अवधूत (भाग-१)
शारद पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने सारं जग भरून गेलेलं होतं. त्या प्रकाशात तारका अगदीच क्षीण दिसत होत्या. नेहमीच्या सरावाने त्याची पावले त्या दुधाळ प्रकाशात गडवाटेवर पडत होती. जवळपास बारा वर्षांपासूनचा परिचित रस्ता. कधीही मनात लहर येईल तेव्हा जायचं जगदंबेच्या भेटीला गड चढून.
हवेत मंदसा प्रसन्न गारवा. वर्षाकाळात तरारून उगवलेल्या गवताचा आणि रानफुलांचा मादक सुगंध मात्र सगळीकडे दरवळत होता. कधी कुठे तरी एखाद्या चुकार रात्रिंचराची फडफड नाहीतर बाकी सर्व शांत शांत. मागे वळून पाहिलं तर खाली गावात घरोघरी लागलेल्या दिव्यांची नाजुकशी रांगोळी. पुढे वर पाहिलं तर आईच्या देवळातून बाहेर झिरपत येणारा समयांचा दिसणारा न दिसणारा असा मंदसा प्रकाश.
एरवी भयानक आकार धारण करणारी झाडेझुडुपे आज मात्र बरीचशी निरुपद्रवी वाटत होती. पलिता घ्यायची गरज नव्हती म्हणून त्याने उजव्या हातात पानांचा द्रोण धरून त्यात रानफुलं भरून आणलेली होती, त्याच्या आईच्या चरणांवर अर्पण करायला. डाव्या हातात स्वसंरक्षणासाठी म्हणा किंवा अवघड गडवाटेवर आधारासाठी म्हणा, एक लांब आणि जाडजूड काठी. कमरेला एक जुनाट मळकट भगवं वस्त्र राहिलेलं फक्त. केसांच्या कधीच जटा झालेल्या. अन्नाच्या आबाळीने शरीराची खोळ हाडाचा सापळा म्हणावी अशीच दिसणारी. पण मन मात्र एका अनोख्या शक्तीने भरुन गेलेलं. तीच शक्ती डोळ्यांतून डोकवायची, बोलण्यातून बाहेर पडायची आणि कृतीतून पण दिसून यायची.
पावलं नेहमीच्या सवयीने वाट चालत होती, पण मनात मात्र आईच्या मंत्राचा अखंड जप आणि डोक्यात असंख्य विचारांची आवर्तने. बारा वर्षांपूर्वीच त्यानं माणसांचं जग सोडून दिलं होतं. आता त्याच्या मनात कशालाच, कुणालाच काही स्थान उरलेलं नव्हतं. तसा पण तो लहानपणापासून बराचसा वेगळा. कुणाच्यात फारसं न मिसळणे, सतत कशाचा तरी विचार करणे, शून्यात नजर लावून बसणे यामुळे तो लवकरच इतर मुलांच्या चेष्टेचा विषय बनला. घरात देखील परिस्थिती फारशी बरी नव्हतीच.
त्याच्या एकलकोंड्या प्रवृत्तीला कंटाळून घरच्यांनी त्याची कुंडली इकडे तिकडे दाखवायला सुरुवात केली. बरेच जणांनी काहीतरी नेहेमीसारखी गुळमुळीत उत्तरं दिली. एक साधू मात्र फार वेगळा निघाला. त्या कुंडलीकडे आणि मग त्या मुलाच्या डोळ्यांत पहात तो उत्तरला, “हा पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट आहे. मागच्या जन्मीचा शोध पूर्ण करायलाच तुमच्या पोटाला आलाय. तुमचं याचं नातं फार थोडे दिवस! एके दिवशी सर्व काही टाकून देऊन त्याच्या ख-या आईबापाच्या शोधात निघून जाणार. याची काळजी करू नका. ती जगदंबाच करेल!”
हे ऐकून आईवडिलांना फारसा फरक पडला नाही. त्याच्या पूर्वीच जन्मलेली सहा भावंडं. ह्या एकट्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे? थोरला तर चांगल्यापैकी शेतीवाडी आणि गाईगुरांचं बघू लागलेला होता. दोन बहिणी देखील लग्नाच्या वयात आलेल्या. याला मात्र अत्यानंद झाला. माझा शोध पूर्ण होणार तर! मला आई भेटणार तर! काळ झपाट्याने बदलत गेला. वडील आता घरीच जास्त राहू लागले. थोरल्या भावंडांनी याच्याविरोधात कुरबुरी सुरु केल्या. आईबापांनी जबरदस्ती लग्नाचा घाट घातला. याला तर प्रपंच, पोरेबाळे वगैरे सांसारिक पाश पहिल्यापासूनच नको होते. एके रात्री कुणालाही कळू न देता घराबाहेर पडला तो कायमचाच!
काही दिवस सतत चालत राहिला. गावांमागून गावं. चेहे-यांमागून चेहरे. प्रश्नचिह्न, सहानुभूती, हेटाळणी आणि संशय यांनी भरलेले. दिलं कुणी अन्न तर खायचं नाहीतर आईवर विश्वास ठेवून पुढच्या गावाला चालू लागायचं. हळूहळू अंगावरील तारूण्याची रया पार निघून गेली. अन्न न मिळाल्याने शरीर कृश झालं. पोटाला देखील उपाशी राहण्याचीच सवय झाली. असाच चालत चालत एके दिवशी सप्तशृंगास पोहोचला. पायथ्याच्या वणी गावात रात्रीचा मुक्काम करून सकाळी गड चढून देवीच्या दर्शनास उपस्थित झाला.
तेव्हांपासून बारा वर्षं तिथेच राहतोय तो. त्या अद्भुत ठिकाणाच्या ओढीने त्याला पुन्हा कुठे जाऊच दिलं नाही. सप्तशृंगाच्या पुढे मार्कंडेयाचा डोंगर आहे. तिथेच याचा जास्तीत जास्त वेळ उपासनेत जायचा. दोनेक दिवसांनी भूक लागायची. मग आजूबाजूच्या पंचक्रोशीत फिरलं तर थोडीफार भिक्षा आयाबाया वाढायच्या. काहीच नाही मिळालं तरी मंदिरातील पुजारी केळी, खोबरं-खडीसाखर देत असे. कधी आईच्या दर्शनाची लहर आली की सप्तशृंगावर जायचं. एरव्ही अखंड नामस्मरण फक्त!
(क्रमशः)
छान सुरुवात आहे.
छान सुरुवात आहे.
छान झाली आहे सुरूवात.
छान झाली आहे सुरूवात.
छान झाली आहे सुरूवात.
छान झाली आहे सुरूवात. >>>>+१११११
धन्यवाद...
धन्यवाद...
पुढील भाग लवकर येऊद्यात ....
पुढील भाग लवकर येऊद्यात ....
व्वा...सुन्दरच आहे लिखाण!
व्वा...सुन्दरच आहे लिखाण! अजुन येउ द्या...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
@ पुरंदरे शशांक आणि
@ पुरंदरे शशांक आणि वेल....
धन्यवाद... टाकतो पुढील भाग लवकरच...
छान लिहीलंय. 'मायबोलीवर
छान लिहीलंय.
'मायबोलीवर स्वागत ' ग्रूप डिसिलेक्ट करून 'मायबोली कथा कादंबरी' ग्रूप सिलेक्ट करा.
स्वागत ग्रूपात नवखे लिहितात शक्यतो.
तुम्ही तर छान लिहिणारे दिसता.
पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा!
धन्यवाद सातीताई...
धन्यवाद सातीताई...
विजयजी, हीच कथा संपादनात जाऊन
विजयजी, हीच कथा संपादनात जाऊन आपण योग्य त्या ग्रूपात हलवू शकता.
काही लक्षात येईना नीट.
काही लक्षात येईना नीट.
छान सुरूवात. कथा जोरदार
छान सुरूवात. कथा जोरदार असेल असे वाटतेय.
विपु, तुमच्या विपूत लिहिते
विपु, तुमच्या विपूत लिहिते थांबा जरा.