दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी आंबा मोसम फारसे आंबे न खाताच गेला. पायरीसारख्या चवीचे मॅरेथॉन २-३ वेळा आणले. त्याचा रस झाला. लंगड्याचा जातभाई शोभेल असा एक प्रकार होल फूड्स मध्ये मिळाला. तो एक चिरून खायचा प्रकार झाला. बस्स बाकी काही नाही. इथे एक जणांकडून हापूस मागवणार होते पण ते राहूनच गेले.
घरी होतो तेव्हा मोसम चालू झाल्यापासून एक एक करून सगळे प्रकार येत. बाजारात मिळणारे हापूस, पायरी, बदाम, केशर, लंगडा, तोतापुरी इ. आणि घरचे अनेक प्रकार. ते तर शेकड्याने येत. संपूर्ण आंबा मोसम अक्षरशः रोज रस असे. हे कितीही खाल्ले, शेजारी-पाजारी, ओळखी-पाळखीच्यांना दिले तरी उरतच. त्याच्याच पोळ्या, वड्या होत. आई रस काढून ऍल्युमिनिअमच्या थाळ्यांमध्ये तूप लावून ओतून देई आणि आम्ही ते थाळे गच्चीवर ठेवून येत असू. धुळ किंवा कचर्यापासून संरक्षण म्हणून वर वाळवणाचे प्लॅस्टिकचे आवरण. सकाळी ठेवले की संध्याकाळपर्यंत पोळी तयार. वड्यांना मात्र फार वेळ लागे. आईने वड्या करायला घेतल्यापासून तयार होईपर्यंत अगदी जीव टांगणीला लागे. आधी चांगला २-३ लीटरचे पातेले भरून रस काढायचा. तो चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आटवायचा. एव्हढा रस आटायला ३-४ तास तरी लागत (असावेत). तो गोळा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर माळून वड्या थापायच्या. तो नुसता गोळा पण इतका चविष्ट लागतो. गेली कित्येक वर्षे आई न चुकता, न कंटाळता पोळ्या/वड्या करते आहे. आणि आता जमेल तश्या आम्हा सगळ्यांना पाठवते. मागच्याच महिन्यात नवर्याच्या मैत्रिणीबरोबर माझ्यासाठी पाठवल्या.
शाळेत असताना आम्ही झाड उतरवायचे असले की जातीने मालुंज्याला जात असू. गड्यांनी कैर्या खाली घेतल्या की त्यातल्या शाख (झाडावरच थोडी पिकलेली कैरी) शोधून खाणे हा अतीव आवडता प्रकार. त्यातल्या त्यात आरतीला जरा जास्तच सापडत (तिचे नाक फार तिखट आहे). आता मला तर जाणे जमत नाही पण तिघी बहिणी मात्र घरचे आंबे एक-एक करून उतरायला लागले की चक्कर टाकतात. तरी आम्ही सगळ्या पूर्णवेळ घरी होतो तेव्हा ज्या प्रमाणात आणि वेगात आंबे संपत तेव्हढे आता संपत नाहीत. आई-बाबा रोज सकाळी "फ्रूट आवर" मध्ये एखादा दुसरा चिरून खातात, एखादा दुसरा चोखून खायला चांगला म्हणून तो प्रकार. बाकीच्यांचा बहुतेक करून रस आणि मग वड्या. आणि मग ते आम्ही नाही म्हणून हळहळतात. बाकी तिघी कमीत-कमी बाजारात मिळणारे आणून खाऊ शकतात. आणि आई त्यांना घरचे आंबेही पाठवतेच अधून मधून. राहता राहिले ती मीच.
मग बाबा आपले रोज फोनवर मला "आंबे-वृत्तांत" देतात. साधारण मोहोर यायच्या वेळेपासूनच प्रत्येक फोनवर त्यांची "आंबे-बोलणी" सुरू होतात. आईचं मागून चाललेलं असतं, झालं का तुमचं आंबे-पुराण सुरू? एखाद्या वर्षी सगळ्याच झाडांना खूप चांगला बार येतो. बाबांचा आनंद बघण्यासारखा असतो. मग हमखास गारपीट होते, मोहोर गळून जातो. एखाद्या लहान मुलाचं आवडतं खेळणं हरवावं तसा त्यांचा सुर होतो. ह्या वर्षी असेच झाले. बार खूप चांगला आला होता. पण अवेळी आलेल्या पावसाने बराच गाळून गेला. मग सध्या कुठला आंबा भरपूर मिळतोय (पावसाळ्याच्या सुरुवातीला केशर/बदाम मिळायला सुरुवात होते ना? ). आज एक शेकडा "राम" उतरवला. मग अढी लावली. इथे परत एकदा अढी लावायचे शास्त्र गिरवून होते. मग आज काय सगळे आंबे पिकल्याने कसा घमघमाट सुटलाय घरात. कपड्यांना पण कसा आंब्यांचाच वास येतोय. आणि कधी कधी (उगीचच) "तुझी आईच सगळे आंबे खाते, माझ्या वाटेला काय १-२ आले तर वाट बघतोय". आणि मग पाठीमागून आईचा "मुली काय आज नाही ओळखत आईला" अश्या अर्थाचा हुंकार!!!
इथे मला आंबे फारसे मिळत नाहीत ह्याचे मला जितके वाईट वाटते त्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त वाटते. गेल्या वर्षी आंबे अमेरिकेला निर्यात होणार अशा बातम्या यायल्या लागल्यावर त्यांना कोण आनंद झाला. अक्षरशः रोज (पूर्वी घर ते ऑफिस आणि आता पाळणाघर ते ऑफिस असा रोज फोन करते घरी) ते मला काय नवी-जुनी बातमी आली ते सांगत. आम्हीही उत्साहात एक पेटी आणली खरी पण उघडल्यावर फार निराशा झाली. सगळे आंबे अर्धे-मुर्धे कच्चे/सडके निघाले. ह्या वर्षी पुन्हा असे होणार नाही कारण काय प्रक्रिया बदलली की यंदा Reliance निर्यात करणार अशा काही बातम्या आल्या नी बाबांना पुन्हा आशा वाटली की यंदा तरी लेकीला चांगले आंबे मिळतील.
पण इथे कितीही चांगल्या दर्जाचे आंबे मिळायला लागले तरी सगळ्यांसोबत बसून खाल्लेल्या घरच्या आंब्यांची लज्जत वेगळीच. लहानपणी सकाळी अकराच्या सुमारास घमेलंभर आंबे अढीतून काढून आम्ही सगळे गोल करून बसायचो. आई, आरती एका पातेल्यात रस काढणार. आम्ही बाकीचे "कुच्चर" नुसते आंबे खाणार. त्या चीकमिश्रित रसाची चव न्यारीच. त्याची सर अमेरिकेत आयात केलेल्या "दर्जेदार" आंब्यांना कुठे यायला!!!!
.
असो, इथे काही आंब्यांच्या जाती देत आहे, हे सगळे आमच्या शेतावरील आंबे आहेत-
राम- मध्यम आकार, हिरवी जाड साल, रस पिवळसर केशरी. आंबा चांगला झाला असेल तर चव गोड. कोय आंब्याच्या एकूण आकारच्या मानाने बरीच मोठी. दशा खूप.
.
गोटी- नाव सार्थ करणारा गोटीचा आकार. ती एक मोठी गोटी असते ना, अगदी तेव्हढा. हिरवी साल आणि रस एकदम गोड, रंगाने केशरी. कोय लहानीच. ह्याचाच एक प्रकार काळी गोटी. साल काळी बाकी सगळा गोटीसारखा.
.
गाढवमुत्या- चांगला तळहाताएव्हढा मोठा आंबा. हिरवी पातळ साल. रस भरपूर पण अगदी फिकट पिवळा आणि पाण्यासारखा पातळ. नावाचा बोध आता झाला असेल.
.
मारुती- हा आमच्या सगळ्यांचा एकदम आवडता. ह्याची चव, रसाचा रंग अगदी हापुसाशी स्पर्धा करणारा. रस करून किंवा चिरून दोन्ही प्रकारे खाता येतो. साल मात्र जाड हिरवी. मारुतीचे एकच झाड आता शिल्लक आहे. त्यालाही दर वर्षी बार येत नाही आता. यंदा खूप आला होता पण निसर्गाने दगा दिला. असो, हा खाण्याची एक विशेष पद्धत आहे-केळं सोलल्यासारखे सगळी साल सोलून घ्यायची. मग लाडूसारखा आंबा खायचा. ह्याची कोय एकदम चपटी असते (बहुतेक). हापूसही अनेक लोक असा खातात.
.
वनराज- हा पुष्कळ ठिकाणी दिसतो. आमच्या शेतात नाही पण शेजारच्या काकांनी लावला आहे. किलोत एकच बसेल एव्हठा मोठा आंबा. भरपूर गुठळ्या असलेला पिवळसर रस.
.
सीता आणि भरत- हे मला फारसे आठवत नाहीत.
.
राजा- हे आमच्या दारातच झाड होते. हा दिसायला "राम" सारखाच. पण रस अगदी हापुसासारखा घट्ट, जर्द केशरी, गोड. दशा अजिबात नाहीत. हे झाड काही वर्षांपूर्वी जळाले.
.
खोबर्या- कुंकवाची कोयरी असते तसा आकार. कैरीत आंबटपणा अजिबात नाही. तयार आंबा कसा लागतो माहिती नाही. कारण ह्याची २-३ झाडे नमकी आमच्या सोसायटीतल्या खतरुड लोकांच्या दारात होती. हे लोक मे महिन्याच्या सुट्टीत गावाला गेलेच तर कैर्या हाती लागायच्या (आणि कैर्यांबरोबर तोंडी लावायला आईची बोलणी). पण बरोबर झाड उतरवायच्या वेळेस यायचेच परत. त्यामुळे ह्याची शाख पण कधी खाल्ली नाही
.
साखर्या- नावाप्रमाणे साखरेसारखी गोडी. मध्यम आकार, हिरवी साधारण साल. बाबांच्या भाषेत साखर्या थकला आता. ह्या वर्षी चार-दोनच कैर्या दिल्या ह्याने.
.
नळ्या- अगदी नळ सोडल्यासारखा भरपूर रस म्हणून नळ्या.
.
कागद्या- कागदासारखी पातळ साल.
.
चरख्या- चरख्यासारखी लांबलचक चांगली ९ इंच कैरी.
.
राघ्या- ह्याच्या कैरीला देठाच्या विरुद्ध बाजूला पोपटासारखी चोच म्हणून राघ्या.
.
ढोल्या- चांगली ढोली, गुबगुबीत कैरी.
.
फुट्या- ही खास लोणच्याची कैरी. लोणच्यासाठी फोडावा लागतो म्हणून फुट्या.
.
तर असे हे आंबे पुराण. तुम्हालाही अशा काही वेगळ्या (गावठी? ) जाती माहीत असतील तर जरूर ओळख करून द्या!!!
मस्तच
मस्तच लिहिलेस गं सिंडरेला, आजोळ, पणजोळची आठवण करुन दिलीस!!
आवडलं तुझं आंबेपुराण!
तू वर्णन
तू वर्णन केलेल्या जातींची नावं मी ऐकलीसुद्धा नव्हती, खाणं तर दूरच
पुढच्या उन्हाळ्यात आणून चाखायला पाहिजेत.
>>> इथे मला आंबे फारसे मिळत नाहीत ह्याचे मला जितके वाईट वाटते त्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त वाटते....
हे सगळ्याच आई-बाबांसाठी खरं असतं असं दिसतंय.
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
व्वा ! फारच
व्वा ! फारच रसाळ वर्णन केलय तुम्हि आंब्यांचं ! वाचुन तोंडला पाणी सुटलं अगदी माझ्याकडे आंब्याच झाड असुनही .
वा एकदम
वा एकदम मस्तच, आता पुढच्या वर्षी मेमध्ये दोन दिवस श्रीरामपुरलाच जावे असे म्हणतोय. काय म्हणतेस ?
सगळ्यांना
सगळ्यांना धन्यवाद

पण आंबे खाण्याची तिथे एक अट असते. हेमट्यासारखे एक न दोन खायचे नाहीत. एका बैठकीत चांगले डझनभर तरी झालेच पाहिजेत
आणि कपड्यांना १-२ डागही पडले पाहिजेत 

.
तू वर्णन केलेल्या जातींची नावं मी ऐकलीसुद्धा नव्हती, खाणं तर दूरच >>> अरेच्चा केशर, बदाम, वनराज, लंगडा हे तर सगळीकडे दिसतात. हापुस्/पायरीचा सीझन संपत आला की हे यायला लागतात. बाकीचे तर मी सांगितल्याप्रमाणे local varieties आहेत. ते खायचे तर GS बरोबर आमच्या घरी जा पुढल्या वर्षी
.
श्रीरामपुरलाच जावे असे म्हणतोय >>> अवश्य. slarti ला पण घेउन जा
.
ह्यातल्या प्रत्येक आंब्याच्या नावाला काहितरी अर्थ आहे. भरताला बहुधा २-२ कैर्या शेजारी शेजारी येत असाव्यात. सीतेच्या चांगल्या गोड्-गोड कैर्या दुष्ट शेजारी पळवुन नेत असावेत
सिंड्रेला,
सिंड्रेला, अग तुला कुठे 'केसर' आंबे मिळाले नाहीत कां? तंतोतंत हापूस. काहीच फरक नाही चवीत आणि वासात. आम्ही रोज खातोय.
सिंड्रेला,
सिंड्रेला, आमंत्रणाबद्दल मनापासून धन्यवाद
आजोबा असेपर्यंत ते बाजारातून नीलम, तोतापुरी आणायचे त्यामुळे ते माहिती आहेत. लंगडा, केसर वगैरेंबद्दल केवळ ऐकलेच आहे. मध्येच एखादा शेप्या (शेपूसारखा लागतो) आंबा यायचा, तो मात्र नको नको व्हायचा. रामायणी आंबे आहेत तसे महाभारती आंबेसुद्धा असतात का ? म्हणजे पाचपाचचे घड लागत असतील तो पांडव आंबा (मध्येच एखादा घड सहाचा) असलं काही...
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
या
या सगळ्यांच्या जोडीला 'देवगड' हापुस पाहीजेच
वयोमानाने इतरांना देउन खाण्यातली मजा बहुदा त्यांना समजली असवी.
.
आजच एकादशी निमीत्त पाठकांचा 'खोबर्या' खाल्ला
.
आमच्या घरी आंबा खुप होता. संपुर्ण बांधा-बांधा ने आमराई होती. पण तो विकण्याची पद्ध्त नव्हती. अगदी आजोबा-पणजोबां पासुन आज पर्यंत. त्यामुळे खाणे-आणि वाटणे हे एक मोठेच काम होउन बसत असे.
.
आमची चुलत्,आत्ये,मावस भावंड आणि शेजारी-पाजारी मित्र मंडळी यांना घेउन आम्ही शेतावर आणि आणि आजोबां कडे वाड्यावर जात असु. तेंव्हा आजोबांचा नियमच असे की दिलेले सगळे आंबे संपवायचे.
.
शेवटी - शेवटी आंबे धुण्यासाठी घेतलेल्या पाण्यातच आम्ही उरलेल पिळुन टाकायचो आणि सांपले ह्मणुन उठुन जायचो. आता कळते त्या आंब्यांची किंमत.
सत्य साई
सत्य साई बाबा, साई केशर export करतात. तो नाही मिळत का तिकडे ? मधंतरी मंदीर [सईबन] बघायला गेलो होतो तेंव्हा rejected आंबा, मंदिराच्या आवारात ६० रुपये किलो मिळत होता
सिंड्रेला,
सिंड्रेला, खास लेख एकदम. आंब्याच्या दिवसात लिहिला असतास तर अजुन लज्जत वाढली असती. मी पण एकदम आंबा वेडी... आता लग्न झाल्यावर मे महिन्यात जायला मिळतेच असे नाही. मग आजी-आजोबा दोघेही चुटपुटतात.. माझ्या आजोळी असेच वेगवेगळ्या जातीचे, चवीचे, कलमांचे आंबे होतात... त्यातलेच काही प्रकार :
नीलम - हा हापूस आणि पायरीचे कलम केलेला आंबा.. दिसायला पायरीसारखाच पण अतिशय चविष्ट आणि रसाळ.
.
खोबरी - तू वर्णन केल्याप्रमाणेच.
.
आमटांबा - हे एकच झाड आहे, पण भयानक आंबट आंबे लागतात ह्याला.. आणि संख्येने पण भरपूर... पोरांना नेम धरून दगडाने आंबा पाडायचं प्रशिक्षण ह्या झाडावर द्यायचं. आजी शक्यतोवर कैर्या असतानाच लोणचं घालते.
.
भोपळी आंबा - साधारण २ ते अडिच किलोचं एकेक फळ असतं. साल हिरवीजर्द आणि आतून पांढरा असतो हा आंबा.. पण मस्त आंबटगोड चव असते. ह्यावर लसणीचं तिखट घालून खातात. आम्ही ह्या आंब्यासाठी अक्षरशः जीव टाकतो. मग आजी प्रत्येक मोसमात एकतरी आंबा आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी जाम धडपडते.
.
काळा हापूस - काळसर हिरवी साल आणि आतून अगदी जर्द केशरी असा हा आंबा. आकाराने हापूसएवढा असतो आणि चवही हापूसचीच..
.
बाकी फणस पण भरपूर असतात आणि करवंद, जांब, जांभळं पण भरपूर.... पण मे महिन्यात आजोळी जायचं ते खास आंब्यांसाठीच.... एखाद्या वर्षी कुठल्या कारणाने नाही जायला मिळालं तर जाणार्यांवर जाम जळायचो आम्ही.. मग 'मोहोर गळून पडलाय, माकडांनी हैदोस घातलाय, आंबाच कमी आहे ह्यावर्षी' वगैरे शिव्याशाप त्यांना देणं सुरू व्हायचे.
.
सिंड्रेला, कुठल्या आठवणी जागवल्यास गं... परत लहान होऊन आंबे बेदम खावेसे वाटताहेत.
'केसर' आंबे
'केसर' आंबे मिळाले नाहीत कां? >>> नाही
तुम्ही कुठे असता ? मी CT मधे. इथे फक्त मॅरेथॉन मिळतात. १-२ वेळा जर्सी सीटीत पण बघितले पण मॅरेथॉनच मिळत होते. तो एकदम पायरीसारखा लागतो.


.
वयोमानाने इतरांना देउन खाण्यातली मजा बहुदा त्यांना समजली असवी >>>> ष्टोरी माहीती नाही का तुला ?
.
साई केशर >>> ह्याला काय गोल गोल गुंता असलेल्या दशा असतात क ?
.
आंब्याच्या दिवसात लिहिला असतास तर अजुन लज्जत वाढली असती >>> हो ना. तेव्हापासुन विषय मनात आहे. पण लिहिणे झालेच नाही. परवा पण रात्री १२ वाजता मुहुर्त लागला
.
निलम म्हणजे ज्यात भुंगा निघतो तोच ना ? एक फणश्या पण खाल्ल्याचे आठवते आहे. फणसासारखी चव की वास आठवत नाही.
अग
अग सिंड्रेला, जर तू जर्सी सिटीत आली असशील्/ किंवा येणं शक्य असेल तर तिथल्या पटेल कडे आहेत केसर आंबे. हापूसपेक्षा किंमतही कमी आहे.
सिंड्रेला,
सिंड्रेला, कुठल्या आठवणी जागवल्यास गं... परत लहान होऊन आंबे बेदम खावेसे वाटताहेत.>> अगदी बरोबर...
.
मस्तच लिहीलं आहेस.
.
माझ्या आजोळी पण शेत आहे आणि भरपुर आंबे असतात, लहाणपणी खुप खाल्ले. रोज सकाळी माझी मामी आंबे अढीतुन काढुन आणत असे आणि आम्ही सगळी भावंड पाण्यातला एक एक आंबा काढुन खात असु...मनसोक्त.
असेच सिताफळाच्या, जांभळाच्या टोपल्या असायच्या आणि मग भरपुर ताव मारयचा
सिंडरेला,
सिंडरेला, कसला 'आंबृतानुभव' घडवलास... पाणी सुटलं तोंडाला. ते ही माहीत नसलेले आंबे ऐकुनच.
कॉलेजच्या दिवसात, 'कोमात बिमात गेलीस तर काय म्हटलं तर उठशील?' असल्या अचरट प्रश्नाला 'आंबा किंवा भेळ' हे प्रामाणिक उत्तर होतं
अजूनही, त्यातला आंबा कायम. दुसरा पदार्थ बदलतो काळ, वेळ, माणूस, हॉटेल वगैरे बघून.... पण आंबा कायम!
cindrelaa, आई ग हे
cindrelaa,

आई ग हे आंबेपुराण वाचून वाटले गेले ते दिवस रत्नागीरीतले/गोव्यातले. इथे अवाच्या सवा किंमती देवून आणले तरी पण आंबे आणले पण सगळे आतून खराब.
आंब्याचे साठं हा प्रकार असाच आवडता प्रकार. सकाळी आजीने घातली सुकायला की संध्याकाळी कौलावर चढून फडशा.
मला कळत नाही जेव्हा काहीजण आंब्यापासून लांब तरी कसे रहातात. कारण काय तर आंबे उष्ण त्यामुळे चेहर्यावर मुरुमे येतात असे मी बर्याच काही मैत्रीणीकडून एकले. पण इथे तर आंब्याच्या दिवसात आम्ही प्रत्येकजण दिवसाला रोज दहा तरी(seriously no jokes,सकाळी २ नाश्त्याला, दुपारी २ तरी,मध्येच एखादा १ तरी आंबा अक्खा चोखून,रात्री २ तरी असे चालु असायचे) खावून कधी चुकून सुद्धा साधी एक पुटकळी नाही आली का येत एवढे आंबे खावून अजूनसुद्धा.
त्या दिवसातल्या आठवणी म्हणजे,
आंबा उष्ण म्हणून माझे आजोबा सुद्धा पाण्यात ठेवत काढून कापायच्या आधी.
दुपारी आंबे खावून एकमेकांच्या अंगावर बाठी फेकून मारत असू नी आजी मागे ओरडत असे की घरात घाण नको खळ्यात जा.
गाईला एकदा बाठी जबरदस्तीने भरवली होती असे वात्रट प्रकार चालत.
एवढे आंबे खावून जाडी पण वढली नाही का वाढायची नाही. भरीस भर म्हणून फणस सुद्धा खायचो रोज. त्यात रोज आंब्याचे प्रकार सकाळ संध्याकाळ चालत अधून मधून आमरस शीरा,मोदक आमरस घालून, रायते,पन्ह,येता जाता तोंडात आंबावडीचा बकाणा.
आता विचार गेला तर वाटते काय खायचो नी कीती त्या (calories) पण इथे तर नीट धड आंबाच नाही मिळत. काही काळे आतून, काही आधीच नरम. तेव्हा ही (calories) चिंताच कुठे करायला मिळणार.
अजून तरी मी चार हापूस आंबे एका वेळेला एका मागोमग खावू शकते कारण एकच आंबा धड मिळतो ना.
हे आंबे नाही लिहिलेस, ते महाराष्ट्र सोडून इतर भागातून मुंबईत यायचे,
तोतापुरी,
दशहरी
असो.
ह्याला काय
ह्याला काय गोल गोल गुंता असलेल्या दशा असतात क ? >>> उलटी (हा स्माईली उपलब्ध नाही )

.
पण इथे तर आंब्याच्या दिवसात आम्ही प्रत्येकजण दिवसाला रोज दहा तरी >> आम्ही पण. तेंव्हा वजन बिजन वाढत नसे. आता दुर्लक्ष करुन
.
आणि तसाच प्रकार घरात केळाचा घड टांगलेला असले की, १० केळी दिवसाला आरामात. आता २ पण जस्त होतात
.
आमच्या मागच्या अंगणात रामफळाचे मोठ्ठे झाड होते, त्याला १२ महीने एक झोका बांधलेला असे. आणि तिथेच मागे सिताफळाचे झाड होते. दुपारी जेवण झाले की मागे जाउन एक पिकलेले सिताफळ खाढायचे आणि झोक्यावर बसुन खायचे. नंतर हाच प्रकार पेरु च्या बाबतीत.
.
आमच्या सिताफळ-पेरुची अतिशय उत्क्रुष्ट जात आहे. ओंजळ भर मोठे फळ अतिशय गोड, कमी बियांचे, आणि गर पण भरपुर.
.
मी कुंडीत सिताफळाची काही रोपे तयार केली आहेत, कुणाला हवी असल्यास सांगा.
अगं काय
अगं काय सिंड्रेला. आंबा पुराण असं सीझन संपल्यावर लिहिलंस. आता पुढच्या वर्षीपर्यंत कसा धीर धरवणार..
देशात असुनही लहानपणीची मजा आता नाही. घरचे आंबे नसायचे पण बाजारात आंबे आले रे आले की आजोबा आणत असत आणि घरी कायम अढी लावलेली असायची. अजुन आठवतं मी आणि आईने आंबा खाल्याशिवाय आण्णा (मझे आजोबा) पहिला आंबा खात नसत. कोणाकडे गेले असताना कितीही आग्रह केला तरी...
मग काय पुर्ण उन्हाळाभर आंबा, आंबा आणि आंबाच....
खुप आंबे खाल्ले की आजी ओरडायची बाधेल म्हणून मग आजीचं लक्ष चुकवुन खाणं सुरु. लपवून अंगणात नेउन, पेरुच्या झाडावर चढून्..केळाचा घड पिकायला ठेवला की तसंच.. आजी बा/सं मधे गेली की पत्येक वेळेस २-३ हाणायची.
आणखी अशीच एक जपुन ठेवलेली आठवण. घरी खुप पाहुणे होते म्हणून मनसोक्त आंबे खाता येत नव्हते. मी ५ एक वर्षाची असेन. तेव्हा बाबू आजोबा (हे आमच्या आजीच्या लग्ना आधीपासुन आण्णांच्या घरी होते. कामाला होते हे लिहायला खरं तर बोटं चालतं नाहीयेत.) मला घेऊन जवळच्या डोंगरावर गेले आणि पिशवीतून डझनभर आंबे काढून मला म्हणाले आता मनसोक्त खा पिल्ल्या...
आता कितीही चांगलं फळ आणलं तरी ती चव नाही आंब्याला... सिंड्रेला तू हळवी तार छेडलीस गं...
सिंड्रेला
सिंड्रेला तू रडवलेस गं......... माझ्या आजोळची आठवण आली. आता खिशाचा विचार करुन आंबे खावे लगतात. लहानपणि अढी घातलेले आंबे संपत नाहीत म्हणुन खायचो. पण गावठी आंब्याची सर हापुस ला नक्कीच नाही................
छान
छान लिहिलय....

वाचायला मजा आली... मी भले शेत वगैरे पासुन लाबं वाढ्लो, तरीही हे सगळं वर्णन वाचुन उगाच माझ्या काल्पनीक आजोळी जाउन आबें खाउन आलो..
ता.कः पुढ्च्या वेळी आइनी आंब्याच्या पोळ्या केल्या की.. थोड्या इकडी ही येउदेत....
आमच्या
आमच्या विदर्भात कलमी आंभा, दशहरी आंभा जास्त छान मिळतो. तू ज्याला शाख म्हणालीस त्याला आम्ही पाडाला पिकलेला आंबा म्हणतो. मस्त रसभरीत वर्णन केलेस.
अरे वा
अरे वा बरेच आंबेपंथी आहेत की इथे
आता परत चक्कर टाकायला हवी.

तुमच्या बायकोला म्हणाल तर देइन एखाद्या वेळेस. तुम्ही आपले चितळ्यांकडे काय मिळेल त्यावर समाधान माना 
.
सायो, गेल्या शनिवारी बघितले मी आंबे पटेलकडे. पण रंग-रुपावरनं मला ते पायरीसारखेच दिसले. म्हणुन घेतले नाहीत
.
पिकलेले सिताफळ खाढायचे आणि झोक्यावर बसुन खायचे >>> त्या झोक्यावर बसुन खाण्याचे अजुन एक कारण म्हणजे पाठकांच्या खोबर्याची कैरी वार्याने पडली कि आवाजाने कळत असे
.
आंबे उष्ण खरेच. आम्हा सगळ्यांना लहानपणि उष्णतेने फोड येत असत. तारुण्यपिटीका किंवा मुरुमे वेगळी आणि हे फोड वेगळे. हे जाम ठणकत. पण ह्याचे डाग रहात नाहीत मागे. तसेच चिमुटभर मीठ किंवा भरपुर तुप घालुन खाल्ले की आंबा बाधत नाही असे बाबा सांगतात. तुपावरुन आठवले, रस खाण्याची माझी आवडती पद्धत अशी- मोठ्या वाटीत १ डाव रस मग १ मोठा चमचा भरुन तुप, मग १ डाव रस परत तुप अशा ४-५ लेयर करायच्या आणि मग (बाकी सगळ्यांचा संपला असे बघुन) चवीचवीने खायचा
.
थोड्या इकडी ही येउदेत >>>> हे पहा वैद्य, मी आईने पाठविलेला खाउ नवर्याला पण एकदा आल्यादिवशी आणि एकदा संपायला आला की असा नावापुरता देते. आंब्याच्या पोळ्या, वड्यांचे तर नावच नको. आता उगी इशानला वाटायला नको त्याची आई कैकेयी आहे म्हणुन त्यालाही मिळतो. शिवाय त्याला दिला नाही तर त्याची आज्जी काही पाठवायचीच नाही
>>एकदा
>>एकदा आल्यादिवशी आणि एकदा संपायला आला की असा नावापुरता देते.
lol सिन्ड्रेला.
मी ऐकले नव्हते हे सगळे प्रकार (आंब्यांचे). गोटी, पायरी, हापूस, रायवळ (म्हणजेच तोतापुरी, राघू का? त्यातून भुंगा येतो तो.)
>>> इथे मला आंबे फारसे मिळत नाहीत ह्याचे मला जितके वाईट वाटते त्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त वाटते....
>>हे सगळ्याच आई-बाबांसाठी खरं असतं असं दिसतंय.
हो, हो.
सिंड्रेला,
सिंड्रेला, मस्त लिहिलंयंस!
सिंड्रेला,
सिंड्रेला, मुद्दाम येऊ नकोस ग आंब्यांकरता पटेलकडे. संपलेत ऑलरेडी.
आय हाय ...
आय हाय ... क्या याद दिला दी कम्बख्त !
काही प्रकार ओळखीचे आहेत .. काही अगदीच अनोळखी ...
परागकण
सिंडरेला...
सिंडरेला...
आज ज्ञानात भर पडली... आंब्याचे इतके प्रकार असतात ???????
मी आपला हापूस एके हापूस, पायरी दुणे हापूस.. असंच करत आलोय
(हे म्हणजे विशिष्ठ गावचे काही लोक जसं 'आम्ही फिश खातो' म्हणतात ...म्हणजे काय तर काटा काढून दिलेलं पापलेट खातात तसं... अरे मासे अजून भरपूर प्रकारचे असतात की !! तसंच आंबे भरपूर प्रकारचे दिसतात की !!!)
सिंड्रेला,
सिंड्रेला,
एकदम आवडले. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
सिन्ड्रेल
सिन्ड्रेला झक्कास एकदम.. छान लिहिलयस, मनसोक्त आंबे खायची मजाच वेगळी, ते पांढरे तलमचे झब्बे असायचे लहान असताना आम्हा मुलांचे.. उन्हात खेळताना चिक्कार घाम आणि मग त्यावर डाग आंबे, जांभळं, करवंदांचे..
आणि हो, देवगडवरून आलेली आंबेपोळी नुकतीच संपवली..
पुन्हा
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद नकोत.. आंबे हवेत पुढच्या मोसमात!
_________________________
-Man has no greater enemy than himself
Pages