'कुणा एकाची भ्रमणगाथा.. फार फार उशीरा म्हणजे अगदी माझी भटकंती सुरु झाल्यानंतर तीनेक वर्षांनी वाचन सुरु केले तेव्हा हाती पडलेले हे पुस्तक.. गोनीदांचे वाचनात आलेले हे पहिले पुस्तक.. त्यांच्यासंगे पुस्तकातूनच नर्मदा परिक्रमा केल्याची अनुभती मिळाली.. या पुस्तकाने भारावून गेलो होतो म्हणूनच सिद्धगड भटकंतीवर ब्लॉग लिहीताना 'दोघांची भ्रमणगाथा' शिर्षकही ठेवले होते.. आमच्या आधीच्या पिढीतले हे अटटल भटके ! त्यांच्याबरोबर भटकंती करणे कदाचित जमलेही नसते.. जमणार तरी कसे.. त्यांच्या भटकंतीला एक झोळी नि पादत्राणे यांची सोबत असावी.. वाट-रस्ते माहिती देण्यासाठी भटकंतीमध्येच पदोपदी भेटणाऱ्या व्यक्ती असाव्यात.. पण आमची सुरवात मुळातच इंटरनेट, उपलब्ध पुस्तके अश्या माध्यमातून माहिती गोळा करण्यापासून होते.. आता आमच्या सोबतीला मोबाईल, एक्शन वा इतर चांगल्या कंपनीचे बूट, भटकंतीला साजेसे कपडे, उत्कृष्ट दर्जाची सॅक, विजार, कॅमेरा इत्यादी सुसज्ज पेहराव असतो.. आता तर चारचाकी वाहनाने थेट पायथ्याचे गावच काय थेट किल्ल्यावर जाताही येते.. त्यामुळे गोनींदा सारख्या व्यक्तीला आदरणीय प्रणाम _/\_ त्यांच्यात नि आमच्यात साम्य असेल तर फक्त छंद.. भटकंती ! त्यातही सह्याद्रीत फिर-फिरणे अगदी जिव्हाळ्याचे.. !
या भटकंतीचा मोह आधीच्या राहत्या घराभोवती असलेल्या सुंदर निसर्गामुळेच झाला होता. त्यात संजय गांधी उद्यान व कान्हेरी गुंफा (नॅशनल पार्क) फार लांब नव्हते.. त्यामुळे पाऊस आला की मग कोणी सोबत मिळाली तर ठीक नाहीतर एकटाच नॅशनल पार्कच्या वाटेला लागायचो.. त्यात सोशल मिडीयाचे युग नुकतेच अवतरलेले.. त्यातून माहिती- फोटो पाहून भटकंतीची आस वाढत गेली.. अशातच मायबोलीवरसुद्धा वावर वाढलेला.. आणि एक दिवस मायबोलीवरील इंद्रा, नील यांच्या जोडीने दुर्गेश्वर म्हणजेच रायगडभेटीचा योग जुळून आला.. झाले.. माझे सीमोल्लंघन झाले.. पहिल्यांदाच सह्याद्रीच्या कुशीत शिरलो.. !
छत्रपती शिवाजी राजे यांचा भवदिव्य राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला हा किल्ला पाहत असताना गुंग होउन गेलो.. अवतीभवतीचा निसर्ग काय तो वर्णावा.. ऑक्टोबर महिन्यातला दुसराच दिवस.. पाऊस परतीला लागलेला.. नुकतेच सुर्यदेव अवतरलेले.. रायगडचा माथा तसाही आसमंताला भिडलेला.. त्यात वातावरण अगदी स्वच्छ.. त्यामुळे अगदी दुरवरचा परिसर दृष्टीक्षेपात होता.. आजुबाजूची सह्यशिखरे या गडापुढे ठेंगी वाटत होती खरी.. पण ह्या शिखरांना खरा साज चढला होता तो शुभ्र सफेद ढगांनी.. आम्हाला कडयावरुन दिसत होते फक्त नि फक्त ढगांची पसरलेली विशालमय लाट.. आणि त्या लाटेला अंगावर झेलणारे सह्यकडे..!! हे दृश्य कायमच काळजात कोरलं गेल.. विलक्षण आनंद झाला.. आणि उमगल की आपल्याला हेच तर सगळ अनुभवयाचं आहे.. निसर्गाच्या सान्निध्यात रहायचे आहे.. इतिहासाच्या पुसट खुणा धुंडाळायच्या आहेत.. आणि यासाठी मग सुरु झाला भटकंतीनामा.. ! आजच्या भाषेत ट्रेकींग..
पाच सहा वर्ष लोटली.. पण भटकंती अखंडपणे सुरुच आहे.. हा किंवा तो डोंगर.. हा गड किंवा तो गड.. अमुकतमुक घाटवाट... बऱ्याचदा असे होते की दैनंदिन जीवनात रमलेले लोकं विचारतात की एवढे उपद्व्याप कशाला ?? यातून मिळतं काय..?? या प्रश्नाचे उत्तर उगीच द्यायचे म्हणून एका वाक्यात देण्यापेक्षा स्मितहास्य दिलेले बरे.. कारण अश्या लोकांच्या 'सुख, आनंद, समाधान..' या व्याख्या नेहमीच्याच पठडीतल्या.. आमच्यासारख्या भटकंतीत रमलेल्या लोकांशी अगदी विसंगत.. थोडक्यात काय तर आम्हा भटक्यांचा पिंडच वेगळा.. !
काय मिळत अस कुणी विचारलं की मनात बरच काही उफाळून येत.. सर्वात पहिलं नाव घ्यायचं तर सोबती.. सोबतीशिवाय ट्रेकला मजाच नाही... भटकंतीची आवड असेलेले एकेक मित्र प्रत्येक ट्रेकमध्ये ह्या ना त्या कारणाने भेटत गेला.. काही तर अगदी जीवा-भावाचे मित्र बनले.. आता कितीही वेळा ट्रेकच्या निमित्ताने जरी भेटलो.. गप्पा रंगल्या... की कुठल्या ना कुठल्या एकत्र ट्रेक केलेल्या त्याच त्याच आठवणी शेअर होतातच.. मित्र बनण्याचे कारणही वेगवेगळे असू शकते.. अशीच एक गोष्ट हरिश्चंद्रगड ट्रेकची.. या गडावर रात्र अनुभवण्याची पहिलीच वेळ होती... नाळीच्या खडतर वाटेने एका ग्रुपसोबत चढून गेलो होतो.. गडावरील गुहा आधीच एका ग्रुपने काबीज केली होती म्हणून उघड्यावर झोपण्याचे ठरले गेले.. डिसेंबरचा महिना.. बोचरी थंडी..माझे जाकीट सुद्धा फिके पडलेले..सोबतीला मित्र सुन्या होता.. तोही स्वेटर घालून कुडकुडतच होता.. झोपेचे खोबरे झालेले.. अश्यातच एकाने पांघरूण म्हणून शाल ऑफर केली.. खर तर ती शाल जेमतेम तिघं पुरतील एवढीच होती.. पण त्याने तू ये झोपू एकत्र म्हणून बोलावले आणि मग ती शाल घेऊन तो, त्याचा मित्र व आम्ही दोघे असे दाटीवाटीने झोपलो..!! पण थंडीचा ज्वर वाढत चालला तशी ती शाल अपुरी वाटायला लागली नि सगळेच कुडकुडू लागले.. शेवटी विझलेली शेकोटी पुन्हा पेटवून काड्या टाकत उर्वरीत रात्र व्यतीत केली..! रात्र सरली.. ट्रेक संपला. पण त्या क्षणाला आमची गट्टी जी जमली ती जमली.. मग लगेच पुढच्या ट्रेकला आपणच जाऊ म्हणून ट्रेकचा प्लान पण केला गेला.. !! असेच मित्र या ना त्या ट्रेकला भेटत गेले.. भटकंतीची आवड फक्त याच निकषावर ऑनलाईन झालेले मित्रही प्रत्यक्षात भेटले.. त्यांच्या सोबतही ट्रेक आखले गेले.. पहिल्याच भेटीगाठीत गाढ मैत्री झाली.. मग दोस्ताना राहिला तो कायमचा..! मग ट्रेकमध्ये वाट शोधताना एकमेकांना केलेली मदत असुदे, एकत्र केलेली खादाडी असुदे वा एकाच ताटात जेवलेले असुदे.. यारी तो बनती है !
आज कोण्या मित्राला गडांची खडानखडा माहिती आहे.. कोण्या मित्राला घाटवाटांची पोथी पाठ आहे.. कुणाला लेण्यांचा शोध घेण्यात स्वारस्य आहे.. तर कुणाला कातळकडे सुळके सर करण्याची आस आहे.. कोणेक मित्र दुर्गसंवर्धनासाठी झटत आहे तर कोणेक मित्र संकटसमयी धावून येणाऱ्या बचावकार्य संघात सामील आहे.. आपल्यासाठी हीच खरी श्रीमंती.. !
भटकंती करताना प्रामुख्याने एक बाब सांगायची तर दुर्गम भागात गडाच्या पायथ्याला वा माचीवर राहणारी माणसं.. त्यांचे नेहमीचीच कौतुक वाटत आले आहे.. भटकंती करताना काय मिळत म्हणाल तर या लोकांची माया मिळणं हेसुद्धा नशीबच.. माझ्या वाट्याला नेहमीच चांगले अनुभव आले.. जितका परिसर दुर्गम तितके लोक जास्त अगत्यशील.. चहा मागितल्यावर नकार कधी मिळालाच नाही.. जमेल तशी मग अगदी कोरी चहा का होईना देण्यात येतो.. भर पावसात एकदा सिध्दगडावर मी व माझा मित्र असे दोघंच गेलेलो.. माचीवर खाण्यापिण्याची सोय नाही असे ऐकून होतो खरं.. पण ढगात गुरफटलेल्या त्या माचीवर एक ताई भेटल्या.. आम्ही जेवणाबाबत विचारले नि त्यांनी आमच्यासमोर पिठलं- भाकरीचे ताट ठेवले.. अशी माणसं कधीच पैसे मागत नाही.. त्यांना आपणहून जबरदस्तीने द्यावे लागतात..
असाच एक आठवणीतला पाहुणचार म्हणजे बितंगाच्या पायथ्याला पोलिस सरपंचाकडे मिळाला होता... गावचा पोलिस सरपंच त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती बरी होती.. पण त्यांनी आम्हाला मुंबईचे पाहुणे म्हणुन दिलेला सन्मान कायम स्मरणात राहील.. त्यांनी आम्हाला कुठे काही कमी पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली होती.. मग प्रश्ण पाण्याचा असो.. जेवणाचा असो.. वा झोपण्याचा. अगदी गडावर जाण्यासाठी गावातला मुलगाही सोबत पाठवलेला.. हे झाले साध्या नि चांगल्या घरातला पाहुणचार.. पण 'तोरणा- राजगड' ट्रेक करताना पालीखिंडीत एका खूपच साध्या धनगरवाडयात काढलेली रात्र जास्त जवळची वाटली.. आम्हाला फक्त झोपतेवेळी घरात घ्या या आमच्या विनंतीला ते बुच़काळ्यात पडले होते पण नंतर होकार दिलाच.. होकार देण्यासाठी उशीर का केला असावा याचे उत्तर झोपतेवेळी घरात शिरल्यावरच कळले.. एकाच छपराखाली गुरं, बकऱ्या, कुत्रा, कोंबडया, मांजर आणि घरात दोन लहान मुल व एक छोटं बाळं धरुन सात-आठ माणसं.. इतक मोठं कुटूंब सामावल होत.. तरीसुद्धा आम्हा पाचजणांसाठी त्यांनी जागा दिली होती.. घरात वीज नाही वा खोली प्रकार नाही.. अगदी गाय-वासरु पासून दिडेक फुटावर झोपलो होतो.. !! खऱ्या अर्थाने मोठं कुटूंब होत ते..! अशी माणसं या ना त्या भटकंतीमध्ये भेटत राहतात नि बरच काही शिकवून जातात.. सुधागडवरील वाड्याजवळ राहणाऱ्या प्रेमळ आज्जी तर ट्रेकर्सलोकांमध्ये फेमसच आहेत.. या सगळ्यांचे जीवनच मुळी कष्टाचे.. पाण्यासाठी कुठल्यातरी कपारीतला झरा यांनी शोधून काढलेला असतो.. त्या पाण्याची चव अमृततुल्य असते.. पण उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी झगडावे लागते.. तर पावसात मोठया सरी वा वीज कोसळण्याचे दडपण घेउन जगायचे.. माचीवरच्या वाडीतले रहिवासी तर पावसात दरड कोसळणे, दवाखाना नसणे, राशनसाठी दोन तीन डोंगर चढ- उतार करणे अश्या अनेक समस्यांना तोंड देत जगत आहेत.. इतके सोसुनही ते हसतमुखाने जगत असतात.. ! आणि हो 'पुन्हा या कधीतरी' असे आमंत्रणही विनासंकोचपणे देतात.. जीवन जगण्याचा खर धडा यांच्याकडूनच घ्यावा.. !
माचीवर राहणारी असोत वा अगदी डोंगराला खेटून पायथ्याशी राहणारी असोत.. या माणसांशी आपण स्वतःच जुळवून घेतले पाहीजे.. म्हणुनच तर आमच्या खादाडीत त्यांनाही सहभागी करुन घेतो.. लहान मुलं असली तर मिसळायला वेळ लागत नाही.. चिल्लर पार्टीबरोबर थोडा का होइना पण वेळ दिला की त्यांची हुशारी लक्षात येते.. मग तोरणा- राजगड ट्रेक ला भेटलेला धनगरवाड्यातील चाणाक्ष 'राम' असो किंवा 'निमगिरी' किल्ल्यावर चढताना आपणहून सामील झालेला जबाबदार 'सचिन' असुदे.. दोघांची वयं जवळपास सारखी.. पण वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले.. एकाला आपल्या भोवती असलेल्या सृष्टीबद्दल ज्ञान तर एकाला ऐकायला कमी येत असूनही सराईत गाईडसारखे बोलण्याचे कौशल्य अवगत होते.. बाकी लहान मुलं म्हटली की ह्यांची धमालमस्ती सुरुच असते.. आपापल्या परिने त्यांचे खेळ रंगलेले असतात.. नमुद करायचे तर 'आजोबा' डोंगराच्या पायथ्याला लहान मुलांसोबत गोटया खेळलेलो.. ती लहान पोरं मस्तच्या मस्त नेम धरुन आम्हाला लांब फुटवत होते.. ! दुसरी गंमत सांगायची झाली तर पेबच्या कुशीत एका टेकाडावर पोरांनी पावसाचा फायदा घेउन बनवलेली चिखल-घसरगुंडी.. आपल्या शहरी उद्यानातील घसरगुंडीला लाजवेल इतकी लाजवाब नैसर्गिक घसरगुंडी त्यांनी शोधली होती.. !
खरच भटकंतीमध्ये आनंदाचे विविध पैलु दडलेले असतात.. आपल्याला फक्त ते उपभोगता आले पाहिजे.. फक्त उगीच पळापळ करून डोंगर किल्ला गाठण्यात काहीच अर्थ नाही वा आनंद मिळत नाही... उलट चुकलेल्या वाटेवरून शोधाशोध करत मुळ वाटेवर पुन्हा येतो तेव्हा होणारा आनंद जास्त जवळचा.. थकवा येतो शक्ती खर्ची होते खरी.. पण अनुभव दांडगा होतो.. नशीब चांगलं असेल तर सगळ सुरळीत पार पडतं.. वाट न चुकण.. राहण्याची सोय.. वाटेकरू भेटण वगैरे वगैरे.. पण कधी कधी सुरवातीपासून चुकायला सुरवात जी होते ती अगदी भटकंती संपेपर्यंत सुरूच राहते.. असेच एकदा काळोख्या रात्री लोकांची झोप मोड करत अख्खे माहुली गाव पालथे घातले होते.. एवढ होऊन पुन्हा सकाळी गड चढताना चुकीची वाट पकडलेली..! कोहोजगडाला तर आम्ही कातळकडयालाच चुकून हात घातला होता.. गड एकीकडे, चढलो एकीकडे..! वेळीच धोका ओळखला नि मोठी कसरत करत खाली उतरलो होतो..! पावसाला न जुमानता केलेला गोप्या घाट तर सर्व सहभागी ट्रेकर्सचा एक अविस्मरणीय ट्रेक होऊन गेला.. कानांना बधीर करणारा तो धबधब्यांचा आवाज.. धुक्यातून- जंगलातून वाट काढत चढून गेलेलो घाट..
आणि मग आडवी आलेली एका प्रलयकारी सदृश नदी.. तिच्या फुगीर पात्राच्या कडे- कडेनेच चालू ठेवलेली पायपीट.. आणि अंधार पडता पडता अगदी शेवटच्या क्षणी भेटलेले शेतकरी.. व त्यांच्या मदतीने नदी पार केल्यानंतर एकमेकांना मिठी मारून व्यक्त केलेला आनंद.. !! जिद्द- साहस - जोखीम यांची योग्यप्रकारे सांगड घातली की ट्रेक भन्नाटच ठरतो..!
कितीही तंगडतोड करा.. घाम गाळा.. पण एकदा का डोंगरमाथा वा किल्ला गाठला की आपण सृष्टीच्या अधीन होतो.. ध्येय साधल्याचा आनंद असतोच.. पण मग आजुबाजूचा परिसर स्वस्थ बसू देत नाही.. गड किल्ले म्हटले की तटबंदी, भक्कम बुरुज, कातळात कोरलेल्या पायऱ्या, बालेकिल्ला, गुप्तमार्ग, पाण्याच्या खोदीव टाक्या, पुष्करणी असं बरच काही धुंडाळायच.. प्रत्येक गडाच वेगवेगळ वैशिष्ट्य..
असच काहीस डोंगरदरीच्या बाबतीत.. प्राचिनकाळी खोदलेल्या लेण्या, गुहा अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठीकाणी विखुरलेल्या आहेत..सह्याद्री रांगेचा आवाकाच पाहीला की "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा " हे शब्द आपसूकच ओठावर येतात.. गडकिल्ले म्हणा वा लेण्या असोत.. त्याकाळच्या कारागीरांबद्दल काय बोलायचे .. त्यांना खरच सलाम !
यथेच्छ भटकंतीला सृष्टीसौंदर्याची फोडणी मिळाली की सोने पे सुहागा..! सुर्योदय वा सुर्यास्त.. दोन्ही वेळा सृष्टीस साज चढवणारी असते...! सर्वोच्च शिखरांपैंकी एक व महाराष्ट्रातील सर्वोच्च असा एक किल्ला.. गारठलेल्या पहाटेच त्या साल्हेर किल्ल्यावरील परशुराम मंदिर चढून गाठले होते फक्त सुर्योदय पाहण्यासाठी.! मग धुक्यात धुंदमंद झालेल्या भव्यदिव्य सह्याद्रीरांगाना उब देत पूर्व क्षितिजावर भानुराज प्रकट होतो.. आणि एका अविस्मरणीय सूर्योदयाचे साक्षीदार बनल्याचा आनंद मिळतो..!!
अशीच एक राजगडावरची अविस्मरणीय संध्या.. पावसाने नेहमीप्रमाणे सुरवातीला हजेरी लावून दडी मारलेली.. दिवसभर स्वच्छ नि स्पष्ट वातावरण एव्हाना धुक्यात विलीन झालेले.. दाटून आलेल्या ढगांमुळे काळोखाचे साम्राज्य लवकर पसरण्याची चिन्ह दिसू लागली होती.. सुर्यास्त काही नजरेस पडणार नव्हता.. पण अचानक तुफानी वाऱ्याचे आक्रमण झाले... पद्मावती माचीभोवताली वेढा घालून बसलेल्या ढगराशींना गदागदा हलवले गेले.. अकस्मात आकाशात पश्चिमेकडून केशरी रंग उधळले गेले.. पाहीले तर तोरणाच्या झुंजारमाची पल्ल्याड भानुराज अस्तास जात होते.. ! काही मिनीटांपुर्वी दाटून आलेल्या काळोखी छटेला धुडकावण्याचे दिव्यकाम भानुराजांनी क्षणात पार पाडले होते..! अस्तास गेल्यानंतरही त्या दिव्यकामाचे पडसाद बराच वेळ आकाशात घुटमळत राहीले.. नि एक अनोखी रंगांची मैफल अनुभवता आली.. ! एका अद्भुत सुर्यास्त सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले _/\_
ट्रेकवर असताना अश्याच गोष्टींचा ध्यास मला लागलेला असतो.. पण असं दृश्य नेहमीच नजरेस पडते अस नाही.. त्यासाठी सगळं काही जुळून यावं लागत.. निसर्गाच्या मनात असाव लागत.. आपण फक्त भटकत रहायचे.. काही ना काही पदरात पडतच.. मग ते आकाशातून कळसुबाई, अलंग-मदन-कुलंग अशा उंच डोंगररांगेवर मारलेला टॉर्चचे विहंगमय दृश्य पट्टागडावरुन पाहिलेले.. वा धोडपचा माथा ढ्गांनी जवळपास गिळंकृत केल्यामुळे सह्याद्रीतले जणु हिमनगच वाटलेले...!
असेच काही वर्षापूर्वी रतनगडच्या वाटेवर रात्री भंडारदऱ्याजवळ अंधारातच आमच्या सवंगडयांची गाडी मागून येण्यास उशीर झाला म्हणून आमची गाडी कडेला थांबवलेली.. टॉयलेटसाठी अंधारात थोडं पुढे गेलो तर समोरच्या काळोख्या दरीत अचानक एकसाथ चांदण्या चमकल्या.. क्षणभर चाट पडलो.. पण काही सेकंदातच पुन्हा अंधार.. आणि पुन्हा दोनेक सेकंदांनी एकाच वेळी तारका चमकल्या.. एव्हाना कळुन गेले की हा तर काजव्यांचा अविष्कार ! पावसाच्या आगमनाची वेळ होती ती.. रोषणाई केल्याप्रमाणे काजवे कधी पाहिले नव्हते असे नाही.. पण संपुर्ण दरीच्या दरी एकाच वेळी काजव्यांनी उजाळते काय नि एकाच वेळी अंधारते काय हे पहिल्यांदाच अनुभवले होते.. !! धन्य झाहलो पाहून.. माझ्या नशिबी असे सुंदर क्षण आले हे माझे भाग्यच समजतो.. प्रत्येक भटक्याने असं काही ना काही अनुभवलेलं असत.. मग काहींना कोकणकड्यावरून दिसलेले सर्वश्रुत असे इंद्रव्रज असो.. तोही क्षण कधी ना कधी भटकताना येईलच असा मला विश्वास आहेच..
असे सुंदर क्षण सोडले तर बाकी आमची नजर फुलझाडांवर, रानफुलांवर व गुंजन करत मुक्तपणे विहारणारे पक्षी यांच्यावर देखील असतेच.. विविध प्रकारची रानफुलं आमच्या पाउलवाटेवर डोकावत असतातच.. पावसाळा हा त्यांचा आवडता ऋतू .. पण मला खरी कमाल वाटते जेव्हा उनामुळे करपटलेल्या जमिनीत, सुकून पिवळ्या पडलेल्या गवतात एखाद पिटुकलं पण सुंदर रंगाच रानफुल वाऱ्यावर डोलताना दिसत.. पक्षी म्हणाल तर खाटिक, सूर्यपक्षी, सातभाई, बुलबुल साद घालतातच.. पण कौतुक वाटते ते दरीत भिरभिर करत विद्युतवेगाने झेपावणाऱ्या पाकोळ्यांचे.. ! कौतुक वाटते ते आकाशात हवेला न जुमानता 'स्थिरप्रज्ञ' अवस्थेत दिसणाऱ्या कापशी घारचे.. ! सुधागडला टाक्यातून पाणी भरत असतानाच समोर जंगलात आपली लांबलचक पांढरी शेपटी मिरवत उडताना दिसलेला स्वर्गीय नर्तक अजूनही लक्षात आहे.. !
मघाशी म्हटल्याप्रमाणे जिद्द- साहस - जोखीम यांची योग्यप्रकारे सांगड घातली की ट्रेक करणं सोप्प पडते.. परिस्थितीशी जुळवून घेण हा अलिखित नियम असतोच.. पण डोंगरखोऱ्यात भटकताना कधी कधी धोके सुद्धा उद्भवतात.. पावसाची रिमझिम सुरु झाली की आपसूकच हिरवा सह्याद्री बघण्याची ओढ लागते..
पण हाच पाऊस अचानक रौद्ररूप धारण करतो नि मग कडेकपारीतून फिरणे धोक्याचे होऊन बसते..! भीमाशंकर व्हाया शिडी घाट हासुद्धा खास पावसात केला जाणारा ट्रेक.. पण याच ट्रेकला मी उंचावरून फुटबॉलच्या आकाराचा दगड बरोबर दोघांच्या मध्ये पडून फुटताना पाहिला होता.. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली होती..! अश्याच एका पावसाळ्यात आम्ही पेबला जाताना वाट चुकलो होतो.. मी, बायको व माझा मित्र रोमा असे तिघच.. बरेच जंगलात घुसलो.. पण जेव्हा कळलं वाट चुकली तेव्हा रोमा ने शोर्टकट मारायच्या नादात उजवीकडच्या कातळकड्याला हात घातला.. जमत असेल तरच वरती सरक अस दोन- तीनदा बजावूनदेखील तो ऐकला नाही.. आणि एका टप्प्याला तो पुरता फसला.. खाली उतरणे शक्य नाही हे समजताच धडपडत वरती सरकला नि त्या नादात भलामोठा खडकचेंडू खाली सोडला.. त्याच्या झटापटीवर डोळा होता म्हणून लागलीच बायकोला घेउन बाजूला सरकलो.. !! नि तो चेंडू काटेरी रान तुडवत दरीत गेला.. ! रोमाच्या या पराक्रमामुळे त्याला अजुनही लाखोली वाहतोच.. कारण ह्याने माझ्या बायकोसमक्ष नसते उपद्व्याप केले होते ज्याचे प्रायश्चित मला नंतरच्या कित्येक भटकंतीसाठी घराबाहेर पडताना मिळत राहीले..!
भटकंती करताना तुम्हाला तुमच्या मर्यादा माहिती हव्यात.. गाफील राहून चालत नाही.. चांदण्यात भटकणं हे कल्पनेत कितीही चांगलं वाटत असलं तरी मी तो नाद केव्हाच सोडून दिला आहे.. 'नाईट ट्रेक' या इंग्लिश शब्दात खूप थरार वगैरे वाटत असले तरीसुद्धा अंधार होण्यापुर्वीच डोंगरमाथा गाठणं नि मग मिटट अंधारात एकाच जागी बसून सुपाचे झुरके मारत आकाश न्याहाळण हेच मला उचित वाटतं.. माझे असे 'नाईट ट्रेक' फार नाही.. नावाला दोन-तीनच झालेत.. त्यात चैत्र पौर्णिमेचे औचित्य साधून केलेला गोरखगडच काय तो आवडला.. बाकीच्या ट्रेकपैंकी दोनवेळेला विषारी साप आडवे आले.. !! एक नागेश्वरहून चोरवणे वाट अंधारात उतरताना.. टॉर्च घेउन उतरत होतो पण ग्रुपमध्ये एक नवशिक्या आलेला जो अंधाराला आधीच टरकलेला.. त्यात दिवसभरच्या तंगडतोडीने दमला होता.. चालताना नेमका त्याचा पाय पाउलवाटेच्या पलिकडे पडला नि तिथे जवळपास असलेल्या फुरसंने जोरदार 'हिस्सस्स ' आवाज करत विरोध दर्शवला.. त्या शांततामय अंधारात तो आवाज काळजात चिर पाडून गेला.. त्याप्रसंगी लिडवर असलेला माझा मित्र सुन्याजवळ टॉर्च होती म्हणुन नशिबाने विषारी दंशापासून बचावला..! दुसरा प्रसंग रात्रीचा नाही म्हणता येणार पण उजाडण्यापुर्वीच तुंग चढायला घेतलेला.. मागच्याकडे टॉर्च होती त्याच प्रकाशात मी त्याच्या पुढे चालत होतो.. पण अंधार जरा जास्तच वाटला म्हणुन त्याला पुढे घेतले.. दोन- तीन पावल पुढे गेलो नि त्या मित्राने पुढचे पाउल टाकणार तोच चमकून मागे उडी घेतली.. मण्यार नावाचा विषारी साप अगदी आरामात बिनधास्त आपली पाउलवाट क्रॉस करत होता.. !! तेव्हापासून ठरलं उगीच रात्री या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वाटेत आपण जायचं नाही.. ! ( सापाला पाहूनच आत्मविश्वास डळमळीत होतो तो भाग वेगळा.)
भटकंती म्हटले की अश्या थरारक घटना पण घडतातच.. त्यातूनही शिकायला मिळते.. अनुभव दांडगा होतो.. एक आत्मविश्वास मिळतो व पुढील भटकंतीसाठी अधिक सज्ज राहता येते.. नव्या भटकंतीला नव्या दमाने सामोरे जाता येते..
आतापर्यंत बरच फिरलोही असेन पण तरीही सह्याद्रीरांगेच्या भव्यदिव्य विस्तारापुढे अगदी नगण्य आहे.. आतापर्यंत किती किल्ले झाले, किती फिरलो याचं मोजमाप लक्षात ठेवण्यापेक्षा आतापर्यंत काय काय अनुभवलं, काय शिकलो हाच खजिना मला जास्त मोलाचा वाटतो.. बरेच जण 'अरे आवड आहे पण वेळ नाही' अश्या सबबी देउन भटकंतीच्या भानगडीत पडत नाही.. पण आम्ही आवड आहे म्हणूनच खास वेळ काढतो व डोंगर-किल्ले भटकायला मोकळे होतो.. म्हणूनच ट्रेक ठरला की घरच्यांची नापसंती ओढावून, वेळप्रसंगी कामावर सुट्टी घेउन आम्ही बाहेर पडतोच.. ठरलं की ठरलं.. मग कुठे जातोय हेसुद्धा कधी कधी ठरलेले नसते.. पण सह्यभटकंतीला जातोय हे मात्र पक्के असते.. मग एकाच ठिकाणी जायची दुसरी वेळ असेल वा नव्या ठिकाणी जायचे असेल तरी नविन काहीतरी सापडतच.. फक्त डोळस भटकंती हवी..! मग सह्यभटकंतीसाठी केलेला प्रत्येक ट्रेक या ना त्या कारणासाठी स्मरणीय ठरतोच.. रोजच्या कामाची मरगळ निघून एक नवी स्फुर्ती मिळते.. मनमोकळा श्वास अगदी पोटभरुन घेता येतो.. रोजच्या दाटीवाटीन असलेल्या गर्दीला मागे सोडून इथे मिळणारा निवांत एकांत जास्त समाधान देउन जातो.. बाकी भटकंतीचे म्हणाल तर निसर्ग सोबतीला आहे म्हटल्यावर कितीही आडवाट आली तरी पुढे सरावण्यास डोंगर-कडेच हात पुढे करतात.. म्हणूनच गडकिल्ल्यांच्या साक्षीने निसर्गसृष्टीत मुक्तविहार करताना जास्त रमतो मी.. !! सह्यभटकंतीमध्ये रमतो मी..!
वाह!! यो, कसलं सुरेख
वाह!! यो, कसलं सुरेख लिहिलंयस.. पुढे मागे एक छान से पुस्तकच लिही इतकं इंटरेस्टिंग मटिरिअल आहे तुझ्याजवळ. अनुभवलेले कसले थरारक क्षण , भेटलेले विलक्षण लोकं .. फार फार आवडलं.
ग्रेट, ग्रेट. फार सुंदर लेख,
ग्रेट, ग्रेट. फार सुंदर लेख, सुंदर फोटो.
काही काही ठिकाणी वाचतांना अंगावर अगदी काटा आला.
जुगजुग जिओ मित्रा! अशक्य भारी
जुगजुग जिओ मित्रा!
अशक्य भारी लिहिलंयस. वाचताना अनेकदा अगदी अगदी झालं
उडीबाबा घाल ना लेखात म्हणजे परिपुर्ती होईल
किती सुंदर लिहिलेस यो
किती सुंदर लिहिलेस यो दगडया!!!
यो,खूपच सुरेख लिहिलयस. तुझं
यो,खूपच सुरेख लिहिलयस. तुझं सह्यभटकंतीवरचं आतोनात प्रेम तुझ्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतय.आणि फोटोजही एकदम समर्पक.
यो, किती सुरेख लिहिलस रे !
यो, किती सुरेख लिहिलस रे !
वाह, सुरेख. काय बोलू ? शब्दच
वाह, सुरेख. काय बोलू ? शब्दच नाहीत. असं वाटलं कि यातल्या प्रत्येक शब्दाबरोबर मी त्या त्या ठिकाणीच चालतेय आणि जगतेय.
भन्नाट ..... वाचताना मलाही
भन्नाट ..... वाचताना मलाही बसल्या बसल्या ट्रेक केल्याचा अनुभव आला.....या वर्षी सिंधुदर्गात द्या दोन दिवस ...
300 - 350 फुटाच्या धबधब्या खाली नेऊन उभा करतो,
अर्थात 3 - 4 तासाच्य तंगड-तोडी नंतरच
मस्तच रे य़ोग्या. निदान तू आणि
मस्तच रे य़ोग्या. निदान तू आणि इंद्राने तरी लेख टाकलास. मला वेळच नव्हता. हर्पेन माफी असावी!
डोंगरदऱ्यांमध्ये मिळणाऱ्या आदरातिथ्याबद्दल माझीही एक आठवण.
मोकळा वेळ असल्याने गेल्यावर्षी कळसुबाईला जाण्याचा बेत आखलेला. हो-नाही करता सगळेच कट झाले आणि उरलो एकटाच. कळसुबाईवर माणसांचा वावर असल्याने एकट जाण्यात काही वावगे वाटले नाही. शनिवारी निघण्यास उशीर झालेला, त्यामुळे रात्री साधारण ८.३० ला कसाऱ्याला पोहोचलो. कसाऱ्याहून रात्री उशिरापर्यंत राजूरला जाण्यासाठी गाड्या असतात याची माहिती मिळाली होती. राजूर गाडीने गेल्यास थेट कळसुबाईच्या पायथ्याशी बारी गावात उतरलो असतो. अन्यथा घोटीला जाऊन परत दुसरी काहीतरी व्यवस्था करून बारी ला जावे लागले असते.
कसाऱ्याला उतरल्यावर एसटीची चौकशी करू लागलो तर कोणीही सांगण्यास तयार होईना, ज्या दुकानासमोरून एसटी सुटते तोही काहीच सांगण्यास तयार होईना. वास्तविक कसाऱ्याहून नाशिक-घोटी वगैरे ठिकाणी जाण्यासठी जीप सुटतात आणि जीपचालकांची दादागिरी चालत असल्याने कोणीही माहिती देत नाही. रात्रीचे साडेनऊ वाजलेले, प्रवासीही कमी होत चाललेले, तेंव्हा ठरवले कि घोटीपर्यंत जाऊया, तिथून काहीतरी सोय होईल. शेवटी एक जीपवाला घोटीपर्यंत सोडण्यास तयार झाला. नाईलाज होता कारण हि जीप सोडली असती तर परत दुसरी जीप तासाभराने मिळाली असती आणि घोटीवरुन पुढे जाण्यासाठी गाडी मिळण्याची शक्यता धुसर झाली असती.
जीपवाल्याने सुद्धा रात्रीच्या काळोखात नाशिक हायवेवर सोडले. तिथून काळोखातच हायवे पार करून घोटी गावातल्या छोट्या गल्ल्या पार करीत एसटी स्टेंड गाठले. गावकरी पण एव्हढ्या रात्रीचा हा कोण म्हणून विचित्र नजरेने पाहत होते. त्यात माझा चेहरा नेपाळी लोकांसारखा, मनात आलं, चोर समजून चोप द्यायचे. जवळपास ११ वाजत आलेले, एसटी स्टेंडवर दोनचार गावगुंड आणि मी धरून आणखी एक प्रवासी होता. तो राजूरला जाणारा होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर कळले कि एक एसटी आहे, ती कसाऱ्यावरूनच येते. हाय रे कर्मा! म्हणजे एसटी असूनसुद्धा मला कसाऱ्याला कोणीही माहिती दिली नव्हती. थोडयावेळाने एसटी आली आणि जीव भांड्यात पडला. एसटी नसती तर रात्र काढण्यासाठी एखादा लॉज गाठावा लागला असता. नशीब अगदीच रुसले नव्हते.
साधारण बारा वाजता बारी गावात उतरलो, आता रात्री झोपण्यासाठी गावातली शाळा शोधायची होती. तेव्हढ्यात गाडीतून एक काका पण उतरले होते. मी फाट्यावरून गावाच्या दिशेने निघालो तेव्हढ्यात त्या काकांनी मला हाक मारली आणि कुठे चालला आहेस म्हणून चौकशी केली. मी झोपण्यासाठी शाळा पाहतोय सांगितल्यावर ते थोडावेळ काहीतरी विचार करू लागले. मग त्यांनीच मला त्यांच्या पाठोपाठ येण्यास सांगितले. पण आम्ही गावाच्या दिशेने न जाता मुख्य रस्त्यावरूनच चालू लागलो. १००-१५० पावलं चाललो असेन ते एका घरापाशी थांबले. हे त्यांच घर होत आणि त्यांनी मला रात्री त्यांच्या घरात मुक्काम करण्याची विनंती केली. मी म्हटलं, 'मी शाळेत झोपतो', पण त्यांनी मनाई केली कारण पावसाळ्यात एव्हढ्या रात्री गावात एकट फिरण्यास सुरक्षित नव्हत. मग मी पण तयार झालो.
घरात प्रवेश करताच, एका बाजूला स्वयंपाकघर आणि दुसऱ्या बाजूला दोन बैल बांधलेले होते. गृहलक्ष्मी जागी झाली होती, त्यांनी मला बसायला खुर्ची दिली. घरधन्याला आणि मला अशी दोन जेवणाची ताट भरून आणली. मी नाही म्हणत असताना सुद्धा आग्रहाने जेवायला बसवले. ते काका कल्याणला रेल्वेमध्ये कामाला होते आणि दर शनिवारी आपल्या घरी यायचा त्यांचा शिरस्ता होता. घरधनी आठवड्यातून एकदाच घरी येतात म्हणून गृहलक्ष्मीने जेवणाचा बेतही चांगलाच आखला होता. हात धुऊन आत आल्यावर त्या काकांनी मला झोपण्याच्या खोलीपर्यंत यायला सांगितले. तिकडे पाहतो तर त्यांचे संपूर्ण कुटूंब एका रांगेत झोपलेले होते आणि त्या काकांनी माझेही अंथरूण तिथेच टाकले होते. मलाच लाजल्यासारखे झाले.
मी त्यांना विनंती केली कि मी माझ अंथरूण घेऊन आलो आहे (Sleeping bag) आणि इथेच स्वयंपाकघरात बैलांच्या समोरच झोपतो. हो-नाही करता त्यांनी एकदाची परवानगी दिली. सकाळी मी उठण्याआधीच त्या गृहलक्ष्मीने माझ्यासाठी चहा करून ठेवला होता. ना ओळख ना पाळख, पण त्या काका-काकूंनी रात्रीचा आसरा देऊन माणुसकीचा झरा असाच जिवंत राहू दे चा संदेश मला दिल्याचा फील आला.
सुनटुन्या - मस्त आठवण
सुनटुन्या - मस्त आठवण जागवलीस. सह्याद्रीच्या लेकरांचे हिमालयापेक्षा विशाल हृदय अनेकदा अनुभवलंय. अशा माणसांमुळेच चांगुलपणावरचा विश्वास अजूनही टिकायला मदत होते.
यो लेका...कसला जबराट
यो लेका...कसला जबराट लिहीलंयस....
अप्रतिम लेखन आणि तितकेच समर्पक फोटो....वाह दिल खुष झाला....
आणि एवढे सगळे आहे आणि यो ची ट्रेडमार्क उडी नाही आणि मेळाव्याबद्दल काही नाही....
चॅम्पा, तू का लिहिनास मुदत
चॅम्पा, तू का लिहिनास
मुदत आहे अजून आजचा दिवस
नै रे मी काय बापडा लिहीणार
नै रे मी काय बापडा लिहीणार यासमोर....
दगडूने सिक्सर मारलाय
यो अरे काय अफाट सुंदर लिहील
यो अरे काय अफाट सुंदर लिहील आहेस. मनातल पुर्ण लिखाणात उमटल आहे. फारच सुंदर लेख.
यो.. सुंदर, अप्रतिम
यो.. सुंदर, अप्रतिम मनोगत..
तुझ्या सारखे जागरूक सह्यमित्र लाभले हे आमचे भाग्य समजतो.. /\
खुप मस्त लिहिलयं यो.. मीपन
खुप मस्त लिहिलयं यो..
मीपन जाऊन आली चित्रात जरा वेळ
किती सुंदर लिहीलयं. दोन
किती सुंदर लिहीलयं. दोन वेळा वाचलं तरी समाधान नाही झालयं.
यो... जबरी
यो...
जबरी लिहिलंस...
भटकंतीदरम्यानच्या सर्व अनुभव, भावना अगदी मनाला भिडतील आणि भटकंती न करणाऱ्यालादेखील अगदी सहज कळतील अशा शब्दात ते तू इथे मांडलायस...
सुंदर लेख _/\_
@ फक्त डोळस भटकंती हवी..! मग सह्यभटकंतीसाठी केलेला प्रत्येक ट्रेक या ना त्या कारणासाठी स्मरणीय ठरतोच.. रोजच्या कामाची मरगळ निघून एक नवी स्फुर्ती मिळते.. +++111
सुंदर, बस्स एव्हढंच लिहितो
सुंदर, बस्स एव्हढंच लिहितो
यो! जबराट लेख एकदम!!
यो! जबराट लेख एकदम!!
यो... जबरी
यो...
जबरी लिहिलंस...
भटकंतीदरम्यानच्या सर्व अनुभव, भावना अगदी मनाला भिडतील आणि भटकंती न करणाऱ्यालादेखील अगदी सहज कळतील अशा शब्दात ते तू इथे मांडलायस...
सुंदर लेख _/\_
@ फक्त डोळस भटकंती हवी..! मग सह्यभटकंतीसाठी केलेला प्रत्येक ट्रेक या ना त्या कारणासाठी स्मरणीय ठरतोच.. रोजच्या कामाची मरगळ निघून एक नवी स्फुर्ती मिळते.१११११११११
भटकत रहा ...... लिहीत रहा......
दगड्या .. भले शाब्बास रे
दगड्या .. भले शाब्बास रे ....
आणी निषेध पण ...क्यामेरच्या ब्यागेसकटं सगळ सामान उचलायला तयार असुन मला जाताना सांगत नाहेस , एकटा निघतोस....
धन्यवाद मंडळी सूनटुन्या..
धन्यवाद मंडळी
सूनटुन्या.. मस्त आठवण.. लेख लिहिला असतास तर अजून काही वाचायला मिळालं असत..
लेख खूप आवडला .
लेख खूप आवडला .
सुपर्ब!!!! मस्तच लिहिलंयस यो.
सुपर्ब!!!!
मस्तच लिहिलंयस यो. खुप आवडलं.
वन ऑफ युवर बेस्ट!!!!!
खूपच मस्त अनुभव कथन. वाचून मन
खूपच मस्त अनुभव कथन. वाचून मन एकदम भूतकाळात गेले. बाकी तिथे राहाणार्या लोकांबद्दल अगदी सहमत. मलाही कधीच वाईट अनुभव नाही आला.
यो. खरंच सुंदर लिहिलंयस! तू
यो. खरंच सुंदर लिहिलंयस! तू लिहिलेल्या प्रत्येक प्रसंगात मी स्वत:लाही पहात होतो. शेकडो आठवणी आहेत.. त्या जाग्या केल्यास. संजीवनी म्हणजे अजून कांय असते!..
उड्यांची व खादाडीची थिमही यायला हवी होती.
क्या बात है यो !!! खरंच
क्या बात है यो !!! खरंच सांगतो…यार डोळ्यात पाणी आणलंस !!! कितीतरी किस्से….सुखद धक्के, गावातल्या स्थानिक मित्रांबरोबर जमलेल्या मैफिली…शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची एखादी गोष्ट त्यांना सांगताना त्यांच्या डोळ्यात फुललेला अभिमानरूपी अंगार…आपण किल्ल्याचा फक्त मार्ग विचारला असता आग्रहाने जेवायला बसवून प्रेमाने खाऊ घालणारे निर्व्याज गावकरी,कधी दोस्तांच्या मदतीने पेटवलेली शेकोटी आणि त्यावर खदखदलेली वाफाळती खिचडी असो किंवा भर पावसात नखशिखांत भिजून आल्यावर आपली गरज ओळखून हातात आपसूक आलेला चहाचा कप असो…एखादी अजाणतेपणी चुकलेली वाट…जीवाची झालेली घालमेल… व्यवस्थित वाट सापडल्यावर झालेला आनंद आणि त्या सह्यशिखराच्या माथ्यावरून दिसणारं अपूर्व दृश्य पाहून ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा असोत !!! किती किती लिहावं…हा जन्म पुरायचा नाही !!!
सह्याद्री आहे म्हणून आपण आहोत हेच खरं !!
यो राॅक्स.... छान लिहिलय....
यो राॅक्स.... छान लिहिलय.... जुन्या स्मृती जाग्या झाल्या. ज्या वेळी आम्ही ट्रेकिंगला जायचो तेव्हा कॅमेरे नसायचेच कोणाकडे. पण तुमचे फोटो बघुन पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
आमच्या ऑफिसच्या लागोपाठ 2 वर्षीच्या ट्रीप्स मुली बाळींसकट गोरखगडावर काढलेल्या त्याचीही आठवण आली.
सुंदर लिखाणाबद्दल शुभेच्छा....
धन्यवाद सर्व भटक्यांना
धन्यवाद सर्व भटक्यांना आपापली केलेल्या भटकंतीची आठवण झाली त्यातचं समाधान व इतरांनाही क्षणभर का होईना सह्यभटकांतीचा प्रत्यय आला यातच आनंद _/\_
सह्यद्रीमित्र.. तुझा प्रतिसाद पाहून त्याऐवजी लेख आला असता तर आमच्यासाठी एक मेजवानीच झाली असती..
Pages