गोपाळांचा मेळा - ५ मार्च २०१६पर्यंत मुदत वाढवली आहे

Submitted by संयोजक on 15 February, 2016 - 02:13

नमस्कार छोट्या दोस्तांनो,

तुम्हांला माहीत आहे का? २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण मायबोलीकर दरवर्षी छान उपक्रम राबवत असतो आणि मोठ्या मायबोलीकरांबरोबर तुम्हीही त्याला नेहमीच छान छान प्रतिसाद दिला आहे. काय मग, यावर्षीही घेणार ना भाग? चला मग, लागा तयारीला. पहा बर यातलं काय काय करायला आवडेल तुम्हांला...

त्याआधी थोडंसं -

हे वर्ष श्री. गो. नी. दांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. कोण आहेत हे गोपाल नीलकंठ दांडेकर? काढा बरं माहिती. शोधा त्यांची पुस्तकं. कारण यावर्षीचा आपला मराठी भाषा दिवस आपण गोनीदांना सादर समर्पित करत आहोत. उपक्रमात सहभागी होताना थोड्या कल्पना गोनिदांकडूनसुद्धा घ्या.

सर्व बालगोपाळांना मराठी दिनाच्या कार्यक्रमाचे म्हणजे गोपाळांच्या मेळ्याचे आग्रही आमंत्रण.

१) 'बोलु कौतुके' - वयोगट २ - ७

बया दार उघड- पोवाडा / गोंधळ / भारुड / मनाचे श्लोक यांचे गायन
हर हर महादेव - ऐतिहासिक कथाकथन

२) 'आनंदवनभुवन' - वयोगट ८ - १४

छंद माझे वेगळे - आपल्या छंदाबद्दल स्वहस्ताक्षरात लेखन
माझे दुर्गभ्रमण - स्वतः पाहिलेल्या किल्ल्याबद्दल / भटकंतीबद्दल स्वहस्ताक्षरात वर्णन
माझी उन्हाळी-सुट्टीगाथा- उन्हाळी सुट्टी कशी घालवली / काय काय मज्जा केली याचे स्वहस्ताक्षरात लेखन

'बोलु कौतुके' - नियम -

१. केवळ मायबोलीकरांच्या पाल्यांना या श्राव्य कार्यक्रमात भाग घेता येईल.

२. या उपक्रमासाठी प्रवेशिका पाठवताना मायबोलीचा आयडी आवश्यक आहे.

३. या उपक्रमांतर्गत मुलांनी 'बया दार उघड'मधील एका प्रकाराचे गायन करायचे आहे किंवा 'हर हर महादेव'मधील गोष्ट सांगायची आहे आणि त्याचे ध्वनिमुद्रण आम्हांला पाठवायचे आहे.

४. ध्वनिमुद्रण संयोजकांकडे बुधवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१६पर्यंत पोहोचले पाहिजे.

५. ध्वनिमुद्रणाच्या कालावधीसाठी किमान मर्यादा नाही, पण कमाल मर्यादा ५ मिनिटे आहे. या मर्यादेपेक्षा थोड्या जास्त कालावधीचे ध्वनिमुद्रण पाठवण्यास हरकत नाही.

६. ध्वनिमुद्रण पाठवताना सोबत गायनप्रकार / कथेचे नाव, कवीचे नाव, स्वतःचा मायबोली आयडी, भाग घेणार्‍या पाल्यांची नावे आणि वय व ध्वनिमुद्रणाचा कालावधी हे तपशील नमूद करावेत.

७. 'हर हर महादेव'मधील गोष्ट ही कुठल्याही पुस्तकातून जशीच्या तशी घेतलेली नसावी. 'बोलु कौतुके'मधील गायन हे पारंपरिक साहित्याचेच असावे.

८. प्रवेशिका मराठी भाषा दिवस २०१६च्या चार दिवसांच्या सत्रांत संयोजकांतर्फे मायबोलीच्या यूट्यूब वाहिनीवर प्रकाशित केल्या जातील.

९. एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकतो.

प्रवेशिका कशी पाठवाल?

१. प्रवेशिका संयोजकांना sanyojak@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करणे अपेक्षित आहे.

२. ई-मेल पाठवताना 'बोलु कौतुके' असा विषय लिहावा.

विशेष सूचना -

ध्वनिमुद्रण पाठवताना प्रताधिकारांची काळजी घेणे आवश्यक आहे. गोष्ट किंवा गायन यांना प्रताधिकार लागू असेल, तर त्यासाठी रचनेचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्या व्यक्तींची (लेखक / कवी आणि प्रकाशक ) लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

'आनंदवनभुवन' - नियम -

१. ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

२. हा उपक्रम फक्त मायबोली सदस्यांच्या पाल्यांसाठीच खुला आहे.

३. मायबोली सदस्यांच्या मित्रमंडळींच्या / नातेवाइकांच्या पाल्यांना यात भाग घ्यायचा असल्यास त्यांच्या पालकांना मायबोली सभासद व्हावे लागेल.

४. उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१६' या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

५. या उपक्रमात दिलेल्या विषयांपैकी एक विषय निवडून त्याबद्दल लिहिणे अपेक्षित आहे.

६. एकापेक्षा जास्त विषयांवर लिहिल्यास स्वागत आहे.

७. दिलेल्या विषयावर मराठीतूनच स्वहस्ताक्षरात पाल्याने स्वत: लिहायचे आहेत. शुद्धलेखनासाठी पालकांची मदत घेतल्यास हरकत नाही, तसेच पालकांनी मुलांकडून गिरवून घेतले तरी चालेल.

८. पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे, पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.

९. हा उपक्रम २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१६पर्यंतच खुला आहे.

या उपक्रमांतर्गत लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना -

१. या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१६ या चार दिवसांतच काढावेत.

२. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१६' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल.

४. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -

आनंदवनभुवन (क्रमांक) - - पाल्याचे नाव व वय

५. विषय या चौकटीमध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

६. 'शब्दखुणा' या चौकटीमध्ये 'आनंदवनभुवन - मराठी भाषा दिवस २०१६' हे शब्द लिहा.

७. मजकुरात पाल्याने केलेले लेखन स्कॅन करून अपलोड करावे.

८. हा धागा कृपया सार्वजनिक करा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१६' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

Fakt manaache shlok bolaayache aahet ka? Itar shlok chaalanaar nahit ka

.

खास लोकाग्रहास्तव या उपक्रमाची मुदत शनिवार, ५ मार्च २०१६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.