अवधूत (भाग २)
डोक्यात असं विचारचक्र चालू असतानाच अचानक वरून येणार्या घंटेच्या टण् टण् आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. आरती सुरु झाली वाटतं! त्याची पावले नकळत वेगाने चालू लागली. आत्ताशी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ सुरु झालं होतं. आईची आरती थोड्याच वेळात चालू होईल, त्याच्या आत पोहोचावं, असा विचार करून भराभर पाय उचलू लागला.
थोड्याच वेळात तो मंदिराच्या गर्भगृहात पोहोचला. समोर जगदंबेची भव्य मूर्ती उभी. त्याने नम्रपणे नमस्कार केला. फुलांचा द्रोण पुजारीबाबाकडे दिला. कुणा धनिकानं दीपदान सोहळा केलेला होता. देवीपुढे गाभा-यात एकशे आठ साजूक तुपाची निरांजनं तेवत होती. असं वाटत होतं की जणू एका नाजूकशा झाडावर सोनचाफ्याची शेकडो फुलंच उमललेली असावीत. सर्व गाभारा व मंडपभर धुपाचा दरवळ भरून राहिलेला. भक्तांनी अर्पण केलेली नाना प्रकारची फळे, फुले, नैवेद्य, अगरबत्त्या या सर्वांचा एक संमिश्र असा वास तेथे भरून राहिलेला होता. फार फार आवडायचा त्याला तो वास. घंटेचा टणटण आवाज, भक्तांचा गंभीर आवाजात आरती गाईल्याचा स्वर, धुपाचा पवित्र दरवळ, निरांजनांचा सौम्य प्रकाश, त्यात मंदमंद उजळून निघालेली जगदंबेची भव्य मूर्ती! एका वेगळ्याच विश्वात हरवल्यासारखं झालं त्याला.
आरती संपली. महानैवेद्य देवीसमोर झाकून ठेवण्यात आला. धनिक महाशय सर्वांना प्रसाद वाटत फिरू लागले. याच्यासमोरही आले. या तेजस्वी साधूला पाहून नमस्कार केला. “ महाराज, सर्व काही आहे. पण मनाला शांतता नाही. जगदंबेचं दर्शन कसं होऊ शकेल काही उपाय सांगाल?” तसा हा चटकन मागे सरला. “अजून मला तो अधिकार नाही.” हातातला प्रसाद मुठीत घट्ट धरून तसाच वेगाने गड उतरु लागला. डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. अजून किती करायचा शोध तिचा? वेड्यासारखं घरदार सोडून सतत अकरा वर्षं शोध करतोय. आईला अजून अजिबात कणव येऊ नये?
आज पुन्हा गावाकडे वळलाच नाही. लहान मुलासारखा स्फुंदत स्फुंदत मार्कंडेय पर्वत चढू लागला. आताशा वाटेचं भानच नव्हतं. डोक्यातली प्रचंड वावटळ काहीच सुचू देत नव्हती. वर पठारावर कधी आला तेही कळलं नाही त्याला. धपापलेल्या उराने जेव्हा खाली बसला तेव्हाच त्याला आपल्या कष्टांची, भुकेची जाणीव झाली. पण मनातला उद्रेकही तेवढाच जोरदार होता. माझ्या कष्टांची काहीच जाणीव नाही? माझी काहीच किंमत नाही तुझ्या दरबारात? डोक्यात जणू तुफानच सुटलेलं होतं.
समोरचं चांदणं हळूहळू मंद दिसू लागलं. भुकेनं गुरगुरणारं पोट पावसात भिजलेल्या कुत्र्याप्रमाणं हळूहळू आकसत आकसत पाठीच्या आश्रयाला जाऊन निजलं. कधीतरी त्याला देखील झोप लागली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक? पण कुणीतरी त्याला हलवून जागं करत होतं. घट्ट मिटलेले डोळे ऐकायला तयार नव्हते. पण सुग्रास अन्नाच्या घमघमीत वासानं निद्रेवर मात केली. डोळे चोळत, धडपडत काप-या हातावर शरीराचा भार देऊन तो उठून बसला. मघाचाच धनिक, आणखी कुठल्यातरी माणसासह! त्या माणसाच्या हातात भोजनाची थाळी होती. बहुतेक सेवक असावा. त्या दोघांनी त्याला थोडं खाऊन घ्यायचा आग्रह केला.
अर्धवट निद्रावस्थेत वरणभाताचा पहिलाच घास घेतला असेल, तेवढ्यात बांगड्यांचा किणकिण असा आवाज येऊ लागला. बाईमाणूस तर कुणी नाहीये इथं. मग हा आवाज कुठून येतोय? असो, अतिशय श्रीमंत माणसाच्या घरचं अन्न असणार! भोजनात तुपाचा सढळ वापर. जास्त काही खाता येणार नव्हतं त्याला. अनेक दिवस अतिशय साध्या अन्नावर राहिलेल्या त्याला तसलं अन्न जास्त खाणं त्रासदायक ठरलं असतं. थोडंसं खाल्लं असेल नसेल, डोळ्यावर झोप इतकी प्रबळ झाली, की तो तिथेच आडवा पडला. समोरचं चांदणं आणि ती दोन माणसं अस्पष्ट अस्पष्ट होत गेली.
सकाळी सूर्याच्या तप्त किरणांनी जाग आणली. उठून बघतोय तर त्याच्या अंगावर कुणीतरी शाल ओढून ठेवलेली. नक्कीच तो धनिकच असणार. काय पाहिजे असेल त्याला माझ्याकडून? मी स्वतःच फाटका. याला काय देऊ? दोन तीन दिवसांनी बरं वाटल्यावर गड चढून देवीच्या दर्शनाला गेला. त्या धनिकाची शाल परत करणे हा देखील हेतू होताच. पुजारीबाबाला नमस्कार करून झाली हकिकत सांगितली. मोठमोठ्याने हसत पुजारीबाबा म्हणाला, “तो ढेरपोट्या शेटजी कशाला येतोय तुमच्यामागं तंगड्या तोडत? तो तर इथंच मनसोक्त भोजन करून, पुन्हा पालखीत बसून गड उतरून गेला. दुसरा कुणीतरी असेल हो! आणि ती शाल ठेवा तुम्हालाच. त्या अज्ञात माणसानं प्रेमानं दिली आहे. ठेवून घ्या.”
आश्चर्याने थक्क व्हायची वेळ होती! अगदी हलका पिसासारखा होत तरंगतच गड उतरला तो! त्या बांगड्यांचा किणकिण आवाज कुणाचा होता ते कळलं त्याला. आई स्वतःच आली होती. संशयच नाही. बाळ भुकेलं असेल तर आईला राहवेल का? माझी हाक तिच्यापर्यंत पोहोचू लागली तर! आता मी लांब नाही माझ्या ध्येयापासून!
(क्रमशः)
अवधूत(भाग-1) http://www.maayboli.com/node/57151
बाळ भुकेलं असेल तर आईला
बाळ भुकेलं असेल तर आईला राहवेल का? >>>>> केवळ ह्रदयस्पर्शी ....... ___/\___
धन्यवाद पुरंदरे साहेब...
धन्यवाद पुरंदरे साहेब...
छान चाललीय कथा!
छान चाललीय कथा!
mast
mast
khup chan
khup chan
वाचतेय!
वाचतेय!
मस्त वळण घेतलं.. लिहा लिहा..
मस्त वळण घेतलं.. लिहा लिहा.. वाचतेय
गुड गोईंग.. लिहीत रहा..
गुड गोईंग.. लिहीत रहा.. आम्ही वाचत रहातो.
सुंदर लिहिताय. पुलेशु.
सुंदर लिहिताय. पुलेशु.
सुंदर लिहिलंय अगदी ..
सुंदर लिहिलंय अगदी ..
आरे संपली का ??
आरे संपली का ??