साबुदाणा खिचडी फॅन क्लब

Submitted by टीना on 14 February, 2016 - 09:51

पेश है आपल्या सर्वांची (ज्यांची ज्यांची असेल त्यांनी हात वर करा रे) आवडती साबुदाण्याची उसळ्/खिचडी..

चतुर्थी म्हणु नका, एकादश्या घ्या, नवरात्री घ्या, हव तर रविवार (सोडून), सोमवार, मंगळवार, बुधवार (पण धरता का ?), गुरुवार, शुक्रवार, शनिवार धरणारे (म्हणजे उपासतापास करणार्‍या) सार्‍यांचीच आवडती ती ही साबुदाण्याची खिचडी..

ती कशापासुन बनते ते तिचे आहारातील चांगले वाईट स्थान इथवर सारे धागे दिसलेत मला पण फॅन क्लब दिसेना.. म्हणल आस कास ? ये धागा तो बनता ही है..
आता इथ जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे सलमान काय हाय, कस्सा हाय तरी त्याचे पंखे हायेच ना ? हायेच ना ? तस्सचं थोडूस साबुदाण्याचं हाय बघा.. वज्जेर कॅलरी का काय थे, उपयुक्तता म्हणाव तर अं अस म्हणत डोक्याले पार ताणेपर्यंत ताणा लागते पण तरी पाण्यात मुरलेली, गरम तेलात जिर्‍याच्या फोडणीत लाल हिरव्या मिरचीत ठसलेली, तळलेल्या आलुच्या काचर्‍यासंग, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटात, जोडीला लिंबाची फोड अन तळलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन सजलेली ती प्लेट दर उपासाले हाती पडावं म्हणुन हरेक माणुस मनोमन जप करतोच तस्सच...

तर इथं साबुदाणा खिचडी लव्हर्स चा कट्टा आपण सुरु करुया..
पयली मी..

तशे साबुदाण्याचे अजुनबी लय पदार्थ करता येतातच..
साबुदाण्याची खीर,
साबुदाणा वडे,
साबुदाण्याचे पापडं,
गेल्याबाजारी साबुदाण्याचा हलवा पन करुन टाका पण खिचडीची सर यातल्या कशालेच नाई म्हणजे नाई अस माजं सोच्च मत हयं.. तर जो जो या बाईचा (साबुदाण्याची खिचडी = स्त्रिलिंगी) पंखा असनं अन ज्याले ज्याले ती सार्‍या गुणदोषांसकट पसंत असन त्यानच तितक्याच सोच्च मनानं इथं हजेरी लावावी...

कृपया तिच्या दोषांचा पाढा इथं वाचु नये.. ती कोण हाय, कशी हाय सबकुछ हम जाणते हयं तरीबी, दिल क्या चीज है जानम अपनी जान इसके नाम करते है अशे डाय हार्ड फॅनच इथं येऊन या व्हॅलेंटाईन डे च्या पर्वावर काढलेल्या साबुदाणा खिचडी लव्हर्स च्या धाग्यावर तिच्या बद्दल असलेल प्रेम इथ व्यक्त करतीनं..

सोबत तिचा दिलखेचक फटू जो मीनं सोत्ताच्या कॅमेर्‍यान, सोत्ताच्या हातानं, सोत्ता कळ दाबुन (कॅमेराची..काय समजला)..आधी इटोबा न मंग पोटोबा म्हणत काल्ला तो देतायं..
भक्ताइनं भरपुर लाभ घ्यावा..

आरं काय राजेहो..
अँगल बिंगल काई पाहु नका..आरं प्रेम बगा प्रेम.. अन जोडीले समाजसेवा..पोटात भुकेचा आगडोंब उसयलेला अस्ताना त्याले चिमटा घेउन फक्त अन फक्त तुमाले दाखोता यावा म्हणुन तुमच्यासाटी काडलेला फट्टू..

नाइ नाइ .. माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका.. अज्याब्बात तिखट नवत्या त्या..तुम्ही निर्र उसळीवरं आपलं हे खिचडीवर कॉन्सन्ट्रेट करा..

शुद्द भाषेत लिवायच ठरुन परत गोल फिरुन बोली भाषेतच घसरली..जाउद्या लहान आहे म्हणुन सोडून द्या अन भाषेचा जांगळबुत्ता गोड मानुन घ्या.. तर चला चला चला रे...साबुदाणा खिचडी लव्हर्स..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी ऑस्सम फोटो!
मलाही साबु खिचडी भयंकर आवडते. मी जशी करते ती मला आवडते. मैं अपनी फॅन हूं Proud
अकु, अच्छा, हा 'तो' आप्पा नाहीये होय! पण या नव्या आप्पाची खिचडी भयंकरच मस्त आहे.
आमच्या मुलाच्या शाळेच्या कॅन्टीनमध्येही सात्विक सुंदर साखि मिळते. गॅदरिंगला आम्ही ठरवून तिकडे साखि खातो.
आणि बादशाहीची खिचडी!! वावा. अवनी कुठंय? Happy

मी आताशा नॉनस्टिक कढईत साखि करते. एकतर खाली चिकटत नाही आणि साबूदाणा कसाही असला तरी एकदम मऊसर होते आणि साबुदाणा गरगरीत फुगतो भारी. साबुदाणा उपसून चाळणीत ठेवते, म्हणजे तो जरासा सुकतो आणि खिचडी मोकळी होते. सढळ हाताने दाण्याच्या कूटाला साखिसाठी पर्याय नाही. या स्टेपला यायला मला जरा वेळ लागला होता Happy पण एकदा धीर करून घातलेच आणि रिझल्टात जो काय फरक पडला! वाह भई वाह! वर कोथिंबीर, लिंबू आणि ओला नारळ हवाच. यम्म!!

पुण्याहून मुंबईला जाताना एक्प्रेसवेवर लोणावळ्यानंतर दत्त (श्रीदत्त) स्नॅक्समध्ये अप्रतीम साखि मिळते.
तिथे आधी ही साखि पोटभर खायची. मग जागा उरली पोटात तर बटाटेवडा वडापाव कोथिंबीर वडी मागवायचं. खूप तिखट खल्ल्यावर गोड शिरा वा खरवस उत्तम मिळतोच. पण खिचडी बेस्टात बेस्ट असते तिथली.

मंजू, मस्त्त्त्त्त!

सुमेधा, तुझ्या आजेसासूबाईंची साखिची कृती उतरवून घेतलीये. आता पुढच्या वेळेला करताना इतके लाड करून करून बघणार.. धन्स गो बाये!

I hate sabudana khichdi..<< नो वंडर यु आर एस आर के फॅन!!!!! Wink

सुमेधाची कृती भारीये. तशीपण करून बघणार.

पुण्याहून मुंबईला जाताना एक्प्रेसवेवर लोणावळ्यानंतर दत्त (श्रीदत्त) स्नॅक्समध्ये अप्रतीम साखि मिळते.<<< होय, त्यासाठी बेलापूरवरून जेवण करून जरी निघालं तरी मला पनवेलला पोचेपर्यंत "प्रचंड भूक" लागायची. ड्रायव्हरचे वैतागवाणे लूक्स झेलत का होइना पण ती साखि खाऊनच पुढं जायचं.

मी पण फॅन आहे.

आमची आईआजीची पद्धत वेगळी आहे. दुसर्‍या दिवशी खिचडी खायची असेल तर,
-आदल्या दिवशी संध्याकाळी'च' साबुदाणा चाळणीत धूवून घ्यायचा वहात्या पाण्याखाली(म्हणजे तो खूप पाणी शोषणार नाही).
-ताक करायचं( जरासे आंबटच हवं मीठं घालूनच साबुदाणाच्या प्रमाणाने आणि खूप पातळ नको). घुसळलेल्या ताकात साबुदाणा भिजवायचा. पातेलं कलतं केलं की, जरासे अर्धं इंच वर ताक दिसले पाहिजे. तो रात्रीपर्यंत भिजतो. मग रात्री झोपायच्या आधी, तो साबुदाणा चाळणीत/रोवळीत निथळायचा व झाकून ठेवायचा.
-सकाळी बटाट्याच्या एक सारख्या चौकोनी आकाराच्या फोडी करायच्या. मिरची (हिरवी) अगदी बारीक न कापता मोठी दिसेल अशी कापावी. कडीपत्ता धूवून घ्यावा.
-जीरं घ्यावं आणि मग चाळणीतला झाकलेला साबुदाणा परातीत मोकळा पसरून त्यावर शें कूट सढळ हाताने घालावा. प्रत्येक साबुदाण्याला लागला पाहिजे कूट.
-फोडणी करताना, लोखंडी पसरट कढईत साजूक तूप(च) घालून, आधी मिरची मग जीरं तडतडलं की नंतर बटाटे खरपूस परतावे. मीठ जरास शिवरावं. आणि जरावेळ शिजवावे झाकण ठेवून.
-आता कडीपत्ता घालावा व सुक्या लाल मिरचीचा कूट(जी ज्यास्त तिखट नाही). बटाटा मस्त लागतो चवीला अश्याने. मग ढवळले की साबुदाणा घालावा. आणि आता आच मोठी करून कालथा खालून वर करावा; बटाटा तूटणार नाही ह्याची काळजी घेत. झाकण ठेवू नये. आणि मीठ घालायच नाहीये. साबुदाणा मीठाच्या ताकात भिजला असतो मस्त. ताकातील फॅटमुळे ज्यास्त तूप सुद्धा घालू नये. तो शिजतो पटकन. ५-७ मिनिटे परतून मगच झाकण ठेवून एक वाफ काढावी. वरून फक्त ओले खोबरं. हवीच असेल तर साखर आवडीप्रमाणे जो तो घेइल वाढताना.
बरोबर खमंग काकडी चोचवून परतून आणि सायीचं गोड दही(साखर किंचीत घालून).

साबुदाणा कसाही असो, खिचडी कधीच गिच होत नाही. टणक होत नाही. तेलकट सुद्धा होत नाही.

बादशाही Happy Happy
समस्त गरवारे स्टूडंट्सचं आराध्य दैवत आहे ते!! सह्याद्रीला नका देऊ तो मान
>> +९६३२५

आमच्याकडे विदर्भात म्हणजे निदान वाशिम, अकोला, कारंजा, अमरावती आणि आजूबाजूच्या खेड्यांमधे साखिमधे रगडलेली मिरी घालतात. मला मिरीयुक्त साखि प्रचंड आवडते पण मी हल्ली बर्‍याच ठिकाणी वाचले की साखि पेक्षा साबुदाण्याची खीर चांगली. मधे दिनेशदांनी सांगितले होते की साबुदाण्याच्याही आधी राजगिरा, वरई, शिंगाडा आला आहे. उपवासाला पोटासाठी म्हणून राजगिरा जास्त चांगला.

बी, हिच ती खिचडी..

मेधावि | 15 February, 2016 - 16:48

आत्ता आत्तापर्यंत असलेल्या माझ्या आजेसासुबाई काय खिचडी बनवत. एखाद्या तान्ह्या बाळाचे करावेत तसे लाड करायच्या अगदी त्या खिचडिचे...

रात्री साबुदाणा धुवून मग रोवळीत उपसून ठेवायच्या. दुसर्‍या दिवशी सकाळी चितळेच्या फुल फॅट दुधाचा हबका द्यायच्या त्यावर. मग मोठ्या लोखंडाच्या कढईत, घरी कढवलेल्या भरपूर तुपाची, जिरे व मिरच्यांचे लांब तुकडे ( हो, म्हणजे हवे तो खाईल व नको तो काढून टाकेल) घालून ( शिवाय थोडे जिरे, मिठ व मिरची खरंगटून)
मग त्यातच उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, त्याला तेवढ्यापुरतेच मिठ चोळून ( म्हणजे चव जिथल्यातिथे रहाते) मग झाकण ठेवून एक वाफ. तोवर सुरकुतलेल्या पण तुकतुकीत हातांच्या लाल-गोर्‍या बोटांनी थोडे सायीचे दही, मिठ, गोडसर चव येइल एवढी साखर, व भरपूर प्रमाणात घरचे दाण्याचे कूट (दाणे घरीच वाळूवर लालबुंद रंगावर भाजून, मग एकेक मुठ दाणे घेऊन त्याची अगदी निगुतीने साले काढून, खलबत्याने तयार केलेले कूट) एकत्र मिसळून मग ती खिचडी फोडणीस टाकायच्या. लोखंडी लांब दांड्याच्या उलथन्याने खरपूस होईपर्यंत परतून मग वरून परत थोडे साजूक तूप व नंतर खोबरे कोथिंबीर घालून वर लिंबाची चंद्रकोर ठेवून ती गुलाबी दिसणारी आंबट-गोड चवीची लुसलुशीत खिचडी सगळ्यांना मायेने खाऊ घालायच्या. आता नाही मिळणार तशी खिचडी.

मेधावि, कृती तर आहेच सुरेख पण त्यासोबत तू तुझ्या सासूबाईंबद्दल प्रेमाने जे काही लिहिले आहे ते फार आवडले. हवे तर एक ललित लिही त्यांची आठवण म्हणून. एका सुनेने आपल्या सासूंबद्दल लिहिलेले फार नाही आहे आपल्या मराठी साहित्यात. तेंव्हा तू नक्की लिहि. आणि लिंबाची चंद्रकोर शब्दप्रयोग फार आवडला. ग्रेट!!!

मॅगी, धन्यवाद Happy

मला पण अ‍ॅड करा या क्लबात.

ंमी आणि माझा नवरा कोणताच उपवास करत नाही. पण सा. खि. मात्र आवडीने खातो. नवरा तर साखि असताना दुसरे काहीही जेवत नाही. म्हणजे उपासवाल्या मेंबरांसारखी फक्त आणि फक्त खिचडीच, हेच जेवण.

साखि ही साजूक तुपातलीच. शेंगदाण्याचे कूट करताना त्यात थोडी हिरवी मिरची पण वाटते. फोडणीतही मिरच्यांचे तुकडे असतातच. पण दाण्याच्या कुटात वाटून टाकली की तिखट व्यवस्थित लागते आणी अगदी किंचितशी साखर.. अहाहा, बरोबर दही आणि काकडीची दही आणि दाण्याचे कूट घालून केलेली कोशिंबीर. वा !

एक मात्र नक्की. असं बोलू नये पण राहवत नाही म्हणून सांगतेच. गुजराती मंडळींनी केलेली नुसते अख्खे शेंगदाणे घालून केलेली रबरी साखि भयाण लागते. आमच्या ऑफिसात फूडकोर्टात संकष्टीला अशीच असते, तिच्याकडे ढुंकूनही पाहवत नाही.

सुमेधाच्या टीप्स भारी आहेत.

गुजराती मंडळींनी केलेली नुसते अख्खे शेंगदाणे >> बिचा-यांना माहित नाही ग.. पण इथे गाडीवर जी साखि मिळते ना ती मस्त असते. ते भिजवलेले साबुदाणे सुट्टे सुट्टे उकडून काढतात. - कसे ते राम जाणे. मग कोणी गिहाइइक आल की मोठ्या पातेल्यातले साबुदाणे (बहुतेक दाकू इ. असते वाट्ट) एका प्लेटात घेतात. वर बटात्याचा सळ्या, ब. चा खमंग चिवडा, इ.इ. घालून लि>बू पिळून डाळिंब दने इ. कोथमिर इ.इ. घालून देतात. झणझणीत पण बरी लागते...

ती गुजराती साखि मी खाल्लीये एकदा. माझी अहमदाबादची असिस्टंट होती एक. तिने केली होती. साबुदाणा, अख्खे शेंगदाणे, भरपूर साखर आणि उलीसं मीठ असं मिक्स करून तुपात परतलं होतं.. हरे राम भयाण टेस्ट होती.

साबुदाणा, अख्खे शेंगदाणे, भरपूर साखर आणि उलीसं मीठ असं मिक्स करून तुपात परतलं होतं.. >>>>> अग्ग्बया!

ते भिजवलेले साबुदाणे सुट्टे सुट्टे उकडून काढतात>> साबूदाना भिजवून ओल्या जाड फडक्यात चार पाच तास बांधून ठेवला की प्रत्येक दाणा फुगून साखि अगदी मोकळी होते हा माझा स्वानुभव आहे. ही टिप खूप पुर्वी सव्यसाचिने दिली होती जुन्या माबोवर.

फॅन क्लब मध्ये add कराव एवढी नाही आवडत पण आवडते.
मेधाच्या रेसिपितील आधी दही घालण्याचा प्रयोग करून बघावा.
देविकाचा पण ताकात साबुदाणा भिजवणे इंटरेस्टिंग वाटतंय

गुजराथी लोकं साबुदाणा भिजला की त्यात सगळं चवीढवीचं एकत्र करून ढोकळ्यासारखं वाफवून घेतात, म्हणून त्यांची खिचडी छान सुट्टी मोकळी असते.
मायक्रोवेवमध्ये तीच प्रक्रिया होते खिचडीवर.

आई साबुदाण्याची खिचडी करताना ताकाचा हबका मारते. साबुदाणा खिचडीवर उपासाची शेव घालते मी बऱ्याचदा. छान लागते. बहुतेकदा आमच्याकडे उपासाला ही खिचडी आणि भोपळ्याचं भरीत. कधी कधी बटाटा पापड, चिकवड्या त्याच्याबरोबर.

मी खिचडीत साखर घालत नाही, आई घालते. नवऱ्याला साखरेचा डबा जवळ देते. हवी असल्यास घाल.

मस्त.
साबूदाणा थालिपीठ आणि बटाटा साबूदाण चकल्याही इतक्याच आवडतात.
पण हल्ली यातले सगळेच सिनफुल म्हणून कमी खाल्ले जाते

Pages