं दुसर्‍या धर्मातल्या मुलीच्या तुम्ही प्रेमात पडला आहात; दुसर्‍या जातीतली मुलगी स्विकारण्याची मानसिकता तयार होईल ;
२] पत्रिका -अशी एखादी मुलीची पत्रिका घरीं दाखवा जिच्यात लग्नानंतर नवर्‍याला मृत्युयोग आहे;[ असा कांहीं योग असतो, ही ऐकीव माहिती[ " अरे बाबा, ही सोडून दुसरी कोणतीही मुलगी कर " , असं म्हणत गुण जुळले नाहीत तरी लग्नाला संमति मिळेल;
३] मुंबईत घर -ठराविक वयानंतर मुंबईपेक्षां गांवीच रहाणं सर्वच दृष्टीने कसं चांगलं किंवा अपरिहार्य , हें आई-वडीलांच्या मनावर बिंबवत रहा; त्यांची गांवीं रवानगी करून स्वतंत्र जागेचा प्रश्न स्वस्तात सुटेल .

[ * सल्ला गंभीरपणे दिला आहे पण तुम्ही तो मस्करीतही घेवूं शकता ]

लग्न करायचं हे पक्कं असेल तर पत्रिका, जात आणि पैसा हे सर्व गौण होतं. कारण मला एक कळलेलं आहे की कितीही जात वगैरे सेम असली तरी स्वभाव जुळत नसेल आणि प्रेम नसेल तर काहीही उपयोग होत नाही. आणि कितीही पैसा असला तरी शेवटी मनाचं समाधान नसेल तरीही काही उपयोग नाही. एकमेकांना समजून घेण्याची, प्रत्येक गोष्टीला वेळ देण्याची समाज असेल तर बाकी कशालाही महत्व नाहीये.

जात- रोजच्या जेवण आणि मुले बाळे सांभाळण्यात जात कुठेही मदत करत नाही. त्यासाठी चांगले जेवण आणि आई- बाबाच लागतात.

पत्रिका- तुमचा विश्वास नसेल तर याने काहीही फरक पडत नाही. घरच्यांना कसे समजावायचे यात फक्त ते एक निमित्त असते. बाकी काही नाही.

घर- लग्न झाल्या झाल्या कुणाकडे मोठे घर नसते. त्यामुळे दोघांनी मिळून घर बांधावे, लग्न झाल्यावर हे सर्व करण्यातही मजा असतेच. आमचे लग्न झाले तेंव्हा १० लाखाचं घर घेण्याचीही ऐपत नव्हती. पण दहा वर्षात खूप काही मिळवलं आहे.

विद्या.

जात- तुला असं वाटत नाही का तुम्ही दोघं तुमच्या पालकांना underestimate करत आहात? मुलगा मुलगी एकमेकांना अनुरुप असतील आणि आर्थिक परिस्थिती आता आहे त्या पेक्षा उंचावणार नसेल पण खालावणारही नसेल तर विशेष अडचण येत नाही. मुंबईत राहणारे विचाराने जरा मोकळे असतात असा अनुभव आहे. सगळं जर चांगलं असेलतर फक्त जातीवरुन विरोध करतील असं वाटत नाही. नाही तर तुम्ही त्यांना हे सगळं समजवण्यात कमी पडताय.
पत्रिका- यातलं काही कळत नाही, त्यामुळे पास.
घर- आज नाहीतर उद्या होईल. कोणाच्या ही दबावाखाली निर्णय घेऊ नकोस. दोघांच्या सोईनुसार मुंबईत/ मुंबईबाहेर घर घे. बाकी घर घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. कुठे घ्यायचं हा त्यातला १ आहे. घरासाठी शुभेच्छा!

लग्नासाठीही शुभेच्छा!

दबावाखाली कुठलाही निर्णय घेऊ नका. नीट विचार करून काय तो निर्णय घ्या.
दोघांच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन त्यांना तुमचा निर्णय सांगा.

मराठी मुलाशी लग्न करण्याचा अनुभव नसल्याने स्वानुभवाचा सल्ला देण्यास असमर्थ आहे रे ऋन्मेष.
Wink

लोकहो, ऋन्मेषने बाहेरच्या बाहेर पत्रिका बघितली कारण घरचे पत्रिका जुळवतील तेव्हा काय काय संभाव्य प्रॉब्लेम समोर येऊ शकतात याची अगोदरच कल्पना यावी म्हणून. त्यात काही चुकीचे नाही.
(तसेही ऋन्मेषने 'सईराट' लिहिणे सोडून आजवर दुसरी काही चूक केलीय असे मला वाटत नाही. Wink )

तरिही स्वानुभव लिहिते.

१. जात- मी परधर्मातल्या मुलावर प्रेम केल्याने जातीचा प्रश्नच नव्हता. मात्र धर्मांतर केल्यासच लग्न करून देऊ अशी सासरची अट होती. त्यानुसार मोठ्ठा सेरेमनी करून अकरा धर्मगुरू बोलावून भरभक्कम दक्षिणा देऊन लग्नाच्या आदल्या दिवशी नव्या धर्माची दीक्षा दिली. दोघांनाही दिली कारण नवर्‍याचाही दीक्षा समारंभ जन्मापासून झाला नव्हता. हा फक्त लग्नाचा एक सोहळा समज असे नवर्‍याने सांगितल्याने एक सोहळा म्हणूनच पाहिले , गॅझेटमध्ये किंवा ऑफिशीयली धर्म चेंज केला नाही. जात तर तशीही काहिही करा, चेंज होत नाही, आणि जातीचे फायदेही. त्यानंतर नोकरी किंवा तत्सम संधी मिळवताना अर्जावर धर्म जुनाच लिहून कॅटॅगरी ओपन लिहिली. जातीचे सर्टीफिकेट न जोडल्याने तो फायदा घेतला नाही.

सामान्य जीवन जगताना तसा दोघांच्या जाती /धर्म वेगळ्या असल्याने काही फरक पडत नाही.
भाड्याचे घर मात्र एक दोन वेळा माझ्या जातीमुळे मिळाले नाही.

२. पत्रिका- आमच्या घरी पत्रिका काढायची पद्धत नव्हती. तरी जन्म वेळ, स्थान, दिनांक यावरून सासरच्यांनी पत्रिका काढली.
तिच्यात बत्तीस गुण जुळत होते म्हणे. आणि पुढे इत्कर्षच उत्कर्ष होता म्हणे. त्यामुळे पत्रिका बघून उलट आनंदाने लग्न थाटामाटात लावले. तो प्रश्न आला नाही.

३. घर- मुंबईत जसा स्वतःचे घर असावे असा प्रश्न असतो तसा आमच्यापुढे कधीच नव्हता. आमचे लग्न झाले तेव्हा आम्ही एमडीचे विद्यार्थी होतो आणि एका हॉस्टेलात लग्नानंतर एकत्र रूम मिळाली. नंतरही मुंबईत एका हास्पिटलात काम करत होतो त्यांच्याकडूनही वर्षभर रूम मिळाली.
आज अकरा वर्षे झाली, अजूनही आमचे स्वतःचे घर नाही भाड्याचीच तीन घरे झाली. त्यात काही चुकीचे आहे असे आम्हाला वाटत नाही. दोन्ही घरच्यांना वाटते , त्याला इलाज नाही.

वनरूम किचन घेऊन मुंबईतच रहाणे हे मोठ्ठं घर घेऊन मुंबईबाहेर रहाणे आणि मग कम्यूट करणे यापेक्षा सध्या बरेच बरे आहे असे मी म्हणाले असते. तुझी गर्लफ्रेंड काय म्हणते बघ. स्टुडिओ टाईप अपार्टमेंटमध्येही टेचात आणि हाय लाईफ स्टाईल मेंटेन करून रहाणारे लोक असतात.

तर... जात/पत्रिका/ स्वतःचे घर हे तीनही मुद्दे प्रेमापुढे गौण आहेत.
आरामात खाऊन पिऊन आणि भाड्याच्या घरात का होईना राहू शकण्याइतके कमावत असू तर या सगळ्या गोष्टींकडे आरामात दुर्लक्ष करता येते.

मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहातील अडचणी दूर करण्याचा एकमेव इलाज - मराठी इतकेच हिब्रू शिकणे.
[मस्करीत सल्ला दिला आहे, शिरेयस नको घेव]

जात:- जर पालकांचा विरोध असेल तर स्वतः जाऊन बोला. एखादा विश्वासू मध्यस्थ शोधा. एखादा भाऊ, आत्या, मावशी, काका वगैरे वगैरे जो स्वतः मुक्त विचाराचा आहे आणि समोरच्याला गोड बोलत मुद्दे पटवून देऊ शकतो.

पत्रिका:- तुम्ही केले ते बरोबर आहे. सरळ मुलीच्या पत्रिकेनुसार तुमची पत्रिका बनवा. घरी कल्पना देऊन ठेवा. लग्न झाल्यावर पाच सहा महिन्याने सासू सासर्यांना सांगून टाका कि तुमची अशी गंमत केली.

घर:- लग्न करताना स्वतःचे घर असल्याचा खूप मोठा फायदा असतो.. लग्नाच्या बाजारात पत राहते. लग्नाला वेळ असेल, शक्य असेल तर एखादी ऑन साईट असाईनमेंट किंवा एक दोन वर्ष दुसऱ्या देशात जॉब करून घ्यावा.

जात - जर मुला/ मुलीच्या कुटूंबचा आर्थिक/ सामाजिक/ शैक्षणिक/ राहणीमान स्तर समान/ सामयिक असेल तर जातीचा प्रश्न निकालात निघेल. असं नसेल तर ज्याचा कुटूंबाला प्रॉब्लेम आहे त्याला लहान भाऊ/ बहीण नसेल तर खुशाल लग्न करा नाही तर तुमच्यामुळे त्यांनां पुढे ठरवलेल्या लग्नांत प्रॉब्लेम येऊ शकतो.

पत्रिका - जर स्वतःवर विश्वास असेल आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेता येत
असेल तर गो अहेड! प्रारब्ध बदलणे आपल्या हातात नसते पण आलेल्या संकटाशी मुकाबला करणे आपल्याला
हातात असते.

घर - जर बचत ५५/ ६० लाख असेल आणि वय ३० च्या आत असेल तर आता जो पगार आहे तो पुढच्या १० वर्षात पाचपट किंवा अजून वाढेल म्हणून जास्तीत जास्त कर्ज घेऊन घर घे. कितीही रक्क्म असू दे पण घर तुझ्या किंवा गफ्रेच्या घराजवळच घे. अजून एक मुंबईत घर महाग आहे पण बाकी सोयीसुविधा चांगल्या आणि कमी खर्चिक आहे म्हणून छोटी जागा असेल तरी मुंबईत घर बघ.

गुड लक!

मराठी मुलांच्या लग्नात जात, धर्म यांबरोबर प्रांताचा पण विचार करतात. एकाच जातीतले पण कोकणातले, देशावरचे विदर्भातले असे वेगवेगळ्या प्रांतातले असतील तरीही लग्न ठरवताना कठीण जाते.

>> नवर्‍याचाही दीक्षा समारंभ जन्मापासून झाला नव्हता <<

साती तै,
मग जन्मापासून लग्न होईपर्यंत त्यांचे धार्मिक स्टेटस काय होते? फक्त कुतुहल म्हणून विचारले.

सिलसिला हा सिनेमा पंचवीस वेळा जोडीने पहा. प्रत्येकवेळी त्यावर प्रश्न काढा. त्याची उत्तरे लिहा. ती मायबोलीवर टाकून तपासून घ्या. हा सिनेमा प्रेमवीरांचं बायबल, कुराण, गीता आहे. तुमच्या लग्नात अनेक विघ्ने असल्याने आणि लग्न करणे आवश्यक असल्याने तुम्हाला लग्न करावेच लागेल. ते आपसात होईल असे थोडेच आहे ?

संजीवकुमार आणि जया भादुरी शोधा.

सायो,
पत्रिकेबाबत साती म्हणाल्या तेच कारण.

राहिला प्रश्न जातीपातीचा. तर त्यांचा अडथळा प्रेमात नाही तर लग्नात येत आहे. जातींना झुगारून आणि समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न करायची हिंमत नाही अश्यातला प्रकार नाही. ते तर जगाशी लढू. पण प्रश्न आहे घरच्यांचा विरोध पत्करून किंवा त्यांना नाराज करून लग्न करण्याचा. त्याहीपेक्षा त्यांना अडचणीत टाकणे योग्य का याचा. किंबहुना आता त्याला पर्यायच नाही, नाईलाजच आहे तर त्यांचा त्रास कमी कसा होईल हे बघणे.

बाकी प्रेमावर शंका घेऊ नका. आपले ते लैलामजनू, हीररांझा, वीरझारा आणि शाहरूखच्या सर्व चित्रपटातील प्रेमाची टोटल मारली तरी ईतके भरणार नाही Happy

ईतर प्रतिसादांचे आभार, त्यावर लिहायचे आहे पण सध्या मोबाईलवर असल्याने आणि फार वेळ नसल्याने नंतर.. पहिलाच प्रतिसाद पाहून अगदीच राहावले नाही म्हणून लिहिले.

आणि हो तो एक वरचा प्रतिसाद.. लिव ईन चा पर्याय .. त्याने हा प्रश्न कसा सुटणार हे नाही समजले. तसेच यात घरच्यांना जास्त अडचणीत टाकल्यासारखे नाही का होणार?

राहुल, जन्मापासून लग्नापर्यंत त्यांचे धार्मिक स्टॅटस त्यांच्या आईवडिलांचे आहे तेच होते ऑन पेपर.
पण त्यांच्यात दीक्षा घेतल्याशिवाय माणूस खरोखर त्या धर्माचा झाला असे समजत नाहीत. (धार्मिक दृष्टीकोनातून)

बर्‍याच विचारांती हे लिहीत आहे:

तुमच्या बर्‍याचश्या प्रश्णांची ऊत्तरे 'तीन मूर्ख' 'मुन्नाभाई' व 'पीके' अशा तत्सम चित्रपटात सापडतील. तुम्ही शा.खा. चे पंखे असलात तरी हे हीट चित्रपट पाहिले असतीलच. Happy
दोन्ही कडच्या कुटूंबानी एकत्रीत बसून हे सर्व चित्रपट पाहिल्यास तुमचा मार्ग सुकर होण्यची शक्यता आहे.
[शेवटी नुसतेच चित्रपट परिक्षण काय कामाचे?]

ता.क. दोन्ही कडच्यांनी 'सैराट' पाहिला नसेल अशी आशा करतो.

शुभेच्छा!

>>तळटीप - एखादा सल्ला मस्करीत दिला तर तसे नमूद करा अन्यथा तुमचा एक मजेचा सल्ला आमचा जीव घेऊ शकतो.
ता.क. ईथले सर्वच सल्ले ज्याने त्याने आपापल्या जबाब्दारीवर घ्यावेत. आणि जरा गृहपाठ करा. जुन्या माबो वरील म्हणजे हितगुज वरील या संबंधतील सर्वच प्रश्ण ऊत्त्तरे views and comments या सदरातून वाचून काढा.

'मन शुध्द तुझं... ' हा 'कुंकू' मधिल रिंग्टोन सेट करूनच टाका दोघांच्याही फोन मधे (ओरीजीनल हा रिमीक्स वगैरे नव्हे). It is perfectly apt. for you:
https://www.youtube.com/watch?v=qqN-EpUdtaw

May the force be with you!

मुळात सातीचा पत्रिकेबाबत लिहिलेला प्रतिसादही मला पटलेला नाही. एकदा प्रेमात पडल्यावर अमुक एका व्य्कतीशी'च' लग्न करणार हे नक्की ठरवल्यावर बाकी कुबड्या हव्यातच कशाला? (घरून विरोध झाला/होणारच हे सर्व गृहित धरून त्याचा सामना करायची ताकद तुमच्यात आहे असं गृहित धरू). जर तशी मानसिक तयारी नसेल तर प्रेमात पडू नये किंवा डोळसपणे पडावे.

वर राजू७६ यांच्या प्रतिसादातला हा भाग पटला >>रिका - जर स्वतःवर विश्वास असेल आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेता येत
असेल तर गो अहेड! प्रारब्ध बदलणे आपल्या हातात नसते पण आलेल्या संकटाशी मुकाबला करणे आपल्याला
हातात असते.>>

सातींचा स्वानुभव आणि इतर बर्‍याच जणांनी छान सल्ले दिले आहेतच.
जात वगैरे कोणत्याही बाबतीत आपापल्या घरच्यांना न फसवता/ अंधारात न ठेवता स्पष्ट कल्पना द्यावी असे मला वाटते.लग्नानंतर आईवडिलांसह रहायला काहीच हरकत नसावी.किंवा काही काळ लीव्ह लायसन्सने रहावे.गुड लक.

बादवे,मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी, हे काही कळले नाही.बाकीच्या प्रांतातील मुलामुलींच्या प्रेमविवाहात अडचणी येत नाहीत का?

एकदा प्रेमविवाह करयचा म्हटल्यावर पत्रिका बघूच नये. कारण जमून किंवा न जमून निर्णय बदलाचा नसेल तर काही उपयोग पण नाही. माझ्याकडे तर गुणमेलन करता पत्रिका आल्या तर प्रेमविवाह असेल तर मी बघत नाही. बघू पण नका असे स्पष्ट सांगते . पत्रिका बघणे हे फक्त ' better options ' कळण्याकरता म्हणूनच वापरावे . जिथे पक्का निर्णय झालाय तिकडे गरजच नाही. अर्थात हे सगळ्याच अन्य बाबतीत पण apply होते फक्त लग्नाकरतच असे नव्हे .

अहो जे प्रेम विवाह करू इच्छितात ते शक्यतो असल्या फंदात पडत नाहीच. पण आई वडिलांना कसे समजावून सांगणार? प्रेम विवाह म्हणलं कि सतराशे साठ अडचणी असतात. घरच्यांच्या हातात जात, धर्म, समाज, संस्कार वगैरे वगैरे खूप शस्त्र असतात. त्यातलेच एक म्हणजे पत्रिका. प्रत्येक शस्त्रासाठी एक एक ढाल बनवून ठेवावी लागते.
गोडीगुलाबीने घ्यावे लागते.

आई वडील आहेत ते आपले. 'बघा जमत असेल तर नाही तर सोडून द्या मी चाललो' असं चालत नाही.

आईवडीलांच्या संमतीने लग्न केल्यास संसार सुखाचा होइल असे मला वाटते. त्यामुळे:
१.दोघांनीही कुठलीही गोष्ट न लपवता आपापल्या आई वडिलांना सांगुन टाकावे. बाहेरच्या लोकांकडुन त्यांना कळण्यापेक्षा तुमच्या तोंडुन कळलेले केव्हाही चांगले.
२. आधी तुम्ही दोघांनी एकत्र बसुन संभाव्य प्रश्न काय विचारले जातील, काय अडचणी येणार आहेत आणि त्यावर तुम्ही तोडगा कसा काढणार आहात ते ठरवा. जर तुम्हा दोघांच्या आईवडिलांनी प्रश्न विचारले तर उत्तरे तयार हवीत. नुसते आमचे प्रेम आहे हे कारण पुरेसे नाही."प्यार सब कुछ सीखा देता है इ. वाक्ये सिनेमात छान वाटतात. रीअल लाईफ मधे नाही.
३.बरीच जोडपी सुरुवातीला भाड्याच्या घरात राहुन बचत करुन मग पैसे साठले की घर घेतात. घराचा प्रश्न (या क्षणाला तरी) गौण आहे
४. घरच्यांना खंबीरपणे (पण न हर्ट करता) सांगा कि तुमच्या संमतीविनाही लग्न करायचा मार्ग आहे पण मला तुमचे आशिर्वाद हवे आहेत.
५.पत्रिका इ. बघण्याचे काय खुळ काढले आहे? समजा ते खरे असले तर तुम्ही लग्न करणार नाही का? का तुझ्या /तिच्या मनात second thoughts येत आहेत? तसे असल्यास आताच थांबा.
६.तुझ्या/तिच्या मनात जराही किंतु असेल तर लग्नाचा विचार सोडुन द्या. पुढे जाउन पस्तावण्यापेक्षा आताच क्लीन ब्रेक बरा.

स्पष्ट लिहिले आहे. वाईट वाटल्यास क्षमस्व.

तुझ्या पुढील आयुष्यास शुभेच्छा..
(आणि असा प्रत्येक बाबतीत पब्लिक पोल घेणे थांबव. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे एका प्रेम विवाहात आलेल्या अडचणी किंवा त्यावर आलेला तोडगा हा दुसर्‍या बाबतीत लागु पडेलच असे नाही. त्यामुळे ते कितपत विश्वासार्ह होइल माहित नाही).

प्रेमविवाहात पण पत्रिका वगैरे पाहतात हे वाचून आश्चर्य वाटले.. सायोसारखंच मलाही वाटलं. असो ! विवाहासाठी शुभेच्छा ऋन्मेष

ज्या घरातल्यांना काहीही करून मुलांचं लग्न होऊन द्यायच नसतंच असे लोक पत्रिका नक्की पहातात Happy
पण जातीचा मुद्दा आधी येतो मग पत्रिकेचा. एकदा जात मान्य केली की कोणी पत्रिकेच्या फंदात पडणार नाही.
माझा एका मैत्रिणीची आणि तिच्या मित्राची जात एकच होती. मग तिच्या घरच्यांनी पत्रिका पाहिली, तीही जुळली मग शैक्षणिक आणि आर्थिक तुलना केली गेली पण तीही अगदीच इक्वल इक्वल Proud म्हणून मग जवळच्या नातेवाईकांची शारिरिक,मानसिक, आर्थिक स्थिती पाहून झाली त्यातही काही न अढळल्याने ब्लड ग्रूप पाहिले - एक आले म्हणुन मग लग्नाला विरोध केला Lol खरतर ब्लडग्रूप एक आले म्हणून विरोध केला यात मला तितकं वावगं काही वाटलं नाही पण ब्लडग्रूप मुळे विरोध करायचा होता तर तो मुद्दा पहिला हवा होता (जातीच्या आधी, पत्रिकेच्या आधी). हे म्हणजे विरोध करायची कारणं शोधून काढण्यासारखं झालं.

तात्पर्य - प्रेमविवाह शांततेत सगळ्यांनी मान्य करून आनंदाने पार पडल्याची उदाहरणे कमीच असणार.

Pages