स्ट्रॉबेरी फिरनी.

Submitted by आरती on 24 March, 2016 - 06:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ लिटरचे आटवून अर्धा लिटर केलेले दुध.
साखर चाविप्रमाणे
स्ट्रॉबेरीज ८-१०
आख्खा बासमती तांदूळ पाव वाटी.
काजूचे तुकडे मुठभर
बदमकाप मुठभर
वेलदोडा पूड १ छोटा चमचा.

क्रमवार पाककृती: 

( ही पूर्ण कृती मंद आचेवर करायची आहे. )
तांदूळ ३-४ तास भिजत घालावे. स्ट्रॉबेरीचे हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्यावे. २-३ चमचे साखर घालून स्ट्रॉबेरीचे तुकडे एका छोट्या पॅनमध्ये शिजवून घ्यावे. या मिश्रणाला थोडे पाणी सुटेलं, ते तसेच ठेवावे. भिजवलेले तांदूळ बारीक वाटले जातील इतपतच पाणी घालून वाटून घ्यावे. त्यांची पेस्ट तयार होईल. आता आटवलेले दुध एका जाड बुडाच्या भांड्यात घ्यावे. गरम झाले की त्यात वाटलेले तांदूळ घालावे. तांदूळ शिजेपर्यंत डावाने हलवत राहावे. तांदूळ शिजले की दुध अजून घट्ट दिसायला लागेल. मग त्यात वेलदोड्याची पूड आणि साखर घालावी. डावाने हलवत राहावे. काजू-बदाम घालावे. गॅसवरून खाली उतरवून गार झालेले स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून एकत्र करून घ्यावे. वाफ निवली की फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावे.
.
firani.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

इथे फिरनीच्या पाककृती आधीच आहेत. पण ही बरीच सुटसुटीत वाटली आणि चव मला खूप म्हणजे खूपच आवडली म्हणून इथे लिहिते आहे.
वेलदोडा पूड मुळ कृतीत होती म्हणून घातली. नुसता स्ट्रॉबेरीचा स्वाद पण मस्त लागेल.
स्ट्रॉबेरीच्या पाण्याने मिश्रण थोडे पातळ झाले तरीपण गार झाल्यावर ते पुन्हा घट्ट होते.
रसगुल्ला फिरनीची तयरी केली होती. पण घरी येतन खुप मस्त स्ट्रॉबेरी मिळाल्या म्हणुन हा प्रयोग सुचला.

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूरच्या रसगुल्ला फिरनीत केलेले बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी (फिरनी ची) छान आहे ..

मला ओरिजीनल (मेडिटरेनियन रेस्टॉरन्ट मध्ये असते तशी रोझ स्वादाची), किंवा भारतीय (वेलदोडा केशर) किंवा मग नंदिनी ने लिहीलं होतं तशी केवडा स्वादाची आवडेल असं वाटतंय .. करून बघायला हवी किमान भारतीय स्वादाची ..

स्ट्रॉबेरीज घातल्यावर दुध खराब नाही होणार का? प्रोसेस्ड असुन सुद्धा स्ट्रॉबेरी क्रश घातल्यावर दुध थोड्या वेळात खराब होतं. इथे तर आपण कच्ची घालणार, मग एक सुद्धा स्ट्रॉबेरी आंबट असेल तर दुध खराब होइल ना?

फिरनी आवडते आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर पण. त्यामुळे वाया जावु नये म्हणुन एवढी fussy बनते आहे. Happy

प्रोसेस्ड असुन सुद्धा स्ट्रॉबेरी क्रश घातल्यावर दुध थोड्या वेळात खराब होतं.>> मनिमाऊ, गरम दुधात घालता का तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश? तसं असेल तर दूध नासेल. पण गार दुधात स्ट्रॉबेरी क्रश मिक्स केलं तर दूध नाही नासत. मी बर्‍याचदा मिल्कशेक करते किंवा ओट्समध्येही स्ट्रॉबेरी क्रश घालते.
आणि या कृतीत तर स्ट्रॉबेरी आधी साखरेबरोबर शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तर अजिबातच दूध खराब होणार नाही.

Half and half milk घातले, आटवलेल्या दुधाऐवजी तर चालेल का >> हो चालेल की. कन्डेन्स्ड मिल्क पण चालेल.

Half and half ला तांदुळ थोडे जास्त लागतील का !! ?? बहुतेक.

स्ट्रॉबेरीज घातल्यावर दुध खराब नाही होणार का? >> खराब होउनये म्हणुनच त्या साखरेत शिजवुन घेतल्या. कारण दुध गरम असतानाच मिक्स करावे लाग्णार होते. गार होता होता दुध घट्ट होत जाते. आणि मग स्टॉबेरीचे मिष्रण नीट मिक्स होत नाही.

शिजवलेल्या स्ट्रॉबेरीज मात्र मी नीट गार होउ दिल्या होत्या.

पण शिजवल्यामुळे 'चव' अजुनच छान उतरली. Happy

मंजूडी, ग्रेट! >> +१

नाही, मंजूडी. गार दुधात घालुन स्ट्रॉबेरी मिल्कशेक केल्यावर जर थोडा आरामसे सीप करत बसलं तर ८-१० मिनिटाने दुध खराब होतं.
घरी चितळेचं असतं आणि ऑफिसमधे पण हाच अनुभव आहे. तिथे गोवर्धन / कृष्णा वापरतात. दोन्हीकडे क्रश मॅप्रो.

मी पण कॉर्नफ्लेक्स मधे हनी / साखरेऐवजी एक स्पुन क्रश घालते. तेव्हा दुध बहुतेक खराब नाही होत आहे. .

स्ट्रॉबेरी मिल्कशेक केल्यावर जर थोडा आरामसे सीप करत बसलं तर ८-१० मिनिटाने दुध खराब होतं. >> ओहह मी पण बरेचदा करते मिल्कशेक. पण असे कधी झाले नाही.

मनिमाऊ, milk curdles up अशी संज्ञा आहे ती. म्हणजे दुधाला पांढरं बनवणारे प्रोटिन मॉलिक्यूल्स अलग होऊन तरंगायला लागतात आणि आपल्याला दूध नासल्यासारखं दिसतं. हे असं होणं म्हणजे दूध प्रत्येकेवेळी खराबच झालेलं असतं असं नसतं. सर्वसाधारणपणे कोमट तापमानाला ही प्रक्रीया होतेच. पण ते दूध नासलेलं असतंच किंवा पोटाला बाधतंच असं नाही. तज्ज्ञांनी या माहितीत भर घालावी. अर्थातच हे असं दूध पचणं प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. काहीजणांना निगुतीने आटवलेली बासुंदीही बाधते.