एखादा ब्रँड तयार होतो, म्हणजे नेमकं काय होतं? थोडक्यात आणि ढोबळपणे सांगायचं तर एखाद्या उत्पादनाचं नावच उत्पादनाची ओळख बनून जात. उदाहरणार्थ लोखंडी कपाटाला आपल्याकडे ‘गोदरेज’च कपाट म्हणण्याचा प्रघात पडून गेला आहे. ‘छायांकित प्रत करा’ असं कुणी म्हणत नाही तर ‘अहो, जरा याची ‘झेरॉक्स’ द्या’ असं आपण म्हणतो. तसंच भारतामधल्या हॉरर चित्रपटांशी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव आहे रामसे परिवाराचं. कित्येक रामगोपाल वर्मा आले नि गेले, कित्येक विक्रम भट अजूनही झगडत आहेत, पण भारतीय भयपट आणि रामसे बंधू हे जे अद्वैत ‘बेंच मार्किंग’ आहे ते अजूनही बदलत नाहीये.
एफ. यू. रामसे हे कराचीमधले मोठे प्रस्थ. फाळणीनंतर हे कुटुंब सात मुलं आणि मोठा जामानिमा घेऊन सर्व चंबुगबाळं आवरून मुंबईला आले. उत्तम बिझनेसमन असणाऱ्या रामसे परिवाराने मुंबईत चांगला जम बसवला. रामसे यांना चित्रपटांचा मोठा शौक होता. त्यांनी ‘शहीद ए आझम भगतसिंग’, ‘रुस्तुम सोहराब’सारख्या मोठ्या बजेटची चित्रपट निर्मिती केली; पण दैवाचे फासे फिरले. हे चित्रपट पडले. दिवाळखोरीची वेळ आली. कर्जाचा डोंगर उभा राहिला. यातून मार्ग कसा काढायचा? रामसेंनी प्रोड्यूस केलेल्या ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ चित्रपटात एक प्रसंग होता. चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणारे पृथ्वीराज कपूर एक भीतिदायक मुखवटा घालून चोरी करतात आणि मुमताज या अभिनेत्रीला घाबरवतात, असा प्रसंग त्या चित्रपटात होता. या ‘भयानक’ प्रसंगातून रामसेंना प्रेरणा मिळाली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अढळ स्थान मिळवलेला आणि नंतर ‘कल्ट’ झालेल्या ‘दो गज जमीन के नीचे’ या भयपटाची निर्मिती केली.
केवळ पंधरा लोकांच्या टीमने हा चित्रपट अवघ्या एका महिन्यात हातावेगळा केला. तिकिट खिडकीवर चित्रपट धो धो चालला आणि बी ग्रेड फिल्म्समधले ‘रामसे युग’ सुरू झाले. नंतर रामसे बंधूंनी ‘दरवाजा’सारखे तब्बल ३० लो बजेट भयपट तयार केले. १९८४ ते १९९३ हा काळ रामसे बंधूसाठी सुवर्णकाळ होता. ‘पुराना मंदिर’, ‘महाकाल’, ‘वीराना’ या चित्रपटांनी जोरदार धंदा केला. एफ. यू. रामसे यांची सातही मुले आज सिनेमाच्या धंद्यात आहेत. गंगू रामसे हा सिनेमॅटोग्राफर आहे. तुलसी आणि श्याम रामसे दिग्दर्शनाची धुरा सांभाळतात. अर्जुन रामसे हा संकलनाची धुरा सांभाळतो. कुमार रामसे हा लेखक आहे, तर किरण रामसेकडे ध्वनी संयोजन खातं आहे. सगळ्यात शेवटचा, केशु रामसे. हा निर्मितीची जबाबदारी सांभाळायचा. पण ही धाकटी पाती बाकी बंधूपेक्षा वेगळी निघाली. घराण्याच्या विशिष्ट चौकटीत राहणं केशु रामसेला मंजूर नव्हतं. केशुनं स्वतःची वेगळी चूल मांडली. राजकुमार संतोषी आणि उमेश मेहरा यांच्यासारख्या तत्कालीन यशस्वी दिग्दर्शकांना घेऊन, मोठ्या स्टार्ससोबत चित्रपटनिर्मिती याने केली. अक्षयकुमारला ‘खिलाडी’ हा खिताब मिळवून देणाऱ्या आणि शीर्षकात आवर्जून खिलाडी हे नाव असणाऱ्या चित्रपटांसाठी केशु रामसे प्रसिद्ध आहे. केशु रामसेने फक्त वेगळी चूलच नाही थाटली, तर आपल्या प्रसिद्ध रामसे आडनावाला सुद्धा सोडचिठ्ठी दिली. आपल्या आडनावाचं ओझं त्याला नको होतं. मोठी स्वप्न बघणाऱ्या चाणाक्ष केशुला आपलं रामसे हे आडनाव आपल्या स्वप्नपूर्तीच्या आड येईल असं वाटत होतं. म्हणून पत्रकारांना मुलाखती देताना, केशु पत्रकारांना आडनाव न छापण्याची विनंती करायचा.
रामसे बंधूंचे चित्रपट काही लोकांना हास्यास्पद वाटतात, तर काही लोकांना भयानक. पण रामसे बंधूंचे चित्रपट त्याच्यातल्या हॉट सीन्समुळे जास्त गाजले. त्यांच्या चित्रपटांच्या निर्मितीमूल्यांची यथेच्छ थट्टा झाली. त्यांच्या चित्रपटात खरे स्टार्स भुताचा रोल बजावणारे नट होते. एका चित्रपटात भूत आदिदासचे बूट घालून येतो. या प्रकाराला लोक कितीही हसत असले तरी आपल्यापैकी बहुतेकांना, रामसे बंधूंच्या चित्रपटांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर नक्की घाबरवलंय हे कबूल करायला हवं. टीव्हीवर ‘झी हॉरर शो’ नवीन सुरू झाला, असताना डोक्यावरून पांघरूण घेऊन एका फटीतून तो शो बघण्याचं थ्रील अनेकांनी लहानपणी अनुभवलं असेल. ‘झी हॉरर शो’च्या निमित्ताने रामसे बंधूंनी फक्त चित्रपटगृहात अनुभवायला मिळणारी भीती, लोकांच्या बेडरूममध्ये पोहोचवली. त्या अर्थाने, सध्या विशीत आणि तिशीत असणाऱ्या पिढीच्या अनेक लोकांच्या नॉस्टाल्जियाचा ते भाग आहेत. दिग्दर्शक श्याम रामसे एका मुलाखतीत म्हणाला होता, “देशाच्या ज्या भागात रेल्वे थांबत नाही, त्या भागात आम्ही सिनेमा आणि टीव्हीच्या माध्यमातून पोहोचलो आहोत.’’ एकदम मार्मिक विधान आहे, ना? जिथे भले भले राजकारणी आणि सेलिब्रिटी पोहोचू शकत नाहीत, तिथे रामसे हा ब्रँड पोहोचला आहे.
कालौघात भारतीय चित्रपट बदलला. रामसे बंधूंना नवीन बदलांशी जुळवून घेणं जमत नाहीये. सुभाष घई, धर्मेश दर्शन वैगेरे मंडळीना तरी कुठं जमलं? रामसे बंधूंनी मध्यंतरी काही चित्रपट बनवले. पण ते कधी आले आणि कधी गेले, ते कळलं नाही. मोठ्या निर्मिती संस्थेचे पाठबळ असणाऱ्या एकेकाळच्या दिग्गज सुभाष घईने दिग्दर्शनाला रामराम ठोकल्यात जमा आहे. पण रामसे बंधू अजूनही हिम्मत हरायला तयार नाहीत. रामसे घराण्याची पुढची पिढी सिनेमाच्या धंद्यात उतरली आहे, हा त्याचा ताजा पुरावा.
मानसशास्त्रात ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षित होणे, किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती हे कृत्य करणाऱ्याकडेच आकर्षित होणे, याला मानसशास्त्रात ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ म्हणतात. म्हणजे, रामसे बंधूंचे हॉरर चित्रपट प्रेक्षकाला घाबरवतात, मध्येच झोपेतून दचकवून उठवतात. अनेक प्रकारे मानसिक छळही करतात. पण लोक अजूनही टीव्हीवर रामसे बंधूचे चित्रपट आवर्जून बघतात. भारतातल्या काही पिढ्या आणि रामसे बंधू यांच्यात मला, या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’च्या छटा आढळतात. त्या शिवाय रामसे बंधूना मिळालेल्या घवघवीत, यशाचं स्पष्टीकरण कसं देता येणार?
रामसे युग
Submitted by बावरा मन on 10 April, 2016 - 06:05
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लहान असताना असं ऐकलं होतं की
लहान असताना असं ऐकलं होतं की हे सर्व रामसे स्वतःच भूत आहेत. मुंबईबाहरेच्या एका पडक्या बंगल्यात ते राहतात. आणि तिथेच शूटींगही चालतं.
छान लिहीलंय.एकदम पटतंय.
छान लिहीलंय.एकदम पटतंय.
मस्त लिहिलंय. अनेक लोकांच्या
मस्त लिहिलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनेक लोकांच्या नॉस्टाल्जियाचा ते भाग आहेत >>लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत व्हिसिआर वर, ब्रुस ली, जॅकी चॅन, अॅरनॉल्ड, स्टॅलन चे अॅक्शन सिनेमे, इव्हिलडेड, एक्झॉरसिस्ट वगैरे हॉरर सिनेमे पाहिले जायचेच जायचे. या सगळ्या इंग्रजी सिनेमांच्या गर्दीत रामसे बंधूंच्या सिनेमांसाठी सुद्धा वेगळं स्थान असायचं.
तेव्हा घरी केबल नव्हतं. बिल्डिंग मधे ज्यांच्याकडे होतं त्यांच्या कडे कुठलंसं टॉप टेन आणि झी हॉरर शो बघायला आवर्जून जायचो याची आठवण झाली. ज्यांच्या कडे जायचो त्यांची मुलगी झी हॉरर शो लागलं की टीव्हीकडे पाठ करुन बसायची
छान लेख. आवडला. मी रामसे
छान लेख. आवडला.
मी रामसे बंधूंचा सुवर्णकाळ अनुभवला नसल्याने मला ते चित्रपट भितीच्या नावावर हास्यास्पद आणि केवळ आंबट शौकीनांसाठी बनवले गेलेलेच वाटलेत. जे काही दरवाजा, पुराणी हवेली, वीराणा वगैरे बघणे झाले त्यावरून हे म्हणतोय .. पण त्या त्या काळातील लोकांची नस अचूक पकडणे याचे श्रेय त्या काळातील यशस्वी कलाकारांना दिलेच पाहिजे. या कारणासाठीच गोविंदा डेविड धवन जोडीलाही मी सलाम ठोकतो. त्यानंतर काळानुसार बदलत त्यांनी जो पार्टनर सिनेमा दिला तो ही मस्तच..
रामगोपाल वर्माच्या "भूत" चित्रपटालाही मी मानतो. भूत आपल्या घरातही असू शकते ही भिती त्या चित्रपटाने परीणामकारकरीत्या घातली.
हल्ली मात्र कश्याचीच भिती वाटत नाही. देवधर्मभूतावरचा विश्वासच उडाल्यासारखे झालेय. पण त्यामुळे भूताच्या चित्रपटांचा फील घेत घाबरत दचकत मजा लुटता येत नाहीये. समोर जे दिसतेय ते नकली आहे, बकवास आहे, प्रत्यक्षात असे काही नसतेच या विचारांचा पगडा भारी पडतोय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
@ऋन्मेश- कानात हेडफोन लावून
@ऋन्मेश- कानात हेडफोन लावून रातच्याला जरा हे बघा..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
https://www.youtube.com/watch?v=NVQoj8iXGwU
आन घाबरायचं कारन न्हाय बरं हे खोटं हाय!
मस्त लिहिलेय . झी हॉररच्या
मस्त लिहिलेय . झी हॉररच्या पॅराबद्दल अगदी अगदी झालं
छान लेख. काही काही पिक्चर
छान लेख. काही काही पिक्चर घाबरवणारे होते, खासकरुन पुराना मंदीर अन दरवाजा. आता ते हास्यास्पद वाटत, पण त्यावेळी जाम सटारायची![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अन झी हॉरर शो पांघरुणात लपुन बघितलाय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तो प्रेमनाथ नावाचा अभिनेता
तो प्रेमनाथ नावाचा अभिनेता पुजारी आणि नव विवाहतेची डोली इ. असलेला चितरपट त्यांचाच का ?
झी हॉररच्या पॅराबद्दल अगदी
झी हॉररच्या पॅराबद्दल अगदी अगदी झालं +१
झी हॉरर शो बघायला मज्जा
झी हॉरर शो बघायला मज्जा यायची. आता मज्जा पण तेव्हा जाम भिती वाटायची.
सामरी हा ३डी सिनेमा रामसे बंधूंचाच होत ना?
भारीच! तुम्ही हा लेख आधी पण
बाकी वीराना, बंद दरवाजा वगैरे तर ऑटाफे आहेत
आठवण निघालीच आहे तर बघेन म्हणते आता.
तो प्रेमनाथ नावाचा अभिनेता
तो प्रेमनाथ नावाचा अभिनेता पुजारी आणि नव विवाहतेची डोली इ. असलेला चितरपट त्यांचाच का ? >>>
विराट कोहलीच्या भावकीतल्या कुणीतरी काढलाय बहुतेक
अन्नू, विडिओ माझ्या मोबाईलवर
अन्नू, विडिओ माझ्या मोबाईलवर बफर बफर होतोय. वायफायची सोय होताच बघेन हेडफोन लावून रात्रीच्या एकांतात. घाबरलो तर चांगलेच आहे. आपण पुन्हा नॉर्मल झालो याचा आनंदच होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी ते पांघरूणाच्या आडून किंवा मनोजकुमार सारखे हात तोंडावर ठेवून बोटांच्या फटीतून भयपटाचा आनंद उचलणारी गॅग आमच्याईथेही होती. मी त्यांना आणखी घाबरवून दचकवून आनंद लुटायचो. चित्रविचित्र आवाज, थंडगार हात, पापण्या वर उचलणे, डोळ्यांच्या खाली सॉस लावणे, अंधारात उदबत्ती किंवा मेणबत्ती घेऊन फिरणे, अंगात आल्यासारखे करणे, जंगली श्वापदासारखे गुरगुरणे, बाईच्या आवाजात बोलणे, घुंगरांचा आवाज करणे हे काही टिपिकल आवडीचे प्रकार.. हॉस्टेलमधील कैक किस्से आहेत.. म्हटले तर गंमत म्हटले तर रॅगिंग .. ज्या लिंबाचे मस्त सरबत करून प्यायचे असते त्यावर कोणी जरा कुंकू काय शिंपडले की लोकांची का उगाच तंतरते मला समजत नाही.. याचा फायदा मात्र खूप उचललाय मी.. या सर्व किस्श्यांची एका धाग्याने पुरचुंडी बांधून लिहायला हरकत नाही ..
रमड. त्यांनी बहुतेक बी ग्रेडी
रमड.
त्यांनी बहुतेक बी ग्रेडी कलाकारांवर लेख लिहिलेला त्याबद्दल तुम्ही बोलत असावेत..
बाकी तो डोलीवाला जानी दुश्मनच ना.. मल्टीस्टारर बी ग्रेडी बंडल चित्रपट.. गाणे मात्र मस्त.. चलो रे डोली उठाओ पिया मिलन की रूत आयी..
कोण जाणे! ऋ, तू म्हणतोयस तो
कोण जाणे! ऋ, तू म्हणतोयस तो लेख काही मला सापडला नाही पण हा सापडला - http://www.maayboli.com/node/37123
कदाचित हाच लेख आठवला असावा मला.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/56404
मी याबद्दल बोलत होतो. त्यांच्याच लिखाणात शोधले..
असाच एक बॉलीवूडचे बोलट म्हणून गुमनाम कलाकारांबद्दलही त्यांनी लिहिलेय.
एकंदरीत उपेक्षित दुर्लक्षितांबद्दल लिहीण्यात साहेबांची मास्टरी आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह्ह, राइट! शोधल्याबद्दल
ओह्ह, राइट! शोधल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/55797
हे कोण आहेत ? दोन रामसे एकत्र कथा लिहीताहेत का माबोवर?