गोनीदा जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षभरात काहीतरी करू या का, असं गेल्या ८ जुलैला मी मित्रमंडळीत विचारलं होतं. त्यात मला सुचलेल्या वेगवेगळ्या कल्पना मांडल्या. काहीतरी करायची ही कल्पना सगळ्यांनीच तेव्हा मनापासून उचलून धरली. प्रत्यक्षात मात्र काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि आज या दिवसापर्यंत तरी काहीच होऊ शकलं नाही. सहज विचार करत मागे मागे जाताना खुपशा अवांतर गोष्टीही आठवत राहिल्या आणि लक्षात आलं, अरेच्चा, पार्श्वभूमीला सगळीकडे गोनीदा आहेतच की. मात्र त्यातली एक गोष्ट अगदी आवर्जून उल्लेख करण्यासारखी आणि आपल्या मायबोलीकरांना तर सहर्ष सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे आमचं 'वाचन वेल्हाळ'.
डिसेंबर २०१३मध्ये मी ध्रूव भट्टांचं 'अकूपार' वाचलं, ते मला खुपच आवडलं. त्याबद्दल माबोच्या पुस्तकांच्या धाग्यावर लिहिताना, ते वाचताना मला खुपदा गोनीदांचे भास झाल्याचं म्हणाले आणि त्याला शैलजा, हर्पेननी दुजोरा दिला. ओघात 'माचीवरला बुधा' आणि 'वाघरू'बद्दल थोडकं बोलणं झालं. ह्या सामायिक आवडीमुळे आपण मिळून एकत्र वाचनं करायची का असं मी त्या दोघांनाही विचारलं. दोघांनीही आनंदानं होकार दिला. बुधा किंवा वाघरूपासूनच सुरूवात करू असं ठरलं. नुकतंच त्याआधी कधीतरी शशांक पुरंदरेंशी बोलताना ते आणि शांकलीसुद्धा गोनीदाभक्त असल्याचं आणि त्यांच्या मातोश्री डोळ्यांना त्रास होत असतानाही 'स्मरणगाथे'त रमून गेल्या असल्याचं ते म्हणाले होते. मग त्यांना आणि माझ्या आणखी एका आवडत्या मैत्रिणीला, अवललाही याबद्दल विचारलं. सगळ्यांनी अनुमोदन दिलं. अशाच एकसमान आवडीमुळे विशाल कुलकर्णी सामिल झाला. पुण्याबाहेरच्या अविनाश चव्हाण, अशोक पाटील आणि कौतुक शिरोडकर या गोनीदाप्रेमी मित्रमंडळींनीही ह्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती, जे पुण्यात असताना वाचनाला उपस्थित रहाणार होते. शोभनाताईदेखिल उत्सुक होत्या, ज्या अधूनमधून हजर रहाणार होत्या. मात्र ह्या उपक्रमात जिचा आवर्जून सहभाग असावा अशी माझी प्रबळ इच्छा होती, त्या दक्षिणानं हो म्हणल्यावर मात्र मला एकदम बाजी मारल्यासारखं वाटलं. यथावकाश ह्या दिंडीत अमेय पंडित, इन्ना आणि साजिराही आले. वाचन वेल्हाळमधे आजघडीला इतकेच मोजके सदस्य आहेत.
जानेवारी १४ च्या पहिल्या आठवड्यात पहिली बैठक हर्पेनकडे ठरली, तेव्हा हातात होतं 'माचीवरला बुधा'.
दक्षिणा सोडून आम्ही प्रत्येकाने बुधा अनेकदा वाचलं होतं, पण आमची सगळ्यांचीच ते पुन्हा वाचण्याची आनंदाने तयारी होती. हे अभिवाचन असणार होतं आणि तिनं पुस्तक वाचलेलं नसल्यानं तिनंच ते वाचायला सुरूवात करावी असं सगळ्यांनी सुचवलं. त्या दिवशी आम्ही फक्त दोन पानं वाचली. दक्षिणानं छान वाचन केलं. ह्या पहिल्या बैठकीला हर्पेनकडे शांकली आणि शशांक पुरंदरे, अवल, दक्षिणा, मी आणि माझा लेक, आणि अर्थातच हर्पेन सहकुटुंब होते. शैलजाच्या अनियमित सुट्ट्यांमुळे तिनं सुरुवातीपासूनच व्हर्च्युअल सहभाग नोंदवून ठेवला होता तर विशालला ऐनवेळी काही कामामुळे येता आलं नाही. वाचन जरी निमित्तापुरतं झालं तरी ह्या बैठकीत एकंदर चर्चा वाचनाशी संबंधितच झाली. भेटण्या-वाचण्याबद्दल साधारण नियमावली बनवली गेली. प्रत्येकाकडून खुप चांगले मुद्दे आले. दर पंधरा दिवसांनी भेटणे, शक्यतो रविवारी आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत, जेणे करून दोन ते अडीच तास वाचन करून उरलेली संध्याकाळ घरच्यांबरोबर घालवता येईल, शक्यतो सदस्य दहा ते बारापेक्षा जास्त वाढवायला नकोत, बैठक फिरती ठेवावी म्हणजे प्रत्येक सदस्याच्या घरी वाचन होईल, खानपान हे चहा किंवा कॉफी आणि फारतर कोरडा खाऊ इतपतच मर्यादित असावं, वाचन चालू असताना कुणालाही काहीही अडलं, शंका विचाराविशी वाटली किंवा त्या अनुषंगाने काही आठवलं आणि बोलावं सांगावंसं वाटलं तर जरूर बोलावं, थांबून तो मुद्दा संपवून मग पुढे जावं, नुसतंच वाचत सुटू नये, किमान ४ लोकं तरी वाचनाला असावीत अन्यथा पुढचा दिवस ठरवावा, आजची बैठक संपवताना पुढची तारीख ठरवूनच उठायचं, वगैरे. प्रत्येकानं येताना आपापली काही आवडती पुस्तकं आणली होती, ती देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एकमेकांशी ओळखी झाल्या. काहीजण काही जणांना छान ओळखत होते, पण सगळेजण सगळ्यांना ओळखत नव्हते. खानपानाचा नियम त्याच दिवशी ठरल्यामुळे त्यादिवशी आमची चंगळ झाली. हर्पेन आणि तेजश्रीने ओली भेळ आणि गाजराच्या हलव्याचा बेत केला होता. त्यामुळे वाचनाचा आनंद वाढला. पुढचं वाचन माझ्याकडे ठरवून आम्ही उठलो.
आनंदाची बाब म्हणजे ही वाचनं पुढे अगदी नियमित होत गेली. अगदी न चुकता ही पाक्षिक भेट होत राहिली. ह्या आमच्या गटाचं नाव सर्वानुमते 'वाचन वेल्हाळ' ठेवलं. कधी माझ्याकडे, कधी पुरंद-यांकडे, अवलकडे, दक्षिणाकडे, विशालकडे, इन्नाकडे, शोभनाताईंकडे आम्ही भेटत-वाचत राहिलो, तर कोल्हापूरकरांच्या आमंत्रणाला मान देऊन एकदा अविनाशकडे निवासी कट्टाही केला. बुधाच्या बहुतेक वाचनांच्यावेळी माझा लेकसुद्धा सोबत होता. आमच्याभोवती इकडेतिकडे करत, खेळत, चित्रं काढत, तोही बुधा आजोबाची गोष्ट ऐकत होता. शशांक आणि अवल अधेमधे त्याला ओरिगामीच्या नव्या कलाकृती किंवा चित्रकलेतल्या करामती शिकवायचे.
बुधासाठी आम्ही साधारण पाच ते सहा बैठका भेटत राहिलो. पूर्ण वाचन दक्षिणानं केलं आणि अतिशय उत्तम वाचलं. ते तसं खुपच चिमुकलं आहे, त्यामुळे त्या आधीही संपलं असतं, पण आम्ही खुप चवीचवीनं वाचत गेलो. त्यातल्या अनवट शब्दांवर, परिसराच्या वर्णनांवर चर्चा होत असे, त्यात येणा-या वनस्पतींबद्दल शांकली तपशीलवार माहिती देई. कधी सर्वांना एकत्रितच भावलेल्या एखाद्या प्रसंगावर थांबून काही बोलणं होई. पूर्वी आपापलं एकेकटं वाचताना लागत गेलेले - न लागलेले संदर्भ, समजलेले - न समजलेले प्रसंग, एकाच वर्णनाचे प्रत्येकाचे आपापले स्वतंत्र अन्वयार्थ, असं विविध प्रकारे बोललं गेल्यामुळे, ह्या एकत्रित वाचनाने व्यक्तिशः मला तरी, पूर्वी अनेकदा वाचलेला असूनही आत्ता कुठे ख-या अर्थाने बुधा थोडाफार समजत, पोचत असल्यासारखं वाटलं. ऐकताना अधेमधे कुणा कुणाच्या तोंडून भारावलेले, विस्मयकारक उद्गार निघत. कुणाला एखाद्या शब्दा-वर्णनावरून काही त्यासंदर्भातलं अवांतर आठवे. असा आनंद घेत घेत आम्ही बुधाच्या माचीवर चढत गेलो. सर्वांना त्याची इतकी आवड लागली की तितकंच अपरिहार्य काही असल्याशिवाय कुणीही वाचनाला दांडी मारली नाही. पुण्याबाहेरचे सदस्यही ब-यापैकी येत राहिले. वाचन सुरू असताना कुणीही फोनवर बोलतोय, व्हॉट्स् अप चाळतोय किंवा फेसबुक बघतोय असं झालेलं नाही. गंमत म्हणजे नाटक किंवा कार्यक्रम सुरू होताना जशी सूचना द्यावी लागते, तसं काही इथे कुणी मुळीच केलं नव्हतं, तरीही प्रत्येकजण स्वहून हा अलिखित नियम आजतागायत पाळत आलेला आहे. बुधा संपणार होतं त्यादिवशी अशोकमामा मुद्दाम पुण्याला आले. त्यादिवशी आम्ही एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. प्रत्येकाने एकेक पदार्थ करून आणला होता.
तेव्हा पुढच्या वाचनाबद्दल ठरवताना आता एकच पुस्तक घेण्यापेक्षा वेगवेगळ्या पुस्तकांतले लेख, उतारे आणि कविता वाचण्याचं ठरलं. त्यानुसार पुढच्या कट्ट्याला आम्ही दुर्गाबाईंच्या 'पैस'पासून सुरूवात केली. ते अतिशय दुर्बोध शब्दांनी भरलेलं असूनही एकत्र चर्चांमुळे आणि गटातल्या सिनियर वाचकांमुळे समजायला खुप सोपं गेलं आणि बुधाच्या पुढच्या टप्प्यावर चढून गेल्यासारखं वाटलं. गोनिदा आणि दुर्गाबाईंची जातकुळी पूर्णच वेगळी. आम्ही वाचनाची निराळी दिशा पकडली होती एकदम, पण काहीही ठरावीक साचा न ठरवल्यामुळेच आम्ही वाचनाची जास्त मजा घेऊ शकलो. पैसमधले 'पैस' आणि 'द्वारकेचा राणा' वाचले. दिलिप चित्रेंच्या 'तिरकस चौकस' मधला 'हंगेरियन रंगारी' वाचला. व्यंकटेश माडगुळकरांच्या 'गोष्टी घराकडील' वाचल्या. त्यादिवशी वाचन शांकलीने केलं. शोभनाताईंकडे मामांनी 'तुती'चं वाचन केलं. तेव्हा साहजिकच जी.ए. चर्चेचा केंद्रबिंदू होते. तेव्हा शोभनाताईंनी श्रेष्ठ कवी सुधीर मोघेंबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गीताबद्दल सुरेख आठवणी सांगितल्या. शोभनाताई, दक्षिणा, मी हे हौशी गाणारे सदस्य. त्यामुळे कधीमधी गाणीही होतात. पुरंदरेंकडच्या वाचनादरम्यान शशांकची मंजुळ सुरेल बासरी आणि संवादिका घुमते. विशालनं पुरंदरेंकडेच एकदा भा. रां. च्या 'घन तमी'वर लिहिलेला अप्रतिम लेख वाचून झाल्यावर ओघानं ते गायलंही गेलं होतं.
अविनाशच्या घरी झालेल्या कट्ट्याला बाकिबाबांच्या कवितांचं अमेयनं आणि विशालनं रात्री केलेलं वाचन आणि त्यामुळे तयार झालेलं वातावरण अविस्मरणीय. तिकडून परतताना प्रवासातही आम्ही ग्रेसांवरचा एक लेख वाचला. त्यादिवशी गाडीत इन्ना, अविनाश आणि विशालचे ग्रेस आणि त्यांच्या कविता हेच मुख्य विषय होते. फक्त मराठीच साहित्य वाचतो असं नाही. इन्नाकडे विशालनं डॉ. बच्चनांची 'मधुशाला' सुरेखच वाचली आणि समजावली होती.
आम्ही आजवर जितक्या वेळा भेटलोय, तेव्हा प्रत्येकच वेळेस वाचनाव्यतिरिक्त फक्त वाचनाशी किंवा इतर सुसंगत विषयांवरच आमच्या गप्पा झाल्या आहेत. राजकारण, घरच्या गप्पा, उखाळ्यापाखाळ्या, स्वतःचीच मतं पुढे, असं कधी झालं नाही. प्रत्येक बोलणा-याला नीट पूर्ण बोलू दिलं जातं आणि प्रत्येकजण उत्तम ऐकतो असा आजवरचा अनुभव आहे. विनाकारण खोटंच हो ला होदेखिल केलं जात नाही. जे लेख किंवा कविता वाचू, त्या आणि समकालिन लेखक / कवींविषयी, त्या शैलीबद्दल वगैरेही बोललं जातं. हंगेरियन रंगारी वाचला तेव्हा भारतीताईंच्या दिलीप चित्रेंवरच्या लेखाचाही उहापोह झाला, सामाजिक स्तर आणि शैक्षणिक स्तर, त्यासंदर्भातलं आपल्या देशातलं आणि बाहेरच्या देशातलं वातावरण, श्रमप्रतिष्ठा, चित्रेंची इतर पुस्तकं ह्याविषयी फार मौलिक चर्चा झाली होती आणि बोलत बोलत हा विषय इन्नाच्या हातच्या मस्त कडक कॉफीबरोबर घमासान आस्तिक-नास्तिक चर्चेवर येऊन स्थिरावला, जो खाली उतरल्यावरही सुरूच होता. एकदा माझ्या घरी हर्पेन करीअर आणि संधी ह्यावर फार सुरेख आणि दीर्घ बोलले होते. खरंतर असं खुप काही सांगता येईल, विस्तारभयास्तव आवरावं लागतंय.
विशालमुखी 'जपानी रमलाची रात्र'
गेली दोन वर्षे आम्ही सगळे भेटतोय, वाचतोय, बोलतोय. आमची प्रत्येक भेट झाल्यानंतर मला, आपण अजून सुरूवातही केली नाहिये आणि केवढा पल्ला गाठायचाय असं वाटत रहातं. संकेतस्थळांवर होणा-या पुस्तकांवरच्या किंवा एकंदरीतच लेखनावरच्या प्रदीर्घ चर्चा नुसतं वाचणं निराळं आणि अशी प्रत्यक्ष चर्चा सुरू असताना तिथे स्वतः उपस्थित असणं अन् त्यावर मनात येणारे कोणतेही प्रश्न, शंका, नि:संकोचपणे विचारता येणं, हे सर्वस्वी निराळं. हा माझ्यासाठी मोठा ठेवा आहे. क्षितीज दरवेळी आणखी विस्तारलं जातं, आवाका आणखी वाढवण्याची जाणीव होते. पण त्याचं दडपण किंवा ताण येत नाही, उलट त्यातून आम्हा सगळ्यांनाच रोजच्या धबडग्यासाठी एक खुप चांगली उर्जा मिळतेय. पुढच्या कट्ट्याची आम्ही सगळेच आतूरतेनं वाट बघतो. दक्षिणाही हे वाचन खुप एंजॉय करत असल्यामुळे माझा आनंद शतगुणित झाला.
हे सगळं आज लिहायची बरीच निमित्तं आहेत. ज्यांच्या पुस्तकांनी आम्हाला एकत्र यायचं निमित्त दिलं ते गोनीदा आहेत, आम्ही सगळे मायबोलीकर असल्यामुळे आपली प्रिय मायबोली आहे आणि साहित्यकृतींचं वाचन हाच पाया असलेल्या आमच्या वाचन वेल्हाळची सर्वांना ओळख करून देण्यासाठी 'मराठी भाषा दिवसा'इतका उचित मुहूर्त दुसरा कोणता असू शकतो? आम्हां सर्वांच्या मनातली मायबोलीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी, असा विचार मनात आला, तो ह्या लेखाद्वारे अंमलात आणला. हल्ली आम्ही अगदी प्रत्येक पंधरा दिवसांनी भेटत नसलो तरी सगळ्यांच्या सोयीने अजूनही नियमीत भेटतो आहे, वाचतो आहे, खुप आनंद घेतो आहे. वाचन वेल्हाळ ग्रुपवर नव्या पुस्तक खरेद्या सांगितल्या जातात, त्यावर आपापले अभिप्राय येतात, त्या अनुषंगाने सर्वांचंच त्याविषयी आणखी बोलणं होतं. आम्हा सर्वांचा एकमेकांशी फार छान मर्मबंध तयार झाला आहे आता.
असे आणखी असंख्य वाचनगट तयार व्हावेत आणि जितक्या सदस्यांना शक्य होईल तितक्यांनी एकत्र वाचन करावं ही ह्यानिमित्ताने आम्हा सर्व वाचन वेल्हाळकरांतर्फे मनापासून सदिच्छा.
आम्हा सर्वांतर्फे सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा
व्वा ! किती छान ! मस्त आहे
व्वा ! किती छान ! मस्त आहे 'वाचन वेल्हाळ' कल्पना.
सई, अरे वा! किती छान.
सई, अरे वा!
किती छान.
(No subject)
फोटोज टाकायचा प्रयत्न करते
फोटोज टाकायचा प्रयत्न करते आहे, लिंक व्यवस्थित देऊनही काहीतरी गडबड झाली आहे.
खूपच छान कल्पना आहे..
खूपच छान कल्पना आहे..
वाचनवेडे एकत्र येणे..
वाचनवेडे एकत्र येणे.. ईटरेस्टींग कल्पना आणि जबरी उपक्रम आहे.. हा लेखही छान झालाय
वाचनवेड, त्यामुळे एकत्र येणे
वाचनवेड, त्यामुळे एकत्र येणे आणि जुळलेले मैत्र हे सर्वच आता भावविश्वाचा अविभाज्य भाग झाले आहे. लांब राहत असल्यामुळे वारंवार हा आनंद मिळत नसला तरी अधून मधून मिळणारे असे सुगंधी क्षण बाकी धकाधकी सुसह्य करण्यासाठी ऊर्जा देऊन जातात.
अविनाशचे मितभाषी पण साक्षेपी आदरातिथ्य, बोरकरांच्या रसवन्त लेखणीने निर्माण केलेला माहौल आणि एकूण जुळून आलेला सूर यामुळे ती मैफिल नेहमीच लक्षात राहील.
"वाचनवेड, वाचनप्रेम आणि वाचन
"वाचनवेड, वाचनप्रेम आणि वाचन देवाणघेवाण....." ~ साहित्याची गंगा फ़ुलायला हे तीन घटक अंगी असणे फ़ार जरूरीचे असते. मी रात्रीच्या समयी एक कथा वाचली.....श्री.दा.पानवलकरांची "कमाई", ती मला इतकी भावली, त्यातील विश्व काही पातळीपर्यंत मला माहीत होते. तसले वातावरण श्री.दा. यानी आपल्या शब्दसामर्थ्याने इतके जिवंत केले की वाटू लागले आपणच त्या मुलाच्या मागोमाग उंदरे पकडायला बाहेर पडलो आहे. मला वाटलेले हे सर्व विचार कुणाला तरी सांगितल्याशिवाय चैन पडणे शक्य नव्हते. मध्यरात्र होत आली असतानासुद्धा हक्काचा श्रोता म्हणून अविनाश चव्हाण याना फ़ोन केला. मोबाईल बंद होता, तरीही लॅंडलाईनचा उपयोग करून त्यांच्याशी संपर्क साधला कारण मला माहीत होते की अजून ते झोपले नसणार. झालेही तसे. पानवलकरांच्या कथेचे नाव ऐकताच अगदी खडबडून जागे झाले आणि मग पुढील दहा मिनिटे वाचनाचा जो आनंद आम्ही घेतला तो आज या लेखामुळे पुन्हा जागृत झाला. मग अशा वेळी "वाचन वेल्हाळ" सारख्या गटाची स्थापना करण्यामागील उद्देश्य चटदिशी समजून येतो. सई ने अतिशय सुंदर वर्णन केले आहे या गटाचे आणि गटातर्फ़े चालत आलेल्या कार्यक्रमाच्या माहितीतून प्रतीत होते की वाचनाची आवड जपणारे अनेक सदस्य असू शकतात, ते आपली नोकरी व्यवसाय सांभाळून अशा आनंदासाठी अगत्यपूर्वक वेळ काढतात....अंतराचा विचार न करता.
दक्षिणा, हर्पेन, इन्ना, शोभनाताई, अमेय, विशाल (कुलकर्णी आणि व्यास), शशांक....आदी मंडळी केवळ वाचनाविषयीच नव्हे तर त्या प्रेमापोटी अनेकांना आपल्या गटात सामील करून घेण्यास उत्सुक असतात. मलाही हा आनंद मिळाला आहे, ज्याचे सुंदर चित्रण सईने शब्दांतून मांडल्याचा प्रत्यय आला....धन्यवाद.
हे सगळं वाचून छान वाटलं आणि
हे सगळं वाचून छान वाटलं आणि हेवाही वाटला. पुढच्या वाचनप्रवासासाठी शुभेच्छा!
हे सगळं वाचून छान वाटलं आणि
हे सगळं वाचून छान वाटलं आणि हेवाही वाटलं. पुढच्या वाचनप्रवासासाठी शुभेच्छा!>>>> +111
आता पहा फोटो दिसताहेत का?
आता पहा फोटो दिसताहेत का?
हो, फोटो आहेत आता.
हो, फोटो आहेत आता.
अरे वा आपली गोष्ट फोटो
अरे वा आपली गोष्ट
फोटो दिसताहेत हो आता जमलं म्हणायचं
फार सुंदर लिहिलंय. हेवा
फार सुंदर लिहिलंय.
हेवा वाटतोय !
मित्रांनो हेवा काय वाटायचा
मित्रांनो हेवा काय वाटायचा त्यात
सामील व्हा, नसेल जमत पुण्यात यायला तर आपापल्या गावी चालू करा असा वाचन कट्टा हाकानाका
हर्पेनदा, भारताबाहेर नाही
हर्पेनदा, भारताबाहेर नाही शक्य होत रे. घरात असलेली पुस्तकंही वाचायला होत नाही. पुढच्या पुणे भेटीत १ दिवस का होईना यायचा प्रयत्न करणार. पण पुण्यात आल्यावर रात्रं थोडी आणि सोंगं फार असतात. तरी बघु
सुंदर अनुभव
सुंदर अनुभव
मित, पुण्यात येशील तेव्हा
मित, पुण्यात येशील तेव्हा संपर्कात रहा जमवू एक कट्टा
वा! फारच छान कल्पना आहे सई,
वा! फारच छान कल्पना आहे
सई, खूप छान लिहलयस.
सईतै, मस्त कट्टा आहे हा..छान
सईतै, मस्त कट्टा आहे हा..छान लिहलयसं
अर्रे व्वा..सई , दक्षु च्या
अर्रे व्वा..सई , दक्षु च्या बोलण्यात कधीतरी आली होती ही गोष्ट!!!
सर्व वाचन वेल्हाळांचे खूप कौतुक वाटले. रोजच्या चक्रातून थोडा वेळ का होईना पण असं एकत्र जमून वाचन, त्यावर चर्चा करण्यातून किती उत्साह ,उर्जा तुम्हाला मिळत असेल याची कल्पना आली. फार आवडली ही अॅक्टिविटी!!
कधीतरी मलाही जमेल का तुमच्या ग्रुप मधे सामील व्हायला ..
खुप छान वाटलं हे वाचून...
खुप छान वाटलं हे वाचून... तूम्ही सगळे परीचयातलेच असल्याने यात मी सहभागी असल्याचीच भावना होतेय.
छान लिहिलास सई. मी आनंद
छान लिहिलास सई. मी आनंद चाखलाय.पण फारच थोडी सामील होऊ शकले.मलाही तुमचा हेवा वाटतो.
छान आहे उपक्रम . असे उपक्रम
छान आहे उपक्रम . असे उपक्रम सुरु राहिल्यास मराठीच्या भवितव्याची काळजी करायचं कारण नाही
सर्वांना धन्यवाद असे काही
सर्वांना धन्यवाद
असे काही नवे वाचनगट सुरू झाले तर इथे अवश्य माहिती द्या त्याबद्दल. आम्हाला खुप आवडेल त्याबद्दल वाचायला.
सई किती छान, ओघवतं लिहिलं
सई किती छान, ओघवतं लिहिलं आहेस. सुंदर उपक्रम, छान रंगतदार होत असेल जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा. आवडलं असतं सहभागी व्हायला. खूप विस्तारलं असतं क्षितीज माझं.
तुमचा उपक्रम असाच बहरत जावो ह्यासाठी अनेक शुभेच्छा. सर्वांचंच कौतुक वाटतं, हेवा वाटतो. फोटो सुंदर.
नीलचं विशेष कौतुक ग.
कीती छान उपक्रम. मर्मबंधातली
कीती छान उपक्रम. मर्मबंधातली ठेव आवडली
अश्या पुअक्रम्मत भाग घ्यायला नक्कीच आवडेल. पण माझे वाचन काही फारसे ग्रेट नाही
तुमचा उपक्रम असाच बहरत जावो ह्यासाठी अनेक शुभेच्छा!!!
खूप छान लिहिलंय.. ह्या
खूप छान लिहिलंय..
ह्या ग्रुपची सदस्य बनायला खूप आवडेल
छानच लिहिलय सई! साहित्यातले
छानच लिहिलय सई!
साहित्यातले एवढे दिग्गज लोक असल्यावर वाचनकट्टा बहारदार होत असणार यात शन्काच नाही.
सुंदर उपक्रम. अशावेळी आपण
सुंदर उपक्रम. अशावेळी आपण मुंबईपुण्यापासून फार दूर आल्याचं फारच जाणवतं.
अजून वाचत रहा. घमासान चर्चा करत रहा, त्याविषयी इथे लिहत रहा.
Pages