तुला काय करायचेय मित्रा ..
किस्सा - १
मागच्याच आठवड्यातील गोष्ट.
सध्या कामाचे शेड्यूल गंडले असल्याने खाण्यापिण्याचे फार हाल चालू आहेत. रोजच बाहेर खावे लागते. बहुतांश वेळा एकटेच जावे लागते. त्या दिवशीही गेलेलो. एकटे गेले की नेमके काय खायचे हा प्रश्न असतो. माझ्यापुरता तो मी ‘मसाला डोसा’ असे उत्तर देऊन सोडवतो. नेहमीप्रमाणेच मेनूकार्ड उगाचच चाळल्यासारखे केले आणि आधीच मनात ठरवल्याप्रमाणे एक आरएमडी (रवा मसाला डोसा) ऑर्डर केला. जेवणाची वेळ असल्याने हॉटेल भरलेलेच होते. लोक वेटींगला होते. अश्यात मी एकटा जीव चार माणसांचे टेबल अडवून बसलो होतो. एक माणूस माझी परवानगी मागायची औपचारीकता निभावत समोर येऊन बसला. मी देखील तो अगोदरच स्थानापन्न झाला असूनही मोठ्या मनाने त्याला परवानगी देऊन टाकली. तसे तो ओळखीच्या माणसांना बघून हसतात तितके ऊग्र हसला. मी सुद्धा त्याच ईंटेन्सिटीचे हास्य परत केले. बहुधा इथेच चुकी झाली असावी. त्या हास्याला पकडूनच त्याने माझ्याशी संवाद सुरू केला. फार काही नाही, बस ईकडच्या तिकडच्या गप्पा.
थोड्याच वेळात माझा रवा मसाला आला. आणि मी नेहमी सारखे डाव्या हातात काटा आणि उजव्या हातात चमचा याची मनोमन उजळणी करत डोश्यावर तुटून पडलो. दोनचार घास नाही खाल्ले ते समोरच्या माणसाला उगाचच ठसका लागला. म्हणाला, "काटा चमच्याने खाण्यात मजा नाही. सरळ हाताने खायचे."
मी म्हटलं बर्रं .. उद्यापासून खातो हाताने. आता तसाही चमचा उष्टा केलाच आहे.
तरीही स्वारी हाताने खाल्यास अन्न कसे अंगाला लागते आणि मनाला खाल्ल्याचे समाधान मिळते हे उगाळत बसली होती.
ईतक्यात त्याचीही ऑर्डर आली. मेदूवडा मागवला होता त्याने. सांबार मे डुबो के.. मी मनोमन म्हटले अब आया ऊंट पहाड के नीचे. अपेक्षेप्रमाणे त्यानेही काटाचमच्यानेच खायला सुरुवात केली. आता माझी वेळ होती. त्याचे कान खायची.
"खरे तर हे हाताने खायला जास्त मजा येते"
"काय? हे, वडासांबार? पण हे कसं खाणार हाताने?"
"सिंपल आहे, मस्त कुस्करायचे सांबारमध्ये आणि डाळभाताचे घास खातो तसे ओरपायचे" मी एक किळसवाणी अॅक्शनही करून दाखवली.
"नको, चमचाच बरा आहे याला"
"अहो खाऊन तर बघा" ..
"नको!.. पुढच्या वेळी बघूया"
"मी दाखवू का कुस्करून?" .. (का माझ्या नादी लागलास? भोग आता आपल्या कर्माची फळे)
"नको, राहू द्या. चूक झाली माझी, तुम्ही खा तुम्हाला हवे तसे.." .. (फार लवकर आले हे वाक्य. मीच जास्त आक्रमकपण दाखवला की काय असे मला वाटू लागले)
"ओके!" मी विषय संपवला !
..................................................................................
किस्सा - २
दाढी करायचा मला ईतका वैताग येतो की बरेचदा हा पुरुषाचा जन्म नकोसा वाटतो. तरी एक बरे आहे की वाढलेली दाढी मला शोभते छान. त्यामुळे पुरुषार्थाचा दागिना म्हणून मिरवू शकतो. पण ती देखील एका मर्यादेबाहेर अस्ताव्यस्त वाढली तर करावीच लागते. कारण एमएनसीत काम करत असल्याने अगदीच साधू महाराज नाही बनता येत.
एका शनिवारी दुपारी हलक्या गर्दीची वेळ साधत दोन महिन्यांची उतरवायला गेलो. लगेचच नंबर लागला. खुणेनेच गाल सफाचट करायला सांगितले. पण तरीही त्या कलावंताला प्रश्न पडलाच.
"पुरा उडाना है?" .. हे विचारताना त्याच्या चेहर्यावर असे आश्चर्य होते जणू काही मी त्याला माझी मानच कापायला सांगत आहे.
"हा पुरा उडाना है"
"मूछ रखनी है?"
"नही"
"रख लो, अच्छी दिखेगी"
"मुझको तो नही रखनी. तुम को रखनी है तो काट के रख लो"
एवढे तिरसट बोललो मी, तरी तो थांबणारा नव्हताच. उलट त्याच्यातील तिरसटपणालाही मी जागे केले.
"निकालनी ही थी तो फिर बढाई क्यू ईतनी? तीन चार दिन बाद या हफ्ते मे एक बार तो दाढी बनानी चाहिये. अभी दो महिनेकी एकसाथ करोगे तो जलेगा, कटेगा, लगेगा.."
"बोअर होता है दाढी करनेको" .. मी निर्वाणीचे म्हटल्यासारखे म्हटले. (खरे तर सलूनमध्ये जायलाही बोअरच होते मला. आणि हा आणखी बोअर करत होता)
"उसमे क्या बोअर होना. मै दिनमे पचास दाढी बनाता हू.. सोचो मुझे कितना बोअर होना चाहिये" .. (फालतू विनोद)
तुला काय करायचेय मित्रा ? .. मी मनोमन म्हणालो
आणि प्रत्यक्षात तोडक्यामोडक्या हिंदी मे बोल्या,
"तुमको क्यू बोअर होगा. तुमको दाढी करनेका पैसा मिलता है. मुझको उलटा देना पडता है."
हा विनोद नव्हता. तरीही तो हसला. पण नशीब बोलायचे थांबला.
..................................................................................
- किस्सा ३ -
ट्रेनमधील किस्सा.
तासाभराचा प्रवास म्हटले की मोबाईलवर टाईमपास लागतोच. कधी व्हॉटसप, कधी मायबोली, कधी गाणी कधी गेम्स. त्या दिवशी कधी नव्हे ते फेसबूक चालू होते. शेजारची व्यक्ती नेहमीसारखेच डोके खुपसत होती.
चेहर्याने चाळीशीचे गृहस्थ दिसत होते. आणि एकंदरीतच फेसबूकचा फ देखील त्यांना माहीत नसावा असे वाटत होते. कदाचित म्हणूनच कुतूहलाने डोकावत असावेत. पण ते कुतूहल साधेसुधे कुतूहल नव्हते हे ते पचकल्यावर समजले.
"आजकालच्या सगळ्या मुलांना वेड लावलेय या ऑर्कुट-फेसबूकने" .. (ऑर्कुट बंद झालेय केव्हाचेच हे त्यांच्या गावीही नव्हते)
बोलण्याचा टोन जनरल विधान केल्यासारखाच होता. पण मी समोर फेसबूक उघडून बसलेलो असताना ते विधान मलाही थेट लागू होत होतेच. काय बोलणार अश्यावेळी,
"हो खरेयं. पण ट्रेनच्या प्रवासात तेवढाच टाईमपास होतो. मी सुद्धा तेवढ्यापुरतेच वापरतो." .. मी स्वत:च्या वागणूकीचे(!) समर्थन केले
"वाचन करायचे त्यापेक्षा. चार पुस्तके वाचायची. तेवढेच ज्ञान वाढते." .. (आता हा थेट सल्ला मलाच होता. त्यामुळे ‘तुला काय करायचेय मित्रा’ असे अखेर माझे झालेच)
"ते ही खरंय. पण माझे डोकं गरगरते ट्रेनबसमध्ये वाचन केल्याने."
"मग ईश्वराचे नामस्मरण करायचे. चित्त शांत राहते. एकाग्रता वाढते."
"हो, पण त्यासाठी देवावर जरा तरी विश्वास हवा. आणि विश्वास ठेवायला देव प्रत्यक्षात असायला हवा. कधीतरी दिसायलाही हवा."
आता मात्र ते सद्सद्गृहस्थ विंचू चावल्यासारखे माझ्याकडे बघू लागले. आणि मी मोठ्या आशेने त्यांच्या पुढच्या चेंडूची वाट पाहू लागलो. कारण आता मी त्यांना माझ्या होमपीचवर घेऊन आलो होतो.
पण खरोखरंच देव असावा. जो त्यांच्या मदतीला धावून आला. त्यांचे स्टेशन आले आणि ते उतरले.
......
मी घरी आलो. झी सिनेमावर कर्ज चित्रपट चालू होता.
तिथून रिशी पकूर ओरडला, "क्या तुमने कभी किसी से प्यार किया है??"
ईथून मी ओरडलो, "तुला काय करायचेय मित्रा...
आईवडील माझ्या चेहर्याकडे बघतच राहिले. आणि मी मान खाली घालून बेडरूमच्या दिशेने चालू पडलो.
.........................................................................................
हे सारे गेल्या महिन्याभरात माझ्याशी घडलेले किस्से. आणखी जुनेपुराणे आठवले वा नवीन घडले तर भर टाकतो सावकाश.
तोपर्यंत तुमच्याशी देखील असे ‘तुकाकमि’ किस्से घडले असतील तर झरूर शेअर करा.
- कु ऋ
मस्त किस्से !!!
मस्त किस्से !!!
अगदी कालच रस्त्याने जाता जाता
अगदी कालच रस्त्याने जाता जाता एक मित्र भेटला.
काय चालूये वगैरे चौकशी सुरू केली. मग अगदी अनपेक्षित पणे गाडी चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्ट वर चांगल्या पगारावर आहेस की पासून लग्न कधी करणार मग आता... झालं की वय पासून मग तू जॉब करणार का लग्नानंतर? मग तुझं घर कोण सांभाळणार? तुला स्वयंपाक नाही येत का मग तुमच्या घरी स्वयंपाक कोण करणारपर्यंत येऊन थांबली तेंव्हा अगदी मनापासून मनातल्या मनात मी हेच ओरडले.
रच्याकने माझ्या भावाल - मिळाला का जॉब? गर्लफ्रेण्ड पण आहे का? घरचे पण राजी झालेत का? मग आता लग्न कधी करणार या प्रश्नाने उबग आणलाय आजकाल. बिचारा असच ओरडत असतो मनात.
थँक यू, भरत मयेकर. माझ्या
थँक यू, भरत मयेकर.
माझ्या बाबतीत घडलेले किस्से.
(No subject)
रीया, मनातल्या मनात ? १.
रीया, मनातल्या मनात ? १. तारीख ठरली की पहिली पत्रिका तुलाच. २ का? तू दुसरा जॉब शोधतो आहेस का? किंवा सरळ, तुला काढलं कमावरून आणि दुसरा जजॉब...मग ३ आणि ४ जमेल का तुला ? किती घेशील? असं विचारायचं. तो पडला की जस्ट किडिंग म्हणायचं.
ललिता आणि मयेकर धन्यवाद
ललिता आणि मयेकर धन्यवाद ..
माझ्या बाबत हे नेहमीच होते
भरतदादा, मी आजकाल अनेकांना
भरतदादा, मी आजकाल अनेकांना हिच उत्तरं देते पण काही लोकं फार जवळचे नसतात अन् फार परकेही नसतात अशांचं काय करावं कळत नाही मग त्यांना इग्नोर मारते मी.
आता हा मित्र काही इतक्यात परत भेटायचा नाही मग कुठे नादी लागाम्हणुन इग्नोरला त्याला आणि चटकन पळाले तिकडून
Aiyyaaaa...runmesh parat ..
Aiyyaaaa...runmesh parat ..:) bt really bare vatle tumcha dhaga bagun ...baki kisse mastach..specially १st vala
मला जेव्हा लग्न झाले नसताना
मला जेव्हा लग्न झाले नसताना कुणी विचारायचे पेढे कधी? तेव्हा मी हेच सांगायचे की घरी आहेत, आता आलात तरी देईन.
Pages