दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी आंबा मोसम फारसे आंबे न खाताच गेला. पायरीसारख्या चवीचे मॅरेथॉन २-३ वेळा आणले. त्याचा रस झाला. लंगड्याचा जातभाई शोभेल असा एक प्रकार होल फूड्स मध्ये मिळाला. तो एक चिरून खायचा प्रकार झाला. बस्स बाकी काही नाही. इथे एक जणांकडून हापूस मागवणार होते पण ते राहूनच गेले.
घरी होतो तेव्हा मोसम चालू झाल्यापासून एक एक करून सगळे प्रकार येत. बाजारात मिळणारे हापूस, पायरी, बदाम, केशर, लंगडा, तोतापुरी इ. आणि घरचे अनेक प्रकार. ते तर शेकड्याने येत. संपूर्ण आंबा मोसम अक्षरशः रोज रस असे. हे कितीही खाल्ले, शेजारी-पाजारी, ओळखी-पाळखीच्यांना दिले तरी उरतच. त्याच्याच पोळ्या, वड्या होत. आई रस काढून ऍल्युमिनिअमच्या थाळ्यांमध्ये तूप लावून ओतून देई आणि आम्ही ते थाळे गच्चीवर ठेवून येत असू. धुळ किंवा कचर्यापासून संरक्षण म्हणून वर वाळवणाचे प्लॅस्टिकचे आवरण. सकाळी ठेवले की संध्याकाळपर्यंत पोळी तयार. वड्यांना मात्र फार वेळ लागे. आईने वड्या करायला घेतल्यापासून तयार होईपर्यंत अगदी जीव टांगणीला लागे. आधी चांगला २-३ लीटरचे पातेले भरून रस काढायचा. तो चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आटवायचा. एव्हढा रस आटायला ३-४ तास तरी लागत (असावेत). तो गोळा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर माळून वड्या थापायच्या. तो नुसता गोळा पण इतका चविष्ट लागतो. गेली कित्येक वर्षे आई न चुकता, न कंटाळता पोळ्या/वड्या करते आहे. आणि आता जमेल तश्या आम्हा सगळ्यांना पाठवते. मागच्याच महिन्यात नवर्याच्या मैत्रिणीबरोबर माझ्यासाठी पाठवल्या.
शाळेत असताना आम्ही झाड उतरवायचे असले की जातीने मालुंज्याला जात असू. गड्यांनी कैर्या खाली घेतल्या की त्यातल्या शाख (झाडावरच थोडी पिकलेली कैरी) शोधून खाणे हा अतीव आवडता प्रकार. त्यातल्या त्यात आरतीला जरा जास्तच सापडत (तिचे नाक फार तिखट आहे). आता मला तर जाणे जमत नाही पण तिघी बहिणी मात्र घरचे आंबे एक-एक करून उतरायला लागले की चक्कर टाकतात. तरी आम्ही सगळ्या पूर्णवेळ घरी होतो तेव्हा ज्या प्रमाणात आणि वेगात आंबे संपत तेव्हढे आता संपत नाहीत. आई-बाबा रोज सकाळी "फ्रूट आवर" मध्ये एखादा दुसरा चिरून खातात, एखादा दुसरा चोखून खायला चांगला म्हणून तो प्रकार. बाकीच्यांचा बहुतेक करून रस आणि मग वड्या. आणि मग ते आम्ही नाही म्हणून हळहळतात. बाकी तिघी कमीत-कमी बाजारात मिळणारे आणून खाऊ शकतात. आणि आई त्यांना घरचे आंबेही पाठवतेच अधून मधून. राहता राहिले ती मीच.
मग बाबा आपले रोज फोनवर मला "आंबे-वृत्तांत" देतात. साधारण मोहोर यायच्या वेळेपासूनच प्रत्येक फोनवर त्यांची "आंबे-बोलणी" सुरू होतात. आईचं मागून चाललेलं असतं, झालं का तुमचं आंबे-पुराण सुरू? एखाद्या वर्षी सगळ्याच झाडांना खूप चांगला बार येतो. बाबांचा आनंद बघण्यासारखा असतो. मग हमखास गारपीट होते, मोहोर गळून जातो. एखाद्या लहान मुलाचं आवडतं खेळणं हरवावं तसा त्यांचा सुर होतो. ह्या वर्षी असेच झाले. बार खूप चांगला आला होता. पण अवेळी आलेल्या पावसाने बराच गाळून गेला. मग सध्या कुठला आंबा भरपूर मिळतोय (पावसाळ्याच्या सुरुवातीला केशर/बदाम मिळायला सुरुवात होते ना? ). आज एक शेकडा "राम" उतरवला. मग अढी लावली. इथे परत एकदा अढी लावायचे शास्त्र गिरवून होते. मग आज काय सगळे आंबे पिकल्याने कसा घमघमाट सुटलाय घरात. कपड्यांना पण कसा आंब्यांचाच वास येतोय. आणि कधी कधी (उगीचच) "तुझी आईच सगळे आंबे खाते, माझ्या वाटेला काय १-२ आले तर वाट बघतोय". आणि मग पाठीमागून आईचा "मुली काय आज नाही ओळखत आईला" अश्या अर्थाचा हुंकार!!!
इथे मला आंबे फारसे मिळत नाहीत ह्याचे मला जितके वाईट वाटते त्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त वाटते. गेल्या वर्षी आंबे अमेरिकेला निर्यात होणार अशा बातम्या यायल्या लागल्यावर त्यांना कोण आनंद झाला. अक्षरशः रोज (पूर्वी घर ते ऑफिस आणि आता पाळणाघर ते ऑफिस असा रोज फोन करते घरी) ते मला काय नवी-जुनी बातमी आली ते सांगत. आम्हीही उत्साहात एक पेटी आणली खरी पण उघडल्यावर फार निराशा झाली. सगळे आंबे अर्धे-मुर्धे कच्चे/सडके निघाले. ह्या वर्षी पुन्हा असे होणार नाही कारण काय प्रक्रिया बदलली की यंदा Reliance निर्यात करणार अशा काही बातम्या आल्या नी बाबांना पुन्हा आशा वाटली की यंदा तरी लेकीला चांगले आंबे मिळतील.
पण इथे कितीही चांगल्या दर्जाचे आंबे मिळायला लागले तरी सगळ्यांसोबत बसून खाल्लेल्या घरच्या आंब्यांची लज्जत वेगळीच. लहानपणी सकाळी अकराच्या सुमारास घमेलंभर आंबे अढीतून काढून आम्ही सगळे गोल करून बसायचो. आई, आरती एका पातेल्यात रस काढणार. आम्ही बाकीचे "कुच्चर" नुसते आंबे खाणार. त्या चीकमिश्रित रसाची चव न्यारीच. त्याची सर अमेरिकेत आयात केलेल्या "दर्जेदार" आंब्यांना कुठे यायला!!!!
.
असो, इथे काही आंब्यांच्या जाती देत आहे, हे सगळे आमच्या शेतावरील आंबे आहेत-
राम- मध्यम आकार, हिरवी जाड साल, रस पिवळसर केशरी. आंबा चांगला झाला असेल तर चव गोड. कोय आंब्याच्या एकूण आकारच्या मानाने बरीच मोठी. दशा खूप.
.
गोटी- नाव सार्थ करणारा गोटीचा आकार. ती एक मोठी गोटी असते ना, अगदी तेव्हढा. हिरवी साल आणि रस एकदम गोड, रंगाने केशरी. कोय लहानीच. ह्याचाच एक प्रकार काळी गोटी. साल काळी बाकी सगळा गोटीसारखा.
.
गाढवमुत्या- चांगला तळहाताएव्हढा मोठा आंबा. हिरवी पातळ साल. रस भरपूर पण अगदी फिकट पिवळा आणि पाण्यासारखा पातळ. नावाचा बोध आता झाला असेल.
.
मारुती- हा आमच्या सगळ्यांचा एकदम आवडता. ह्याची चव, रसाचा रंग अगदी हापुसाशी स्पर्धा करणारा. रस करून किंवा चिरून दोन्ही प्रकारे खाता येतो. साल मात्र जाड हिरवी. मारुतीचे एकच झाड आता शिल्लक आहे. त्यालाही दर वर्षी बार येत नाही आता. यंदा खूप आला होता पण निसर्गाने दगा दिला. असो, हा खाण्याची एक विशेष पद्धत आहे-केळं सोलल्यासारखे सगळी साल सोलून घ्यायची. मग लाडूसारखा आंबा खायचा. ह्याची कोय एकदम चपटी असते (बहुतेक). हापूसही अनेक लोक असा खातात.
.
वनराज- हा पुष्कळ ठिकाणी दिसतो. आमच्या शेतात नाही पण शेजारच्या काकांनी लावला आहे. किलोत एकच बसेल एव्हठा मोठा आंबा. भरपूर गुठळ्या असलेला पिवळसर रस.
.
सीता आणि भरत- हे मला फारसे आठवत नाहीत.
.
राजा- हे आमच्या दारातच झाड होते. हा दिसायला "राम" सारखाच. पण रस अगदी हापुसासारखा घट्ट, जर्द केशरी, गोड. दशा अजिबात नाहीत. हे झाड काही वर्षांपूर्वी जळाले.
.
खोबर्या- कुंकवाची कोयरी असते तसा आकार. कैरीत आंबटपणा अजिबात नाही. तयार आंबा कसा लागतो माहिती नाही. कारण ह्याची २-३ झाडे नमकी आमच्या सोसायटीतल्या खतरुड लोकांच्या दारात होती. हे लोक मे महिन्याच्या सुट्टीत गावाला गेलेच तर कैर्या हाती लागायच्या (आणि कैर्यांबरोबर तोंडी लावायला आईची बोलणी). पण बरोबर झाड उतरवायच्या वेळेस यायचेच परत. त्यामुळे ह्याची शाख पण कधी खाल्ली नाही
.
साखर्या- नावाप्रमाणे साखरेसारखी गोडी. मध्यम आकार, हिरवी साधारण साल. बाबांच्या भाषेत साखर्या थकला आता. ह्या वर्षी चार-दोनच कैर्या दिल्या ह्याने.
.
नळ्या- अगदी नळ सोडल्यासारखा भरपूर रस म्हणून नळ्या.
.
कागद्या- कागदासारखी पातळ साल.
.
चरख्या- चरख्यासारखी लांबलचक चांगली ९ इंच कैरी.
.
राघ्या- ह्याच्या कैरीला देठाच्या विरुद्ध बाजूला पोपटासारखी चोच म्हणून राघ्या.
.
ढोल्या- चांगली ढोली, गुबगुबीत कैरी.
.
फुट्या- ही खास लोणच्याची कैरी. लोणच्यासाठी फोडावा लागतो म्हणून फुट्या.
.
तर असे हे आंबे पुराण. तुम्हालाही अशा काही वेगळ्या (गावठी? ) जाती माहीत असतील तर जरूर ओळख करून द्या!!!
श्रीरामपु
श्रीरामपुरचे तिकीट काढा
सिंडरेला,
सिंडरेला, किती मस्त आठवणी जागवल्यास ग.
आमच्याकडे पण बाबा नि काका आंब्याचे दर्दी. मोसमात रोज आंब्याचा रस जेवणात असेच. अगदी रोजच. मोठी वाटीभर रस, त्यात भरपूर तूप घालून आधी ताटाजवळ ठेवल्या जाई, नि मग आई नि काकू भाज्या, चटण्या वगैरे वाढायला लागत.
आंब्याचे दिवस आले की रसना तृप्त करतात अगदी. तेव्हा जेवणात आंबाडाळ, फणस नि कच्च्या कैरीचे लोणचे, कांदाकैरीचे लोणचे, कैरी किसून घातलेली घोळीची भाजी, कैरीचा कीस घालून केलेला खमंग भात.. मज्जाच मज्जा.
आंब्याच्या पोळ्या पण अशाच ताटात वाळवायला ठेवायची आई. ती पोळी तशी नागपूरच्या कडक उन्हात लवकर वाळायची.. पण तेवढाही धीर निघत नसे आम्हा मुलांना..
नि लहानपणी रोज सकाळी एका मोठ्या प्लॅस्टिकच्या टब मधे पाण्यात भरपूर गावरान आंबे.. हे अगदी छान चोखता येतात... टाकून ठेवलेले असत. दात घासले कि आम्ही भावंडे मुद्दाम जुने कपडे घालून भोवती जमत असू. मग काय, पोट फुटेपर्यंत आंब्याचा रस खायचा. अगदी कोपरापर्यंत ओघळ वहाताहेत रसाचे.. कपड्यांना, तोंडाला रसाचे डाग.. काय नमुने दिसायचो तेव्हा.. अजूनही भारतात गेलो की सार्या बहिणी बाबांनी काढलेले त्या वेळचे फोटो पाहून जाम हसतो.
लग्न झाल्याझाल्या माझ्या पहिल्या सणाला आमरस पुरीचा मेनू होता. सासरी भरपूर मंडळी... तेव्हा मोठ्या दिरांनी असेच टबात आंबे टाकून ठेवले होते. लहानपणीच्या आठवणींनी खूप हसायला आलं होतं.
मात्र सासरी हापूसच आवडता. दिरांच्या नि नवर्याच्या मते हापूसची सर कशालाच नाही.
मी नि माझी जाऊ अस्सल नागपुरी. त्यामुळे आम्ही मुद्दाम म्हणणार.. 'छे बाई, आपल्या नागपूरच्या बैगनपल्ली आंब्याचा रस कसा छान घट्ट, चविष्ट लागतो. हापूससारखा पातळ नसतो..'
नि मग हे दोघं भाऊ चिडवणार,' गाढवाला गुळाची......'
बाकी आठवणींच्या राज्यात मस्त सफर घडवून आणलीस. (धन्स म्हणू का?)
इथले सर्व
इथले सर्व आंबा प्रेमी.... (सर्वांची क्षमा मागुन) मला आंबे अजिबात आवडत नाहीत!
आणि एखाद्याला आंबे न आवडणे हा कसा प्रमाद ठरु शकतो.... याचा हा किस्सा!
मी कॉलेजला असताना आमच्या घरमालकांकडे भाडे द्यायला गेलो होतो..... घरमालक देवरुखचे आणि त्यातुन आंब्याचा सिझन.... घरात पाउल ठेवताच मला संभाव्य धोक्याची जाणीव झाली.... सगळे घर आंब्याच्या त्या टिपीकल वासाने भरुन गेले होते.
भाड वगैरे देवुन होताच मी उठायला लागलो.... तेवढ्यात त्यांनी आत बघुन हाक मारली, अग ए ऐकलस का?...... मी मनाशी म्हणालो आता मेलो.... मी काही बोलणार एव्ह्ढ्यात त्यांचे सुरु झाले.... या वर्षी आंबा कसा मस्त झालाय.... आम्ही किती आंबा लावला होता... इकडे एक खोली आम्ही कशी आंबा साठवण्यासाठीच बांधुन घेतलीय वगैरे वगैरे!
इतक्यात काकू बशीभर आंब्याच्या फोडी घेउन आल्या.... मला आंबा आवडत नाही हे सांगायला मी तोंड उघडणार इततक्यात इति काका : लोकांना आंबा आवडत नाही असं कसं होउ शकत हो?... आता आमच्या लेकाचच कार्ट.... आता एव्ह्ढ घर भरलय आंब्यान अन या नतद्रष्टाला आंबा आवडत नाही म्हणे... नसती थेरं एकेक!.... ते फ्रुटी का बीटी विकत घेउन पितिल पण आंबा आवडत नाही म्हणे!
आता इतक सगळ ऐकल्यावर अस्मादिकांनी तोंडावर आलेली आपली नावड (आपला न-नतद्रष्टपणा सिद्ध करण्यासाठी) आंब्यांच्या फोडी सकट गिळली हे वेगळ सांगायलाच नको!
असो.... हे झाल माझं, पण आमच्या घरी सगळ्यांना आंबे फार आवडतात.... माझा छोटा भाउ तर आंब्याच्या सीझन मध्ये २-४ बनियन एस्ट्रा घेतो.... तो म्हणतो अस कपड्यावर डाग पाडुन घेतल्याशिवाय आंब्यांची मजाच नाही!
सिन्ड्रेला, आंबे आवडत नसले तरी तुझा लेख फार आवडला!
सिंडरेला,
सिंडरेला, मस्तच लिहिलं आहेस गं. तु अंब्यांब्बद्दल लिहील असलस तरी प्रत्येकाला हटकुन आपापल्या लहान्पणाची आठवण आली असणार.
गेले ते दीन गेले----पण खुप श्रीमंती देऊन गेले.
काहीही झालं तरी आईच्या हातची सर कशालाच येत नाही गं.
मग तो तिने केलेला पदार्थ असो , मायेने फिरवलेला हात असो वा रागाउन पाठीत घातलेला धपाटा.
अनघा
अरेच्चा हे
अरेच्चा हे सगळे पोस्ट मी बघितलेच नव्हते.
सुमॉ, आता NC मधे मिळतील का आंबे ? बारामधे मला वाटते १-२ प्रकार तरी मिळत असतील इतके दिवस.
स्वरुप, धन्यवाद. माझी एक शाळेतली मैत्रिण आहे तिला पण आंबे आवडत नाहीत. पहिल्यांदा ऐकुन इतके आश्चर्य वाटले होते.
अनघा, बरोबर आहे. अजुनही घरी गेलो की आमच्या धिंगाण्याला वैतागुन आई रागवली की दिवस सार्थ होतो
अरेच्चा हा
अरेच्चा हा लेखच मी बघितला नव्ह्ता.
मात्र तिथे आम्ब्याची भरपुर झाड आहेत. आम्ही भावंड मे महिन्यात जमलो की आंबे,काजु धुंडाळत फिरत असु. धमाल.
आंबा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय
सिन्ड्रेला मस्तच लिहिलयस. माझ गाव म्हणजे आरे कॉलनी
आई बाबांना वाईट वाटणे ... सेम पिंच.
आज मात्र जुई अजिबात आंबे खात नाही तेव्हा खुप वाईट वाटत. खुप प्रयत्न केला तिला आवडवायचा पण
अजुनही आशा सोडली नाहिये मी
दर वर्षी प्रयत्न करणार..
तु भारतात
तु भारतात आंबे चाखत असशील तेव्हा टाकला होता हा लेख
जुईवर आंबे-प्रयोग करत रहा. आंबा म्हणजे अमृत हे एक ना एक दिवस तिला नक्की कळेल
माझ्या भाच्याला एखाद्या मोसमात आंबेच खायचे असतात तर एखाद्या वर्षी बघत पण नाही. आम्ही पण त्याला "आग्रह" करणे सोडत नाही 
*******
******* आंब्याचा मोसम आहे म्हणुन हा लेख पुन्हा वर आणते आहे *******
जीएस, गिरी,
जीएस, गिरी, आरती केव्हा येताय श्रीरामपूरला? ह्याच मोसमात येणार आहात ना?
ह्यातले बरेच प्रकार आमच्याकडे पण आहेत. पण ह्या वर्षी मोहोर खुपच कमी आहे झाडांना.
झक्कास तोंपासू लेख! मलापण
झक्कास तोंपासू लेख!
हंगामात घातलेली साटं हरताळकेसाठी राखून ठेवते अजून. आणि ती वाळवताना अर्धवट ओली असतात तेव्हा ताटातून उचकून खायलाही धमाल येते. १ ताट आई मुद्दाम उचकायला ठेवते माझ्यासाठी. 
मलापण एवढे प्रकार माहिती नव्हते की! मावशीआजीकडे गावाला गेलो की रायवळचे साटांबे आणायचे पिशव्या भरभरून. साटं घालायला मस्त रस येतो म्हणून साटांबा. माझी कुठलीच हरताळका साटं न खाता गेलेली नाही.
मग आईच्या अजून रेस्प्या असायच्या. कैरी घातलेलं कुळथाचं पिठलं, मेथांब्याचं लोणचं, कोयाडं, उकडांबा, गुळंबा, साखरांबा, चुंदा, आंबेडाळ, पन्हं, गोडं लोणचं लवकर संपवायला, टिकाऊ लोणचं वर्षभरासाठी, आंब्याचा उकडलेला रस गोळा करून ठेवलेला, जास्तीचे आंबे पिळून रस बाटलीत भरून घरच्याघरी कॅनिंग....काय नि काय!
अगदी तोतापुरी वगैरेंचा हंगाम संपेपर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री जेवणं झाल्यावर खायला सतत आंबे! न कंटाळता!
सिंडाक्का, सगळं आठवलं!!! भारी लेख. तुला १००००००....धन्यवाद!
मस्त लेख
मस्त लेख
(No subject)
मस्तच लिहिलयं, आठवणी जाग्या
मस्तच लिहिलयं, आठवणी जाग्या केल्यास माझ्या माहेरच्या हापूस आंब्याच्या झाडाच्या. यावर्षी तिकडे आंबे आहेत पण मी नाही खायला. कुरीयरने मागवता येतात का आंबे? कोणाला माहिती आहे का? सध्या तरी इकडे मॅरेथॉन आंब्यावर तहान भागवावी लागतेय
मस्त...माझ्याही लहानपणच्या
मस्त...माझ्याही लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या. रच्याकने, यातल्या बर्याचश्या आंब्यांची नावं मी ही नाही ऐकलेली.
अगागा.... तोंपासु. सिंडरेला,
अगागा.... तोंपासु.
सिंडरेला, मला तुझ्या लहानपणाचा हेवा वाटतोय.
रुणुझुणू, बघ इथे स्वरुपला
रुणुझुणू, बघ इथे स्वरुपला आंबे आवडत नाहीत. आमच्या गावी एक वर्ष इतका आंबा झाला कि कुणी आले कि आंबे कापून आणते म्हणले की म्हणायचे,भाभीजी,वैसेही जाइये बोलो,आम काटके मत लाना,हम जा रहे है. :स्मितः .सिंड्रेला,खूप मजा वाटली लेख वाचून.
धन्यवाद मंडळी. प्रज्ञा तुला
धन्यवाद मंडळी. प्रज्ञा तुला विशेष धन्यवाद लेख वर आणल्याबद्दल
कसचं कसचं..
कसचं कसचं..
सिंडरेला तुला आवडेलच म्हणुन
सिंडरेला तुला आवडेलच म्हणुन आमच्या घरातल्या आंब्याची एक जात सांगते.
शेपु : एकदम गोड. पण शेपुसारखा उग्र वास. खुप केसर असतो या आंब्यात. आकाराने मुठी सारखा.
दुसर्या काही जाती म्हणजे
लोणची आंबा: हापुसच ज्युनिअर स्वरुप. लोणची घालायला पर्फेक्ट. पिकला कि चोखुन खायला.
खोबरी: खोबर्यासारखाच मधुर चव असलेला.
भोपळी: गोलसर. दोन्ही हाताच्या तळव्यात बसेल एवढा. फुगीर आकार. रस खुप पातळ असतो खरं.
आंब्याची बागच होती. बरीच झाड गेली. ते घमेलीत आंबे घेवुन खात बसणं वगैरे तर आमच्या घरी सेम. आता अगदी थोडी झाड शिल्लक आहेत. पण वडिलांनी आता चार पाच झाड घरासमोरच लावली आहेत. त्यांच्या नातवंडाची सोय असावी.
सिंडरेला झक्कास. माझी पण
सिंडरेला झक्कास. माझी पण आंब्याची बाग आहे. १० प्रकारचे आंबे आहेत. पण ही नाहीत. मला यांचे खाऊन राहीलेले बाठे मीळतील काय.
विजय, तुम्ही कुठे असता ? मी
विजय, तुम्ही कुठे असता ? मी घरी विचारुन सांगेन. यंदा अवेळी पावसाने बराच मोहोर गळाला असं ऐकलं. तरी काही कोयी नक्कीच पाठवता येतील.
सीमा, अंगणात आंब्याचं आणि कडुलिंबाचं झाड म्हणजे ड्रीम कम ट्रू
सिंडरेला मी डोंबिवली ला
सिंडरेला मी डोंबिवली ला रहातो. बदलापूर ला माझी शेती आहे.
हो या वेळी खूपच मोहर जळाला.
सिंडरेला छान दिलीयेस माहीती.
सिंडरेला
छान दिलीयेस माहीती. मस्त...
वलसाडचा हापूस राहीला यात
Pages