कोहलीने आज जे काही शेवटच्या चारपाच ओवरमध्ये केले ते निव्वळ निव्वळ निव्वळ... मॅच संपून काही तास लोटले तरी अजूनही शब्द नाहीयेत माझ्याकडे.. आमच्या व्हॉटस्सप ग्रूपवर हजारो लाखो करोडो पोस्टचा नुसता नुसता खच पडला होता या सामन्याच्या दरम्यान.. सर्वांचा एकच विश्वास.. विराट कोहली! किती वेळा त्याची परीक्षा घेतली जाणार आणि किती वेळा तो पहिला नंबर पटकावत पास होणार याची आता गिणती उरली नाही.. प्रत्येक वेळी पेपर पहिल्यापेक्षा कठीण आणि तरीही तो शेवट अगदी सोपा करून येणार.. आपले ईतर कागदावरचे बलाढ्य फलंदाज जणू काही त्याचे हे तेज जगासमोर यावे म्हणून मुद्दाम निस्तेज खेळ करत आहेत की काय अशी शंका यावी असे काही सारे चालू आहे.. आजच्या सामन्यात कॉमेटरी करताना गावस्करच्या अंगात जणू काही रमीज राजा संचारला होता. आपल्या पोराचे कौतुक करताना त्याचे तोंड थकत नव्हते. एकापाठोपाठ एक, धडाधड, सरळ बॅटने मारलेले क्लासिकल चौकार पाहून त्याचीही तबियत खूश झाली होती. एकेकाळी ऑस्ट्रेलियन्स म्हणायचे की आम्ही टीम ईंडियाशी नाही, तर सचिन तेंडुलकर नाव असलेल्या एका माणसाशी हरतो. हा विश्वचषक संपता संपता सारेच देश असे कोहलीबाबत म्हणू लागतील. आताच्या भारतीय संघात सध्या सतराशे साठ समस्या आहेत, कित्येकांचे सूर हरवलेत, आणि तरीही आज या घडीला हा विश्वचषक आपलाच आहे कारण आपल्याकडे विराट कोहली आहे, असे म्हणावेसे वाटतेय, असा विश्वास वाटू लागलाय. यापुढच्या सामन्यात धोनीने बस्स टॉस उडवायला जावे, आणि कसलाही विचार न करता प्रतिस्पर्ध्यांना पहिली फलंदाजी द्यावी. मग जे काही टारगेट मिळेल ते आपली 'चेस मशीन' विराट कोहली बघून घेईन. त्याला जिंकायला आवडते असे म्हणण्यापेक्षा त्याला हरायला आवडत नाही असे म्हणने जास्त समर्पक राहील. ज्या ज्या कोणाला त्याचा हा एटीट्यूड आणि त्याच्या फलंदाजीचा क्लास आवडत असेल त्या त्या सर्वांचे या क्लबमध्ये स्वागत आहे. तसेच क्रिकेटव्यतीरीक्त त्याचे दिसणे, वागणे, बोलणे चालणे, स्टाईलच्याही कोणी प्रेमात असेल तर त्यांचेही स्वागत आहे
आणि हो, हा धागा आजच्या या भारावलेल्या स्थितीतच काढायचे आणखी एक कारण म्हणजे एक कन्फेशन करणे देखील होते.
हा खेळाडू एकेकाळचा माझा अत्यंत नावडता खेळाडू होता. याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्याचा एटीट्यूड ज्यात मला अहंकारच दिसायचा. पुढे पुढे तो कमी दिसू लागला आणि नावडतेपण मावळू लागले. त्याची फलंदाजी, फटकेबाजी, त्याने मिळवून दिलेले विजय हळूहळू त्याला माझ्या आवडत्यांच्या यादीत घेऊन आले. आणि बघता बघता गेल्या दोनचार मालिका भारतीय क्रिकेट म्हणजे तो, तो, आणि तोच वाटू लागल्याने त्याने माझ्याकडे त्याचा फॅन बनण्याव्यतिरीक्त पर्यायच ठेवला नाही
छान लिहीले आहेस. कोहलीच्या
छान लिहीले आहेस. कोहलीच्या अॅरोगन्स चे किस्से फारसे वाचलेले नसल्याने त्याच्या खेळाची चांगली बाजूच सहसा समोर आलेली आहे आतापर्यंत. त्याच्या बॅटिंग चा एक भाग मला आवडतो तो म्हणजे स्लॉगिंग नसते फारसे. क्लासिकल फटकेच जास्त असतात.
मस्त रे. कोहली २००८ ला जेव्हा
मस्त रे.
कोहली २००८ ला जेव्हा १९ वर्षाच्या खालील संघाचा कर्णधार होता तेव्हाच आवडलेला. त्याने त्या स्पर्धेत विंडिजला चोपत ७४ चेंडूत केलेले शतक भारतीय फलंदाजीच्या भविष्याची झलक होती. मी कोहलीच्या मानसिकतेचा फॅन आहे. त्या माणसाला मॅच आपल्या मर्जीनुसार वाकवता येते. शेन वॉर्न, व्हिव रिचर्डस ज्याप्रमाणे खेळावर , प्रतिस्पर्धी वा परिस्थिती काहीही असो, हुकूमत गाजवायचे त्याची आठवण कोहलीला बघताना येते - As if you are watching a king!
कोहली फॅन्स हे आर्टिकल वाचा - http://www.espncricinfo.com/blogs/content/story/986665.html
मलाही ऑनेस्टली आत्ता पर्यंत
मलाही ऑनेस्टली आत्ता पर्यंत कोहली "आवडला" वगैरे नाहीच कधी. मी आय पि एल बघत नाही जास्त आणि मागच्या वर्ल्ड कप मॅच मध्ये तो खेळला पण इतरांचंही योगदान होतं. त्याच्या फटाक्यांबाबत आत्ता तिकडे विश्वचषक बाफं वर जरा स्वगत पाड्लं ते इथे देतो. (सहज) होप यु डोंट माईंड. मी पण जरा अत्यांनंदी अवस्थेत आहे त्यामुळे जरा कौतूक पाजळून घेतो (परत).
कोहलीच्या बर्याच आरत्या ओवाळून झाल्यात पण तरी काय पठ्ठ्याची नजर असते बॉलवर? मला आज असं जाणवलं की तो तंत्रशुद्ध शॉट तर मारु शकतोच पण त्यांचे बरचसे शॉट असे एन वेळेस "टेनिसचे फटके" कसे असतात? एक प्रकारचा किव्क फ्लिक इन्वॉल्व्ड असतो त्याच्या फटक्यांमध्ये म्हणजे चक्क क्रिकेटच्या हैसियतसे ते जुगाडू आणि चोरटे शॉट वाटतात मला पण ते प्रचंड इफेक्टिव आहेत कारण तो हवं तिथे लिलया स्टियर करतो बॉल! इथेच त्याच्या स्टाईलचं वेगळेपण दिसून येतं. शर्मा वगैरे त्याच्यापेक्षा खुप देखणे शॉट मारु शकतो. इन फॅ़क्ट शिखर सुद्धा पण ही पबलिक सहसा पुढे वगैरे आली की कधी कधी बीट होतात. दॅट्स व्हेअर कोहलीज अबिलिटी इज जस्ट फिनॉमिनल. झटकल्या सारखा शॉट मारतो, आपल्याला वाटतं १-२ रन निघतील तर कस्लं काय? गॅप मध्ये प्लेसमेंट असते अन बॉल बाऊंडरीकडे चाललेला असतो बिगीबिगी.
अतिशय लेट खेळतो तो! त्यानी एक सिक्स मारला तो स्लोवर बॉलला होता. इथे कित्येक लोकं धारातिर्थी पडतात पण त्यानी अगदी शेवटच्या क्षणाला त्याचा शॉट मॉड्युलेट केलेला असतो. बरोब्बर लोवर हँडनी जास्त जोर लावलेला असतो अन बॉल त्या पावर मुळे आरामात बाऊंडरी क्रोस करतो. जस्ट मार्वलस! शॉट देखणे नसतात त्याचे बट टु सी धिस होल प्रोसेस अॅट वर्क इज सच अ ट्रिट टु वॉच!
जय कोहली!!!! _/\_
त्याच्या व्यक्तीमत्वाचे
त्याच्या व्यक्तीमत्वाचे कांहीं पैलू मलाच काय बर्याच जणाना रुचतील असे नसतीलही पण तो 'बॅटींग जीनीयस' आहे हें वादातीत !! दुसरं, मैदानावर तो स्वतःचं १००% योगदान देतो, याबद्दलही शंकाच नाही. काल तर त्याने अप्रतिम, आक्रमक व शैलीदार क्रिकेटींग शॉटस मारून टी-२०मधे 'अनऑर्थोडॉक्स' फटकेबाजी अपरिहार्य आहे , या माझ्या समजूतीला सुरूंगच लावला !! तिसरं, काल धोनी म्हणाला तसं, आपली फलंदाजी आणखीही सुधारावी म्हणून सतत झटणारा खेळाडू आहे तो व ह्या त्याच्या अॅटीट्यूडमुळे त्याचे इतर 'अॅटीट्यूड' दुय्यम ठरतात, ठरावेत. कोणत्याही देशाला हेवा वाटावा, दबदबा वाटावा, असा असामान्य खेळाडू आपल्या संघात आहे , याचा सार्थ अभिमान वाटतो !
आणि, कालच्या त्याच्या अविस्मरणीय, अद्वितीय व आनंददायी खेळीबद्दल त्याला मनःपूर्वक धन्यवाद.
मी पण या क्लबात सामील. मलाही
मी पण या क्लबात सामील. मलाही विराट आधी आवडायचा नाही. कारण त्याचा आक्रमकपणा मला मैदानाबाहेरच आहे असं वाटायचं. पण गेल्या काही सामन्यांमुळे विराट आवडायला लागलाय.
कोहली २००८ ला जेव्हा १९
कोहली २००८ ला जेव्हा १९ वर्षाच्या खालील संघाचा कर्णधार होता तेव्हाच आवडलेला. >> +१. अगदी तेव्हापासूनच कोहली फार आवडतो.
मी या फॅन क्लबमध्ये आधीपासूनच आहे.
मस्त लिहिलयस ऋ.
लेख आवडला. कोहली प्रत्येक
लेख आवडला. कोहली प्रत्येक सामन्यानुसार स्वतःला बदलवत जाण्याचं कसब वाखाणण्यासारखं आहे. बुवा आणि भाऊ काकांच्या प्रतिक्रिया पण आवडल्या.
अय्यो हम फॅन नही था रे. लेकीन
अय्यो हम फॅन नही था रे. लेकीन कल दिल आ ही गया कोहलीपे
फारएण्ड, त्याचे एरोगन्सचे
फारएण्ड, त्याचे एरोगन्सचे किस्से तसे मी सुद्धा ऐकले वाचले नाहीत. मैदानाबाहेरच्या गॉसिपिंगमध्ये जास्त ईंटरेस्ट नाही. पण ते ऑन फिल्डही जाणवायचे. त्यातील जे मूळ स्वभावाचा भाग आहे ते आताही तसेच असेल, पण आता मॅच्युरीटी आली आहे हे सुद्धा जाणवते. इथून पुढे वाढतच जाईल. भारतीय क्रिकेटप्रेमींची नस त्याने आता पकडली आहे. हेच जर तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असता तर त्याने तो तसाच जपला असता आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन्सनी त्यासह त्याला डोक्यावर घेतला असता.
वैद्यबुवा अगदी प्लस वन.. निव्वळ मनगटाच्या जीवावर तो गोलंदाजीवर राज्य करू शकतो. अगदी काल आल्याआल्या त्याने एक लेगला आणि एक ऑफला जे दोन फोर मारून सुरुवात केली, कमाल वापर करतो तो.. ऑनसाईडलाही तो लॉफ्टेड फ्लिक करत सिक्स मारतो ते पण एक कमाल असते..
खरंय या आधी मलाही त्याचे शॉट ईतरांच्या तुलनेत तितके नेत्रसुखद नाही वाटायचे. पण आता त्याचे शॉट आवडायची टेस्ट डेवलप झालीय माझ्यात..
कालच्या पोस्ट प्रेझेन्टेशन
कालच्या पोस्ट प्रेझेन्टेशन नंतर सेहवाग आणि अक्तर सोबत नेहराला पाचारण करण्यात आलं होतं. तेव्हा नेहराला कोहली मधे झालेल्या या बदला बद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, विराटच फक्त क्रिकेटच नव्हे तर तो आंर्तबाह्य बददला आहे. मॅच व्यतिरिक्त सचिन कडून बरच काही शिकत आहे.
मला वाटतं ही विराटची दिग्गज होण्याची सुरवात असवी...
हा खेळाडू एकेकाळचा माझा अत्यंत नावडता खेळाडू होता. याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्याचा एटीट्यूड ज्यात मला अहंकारच दिसायचा. पुढे पुढे तो कमी दिसू लागला आणि नावडतेपण मावळू लागले. त्याची फलंदाजी, फटकेबाजी, त्याने मिळवून दिलेले विजय हळूहळू त्याला माझ्या आवडत्यांच्या यादीत घेऊन आले. आणि बघता बघता गेल्या दोनचार मालिका भारतीय क्रिकेट म्हणजे तो, तो, आणि तोच वाटू लागल्याने त्याने माझ्याकडे त्याचा फॅन बनण्याव्यतिरीक्त पर्यायच ठेवला नाही >>> +१
मॅच व्यतिरिक्त सचिन कडून बरच
मॅच व्यतिरिक्त सचिन कडून बरच काही शिकत आहे. -> देवाकडून डायरेक्ट शिकत आहे... देवाच्या वरच्या लेव्हलला जाणार बहुतेक हा.. फक्त तितकी वर्ष खेळायला पाहिजे.
सस्मितला मम.
सस्मितला मम.
आजकाल कोणी ओपनर आऊट झाला की
आजकाल कोणी ओपनर आऊट झाला की आनंद होतो, कारण लगेच विराट खेळायला येणार असतो.
विराटपंखा जव्हेर
हा खेळाडू एकेकाळचा माझा
हा खेळाडू एकेकाळचा माझा अत्यंत नावडता खेळाडू होता. याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्याचा एटीट्यूड ज्यात मला अहंकारच दिसायचा. पुढे पुढे तो कमी दिसू लागला आणि नावडतेपण मावळू लागले
>>>
मला तर अजुनही तो आवडत नाही
ठिकेय म्हनजे चांगला खेळतो तो म्हणू खेळाडू म्हणून नावडता नाही पण विराट कोहली म्हणून लैच नावडता :पळा:
{ हा खेळाडू एकेकाळचा माझा
{ हा खेळाडू एकेकाळचा माझा अत्यंत नावडता खेळाडू होता. याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्याचा एटीट्यूड ज्यात मला अहंकारच दिसायचा. }
मला तर वाटले होते की अहंकार दाखवणार्यांचेच तुम्ही फॅन आहात. उदा. शाहरूख खान, दीपिका पडुकोणे, इत्यादी.
" देवाकडून डायरेक्ट शिकत आहे"
" देवाकडून डायरेक्ट शिकत आहे" - वाह! एक नंबर! देव म्हणजे वन मॅन बॅटींग लाईन-अप होता. कोहली ची वाटचाल चांगल्या मार्गावर चालू आहे.
कालची कोहली ची ईनिंग अफलातून
कालची कोहली ची ईनिंग अफलातून होती. ऑस्ट्रेलिया च्या आतड्यापर्यंत गेलेला घास त्यानं खेचुन घेतला.
बिपीनचंद्र, इथे नाही. पण
बिपीनचंद्र,
इथे नाही. पण स्वतंत्र धाग्यावर तुम्हाला याचे जरूर उत्तर देणार. तो धागा लवकरच येईन. तुम्हाला विपुत कळवले जाईल
रीया, ज्या कारणासाठी तो माझा नावडता होता त्या कारणासाठीच असेल तर ते ठिकच आहे. सतत क्रिकेट फॉलो करशील तर ते ही मत बदलेल.
@ सचिन,
तर कोहलीने सचिनला जाहीरपणे मानवंदना दिल्याने एक गोष्ट चांगली झाली. आता यापुढे सचिन आणि त्याची तुलना होणे याला खीळ बसेल जे करीअरच्या या टप्प्यावर त्याच्यासाठी नक्कीच चांगले नव्हते. त्याच्यात नक्कीच ते कॅलिबर आहे, पण ते त्याला करीअरभर खेळून सिद्ध करायचे आहे, अजून बरेच काही शिकायचे आहे. मुख्य करून कसोटीत. मागे ईंग्लंडला कसोटीत तो जसा फ्लॉप गेलेला तो शिक्का त्याला तिथे चमकत धुतलेला मला बघायचेय. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीवर राज्य करताना बघायचेय..
विराट कोहली सर छान खेळतात. मी
विराट कोहली सर छान खेळतात. मी क्रिकेट बघणे सोडून दिले असल्याने त्यांच्या खेळाबद्दलच्या फेसबुकच्या पोस्टी वाचून इम्याजिन करू शकतो. धोनी सर पण ग्रेट फिनिशर आहेत. पण त्यांच्या कौतुकाचा हा बाफ नाही. सचिन सर सुरुवातीला आले होते तेव्हां त्यांचा डाव होईपर्यंत टीव्ही पाहिला जायचा. ते बाद झाले कि टीव्ही बंद व्हायचा. पुढे लक्ष्मण सर आणि द्रवीडगुरुजी आले त्यानंतर पुन्हा पाहिला गेला टीव्ही.
बॅटींगचे स्पेशालिस्ट तरी आजही कपिल, मदनलाल, बिन्नी वगैरे लक्षात आहेत. पहिले पाच आउट झाले की हे शेपूट २० - २० असल्यासारखंच खेळायचं. हार जीतचं फारसं टेन्शन न घेता. या लोकांमुळे गेलेल्या म्याचेस जिंकताना पाहताना जी मजा आली तिला तोड नाही.
कोहली सरांबद्दल आणखी माहिती या बाफवर अवश्य वाचणार आहे. अजून दोन तीन बाफ निघाले तर ते ही जरूर वाचेन. त्यामुळे आपण सर्वांनी कोहली सरांबद्दल भरभरून लिहावे ही नम्र विनंती.
कापोचे अश्या टोनमध्ये का
कापोचे अश्या टोनमध्ये का पोस्ट लिहिलीत
क्रिकेट पिढी दर पिढी बदलतेय.
आजच्या मॉडर्न डे क्रिकेटचा तो बेस्टेस्ट बेस्ट खेळाडू आहे.
गावस्कर आणि सचिननंतर पुन्हा एकदा विराट कोहली या नावाने जगातील सर्वोत्तम फलंदाजाचा किताब भारताकडे शाबूत राहिलाय ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे.
कापोचे अश्या टोनमध्ये (?) का
कापोचे अश्या टोनमध्ये (?) का पोस्ट लिहिलीत >>> माय चॉईस !!
कोहली हा भारताचा गावसकर नंतर
कोहली हा भारताचा गावसकर नंतर मिळालेला ग्रेट खेळाडु आहे.
पब्लिक ला कंपॅरिझन करायची आणि
पब्लिक ला कंपॅरिझन करायची आणि कोणाला तरी देव / मसीहा बनवायची घाईच फार
त्या सचिन ला एक गॉड बनवून ठेवलय आता विराटच्या मागे !
असु दे त्याला कोहलीच आणि अॅटीट्युडही असु दे, पाहिजेच एक तरी अॅग्रेसिव्ह थोडा किलिंग इन्स्टीक्ट असलेला प्लेयर !
काही नको अजुन एक सचिन / गावस्कर !
पब्लिक ला कंपॅरिझन करायची आणि
पब्लिक ला कंपॅरिझन करायची आणि कोणाला तरी देव / मसीहा बनवायची घाईच फार
>>>>> डिज्जे, अगदी हेच लिहायला आलो होतो. +१.
कोहलीचा गेम टोटली वेगळा आहे. मला तर वाटतं तो कॅप्टन होईल आणि ती जबाबदारी तो त्याच्या अॅटिट्युड्मुळे कदाचित व्यवस्थित पेलेल सुद्धा. त्याचं करियर टोटली वेगळ्या काळात आणि वेगळ्या मार्गानी पुढे सरकणार आहे.
आपल्या इथे देव बनवायला पण वेळ नाही लावत अन दाणकन खाली पाडून नंतर पायदळी तुडवायलाही आजिबात विलंब नसतो. त्या शिखर अन शर्मानी पुर्वी वेळोवेळी आपली गाडी नीट लावून दिली आहे पण आता फेल गेले की त्यांच्या नावानी शंख सुरु. खेद व्यक्त करणे आणि डाऊनराईट शिव्या देणे, खालच्या पातळीला जाऊन विनोद करणे म्हणजे टोटल वेडेपणा आहे. त्या व्हॉट्सॅप वरच्या अनुष्काबाबतच्या चीप जोक्सना पण उधाण आलय अक्षरशः. एकदम योग्य ट्विट केलीये कोहलीनी ह्याबाबत.
कोहली, धोनी, अश्विन किंवा फॉर दॅट मॅटर सगळीच टीम एकदम डाऊन टु अर्थ अन त्यातल्या त्यात स्क्वाड मध्ये एकी असलेले वाटतात. मायनर डिफरन्सेस असतील त्यांच्यात पण बाहेर जे एकायला येतं धोनी-कोहली कोल्ड वॉर वगैरे ते सगळं वाफ आहे प्युअर. काल कोहलीनी बरोबर धोनीचं नाव घेतलच की " ही केप्ट मी calm".
मला तर वाटतं तो कॅप्टन होईल
मला तर वाटतं तो कॅप्टन होईल आणि ती जबाबदारी तो त्याच्या अॅटिट्युड्मुळे कदाचित व्यवस्थित पेलेल
>>>
पण तो तर कर्णधार झाला आहे ना..
कसोटीत झालाय म्हणजे एकदिवसीय मध्ये होणारच.. सध्याही उपकर्णधार तोच असेल ना..
डावपेचांबाबत, टेंपरामेंटबाबत, अनहोनी को होनी कर दे कॅप्टन कूल धोनीला तोड नाही पण कोहली आपल्या आक्रमकतेमुळे नक्कीच त्याच्या कप्तानीत भारतीय क्रिकेटची वेगळीच इमेज बनवेल. दादाने अरे ला कारे करायला सुरुवात केली, हा चल घरी जारे बोलणारा आहे..
बाकी कोहली धोनीचे कोल्ड वॉर खरे आहे, जसे त्याने आज सकारात्मक स्टेटमेंट दिलेय तसे एकेकाळी बिनसल्याचे जाणवणारी स्टेटमेंटही त्यानेच दिली होती. असो हा धोनी धाग्याचा विषय आहे. किंबहुना हा विषय आता तिथेही नकोच. सध्या सारे काही आलबेल आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यापासूनच ते तसे आहे. जे काही आहे, आपसात सेटलमेंट झाली हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले झाले. इथून पुढे कोहलीची फटकेबाजी, धोनीच्वे कप्तानी आणि भारताचे विजय तिन्ही एंजॉय करूया.
भारतीय क्रिकेटरसिकांचे डोक्यावर घेणे आणि पायदळी तुडवणे हे खरे आहे. चुकीचेही आहे. पण आपल्याकडे पॅशनेट क्रिकेटवेडे लोकं आहेत. तेव्हा यासाठी खेळाडूंनीही तयार राहायला हवे. किंबहुना म्हणून तर या लाखो करोडो प्रेक्षकांच्या अपेक्षा घेऊन खेळणारा सचिन स्पेशल बनतो. अनुष्का शर्मावरून होणारे विनोद मात्र खरेच चीप पातळी आहे, पण दुर्दैवाने आपल्याकडे ती सेलिब्रेटी असण्याची किंमत आहे. अनुष्का शर्मा अशीच कोणीही असती तर त्यांच्या नात्याला एवढे ग्लॅमरही नसते. मात्र याचा आपल्या खेळावर परीणाम होऊ न् देता कोहली खेळतोय याचे जास्त कौतुक आहे.
कोहली हा भारताचा गावसकर नंतर
कोहली हा भारताचा गावसकर नंतर मिळालेला ग्रेट खेळाडु आहे.
पगारेंशी अतिशय सहमत. मधल्या काळातले सचिन, सेहवाग, सौरभ, लक्ष्मण वगैरे काय प्लेयर होते का छ्या..........
मला पन आधी नव्हता आवडत आणि
मला पन आधी नव्हता आवडत आणि त्याची आणि देवाची तुलना म्हणजे हद्द होती..
आता आताशा आवडायला लागला. फॅन क्लबात नाहीं मी पन छाने..
बाकी I like Dhoni more than him..
अगदी त्याच्या entry पासुन.. लंबे बाल ते miltry cut..
विश्वचषक 20-20 सेमीला आज हरलो
विश्वचषक 20-20 सेमीला आज हरलो त्याचे तितकेसे वाईट वाटले नाही कारण या स्पर्धेतील फारशी डिजर्व्हिंग टीम आपण वाटलोच नव्हतो. पण विराट कोहलीबद्दल मात्र आज अशक्य वाईट वाटले. धावा बनवून दिल्यानंतर अखेर विकेट काढायलाही त्यालाच यावे लागले. शेवटच्या ओवरला मात्र त्याला ते करायचे होते ज्यावर त्याची हुकूमत नाही. त्या जागी एका षटकाय वीसपंचवीस रन्स ठोकायचे असते तर ते आव्हान त्याने आवडीने पेलले असते.
गड गेला पण छावा चमकला!
पण विराट कोहलीबद्दल मात्र आज
पण विराट कोहलीबद्दल मात्र आज अशक्य वाईट वाटले. >>> टोटली सहमत.
त्याबाबतीत मात्र सचिन ची स्क्रिप्ट रिपीट होत आहे असे वाटले आज. शेवटी तो एक प्लेअर एक्झॉस्ट होउन जातो.
रिस्पेक्ट कोहली रिस्पेक्ट
रिस्पेक्ट कोहली रिस्पेक्ट !
सकाळी बातमी ऐकली की हाताला आठ दहा टाके लागलेल्या अवस्थेतही कोहली खेळणार आहे. पहिलाच विचार मनात आला कश्याला उगाच आयपीएलमध्ये जीव मरवतोय..
पण तो खेळला.. आणि ते सुद्धा ईतके जबरदस्त .. खरेच जबरदस्त संघभावना आहे यार याच्यात.. त्याहीपेक्षा स्वताचा एक सर्वात उंचीवरचा बेंचमार्क त्याने सेट केलाय .. जिथे त्याला कोणालाच पोहोचू द्यायचे नाहीये असा खेळतोय हा बंदा.. आयपीएलच्या एका मौसमात चार शतके.. आजचे तर 20-20 चे ही नाही तर 15-15 मॅचचे बोलायला हवे.. निव्वळ अविश्वसनीय आकडे आहेत आणि तितक्याच अविश्वसनीय सहजतेने कमावलेल्या धावा ..
क्रिकेट जरी टीम गेम असला तरी बेंगलोरला ही आयपीएल जिंकता नाही आली तर निव्वळ कोहलीसाठी वाईट वाटेल..
जाता जाता,
कोहली या काळातलाच नाही तर एक ऑलटाईम वर्ल्डक्लास ग्रेट फलंदाज आहे यात मला शंका नव्हतीच. तरी त्याला सचिनसारखा दर्जा एवढ्यात मिळणार नाही किंवा कदाचित कारकिर्द संपवून एक ऑलटाईम ग्रेटेस्ट फलंदाज म्हणून निवृत्त झाला तरी भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनात सचिनसारखे स्थान तो किंवा दुसरा कोणीच मिळवू शकणार नाही असे वाटायचे..
पण आज त्याने जो खेळ आणि सोबत जी वृत्ती दाखवली ती हमखासच येत्या काळातही वारंवार दिसतच राहील आणि भारतीय क्रिकेट हे गावस्कर, सचिन आणि कोहली या तीन पिढ्यांचे म्हणून ओळखले जाईल. बोलो आमीन
Pages