आरसा
दूर-दूर हून लोक येतात, माझ्या घरी,
लांबच लांब रांगा लावतात, झुंबड उडते.
माझा आरशांचा संग्रह पहाण्यासाठी.
शेकडो, हजारो, आरसे, पहावे तिकडे आरसे.
छोटे, मोठे,गोल, चौकोनी, षटकोनी,
छान-छान सजावटी, मढवलेल्या महिरपी,
जडवलेली नक्षी, बुट्टे, पाने, फुले, वेली.
काहींच्या भोवती, चित्र-विचित्र आकृती.
काही वेळाने, पाय थकतात त्यांचे.
आपली तीच ती छबी न्याहाळून,
डोळेही शिणतात, कंटाळा येतो.
किती पहायचे? शेवटी सगळे आरसेच.
'काय मुलुखावेगळा छंद हा, नाही?'
'पण परिश्रम किती घेतले असतील.'
'हौसेला खरंच मोल नसतं.'
'एका आरशात दिसतं, तेच दुसर्यांत,
काय करणारे हा इतक्या आरशांचं?'
'सरकारने ताब्यात घ्यावा हा संग्रह,
छानसं म्युझियम होईल, नाही का?'
नानाविध प्रतिक्रिया, मतं, प्रतिवाद,
माझ्या सवयीचं झालंय आता सारं.
एक जण मात्र निघाला, समोर येऊन बसला.
"दोन प्रश्न विचारू कां?" मला म्हणाला.
मी मान डोलावली, तशी म्हणाला, "का?"
मी म्हटले,"आणि दुसरा प्रश्न?"
"आणखी किती जमले की थांबणार?"
त्याचा दुसरा प्रश्न, तयारच होता.
"दुसत्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो,
मग पहिल्याचं, कदाचित नाही द्यावं लागणार.
खरं उत्तर आहे, 'मला माहीत नाही'.
मलाही वाटतं, कधी कधी,पुरे झाले आता,
थांबावं इथेच. नको आणखी आरसे.
पण एकच आरसा आणखी हवाय,
तो मिळेपर्यन्त, कसं थांबणार?"
"आणखी कसला आरसा हवाय तुला?"
"तू नीट पाहिलंस का? संग्रहातला
एक आरसा दुसर्यासारखा नाही.
तुला काय दिसलं, ठाऊक नाही, पण
मला प्रत्येकात दिसतं वेगळं प्रतिबिंब.
एक मी दुसर्या मी सारखा नाही.
अजून शोधतोय, शेवटचा एक आरसा,
जो दाखवेल, जुन्यातल्या एकातरी
प्रतिबिंबाची पुनरावृत्ती.
एकदातरी, फक्त एकदाच,
एकाची दुसरी हुबेहूब आवृत्ती.
घेऊन ये, माझ्या साठी, मिळाला तुला,
कुठे जर, असला आरसा, शेवटचा."
बापू
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/107913.html?1146893680
छान, ओघवती व आशयपूर्ण !
छान, ओघवती व आशयपूर्ण !