निखारा

Submitted by जव्हेरगंज on 20 February, 2016 - 08:30

कधीमधी पाऊस यायचा. मग जरा अडचणच व्हायची. लाकडं पेटत नसायची. पत्र्याचं शेडपण गळकं. वाऱ्याच्या झोतानं पाऊस आत यायचा आन पाण्याचा फवारा शिपडून जायचा. येवढी मेहनत करुन पेटवलेली लाकडं मग विझायची. राकेलचा आख्खा ड्रम मग उपडा करावा लागायचा. रातभर तसंच बसून राहावं लागायचं. पाऊस उघडला की मग पुन्हा सुकी लाकडं आणून पेटावायला लागायची. रात गेली तरी चालंल पण मढं समदं जळलं पाहीजे. त्याशिवाय सुट्टी न्हाय. थंडीवाऱ्यानं हाडं खिळखीळ करायची. मग गांज्या मारावा लागायच्या. त्याच्या नशेत सगळं स्मशान डोक्यात घुमत राहायचं. अनंतकाळ.

येरवाळी बरं असायचं. राती नऊ-दहालाच सराण पेटवून देऊन खोपट्यात निवांत पडायला मिळायचं. आख्खी संत्रा नीट मारुन रात झिंगून जायची. आम्लेट पावाशिवाय तिथं खायला बी काय मिळायचं न्हाय. न्हाय म्हनायला एक घोंगडं पांघरलेला माणूस तिथं येऊन मक्याची कणसं विकायचा. या वैरान जागी मी एकटाच त्याचं गिऱ्हाईक होतो. पण तरीही यायचा.

कित्येक रात्री तशा शांतच असायच्या. प्रेताची धग घेऊन गुरफटून जायच्या. कुणी आलाच एखादा नातलग तर त्याच्या गगणभेदी आक्रोशाला सलाम ठोकायच्या. मुक्कामाच्या गावाला जाता जाता मला मात्र त्या आपल्याच वाटायच्या.

त्यादिवशी मी सकाळी उठलो. ऊन जास्तच होतं. नेहमीच असतं. सुर्य उगवायच्या आत मला एकदा ऊठून बघायचयं. पहाटेचा गारठा डोळ्यात साठवायचाय. तांबूस किरणांची रांगोळी मी कधी बघितली नाही. पण कितीबी वेळा जाग आली तरी ऊठणं झालं नाही.
लिंबाच्या दोन-चार काड्या तोंडात टाकून नदीकडं गेलो. आंघोळ केली. गार पाण्यात रातीची ऊतरायची. पापंसुद्धा. सोन्यानाण्याचं किडूकमिडूक काढून घेणं हिच आमची पापं. त्या पापात आम्ही जगणं शोधतो. मरणाला चार दिवस पुढं ढकलतो. हे अखंड बेवारशी मृत्यू आमच्या जगण्याचं साधन आहे.

पोलिस कधीमधी शे-दोनशे देतात. ती मजूरी आहे.

आंघोळ करुन टेरिकोट चा डगला घातला. कोस दोन कोस चालत जाऊन महुदाच्या टपरीवर एक कप चहा कसाबसा पोटात ढकलला. आणि माझा दिवस सुरु केला. मग डांबरीवरच्या फळकुटावर ऊगंच बसून राहिलो. या आडवळणाच्या जाग्यावर म्हटलं तर वर्दळ तशी नव्हतीच. सकाळपासून भरतीसाठी थांबलेलं एक जिपडं निघायच्या तयारीत ऊभं होतं. काय मनात आलं आन मी पण जाऊन बसलो. डायवर म्हणाला, " काय रे बेवड्या, लय कमाई झालीय वाटतं तुझी?"
मी गप बसून राहिलो. धातूरीला आधनंमधनं चक्कर व्हायची पण आजकाल जरा कमीच. ह्या डायवरनं मला बरोब्बर वळाखलं हुतं. पंधरादिवसाखाली याच्यासारखाच एकजण आला होता तिकडे. त्याची बायली हमसून हमसून रडत होती. मोठ्या पोरानं जेव्हा अग्नी दिला तेव्हा त्याची दातखिळ बसली होती. समदी निघून गेल्यावर राखेत काळवंडलेलं बदाम मी शोधून काढलं होतं. तेव्हा या डायवरनं बघितलं होतं.
कधीकधी काहीतरी अतर्क्य घडतं. माणसाला कळतच नाही की तो मेलाय. हा डायवर ही यातलाच असावा. पंधरादिवसाखाली यालाच अग्नी दिला होता. मात्र हा अजुनही भटकतोय. अगदी माणसासारखा राहतोय. हा माझा भ्रम आहे की मनातले गोंधळलेले विचार. असे विचार मी लगेच झटकून टाकतो. नाहितर मी वेडा होऊन जाईन.

धातूरीला ऊतरुन किडूकमडूक विकलं. पाचशे आलं. खिशातले शंभर. म्हणजे सहाशेची बेरीज लागली. बऱ्याच दिवसांनी खिसा फुगल्यासारखा वाटला.

मग आण्णाच्या खानावळीत जाऊन वशाड खाल्लं. दारु मात्र पिलो नाही. येताळबाबाच्या पाठीमागं मग झाडाखाली आंग टाकून दिलं. पार ऊन्हं उतरोस्तर झोपलो. पैसं आलं की जीवाची चैन होते.

जेव्हा जाग आली तेव्हा आकाशात तांबूस किरणांची रांगोळी दिसली. पहाटेची नाही किमान संध्याकाळची तरी पाहिली.

येता येता बाजारात फिरुन पावशेर तंबाकू आन दोन बिंडेल बीड्या घेतल्या. दारुतर महूदातबी मिळंल. गांजा शिल्लक होता.

परत यायला जरा ऊशीरंच झाला. बरीच रात झाली होती. त्यात पाऊस सुरु झाला. पाऊस आला की जरा अडचणच होते. लाकडं भिजून जातात. मढ लवकर जळत नाही. मग रात टाकावी लागते. भुतं दिसायला लागतात. त्यात त्या ताज्या प्रेताचं भुत मानकुटीवरच बसलेलं असतं. मग गांज्याशिवाय झोप लागत नाही.

पाय ऊचलत घाईघाईनं खोपट्यात शिरलो. कधीही एखादं प्रेत इथं येऊ शकतं. लाकडं फारीनं झाकून ठेवायला लागतील. कसंबसं माचीस शोधलं अन दिवा पेटवला. अन बघतोय तर काय एक म्हातारा कुडाला लागून अस्ताव्यस्त पडलाय. माझ्याच पोतडीवर. गतप्राण.

मी हताश होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. पुढे काय आणि कसं करावं हेच मला कळेना. त्याच्या अंगात टेरिकोटचा डगला होता.

ही रात जीवेघेणी. त्यात पाऊस आलेला. आन लाकडंही भिजलेली....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट.. शेवटचा ट्विस्ट जबरीच.
गार पाण्यात रातीची ऊतरायची. पापंसुद्धा>> असली छोटी पण परिणामकारक वाक्यं सॉलीड पेरता तुम्ही !

मस्त!

बापरे Sad

ही सुद्धा आवडली.. काल रात्रीच वाचलेली.. मोबाईलवरून प्रतिसाd द्यायाा आळ्स केलेला..

जबरी!

गार पाण्यात रातीची ऊतरायची. पापंसुद्धा>> असली छोटी पण परिणामकारक वाक्यं सॉलीड पेरता तुम्ही ! >>> सहमत.