मेरा भारत महान

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2016 - 08:09

इ.स. २००७ च्या आसपासची गोष्ट! आमचा एक टँकर चक्क सिलिगुडीला निघाला होता. तेथील कोकच्या प्लँटची ऑर्डर म्हणजे घबाडच होते. प्रॉडक्टच्या चौपट पैसे नुसते भाड्याचेच व्हायचे. आता पुण्याहून सिलिगुडी म्हणजे एक टँकर दहा दिवसांसाठी सप्लाय चेनमधून हद्दपार असेच समजायचे. त्यामुळे घसघशीत प्रिमियम रेट घेऊनच ऑर्डर फायनल केलेली होती. ह्या दहा दिवसांत हा टँकर नसल्यामुळे बाकी व्यवसायावर काय परिणाम होऊ शकेल ह्याची एक्सेल वर्कशीट चौघापाचजणांनी डोळ्याखालून घालून मगच ही ऑर्डर मान्य केली गेली होती. व्यवसायावर काहीही विपरीत परिणाम होऊ न देता भर सीझनमध्ये एक टँकर सिलिगुडीला पाठवणे शक्य आहे हे सिद्ध केल्यावरच एस ओ सी अनब्लॉक झाली होती.

पुणे - नगर - औरंगाबाद - नागपूर - दुर्ग - भिलाई - रायपूर - बिलासपूर - आणि मग पुढे पश्चिम बंगाल! सुमारे सव्वा दोन हजार किलोमीटरचा प्रवास असावा.

काहीच्या काही रूट होता. देश कुठल्याकुठे पसरला आहे हे जाणवले. मेरा भारत महान!

लेक सासरी नांदायला जात असावी तसे टँकरचे कोडकौतुक केले गेले. सतराशे साठ प्रकारचा मसाज केला गेला टँकरला! ड्रायव्हर आणि क्लीनर दोघांनाही वेगळा व विशेष भत्ता कबूल करण्यात आला. नियमाप्रमाणे छत्तीसगड आणि पश्चिम बंगालची परमिट्स स्पेशली घेण्यात आली.

एकदाचं गाडं भरलं आणि हललं! नारळबिरळ फोडण्यात आला. टँकर आहे की विमान असा प्रश्न पडावा असे कौतुक चालले होते. ड्रायव्हर एखाद्या उत्सवमूर्तीप्रमाणे वावरत होता. एका बारक्या एच आर ऑफीसरने उगाच एक पाच मिनिटांचे भाषणही ठोकून घेतले. फोटोबिटो झाले. ते इमेलबिमेलवरून देशभरातील सगळ्या ऑफिसेस आणि प्लॅन्ट्समधून झळकवण्यात आले. एकमेकांची अभिनंदने करून झाली. ऑर्डर मिळवल्याबद्दल वगैरे आम्हाला शाबासक्या मिळाल्या. सेफ्टी व्हॉल्व्ह किती वेळा उडेल ह्याचा अंदाज कोणालाच नव्हता. पाठवायचा अकरा टन माल आणि पोचणार नऊ टन असे नको व्हायला म्हणून सूचना देण्यात आल्या होत्या. कुठून कुठून फोन करायचे ते ड्रायव्हरकडून घोकून घेण्यात आलेले होते. पूर्वी मुलगा विलायतेला जाताना आईचे डोळे भरून येत असत तसा ट्रान्स्पोर्टर गहिवरला वगैरे! हल्ली मुलगा देशातच थांबला तर डोळे भरून येतात. एक गोविंद म्हणून 'अधेड उम्र'चा उत्तर भारतीय मुनीम जहाज समुद्रात दिसेनासे होताना बघतात तसा टँकर दिसेनासा होईपर्यंत बघत राहिला. त्याला वाटत असावे की दिड दोन किलोमीटरमध्येच ड्रायव्हरचा आवेश गळून पडेल आणि सिलिगुडी ह्या नावाने धडकी भरल्यामुळे घाबरलेला ड्रायव्हर टँकर परतपावली आणेल. टँकर दिसेनासा होताक्षणीच त्याने ड्रायव्हरला फोन लावला व खालील पॅराग्राफ उच्चारला:

"कहां पहुंचे? अच्छा! फिक्र मत करना! कई गाडियां चलती है लंबी! तुम कोई अकेले नही हो! और सुनो? यहांकी चिंता मत करो! यहां हम है! सेफ्टी उडनेसे पहिले पचास एक किलो छोडदिया करो! पता चला गाडी सात टन माल खाली करके लौटी! खोलके मारेंगे साब लोग दिनदहाडे! दिनमे सोना! रातमे डिजलभी कम लगता है! रफ्तारभी मिलती है! और छत्तीसगडके दुसरे टोलपे बोलना चित्तर नही चाहिये! रसीद लगेंगी कंपनीमे! नही तो वहाँसे फोन करो! हम बात करेंगे सालोंसे! बहेणके स्साले चित्तर थमादेते है! भेडियोंके, शेरके, भैंसके! दस रुपयेकी भैंस और सौ रुपयेका तेंदुआ! समझे? रसीद मांगलेना! बोलना तेंदुआ चलता नही अकाऊंट्समे! कहां पहुंचे? अच्छा! भिलाईसे पहले दुर्गमे बंटी ढाबा होगा! रोट्टी खालेना वहां! रख्खूं? हां!"

टँकर चार किलोमीटर नाही गेला तर ह्या गोविंदने त्याला इतके सल्ले दिले. काय होणार त्या ड्रायव्हरचे?

पण हीच आपुलकी व्यावसायिकतेच्या पुढे जाऊन पोचते ती केवळ आपल्या देशातच! मेरा भारत महान!

छत्तीसगडच्या एका टोलनाक्यावर पावत्याच देत नसत. त्याऐवजी लहान लहान चित्रे देत असत कागदी! लांडगा, गेंडा, म्हैस, सिंह, बिबटा, कोंबडा अशी चित्रं! प्रत्येक पशूची एक विशिष्ट किंमत ठरलेली असायची. तुमची मल्टि - अ‍ॅक्सल गाडी असेल आणि चारशे पस्तीस रुपये टोल असेल तर चार बिबटे, एक म्हैस आणि एक चिमणी मिळायची. ही चित्रे ऑफिसमध्ये नेऊन दाखवली की अकाऊंट्सवाले ट्रान्स्पोर्टरच्या पार्श्वभागावर शाब्दिक लाथा घालून त्याला हाकलून देण्याचा एक महोत्सव ठेवायचे. मग त्याला एक डिक्लरेशन द्यावे लागायचे की छत्तीसगडमध्ये सिस्टीमच अशी आहे. मग टोल बिल पास व्हायचे. अकाऊंट्सच्या जुन्या पोतड्यांमध्ये असे अनेक पशू एकत्र नांदत होते. आमच्या प्रॉडक्टची गाडी सिलिगुडीला प्रथमच चालली होती. पण छत्तीसगडला ह्यापूर्वी काही वेळा जाऊन आलेली होती. त्यामुळे आमच्या प्रॉडक्टच्या चोपड्यांमध्येही काही सजीव नांदत असत. एकदा एका ड्रायव्हरने दोन गेंडे आणि एक हरीण स्वतःच टोलवर देऊ केले. त्याला शिवीगाळ करण्यात आली. ती करन्सी एकाच बाजूला वापरण्याची मुभा होती. असा मेरा भारत महान!

काळजाचा तुकडा दूर जावा तसे चेहरे करून काहीजण प्लँटमध्ये परतले. दुसर्‍या दिवशी सकाळी आठपासून सगळ्यांना एक नवीन विषय मिळाला चर्चेला आणि इमेलबाजी करायला! 'आपण कसे स्मार्ट' हे दाखवण्यासाठी इमेलचा जितका उपयोग होतो तितका तो प्रत्यक्ष कामासाठी होत नाही. टँकर कुठे आहे, जिथे आहे तिथेच का आहे, गेल्या काही तासांत विशेष काय घडले ह्याची माहिती विविध कर्मचार्‍यांकडून इमेलवर येऊन आपटत होती. उगाचच रनिंग कॉमेंट्रीमुळे तणाव वाढू लागला होता. चहाची वेळ असो वा लंचटाईम, आमच्या बिझिनेसशी संबंधीत लोक फक्त 'सिलिगुडीच्या गाडीचं काय झालं रे' इतकंच बोलत होती.

हे झालं आमच्याकडचं, म्हणजे लेकीच्या माहेरचं! तिकडे सासरी सुरू झालेली बोंबाबोंब निराळीच होती. सासर म्हणजे कस्टमर! सिलिगुडी नावाच्या ठिकाणी भर सीझनमध्ये स्वतःचा एकही टँकर पाठवायला आमचा एकही स्पर्धक तयार झालेला नसल्यामुळे आम्ही ही आव्हानात्मक ऑर्डर घेताना प्रिमियम वाजवून घेतलेला होता. पैसे अ‍ॅडव्हान्स घेतलेले होते. ब्लॅंक सी फॉर्म अ‍ॅडव्हान्स घेतलेला होता. तेव्हा तोही मिळत असे. एवढे सगळे झाल्यामुळे आता सासरचे आमच्या उरावर चढणार ह्यात शंका नव्हतीच. दर अर्ध्या तासाने माझ्या किंवा मी अगदीच हिंस्त्रपणे रिअ‍ॅक्ट होत असेन तर इतर संबंधितांच्या मोबाईलवर कोणी ना कोणी बंगाली मनुष्य तारस्वरात बोंबलत होता. पश्चिम बंगालमधील बायका तेथील मिठाईप्रमाणे रसरशीत आणि पुरुष तेथील बकाल, गोड्या पाण्यातील माश्यांप्रमाणे तेलकट आणि कळकट्ट असतात. काही वेळा त्या बायकांची कीव येते. ह्या कश्या काय अश्या पुरुषांना पसंत करत असतील असे वाटते. त्यात बहुतांशी पुरुष तोंडातून स्वस्त सिगारेटचा धूर काढून विश्वाचे गांभीर्य डोळ्यातून प्रकट करत सगळ्यांना अक्कल शिकवत वावरत असतात.

तर कस्टमरचा फोन आला की सुरुवातीला उत्साहाने माहिती पुरवणारे आम्ही नंतर त्यांना अद्वातद्वा बोलू लागलो. एक तर बाण आमच्या धनुष्यातून सुटलेला होता. 'तो आमच्यापर्यंत कधी पोचणार' असे विचारून शत्रू भर रणांगणात आमचा अपमान करत होता. आणि बाण तत्क्षणी नेमका कुठे आहे हे त्या ड्रायव्हरशिवाय अखिल ब्रह्मांडात कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे कावलेलो आम्ही कस्टमरला 'भाईसाहब पाच दिन बताये थे ना? आप दुसरेही दिन टँकर किधर है पूछ रहे हो! अरे हां सरजी पेमेंट अ‍ॅडव्हान्स किया है मानते है! लेकिन आप जरा इन्डियाका मॅप तो देखिये? कहा पूना कहा सिलिगुडी?' असे बोलू लागलो होतो. ही अवस्था केवळ दुसर्‍या दिवशी दुपारी चार वाजता आलेली होती. अजून तीन दिवस काढायचे होते.

शेवटी एकदा रात्री मला ड्रायव्हरचा फोन आला. म्हणाला........

"साहब मै छत्तीसगड बॉर्डर क्रॉस किया हूं! लेकिन एक्श्ट्रा तीन हजार लिये मेरेसे! यांके साब बोले कोई अलग टॅक्स है करके! और साहब, इस बार भी टोल की रसीद नही दी! वही चित्तर थमाये है! क्या करूं"

"तुम निकलो यार आगे! ये सब बादमे देखेंगे! पहले निकलो और पहूंच जाओ"

मेरा भारत महान!

निदान उद्या सकाळी बंगाल्यांना सांगायला माझ्याकडे काहीतरी होते. आता खरे तर अजून दोन दिवस लागायचेही कारण नव्हते. दिड दिवसांत गाडी पोचायला हवी होती.

ड्रायव्हरकडे मोबाईल असण्याचा तो काळ नव्हता. ड्रायव्हरला जर वाटले की 'आपण एका कंपनीसाठी काम करत असून त्या कंपनीचा माल उरावर घेऊन कुठेतरी उधळलेलो आहोत आणि कुठे उधळलेलो आहोत हे जर त्या कंपनीला समजले तर त्या कंपनीला हा बिझिनेस सुरू केल्याचे समाधान मिळेल' तर ड्रायव्हर फोन करायचा. ड्रायव्हर आम्हाला करत असलेल्या फोनच्या वेळा ह्या त्याच्या सोयीच्या असत. आमच्या नव्हे. सायंकाळी सात वाजता भर ट्रॅफीकमध्ये असताना त्याचा फोन येऊ शकायचा. रात्री पावणे अकरालाही येऊ शकायचा. तसेच तो केवळ मलाच येईल असे नाही. कधी ट्रान्स्पोर्टरला, कधी मुनीम गोविंदला तर कधी वेअरहाऊसमध्ये! त्यामुळे हेलिकॉप्टरमधून पडणारी अन्नाची पुडकी मिळवायला दुष्काळी प्रदेशातील जनता जशी सैरावैरा धावते तसे सकाळ झाली की आमच्याकडील लोक धावत सुटायचे. 'अरे तुला काही फोन आला का, मला काल दुपारी आला होता, नंतर काही समजलेच नाही, वर्गीसला म्हणे संध्याकाळी आला होता' वगैरे असे चाललेले होते.

तिसर्‍या दिवशी सकाळपासून त्या बंगाल्यांनी एक बग्गा नावाचा सरदारजी पाळला. ह्या सरदारजीचे का होते फोन करून भंडावणे! तो इतका थोर हेर होता की तो मला पहिला फोन करायचा. मी जर म्हणालो की काल टँकर छत्तीसगडमध्ये होता तर विचारायचा की मग अजून अठरा तासात पोचायला हरकत नाही ना म्हणून! त्यावर मी त्याला 'छे छे, अजून दोन दिवस' असे म्हणालो की तो माझा फोन ठेवून दुसरा फोन त्वरीत वर्गीसला लावायचा. वर्गीसला सांगायचा की मार्केटिंगवाले म्हणतायत दोन दिवस लागतील. हे बरोबर आहे का? वर्गीस हो म्हणायचा. मग तो ट्रान्स्पोर्टरला फोन करून सांगायचा की तुमच्या गाडीत दम नाही. दोन दिवस म्हणजे झाले काय? खरे तर त्या सरदारजीला 'गाडीत' हा शद बोलायचा नसून वेगळाच बोलायचा असायचा. पण ट्रान्स्पोर्टर भडकून काहीतरी बकायचा. मग चौथा फोन गोविंदला! गोविंद म्हणायचा 'दो दिन किसलिये लगेंगे? आज रात वेस्ट बेंगॉल बॉर्डरके पार होगी गाडी'! मग तेवढे ऐकून तो पुन्हा मला पाचवा फोन लावून तेच क्रॉस चेक करायचा. मग मी 'दोन दिवस' ह्या गोष्टीवर ठाम राहायचो आणि फोन संपला की ट्रान्स्पोर्टर आणि गोविंदची ठासायचो. अकरा टन माल घेऊन एका रात्रीत तुमचा आजा पोचलावता का छत्तीसगडहून पश्चिम बंगालमध्ये असे विचारायचो. वर हेही म्हणायचो की कस्टमरला वाट्टेल त्या कमिटमेन्ट्स देता त्या आधी आमच्यासाठी पूर्ण करून दाखवा. ते दोघे वरमले की मला लक्षात यायचे की गोविंद बावळट आहे आणि सरदारजी हरामखोर! मग मी कस्टमरलाच फोन केला.

"सर एक बात बताईये! ये जो आपने बग्गा हमारे पीछे लगादिया है, ये क्या आदमी है वहांपर? असोसिएट? मतलब? क्या उमर क्या है उसकी? तो भाईसाहब, उसे प्लीज बताईये की जरा लिहाज रख्खे! वो किसीकोभी कुछभी बोले जा रहा है" वगैरे वगैरे!

टँकर अजून आमच्या आदेशाखाली असल्याने आणि पोचलेला नसल्याने कस्टमरही जरा नमते घेत होता. पण थोड्या वेळाने पुन्हा बग्गा उधळत होता. शेवटी मी त्या बग्गाला सांगितले.

"भैय्या एक काम करो! आप एक गाडी निकालके छत्तीसगडकी तरफ निकलो. जहांभी ये टँकर मिले उसे पकडकर प्लँट ले जाओ"

तर तो बग्गा म्हणाला:

"वो तो हम निकलही रहे है जी? आधे घंटेमे हमारे यहाँके तीन लोग निकलरहे है"

मेरा भारत महान!

त्यांची किती दयनीय अवस्था होती ते मला लक्षात आले. क्षणभर वाईटही वाटले. पण आम्हीही काही कमी त्रास झेलत नव्हतो. दहा दिवस एक टँकर भर सीझनमध्ये बाहेर पाठवायचा म्हणजे कोणत्याही क्षणी दुसर्‍या जवळच्या व नियमीत मिळणर्‍या ऑर्डर्स जाण्याची शक्यता! अतिशय संवेदनशील प्रकरण! वरतून शिव्या मिळण्याचे भरपूर पोटेन्शिअल!

अचानक मला वेअरहाऊसमधील जांभळेचा फोन आला. हा मनुष्य जेव्हा फोन करायचा तेव्हा काहीतरी वाईटच सांगायचा हा माझा आजवरचा अनुभव होता.

"साहेब मेल वाचली का?"

"कोणाची बाबा?"

"मदन सिंग"

"काय झालं?"

मी विचारतच मेलबॉक्स रिफ्रेश केली.

फ्रॉम मदन सिंग!

खाडकन क्लिक केलं! कारण सब्जेक्ट होता 'टँकर टू सिलिगुडी'!

खाली लिहिलेले होते.

'आय अन्डरस्टँड दॅट प्रॉपर को-ऑर्डिनेशन इज नॉट बीइंग डन इन धिस केस. वुई हॅव अ कस्टमर कंप्लेंट हिअर अ‍ॅट नॉयडा अ‍ॅन्ड आर एन्टरिंग इट इन द सिस्टीम. मेक शुअर इट इस रिझॉल्व्ह्ड इन नेक्स्ट टू अवर्स'!

वाजले होते संध्याकाळचे साडे सहा! म्हणजे रात्र घालवावी लागणार का काय? हे मदन सिंग म्हणजे ऑल इन्डिया सप्लाय चेन हेड! ह्या भाऊला काय प्रॉब्लेम झाला होता? एक तर टँकर ह्याच्याच अखत्यारीत आणि मेल लिहितोय मार्केटिंगला! त्यात अ‍ॅड्रेस केलीय मला, माझ्या साहेबाच्या लेव्हलच्या माणसाने! आणि माझ्या साहेबाला सी सी! आणि वर स्वतःच्याच कारभारातील गलथानपणाची बाहेरून आलेली कंप्लेंट स्वतःच लॉज केलीय सिस्टीममध्ये मूर्खासारखी! आणि ती सोडवायची आम्ही! 'कमी तिथे आम्ही'पेक्षा वाईट अवस्था झाली होती. तिकडून सरदार बग्गा कोकलत होताच. त्यांची एक गाडी टँकर शोधायला निघणार होती ती कॅन्सलच झाली म्हणे! त्यामुळे त्या बग्गाला अधिकच जोर चढला. इकडे त्या कस्टमरकडच्याच्या वरिष्ठांना दादापुता करून आम्ही एक मेल मागवली

'वुई कॅन अन्डरस्टँड दॅट ड्यू टू लाँग डिस्टन्स द व्हेइकल मे टेक लिटल लाँगर अ‍ॅन्ड अल्सो मेक अ मेन्शन दॅट यूअर पूना स्टाफ इस कीपिंग अस पोस्टेड रेग्युलरली'

ही मेल नॉयडाच्या कस्टमर ग्रिएव्हन्स सेलला आणि सर्व संबंधितांना फॉर्वर्ड करून कंप्लेंट रिझॉल्व्ह करून घेतली आणि तो नंबर मदन सिंगच्या मेलला रिप्लाय म्हणून पाठवून हुश्श केलं तर ड्रायव्हरचा फोन!

'साब रोड ब्लॉक है! गाडी ढाई दिन रुकेगी!'

मला शोभून दिसतील त्या सर्व शिव्या त्याला घातल्या. तो जिथे थांबला होता तिथला एक लोकल नंबर टिपून घेतला. ट्रान्स्पोर्टरला फोन केला. त्याने गोविंदला मधे घातले. गोविंदने माझ्याशी बोलताना ड्रायव्हरचीच अक्कल काढली. म्हणे त्या रस्त्याच्या अलीकडे आणखी एक रस्ता आहे तिथून जरा लांब पडेल पण थांबावे तरी लागणार नाही. मी गोविंदला त्या ड्रायव्हरचा स्थानिक नंबर दिला. पंधरा मिनिटांनी गोविंदने भडकून मला फोन केला. म्हणे तो मूर्ख ड्रायव्हर त्या लांबच्याच रस्त्याने निघाला होता आणि तोच रस्ता ब्लॉक होता. आता तो योग्य रस्त्याने निघाला आहे.

हे ऐकल्यावर मी घरी फोन केला की आज माझी जेवणाला वाट पाहू नका आणि माझ्यासाठी केलेला स्वयंपाक उद्या थोडा थोडा करून कबूतरांना घालूयात. असे बोलून्मी फोन आपटला आणि हॉटेल सुवर्ण प्लाझाला जाऊन अ‍ॅन्टिक्विटी ब्ल्यूची ऑर्डर दिली.

मेरा भारत महान!

च्यायला त्या ड्रायव्हरला अक्कल चालवायला कोणी सांगितली होती? उगाच रक्तदाब खालीवर! मी गोविंदसाठी ट्रान्स्पोर्टरकडे निरोप ठेवला की पुढच्यावेळी गोविंद भेटेल तेव्हा त्याने पाचशे रुपये बक्षीस घेऊन जावे.

रात्री साडे दहाला बग्गाचा फोन आला. हा मनुष्य दिवसातील कोणत्याही वेळी तितकाच उत्साही आवाज कसा काढू शकतो असे कोडे मला पडले. त्यात मला किंचित चढलेलीही होती. मी बग्गाला म्हणालो........

"आप लोग जो फॉलो अप कर रहे है ना भाईसाहब? वो देखके मुझे ऐसा लगने लगा है मै आपकी कंपनीका एम्प्लॉयी हूं और टँकर रवाना करनेके लिये यहाँ आकर बैठा हूं! एक बात बताओ भैय्या? आपको ऐसा लगता है क्या, के मुझे और कोईभी काम नही है?"

झाप झाप झापला त्या बग्गाला! बिचारा हिरमुसला. तेवढ्यात गोविंदचा फोन! अगदी हसत हसत!

"अरे साहब आपने क्या बोलदिया? इनाम दे रहे है सुना है?"

"गोविंद, इनाम नही सिर्फ पाचसौ रुपये"

"हा हा हा हा, वो तो इनामही हुवा साहब! अब देखिये मै उसको कैसे भगाता हूं"

मेरा भारत महान!

"तो तुम्हे उसे भगाने के लिये पाचसौ रुपये चाहिये थे"

"अरे नहीं नहीं साहब, आपका दिल बडा है, नही तो अग्ग्रवालसाहबसे दस रुपये नही छुटते"

"रख्खो अब"

"जी जी"

गोविंद मोटिव्हेट झालेला पाहून मी स्वतःच बग्गाला फोन करून सांगितले की आता लवकरच टँकर पोचेल. त्याने कधी असे विचारले त्यावर माझ्याकडे नेमके उत्तर नव्हतेच. काहीतरी बोलून मी फोन बंद केला. बग्गाला निदान मी फोन केल्याचे समाधान मिळाले ह्याचेच मला बरे वाटले. ह्याच बग्गाच्या कंपनीने काही तासांपूर्वी केलेली कंप्लेंट सिस्टीममध्ये घुसली होती ह्याचे मला टेन्शन आल्यामुळे मी बग्गाला जरा फोनवरून शांत केले इतकेच.

आजची रात्र बरी जाणार होती. काही झाले तरी उद्या टँकर पोचणारच होता. अपेक्षेपेक्षा जरा लवकरच पोचणार होता हे आणखीन चांगले होते. त्यात उद्या सिलिगुडीवाले आणखी दोन टँकर्सची ऑर्डर फायनल करण्याचे ठरवणार होते. एकंदरीत बरा काळा आला असावा. मी घरी जाऊन असा चेहरा करून झोपलो जसे चेहरे करून लोक घराबाहेर पडून ऑफिसला निघतात. नशिबाने एक हे सिलिगुडी प्रकरण सोडले तर दुसरे काहीही पेटलेले नव्हते.

सकाळी जरा उशीराच उठलो. मोबाईलवर चंद गुड मॉर्निंगचे मेसेजेस होते. एक अगम्य मिस्ड कॉल होता. हा नंबर साधारण पूर्व भारतातला आहे हे मला समजले. म्हणजे ड्रायव्हरचा कॉल येऊन गेलेला असणार. मी कॉल बॅक केले नाही कारण अनेकदा ड्रायव्हर्स कॉल लागला नाही की पुढे निघून जातात. कोणीतरी बूथवाला तिरसटासारखा बोलतो.

माझे आवरून झाले आणि पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला. मी घाईघाईत घेतला तर ड्रायव्हर!

"साब, यहां पहुंचगया हूं मै"

"कहां?"

"ये....बॉर्डरपे"

"अच्छा, तो अब?"

"यहांसे छोड नही रहे है साहब"

"कौन?"

"बॉर्डरवाले"

"क्यूं?"

"बोलते है ऐसी गाडिया नहीं छोडते"

"ऐसी मतलब?"

"बोलते है गाडीपे संदेसा पेंट करवाओ पहले"

"काहेका संदेसा भैय्या?"

"मेरा भारत महान"

"क्या?"

"मेरा भारत महान"

"मतलब?"

"बोलते है गाडीपे मेरा भारत महान पेंट करवालो, तब जाके छोडेंगे बॉर्डरसे"

"ऐसा क्यूं?"

"ऐसाही है साहब! वेस्ट बेन्गॉलमे एन्ट्री लेनेके लिये मेरा भारत महान लिखा हुवा होना जरूरी है"

"ये कौनसा रूल है?"

"सभी गाडियोंपे लिखा हुवा है साहब"

"तो तुमको मालुम नही था?"

"अब हमे कैसे पता रहेगा साहब?"

"क्यों? इतने सारे ड्रायव्हरोंसे मिलते रहते हो? और गोविंदनेभी नही बताया?"

"ना! गोविंद बुढा है"

"गोविंद बुढा है से क्या मतलब है? जानता तो है वो बहोत कुछ"

"उसने नही बताया साहब"

"तो अब लिखवालो ना?"

"कहांसे लिखवाये सर? यहां कोई हैही नही?"

"मतलब?"

"पेंटर बॉर्डर के अंदर है"

"अंदर? कितना अंदर?"

"यही चार छे किलोमीटरपे"

"अरे तो जाओ ना? उसे लेकर आओ"

"और गाडी?"

"क्या गाडी?"

"गाडी कैसे ऐसेही खडी करे?"

"क्यों? क्लीनर कहां है?"

"वो तो कलही दोपहरमे लौटा"

"क्या???????? कहां लौटा?"

"पूना"

"क्यूं????"

"उसके घरमे कुछ तो हुवा"

"अरे क्या बात कर रहे हो तुम? तो ये कल रात क्युं नही बोले?"

"हम तो जाही रहे है ना?"

"साले क्लीनर बीच रास्ते लौटगया और तुम्हे कुछ लगाही नही? कैसे इन्सान हो तुम?"

"अभी क्या करूं साहब?"

"अब नाचो वहां"

"अब हम क्या करेंगे साहब? वो हमारी सुनेबगैरही निकल गया!"

"ये लफडा क्या है लेकिन मेरा भारत महान?"

"अब ये पेंट किये बिना नही जा सकता अंदर"

"तुम इसी नंबरके आसपास रहो! मै कस्टमरसे बात करके बोलता हूं! काहेका मेरा भारत महान यार!"

मी वैतागून फोन ठेवला तर घरातले हसत होते. त्यामुळे आणखीनच वैतागून मी बग्गाला फोन लावला तर बेणं नेमकं आजच हाफ डे वर होतं! मग कस्टमरकडच्या काही वरिष्ठांना मी ही बातमी दिली तर ते म्हणाले 'मेरा भारत महान' पेंट करून देणारे तिथेच बसतात बॉर्डरवर! तसे तिथे कोणी नाहीयेत म्हणालो तर म्हणे आम्ही काय इथून पेंटर पाठवू का?

आता आली का पंचाईत? त्यात दुष्काळात तेरावा! ड्रायव्हरचा पुन्हा कॉल!

"साहब सेफ्टी बजी"

"कितना गया?"

"लगभग तीनसौ किलो"

"पहलीही बार बजी ना?"

"नही जी, दुसरी बार"

"अरे? तो ये कब बताओगे?"

"साब वो कुछ नही, लेकिन सेफ्टी बजी तो यहां भगदड मची"

"क्युं?"

"सब डरगये है"

"कौन सब?"

"ये बॉर्डरवाले और बाकी ड्रायव्हर वगैरे"

"डरनेजैसा क्या है उसमे? वो तो हवामे गया ना गॅस?"

"हा साहब लेकिन बोलते है दस किलोमीटर पीछे जाओ"

"अरे उनको बोलो के अब नही उडेगी"

"नही सुन रहे है साहब! हम जा रहे है पीछे"

ह्यावेळी फोन ड्रायव्हरनेच आपटला. मला आता हातात येईल ती वस्तू उचलून फेकावीशी वाटू लागली होती.

मेरा भारत महान!

त्यानंतर मी घरातूनच किमान तासभर अव्याहत फोनाफोनी आणि मेलबाजी केली.

'मेरा भारत महान' हे तीन शब्द कधीतरी इतके भयंकर महत्त्वाचे ठरतील असे मला अजिबात वाटले नव्हते.

कोणीही सहकार्य करू शकत नव्हते. इच्छा असूनही! कस्टमर प्रचंड फॉलो अप करत होता. नॉयडाला सगळे आपल्याच धुंदीत होते. भारतात कुठेतरी एक टँकर 'मेरा भारत महान' लिहिले नाही म्हणून अडकला आहे ह्याची कोणालाही जणू फिकीर नव्हती. काल ह्याच टँकरबाबतची कंप्लेंट सिस्टीममध्ये टाकताना मात्र हवे तसे पॉलिटिक्स करून घेण्यात आले होते. आज त्या गावचेच नव्हते कोणी! इकडे ट्रान्स्पोर्टर पेंढा भरलेल्या हरणासारखा स्वतःच्या ऑफीसमध्ये निर्जीवपणे बसला होता. सध्याच्या परिस्थितीत त्याच्या हातात काहीही नव्हते. गोविंद फुटाण्यासारखा एकटाच तडतड उडत होता पण तेही केवळ दाखवण्यापुरतेच की त्याला खूप काही करणे शक्य आहे. प्रत्यक्षात त्याच्याकडे काहीही सोल्यूशन नव्हते.

मेरा भारत महान!

काय संबंध ह्या पाटीचा? भारत देश काय वेस्ट बेन्गॉलपाशी सुरू होतो? बाकीची स्टेट्स काय अफगाणिस्तानात आहेत?

शेवटी मी एक मेल टाकली सगळ्या ऑफीसला. त्यात स्पष्ट लिहिले की असा असा काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो सोडवणे तूर्त कोणालाच शक्य नाही आहे. ज्या क्षणी ते शक्य होईल त्या क्षणी टँकर पुढे निघेल.

अक्षरशः प्राणायाम करून आणि मन शांत करून मी प्रयत्नपूर्वक सिलिगुडीच्या टँकरचा विचार मनातून दूर केला आणि ऑफीसला निघालो. मला आता कस्टमरचा कॉल येत नव्हता. नॉयडाचा येत नव्हता. गोविंद, ट्रान्स्पोर्टर, वर्गीस कोणाचाही कॉल येत नव्हता. मी नेहमीची कामे करत राहिलो.

दिवस कसा गेला ते समजलेच नाही. संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत मी सिलिगुडी ह्या विषयावर एक क्षणही घालवला नाही. आणि साडे सात वाजता ती भयानक घटनेची नांदी देणारा कॉल आला. 'जांभळेचा कॉल'! जांभळेचा कॉल म्हणजे काहीतरी आक्रीत घडलेले असणार हे नक्की होते! तो वेअरहाऊसला बसायचा आणि 'शुभ बोल नार्‍या' म्हंटले तर 'मांडवाला आग लागली' इतकेच त्याला बोलता यायचे. जाड भिंगाच्या चष्म्यामुळे त्याचा चेहरा नीट कधी दिसायचाच नाही. सतत गंभीर असनार्‍या जांभळेला मी आजतागायत हसताना पाहिलेले नव्हते.

जांभळेचा कॉल पाहून मी मनातच एक शिवी हासडली आणि कॉल घेतला.

"साहेब, मेल वाचली का?"

ह्या जांभळेला हा एकच प्रश्न विचारता येत असावा आणि तो एकाच वेळी म्हणजे संध्याकाळी, सगळे सामसूम झाल्यावरच विचारता येत असावा.

"काय झालंय ते बोल बाबा"

"टँकर पोचतोय उद्या पहाटे"

"कुठे????????"

जमीन दुभंगली. ड्रायव्हर म्हणाला होता 'हम जा रहे है पीछे'! पीछे म्हणजे दहा किलोमीटर! हे मला नीट माहीत होते. पण तरी ज्याने आजवर फक्त दाणादाणच पाहिलेली असते त्याच्या मनात प्रथम असलेच विचार येतात. मला वाटले काहीतरी भलतेच कारण घडल्यामुळे टँकर परत येतोय की काय! तर जांभळे म्हणाला

"सिलिगुडी"

"कसा काय????????"

"आता काहीतरी साडे चारशे का काहीतरी किलोमीटर राहिलंय म्हणे"

"अरे पण बॉर्डरवरून?"

"काय?"

"ते मेरा भारत महानचं काय झालं?"

"अहो साहेब तुम्हाला काहीच माहीत नाही का?"

"काय?"

मी मेल बंद केलेली होती. परत उघडायची इच्छाच होत नव्हती. जांभळे बोलू लागला........

"त्या क्लीनरचा मला वाटेतून फोन आला. त्याला मी झापले. तसा तो उलटा निघाला. त्याला मी सांगून ठेवले होते त्याप्रमाणे त्याने पश्चिम बंगालमधून बाहेर आलेल्या एका ट्रकवरचा एक स्टीकर काढून तीनशे रुपयांना विकत घेतला. तो नेऊन त्याला मध्ये आपला टँकर दिसला त्याच्यावर त्याने चिकटवला. मग टँकर बॉर्डर क्रॉस करून पुढे गेला. तोवर मदन सिंग साहेबांच्या विनंतीवरून कस्टमरने सिलिगुडीहून एक पेंटर आणि एक माणूस असलेली गाडी सोदलेली होती. ती आता त्यांना वाटेत भेटणार आहे कुठेतरी! आता त्या पेंटरचा काही उपयोग नाहीच्चे म्हणा! पण निदान एस्कॉर्ट व्यवस्थित मिळेल. तो बग्गा नाही का? तो बग्गा ऑफीसला आला म्हणे आणि तडक बॉर्डरकडेच निघाला गाडी घेऊन! इकडे क्लीनरच्या भावाला गोविंदने अ‍ॅडमीट केलंय बराच आजारी आहे म्हणून! ट्रान्स्पोर्टरने एक वेळची सेफ्टी रिलीज स्वतःच्या अकाऊंटमध्ये घ्यायची तयारी दाखवलीय! कस्टमरने अजून दोन ऑर्डर्स फायनल केल्या आहेत. आणि मदन सिंग साहेबांनी तुमच्या अ‍ॅप्रिसिएशनची एक स्वतंत्र इमेल केली आहे"

मी खुर्चीला पूर्ण टेकून बसलो. दगदग, ताणतणाव, चिडचिड, रक्तदाब सगळे काही आता व्यवस्थित मार्गी लागू लागलेले होते. जांभळेला मी प्रथमच हसताना ऐकले होते आज! त्याचे त्रिवार आभार मानून मी त्याला एक पार्टी कबूल केली.

आणि घरून फोन आला.

"सुटला का रे सकाळचा प्रॉब्लेम?"

"हो हो"

"नाही, फारच टेन्शनमध्ये वाटत होतास म्हणून म्हंटलं विचारावं. ते 'मेरा भारत महानचं' मिटलं का?"

:हो हो मिटलं"

तो फोन ठेवला आणि बग्गाचा फोन आला.

"ये गाडी आपको तीन दिनमे मिलजायेगी, तो इसीको लौटादीजिये दो बार! अब तो इसके उपर स्टीकरभी है बाकायदा"

मी हसत हसत फोन ठेवला आणि समोरच्या भिंतीवरच्या नकाशाकडे पाहिले आणि हात जोडत म्हणालो........

"खरोखरच बाबा, मेरा भारत म्हणजे अगदी महान"

==================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त! आता कधीही गाड्यांच्या मागे लिहिलेले हे वाक्य वाचेन तेव्हा हे ललित आठवेल.

मेरा भारत महान. Lol

भारी किस्सा Happy
चारशे पस्तीस रुपये टोल असेल तर चार बिबटे, एक म्हैस आणि एक चिमणी मिळायची. >>> Lol हे फार फनी आहे!! अन ड्रायव्हर ने नंतर ते चलन म्हणून टोलबूथ वर वापरण्याचा प्रयत्न पण Happy

ओ माय गॉड. किती तो गोंधळ आणि किती लोकांचा वेळ वाया.

हे मेरा भारत महानचं गौडबंगाल माहित नव्हतं. म्हणून लिहिलेलं असतं काय? हा कसला वेडपट नियम?

छान.

भारी आहे किस्सा! बंगाली लोक पण ना...!

"मेरा भारत महान"ची नंबरप्लेट! क्लीनरच्या चातुर्याला दाद द्यायला हवी.

सगळा गड्बडगोंधळ छान लिहीला आहे.

शेवटपर्यंत एका दमात वाचून काढला! भारी लिहिलंय! त्या टोलवर ची चलनं कमाल आहेत! मेरा भारत महान खरोखरच_/\_

भन्नाट लिहिले आहे ! वेळी अवेळी फोन करून "साहेब मेल वाचली का?" अशी प्रस्तावना करून वाईट बातमी देणारा जांभळे अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहिला.

महान किस्सा आहे _/\_ मस्त लिहिलंय. सगळी पात्रं उभी राहिली समोर.
चित्तर प्रकरण पण भारीच !
अकाऊंट्सवाले ट्रान्स्पोर्टरच्या पार्श्वभागावर शाब्दिक लाथा घालून त्याला हाकलून देण्याचा एक महोत्सव ठेवायचे>>> 'बाप दाखव नाहीतर....' ही आम्हा अकाऊंट्स / ऑडीट वाल्यांची पॉलीसी ! Happy

जबरदस्त लिहिलेय, Lol

त्या ड्रायव्हरला सिलिगुडीला पाठवतानाचा प्रसंग वाचून मला आचार्य अत्र्यांच्या 'मी कसा झालो' ह्या पुस्तकातील अत्र्यांचे काका सासवडहून पुण्याला नोकरिला येत असतानाचा प्रसंग आठवला.

मस्त Happy

__/\__ Happy

मस्त.

जुने सेल्स चे दिवस आठवले माझा माल कधी कधी बद्दी बॉर्डर वर अडकून पडून असे. सेल्स टॅक्स वाल्याच्या टपरीत. तिथून सोडवून कस्टमरला द्यायचा. तो थर्ड पार्टी. कस्टमर सॅप वाला. ऑस्सम हॅसल्स. अश्या अनंत केसेस सोडवल्या आहेत. प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झालं.

Pages