वृत्तबद्ध कविता - भारती..

Submitted by संयोजक on 27 February, 2016 - 13:04

वृत्तबद्ध कविता करणार्‍या समकालीन रचनाकरांमध्ये श्रीमती भारती बिर्जे डिग्गीकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने त्यांनी मायबोलीकरांसाठी काही वृत्तबद्ध कविता सादर केल्या आहेत.

वृत्तबद्ध कविता - भाग १

वृत्तबद्ध कविता - भाग २

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीची अवघड वृत्तांना लीलया हाताळण्याची हातोटी विलक्षण आहे, भाषेतील शब्दलालित्य तर अतिशय प्रभावी आणि परिणामकारक...!
वृत्तांची अद्भुत लयबद्धता अशा काव्यवाचनातून अभिव्यक्त होते तेंव्हा अधिकच आकर्षक आणि मोहक ठरते...! अभिनन्दन !
- स्वामीजी

वृत्तबद्ध कवितेची गोडी आणि लोभ वाढविण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल भारतीचे हे निवेदन आणि वृत्तात गुंफ़लेल्या कविता सादर करण्याची त्यांची विलक्षण अशी हातोटी.....

"....टपोरा सोनेरी परीमळत चाफ़ा उमलला
उफ़ाडा ग्रीष्माचा जळत जरी वारा तरळला...."

इथला "वारा तरळला...." भावनेतून जी आशा फ़ुलते ती फ़ार हवीशी अशीच असते.

भारती बिर्जे-डिग्गीकर, अमेय पंडित अशा दिग्गजांकडून सादर होत असलेले ही चित्र अभिव्यक्ती अगदी मोहात पाडणारी अशीच आहे.

हे घडवून आणणार्‍या मायबोली टीममधील सदस्यांना धन्यवाद.

स्वामीजी _/\_ , माझ्याकडून याप्रकारचं लेखन होण्याचं मूळ श्रेय तुमचं .
अशोक, दिनेश, तुमचे प्रतिसाद नेहमीच उत्साह वाढवणारे आणि रसिकतेची साक्ष देणारे.
हर्पेन, तुझे आणि मायबोलीचे आभार क्वचितच कुठे कवितावाचनाला जाणाऱ्या माझ्या कवितांना हे सुंदर व्यासपीठ देण्यासाठी.

याचं लिखित रूप वाचनाच्या क्रमाने -

1.कवितेचे ‘’असणे’’
The Being of a Poem '- डॉ.अशोक केळकर यांचा तत्त्वविचार, कवितेच्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न
तोटक वृत्त- गण स स स स – वृत्तलक्षण ‘’बघ चार स या गणि तोटक ते ‘’

कवितेतुन काय हवे असते
‘असणे’ कवितेत कसे वसते
कवितापण ओळखणार कसे
हृदयातुन पारखणार कसे

तर येत समोर सखी कविता
कितिदा शतदा जगता जगता
नित भेटत ती घटना बनुनी
बहुरंग जनी सुनसान मनी

कवचापरि निव्वळ शब्दखुणा
परिघासम संस्कृतिकक्ष जुना
घरअंगण हा स्थळकाळ तिचा
पण कुंपण ना सृजनास तिच्या

कविता घडते स्फुरता लिहिता
कवि आकृतिबंध तिचा रचता
बदलांमधुनी स्थिर होत तिने
स्फटिकीकृत बिंदुत साकळणे

कविता असते रसतत्त्वमयी
व्यवहारलिपी पण सत्वमयी
जरि वाचिक भाषिक ती दिसते
परतत्त्व तिच्यातुन संक्रमते

कविता लिहितो कवि एक कुणी
कुणि गात, सभास्थळि नेत कुणी
श्रवणात मनात कुणी भजतो
कुणि मर्म तिचे उकलू धजतो

स्तर सर्व असे किति आकळणे
कवितेस्तव काय किती लिहिणे
कवितारति काय विरेल कधी ?
जर मानववंश सरेल कधी !

२. ग्रीष्मराग (शिखरिणी –जयामध्ये येती य म न स भ ला गा शिखरिणी, यती ६ वर )

टपोरा सोनेरी परिमळत चाफा उमलला
उफाडा ग्रीष्माचा जळत जरि वारा तरळला
असा नि:शब्दाचा कहर करणाऱ्या दशदिशा
झळा या एकाकी घुमट भरणाऱ्या अनिमिषा

जणू आकाशाचा तळ उसवुनी नीळ झरते
सवे आभासाचे मृगजळ दिठीलाच हसते
सुदीप्ता वेळेला भिरभिरत ही घार वरती
निराकाराला का भिडत करते प्रश्न धरती

विचाराच्या डोही झुरत पळ काही ठिबकले
रित्या गाभाऱ्याला सुखवत दिवास्वप्न पडले
उभा दाराशी का सजण सदनाला कळत ना
धुळीच्या वाटांना गवत पिवळे सोसवत ना

चढे माध्यान्हीचा ज्वर परिसरा जीव शिणतो
विरागी क्षोभाचा भडक गुलमोहोर फुलतो ..

३. लीलावती हॉस्पिटल
( सुमंदारमाला –लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा अनिश्चित यती ५ ११ १७ २३ )
जुन्या शिल्पशाळेत छिन्नीप्रमाणे घुमे ताल दु:खार्त प्राणातला
असा भव्य प्राकार स्थापत्यविस्तार माझ्या घराच्या पुढे थाटला
जरा वाट जाते वळूनी जिथे त्या तिठ्याशी दिशा भाबड्या थांबती
कुणाला कशाला कितीदा स्मरावे कुठे काय उत्पात ओसंडती

अमर्याद वर्षे कशी लोटती ध्वस्त पंखात आकाश घ्यावे कसे
अता झुंजता श्वास गुंगीत जातो मनाला अशी व्यर्थ चिंता नसे
पहावे स्वत:ला दुज्या भावनेने कसा देह वाहे प्रवाहासवे
कसा सोहळा साजरा हो क्रमाने जुना भोग शृंगार त्याचे नवे

इथे गारठा वेढतो हा जिवाला अमानूष न्यायापरि स्तब्ध-सा
अतीन्द्रीय गंधात अस्तित्व नाहे भयाचा दिसे देखणा स्वर्ग-सा
मला मोह नाही मला नाव नाही विशुद्धातली ऊर्ध्वपातीत मी
नियंत्रीत आकांत आत्म्यातला मी तुझी प्रार्थना रक्तरंजीत मी

निजे शल्यमंचावरी स्तब्ध काया अनास्थेशिया जाणिवा घेरता
दिसे खोल भासातळाशीच दीप्ती असा मोक्ष गात्रांत हिंदोळता ..

४. पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’
(लगाल ललगा लगा लललगा लगागा लगा गण ज स ज स य ल ग यती ८ वर )

विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी
गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी
सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा
‘’सुटे धरणिबंध हा पथिकमित्रहो सज्ज व्हा’’

जसे हळुहळू चढे वर विमान वेगे उठे
घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे
क्षणैक नजरेपुढे झरझरा नकाशा सरे
विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे

उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी
किती प्रहर नेणिवेत झरती उदासीपरी
अधांतरच आपले घर नवे मनाला गमे
गवाक्ष पडद्यामधे लपत शर्वरी आक्रमे

सरे समय नाकळे असत नीज की जागृती
तशात परिचारिका दिसत भास-शी आकृती
नसेच पण भास तो, हसत ती करे स्वागता
‘’उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा ‘’

गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा
अपार नभपोकळीत झळके नवा नीलिमा
कुठे पुसट पुंजके ढग असे वहाती सुखे
असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

प्रवास असती किती कुठुनसे कुठे जायचे
मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे
असो कलह तल्खली गलबला जिवाभोवती
परंतु क्षणी एकट्या नभ निळे मला सोबती ..

५. शेवटली कविता- (मदिरा वृत्त भ भ भ भ भ भ भ ग वृत्तलक्षण संस्कृत – ‘सप्तभकारयुतैकगुरुर्गदियेतमुदारतरा मदिरा’ गाललगाललगाललगालल गाललगालल गाललगा या क्रमाने २२ अक्षरे येतात व दहाव्या अक्षरावर अनिश्चित यति असतो.

आक्रमता पथ संतत सोबत संथपणे करते कविता
झांजरल्या भयभीत दिशांतुन रंग नवे भरते कविता
पूर्ण कफल्लक भासत जीवन त्यात उचंबळते कविता
सर्व निरर्थक ? का रसमाधुर त्यातच उन्मळते कविता

हे व्यवहारिक दारुण वास्तव यात कुठे नसते कविता
पोटभरू तडजोड पदोपद काय इथे दिसते कविता
ऊन्हभुलावण घालतसे मृगनीर तशी सुचते कविता
जे जग जाणत सूज्ञ कुणी न अशांस कधी रुचते कविता

मी लिहिली नित साहियली जणू वागवली हृदयी कविता
जन्म जळे तेव्हा उजळे निजज्योत प्रकाशमयी कविता
आचरले तपताप कधी फळ लाभत प्राणभुली कविता
लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता...

६.आठवावा तुला ..
( वृत्त स्रग्विणी , वृत्तलक्षण ‘’कीर्तितैषा चतूरेफिका स्रग्विणी’’
गण र, र, र, र - गालगा गालगा गालगा गालगा,अक्षरे बारा, यति ६ व्या अक्षरावर )

आठवावा तुला केशसंभार तो
यौवनाच्या वनी मेघमल्हार तो

आठवावी तुला वाळुची वादळे
प्राण देठातुनी मोडती कोवळे

आठवावा तुला गर्व दु:खातला
एक हुंकारही ना कुठे गुंजला

आठवावी तुला तत्वनिष्ठा खुळी
आग्रहांची दळे विग्रहांचे बळी

आठवावी तुला आत्मसंवादिनी
स्वत्व जे मुक्त हो स्त्रीत्व ओलांडुनी

आठवावी तुला जाणिवेची उषा
.. आज सांजावता रम्य झाली निशा

७.कोल्यूरची उघडी खिडकी :मत्तकोकील वृत्त – गालगा ललगा लगा ललगा लगा ललगा लगा
(Henry Matisse's " Open Window, Collioure "1905- )

ऊष्ण पाजळता ऋतू पिवळी प्रभा झळकावतो
आळसावत स्वप्नजांभुळ पापणीत जडावतो
वेळ ती :अनुबंध तो :हृदयातला चढता ज्वर
दृश्य ते खिडकीतले निथळे मन:फलकावर

ते समोरच एक बंदर होडकी फिरती जिथे
खोल पाणथळीत बिंबत सूर्यकांचन तापते
खळ्बळे जळऊर्मि सांवळ-ताम्र-शुभ्र जरा निळी
अर्थसंगत मी नवी उकलेन या खिडकीतली

सृष्टि मी :भरले अरण्यच रंगविव्हळ कोंडले
दृष्टि मी :दिनरात झोत सतेजशीतळ त्यातले
व्यक्त मी : कथनात्म हे अवकाशखंड चितारता
मुक्त मी: कळते मला खिडकीतली भवितव्यता

ऊष्ण पाजळता ऋतू किरणात मी लिहिला इथे
या जुन्या खिडकीत आदिम मग्नसत्य विलासते ..

८. मंदारमाला : :(गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा )
साता तकारीच मंदारमाला गुरु एक त्याच्याही अंती असे –अनिश्चित यती ४,१०,१६
‘’शोध’’
येथे दिसे की सुखाच्या मिषाने झळाळे भ्रमाचीच रंगावली
जी रोषणाई दिसे घाटमाथ्यास ती काजव्यांचीच दीपावली

आघात नी घात उत्पात हे नित्य वृत्तात चित्तात घोटाळती
संवेदनांचे मृतप्राय तंतू कसे जाणिवेलाच वेटाळती

आक्रंदुनी जात निद्रेत अस्तित्व माझी मला मी न ये ओळखू
बाजार आवार हे एक झाले निके सत्त्व येथे कसे पारखू

मी विस्मरावी कुरूपे जगाची ढिगार्‍यात मेंदूत जी साचली
ते दंभ आवेश ती मत्सराची कडूझार वाणी कधी बोचली

नि:संग निभ्रांत निस्सीम होऊन आकाशवृत्ती धरावी कशी
सार्‍या किनार्‍यास रेखून घेई अशी पूर्णता पांघरावी कशी

आसक्त आरक्त हव्यास रंगी नभाच्या कडा रंगलेल्या इथे
चित्रे विचित्रात एकत्र होती किती साधना भंगलेल्या इथे

वार्‍यावरी श्वास जे गीत गातात आतील आनंद ओसंडुनी
वार्‍यावरी जी विराली विराणी व्यथेची कथा आर्त ओथंबुनी

त्या गूढ गर्भात जेथून येतात ही अमृताची मधुस्पंदने
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ माझे मला तेथ आहे स्वत: शोधणे..

९. त्या बाया :शार्दूलविक्रीडित – येती मासजसातताग चरणी शार्दूलविक्रीडित –निश्चित यती १२ वर )
(Les Demoiselles d’Avignon: Pablo Picasso च्या चित्रावरून )
त्या बाया असती तिथेच दिसती काळास ओलांडुनी
चित्राच्या खिडकीत काय थिजले आवर्त भोवंडुनी
देहांची उघडी वखार भरली आहे विखारी इथे
तूही थांब जरा इथे जिवलगा हे दृश्य हाकारते

हे ते उन्नत मांसपिंड इथले ही क्षुब्ध आवाहने
आहे हाट समोर तू न करता संकोच न्याहाळणे
चौघी पाचजणी: समान दिसती कोणी,कुणी भिन्नशा
वंशाचे तितके विशेष उरले रेषांमधे खिन्नशा

काळे रान हले : कुणा नरपशू भोगून चिरफाडती
काळ्या चेटकिणी भयाण फिरती किंचाळती आकृती
यांची रिक्त मने जळून विझणारी आठवांची घरे
बाजारात इथे परिस्थिति बरी हे मात्र आहे खरे

काष्ठांच्या जणु बाहुल्याच असले हे चेहरे दुस्तर
आता जाणवते भकास कसलेसे आतले अस्तर
कोनांचे खुपते शरीर मृदुता लोपे दुखे कोपरा
आसक्ती उमटून पूर्ण विझते तो हा जुना उंबरा

आकाशी निळवी गुलाबस भुरी राखाड गर्दाळली
रंगांची असली भुलावण जरी चित्रात सर्दाळली
बायांच्या नजरा गिऱ्हाइक नवे न्याहाळती थंडशा
हेतूंनाच पुरे विवस्त्र करती वाभाडती पौरुषा..

१०. स्मरणरंजन : (वृत्त चंपकमाला)
गण भ म स ग , अक्षरे दहा,यति ५ व्या अक्षरावर
वृत्तलक्षण भा म स गा नी चंपकमाला,गाललगागा गाललगागा

त्या दिनराती त्या क्षणमाला
ती सुखदु:खे अंतरलेली
पैल नदीच्या अंधुक पात्री
नाव जुनीशी नांगरलेली

स्तब्ध नभाला मुग्ध भुईला
मंत्र कुणी का घालत आहे
धूळ धुक्याच्या चाहुलवाटा
दूर कुणी का चालत आहे

ती घरदारे ओळख देता
विस्कटलेले अर्थ कळावे
बांध फुटावा आणिक आता
काही नवे संदर्भ जुळावे

एक उसासा अंधुक अश्रू
काजळओल्या पापणकाठी
आवर आता नीघच बाई
हीच असो श्रीशिल्लक गाठी..

- भारती बिर्जे डिग्गीकर

भारती!!! खूप सुंदर सादरीकरण!!! कान तृप्त झाले.

या उपक्रमाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याकरता हर्पेन आणी मायबोली चे शतशः आभार!!!

खूप छान कवितावाचन… सध्या ऐकता क्षणीच त्यातल्या तालतत्वाने मोहवश केलंय पुन्हा कधीतरी शांत बसुन कवितेचा आस्वाद घेईन.

भारती.. माझे कसले आभार
उलटपक्षी अजीबात आढेवेढे न घेता चटकन होकार भरून हवे तसे रेकॉर्ड होई पर्यंत ज्या आपुलकीने सहकार्य केलंत त्याबद्दल मीच आपला ॠणी आहे.

खुप आवडले ऐकायला. छंदबद्द रचना तशाच अंगाने वाचल्यात, अगदी कवितेत बुडून जाऊन वाचल्यात, आपणही नकळत डोलायला लागतो. Happy

माझ्या आवडात्या दहात घालुन ठेवते म्हणजे हवे तेव्हा चटकन ऐक्ता येईल.

वर्षू नील , खूप छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून , घरीच, स्वत:च रेकॉर्ड केलेलं आवडतंय तुम्हाला म्हणून.

भुईकमळ , बेफिकीर, मॅगी , साधना _/\_

मलाही वाचताना या तालांचे आनंद अधिक जाणवले ..कविता ही मूलत: ऐकवायची गोष्ट ( श्रुतींचा विषय ) आहे असाही एक सिद्धांत आहे, महान फ्रेंच कवी Paul Valéry यांचं याविषयी हे वाक्य किती प्रत्ययकारी आहे ते पुन: एकदा आठवलं या अस्सल भारतीय श्रुतीबंधांच्याही संदर्भातही-
‘’-One should approach poetry as pure sonority, reading and rereading it as a sort of music, and should not introduce meanings or intentions into the diction before clearly grasping the system of sounds that every poem must offer on pain of nonexistence.’’

साधना आभार आवडत्या दहासाठी Happy

माझ्या एकपात्री वाचन-प्रयोगात काही त्रुटी राहिल्या असतील तर लिखित स्वरूपात दिल्याच आहेत कविता.

व्वा! भारतीताई सुरेख! Happy

पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’>>>>>>>>>>>.हे ऐकताना, लहानपणापासून आईने ऐकवलेली, तिला असलेली कविता, आठवली. ही ती कविता,
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- ना.वा.टिळक

आता फक्त पहिला भाग ऐकला! कित्ती कर्णमधुर वाटतं वृत्तबद्ध कविता वाचताना! ताई तु वाचत होतीस तेव्हा आपोआप पायने ताल धरला जात होता माझ्या! आणि किती नवी वृत्ते कळली! सुमंदारमाला, तोटक, मदिरा ही वृत्ते माहितच नव्हती आजिबात! आता कवितेचा अर्थ बघतो! आधी तालाने मोहुन गेलोय!

खूप छान कवितावाचन… सध्या ऐकता क्षणीच त्यातल्या तालतत्वाने मोहवश केलंय . कान आणि मन दोन्ही तृप्त झाले . भारतीताई आभार ...